माहितीचा अधिकार (लोकमित्र करिता लेखाचा एक प्रयत्न)

आजच्या "स्टेट्समन्"च्या संपादकीयामधील एक लेख वाचला. पश्चिम बंगालच्या सरकारबद्दल भारताच्या "प्रमुख माहिती अधिकार्‍याने" काही गंभीर स्वरूपाची विधाने केली आहेत. या राज्यातील बाबूलोक लोकांना सहजासहजी माहिती देत नाहीत, शेकडो लोकांचे अर्ज महिनोन् महिने पडून आहेत , आणि हे सर्व बेकायदा आहे.

वाचा : http://www.thestatesman.net/page.news.php?clid=3&theme=&usrsess=1&id=200983

ही बातमी वाचताना जाणवले : "प्रमुख माहिती अधिकारी " म्हणजे कोण ? नक्की कशाबद्दलची विधाने आहेत ही ? तर , हा सगळा मामला आहे , "माहितीच्या अधिकारा"संदर्भात. (Right To Information Act)

भारतामधे "माहितीच्या अधिकाराचा कायदा"( म्हणजे Right to Information Act , कायदा क्रमांक २२/२००५) २००५ साली अस्तित्त्वात आला. या कायद्यान्वये , कोणत्याही भारतीय नागरिकाला केंद्रशासनाच्या किंवा कुठल्याही राज्याच्या सरकारातील कोणत्याही कागदपत्राची प्रत मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला. ज्या कुठल्याही सरकारी संस्थेकडे अशा माहितीकरता अर्ज पाठवला असेल त्या संस्थेला ३० दिवसांच्या आत त्याला उत्तर देण्याची जबाबदारी या कायद्यामुळे निर्माण झाली. या कायद्याच्या एका कलमाप्रमाणे , ही माहिती सामान्य नागरिकाना विनासायास मिळावी म्हणून , प्रत्येक शासनसंस्थेला आपली कागदपत्रे संगणकीय व्यवस्थेमधे रूपांतरित करणे बंधनकारक बनविण्यात आले आहे.
जी माहिती बाहेर पडल्याने देशाच्या सुरक्षिततेला आणि सार्वभौमत्वाला धोका पोचेल अशा प्रकारच्या माहितीला या कायद्याच्या अंमलातून वगळण्यात आलेले आहे.

२००२ ते २००४ मधे अशा स्वरूपाचे कायदे काही राज्यांच्या विधिमंडळांमधून संमत करण्यात आले. या राज्यांमधे महाराष्ट्राचाही समावेश होतो. हे कायदे संमत झाल्यावर , दिल्ली आणि महाराष्ट्र या राज्यांमधून त्यांचा वापर जास्तीत जास्त नागरिकांनी केला , याचा , महाराष्ट्रीय म्हणून आपल्याला अभिमान वाटायला हवा.

या कायद्याचे विधेयक २२ डिसेंबर २००४ रोजी लोकसभेपुढे सादर करण्यात आले. प्रचंड मतमतांतरे , वादविवाद झडल्यानंतर , मूळ मसुद्यामधे सुमारे १०० बदल घडल्यावर जून २००५ मधे हे विधेयक संसदेमधे मंजूर झाले.

भारतीय विधानातील प्रमुख घटक म्हणजे प्रशासनव्यवस्था , राज्यकर्ते , आणि न्यायव्यवस्था. हे तीन्ही घटक या कायद्याच्या अधिक्षेत्राखाली येतात. ज्या ज्या संस्था, पदे , यंत्रणा सरकारच्या मालकीच्या , सरकारच्या नियंत्रणाखालच्या , सरकारकडून चालविल्या जाणार्‍या , सरकारकडून आर्थिक मदत घेणार्‍या असतील त्या त्या सर्व या कायद्याखाली येतात. आणि ज्याची नोंद करावी अशी , महत्त्वाची गोष्ट म्हणजे , ज्या ज्या सरकारी संस्थांचे , उद्योगांचे खाजगीकरण झाले आहे , ज्या ज्या खाजगी संस्था सरकारने लोकोपयोगी कामाकरता नेमलेल्या आहेत, ज्याना ज्याना सरदेतेआपल्या उपयोगाकरता पैसे देते आणि त्यांच्याकडून सेवा किंवा वस्तू खरेदी करते, त्या सर्व संस्था आणि कंपन्याही या कायद्याखाली येतात !

या कायद्याच्या अधिक्षेत्राखाली येणार्‍या प्रत्येक सरकारी संस्थेने आपापला "सार्वजनिक माहिती-वितरण अधिकारी" नेमावा असे ठरले. कुठल्याही भारतीय नागरिकाला , कागदी किंवा संगणकीय माध्यमातून , या अधिकार्‍याकडे माहितीकरता अर्ज देता येईल. संस्थेच्या योग्य त्या विभागातून माहिती उलपब्ध करून देण्याची जबाबदारी या अधिकार्‍याची राहते. जर विचारलेल्या माहितीचा काही भाग (किंवा संपूर्ण माहिती) दुसर्‍या सरकारी संस्थेच्या कक्षेखाली येत असेल , तर माहितीचा अर्ज त्या त्या संस्थेकडे देण्याची जबाबदारीही या अधिकार्‍याचीच. या अधिकार्‍याला आपले कार्य कुशलतेने पार पाडता येण्याकरता त्याचा मदतनीस अधिकारी नेमण्याचे बंधन सुद्धा या कायद्याने लागू होते. मदतनीस अधिकार्‍याची जबाबदारीसुद्धा प्रमुख अधिकार्‍यासारखीच असते.

माहिती विचारणार्‍या नागरिकास , माहिती विचारण्यामागचे कारण सांगण्याचे बंधन नाही. सरकारी संस्थाना ३० दिवसात ही माहिती देण्याचे बंधन आहे. एखाद्या सरकारी सुरक्षा व्यवस्थेने मानवी अधिकारांचा भंग केल्याबद्दलची माहिती किंवा नागरिकांच्या जीवनमरणाचा प्रश्न जिथे उद्भवत असेल तर त्या संदर्भातली माहिती या सर्व गोष्टी या कायद्याच्या कक्षेमधे येतात.

माहिती मिळवण्यासाठी नाममात्र शुल्क आहे. माहिती देण्यास नकार दिला गेला किंवा विलंब लावण्यात आला तर त्या त्या व्यक्तिवर कायदेशीर कारवाई होऊ शकते.

या कायद्याचा उपयोग जास्तीत जास्त लोकाना करता यावा म्हणून सरकारी संस्थांनी शैक्षणिक कार्यक्रम राबवावेत , सरकारी अधिकार्‍यांनी लोकांपर्यंत माहिती पोचवावी, "माहिती अधिकार्‍यांची " नावे , त्यांचे पत्ते , दूरध्वनि वगैरे लोकांना वेळोवेळी कळवावेत अशा स्वरूपाचे विधेयकही संमत करण्यात आले आहे.

या कायद्याबद्दलची अधिकृत माहिती :
http://persmin.nic.in/RTI/WelcomeRTI.htm

या कायद्याबद्दल माहितीची देवाणघेवाण करणारा चर्चागट :
http://groups.yahoo.com/group/rti_india/

या विषयावरील ब्लॉग् :
http://right2information.wordpress.com/

Comments

माहितीचा अधिकार- एक सवलत

माहिती अधिकार वापरण्याची मुभा ही एक दिलेली सवलत आहे. माहिती मिळण्याची शक्यता या अधिकाराद्वारे निर्माण होते. माहिती अधिकार तुम्हाला न्याय देत नाही .मिळालेल्या माहितीच्याद्वारे तुम्ही न्याय मागु शकता. माहिती अपुरी ,संदिग्ध, सदोष असेल तर तसे सिद्ध करण्याची जबाबदारी ही पुन्हा माहिती मागणार्‍याचीच. पुण्याचे माहिती आयुक्त विजय कुवळेकर हे दै.सकाळचे माजी संपादक. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट मधे पत्र कारितेच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना अनेक मनोरंजक किस्से सांगितले. ते म्हणाले कि एकवेळ मुख्यमंत्री कार्यालयातील माहिती मिळणे सोपे पण तलाठी कार्यालयातील माहिती मिळणे दुरापास्त.
जी माहिती सहजपणे उपलब्घ हवी ती जर माहिती अधिकारातून मिळवायला लागत असेल तर ही अपारदर्शकते ची अभेद्य भिंती आड दडलय काय? हे सर्वज्ञात आहे.
महाराष्ट्र पोलिस बिनतारि विभागातील खात्यांतर्गत परिक्षेतील निकाल निश्चिती प्रकरण २००६ हे माझ्या काही सहकार्‍यांनी उघडकीस आणण्याचा प्रयत्न माहिती अधिकाराद्वारे केला. त्यातील मिळालेली माहिती (जी शक्यतो न देण्याचा प्रयत्न केला होता) नुसार यात गौडबंगाल आहे हे समजले. जे केवळ तारतम्याने समजत होते. दारुड्याच्या तोंडाला दारुचा भका भका वास मारतोय मग हे सिद्ध करायला ब्रेथ अनालायझर कशाला?
तरी पण माहिती अधिकाराने किमान काहि अंशी लगाम बसण्यास मदत झाली. अन्यथा उन्मत्त यंत्रणेला माहिती विचारण्याचे धाडस कोण करणार?
(माहिती अधिकाराचा वापर न करताच माहिती असलेला)
प्रकाश घाटपांडे

चांगला लेख

लेख आणि विषय आवडला. मला नक्कीच "माहीती"पूर्ण वाटला :-)

याबाबत अमेरिकेतील - फ्रीडम ऑफ इन्फर्मेशन ऍक्टचा चांगला उपयोग येथील पत्रकारांनी केलेला दिसतो. त्यात ९/११ संदर्भात पण न्यूयॉर्क टाईम्स सारखी वृत्तपत्रे आघाडीवर आहेत.

पण पत्रकारांना माध्यमांच्या बळावर जे कधी कधी सहज शक्य होऊ शकेल ते सामान्यांना होतच असेल असे नाही. किमान तात्काळ माहीती मिळायला. माझ्या समजुतीप्रमाणे (अमेरिकेत - निदान आमच्या राज्यात) माहीती अधिकाराचा वापर करून मागितलेल्या माहीतीसंदर्भात १० दिवसात उत्तर देणे बंधनकारक आहे. माहीती १० दिवसात देणे बंधनकारक नाही! ;)

पब्लिक् इन्टरेस्ट् लिटिगेशन् (मराठी शब्द विसरलो)

माहितीच्या अधिकारासारखीच महत्त्वाची यंत्रणा म्हणजे पब्लिक् इन्टरेस्ट् लिटिगेशन् , असे मला वाटते. आणीबाणीसारख्या घटनेनंतर , सर्वोच्च न्यायालयापर्यंत सामान्य माणसाचा आवाज पोचविण्याकरता PIL ची यंत्रणा निर्माण केली गेली. PIL चे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, एखाद्या व्यक्तिवर किंवा समूहावर झालेल्या अन्यायाची न्यायालयात दाद मागण्याकरता खुद्द त्या व्यक्ति किंवा त्या समूहानेच जायला पाहिजे , रीतसर फिर्याद केली पाहिजे, जातीने न्यायालयाच्या कामाला हजर राहिले पाहिजे, इतकेच काय, "फिर्यादी पक्ष" म्हणून अधिकृतरीत्या नाव टाकले पाहिजे अशी बंधने नाहीत. कोणत्याही तिसर्‍या घटकाने येऊन अन्यायग्रस्तांच्या वतीने हे सर्व करण्याची तरतूद PIL ने केली.

प्रशासनाच्या वेगवेगळ्या घटकांना जबाबदार धरण्याचे , लोकांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम १९८० नंतर PIL मुळे शक्य झाले. माहितीचा कायदा आणि PIL ही या अर्थाने भावंडे म्हणायला हवीत.

जनहित याचिका

पब्लिक इन्टरेस्ट लिटिगेशन ला जनहित याचिका म्हणतात.

लेखाचा विषय चांगला निवडला आहे. व्यवस्थित वाचून सविस्तर प्रतिसाद देईनच

उपयुक्त

उपयुक्त कायदा व उपयुक्त लेख.

ह्या कायद्याने निदान एक पाउल तरी पुढे पडले असे म्हणता येईल. बाकी पळवाटा शोधायचा प्रयत्न सरकारी खात्याकडुन होईलच पण मग हा कायदा अजुन बळकट व्हायचे प्रयत्न करता येतील.

लेख आवडला.

लेख माहितीपुर्ण आहे, आवडला.

(माहितीचा अधिकाराचा कायदा या संबधी, किती लोक जागृत झाले, त्याचे फायदे, तोटे या संदर्भात आमच्या एका मित्राने नुकतेच संशोधनाचे काम पुर्ण केले. त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या कार्यालयात प्रत्यक्ष भेटी दिली असता एक गोष्ट सतत जाणवली की काही अधिकारी अजूनही माहिती देण्याचे टाळतात. दिली तर थातूर-मातूर स्वरुपाची देतात. काही प्रामाणिक अधिकारी आहेत जे अशी माहिती देण्यास तत्पर असतात. त्याच बरोबर कार्यालयात उपलब्ध नसणारी माहिती ( ब्लॅकमेलींगसाठी ) मागणारे महाभाग कमी नाहीत.मात्र या कायद्याने कार्यालयातील कामकाजात काही प्रमाणात पारदर्शकता आली आहे. मात्र भ्रष्टाचार कमी झाला आहे का याचे उत्तर नाही असेच आहे असे वाटते. )
मात्र या हा कायदा तुम्हाला न्याय देत नाही या श्री घाटपांडे साहेबांच्या विधानाशी पुर्ण सहमत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रथम धन्यवाद!

लोकमित्रसाठी लेख लिहिल्याबाबत धन्यवाद! शब्दांचे बंधन पाळले आहे, पण अगदी नैसर्गिकपणे - कुठलाच कृत्रिमपणा नाही.

विषय सर्वांना उपयोगाचाच आहे.

कायदा आणि न्यायाबाबत काही त्रोटक विचार. कुठल्याही कायद्याने न्याय मिळत नाही. लोकशाहीच्या मालकांनी (म्हणजे लोकांनी) कायद्याच्या चौकटीत राहून न्याय मिळवावा लागतो. तो न्याय मिळवून घ्यायला न्याय केवळ वाव देतो. कायदा म्हणजे केवळ शिधा. न्याय मिळवण्याची खिचडी स्वतःच शिजवावी लागते. खिचडी मस्त चविष्ट होईल की नाही, की करपेल? यात दोन भाग आहे. १. दर्जेदार शिधा. २. शिजवणार्‍याचे कौशल्य.

मुक्तसुनीत आपल्याला "अमुक कायदा आहे" असे सांगत आहेत. त्याचा प्रभावी उपयोग करून घेणे लोकांच्या हातात आहे. पारदर्शकतेचा, माहिती मिळण्याचा काही थोडा तरी उपयोग होतो, त्याबद्दल एक पाहाणीबद्दल मागे उपक्रमावर लिहिलेले आहे. (दुवा) त्यामुळे लोकांबद्दल, लोकशाहीबद्दल आपण फार निराशावादी असू नये, असे मला वाटते.

अवांतर : उपक्रमावर "लोकमित्र" नावाचा आयडी बनवला आहे. लोकमित्रबाबत व्यनि-व्यवहार त्या आयडीवरून करीन. माझी वैयक्तिक मते "धनंजय" या आयडीवरून देईन.

चांगला लेख

लेख चांगला आहे. माहितीच्या अधिकाराची पार्श्वभूमी आणि ही प्रक्रिया चालते कशी याची चांगली माहिती मिळते.

याचा प्रत्यक्षात उपयोग कसा करायचा, सामान्य नागरिकांना याकामी मदत करणार्‍या काही संस्थ आहेत का, इत्यादि माहिती पुढील लेखात देता आल्यास उत्तम!

 
^ वर