नैसर्गिक साधनसंपत्तीचा शेवट जवळ आला? (पॉल क्रुगमन यांचा लेख)
PAUL KRUGMAN यांनी Running Out of Planet to Exploit या लेखात काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. दिवसेंदिवस घटणार्या नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे आर्थिक वाढीला आणि एकूणच मानवजातीला असणार्या धोक्याचे भयंकर चित्र त्यामुळे डोळ्यापुढे उभे राहते.
पॉल क्रुगमन लिहितात
नऊ वर्षांपूर्वी $१० प्रति बॅरेल दराने विकले जात होते. गेल्या आठवड्यात तेलाची किंमत $११७ प्रति बॅरेल होती.
फक्त तेलच नाही तर अन्नधान्याच्या, धातूंच्या किमती जगभरात वाढल्या आहेत. याचबरोबर जगभरात वाढत्या कमोडिटीजच्या (मराठी?) किमतींनी बर्याच दिवसांत न ऐकलेला प्रश्न पुन्हा उभा राहू लागला आहे : पृथ्वीवरील नैसर्गिक साधनसंपत्तीचा मर्यादित साठा जागतिक आर्थिक प्रगतीमध्ये अडथळा ठरू शकेल काय?
या प्रश्नांची उत्तरे शोधणारे तीन विचारप्रवाह आहेत असे क्रुगमन लिहितात
पहिला विचारप्रवाह असे मानतो की ही भाववाढ मुख्यतः कृत्रिम टंचाईमुळे आणि जाणीवपूर्वक पसरवलेल्या अफवांमुळे (speculation) आहे. लवकरच हा कृत्रिम फुगवटा फुटून किमती उतरतील.
दुसरा विचारप्रवाह असे मानतो की वाढत्या मागणीमुळे ही भाववाढ झाली आहे. विकसनशील देशांची वेगाने होणारी वाढ हे वाढत्या मागणीचे प्रमुख कारण. पण दिवस जातील तसे तेलाच्या आणखी विहिरी खणून, अन्नधान्याच्या लागवडीचे क्षेत्र वाढवून पुरवठा वाढेल आणि किमती कमी होतील.
तिसरा विचारप्रवाह मानतो की स्वस्त नैसर्गिक साधनसंपत्तीचा जमाना आता संपला. तेलाचा साठा कमी होत आहे, अधिक लागवडीसाठी उपलब्ध मोकळी जमीन कमी होत आहे. (क्रुगमन लिहितात : we’re running out of oil, running out of land to expand food production and generally running out of planet to exploit.)
पहिल्या विचारप्रवाहाविषयी क्रुगमन लिहितात : कृत्रिम टंचाई साठेबाजीमुळे होते, त्याची कुठे लक्षणे नाहीत.
दुसर्या विचारप्रवाहाविषयी क्रुगमन लिहितात : या विचारप्रवाहानुसार टंचाई खरी आहे पण तात्पुरती आहे. ७०च्या दशकात आलेल्या टंचाईशी याची तुलना केली जाते. त्यावेळची टंचाई वेगवान विकासाने पुरवठ्याच्या क्षमतेवर मात केल्याने निर्माण झाली होती. त्यानंतर अधिक जमीन लागवडीखाली आणली गेली आणी तेलाचे नवीन साठे सापडले आणि किमती पुन्हा कमी झाल्या. पण तेलाचे कमी होत जाणारे उत्पादन, वातावरणात झालेले कायमस्वरूपी बदल (ऑस्ट्रेलियामध्ये सलग दहा वर्षे दुष्काळसदृश स्थिती) यामुळे यावेळची परिस्थिती वेगळी आहे.
तेल आणि इतर गोष्टींच्या वाढत्या किंमतींमुळे विकसित देशांवरील दबाव वाढेल आणि त्यांना जीवनमान उंचावणे (किंवा कायम ठेवणे) अधिकाधिक अवघड होत जाईल आणि गरीब देश अतिशय भयंकर परिस्थितीच्या टोकावर पोचतील.
===============================================
पॉल क्रुगमन यांनी या लेखात मांडलेल्या विचाराबद्दल आपणांस काय वाटते?
Comments
महत्वाचा विषय
विषय महत्वाचा आहेच. त्या नुसार उभे राहणारे प्रश्न अवघडच आहेत. अर्थात निसर्गचक्राचा विचार केल्यास जे होते आहे ते अनेक सहस्त्रकांपुर्वी झाले असावे (जे आजच्या शास्त्रीय विचारवंतांना पटत नाही) आणि काही सहस्त्रकांनी परत होइल (जे आजच्या शास्त्रीय विचारवंतांना पहायला मिळणार नाही). असे वाटते.
या विषयावरचे प्रतिसाद वाचायला आवडतील.
निसर्गचक्र आणि माणूस प्राण्याची लुडबूड
>> अर्थात निसर्गचक्राचा विचार केल्यास जे होते आहे ते अनेक सहस्त्रकांपुर्वी झाले असावे (जे आजच्या शास्त्रीय विचारवंतांना पटत नाही) आणि काही
>> सहस्त्रकांनी परत होइल
अनेक सहस्रकांपूर्वी 'आता-जे-होते-आहे' ते झाले होते असे वाटत नाही. कारण तसे सुचवणारा काही आधार/पुरावा नाही. निसर्गचक्राच्या बाबतीत म्हणाल तर गेल्या तीन-चारशे वर्षात माणूसप्राण्याने केलेल्या काही कृतींमुळे (मुख्यतः राहण्यासाठी आणि शेतीसाठी जंगलांचा विनाश आणि भूगर्भातील इंधने (तेल, कोळसा इ.) काढून आणि जाळून बदललेले वातावरणाचे स्वरूप) या निसर्गचक्रात काही इर्रिवर्सिबल (मराठी?) बदल झाले आहेत.
काही उपाय
एक फायदा:
गरज ही शोधाची जननी आहे. जर सहज उपलब्ध असणारी साधने कमी पडू लागली तर नवीन स्त्रोत तयार करण्यासाठी किंवा आहे त्या प्रकियेचा दर्जा वाढवण्यासाठी संशोधन केले जाईल. उदा: १०० ली कच्च्या तेलापासून ६० ली चांगले तेल तयार होत असेल तर हे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केला जाईल. हिंडाल्कोने ऍल्युमिनिअम शुद्धिकरणासाठी अमेरिकन कंपनीचे तंत्रज्ञान विकत घेतले आहे. त्यामुळे एकाच वेळी उत्पादनही वाढेल आणि मूळ कच्च्या मालावरील ताणही कमी होईल.
आपत्कालीन उपाय
अपारंपारीक उर्जा स्त्रोतांचा वापर वाढवला पाहिजे.
घरगुती वापराचे सिलिंडर गाडीला जोडणे थांबवले पाहिजे.
झाडे कोणत्याही परिस्थितीत तोडता कामा नयेत. रस्ता वळवला तरी चालेल.
पाणी जपून वापरावे. गाड्या महिन्यातून एकदा धुतल्या तरी चालतील.
पेट्रोल आणि डिझेल वगैरेंची मनोरंजनासाठीची उधळपट्टी थांबवली पाहिजे.
नैसर्गिक स्त्रोतांचे रेशनिंग करण्याचा उपाय कसा वाटतो?
व्यक्तिपासून राष्ट्रापर्यंत सर्वांना जबाबदारीची जाणीव होणे महत्त्वाचे आहे. अन्यथा अवघड आहे.
अभिजित...
भूक आणि हाव
चर्चा विषय आणि दुव्याबद्दल नवीन चे आभार!
गरज ही शोधाची जननी आहे. जर सहज उपलब्ध असणारी साधने कमी पडू लागली तर नवीन स्त्रोत तयार करण्यासाठी किंवा आहे त्या प्रकियेचा दर्जा वाढवण्यासाठी संशोधन केले जाईल.
आपण म्हणता त्यात तथ्य असले तरी राजकारणी आणि उद्योग याच्या नावाखाली आता जसे आहे तसेच वापरत रहातात आणि नवे बदल घडवून आणण्याकडे दुर्लक्ष करतात.
गांधीजींचे मला वाक्य आठवले: "Earth Provides enough to satisfy every man's need but not every man's greed." - भूमाता सर्वांची भू़क भागवू शकेल हाव नाही...
आजची वस्तुस्थिती अजूनही अशीच आहे की विकसीत देश त्यांच्या सवयी घालवायला तयार नाहीत आणि विकसनशील देश हे त्या सवयी असल्याशिवाय विकसीत होताच येणार नाहीत असल्या कुठल्यातरी भ्रमात तसेच वागत आहेत. पर्यावरण आणि सस्टेनेबिलीटी (मराठी?) हे आता परवलीचे शब्द होत आहेत पण अजूनही त्याचा संबंध हा विशेष करून प्रतिमा तयार करण्यातच आहे.
सध्या खनीज तेलाव्यतिरीक्त गंभीर होऊ पहाणारा मोठा प्रश्न झाला आहे तो - तांदळाचा. अमेरिकेतील भारतीय दुकानात तो आधी जाणवत होता. काल सीएनएनवर पाहीले की आता बी़जे आणो कॉट्स्को सारख्या घाउक खरेदीकेंद्राने खरेदीदार किती तांदूळ विकत घेऊ शकेल यावर बंधन आणले आहे. त्याहून ही आश्चर्य म्हणजे काल लेट नाईट शो - जे लेनोचा पाहात होतो. त्यावर पण त्याचा एक विनोद हा तांदूळ नसण्यावर होता.
डार्फर मधे जे भयानक अत्याचार चालू आहेत त्याला कारण हे तेथील साधनसंपत्ती मुख्य म्हणजे पाणी आणि पर्यायाने अन्न नसणे हे होते. तेथे डार्वीनच्या सिद्धांतातील "स्ट्रगल फॉर एक्झिसटंस" चालू आहे. विचार करा उत्तर गोलार्धातील नैसर्गीक साधनसमृद्धी असलेल्या अमेरिकेत दक्षिण गोलार्धातील फिजी या छोट्याशा राष्ट्रातून पाणी आणून बाटल्यात विकायचे कारण काय? त्याने त्यांची (फिजीची) बिचार्यांची साधनसंपत्ती कमी होते, शेतकर्यांचे हाल. जी अमेरिकन लोकं इथले सुखाने पाणी पिऊ शकतात ते उगाच "स्टाईल" म्हणून "फिजी वॉटर" पितात आणि फायदा कुणाला?...असो.
आपण म्हणता तसे ही जबाबदारी व्यक्तीपासून राष्ट्रापर्यंत सर्वांचीच आहे. पण त्यात उद्योगधंदे पण असले पाहीजेत कारण ते स्वतःला या दोन्हीपेक्षा (व्यक्ती आणि राष्ट्र) वेगळे आणि मोठे समजतात....(एखादा अपवाद कदाचीत टाटा सारखा असतो).
गांधींजींनी गेल्या शतकात स्वातंत्र्यापूर्वीपासून सांगीतले की गावे स्वयंपूर्ण असली पाहीजेत. दत्तोपंत ठेंगडी, गुरूमुर्ती आणि स्वदेशी जागरण मंचशी बोलताना पण हेच लक्षात आले होते की त्यांचे म्हणणे हे शक्यतो जिथे गरजा नाहीत त्या वाढवू नयेत. पण त्यांचा भूमिकेचा विपर्यास हा माध्यमांनी आणि सर्वच राजकारण्यांनी केला. आणि आज अमेरिकेतपण "लोकल फूड" ला महत्व येत आहे...
छान प्रतिसाद | जागतिक टंचाई
विकास, छान प्रतिसाद!
>> सध्या खनीज तेलाव्यतिरीक्त गंभीर होऊ पहाणारा मोठा प्रश्न झाला आहे तो - तांदळाचा. अमेरिकेतील भारतीय दुकानात तो आधी जाणवत होता. काल
>> सीएनएनवर पाहीले की आता बी़जे आणो कॉट्स्को सारख्या घाउक खरेदीकेंद्राने खरेदीदार किती तांदूळ विकत घेऊ शकेल यावर बंधन आणले आहे.
हो. अन्नधान्यांची टंचाई जागतिक आहे. अमेरिकेतही त्याचे परिणाम दिसू लागले आहेत असे दिसते. मध्यंतरी युरोपीय नेत्यांनीही अन्नधान्यांच्या टंचाईविषयी काळजी व्यक्त केली होती. आफ्रिकेतील आणि इतर गरीब देशांमध्ये काय परिस्थिती असेल?
संशोधनाची किंमत
संशोधनाबद्दल आपला मुद्दा योग्य आहे. पण संशोधनावर होणारा खर्च आणि नव्या प्रक्रियेमुळे (बव्हंशी) उत्पादन खर्चात होणारी वाढ यामुळे उत्पादित वस्तूंची किंमत वाढतच राहील. शिवाय मुळात कच्च्या मालाचा असणारा मर्यादित साठा हा प्रश्न राहतोच. उदा. हिंडाल्कोच्या खाणींतील आल्युमिनियमच्या कच्च्या मालाचा साठा कमी कमी होत आहेच.
>> व्यक्तिपासून राष्ट्रापर्यंत सर्वांना जबाबदारीची जाणीव होणे महत्त्वाचे आहे. अन्यथा अवघड आहे.
अगदी योग्य बोललात!
६० हजार वर्षांपूर्वी
काल सीएनएन वर आलेल्या बातमीचा दूवा पहा.
थोडक्यात - नवीन शोधा प्रमाणे, साठ हजार वर्षांपूर्वी दुष्काळ आणि इतर पर्यावरणीय कारणांमुळे मानवजातीचा र्हास झाला आणि भूतलावर केवळ २००० माणसे अफ्रिकेत शिल्लक राहीली. नंतर ती हळू हळू सर्वत्र वाढत गेली आणि आज ६.६ अब्ज झाली! या संदर्भातील माहीती या संशोधनाप्रमाणे आपल्या जीन्स/जनुकामध्ये आजही साठवलेली आहे.
तेल साठे
परवाच वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये सौदी अरेबिया त्यांच्या हातातील शेवटचा खुरैईस येथील तेलसाठा वापरात आणण्यासाठी कशी शिकस्त करत आहे, ह्यावर सविस्तर बातमी वाचली. त्या बातमीतील काही महत्वाचे मुद्दे:
१. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीनुसार सध्या जगाची तेलाची निकड प्रतिदिन ८७ मि. बॅरल्स इतकी आहे. ती २०१५ मध्ये ९९ मि. बॅरल्स इतकी होईल.
२. त्यातील सौदीचा सध्याचा पुरवट्याचा वाटा ११ मि. बॅ. प्रतिदिन इतका आहे (म्हणजे सुमारे ६ %).
३. खुरैइस चालू झाल्यावर (२००९ साली) हा पुरवठा प्रतिदिन १२. ५ मि. बॅ. इतका होईल.
४. आतापर्यंतचे सौदीचे सर्व साठे तसे 'सहज' उपलब्ध होते, म्हणजे तुलनेने कमी खर्चिक होते. खुरैइसचे तसे नाही. हा साठा ५० च्या दशकातच सापडला होता, परंतु त्यातून तेल काढणे कमालीचे बिकट व खर्चिक असल्याने त्यांनी तो विकसीत केला नव्हता. आता मात्र (अगदी शेवटचा निकराचा प्रयत्न म्हणून) सौदी राजवट हा साठा कार्यरत करण्याच्या मागे आहे.
५. ह्या क्षेत्रातील तंत्रज्ञ मात्र ह्या प्रयत्नाबद्दल थोडे साशंक आहेत, कारण बर्याच तंत्रज्ञ्यांच्या मते तिथून तेल नियमीत स्वरूपात काढणे (sustainabale ) शक्य नाही.
किमतींवर थेट परिणाम
प्रदीप, या माहितीबद्दल धन्यवाद!
इंधननिर्मितीतील वाढत्या खर्चाचा थेट परिणाम त्यांच्या किमतींवर होईल हे सांगायला कोण्या अर्थतज्ज्ञाची गरज नाही. कालांतराने ही महाग संसाधने 'फॉर ए फॉर्च्युनेट फ्यू' राहतील असे वाटते.
खनिज तेलाची किंमत
माझ्या वाचनाप्रमाणे खनिज तेलाची किंमत सद्ध्या दोन गोष्टींमुळे वाढलेली आहे -
१. अनेक तेल निर्यात करणार्या देशांत झालेली अस्थिरता - ह्यात सगळ्यात मोठा वाटा अर्थातच इराकचा व त्यानंतर व्हेनेझुएलाचा. अस्थिरतेमुळे बाजारामध्ये तयार झालेली भीती ही प्रत्यक्ष तेलाच्या पुरवठ्यापेक्षा वाढलेल्या किंमतीला कारणीभूत आहे.
२. प्रचंड प्रमाणाची सट्टेबाजी - ह्यात हेज फंड, सोवरिन् वेल्थ फंड्स् चा खूप मोठा वाटा आहे.
गेले अनेक वर्ष तेल पुढच्या ३० वर्षांत संपणार आहे असे आपण भाकित ऐकत आलेलो आहोत. पण ह्यातला महत्वाचा डेटा हा तेल कंपन्यांनीच पुरवला आहे ही लक्षात घेण्यासारखी बाब आहे.
शक्यता
आपल्या म्हणण्याप्रमाणे, नफेखोरीसाठी तेल कंपन्यांनीच तेलाचे साठे आता लवकरच संपणार आहेत अशा अर्थाची भाकिते प्रस्तृत केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु ह्या क्षेत्रातील घडामोडींवर काही अन्य रिसर्च कंपन्याही लक्ष ठेऊन असतात व चांगले पत्रकार काहीही लिहीतांना सर्व ठिकाणांहून माहिती गोळा करून मग लिहीतात. वर मी निदर्शित केलेल्या आर्टिकलमध्येही असे उल्लेख होते. त्यात तर हेही म्हटले होते, की सौदीचीच तेल कंपनी, अर्मॅको ह्या विषयावर, खुरैस तेलसाठ्याबद्दल बोलावयास तयार नाही! तेव्हा हे लिहीणार्या पत्रकाराने तेथे अगोदर उच्च श्रेणीवर काम केलेल्या काही व्यवस्थापकांशी बातचीत केली.
कंपन्यांचे हितसंबंध
प्रदीप यांच्याशी सहमत आहे.
तेलाच्या वाढत्या किमतींमध्ये कंपन्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत आणि त्याची किंमत ठरवण्यात ढवळाढवळ करण्याचे प्रयत्नही होत असतात हे खरेच. पण अनेक देशांच्या सरकारांचे (पर्यायाने जनतेचे) हितसंबंध गुंतलेले असल्याने तसेच त्रयस्थ/तटस्थ लोकांच्या अभ्यासातूनही तेलाच्या मर्यादित साठ्याचे खरे स्वरूप पुढे येते असे वाटते.
पत्रकारांची प्रतिष्ठा
आपला मुद्दा असा आहे, की प्रतिष्ठीत पत्रकारांकडून अशी चूक होणार नाही, पण इराक युद्ध सुरू होण्याआधी हेच पत्रकार अमेरिकन सरकारने टाकलेले अनेक फटकळ पुरावे सत्य म्हणून प्रकाशित करत होते. हा त्यांचा आळशीपणा आहे की अजूनकाही ते माहित नाही, पण विषेशतः न्यू यॉर्क टाईम्सची त्या वेळेसची पत्रकारिता साफ चुकीची होती. ह्याबद्दल पी. बी. एस्. वर विषेश कार्यक्रम पण झाला होता. त्यात सरकारच्या खोट्या प्रचाराला हे लोक कसे बळी पडले ह्याचा तपशीलवार खुलासा केला आहे.
ऊर्जाअनैसर्गिक साधन संपत्ती सम्पत आली...
अनैसर्गिक साधन संपत्ती सम्पत आली...
खरे म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती सम्पत आली आहे असे म्हणणॆ संपूर्ण सत्य नाही. फ़ार तर तेल,ज्वलनशील
वायू कमी प्रमाणात उपलब्ध होत आहेत असे म्हणावे. सौर्य ऊर्जा,पवन ऊर्जा,समुद्राच्या लाटांपासून मिळू शकणारी
ऊर्जा वगेरे आपण आज दुर्लक्षित करत आहोत.गरम पाण्याचे झरे जगभर आढळतात. त्यांच्याकडे ऊर्जा स्रोत
म्हणून पहा ना.
श्री. कोर्डे यांच्या भन्नाट कल्पनांमध्ये थोडिशी भर: कांही किलोमिटर खोलीच्या कूपनलीका खणून पृथ्वीच्या गर्भातील
ऊच्य तपमानाचा आपण ऊपयोग करू शकू.विशेषत: जागृत ज्वालामुखींजवळच्या प्रदेशांत किन्वा खोल खाणीमध्ये
या कूपनलिका खणल्यास नियंत्रित लाव्हा बाहेर आणून त्या पासून ऊर्जा मिळवणे अवघड जाऊ नये. [पृथ्वी आहे तोपर्यंत तरी हा स्रोत संपणार नाही!]
शरद .
भूगर्भातील तापमान
कांही किलोमिटर खोलीच्या कूपनलीका खणून पृथ्वीच्या गर्भातील ऊच्य तपमानाचा आपण ऊपयोग करू शकू.
थंड प्रदेशात (निदान अमेरीका-कॅनडात) थंडीच्या काळात घरे गरम ठेवायला जी उष्णता लागते ती बहुतांशी तेल/नैसर्गीकवायू आणि वीज (म्हणजे बहुतांशी कोळसा अथवा अणुशक्ती) अशी असते. पण आपण वरील वाक्यात म्हणलेली उर्जा पण आता लोकं वापरू लागले आहेत. त्याला जीओथर्मल एनर्जी असे नाव आहे आणि बर्याच ठिकाणी त्याचा वापर होतो.
पृथ्वी आहे तोपर्यंत तरी हा स्रोत संपणार नाही!
त्याबाबत मला वाटते की मनुष्यप्राण्याची हाव अशीच राहीली तर स्त्रोत संपले नाही तरी पृथ्वी नक्की संपू शकेल :-(
तेलाच्या किंमतींबद्दल एक अभ्यासपूर्ण लेख
इथे वाचा -
ए पी इंपॅक्ट फीचर