वेदनाशामक व्हायॉक्स (रोफेकॉक्सिब): धोक्याबद्दल महिती कळण्यात दिरंगाई का झाली?

एखाद्या लोकप्रिय नवीन औषधावर बंदी येते, तेव्हा "असे कसे?" म्हणून प्रश्नचिह्न उभे राहाते. एक ताजे उदाहरण आहे मर्क कंपनीचे व्हायॉक्स (रोफेकॉक्सिब) हे वेदनाशामक औषध. २००४मध्ये हे औषध कंपनीने स्वतःहून विकणे बंद केले. तेव्हा त्यांनी सांगितले की त्यांच्या नव्या पाहाणीनुसार हे औषध घेणार्‍यांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचा धोका होता.यानंतर मर्कविरुद्ध खटले गुदरले गेले, आणि कंपनीची अंतर्गत कागदपत्रे अभ्यासकांच्या हातात आलीत. त्या कागदपत्रांचे विश्लेषण करणारे दोन लेख १४ एप्रिल २००८च्या जर्नल ऑफ दि अमेरिकन मेडिकल असोसिएशन (जामा) या अग्रणी वैद्यकीय मासिकात प्रकाशित झाले.

दोन्ही लेख वैद्यकीय माहितीच्या सम्यक प्रसाराबद्दल आहेत. या माहितीच्या बाजारपेठेत ग्राहक म्हणजे रुग्ण, किंवा रुग्णांच्या हिताचे कर्तव्य मानणारे डॉक्टर. डॉक्टरांना किंवा रुग्णांना "माहिती कोण पुरवत आहे?" हे समजून घ्यावे लागते. माहिती पुरवणार्‍यांचे हितसंबंध जाणून माहितीचे परिशीलन करावे लागते. औषध किती परिणामकारक आहे, त्याच्यापासून अपाय काय, हे शोध लावण्यासाठी खर्चिक चाचण्या औषधे बनवणार्‍या कंपन्याच बहुधा करतात. पण त्या चाचण्यांची माहिती आपल्याला तटस्थ अभ्यासक पुरवत आहेत, की कंपनीचे अधिकारी, हे कळल्यास माहितीचा संदर्भ कळतो. हे समजले नाही तर माहितीचा योग्य उपयोग करता येत नाही.

जामाच्या अंकातला पहिला लेख डॉ. रॉस आणि सहकार्‍यांचा आहे. त्यांनी कंपनीच्या १९९६-२००४ कालावधीतील कागदपत्रांवरून असे दाखवले, की रोफेकॉक्सिब विषयी कित्येक शोधनिबंध कंपनीचे अधिकारी लिहीत असत. पण ते शोधनिबंध कुठल्याकुठल्या मेडिकल कॉलेजातल्या प्राध्यापकांच्या करवी प्रकाशित करत असत. या प्राध्यापकांना कंपनीकडून मानधन मिळत असल्याचा उल्लेख केवळ ५०% शोधनिबंधांमध्ये तळटीप म्हणून दिलेला दिसतो. कंपनीची अंतर्गत कागदपत्रे मिळाली नसती, तर ते लेख कंपनीने लिहून घेतले होते हे कळण्यास मार्ग नव्हता.

दुसरा लेख डॉ. प्सेटी व डॉ. क्रोनमाल यांचा आहे. त्यांनी कागदपत्रांमध्ये असा शोध लावला की २००१ सालापासून, म्हणजे रोफेकॉक्सिब औषध बंद करायच्या ३ वर्षे आधी, कंपनीने खुद्द धोक्याच्या आकड्यांचे विश्लेषण केले होते. वैद्यकीय मासिकात प्रकाशित झाले नाहीत तरीही कायद्यानुसार हे आकडे अमेरिकन सरकारच्या अन्न व औषध प्रशासनाकडे (एफडीएकडे) कंपनीला द्यावे लागतात. कंपनीने आकडे दिलेत खरे पण अशा प्रकारच्या तक्त्यात दिलेत, की धोका आहे हे कळणे कठिण होते. शिवाय फक्त लगेच होणार्‍या अपायकारक घडामोडींचे आकडे दिले. औषध थांबवल्यानंतरही होणार्‍या अपायाचे आकडे होते तरी पुरवले नाहीत. एफडीएच्या साशंक अधिकार्‍याने कंपनीला पृच्छा केली, तर असे कळले की सर्व हॉस्पिटलांतील चाचण्यांसाठी एकत्रित असा स्वतंत्र सुरक्षा बोर्ड कंपनीने नेमला नव्हता. प्रत्येक हॉस्पिटलात संशोधनासाठी देखरेख समिती असतेच. कंपनीचे असे म्हणणे होते, की कुठल्याही एकाच हॉस्पिटलात खूप हृदयविकाराचे झटके न झाल्यामुळे त्या सर्व समित्यांना गोवण्याची गरज नव्हती.

डॉ. प्सेटी आणि क्रोनमाल टिप्पणी करतात : "औषध कंपन्यांना चाचणीच्या निष्कर्षाशी थेट हितसंबंध असतो. तसेच त्यांच्या समभागधारकांना सर्वाधिक नफा मिळवून देण्याचे सर्वाधिक विश्वस्त कर्तव्य असते. यामुळे कंपन्यांना बाकी कर्तव्यांना प्राथमिकता देता येत नाही." त्यामुळे रुग्णांच्या सुरक्षेवर पाळत कंपनीवेगळ्या दुसर्‍या कोणी, सरकारने किंवा स्वतंत्र बोर्डाने, ठेवली पाहिजे असे या लेखकांचे मत आहे.

या दोन लेखांच्या बाबतीत मर्क कंपनीच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की लेखांतील तपशील खोटे, दिशाभूल करणारे, किंवा असंदर्भ आहेत. चूक कोणाची का असेना, या बाबतीत गेल्या १० वर्षांत शास्त्रीय माहितीच्या प्रसारात घोटाळा झाला हे नि:संशय. औषधांचा व्यापार हा मनुष्यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे. बाजारपेठेला, रुग्णांना आणि डॉक्टरांना हितसंबंधांसहित पूर्ण माहिती समजावी असा ज्ञानाचा प्रसार झाला पाहिजे. या त्रुटी अनायासे उघडकीस आल्या आहेत. सरकारने, आणि शोधनिबंध प्रकाशित करणार्‍या मासिकांनी लक्षपूर्वक बदल करून त्या सुधारल्या तर समाजाचा फायदा होईल.

Comments

वेगळा

वेगळा विषय.
आवडला!
एकुण या कंपन्यांची कार्यपद्धती काहीही करून नफा मिळवण्याचीच असणार यात वाद नाही. कारण त्यांची स्थापना काही लोकांचे जीव वाचावेत वगैरे म्हणून होत नसते. (कदाचित काही सन्मानिय अपवाद असावेतही...) तर, ही औषधे विकुन नफा कसा कमावता येईल, यासाठीच असते ही स्थापना असते. त्याच साठी संशोधनावर मोठ-मोठाले खर्च (विद्यापीठांमार्फत) करत असतात.


डॉ. प्सेटी आणि क्रोनमाल टिप्पणी करतात : "औषध कंपन्यांना चाचणीच्या निष्कर्षाशी थेट हितसंबंध असतो. तसेच त्यांच्या समभागधारकांना सर्वाधिक नफा मिळवून देण्याचे सर्वाधिक विश्वस्त कर्तव्य असते. यामुळे कंपन्यांना बाकी कर्तव्यांना प्राथमिकता देता येत नाही."
हे वाक्य त्याचे निदर्शकच आहे. या सर्वाधिक हे महत्वाचे! म्हणजे आम्ही जास्तीत जास्त नफ्यासाठी काहीही करू शकू हे अधोरेखीतच होत नाही का?

असो,
या नंतर मला पडलेले प्रश्नः

  • या औषधावर बेतलेली भारतातली औषधे कोणती आहेत?
  • या कंपनीचे जगात कोणकोणत्या देशात कार्य आहे व या औषधाची (वेगळ्या नावांनीही) विक्री होते?
  • तेथेही बंदी घातली जाते आहे का?

यावर खरं एक मुद्देसूद चर्चा व्हावी, की जेणे करून ही चर्चा एकत्र केल्यावर त्याचा लोकमित्रसाठी एक लेख बनेल.

काय वाटते तुम्हाला?
आपला
गुंडोपंत

"सर्वाधिक" - माझी भाषांतरातील चूक

क्षमस्व. ती वाक्ये "" मध्ये असायला नको होती. तो माझा स्वैर अनुवाद आहे, आणि आजूबाजूच्या वाक्यांचा आधार घेऊन आहे.
मूळ वाक्य असे आहे :
Sponsors have a direct financial interest in their products and a fiduciary duty to shareholders to provide a return on their investment.
स्पॉन्सरना (औषध कंपन्यांना) त्यांच्या मालाविषयी थेट आर्थिक हितसंबंध असतो आणि समभागधारकांना त्यांच्या गुंतवणुकीवर नफा करून देण्याचे त्यांचे विश्वस्त कर्तव्य असते.
तरी माझ्या स्वैर भाषांतरात अर्थाचा कुठलाच विपर्यास झाला नाही असे वाटते.
(१०%पेक्षा अधिक रोमन अक्षरे वापरण्याबाबत प्रायश्चित्त.)

प्रश्नांची काही उत्तरे

* या औषधावर बेतलेली भारतातली औषधे कोणती आहेत?
भारतात या औषधाच्या "जेनेरिक" आवृत्ती अन्य कंपन्या उत्पादित करत होत्या. या प्रकारची दोन औषधे आहेत. औषधांची रासायनिक नावे "रोफेकॉक्सिब" (मर्कचे व्हायॉक्स) आणि "व्हॅल्डेकॉक्सिब" (फायझरचे बेक्स्ट्रा) असे आहे. भारतात रणबक्षी कंपनी "रोफेकॉक्सिब"चे उत्पादन करत होती, असे जालावरून कळते. भारतातील कोणी उपक्रमी डॉक्टरांनी किंवा फार्मासिस्टनी या औषधांची सर्व "व्यापारी" नावे शोधून द्यावीत.

* या कंपनीचे जगात कोणकोणत्या देशात कार्य आहे व या औषधाची (वेगळ्या नावांनीही) विक्री होते?
या कंपनीचे जगातील बहुतेक देशांत कार्य आहे.

* तेथेही बंदी घातली जाते आहे का?
अमेरिकेत (एप्रिल?) २००४ मध्ये मर्क कंपनीने हे औषध विकणे बंद केले, आणि फार्मासीतून औषधांचे साठे परत मागवले. इंग्लंडमध्ये लगेच सरकारने हे औषध बंद केले. ऑक्टोबर २००४ मध्ये भारताने या औषधावर बंदी आणली. परंतु औषधांचा साठा फार्मासीतून परत आणण्याची यंत्रणा भारतात चांगल्या प्रकारे राबवली जात नाही, असे माझ्या ऐकण्यात आले आहे. भारतातील कोणी उपक्रमी डॉक्टरांनी किंवा फार्मासिस्टनी आपला अनुभव सांगावा.

मी असे ऐकले आहे की...

जगात इतरत्र बंदी घातलेल्या अनेक औषधांच्या भारतात विक्रिला परवाणगी आहे. आणि ती तशी विकलीही जातात. यात वेदनाशामक औषधांचा प्रामुख्याने समावेश आहे. जसे नाईस वगैरे.
जाणकार या बद्दल काही माहिती देतील का?

नीलकांत

चांगला लेख

या लेखाच्या आणि प्रतिसादांच्या आधारे या विषयावर आणखी माहिती मिळावी असे वाटते. पूर्वीचे झोपेच्या गोळ्यांबद्दल संशोधन आणि काही रिलॅक्सेशन च्या गोळ्या याबद्दलही असे परीणाम दिसले आहेत असे वाचले होते. भारतात कोणत्या कोणत्या औषधांपासून जपून रहावे? तसेच ज्या औषधांमध्ये स्टिरॉइड किंवा काही संप्रेरके(हार्मोन) वापरलेली असतात त्यांच्यावर तसा स्पष्ट उल्लेख असतो का? भारतात अशी चुकीची औषधे विकण्यासंबंधी आणि त्यांचे परीणाम कोणावर झाल्यास त्यासंबंधी कायद्यात काही कलमे आहेत का?
हे सर्व प्रश्न पडले.

मल्टीनेशनल ह्या खेळात माहिर

छान माहितीपूर्ण लेख, मल्टीनेशनल कम्पन्या असे खेळ वर्षोवर्षे खेळत आहेत, त्याना रोखण्याची ताकद कुठल्या ही सरकार मधे नाही, कारण ह्यांचे मालक सगळी कडे पैसे चारतात, नेते, एनजीओ, प्रोफेसर, डाक्टर सर्वाना पैसे मिळतात, आणि लोकांचे प्राण जातात... भारतात सरकारी इस्पितळात क्षुल्लक प्लास्टर सुद्धा नसते तर टेस्टिंग इक्विपमेंट्स ची काय बिशाद?
एक गोळी अथवा विटामिन उगाचच रुग्णाला द्यायला लावायला डाक्टर्स च्या घरी एसी बसवला जातो ही एक सामान्य गोष्ट आहे...

(रागाने संतापलेला)
सुरेश चिपळूणकर
http://sureshchiplunkar.blogspot.com

औषधे टाळण्याचा विचार करायला हवा.

कोणतीही औषधे असोत त्याचा काहीना काही दुष्परिणाम असतोच असतो. त्यामूळे शक्यतो औषधे टाळण्यावर भर असायला हवा,

पूर्वी सर्दी पडस्याने आजारी असतांना मी एनटीबॉयोटिक्स घ्यायचो आणि सात / आठ दिवस या औषधांचे दुष्परिणाम सहन करत असे, आता जाणिवपूर्वक आयुर्वेदाची औषधे घेतो आणि बरे व्हायला सात दिवस लागतात.

विश्रांती, योग्य आहार, प्रसन्न मन इत्यादींचा वापर माझ्या मते ९९ % रोगांना आणि अश्या औषधांना दूर ठेवतो.

टक्केवारी


विश्रांती, योग्य आहार, प्रसन्न मन इत्यादींचा वापर माझ्या मते ९९ % रोगांना आणि अश्या औषधांना दूर ठेवतो


ही टक्केवारी जरा जास्तच वाटते का?
प्रकाश घाटपांडे

असे असू शकते का?

समजा काहि दुष्परिणाम नोंदले गेल्याने ते औषध बंद करण्यात आले असेल तर ते परिणाम सार्वत्रिक होते का? जर नसेल तर फक्त अमेरिकेमध्ये जाणवलेले दुष्परिणाम/परिणाम हे जगातील अन्य काही भागात जाणवले ही नसतील.
प्रकाश घाटपांडे

औषधे : मानववंश किंवा पर्यावरणातला फरक

वेगवेगळ्या मानववंशांमध्ये जनुकांचे सूक्ष्म फरक असतात. त्यामुळे असे शक्य आहे की एखाद्या औषधाचा परिणाम एका देशात जसा दिसतो, तसा दुसर्‍या देशात दिसणार नाही. पण अशी औषधे आजपर्यंत फारच कमी माहीत आहेत.

औषधाचा परिणाम-दुष्परिणाम होतो, त्याचा फायदा-तोटा एका समाजात जितका होतो तितका दुसर्‍या समाजात होत नाही, असेही शक्य आहे. काही खोकल्याची औषधे घेतल्यानंतर गुंगी येते. मोटार चालवणे कठिण होते आणि अपघात होऊ शकतात. जर एखाद्या देशात बहुतेक लोक मोटार चालवत नसतील, तर त्या औषधाने येणारी गुंगी तेवढी धोकादायक नाही.

नाहीतर एका देशातील चांगल्या-वाईट अनुभवांचा दुसर्‍या देशांनी फायदा घ्यावा.

पर्यावरणातला फरक पडतो का?

मी भारतात असताना काँबिफ्लॅम घ्यायचे कधी कधी. कधीही त्रास नाही झाला आणि लगेच दुखणं पळायचं. इथे अमेरिकेला आल्यावर १-२दा घेतली, तर पोट बिघडलं..
हा साईड इफेक्ट होतो कधी कधी हे मी नेटवर वाचलं पण भारतात त्रास नाही झाला आणि अमेरिकेत झाला यामागे हेच कारण असावे का?

पटण्यासारखे

रुग्णांच्या सुरक्षेवर पाळत कंपनीवेगळ्या दुसर्‍या कोणी, सरकारने किंवा स्वतंत्र बोर्डाने, ठेवली पाहिजे असे या लेखकांचे मत आहे.

पटण्यासारखेच आहे, पण संशोधनाची गुप्तता पाळणार्‍या कंपन्या याला कडाडून विरोध करतील असे वाटते.

लेख छान.

चांगलाच विषय

विषय आणि अनुवाद आवडला. हा विषय गंभीर आहे. वर काही प्रतिसादात भारतावरील / भारतीयांवरील परीणामांबद्दल लिहीले आहे. हा प्रश्न केवळ भारतीयांचाच नाही तर सर्व विकसनशील आणि अविकसित राष्ट्रांचा आहे - जेथएकतर संबंधीत कायदे नाहीत अथवा हुकूमशाही आहे आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांची आणि विकसीत देशांची दंडेली चालू शकते. चर्चेच्या विषयापुरताच संबंधीत प्रतिसाद देतो:

मधे एका मोठ्या विद्यापिठातील उच्चशिक्षितांच्या बहुराष्ट्रीय "गट" माहीतीत आला होता. त्यातील व्यक्ती ह्या अर्थातच दोन प्रगत राष्ट्रातील होत्या. नक्कीच त्यांच्या विषयातील ज्ञानी होत्या. पण त्यांनी एक सामाजीक उपक्रम चालू केला होता तो पाहून धक्का बसला - आणि त्याहूनही धक्का त्याला मिळालेल्या विद्यापिठीय अनुदानामुळे बसला! एका लोकशाहीविरहीत देशात लोकसंख्या अधिक आणि गरीबी अधिक असल्याने त्यांच्या म्हणण्यामु़ळे मुलांचे हाल होत आहेत. बदललेल्या राहणीमानामुळे त्यांच्यात हृदयविकार बळावण्याची शक्यता अधिक असते म्हणून मुलांना निरोगी ठेवण्यासाठी म्हणून ते औषधे वाटणार होते. मग प्रश्न विचारला की हे औषध ह्या गटातील लोकं ज्या देशांमधून हे काम करत आहेत त्या देशात वापरले जाते का? तर उत्तर आले नाही... मग विचारले की हे औषध (अर्थातच बहुराष्ट्रीय कंपन्यांचे) कसे कुठे उत्पादीत केले जाते? उत्तर मिळाले की ते उत्पादीत भारतात करणारे कोणीतरी आहे आणि वापरले अजून इतरत्र जाणार! बरं मग प्रश्न विचारला की जर (बदललेल्या राहणीमानामुळे) हृदयविकार होवू शकतो ही काळजी असल्यास स्थानीक पद्धती - खाणे, पिणे, आणि व्यायामाने हा प्रश्न सुटणार नाही का?.... काय उत्तर मिळणार यावर. बरं जे काही चालले आहे ते प्रकाशात (कायदेशीर) चालले आहे जरी ज्यांच्याबरोबर चालले आहे ते अंधारात असले तरी...

दोन-तीन आठवड्यांपूर्वी एका कार्यक्रमात व्हेंचर कॅपिटॅलीस्टचे (व्हिसीज् चे) बोलणे ऐकत होतो. मॅसॅच्युसेट्स मधे गव्हर्नर बायोटेक उद्योगांना चालना देत आहे या संदर्भात व्हिसीज् ना काय वाटते अशा अर्थाचा प्रश्न होता. त्यांची "व्यथा" अशी होती की या क्षेत्रात पैसे गुंतवले तर त्यातून "फळ" मिळायला दहा वर्षे वेळ लागतो कारण "फूड अँड ड्रग्ज ऍड्मिनिस्ट्रेशन" च्या लांबड्या प्रक्रीयेत एखादे औषध तयार होण्यास लागणारा वेळ मोठा असतो. दहा-दहा वर्षे थांबायला लागते... मग दुसर्‍या एका कार्यक्रमात अशा व्यथांना उत्तर म्हणून अशी सेवाभावीसंस्था पाहीली की ती अशा कंपन्यांच्या मानवी चाचण्या भारतात आणि इतरत्र करायला मदत करते.

आपणास माहीत आहे की नाही ते माहीत नाही पण अशा प्रकारच्या घटनांमधे कदाचीत सर्वात प्रथम, पण गाजलेली घटना ही "रोश विरुद्ध ऍडम्स" म्हणून प्रसिद्ध आहे. ऍडम्स स्टॅनले नावाच्या रोश कंपनीतील एका वरीष्ठ अधिकार्‍याने तत्कालीन युरोपिअन इकॉनॉमिक कम्यूनिटीस गोपनीय तक्रार करून तिथले गैरव्यवहार कळवले. त्या कंपनीस ईईसीने पाठवलेल्या कागदपत्रातील माहीतीतून चुकून नाव समजले आणि मग त्याला अनेक त्रासातून जावे लागले. हा भाग विकीवर वाचा. त्याचे पुस्तक वाचले होते म्हणून चांगला लक्षात आहे. पण विकीमुळे त्यासर्वाचा (त्याच्या या कामाशी संबंधीत नसलेला तरीही) अँटीक्लायमॅक्स कळला!

 
^ वर