टिंग्या


टिंग्या हा चित्रपट काल पाहिला आणि कृतज्ञता म्हणून थोडेसे लिहावे वाटले.

शेतात काम करणारा चितंग्या बैल रुतून बसल्यामुळे औताला जोडायला आता दुसरा बैल नाही. घरी बटाट्याचं बियाणं तर येऊन पडलं आहे. लवकर कामं आटपली नाहीत तर मोलामहागाचं बियाणं खराब होईल. याआधीच थकलेल्या कर्जाच्या व्याजाचेही हप्ते पुरते फिटलेले नाहीत. कुठेही मदत मिळण्याची सुतराम शक्यता नाही. किंबहुना आपल्या मेव्हण्याकडे असलेला ट्रॅक्टर मिळवण्याचे व्यर्थ प्रयत्नही करून झाले आहेत.

आमच्या वस्तीत करतो सूर्य टाळाटाळ देवा
गोठला आहे कधीपासून येथे काळ देवा

कोसळाया लागले आहे पुन्हा दाही दिशांनी
बांधले कंत्राटदाराने कुण्या आभाळ देवा?

चित्तरंजन भटांच्या या ओळींची आठवण व्हावी अशी सगळी परिस्थिती. आता या शेतकर्‍याकडे चितंग्याला विकण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहिलेला नाही. पण चितंग्यामध्ये गुंतलेले टिंग्याचे आतडे त्याच्या पायात अडकत आहे. बैलाला बरे करायला थेट ओतूरपर्यंत धावत जाऊन येणारा टिंग्या त्याच्या जिवाभावाच्या बैलाला कसायाच्या हाती देण्यास राजी होणे शक्यच नाही.

समोरच्या घरातली नानी आता म्हातारी झाली, ती देखील काम करत नाही. पण मग तिला कोणी कसायाला का विकत नाही? चितंग्यालाच का विकायचे या प्रश्नाचे उत्तर टिंग्याला समजत नाही.

गावाकडच्या छोट्या शेतकर्‍यांची परिस्थिती. हिंदू आणि मुसलमान शेजार्‍यांमधले घरगुती कौटुंबिक संबंध, परिस्थितीमुळे भेदरलेल्या या दोन कुटुंबांचे जीवन शैलीदार ग्रामीण भाषेतील संवादांद्वारे आपल्यासमोर सादर होते. ग्रामीण जीवनाचे सगळे रंग अगदी अनोख्या पद्धतीने हाडवळे यांनी चित्रपटात भरले आहेत. चित्रपटातील भाषा ही माझ्या गावाकडची बोलीभाषा

चित्रपटातल्या अगदी छोट्या छोट्या स्ंदर्भातून ग्रामीण जीवनाचा पोत उलगडत जातो. ट्रॅक्टर आणायला बहिणीकडे गेलेला गेलेला बाप घरी येताना फक्त केळीचा एक घड घेऊन परत येतो. हे दृश्य अगदी आतपर्यंत हलवून टाकणारे आहे. वांझोटेपणाचा शाप मिळाल्याने सवतपण भोगावे लागणारे त्याची बहीण, सवत आल्याने तिला कुटुंबात काहीही स्थान राहिलेले नाही. मात्र तिच्या मायेचा झरा आटलेला नाही. हे सगळे संदर्भ केवळ एका छोट्याश्या दृश्यातून व्यक्त होतात.

चित्रपटाच्या सुरुवातीला हातात बॅटसारखे दिसणारे एक फळकूट घेऊन नाचत येणारा टिंग्या. बटणं नसल्याने मागे उडणार्‍या शर्टातून दिसणार्‍या त्याच्या बरगड्या हे दृश्य असेच मनावर ओरखडा उमटवणारे आहे. टिंग्याचे कुपोषित शरीर आणि त्याच्या हातातली बॅट याला एक वेगळाच अर्थ प्राप्त होतो.

'तिन्ही सांजेला उंबर्‍यावर बसू नये. ही लक्ष्मीची यायची वेळ असते.' या आईच्या प्रश्नाला 'लक्ष्मी म्हणजे काय आई?" या टिंग्याच्या उत्तर नसलेल्या प्रश्नाचे दृश्यही असेच.

खड्ड्यात पडलेल्या बैलाला बाहेर काढण्याचा प्रसंग काय किंवा बैल विकल्यानंतर घुंगराचा पट्टा स्वतःच्या गळ्यात घालून येणारा टिंग्या काय किंवा शेवटचा क्षण जवळ आल्याने अहेवपणाचे सगळे दागिने घालून आता शांतपणे मृत्यूची वाट पाहणार्‍या नानीच्या मृत्यूचा प्रसंग काय. हा सगळा चित्रपटच असा अगदी आतपर्यंत ढवळून आणणारा आहे.

ंटिंग्याचं काम करणारा शरद गोयकर हा मुलगा तर अफलातून. अनेक किंग, सुपरस्टार, हार्टथ्रॉब इत्यादी मंडळींनी त्याचे पाय धूवून पाणी प्यावे. या मुलाचे विलक्षण बोलके डोळे, गलबलून टाकणारं रडणं, शरीराचे हावभाव आणि बोलीभाषेतील संवाद हे केवळ अवर्णनीय आहेत. चित्रपटात असलेलं 'माझं आभाळ तुला दे हे असंच अत्यंत थोर गाणं आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला टिंग्याचा अवखळपणा, निरागसता अधोरेखित करणारं हे गाणं चित्रपटात नंतर वेगवेगळे अर्थ घेऊन समोर येतं.

टिंग्या हा एक हादरवून टाकणारा अनुभव आहे. एका लहान मुलाचे आपल्या बैलावर असलेले प्रेम आणि परिस्थितीमुळे तो बैल कसायाला विकावा लागत असल्याने त्या मुलाचे कोसळत जाणारे निराग भावविश्व, केवळ हाच चित्रपटाचा विषय नाही. जागतिकीकरणामुळे ढवळून निघणार्‍या आपल्या समाजात होणारे बदल, या बदलांशी जुळवून घेण्याची संधीच न मिळाल्यामुळे एका वस्तीतील कुटुंबाची होणारी ससेहोलपट. परिस्थितीशी अपरिहार्यपणे, निमूटपणे चाललेला त्यांचा लढा. अशा परिस्थितीत देखील आपला आत्मसन्मान न गमावता उभे राहण्याचा प्रयत्न. आयुष्याच्या रखरखाटातही मायेचा ओलावा न गमावण्याची त्यांची वृत्ती. साध्या सोप्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्याचा समजूतदारपणा. या सर्व गोष्टी चित्रपटातून ठळकपणे सामोर्‍या येतात.

विकासाच्या लखलखाटामुळे आपले डोळे इतके दिपले आहेत की अशा यातना भोगणारे अनामिक आपल्याला आता दिसतच नाहीत. आपण अद्यापही जिवंत असलो तर निदान हा चित्रपट पाहून त्यांच्या परिस्थितीच्या जाणीवेने अशांत व्हावे. आपल्याच आयुष्याबाबतची आपली समज वाढवून घ्यावी इतकी अपेक्षा करणेही फार होईल.

Comments

सुरेख!

किती छान लिखाण केले आहेस कर्णा.
अगदी लगेच पाहावासा वाटला हा चित्रपट.
मी तर पाहीनच पण इतरांनाही पाहायला सांगेन.
आपला
गुंडोपंत

+१

हा चित्रपट बघितलाच पाहिजे असे वाटत आहे.

सुंदर परिचय.

++१

खरंच!!! हा चित्रपट बघितलाच पाहिजे असच वाटतंय. अत्यंत सुंदर परिचय.

-ऋषिकेश

असेच

जबरदस्त

जबरे परीक्षण. 'टिंग्या' पहावाच आणि आता नवीन खळबळ उठवणारे काहीही पाहू नये अशी दोन्ही मते एकाच वेळी मनात आणणारे.
सन्जोप राव

टिंग्या

निर्माता मंगेश हाडवळे हा राजुरीचा. आळेफाटा-आळे-राजुरी आन बेल्हे. ओतुर म्हणजे माझे जन्मगाव. पण मी वाढलो बेल्ह्यात.बैलांच्या बाजारासाठी सुप्रसिद्ध. तीन पिढ्यांची शेती, गडीमान्सांनि भरलेलं घर. गाव नबाबाचं. आजोबा व (नंतर चुल्ते ) मुलकी व पोलिस पाटील. या माझ्या पार्श्वभुमीवर मला या चित्रपटाने नॉस्टल्जिक बनवले. ट्रॅक्टर आपल्या वावरात येईल म्ह्जी मंग आपल्या चितंग्याला सुटी; अशी वाट पहाणारा टिंग्या पुलावरुन थांबलेला ट्रॅक्टर जेव्हा वाट बदलतो तेव्हा निराश होणारा टिंग्या. 'त्वा व्हय म्होरं मपला मी येतु मागन' अस म्हणून मोठ्या भावाला कटवणारा टिंग्या. " मोठी मान्स समदी ख्वटाल्डी" "आत्ता मी बारकाये मॉठ झाल्याव मंग पघ काय कर्तो ते" असा विद्रोह व्यक्त करणारा टिंग्या. "द्यवाला सांग मपल्याला दाक्तर भेटू दे" "मपल्या चितंग्याला बरा कर" अशी विनवणी करणारा टिंग्या. बाजारला चितंग्याला घेउन जाताना चितंग्या ऐवजी स्वतःच्या पायावर फटके मारुन घेणार टिंग्या. शेवटपर्यंत चितंग्याला ईकू नये म्हनुन बाजारात बी वपायाला आल्याव सौदा फिसकटताना आनंद होणारा टिंग्या. आता सौदा काय होत न्हाई असे झाल्याव आनंदून चितंग्याला परत घेउन जाताना चौकशी करणार्‍याला "घेतला" अशी थाप मारणारा टिंग्या. अगदी शेवटी पाच हजाराला दोनशे कमी असा सौदा बाजार संपता संपता झाल्यावर टिंग्या व चितंग्याला शोधत येणारे गिर्‍हाईक जेव्हा त्याच्या हातातून चिंतंग्याला घेतो तेव्हा असहाय्य बापाला "मपला चितंग्या परतदे" असं म्हणत त्याच्या कुशीत आक्रोश करणारा टिंग्या. गावडीला ग्वॉर्‍ह झाल्याव चितंग्याच्या साळलेल्या शिंगाड्याचा तुकडा खडकाच्या कपारीतुन परत आणुन गोर्‍ह्याला चिंतंग्या नाव ठेवून आनंद व्यक्त करणारा टिंग्या.मला माझा सवंगडीच वाटला. लघुशंका करणार्‍या तीन मुलांचे दृष्य पाहिल्यावर् मला शाळेतील मुतायच्या खेळाची आठवण आली. डावखराच्या बाब्याचा मुत लई लांब जायचा. आम्ही मुतावं झाड बी जगवायचो.
जुन्नर, आंबेगाव, खेड (आता राजगुरुनगर) या उत्तर पुणे जिल्ह्यातील तालुक्यातील ग्राम्य बोली कोल्हापुर भागात निर्माण झालेल्या मराठी चित्रपटांपेक्षा वेगळीच. तिन्ही तालुक्यातील पुर्व भाग व पश्चिम भाग हा भौगोलिक दृष्ट्या वेगळा. पुर्व भागात नेहमीच दुष्काळ असे . जुन्नर तालुक्यात मुस्लीम बहुल भाग हा खूप आहे. हा समाज इथल्या मातीशी एकरुप झालेला आहे. मुंडास व नौवारी घालताना दाढी वाढलेलि -मिशीचा साफ कट व कानातले बहुरंध्रांकित पाळीवरचे दागिने, खेडवळ मर्‍हाटी भाषा असा हा साज या भागात दिसून येतो. चित्रपटात उर्दू मिश्रित मराठी टाळलेले दिसते.
चित्रपट संपल्यावर मला कालकुपीतून बाहेर आल्यासारखे वाटले. शरद गोयकर या बालकलाकाराचा इतरांच्या दृष्टिने असलेला अभिनय हा माझ्यासाठी मात्र वास्तवच होता
( चितंग्यासाठी दोन आसु ढळलेला)
प्रकाश घाटपांडे

वा

प्रकाशराव, काय सुंदर प्रतिसाद दिला आहे.
मलाही हा चित्रपट संपल्यावर कालकुपीतून बाहेर आल्यासारखे वाटले.

मपल्या गावाची लई आठवन झाली.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

बासुंदीतल्या चारोळ्या

प्रकाशराव, तुमचा प्रतिसाद म्हणजे आजानुकर्णाच्या बासुंदीतल्या पिस्ते- चारोळ्यांसारखा आहे.
सन्जोप राव

सुंदर परीक्षण

चित्रपट पहायलाच हवा. वळू पाहिला. आवडला. पण पटकन संपला असे वाटले.

मी गमभन शब्दसंपदा कधीकधी वापरते.

वा!वा!वा! आणि अरेरे!

इतका आशयगर्भ विषय इतक्या चपखल पार्श्वभूमीवर इतक्या सूक्ष्म पद्धतीने हाताळल्याबद्दल निर्माते मंगेश हाडवळे आणि त्यांच्या सहकार्‍यांचे अभिनंदन.
आणि आजानुकर्णाचे हे रसग्रहण तर एकदम वा! वा!
त्यात घाटपांड्यांचा साजिरा प्रतिसाद! वा!

पण हा चित्रपट इथे पाहता येत नाही म्हणून अरेरे! अरेरे!

मस्त

चांगल्या चित्रपटाची सुंदर ओळख. प्रकाश काकांचा अतिशय सुंदर प्रतिसाद.

विसुनाना निदान "बघायचे सिनेमे" या यादीत तरी हे नाव टाकता आले.

असाधारण दिग्दर्शक

टिंग्या पाहण्यापूर्वी असं वाटलं होतं की मराठीमध्ये बैलांवर चित्रपट बनविण्याचा ट्रेंड सुरु होतोय की काय? सहज म्हणून टिंग्या बघायला गेलो. तिकिटखिडकीवर चित्रपट सुरु व्हायच्या फक्त पाच मिनिटे आधी पोहोचलो तरी तिकिट मिळालं.

मध्यंतरापर्यंत छोट्या छोट्या प्रसंगांतून टिंग्या आणि चितंग्याचं नातं तसंच टिंग्याचा बापाची घालमेल उलगडत नेली आहे. रात्री उठून एकटाच बाहेर बसलेला टिंग्याचा बाप आणि मागे कडकलक्ष्मीचा बुंगबुंग आवाज. पुढे फासाचा दोर. शहरी यांत्रिकतेमुळं डोळ्यांतलं पाणी गेली कित्येक वर्षे आटून गेलं होतं ते बाहेर आलं. हुंदका आवरला तरी डोळ्यातील पाण्याला कोण अडवणार आणि अडवावंही का?

टिंग्या आणि रशिदा. जेव्हा टिंग्या चितंग्याला विकून येतो तेव्हा नानीही गेलेली असते. गळ्यात चितंग्याची माळ घालून पळत येणारा टिंग्या आणि इकडून येणारी रशीदा एकमेकासमोर येऊन थबकतात तो शॉट अप्रतिम आहे. दोघांचीही आपापली दु:खे आहेत. "माझं आभाळ तुला घे तुझं आभाळ मला" हे गाण मागे वाजतंय आणि सूर्य पश्चिमेकडे कललाय. सर्व जाणिवा स्तब्ध होऊन जातात या क्षणी.

आज हे लिहितोय पण चित्रपट बघून एक आठवडा झाला आहे. पण कंठ तसाच पुन्हा पुन्हा दाटून येतोय..स्वतःच्याच कबरीवर लावायला दगड कोरत बसलेले नाना-नानी आठवताहेत.

अभिजित...

सुंदर परीक्षण

खूपच सुंदर परीक्षण. बघायलाच हवा असा पिक्चर.. या आठवड्यात जमवणारच बघणे.

मी देखिल लहानपणी गाईबैलांमध्ये वाढले आहे. आजही गावी जेव्हा आमच्या गाईला वासरी/गोर्‍हा होतो तेव्हा माझा आणि आऊचा अर्धापाऊण तास फोन चालतो वर्णन ऐकतऐकवत. गोर्‍ह्याच्या बदल्यात वासरी घेतली असली तरी देवाच्या कृपेने कधी कोणाला कसायाच्या हाती विकायची वेळ आली नाही पण तशी काही कारणाने आल्यास कशी मनःस्थिती होईल, याचा विचार करूनच मन थिजून जाते आहे. चार-एक दिवसात आमची गोदा व्यायची आहे.. गोर्‍हा झाला तर 'चितंगा' नाव ठेवायचा विचार घोळतो आहे आता मनात. :-)

एव्हढ्या दुरून...

हा अप्रतिम चित्रपट परिचय आणि त्यावर उत्स्फूर्तपणे आलेले प्रतिसाद -विशेष करून घाटपांडे, अभिजीत आणिअ वेदश्री ह्यांचे--- हे सर्व वाचून कुठेतरी आपल्या मातीची अनिवार ओढ लागून राहिली आहे. टिंग्या हा माझ्या मातीचा चित्रपट आहे, हे ह्या सर्वावरून तीव्रपणे जाणवले. म्हणून तो बघायलाच हवा.

ह्या लेखाबद्दल कर्णाचे धन्यवाद मानावे तितके थोडेच.

अभिनंदनासोबत आभार

वर सर्वांनी वेगवेगळ्या पद्धतीने अभिनंदन केल्यावर माझ्यासाठी फारच कमी शब्द उरले आहेत. म्हणूनच अभिनंदनासोबत आभार मानतो. आजानुकर्णाच्या परिक्षण वा रसग्रहण शैलीचे वैशिष्ट्य म्हणजे नेमक्या शब्दात तो विषयाचा आवाका मांडून वाचकांना संपूर्णतेची अनुभूती देतो आणि त्याच वेळी त्यांना ती कलाकृती प्रत्यक्ष अनुभवण्यास भाग पाडतो.
खरोखरच अप्रतिम परिक्षण..... अजून काय लिहू!

एक सूचना: मला वाटतं प्रकाशकाकांच्या व अभिजितच्या प्रतिसादातील काही मुद्दे घेऊन (तसेच यानंतर काही उपयुक्त जोड प्रतिसाद आल्यास त्यातील योग्य तो भाग घेऊन) तुझे परिक्षण पुन्हा संकलित करुन निर्मात्यांकडे पाठविल्यास ते त्यांच्या पीआर एजंसी मार्फत सदर परि़क्षण वृत्तपत्रांकडे पोहचविण्याचा प्रयत्न करतील. त्याचबरोबर उपक्रम चालकांनी 'मित्रांना कळवा' अशी लिंक लेखाला देण्याची व्यवस्था केल्यास अधिकाधिक लोकांना पाठविता येईल. सोबतच उपक्रमावर नवीन सदस्य येण्यास नवा मार्ग तयार होईल.
जयेश

+१

>> वर सर्वांनी वेगवेगळ्या पद्धतीने अभिनंदन केल्यावर माझ्यासाठी फारच कमी शब्द उरले आहेत.

काय लिहू ? शब्द संपले आहेत. 'कर्ण आणि घाटपांडे यांचे मनःपूर्वक आभार, इतकेच म्हणतो.

वा..

वा कर्णा,परीक्षण तर उत्तमच ! चित्रपट कधी पाहता येईल त्याची वाट पाहणे आले.
स्वाती

मस्त रे !!!

कर्णा, टिंग्याचं परिक्षण झकास झालं आहे.
आपल्या परीक्षणाने दुसरा चित्रपट पाहण्याची उर्मी झाली. यापुर्वी 'वळू' आणि आता 'टिंग्या'
सुटीतल्या उपक्रमात याची नोंद करुन ठेवली :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अशांत


विकासाच्या लखलखाटामुळे आपले डोळे इतके दिपले आहेत की अशा यातना भोगणारे अनामिक आपल्याला आता दिसतच नाहीत. आपण अद्यापही जिवंत असलो तर निदान हा चित्रपट पाहून त्यांच्या परिस्थितीच्या जाणीवेने अशांत व्हावे. आपल्याच आयुष्याबाबतची आपली समज वाढवून घ्यावी इतकी अपेक्षा करणेही फार होईल.

या अशांततेतुनच सामाजिक संवेदना निर्माण होवो. २०२० साली भारत महासत्ता निर्माण होण्याची स्वप्ने आपण बघतो आहोत. तो कुठला भारत आहे?
प्रकाश घाटपांडे

२०२० साली भारत महासत्ता

याचा अर्थ असा कि त्यावेळी भारत जगाच्या दृष्टीने एक राखीव देश असेल. ग्लोबल व्हिलेज संकल्पने मुळे जगावर एकेका देशाचे राज्य येइल. २०२० साली भारतात १००% आरक्षण असेल (त्यावेळी ज्यांना आरक्षण नाही ते भारतात नसतील). २०२० हे साल मग भारतीयांसाठी राज्य करण्यासाठी आरक्षीत करण्यात येइल. म्हणून २०२० साली भारत महासत्ता असेल असे म्हटले जाते. तो हा भारत आहे. :) ह. घ्या.

सुरेख परीक्षण

योगेश, सुरेख परीक्षण! प्रकाशराव आणि अभिजित यांचे प्रतिसादही आवडले.

:-(

नुसतं परिक्षण वाचूनच गलबलून जायला झालं !!
चित्रपट पहायला हवा असं वाटतंय, पण पाहवला जाईल असं नाही वाटत आहे.

सुंदर परिक्षण कर्ण !

वाहवा!

फारच सुंदर परिक्षण. घाटपांडे आणि अभिजीतचे प्रतिसादही सुरेखच. चित्रपट पाहण्याची अनिवार इच्छा झाली.

प्रेम!

टिंग्या हा चित्रपट बर्‍याच लोकांना आवडला तो त्यातल्या कथेमुळे आणि त्यातील कलाकारांच्या अभिनयामुळे. विशेषतः टिंग्याच्या भूमिकेतील बालकलाकाराच्या अभिनयामुळे. मी स्वतः चित्रपट पाहात नसल्यामुळे माझे स्वतःचे असे ह्याबाबत काहीच मत नाही.आत्तापर्यंत इतरांकडून ऐकलेल्या मतांमध्ये जरा वेगळे वाटलेले आणि विचारप्रवृत्त करणारे हे मत वाचल्यावर ते आपल्यासमोर मांडावे असे वाटले.
त्या चित्रपटाच्या कथेसंबंधात आणि एकूणच आपल्या प्रेक्षक मंडळींबद्दल एक गमतीदार तरीही वास्तववादी वाटणारा हा अभिप्राय वाचा.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

 
^ वर