कर्माचा सिद्धांत - २
कर्माचा सिद्धांत - २.
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन |
मा कर्मफलहेतुर्भू: मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ||
- (श्रीमद्भगवद्गीता २.४७).
श्री. गुंडोपंत ह्यांनी आरंभिलेल्या चर्चेस प्रतिसाद देताना माझ्याकडून हा श्लोक उद्धृत केला गेला. त्यानंतर त्यावर चिंतन करतांना असे लक्षात आले, की (बहुधा) ह्या श्लोकाचा अर्थ करण्यांत लोक चुकले असावेत. जवळजवळ प्रत्येकजण त्याचा 'कर्म कर, परंतु फलाची अपेक्षा करूं नकोस' असाच अर्थ करतो. हा अर्थ (Interpretation) चूक असावा असे आता मला वाटत आहे.
भगवंताने अर्जुनासमोर श्रीमद्भगवद्गीता गाइली त्याचे कारणच मुळी भगवंताला काही एक निश्चित फल अपेक्षित होते. अर्जुनाने संन्यस्तवृत्ती टाकून योद्ध्याप्रमाणे हाती शस्त्रास्त्रे घेऊन न्याय्य कारणाकरिता युद्ध करावे ही भगवंताची (रास्त) अपेक्षा होती. आणि स्वतः भगवंतानेच तसे श्रीमद्भगवद्गीतेत अनेक ठिकाणी सांगितलेले आहे.
असे असतांना भगवंत स्वतःच 'कर्म कर, परंतु फलाची अपेक्षा करूं नकोस' असे कसे काय म्हणेल? ;-)
ह्यावर आपले काय विचार आहेत?
          
Comments
मला वाट्ले
भाग २ पाहून
मला मला वाट्ले,
वा! लगेच ५० प्रतिसाद होवून चर्चा संपली पण? ;)))
असो,
आपला
गुंडोपंत
फलाची अपेक्षा
असे असतांना भगवंत स्वतःच 'कर्म कर, परंतु फलाची अपेक्षा करूं नकोस' असे कसे काय म्हणेल?
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन |
मा कर्मफलहेतुर्भू: मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ||
- (श्रीमद्भगवद्गीता २.४७).
यात सुरवातीसच "कर्म करण्यावरील अधिकार" सांगीतला आहे. पण फळ मिळण्याबाबत मात्र तेच फळ मिळाले पाहीजे असा हट्ट केलास तरी त्यावर अधिकार गाजवता येणार नाही कारण त्यातून काय फळ मिळेल ते आधीच सांगता येणार नाही. आर्शविद्यागुरूकुलमच्या स्वामी दयानंद सरस्वतींचे १०-१२ वर्षांपूर्वी व्याख्यान ऐकले होते. खुप छान आणि मिश्कील व्यक्तिमत्व आहे ते. त्यांनी गमतीत उदाहरण देताना म्हणले होते (पुसटसे आठवते, काही चूक असल्यास माझ्या आठवणिची!) की कामाला जायला बस पकडायला म्हणून माणूस पळत पळत रस्ता ओलांडून समोरच्या बसस्टॉपवर जात असतो. त्यातील एखाद्याला बस मिळू शकेल, तर दुसर्याची चूकेल तर तीसरा कोण जाणे त्याच बसच्या अथवा इतर कुठल्या वाहनाच्या खाली येऊ शकेल. पण यातील सर्व शक्यता असल्या तरी शेवटी स्वतःचे बस पकडण्याचे कर्तव्य तो नोकरदार करतोच! तो विविध फळांच्या मिळण्याच्या काळजीत/वासनेत अडकत नाही...
थोडक्यात असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी या हेतूने जगून चालत नाही, तर फळ काय मिळेल अथवा मिळेल का, याची चिंता न करता स्वतःची कर्तव्ये / कर्मे ही करावीच लागतात. श्रीकृष्णाने अर्जूनास गीतेत सतत कर्म (युद्ध/संघर्ष) करायला प्रवृत्त केले. झटून प्रयत्न करण्यास सांगीतले. शेवटी जगलास तर राज्य तुझे आणि लढताना मेलास तर स्वर्गसूख तुझे अशा दोन्ही चांगल्या फळांबद्दल सांगीतले. पण त्यातील कुठले मिळेल याची काही खात्री दिली नाही. त्याने फक्त त्याच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. संन्यस्त वृत्तीने म्हणजे कर्म हे कर्तव्य म्हणून करणे यावर भर दिला. एकदा का मनुष्य बंधनरहीत वृत्तीने त्याची कर्तव्ये करू लागला की त्याला त्याची कर्मे पार पाडताना मानसीक त्रास होण्याची शक्यता कमी होते कारण (चुकीच्या पद्धतीने) गुंतणे हा प्रकार संपलेला असतो.
दुर्दैवाने आपल्याकडे जेंव्हा तामसीकता वाढायला लागली तेंव्हा चुकीच्या दृष्टीने संन्यास याच गोष्टीवर भर दिला गेला. लोकमान्य टिळकांनी त्याच चुकीच्या भावनेवर प्रहार करताना गीता रहस्य लिहीले ज्यात कर्मावर भर दिला - संन्यास्त वृत्तीचे (चुकीचे) महत्व बाजूस करत. परीणामी त्यांना धर्ममार्तंडांना सामोरे जावे लागले. पण त्याने त्यांची पर्वा बाळगली नाही. स्वतःचा कर्मयज्ञ आरंभला होता. स्वातंत्र्याच्या ध्येयाने आणि हे जाणून की ही फलप्राप्ती स्वतःच्या आयुष्यात स्वतःस बघायला कदाचीत मिळणार नाही...
स्वतः श्रीकृष्ण पण गीताई सांगताना त्याचे कर्मच करत होता. त्याला खरेच देव मानले तर तो "विनाशायंच दुश्कृताम्" करायला जन्माला आला होता. म्हणून असे नाही तर् तसे, तो अर्जूनास समजावून सांगतो - या अपेक्षेने की तो आपले ऐकेल. पण तरी देखील शेवटी, असेही म्हणतो की:
एकंदरीत गीता ही एका श्लोकावरून निरूपण करणे हे कदाचीत "आउट ऑफ कॉन्टेक्स्ट" ठरू शकेल आणि ती वाचताना आपण निष्क्रीय होत आहोत असे जाणवू लागले तर सरळ तो ग्रंथ आपल्यासाठी नाही म्हणत बाजूस ठेवून द्यावा असे म्हणावेसे वाटते!
काय
काय छान लिहिलेत हो विकासराव!
एकदम मास्टरपीस लिहून गेलात.
आवडली ही प्रतिक्रीया खूप!
दोन् वेळा वाचली...
वाचायला फार छान वाटतेय.
अजून लिहा ना तपशिलात जावून.
आपला
गुंडोपंत
+१
पुर्ण सहमत.
प्रतिसाद आवडला
उत्तम उदाहरण.
अपेक्षा ठेवून कर्म करणे ह्यास बहुधा भगवंताची ना नसावी.
अपेक्षा ठेवून कर्म करणे ह्यास बहुधा भगवंताची ना नसावी.
१.
आपले उदाहरण अगदी चपखल असे आहे. धन्यवाद. आपण 'अपेक्षा ठेवून कर्म करणे ह्यास बहुधा भगवंताची ना नसावी' ह्या मुद्द्यावर वर चर्चा करित आहोत. आपल्या उदाहरणातील मनुष्यदेखील एकावेळी एकच अपेक्षा ठेवून बस मागे धावण्याचे त्याचे विहितकर्म करितोच आहे. एकाचवेळी तीन अपेक्षा ठेवून बस मागे धावण्याचे म्हटल्यास त्याची फजितीच व्हावयाची!
तर मुद्दा असा, की हा मनुष्य एकावेळी एकच विशिष्ट अपेक्षा मानसीं बाळगून बस मागे धावू शकतो. त्याला त्याच्या कर्माचे फल काय मिळेल हे त्याच्या हातीं नाही. परंतु विविध फलप्राप्तीच्या काळजीत/वासनेत तो अडकत नाही. एकच विशिष्ट अशी अपेक्षा मानसीं बाळगून तो त्याचे विहितकर्म करू शकतो. नव्हे, तो तसे करतोच.
२.
ह्याबाबत अजिबातच वाद नाही.
३.
हेही बरोबरच आहे. संदर्भासाठी निम्नलिखित श्लोक उद्धृत करतो आहे.
हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् |
तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः ||
- (श्रीमद्भगवद्गीता २.३७).
४.
"स्वतः श्रीकृष्ण पण गीताई सांगताना त्याचे कर्मच करत होता", हे बरोबर. परंतु "स्वतः श्रीकृष्ण पण गीताई सांगताना अर्जुनाचे मन वळविण्याची कामना मनीं बाळगूनच त्याचे कर्म करत होता", असे म्हटल्यास ते अधिक बरोबर ठरावे.
५.
महत्त्वाचा मुद्दा आहे. ह्याबाबतींतले माझे म्हणणे सोपे करून सांगण्यास एक उदाहरण देतो.
प्रस्तुत काळांत कायद्याच्या क्षेत्रांत अनेक अधिवक्ते खटल्यातली आपापली बाजू न्यायाधीशासमोर मांडतांना असे करतांत, की प्रथम आपल्या बाजूचे सर्व मुद्दे मांडावे. प्रतिपक्षाचे संभाव्य प्रश्नदेखिल गृहित धरून आपणच ते (प्रतिपक्षाचेही आधी) विचारांत घ्यावे, त्याचे विश्लेषण करावे. असे करत सर्व बाजू सर्वप्रकारे बंद करित-करित यावे. आणि आपल्याला हवे त्या मुद्द्यावर न्यायाधीशाचे लक्ष वेधले गेले, की मग असे म्हणावे:
हे न्यायदेवते, असे गूढाहुनी गूढ बोलिलो ज्ञान मी तुज । ध्यानी घेऊनि ते सारे स्वेच्छेने योग्य ते करी ||
आता न्यायदेवतेसमोर अशी परिस्थिती येते, की दुसरा कोठलाच मार्ग उपलब्ध नसतो. कितीही स्वेच्छेने योग्य ते करूं म्हटले, तरीही 'योग्य म्हणजे काय' हे अधिवक्त्याने ठरवून दिलेले असते. कायद्याच्या चाकोरीत ते असेल, तर अमान्यदेखिल करतां येणार नसते. सरतेशेवटी स्वेच्छेने असेच म्हणत त्या न्यायाधीशाने जे अधिवक्त्याने ठरवून दिलेले आहे, तेच मान्य करणे भाग पडते.
तरीही, प्रत्येक न्यायाधीश अशीच भूमिका घेईल असे सांगणे अवघड आहे.
म्हणजेच काय, की, फलप्राप्तीची आशा मनीं बाळगून कार्य करतां येते. ते मिळणे, न मिळणे मात्र आपल्या हातीं नाही.
कसे म्हणतां? अपेक्षा ठेवून कर्म करण्यास भगवंताची ना कां बरे असावी?
कोणी एका श्लोकावरूनच संपूर्ण श्रीमद्भगवद्गीतेचे निरूपण करावें अशी माझी इच्छा नाही, परंतु स्वतःला निदान एक श्लोकतरी पूर्णपणे उमगावा अशी मात्र इच्छा खचितच आहे.
हैयो हैयैयो!
अपेक्षा
सर्वप्रथम मराठीतील गीताईतील अनुवादः
कर्मात चि तुझा भाग तो फळात नसो कधी । नको कर्म-फळी हेतु अकर्मी वासना नको ॥ ४७ ॥
यात विनोबांनी "हेतू"आणि "वासना" हे शब्द वापरले आहेत.
कसे म्हणतां? अपेक्षा ठेवून कर्म करण्यास भगवंताची ना कां बरे असावी?
अपेक्षा ठेवणे आणि त्यात गुंतून जाऊन म्हणजे वासना तयार करणे यात फरक आहे. अर्जूनाला लढाई करायला सांगताना कृष्णाने (आणि त्याचे ऐकून नंतर अर्जुनाने) कुठे "whatever!" असे म्हणले नाही. मन लावून प्रयत्न कर, जिंकलास तर राज्य मेलास तर स्वर्ग उपभोगशील असे कृष्ण म्हणाला. "जिंकलास तरी तंगडे पण मोडू शकते. तेंव्हा बघ बाबा, विचार कर..."असे काही तो म्हणत नव्हता. किंबहूना असला "भलता शोक " करण्यापासून तो अर्जूनास परावृत्त करत होता.
वासनेने बांधलेले अ-कर्म (ज्ञानेश्वरांनी याला "कुकर्म" म्हणले आहे) हे माणसाची वृत्ती त्याच्याच विनाशाला कारणीभूत ठरवते. अर्थात हा सर्व प्रकार वर्तमानातील घटना पाहताना नको इतका गूढ होऊ लागतो. त्यासंदर्भात अनेक उदाहरणे देता येतील पण इतकेच म्हणीन की त्याचा अर्थ लावत न बसता स्वतःची कर्मे आणि कर्तव्ये ओळखून वागत रहाणे, कारण परत गीता अध्यात्मिक ज्ञानाचे साधन आहे रीलीजियस या अर्थी धार्मिक नाही. रिलीजियस या अर्थी जे काही वागणे असते ते वैषयिक आणि बाहेरील क्रियांवर आपली प्रतिक्रीया म्हणून असते (देवा मला अमूक मिळाले तर मी तमूक करेन अथवा इतर धर्मांच्या बाबतीत तसेच) तर अध्यात्मिक ज्ञान हे स्वतःच्या क्रियांनी स्वतःचा उद्धार करत इतरांचे चांगभल करण्यावर भर देते. म्हणूनच गीतेत प्रत्येक गुणावगुणांवर चर्चा करताना त्यातून होणारी लाभ-हानी सांगितली आहे.
धन्यवाद
- ह.भ.प. विकोबा महाराज बॉस्टनकर
माझे विवेचन
कृपया माझा उपक्रमवरील २ सप्टेंबर २००७ चा "कर्मण्येवाधिकारस्ते...." हा चर्चाप्रस्ताव पहावा.
अन्वय आणि अर्थ
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन |
मा कर्मफलहेतुर्भू: मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ||
.........
अन्वयः-
ते अधिकारः कर्मणि एव (अस्तु)| फलेषु कदाचन मा (अस्तु)|
(त्वं) कर्मफलहेतु: मा भू:|(तथैव च)ते संगः अकर्मणि मा अस्तु|
.....(येथे 'ते' हे तव चे वैकल्पिक रूप आहे. ...अर्थः तुझा )
.............
अर्थ :---
तुझा अधिकार कर्म करण्यापुरताच असूं दे. त्याच्या फळाविषयी कधीही नको.
तू "कर्मफळ मिळण्याचे उद्दिष्ट ठेवणारा" होऊ नकोस.तसेच अकर्माविषयी (कर्म नकरण्याची) तू आसक्ती ठेऊ नकोस.
.....
मात्र ज्याला कर्मसिद्धान्त म्हणतात तो हा नव्हे. संचित वाढू न देण्याचा हा उपाय आहे
अन्वय आणि अर्थ
बरीचशी निरुपणे ही 'अन्वयार्थ' यातूनच उदभवलेली आहेत. पुढे पारायणातून त्याला 'अभिप्रेत' अर्थ प्राप्त झाले. यनावालांनी सांगितलेला अन्वय व अर्थ हा 'अनर्थ' ओढवण्यापासून वाचवतो.
प्रकाश घाटपांडे
कर्मफलहेतु
कर्मफलहेतु
कर्मफलहेतु हा शब्द बहुव्रीही समासाचा की द्वंद्व समासाचा? दोहोंचे अर्थ वेगळे होतात. त्यानुसार श्लोकाच्या अर्थात किंचित अंतर पडते.
-
हैयो हैयैयो!
बहुव्रीहिच
द्वंद्व सामान्यपणे एकवचनात दिसत नाही. समाहार-द्वंद्व एकवचनात असते, पण नपुंसकलिंगात असते.
"कर्मफल ज्याचा हेतू असा (तू)" असा एकच बहुव्रीहि अर्थ (ओढाताण न करता) निघतो.
"हेतु"चा संस्कृतात अर्थ मराठीतल्यापेक्षा थोडा वेगळा आहे, हे लक्षात असू द्यावे!
हेतु
हेतु
कृपया 'हेतु'चा मराठी तसेच संस्कृत अर्थ, तसेच त्यांतील अंतर सांगावे. श्लोक मूलत: संस्कृतभाषेत असल्याने आपण संस्कृत भाषेतील अर्थच ग्राह्य अधरणार हे निश्चित, तरीही मराठीभाषेत काय अर्थ होतो हे जाणून घेण्याची आस आहे.
धन्यवाद.
हैयो हैयैयो!
आस
...तरीही मराठीभाषेत काय अर्थ होतो हे जाणून घेण्याची आस आहे.
आपल्याच वरील वाक्यात आलेला शब्द हा ज्ञानेश्वरांनी मराठीत टिका करताना ग्राह्य धरला आहे.
परी कर्मफळीं आस न करावी । आणि कुकर्मी संगति न व्हावी । हे सत्क्रियाचि आचरावी । हेतूविण ॥ २६६ ॥
विनोबांनी "हेतू" हाच शब्द घेतला आहे. अजून पण कोणी काही अर्थ लावू शकतील.
मथितार्थ बरोबर
(ज्ञानेश्वरांना स्वयंभू प्रतिभाही होती. त्यांनी भावार्थदीपिका लिहिली, शब्दार्थदीपिका नव्हे. त्यामुळे त्यांचे म्हणणे अभ्यासण्यासारखे असते, अंगीकारण्यासारखे असते. त्यांना स्वतःच्या वृत्ताचे बंधन होते, इ.इ. या ठिकाणी "हेतु"="आस" हा फारच चपखल भावार्थ आहे, अत्यंत योग्य आहे, तरी तो शब्दार्थ नाही. इतकेच काय ज्ञानेश्वरांच्या भावार्थाच्या योग्यायोग्यतेचा निर्णय करण्याची माझी पायरीही नाही.)
तसेच तुमचे, किंवा यनावालांचे अर्थ ठीक आहेत.
"हेतू" आणि "कारण" शब्दांचे अर्थ बर्यापैकी एकसारखे आहेत. अमरकोशात "हेतुर्ना कारणो..." असे ते दोन्ही शब्द एकाला लागून एक सांगितलेले आहेत. तरी त्यांच्या अर्थच्छटांतला फरक व्यवहारात पुष्कळ महत्त्वाचा असतो.
कार्यकारणभावाच्या साखळीमध्ये काही "आधी" असतात आणि काही "नंतर". पैकी ज्या गोष्टी आधी असतात, त्यांना संस्कृतमध्ये "कारण" म्हणतात, तर ज्या "नंतर" असतात त्यांना संस्कृतमध्ये "हेतु" म्हणतात. संस्कृतात "हेतु" ही हवी असलेली वस्तू असते, हा मूळ अर्थ. आणि काव्यात (कधीकधीच) त्या आशेला "हेतु" म्हटले जाऊ शकते. वरील श्लोकात तसे म्हटलेले नाही. "हेतु" नेहमीच्या संस्कृत अर्थाने "कर्मफल" ही हवी-असलेली-वस्तूच आहे. मराठीतला "उद्दिष्ट" हा शब्द अर्थाच्या दृष्टीने संस्कृतातल्या "हेतु" शब्दाच्या जवळ जातो.
कर्मफलहेतु = कर्मफल ज्याचा हेतु=उद्दिष्ट असा (माणूस)
"उद्दिष्ट असणारा माणूस" हा "उद्दिष्टाची आस असणारा माणूस" असतो त्यामुळे या ठिकाणी भावार्थात "आस" असे म्हणणे अत्यंत यथार्थ आहे.
मराठीत "हेतु" शब्द साधारणपणे उद्दिष्ट-वस्तूच्या संदर्भात वापरत नाहीत, तर काम करणार्या माणसाच्या मनातील प्रेरणेबद्दल वापरतो.
उदा :
मनातल्या लालसेमुळे धनासाठी चोराने चोरी केली.
येथे संस्कृतात "कारण"=लालसा, "हेतु"=धन - म्हणजे पुढील प्रश्नोत्तरे योग्य ठरतील.
किं कारणम् अत्र चौर्यप्रसङ्गे? लालसा कारणम् ।
को हेतुर् अत्र चौर्यप्रसङ्गे? धनं हेतु: । (धनप्राप्राप्तिर् हेतुर् वा) ।
मराठीत असे प्रश्नोत्तर होऊ शकेल
या चोरीच्या मामल्यात कारण काय होते? धन (किंवा धनप्राप्ती) हे कारण होते.
या चोरीच्या मामल्यात हेतू काय होता?धनाची लालसा (धन मिळवण्याची इच्छा) हा चोराच्या मनातला हेतू होता.
काही प्रमाणात अर्थच्छटांची आदलाबदल झाली आहे. मराठीत या बाबतीत संदर्भाला फार महत्त्व आहे.
निर्हेतुक घटनांना कारणे असू शकतात. "उदा : पाऊस पडण्याचे कारण जलचक्र आहे." (या ठिकाणी संस्कृत आणि मराठी अर्थ एकच आहे, हे लक्षात घ्यावे.)
अन्य भाषांमध्येही या दोन अर्थच्छटा व्यवहारात उपयोगी दिसतात. इंग्रजीत कार्यकारणभावाच्या साखळीत जे आधी येते त्याला "रीझन (reason)" म्हणतात, जे नंतर येते त्याला "पर्पझ (purpose)" म्हणतात. त्यांच्या अर्थातला सूक्ष्म पण महत्त्वाचा फरक व्यवहारात उपयोगी पडतो.
My reason for coming here is that my boss sent me.
My purpose for coming here is to deliver the goods.
वगैरे, वगैरे, सर्व अति-अवांतर गोष्टी.
कदाचीत...
वर छान अर्थ समजावून सांगीतला.
त्यातील "लालसा" हा शब्द बघितल्यावर विनोबांनी "...अकर्मी वासना नको" असे शेवटी म्हणताना "वासना" हा शब्द का वापरला असावा ते कळते.
"हेतुर्ना कारणो..." ?
'कारण' शब्द पुल्लिंगीपण आहे?--वाचक्नवी
धन्यवाद : माझे चुक अवतरण - शुद्ध असे
हेतुर् ना कारणं बीजं निदानं त्वादिकारणम् ।
धन्यवाद.
हेतु
हेतु
अधिक शोधू पाहता 'हेतु' म्हणजे object असा अर्थ केल्याचे सुद्धा आढळले. म्हणजे 'तूं कर्मफलाचा हेतु होऊ नकोस', अथवा, 'तूं कर्मफलाचा object होऊ नकोस' असे. म्हणजे कर्माच्या फलास बळी पडू नकोस असे घ्यावे काय?
मी ज्ञानेश्वरी वाचलेली नाही. विनोबा भावेंची गीताईदेखिल वाचलेली नाही. परंतु तमिऴभाषेत (माझी मातृभाषा) भगवद्गीतेचे साष्टांग विवेचन-विश्लेषण मात्र वाचले आहे. सांगावयाचा उद्देश एवढाच, की ज्ञानेश्वरी गीताई इत्यादींतले संदर्भ जड जातात. (जड मराठीशी परिचय नसल्यामुळे.)
धन्यवाद.
हैयो हैयैयो!
शाङ्करभाष्य
तुम्ही म्हणता तसा object अर्थ बरोबर आहे.
तुमच्या मते कर्मफलहेतु: ची फोड "कर्मफलस्य हेतु:" अशी आहे.
व्याकरणाच्या दृष्टीने असा काही अर्थ जरूर होऊ शकेल. पण प्रत्यक्षात तो तसा नसावा. मराठी व्याख्याकार (ज्ञानेश्वर, विनोबा) सोडून आपण संस्कृतातले भाष्यकार शङ्कराचार्य काय म्हणतात ते बघू.
शङ्कराचार्य "कर्मफलहेतु:" ची फोड "कर्मफलप्राप्तेर् हेतु:" अशी करतात (म्हणजे थोडीशी तुम्ही म्हणता तशी - तुम्ही म्हणता "कर्मफलस्य हेतु:"). पण "प्राप्ति" हा महत्त्वाचा "भावार्थ" घातल्यामुळे शङ्कराचार्यांचा अर्थ ज्ञानेश्वर/विनोबा आणि वर यनावालांनी दिलेल्या अर्थाशी जवळजवळ सारखा होतो.
काही शंका राहू नये म्हणून शंकराचार्य पुढे स्पष्ट म्हणतात :
"यदा हि कर्मफलतृष्णाप्रयुक्तः कर्मफलं न इष्यते ..."
मराठी अर्थ : "जेव्हा कर्मफल-तहानेने-प्रयुक्त-असलेला कर्मफळाची इच्छा करत नाही..."
इथे "तू"(=अर्जुन) हा कर्मफळाचे object नसून कर्माच्या फळाची तहान हे प्रयोजन असलेला असा अहे, तसा होऊ नकोस, असे कृष्ण म्हणतो.
तुम्ही म्हणता तो "कर्मफलस्य हेतु:" हा अर्थ संदर्भात बसवणे फारच कठिण जातो - मागच्या पुढच्या वाक्यांशी, श्लोकांशी तफावत येते.
(गीताभाष्यातून मी निवडलेले शब्द आणि माझे भाषांतर पटेल न पटेल, म्हणून मूळ पाठ्य दिलेले आहे.)
शांकरभाष्य
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.धनंजय यांनी शांकरभाष्यातील अवतरणे दिली. खरेच किती सोपे संस्कृत आहे.! कोणालाही समजावे. त्यांनी रचलेली स्तोत्रें अशीच प्रासादिक असतात. पूर्वी एका नातेवाईकाकडून हे भाष्य आणून वाचले होते.पण मी ते चुकून त्यांना परत दिले.
कांही सदस्यांनी संस्कृत शिकण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यासाठी पुढील पुस्तके उपयुक्त ठरावी:
* संस्कृत स्वयंशिक्षक भाग १ ते २४..वेदव्यास श्री. दा. सातवळेकर. ( ही अल्प मूल्यांत उपलब्ध आहेत).
* गीर्वाण लघुकोश: जनार्दन वि. ओक (प्रकाशक : सरवतीबाई आपटे)
* भगवद्गीता :पदच्छेद, अन्वय, अर्थ (हिंदी) : गीता प्रकाशन गोरखपूर.
* शांकरभाष्य.
नुसते शाङ्करभाष्य ?
शाङ्करभाष्य म्हणजे प्रस्थानत्रयी.. गीताभाष्य, ब्रह्मसूत्रभाष्य आणि उपनिषदांवरचे भाष्य. यातले मधलेतरी माझ्या डोक्यावरून गेले. शेवटचे गीताभाष्यापेक्षाही सोपे वाटले. धनंजयांनी इथे फक्त गीताभाष्यातील अवतरणे दिली आहेत. संस्कृत शिकण्यासाठी ही तीनही भाष्ये शिकायला पाहिजेत असे श्री. यनावालांचा आग्रह आहे?--वाचक्नवी
शांकरभाष्य
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
संस्कृत शिकण्यासाठी ही तीनही भाष्ये शिकायला पाहिजेत असे श्री. यनावालांचा आग्रह आहे?--वाचक्नवी
नव्हे नव्हे! शांकरभाष्य म्हणजे आद्यशंकराचार्यांचे गीते वरील भाष्य. ते इतके सोपे वाटते की वाचता वाचता अर्थ (शब्दार्थ) समजतो.
धन्यवाद.
धन्यवाद.
अभ्यासपूर्ण प्रतिसादासाठी प्रत्येकास व्यक्तिगतरित्या धन्यवाद नोंदवितो. अर्थात, विषय एवढ्यावरच संपणारा नाही. तरीही आपल्या सर्वांच्या प्रतिसादामुळे, विचारास आणि एक वेगळी दिशा प्राप्त झाली. आणिक काही सुचेल तेंव्हा ते आपल्यापुढे मांडण्याची अशीच मोकळीक द्यावी.
धन्यवाद. आभार.
हैयो हैयैयो!
असं तर् नसेल्?
श्रीकृष्णाने गीतेत एका श्लोकात असं म्हटलं आहे कि "अर्जुना, तुझ्या समोर् जे सैन्य दिसतं आहे ते मी आधीच् मारलं आहे. तेव्हा त्यांच्या हत्येमुळे लागणर्या पातकाची चिंता करू नकोस.."
थोडक्यात अर्जुनाने युद्ध नाही केलंतरी दुष्टांचा नाश् करायच भगवंतांचं कार्यपार पडणार आहेच्..
गीतेचा उपदेश करून ते अर्जुनाला स्वर्गात जाण्याची किंवा राज्य भोगण्याची संधी देत आहेत्. म्हणजेच ही गीता ऐकून अर्जुनाने युद्ध करावं असं फळ श्रीकृष्णाने अपेक्षिलं नव्हतं. असं नाही का वाटत?
पातकाची चिंता?
मयैवैते निहता: पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन् । इथे पातक वगैरे काही नाही. श्रीकृष्ण म्हणतात "मी हे सैन्य आधीच मारलेले आहे, तू फक्त त्यांच्या मृत्यूचे निमित्त हो."
फळाची अपेक्षा करू नको असे श्रीकृष्ण कुठेच म्हणत नाहीत, ते म्हणतात, (अमुकच) फळावर तुझा अधिकार नाही. --वाचक्नवी
शंकेखोर -
मनाला आवरून सांप्रत कार्यावर नीट लक्ष देण्यासाठी तर हा नियम भगवानांनी सांगितला नसेल?
जसे -
सुपरवायझर कामगाराला: हां, हां, हां, हात किती थरथरतोय तुझा! लक्ष कुठाय तुझं? कामावर नीट लक्ष दे! आणि बिडी का ओढतो आहेस?
कामगारः साहेब, हे यंत्राचे भाग जोडतोय खरे. पण टेन्शन आलय. हात थरथरतोय. टेन्शन कमी करण्यासाठी बिडीचे दोन झुरके मारले.शेवटी यंत्र चालेल की नाही याची फार काळजी वाटते.
सुपरवायझर : ते यंत्र जेव्हा पूर्ण होईल तेव्हा कळेलच. आताच त्याचा विचार करून काम बिघडवू नकोस! टाक ती बिडी आणि मन घट्ट करून कामाला लाग. काही मदत हवी असेल तर मी आहेच!
यंत्र
यंत्र नीट चालवावे , बिघडल्यास दुरुस्त चालवावे , चित्त ढळू देऊ नये, हात थरथरू नये , मन घट्ट करावे हे सारे सारे तो सुपरवायझर सांगतो. यंत्र कसे चालवावे याचेही प्रशिक्षण नीट देतो. यंत्राचे स्वरूप समजावून सांगणारी अनेक मॅन्युअल्स् आहेत.... पण यंत्राचा नक्की उपयोग काय ? ते यंत्र घेऊन कुठे जावे याबद्दल फारशी माहिती कुणी देत नाही :-)
हे मी नाही , एक धारवाडकर कुळकर्णी गॉगलवाले म्हणून गेले :-)
अरे वा!
गुरुनाथराव अबाजींनी असं म्हटलं आहे.!!?
आमच्या मनातलं बोलून गेले. ;)
गहना कर्मणो गति:
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. विकास लिहितातः "वासनेने बांधलेले अ-कर्म (ज्ञानेश्वरांनी याला "कुकर्म" म्हणले आहे) ."
......
ज्ञानेश्वरीत ..."आणि कुकर्मीं संगती न व्हावी |" असे आहे हे खरे, पण " अकर्म" या शब्दाचा अर्थ 'कर्मसंन्यास, कर्म न करणे' असा आहे. संस्कृत श्लोकात तोच अभिप्रेत आहे.
....कुकर्म म्हणजे निषिद्ध कर्म.ते करू नयेच. श्री.धनंजय लिहितात त्या प्रमाणे ज्ञानेश्वरी ही भावार्थदीपिका आहे.शब्दार्थदीपिका नव्हे.
.....
"ज्ञानेश्वरी: स्वरूप,तत्त्वज्ञान आणि काव्य " यापुस्तकात लेखक म.वा.धोंड लिहितातः " व्यासांचा मागोवा घेत, त्यांची पदे पाहात्,ती स्पष्ट नसली तर भाष्यकारांना विचारीत ज्ञानदेवांना पोचायचे आहे ते गीतार्थाकडे, व्यासांकडे नव्हे.म्हणून ते व्यासांची कित्येक पदे गाळतात...त्यांचा लक्ष आहे गीतार्थाकडे....ज्ञानेश्वरी ही गीताटीका नव्हे की गीताभाष्यही नव्हे.(ती स्वतंत्र रचना आहे). ती मराठी गीताच आहे...."
अर्थ, भावार्थ, शब्दार्थ
श्री.धनंजय लिहितात त्या प्रमाणे ज्ञानेश्वरी ही भावार्थदीपिका आहे.शब्दार्थदीपिका नव्हे.
बरोबरच आहे ते. अतिशय चपखल वर्णन आणि १००% सहमत.
"ज्ञानेश्वरी: स्वरूप,तत्त्वज्ञान आणि काव्य " यापुस्तकात लेखक म.वा.धोंड लिहितातः " व्यासांचा मागोवा घेत, त्यांची पदे पाहात्,ती स्पष्ट नसली तर भाष्यकारांना विचारीत ज्ञानदेवांना पोचायचे आहे ते गीतार्थाकडे, व्यासांकडे नव्हे.म्हणून ते व्यासांची कित्येक पदे गाळतात...त्यांचा लक्ष आहे गीतार्थाकडे....ज्ञानेश्वरी ही गीताटीका नव्हे की गीताभाष्यही नव्हे.(ती स्वतंत्र रचना आहे). ती मराठी गीताच आहे...."
या संदर्भात म.वा. धोंड अथवा अजून कोणी अभ्यासू काय म्हणतात त्यापेक्षा ज्ञानेश्वरांनी स्वतःच्या या काव्याबद्दल काय म्हणले आहे ते पाहूया:
जैसे शारदियेचे चंद्रकळे- । माजीं अमृतकण कोंवळे । तें वेंचती मवाळें । चकोरतलगें ॥ ५६॥
तियापरी श्रोतां । अनुभवावी हे कथा । अति हळुवारपणे चित्ता । आणूनियां ॥ ५७॥
....
जैसा स्वभावो मायबापांचा । अपत्य बोले जरी बोबडी वाचा । तरी अधिकचि तयाचा । संतोष आथी ॥ ६४॥
तैसा तुम्हीं मी अंगीकारिलां । सज्जनीं आपुला म्हणितला । तरी सहज उणें उपसाहला । प्रार्थूं कायी ॥ ६५॥
परी अपराधु तो आणिक आहे । जें मी गीतार्थ कवळुं पाहें । ते अवधारा विनवूं लाहें । म्हणऊनियां ॥ ६६॥
....
या गीतार्थाची थोरी । स्वयें शंभू विवरी । जेथ भवानी प्रश्नु करी । चमत्कारोनी ॥ ७०॥
तेथ हरू म्हणे नेणिजे । देवी जैसें का स्वरूप तुझें । तैसें नित्यनूतन देखिजे । गीतातत्व ॥ ७१॥
थोडक्यात ज्ञानेश्वरांनी लिहीताना गीतार्थ आहे या विचारातून लिहीले होते आणि अर्थातच म्हणून त्यांना विरोध झाला आणि त्याला त्यांनी त्यांच्या पद्धतीने उत्तरही दिले. म. वा, धोंडांच्या विद्वत्तेबद्दल मला शंका नाही, आदरच आहे पण त्यांचे पुस्तक मी वाचले नसल्याने केवळ एका वाक्यावरून जशी गीता ओळखता येत नाही तसे त्या पुस्तकावरही मी भाष्य करू शकत नाही.
बाकी राहीले शब्दार्थ आणि भावार्थ या संदर्भातले चर्विचरणः या बाबतीत मला इतकेच म्हणावेसे वाटते की शब्दार्थाच्या अतिरेकाने त्या काव्याचे (आणि तसेच इतर कुठल्याही काव्याचे/साहीत्य कृतीचे) चिरफाडकेल्या सारखे होवू नये. ते जेंव्हा होते, तेंव्हा एखाद्याने शृंगाररसाने ओतप्रोत भरलेल्या काव्यावर भाष्य करताना सेक्सएज्युकेशनच्या थाटात त्याचे विश्लेषण केल्यासारखे वाटते. दोन्हीत काही मजा नाही...!
बाकी आता मला "गोट्या" आठवायला लागला: शाळेत मास्तरांनी कर्मण्येवाधिकारस्ते चा अर्थ विचारल्यावर, "कर्माचा वाद रस्त्यावर का घालावा?" असे सांगीतले होते. या चर्चेसंदर्भात हाच भावार्थ योग्य वाटतो! :-)
+१
बाकी आता मला "गोट्या" आठवायला लागला: शाळेत मास्तरांनी कर्मण्येवाधिकारस्ते चा अर्थ विचारल्यावर, "कर्माचा वाद रस्त्यावर का घालावा?" असे सांगीतले होते. या चर्चेसंदर्भात हाच भावार्थ योग्य वाटतो! :-)
आवडले. :-)
गोट्या परत वाचायला हवा.
----
"Those are my principles. If you don't like them, I have others." -- Groucho Marx
वा!
कर्मण्येवाधिकारस्ते चा अर्थ "कर्माचा वाद रस्त्यावर का घालावा?" असे सांगितले होते. या चर्चेसंदर्भात हाच भावार्थ योग्य वाटतो! :-)
चांगला शेरा!--वाचक्नवी