माझे आवडते सुभाषित

सुखस्य दु:खस्य कोऽपि न दाता
परो ददाति इति कुबुद्धिरेषा ।
अहं करोमीति वृथाभिमान:
स्वकर्मसूत्रे ग्रथितो हि लोक: ।।

भावार्थ - आपल्याला सुख किंवा दु:ख देणारे कोणीही नसते. दुसरे आपल्याला दु:ख देतात हे दुष्ट विचारांचे लक्षण आहे आणि सर्व काही मीच करतो हा खोटा अभिमान आहे. प्रत्यक्षात सर्वजण आपापल्या कर्माशी बांधलेले असतात.

कृपया माझ्या काही शुद्धलेखनाच्या चुका झाल्या असतील तर नक्की दाखवून द्याव्यात आणि आपल्याला आवडते सुभाषितसुद्धा भावार्थासह द्यावे. मी वाट पाहतो आहे.

Comments

भुजंगप्रयात

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.ऋजु यांनी दिलेले सुभाषित चांगले आहे.सर्व शब्द बरोबर आहेत.
या सुभाषिताचे वृत्त भुजंगप्रयात आहे.( भुजंगप्रयाती य चारीहि येती.) वृत्तात म्हणता येण्यासाठी पुढील प्रमाणे किंचित् बदल हवा :

सुखस्य दु:खस्य न कोऽपि दाता
परो ददातीति कुबुद्धिरेषा ।
अहं करोमीति वृथाभिमान:
स्वकर्मसूत्रे ग्रथितो हि लोक: ।।

........
मात्र या सुभाषितात जो अर्थ अभिप्रेत आहे त्याच्याशी मी सहमत नाही. "स्वकर्मसूत्रे ग्रथितो हि लोक:" हे जरी खरे असले तरी इतर लोकांकडूनही आपल्याला सुख तसेच दु:ख मिळत असते.

जगन्नियन्ता

मा. यनावाला, आपला प्रतिसाद अतिशय अभ्यासपूर्ण आहे. मी तर नुकताच पोहायला शिकायला सुरवात केलेला बालक आहे. त्यामुळे आपल्या सारख्यांची केवळ उपस्थिती सुद्धा दिलासादायक आहे.

आपली असहमति कळली पण मी तर म्हणेन इतर लोक तर नुसते टपाल आणून देणारे पोस्टमन आहेत, तो जगन्नियन्ताच सुख किंवा दु:ख आपल्याला आपल्या पूर्वसंचिताप्रमाणे धाडत असतो.

टपाल...

आपल्या श्लोकासंदर्भात वाचक्‍नवी यांनी खाली भावार्थ सांगीतलाच आहे. माडगुळकरांनी त्यांच्या प्रसिद्ध गाण्यात खालील ओळी याच श्लोकावरून घेतल्या आहेतः

माय कैकयी ना दोषी
नव्हे दोषी तात
राज्यत्याग कानन यात्रा सर्व कर्मजात
खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचितांचा
पराधीन आहे जगती पूत्र मानवाचा, दोष ना कुणाचा

फक्त यात वर यनावालांनी म्हणल्याप्रमाणे त्याचा "अक्षरशः" अर्थ घेऊ नये. त्यांच्याशी (शब्दशः अर्थ न लावण्याबाबत) सहमत आहे. रामाने भरताला समजावून सांगताना कदाचीत वर म्हणलेल्या ओळी म्हणल्या देखील असतील पण स्वत:च्या पत्नीस पळवून दु:ख देणार्‍या रावणाला त्याने टपाल देणारा एक पोस्टमन म्हणत गप्प बसणे स्विकारले नाही हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे.

कृपया हे व्यक्तिगत घेऊ नका कारण तसा उद्देश नाही. पण थोडक्यात आपले तत्वज्ञान हे शब्दशः न घेता, व्यावहारीकतेच्या पातळीवर समजावून घेता आले नाही तर त्या पासून लांब राहीला तर जास्त उत्तम असे कुणालाही सांगावेसे वाटते. त्यामुळे तत्वज्ञानाचा काही तोटा होणार नाही पण गैरसमजुतीने तत्वज्ञान न वापरल्याने आपला मात्र व्यावहारीक जगतात फायदा होवू शकतो असे कुठेतरी वाटले.

सत्व ज्ञान

थोडक्यात आपले तत्वज्ञान हे शब्दशः न घेता, व्यावहारीकतेच्या पातळीवर समजावून घेता आले नाही तर त्या पासून लांब राहीला तर जास्त उत्तम असे कुणालाही सांगावेसे वाटते. त्यामुळे तत्वज्ञानाचा काही तोटा होणार नाही पण गैरसमजुतीने तत्वज्ञान न वापरल्याने आपला मात्र व्यावहारीक जगतात फायदा होवू शकतो असे कुठेतरी वाटले

सहमत आहे. कधी कधी शब्दोच्छल केला नाही तरच भावार्थातला आनंद मिळतो. उदा. शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातुनी, चंद्र आहे स्वप्न वाहे धुंद या गाण्यातुनी ... यात जर अहो शुक्र हा ग्रह आहे , तारा नव्हे. ग्रह हा परप्रकाशित असतो. असे जर विश्लेषण करत बसलो तर गाण्यातला आनंदच गमावून बसू आणि जगण्यातलाही.
प्रकाश घाटपांडे

खरे आहे

प्रकाशरावांशी सहमत!
हेच म्हणतो,
ग्रह आहेत ते काय आपल्याला करणार?
चिखलाच्या गोळ्यांनी का नशीब बदलते?

असे जर विश्लेषण करत बसलो तर आशेतला आनंदच गमावून बसू आणी जगण्यातलाही.

आपला
गुंडोपंत

जगन्नियंता

This comment has been moved here.

नवा धागा सुरू करावा...

दुसरे पान उलटावे लागायच्या आत पुढील "सुभाषित"प्रेमीने नवा धागा सुरू करावा ही विनंती...

चुकीची दुरुस्ती

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
या सुभाषिताची चाल "मना सज्जना भक्ति पंथेचि जावे|" ..सारखी आहे असे वाटल्याने हे भुजंगप्रयात वृत्त आहे असे मी लिहिले. वास्तविक यात ११ च अक्षरे आहेत. भुजंगप्रयातात १२ असतात. हे सुभाषित उपेन्द्रवज्रा वृत्तात आहे.( ज ता ज गा गींच उपेंद्रवज्रा ).हे श्री.धनंजय यांनी माझ्या निदर्शनास आणून दिले.(व्य.नि. ने).त्यांचे आभार.

सहमत

मलाही असेच वाटते

श्लोकाचा भावार्थ

हा श्लोक अध्यात्म रामायणात २.६.६ इथे आहे. भावार्थ:-- सुख किंवा दु:ख कोणी देत नाही. दुसरा कुणी ते देतो हे वाटणे ही चुकीची समजूत आहे. मी(च सर्व काही)करतो असे वाटणे हा खोटा अभिमान आहे. प्रत्येकजण स्वत:च्या कर्माच्या धाग्याने बांधला गेलेला आहे.(प्रत्येकाला त्याच्या कर्माप्रमाणे फळ मिळत असते.)
यावर श्री यनावालांनी केलेल्या दुरुस्ती आणि टिप्पणीला माझा दुजोरा आहे. --वाचक्‍नवी

अपेक्षाभंग

मा. वाचक्‍नवी,

आपल्याकडून सुद्धा आपल्याला आवडत्या सुभाषिताबद्दल इथे लिहिणे अपेक्षित आहे आणि माझी खात्री आहे की आपण माझा अपेक्षाभंग करणार नाही.

आपल्या कसदार लिखाणाच्या अखंड प्रतीक्षेत असलेला,
ऋजु.

मा?

एखाद्याच्या नावामागे मा. लिहिले की तो माणूस चालू किंवा होऊ इच्छिणारा नगरसेवक किंवा ग्रामपंचायतीचा सभासद वाटतो. नावानंतर जी किंवा साहेब लावले की हांजीहांजी पूर्ण होते.--वाचक्‍नवी

आणि ....

मा. लावले की मा आनंदमयी सारखेही वाटतेच! ;-)

---- मुक्तचंद्ररावजी सुनीतसाहेब.

किंवा

किंवा मांसाहेब मीनाताईजी किंवा अशाच कुणीतरी.--वाचक्‍नवी.

माझी आवडती सुभाषिते.

माझी आवडती सुभाषिते.

१.
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन |
मा कर्मफलहेतुर्भू: मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ||

२.
सुखदु:खे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ |
ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि ||

३.
रथे युतानाम् परिवर्तनाय पुरातनानामिव वाहनानाम् |
उत्पत्तिभूमौ तुरगोत्तमानाम् दिशि प्रतस्थे रविरुत्तरस्याम् ||

४.
रामाभिषेके जलमाहरन्त्या हस्ताच्च्युतो हेमघटो युवत्या: |
सोपानमार्गेण करोति शब्दम् ठंठंठठंठंठठठठंठठंठ: ||

५.
जंबुफलानि पक्वानि पतन्ति विमले जले |
कपि कम्पित शाखाभ्याम् गुळगुग्गुळगुग्गुळगु ||

अजूनही अनेकानेक आहेत, पण हैयो! यूनिकोडांत लिहिणे म्हणजे एकच त्रास आहे!! ;-)

हैयो हैयैयो!

धन्यु!

जंबुफलानि पक्वानि पतन्ति विमले जले |
कपि कम्पित शाखाभ्याम् गुळगुग्गुळगुग्गुळगु ||

वा वा वा.. बरेच दिवस हा श्लोक आठवत होतो. धन्यु!

ठाठं ठठठं ठठं ठठः

ठंठंठठंठंठठठठंठठंठ

ठाठं ठठठं ठठं ठठः असे काहीतरी होते. ते तालात म्हणायला खूप मजा येते.

(तालबद्ध) आजानुकर्ण


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

ताल

ठाठंठठंठंठाठंठठंठा:

कधी कधी..

कधी कधी व्यवहारात पाळावे लागणारे (सुभाषित का ते माहीत नाही, संस्कृतभाषिक नक्की!) - आठवते तसे आणि मुक्तव्याकरण पद्धतीत (थोडक्यात चुकभूल द्या.घ्या.!)

गुरू वा बाल वृद्धैवा, ब्राम्हणं वा बहुश्रूतम्
आततायीनाम् आयांतम् हन्यत्देवा विचारयन्

भावार्थ (शब्दार्थ नाही): गुरू असोत, बाल असोत, वृद्ध असोत, ब्राम्हण असोत अथवा बहुश्रूत असोत - थोडक्यात कोणीही असोत, जर तो/ती व्यक्ती अतिरेकी पद्धतीने वागायला लागली तर त्यांना वेळीच यथायोग्य पद्धतीने थांबवणे महत्वाचे असते.

या श्लोक/सुभाषिताबद्दल एक मजेदार गोष्ट ऐकली होती, पण ती नंतर कधीतरी...

विनोदी श्लोक आठवतो

सुभाषिते स्मृतीतून या क्षणी कुठे पळून गेली कोणास ठाऊक.

पण या गमतीदार श्लोक आठवतो :

यद् उदुम्बर-वर्णानां घटीनां मण्डलं महत् ।
पीबेन् न गमयेत् स्वर्गं तत् किं क्रतु-गतं नयेत् ॥

(हा श्लोक व्याकरणमहाभाष्यात गंमत म्हणून उल्लेखलेला आहे.)
अर्थ : उंबराच्या वर्णाच्या (मद्याच्या) घड्यांचे मोठे मंडल प्याले आणि जर (त्यामुळे) स्वर्गात गेलो नाही, तर ("सौत्रामणि")-यज्ञात प्यालेले (थोडेसे मद्य) स्वर्गात कसे काय नेणार?

शांतम् पापम्

उंबराच्या वर्णाच्या (मद्याच्या) घड्यांचे मोठे मंडल प्याले आणि जर (त्यामुळे) स्वर्गात गेलो नाही, तर ("सौत्रामणि")-यज्ञात प्यालेले (थोडेसे मद्य) स्वर्गात कसे काय नेणार?

म्हणजे आमचे पूर्वज यज्ञात बसून मद्य प्यायचे? सनातन धर्मी बघून घेतील हो, सांभाळून!

शाब्बास रे जेसना :)

अधुन मधुन सुभाषितांचे अर्थ सांगायला तरी येत जा !!! :)
आपल्या सुभाषिताच्या अर्थाने आमचा आजचा दिवस खुसखुशीत जाईल :)

अवांतर :) हे संस्कृतचं फॅड कुठून आलं राव !!! उपक्रमवर.
पुन्हा ते नमोनम: पुन्हा ते कालिदास. त्याची ती शकुंतला, तो दुश्यंत....!!!
संस्कृत ग्रेट, ती माता, जननी..........
चालु द्या !!!! चालु द्या !!! सुंदर उपक्रम आहे, आपल्या उपक्रमास आमच्या हार्दिक शुभेच्छा !!!! :)))

आपला
मराठी भाषा प्रेमी
अ ब क आणि ढ

वा

वा! फार आवडला. कल्पनेनेही रोमांच उभे राहीले.
यज्ञ मंडपात बसून सर्वांसोबत इअतर भटजी यज्ञची कार्यपूर्ती करत असतांना आपण लोडाला टेकून बसून काही गहन विषयांवर चर्चा करत सोमरस पीणे यात जी काही मजा असेल ती कशातच नाही!

अगदी कंठ अवरूद्ध होवून आला आहे माझा.

या करता तरी मला माझे पुर्वज अतिशय प्रिय आहेत.
त्यांची परंपरा (यज्ञ जमत नाही ते सोडून!) सोमरसा पुरती तरी मी चालवतो आहे याचा मला अभिमान वाटतो!

आणि अर्थात त्यांच्या कल्पना शक्तीपुढे मी नतमस्तक आहेच! ;)
आपला
गुंडोपंत

साधी दारू, सोमरस नव्हे :-)

सौत्रामणि-यज्ञात साधी दारू (थोडीशी) वापरतात (कसली बनवतात माहीत नाही - फळाची की धान्याची). हा सोमयाग नाही...

तपशील, तपशील, तपशील... :-)

छानच


या करता तरी मला माझे पुर्वज अतिशय प्रिय आहेत.
त्यांची परंपरा (यज्ञ जमत नाही ते सोडून!) सोमरसा पुरती तरी मी चालवतो आहे याचा मला अभिमान वाटतो


मग गुंडोपंत यासाठीतरी
सोमरसप्राशनार्थाय संभवामि युगे युगे|
प्रकाश घाटपांडे

एकही नाही!

एकही नाही. कारण आम्हाला संस्कृतचा गंध नाही त्यामुळे संस्कृतातली कुठलिही सुभाषिते आम्हाला माहितीच नाहीत! त्यामुळे आमचे आवडते सुभाषित कोणते हे सांगायचा आमचा चान्स हुकला! :)

अवांतर - आम्हाला संस्कृत ही एक भयंकरच कठीण भाषा वाटते बुवा! त्यापेक्षा आईची मायमराठी आणि सायबाची विंग्रजी भाषा समजायला, लिहायला,बोलायला (उच्चारायला) कितीतरी सोपी!

असो...

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

काही शालेय सुभाषिते

काले मृदुर्यो भवति काले भवति दारुणः|
स साध्नोति परं श्रेयः विघ्नांश्चाप्यधतिष्ठति||

- इयत्ता दहावी, पूर्ण संस्कृत, पहिल्या सुभाषितमालेतले पहिले सुभाषित

आघ्रातं परिचुंबितं ननु मुहुर्लीढं ततश्चर्वितम्
त्यक्तं वा भूवि नीरसेन मनसा तत्र व्यथा मा कृथा
हे सद्रत्न, तवैतदेव कुशलं यद्वानरेणादरात्
अंतःसारविलोकनव्यसनिना चूर्णीकृतं नाश्मना

- बहुतेक नववीतले :)

वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि
तथा शरीराणि विहाय जीर्णानि, अन्यानि संयाति नवानि देही

[किंवा ज्ञानेश्वरीतला याचा अर्थविस्तार -
जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे, मग नूतन जे वेढिजे, तैसे देहांतराते स्वीकारिजे, चैतन्यनाथे]

अजून एक अभ्यासक्रमबाह्य आठवणारे म्हणजे -

विद्या विवादाय धनं मदाय खलस्य शक्तिः परपीडनाय |
साधोस्तु सर्वं विपरीतमेतद् ज्ञानाय दानाय च रक्षणाय ||

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

माझे अति आवडते - भर्तुहरि नीतिशतक

वरं पर्वतदुर्गेषु भ्रान्तं वनचरै: सह। न मूर्खजनसम्पर्क: सुरेन्द्रभवनेष्वपि।।

स्वैर भाषांतर - मूर्खाच्या संगतीत स्वर्गात राहण्याऐवजी जंगली प्राण्यांबरोबर रानोमाळ भटकणे परवडले.

वा!

वा!
म्हणजे अमेरिकेपेक्षा भारतात राहणे परवडते असे?
;)
आपला
गुंडोपंत

हा हा हा

>> म्हणजे अमेरिकेपेक्षा भारतात राहणे परवडते असे?

वा गुंडोपंत!

माझी याक्षणीची अवस्था मात्र "अक्षरशः विपरित" आहे!!

@एकलव्य@

अनुवाद?

वन-चरांसह शैल-वनांतरें । निज-सुखें फिरणें तरि तें बरें ॥
जरि घडे सहवासचि पामरीं । तरि जळो असणें सुर-मंदिरीं ॥॥
--वाचक्‍नवी

सुरेख

अनुवाद आहे... धन्यवाद वाचक्‍नवी!

माझ्या जिभेवर आणि मनामध्येही मात्र संस्कृत सुभाषितच अधिक रुळले आहे ... तेच मला अधिक रसाळ आणि सुलभ वाटते.

सत्यवचन

१०१% सत्य आहे!

अजून एक..

अजून एक..

तमाखुपत्रम् राजेन्द्रम् भजमाज्ञानदायकम् |
तमाखुपत्रम् राजेन्द्रम् भजमाज्ञानदायकम् ||

भावार्थः

राजा, तूं तंबाखूचेच भजन करू नकोस, तंबाखू अज्ञानकारक आहे.
(त्यापेक्षा) गणेशाला भज, तो ज्ञानदायक आहे.

(आखु=उंदीर, आखुपत्रं=उंदीर ज्याचे वाहन आहे असा तो. ' तम्+आखुपत्रं ' इति शाब्दिक कोटी.)

हैयो हैयैयो!

गणेशाला भज

गणेशाला भज ऐवजी चुकून गणेशाला भाज असे वाचले. ;)

मंचरला मशेरीसाठी तंबाखू भाजतात.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

वा वा

मस्त सुभाषिते येत आहेत एक एक. जरा कंसात अर्थही देत चला. समजेल आणि लक्षातही राहील. नाहीतर तुकोबांसारखे म्हणायला लागायचे -

कानडीने केला | मर्‍हाटी भ्रतार ||
एकाचे उत्तर | एका न ये ||

तैसे मज नको | करू कमळापति ||
देई या संगति | सज्जनांची ||


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

पाप -पुण्य

अष्टादश पुराणेषु
व्यासस्य वचनद्वयम|
परोपकार: पुण्याय
पापाय परपीडनम्||
साध्या सोप्या संकल्पनात पाप पुण्य बसवले आहे.
अवांतर- मी सुरुवातीला परोपकाराय असे लिहिले होते. यनावालांनी दुरुस्ती सुचवल्याने ते परोपकारः असे केले आहे

प्रकाश घाटपांडे

पाप पुण्य

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
**********************************
श्री.प्रकाश घाटपांडे यांनी दिलेले सुभाषित माझे आवडते सुभाषित आहे.त्यात किंचित् सुधारणा हवी ती पुढील प्रमाणे :

अष्टादश पुराणेषु
व्यासस्य वचनद्वयम्|
परोपकारः पुण्याय
पापाय परपीडनम्||

दुसर्‍याला काही मदत केली,त्याच्याशी नुसते प्रेमाने बोलले, त्याच्याविषयी सद्भावपूर्वक आस्था दाखवली तर ते पुण्य.पूजा अर्चा,होम हवन,उपास तापास करणे म्हणजे पुण्यकृत्य नव्हे. दुसर्‍याला त्रास होईल असे वागणे म्हणजे पाप. या पाप पुण्याच्या मूलभूत व्याख्या आहेत. "पुण्य पर उपकार| पाप तेची परपीडा|" असे तुकाराम महाराजांनी म्हटले आहे ते याच सुभाषितावरून.

अनुवाद?

या श्लोकाचा अनुवाद:
अरे ! अठराही पुराणात वाची ।
व्यासवचनें हीं दोन महत्त्वाचीं ॥
दुजा दिधलें दुःख तें पापकर्म ।
कुणा केला उपकार पुण्यकर्म ॥॥

--वाचक्‍नवी

मूर्खोऽस्मि

यनावाला सरांनी http://mr.upakram.org/node/662#comment-10476 इथे दिलेले सुभाषित आवडते आणि उपक्रमावर आल्यापासून पटतेही :)

यदा किंचित्ज्ञोऽहं द्विप इव मदान्धः समभवम् |
तदा सर्वज्ञोऽस्मीत्यभदवलिप्तं मम मनः|
यदा किंचित् किंचित् बुधजनसकाशादवगतम् |
तदा मूर्खोऽस्मीति ज्वर इव मदो मे व्यपगतः|

याचे वामन पंडित कृत मराठीकरण असे:

यदा काही काही हरि कवि असे शब्द शिकलो |
तदा मी सर्वज्ञ द्विपसम मदें याच भरलो|
यदा "काही नेणे "म्हणुनि वदले पंडित मला|
तदा माझा गर्वज्वर सकळही हा उतरला |
(द्विप=हत्ती)
गद्य अनुवाद (किंचित् स्वैर) :
....जेव्हा मला थोडे काही ज्ञान झाले,तेव्हा मदांध हत्ती प्रमाणे मला (त्या ज्ञानाचा) माज चढला.
"मी सर्वज्ञ आहे" या विचाराने माझे मन व्यापले.
(पण) ज्ञानी लोकांच्या सहवासात थोडे थोडे काही समजू लागले तेव्हा "मी मूर्ख आहे" याची जाणीव होऊन;जसा (अंगात आलेला) ताप उतरतो ;तसा माझा गर्व उतरला.

+१

उपक्रमाच्या संदर्भात हेच म्हणतो !

-कुवलयापीड ;-)

आवडते सुभाषित?

इतकी सुभाषिते डोळ्याखालून गेली, पण आवडते काही चटकन सांगता येईना. मग शाळेत असताना वाचलेले एक आठवले.

सा रम्या नगरी महान्‌ स नृपति: सामन्तचक्रं च तत्‌
पार्श्वे तस्य च सा विदग्धपरिषत्ताश्चन्द्रबिंबानना: । ।
उन्मत्त: स च राजपुत्रनिवहस्ते बंदिनस्ता: कथा:
सर्वम्‌ यस्य वशादगात्स्मृतिपथम्‌ कालाय तस्मै नम: । ।। ।


--भर्तृहरिकृत वैराग्यशतक(३९)

वाचल्याबरोबर डोळ्यापुढे इतिहास उभा राहतो. बहुधा याच श्लोकामुळे मला संस्कृत, संस्कृती आणि प्राचीन इतिहासामध्ये रस वाटायला लागला असावा. या संस्कृत ओळींचे वामनपंडितकृत समश्लोकी भाषान्तर:

गेला तो नृप ते प्रधान अवघे ते पंडितांची सभा ।
गेली ती नगरी तशा शशिमुखी त्या तप्तहेमप्रभा । ।
गेला तो नृपपुत्र त्या शुभकथा म्यां देखिलें सर्व जें ।
तें जेणें स्मरणास योग्य रचिलें कालास त्या वंदिजे । ।


यातल्या 'वंदिजे' ह्या विध्यर्थी रूपाचेदेखील मला लहानपणी अप्रूप वाटले होते.--वाचक्‍नवी

माझे आवडते सुभाषित

आरम्भगुर्वी क्षयिणी क्रमेण लघ्वी पुरा वृद्धिमती च पश्चात्।
दिनस्य पूर्वार्धपरार्धभिन्ना छायेव मैत्री खलसज्जनानाम्॥

दिवसभरात सूर्यामुळे पडणारी सावली सतत आपला आकार बदलत असते. सकाळी सूर्य उगवतो तेव्हा लांबच लांब सावली पडते. पण सूर्य जसजसा आकाशात वर वर चढू लागतो, तसतसा तिचा आकार कमीकमी होत जातो. व शेवटी सूर्य डोक्यावर येतो, तेव्हा तर ही सावली गायबच होते. तशीच दुष्ट माणसांची मैत्री! सुरवातीला अगदी गळ्यात गळे घालतील, स्तुती करतील. पण एकदा का त्यांचा मतलब साध्य झाला, की त्यांचे उतू जाणारे प्रेम अचानक थंडावते. व कमी होत होत शेवटी ओळख दाखवण्याचीही मारामार होते. असे हे खल, चञ्चल वृत्तीचे.
त्याऊलट सज्जनांची मैत्री मात्र दिवसाच्या उत्तरार्धातल्या सावलीसारखी, सुरवातीला लहान व मग बाळसे धरणारी, दाट होत जाणारी, ती थेट जीवनाच्या काळरात्रीपर्यंत सोबत करणारी!

राधिका

फार छान!

नीतिशतकातल्या या श्लोकाची वामनपंडितकृत समश्लोकी:
आरंभीं जे फार शेखीं न कांहीं । आधीं थोडी जे क्रमें फार पाहीं ।
छाया पूर्वार्द्धा परार्द्धा दिनाची । मैत्री तशी दुर्जनांची भल्यांची । ।

त्यातलेच आणखी एक:
निन्दतु नीतिनिपुणा यदि वा स्तुवन्तु । लक्ष्मी: समाविशतु गच्छतु वा यथेष्टम्‌ । ।
अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा । न्याय्यात्पथ: प्रविचलन्ति पदं न धीरा: । ।
(वानोत निन्दोत सु-नीतिमन्त । चळो असो वा कमला गृहांत ।
हो मृत्यु आजीच घडो युगान्तीं । सन्मार्ग टाकूनी भले न जाती ॥ )--वाचक्‍नवी

वामनपंडितांचा हा मराठी श्लोक मला शाळेत बालभारतीच्या पुस्तकात

होता. म्हणून ही ओळ संपताक्षणीच पाठ केलेली पुढची ओळ आपोआप जीभेवर येते ती -

सुनीती पथ सेवणे मलिनकर्म मानिचे ना, घडो मरण नावडे खल जनांप्रति...

त्या पाठोपाठ म्हातारी उडता, केला जरी पोत, अहर्निश तथापि इ.इ. इतर श्लोक अर्धेमुर्धे आठवतात.

हे भाषान्तर याचे:

सुनीती पथ सेवणे मलिनकर्म मानेच ना, घडो मरण नावडे खल जनांप्रति... हे भाषान्तर
प्रिया न्याय्या वृत्तिर्मलिनमसुभंगे..या श्लोकाचे.

माझे ही एक....

शालेय संस्कृत विषय सोडुन सुमारे दशक उलटून गेले आहे.
त्यामुळे शुद्धलेखनातील संभाव्य चुकांबद्दल क्षमस्व.

तर, आवडते सुभाषित :-

अति दानात् बलिर्बद्धो | अति लोभात् हि सुयोधनः |
विनष्टो रावणो लौल्यात् | अति सर्वत्र वर्जयेत् ||

ह्याशिवाय,भर्तृ हरी चे ही एक आहे पण पूर्ण आठवत नाहिये.
साधरण ते होते ते असे:-

भोगा न भुक्तः वयम् एव भुक्तः|
कालो न जातः वयम् एव जातः||

असं काहिसं आहे.
कृपया शक्य असल्यास पूर्ण करुन द्यावे.

जन सामान्यांचे मन

भोगा न भुक्ता

आम्ही भोग भोगले नाहीत तर आम्हीच भोगले गेलो. आम्ही तप केले नाही परन्तु आम्हीच तापलो. काळ गेला नाही मात्र आम्हीच गेलो. आशा जीर्ण झाली नाही मात्र आम्हीच जीर्ण झालो.

भोगा न भुक्ता वयमेव भुक्ताः
तपो न तप्तं वयमेव तप्ताः।
कालो न यातो वयमेव याताः
तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णाः॥१॥

- भर्तृहरिकृत वैराग्यशतक.

एक दुवा - नीतिशतक

संवाद

संस्कृतज्ञा व प्रेमळ व्यक्ती अश्या सौ. वीणाताई गोडबोले यांच्या तोंडून ऐकलेला हा श्लोक व त्याचे रसाळ विवेचन -

भिक्षु: क्वास्ति, बलेर्मखे, पशुपति:,
किं नास्त्यसौ गोकुले,
मुग्धे पन्नगभूषण:,
सखि सदा शेते च तस्योपरि ।
आर्ये, मुञ्च विषादमाशु,
कमले नाहं प्रकृत्या चला,
चेत्थं वै गिरिजासमुद्रसुतयो:
सम्भाषणं पातु व: ।।

संपत्तीची देवी श्रीर्लक्ष्मी ही थोडिशी आढ्यताखोर आणि घमेंडी. गरीब बिचार्‍या पार्वतीला सदैव टाकून बोलणारी, टोमणे मारणारी. निर्धन शंकराशी लग्न झालेली पार्वती शांतपणे ऐकून घेणारी. एकदा काय होते, लक्ष्मी पार्वतीकडे येते आणि चार इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलायला लागते आणि बोलता बोलता अगदी सहज स्वरात पण कुत्सितपणे म्हणते,

"काय गं, (तुझा) भिक्षु कुठे आहे?"
पार्वती : असेल बळीच्या यज्ञात (अगं म्हणजे तुझाच नवरा भिक्षु).

लक्ष्मी : (तो नव्हे,) पशुपती.
पार्वती : का, गोकुळात नाही का तो? (अगं म्हणजे तुझाच नवरा).

लक्ष्मी : (तो नव्हे,) अगं वेडे, साप ज्याचे भूषण आहे तो.
पार्वती : सखे, अगं त्याच्यावरच तर सदैव पहुडलेला असतो तो (अगं म्हणजे तुझाच नवरा).

लक्ष्मी : आर्ये, (लोक आपल्या नवर्‍याला बोलतात) हा विषाद टाकून दे.
पार्वती : अगं, माझा स्वभाव मूळातच चंचल नाही (तुझ्यासारखा).

हा लक्ष्मी-पार्वती उभयतांचा संवाद आपले रक्षण करो.

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

संस्कृतस्य महिमवर्णनेन नास्ति साधितम् । सततसंभाषणेन तस्य जीवनं स्थिरम् ।।

झकास...........

थेट श्लोक वाचुन काहिच कळला नव्हता.
पण भाषांतर वाचुन मजा आली.
म्हणजे ह्या देअवांच्या बायका पण एक् मेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढतात असं दिसतयं.

जन सामान्यांचे मन

 
^ वर