माझे आवडते सुभाषित

सुखस्य दु:खस्य कोऽपि न दाता
परो ददाति इति कुबुद्धिरेषा ।
अहं करोमीति वृथाभिमान:
स्वकर्मसूत्रे ग्रथितो हि लोक: ।।

भावार्थ - आपल्याला सुख किंवा दु:ख देणारे कोणीही नसते. दुसरे आपल्याला दु:ख देतात हे दुष्ट विचारांचे लक्षण आहे आणि सर्व काही मीच करतो हा खोटा अभिमान आहे. प्रत्यक्षात सर्वजण आपापल्या कर्माशी बांधलेले असतात.

कृपया माझ्या काही शुद्धलेखनाच्या चुका झाल्या असतील तर नक्की दाखवून द्याव्यात आणि आपल्याला आवडते सुभाषितसुद्धा भावार्थासह द्यावे. मी वाट पाहतो आहे.

Comments

सुभाषितकाराची प्रतिभा

येषां श्रीमद्यशोदासुतपदकमले नास्तिभक्तिर्नराणाम्
येषामाभीरकन्याप्रियगुणकथने नानुरक्ता रसज्ञा|
येषां श्रीकृष्णलीलालसितगुणरसे सादरौ नैव कर्णौ
धिक् तान् धिक् तान् धिगेतान् कथयति सततं कीर्तनस्थो मृदङ्ग: ||

ज्यांची यशोदापुत्र कृष्णावर भक्ती नाही, गोपिकाप्रिय कृष्णाचे गुण गाण्यात ज्यांची जीभ मग्न झालेली नाही, श्रीकृष्णाचे गुण ऐकण्यात ज्यांचे कान सादर नाहीत, त्यांचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, असे मृदंगाचे बोल सांगत असतात.

आता तुम्ही म्हणाल या सुभाषितात इतकं काय विशेष आहे. तर शेवटच्या ओळीत सुभाषिताचं विशेषत्व दडलेलं आहे. सुभाषितकाराची प्रतिभा शेवटच्या ओळीत दिसून येते. 'धिक् तान्' हे तर मृदुंगाचे बोल. संस्कृतात त्याचा अर्थ होतो 'त्यांचा धिक्कार असो'. कीर्तनात हेच बोल बर्‍याच वेळा येतात. म्हणजे मृदंग जणू वर उल्लेख केलेल्या लोकांचा धिक्कार कीर्तनात करत असतो!

मस्त

सुभाषित आवडले.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सज्जनांचं ह्रदय

आवडती अशी बरीच सुभाषितं आहेत. त्यातीलच हे एक.

सज्जनस्य ह्रदयं नवनीतं यद्वदन्ति कवयस्तदलीकम्|
अन्यदेहविलसत्परितापात् सज्जनो द्रवति नो नवनीतम्||

सरलार्थ: सज्जनांचं ह्रदय लोण्याप्रमाणं असतं असं जे म्हटलं जातं ते खोटं आहे. इतरांच्या देहाला झालेल्या तापामुळे (त्रासामुळे) सज्जन विरघळतात. लोणी विरघळत नाही.

+२

चितां प्रज्वलितां दृष्ट्वा वैद्य: विस्मयम् आगत: ।
नाहं गतो न मे भ्राता कस्य इदं हस्तलाघवम् ।।

भावार्थ -चितेला जळताना पाहून वैद्यबुवांना आश्चर्य वाटले, ते मनांत म्हणाले, ह्या व्यक्तिवर उपचार करायला मी सुद्धा गेलो नव्हतो आणि माझा भाऊ पण. मग कोणाचे बरे हे हस्तकौशल्य?

________________________________________________

एका ठिकाणी यज्ञविधी चालू असतो. पुरोहित पूजा सांगत असतात. त्याचवेळी तिथे अचानक दुसरा एक ब्राह्मण उपस्थित होतो. पूजा सांगता सांगताच पुरोहित त्या ब्राह्मणाला म्हणतो,

अस्य मूर्खस्य यागस्य दक्षिणा महिषीशतम् ।
त्वया अर्धं च मया अर्धं विघ्नं मा कुरु पण्डित ।।

ह्या मूर्खाच्या यज्ञात १०० म्हशी दक्षिणा म्हणून आहेत, तू अर्ध्या घे, मी अर्ध्या घेतो, (पण म्हशी दान केल्याने पुण्य नसते असे सांगून) हे पण्डिता ह्या यज्ञात विघ्न आणू नकोस.

मी शिकलेला पहिला श्लोक

काकः कृष्ण पिकः कृष्ण, को भेद पिककाकयो: ।
वसन्तसमये प्राप्ते काकः काकः पिकः पिकः ॥

अर्थः कावळाही काळा आणि कोकिळाही काळी, मग कावळा आणि कोकिळेत फरक काय?
वसंत ॠतू आल्यावर (समजते की,) कावळा कावळा आहे आणि कोकिळा कोकिळा आहे.

मला हा आठवला :

हंसः श्वेतो बकः श्वेतः को भेद बकहंसयो: ।
नीरक्षीरविवेके तु हंसो हंसो बको बकः ॥

:)

आळस

आलसस्य कुतो: विद्या अविद्यस्य कुतो: धनम्।
अधनस्य कुतो: मित्रम् अमित्रस्य कुतो: सुखम् ॥

अर्थः आळश्याला विद्या कोठून मिळणार? ज्याच्याकडे विद्या नाही त्याला धन कोठून मिळणार? ज्याच्याकडे धन नाही त्याला मित्र कोठून मिळणार? ज्याच्याकडे मित्र नाही त्याला सुख कोठून मिळणार?

म. ज्योतिबा फुले यांचे साधारण याच अर्थाचे एक वचन आहे,
विद्येविण मति गेली, मतिविण गति गेली, गतीविण वित्त गेले, वित्ताविना शुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले.
 
^ वर