शालेय विद्यार्थ्यांसाठी संस्कृतमधून निबंध सुलभलेखन.

(एक विनम्र सूचना - प्रस्तुत लेख संस्कृत विद्वज्जनांसाठी नाही).

दरवर्षी आयईएस संस्कृत केंद्र संस्कृत शिक्षकांसाठी वर्ग घेते ज्यात संस्कृत विषयात
विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गुण कसे मिळतील व त्यासाठी परीक्षेत प्रश्न कसे सोडवावेत
याचेपण मार्गदर्शन केले जाते.

त्यात एकदा आम्हाला सांगितले गेले की बरेच विद्यार्थी निबंधाचा प्रश्न सोडवतच नाहीत
अश्यावेळी जर तुमच्या विद्यार्थ्यांनी पहिल्या पानावर पहिलाच प्रश्न म्हणून निबंध लिहिला तर परीक्षकावर त्याची चांगली छाप पडते. हा निबंध लिहिण्याच्या अनेक सोप्या क्लृप्त्या आहेत आणि ह्या क्लृप्त्या सर्वसामान्य विद्यार्थी डोळ्यासमोर ठेऊन शोधलेल्या आहेत.

सर्वांत पहिले आणि महत्त्वाचे म्हणजे दिलेल्या पर्यायांपैकी सोप्यातला सोपा विषय
निबंधासाठी निवडणे.उदा. मम गृहम्, वर्षाऋतु, महाकवि कालिदास: असे विषय दिले
असतील तर मम गृहम् हाच विषय निवडायचा. म्हणजेच असे विषय निवडायचे जे
अकारान्त पुलिंगी, नपुंसकलिंगी किंवा आकारान्त स्त्रीलिंगी आहेत आणि ज्यात सोपी वाक्य रचना करता येईल. उदा. मम प्रियदेव: हा विषय असेल आणि आपल्याला विष्णु बद्दल जरी
लिहायचे असेल तरी विष्णु शब्दाला प्रथम देव जोडून विष्णुदेव हा अकारान्त पुल्लिंगी शब्द
करून घ्यायचा.

आपल्या निबंधात ७-८ वाक्ये असावीत. शक्यतो संधि आणि समास टाळावेत. निबंध
लिहिताना इ. १ ली च्या पुस्तकातील कमल घर बघ, शरद वर जा इ.इ. वाक्ये नजरेसमोर आणावीत (बोजड वाक्ये टाळावीत).

उदाहरणादाखल आपण एक सोपा निबंध कसा लिहायचा ते पाहू.

विषय - मम प्रियदेव:।
विभक्ती प्रत्यय मराठी प्रत्यय अर्थ

प्रथमा सूर्य: - सूर्य
द्वितीया सूर्यम् ला सूर्याला
तृतीया सूर्येण ने सूर्याने
चतुर्थी सूर्याय साठी करिता सूर्यासाठी
पञ्चमी सूर्यात् ऊन, हून, पासून सूर्यापासून
षष्ठी सूर्यस्य चा सूर्याचा
सप्तमी सूर्ये त सूर्यात
सम्बोधन हे सूर्य हे, अरे हे सूर्या

विभक्ती विशेष उपयोग साधी व सोपी वाक्ये
(८ वी, ९ वी, १० वी च्या पुस्तकात दिल्याप्रमाणे)

प्रथमा कर्ता सूर्य: नाम मम प्रियदेव: ।
सूर्य: नाम उर्जादाता ।
द्वितीया कर्म, परित:, प्रति, अभित:, विना सूर्यं परित: ग्रहा: चलन्ति ।
सूर्यं प्रति मम भक्ति ।
तृतीया साधन, विना, सह, किम्, अलम् सूर्येण विना जीवनं कठिनम् ।
आकाशे सूर्येण सह चन्द्र:, खगा:, तारका: ।
चतुर्थी नम:, स्वस्ति, दा, रुच्, स्पृह् सूर्याय नम: ।
अहं सूर्याय अर्घ्यं ददामि ।
पञ्चमी विना, ऋते, बहि:, प्रभृति, आ,
आरभ्य सूर्यात् वयं प्रकाशं प्राप्नुम: ।
सूर्यात् उष्मा आगच्छति ।
षष्ठी कृते, उपरी, अध:, पश्चात् सूर्यस्य उपरि जीव: नास्ति ।
सूर्यस्य द्वितीयनाम भास्कर: ।
सूर्यस्य उपरि गर्ता: ।
सप्तमी स्निह्, पत् (स्थानदर्शक व कालदर्शक) सूर्ये अहं स्निह्यामि ।
सूर्ये मम श्रद्धा ।
सम्बोधन अरे, अग, अहो हे सूर्य रक्ष माम् ।
हे सूर्य त्राहि माम् ।
हे सूर्य अहं तं नमामि ।

हाच विचार करून उद्यानम्, दूरदर्शनम्, मम शाला वैगरे इतर लेख लिहिता येतील.
विद्यार्थ्यांनी प्रयत्न करून पाहावा आणि आपले मत अवश्य कळवावे.

लेखनविषय: दुवे:

Comments

स्वागत !

नव्या सभासदाचे स्वागत ! आणि संस्कृत भाषेशी पुन्हा एकदा नाते जोड्ण्याच्या अनेक वर्षांपासूनच्या इच्छेची या निमित्ताने अंशतः पूर्ती होईल याचा आनंदसुद्धा !

संस्कृतमधे संभाषणे कशी करावीत याचे पहिले धडे आपण गिरवू शकू का ?
(संपादित : म्हणजे तसे तुम्ही आम्हापैकी जे अज्ञ आणि इच्छुक आहेत त्याना शिकवू शकाल का ? :-) )

संभाषणात्मक संस्कृत

संस्कृतमधे संभाषणे कशी करावीत याचे पहिले धडे आपण गिरवू शकू का ?

खरे तर संभाषण हे स+अक्षात् अथवा गुरु समोर बसून शिकावे (या गुरुमुखात् आगच्छति सा एव विद्या).

पण आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायला काहीच हरकत नाही. मी नक्की लिहितो इथे संभाषणात्मक संस्कृतविषयी.

स्वागत

हा चांगला लेख अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगला उपयोगी पडेल.

याने सुरुवातीला आत्मविश्वास यावा. संस्कृतबद्दल परीक्षेनंतरही रुची असल्यास या पद्धतीत अल्पसंतोष मानू नये. थोडेफार अशा प्रकारे लिहून आपल्याला संस्कृत रचना करता येतात असे वाटू लागण्यात धोका आहे. याबद्दल टीका व्यंग्य/चेष्टेच्या माध्यमाने मी अन्यत्र केलेली आहे (दुवा). व्यंग्य माध्यम असल्यामुळे ती टीका विखारी वाटेल, पण त्यातले मुख्य मुद्दे गंभीर आहेत, आणि कुणाची हेटाळणी माझ्या मनात नाही.

नव्या सभासदाचे मनापासून स्वागत!

झुरळाने का पतंगावे !

अहो, संस्कृतमधे चार ओळी लिहिता/संभाषिता आल्या म्हणजे का त्याच्यात रचना करता येईल ? इथे आपल्या लाडक्या मातृभाषेतसुद्धा इतके बोलता येऊन, लिहीता वाचता येऊनसुद्धा , ज्याला "काव्य" म्हणता येईल अशी एक ओळसुद्धा लिहीता येत नाही आम्हाला. तिकडे संस्कृत रचना करण्याचा कसला बडेजाव कोणी मारणार !

आमची इच्छा साधी-सरळ आहे. संस्कृत भाषा एका प्रचंड मोठ्या जलाशयासारखी आहे. त्यातील ओंजळ-ओंजळ जरी पदरात पडले तर ते घ्यावे. असे देऊ शकणारे कुणी नुकतेच येथे आले आहे असे वाटले. या जलाशयामधे मुक्त विहार करणे , त्या विहारातून काही कलात्मक प्रदर्शन करणे हे काम प्रचंड नैपुण्याचे आहे आणि त्याबाबत कसल्याही अवाजवी कल्पना नाहीत ! :-)

पाठिंबा

त्याबाबत कसल्याही अवाजवी कल्पना नाहीत ! :-)

तुमच्या म्हणण्याला मी पण पाठिंबा देतो. ज्याला आपल्या मर्यादा कळल्या त्याला परमेश्वर उमजला.

काव्य प्रतिभा

थोडेफार अशा प्रकारे लिहून आपल्याला संस्कृत रचना करता येतात असे वाटू लागण्यात धोका आहे.

महामहिम, केवळ आपल्या माहितीसाठी : साहित्य हा विनोदाचा विषय नव्हे आणि माझ्या ओळखीचे एक श्री. चिन्मय धारूरकर यांनी संस्कृत संभाषण शिकायला लागल्याच्या तिसर्‍या दिवशी "रम्या रम्या रम्या ।" हे लघुकाव्य केले. (अवान्तर: संस्कृत भाषेत गच्छामि हे पूर्ण वाक्य होय.)

कारण काव्य करण्यासाठी भाषा ज्ञान कमी आणि काव्य प्रतिभा अधिक लागते. मराठी कवि वसंत बापट यांनी सुद्धा उत्तम संस्कृत रचना केल्या आहेत. मुंबई विद्यापीठाचे गीत "इदं सुन्दरं मन्दीरं शारदाया" ही त्यांचीच रचना.

संस्कृत रचना...

सर्व प्रथम लेख चांगला आहे आणि आवडला. आपल्याला अजून लिहीण्याबद्दल शुभेच्छा!

थोडेफार अशा प्रकारे लिहून आपल्याला संस्कृत रचना करता येतात असे वाटू लागण्यात धोका आहे.

थोडेफार अशा प्रकारे लिहून इतरांना संस्कृत रचना करता येतात असे वाटू लागण्यात आम्हाला धोका आहे :-)

वरील वाक्य अर्थातच ह. घ्या. कविता आवडत असल्यातरी कधी करता आल्या नाहीत त्यामुळे तसे करता येऊ शकेल (संस्कृतमधे सोडा, मराठीतपण) असे स्वप्नातपण वाटणार नाही :-) तेंव्हा आमच्याकडून निश्चिंत रहावे!

इमॉटिकॉन

थोडेफार अशा प्रकारे लिहून इतरांना संस्कृत रचना करता येतात असे वाटू लागण्यात आम्हाला धोका आहे :-)

ह.ह.पु.वा. याहू मेसेंजरवर इमॉटिकॉनमध्ये दाखवतात तसे जमिनीवर गडाबडा लोळायलाच झाले.

चांगला लेख

लेख आवडला.

शब्द अकारान्ती नसल्यास तो अकारान्ती करून घ्यावा म्हणजे विभक्ती करायला सोपे पडते, ही कल्पना धमाल वाटली. ही क्लृप्ती कधीच ध्यानात आली नव्हती. पण मला वाटते, जर परीक्षकांवर छाप पाडायचीच असेल, तर मग उकारान्ती वगैरे शब्दांचीही रुपे लिहिली तर इतर निबंध लिहिणार्‍यांपेक्षा अधिक छाप पडेल. असो, बाकी तुम्ही निबंध लिहून दाखवताना त्यात द्वितीयेची वगैरे अपेक्षा असलेल्या अव्ययांचा वापर करायचे सूचवले आहे. मीही माझ्या विद्यार्थ्यांना असेच सांगते, जेणेकरून वाक्ये वाढवता येतात, अव्यये व त्यांना अपेक्षित असलेल्या विभक्ती यांचे ज्ञानही दाखवता येते.

पण मी माझ्या विद्यार्थ्यांना शक्यतो सोपे कर्मधारय समास आणि सोप्या म् + स्वर संधी तसेच स्वरसंधी करा असे आवर्जून सांगते. तसेही एवीतेवी रुपे लिहा, संधी सोडवा, संधी करा यासाठी जर आपण संधी, समास, वेगवेगळ्या स्वरांनी अंत होणारे शब्द यांचा अभ्यास करणारच असू, तर तो निबंधातून दाखवायला काय हरकत आहे!

असो, ही माझी फारच वैयक्तिक मते झाली. कृपया मी आपल्यावर टीका करतेय असा गैरसमज करून घेऊ नये. आपण एक शिक्षिका म्हणून काही क्लृप्त्या सांगितल्यात, त्यात मी ज्या क्लृप्त्या वापरायला सांगते त्यांची भर टाकली एवढेच. शेवटी कसे लिहावे हे विद्यार्थ्याच्या क्षमतेवर आणि आवडीवर अवलंबून असते.

राधिका

अकारान्त

पण मला वाटते, जर परीक्षकांवर छाप पाडायचीच असेल, तर मग उकारान्ती वगैरे शब्दांचीही रुपे लिहिली तर इतर निबंध लिहिणार्‍यांपेक्षा अधिक छाप पडेल.

मला पण तसेच वाटते पण मला मुले म्हणतात की सर आम्हाला फक्त देव आणि माला एव्हढ्याचीच रुपे येतात म्हणून ही अकारान्त करण्याची कल्पना मला पण आवडली. पण जर चांगले अभ्यासू विद्यार्थी असतील तर तुमचे म्हणणे नक्की विचारात घेता येईल.

माझा दुसरा एक अनुभव

शब्द अकारान्ती नसल्यास तो अकारान्ती करून घ्यावा म्हणजे विभक्ती करायला सोपे पडते, ही कल्पना धमाल वाटली.

आम्ही जेव्हा संस्कृत शिक्षण प्रशिक्षण वर्गाचे विद्यार्थी होतो तेव्हा आम्हाला आशुभाषण
करण्यासाठी विविध सोपे सोपे विषय दिले जायचे. त्यावर झटपट ७-८ वाक्ये बोलणे अपेक्षित असायचे.

एकदा आमच्यातील एका दुहिता नावाच्या हुशार विद्यार्थिनीला "श्वश्रू" हा जरा कठिण विषय देण्यात आला. आम्हाला वाटले कि तिची आता दांडी उडणार.

पण तिने २ मिनिटे शांतपणे विचार केला व सुरवात केली :-कखग नाम मम श्वश्रू। सा अतीव सुन्दरी, सा करुणानिधि । ताम् .... । तया ... ।

अश्या रीतीने तिने इतर सर्व वाक्ये तद् स्त्री लिंगी सर्वनामाचा वापर करून म्हटली.

संस्कृत ही भाषा क्लिष्ट नसून त्याचे इतर सर्व भाषांप्रमाणेच सुलभ व प्रौढ (साहित्यिक) असे भाग आहेत. शेवटी आपण कुठली उपयोगात आणायची हे ज्याने त्याने ठरवायचे.

मी स्वत: सर्वत्र सरल, सुबोध संस्कृतचाच वापर करतो.

स्वागत

नव्या सदस्याचे स्वागत!.
बाकी लेख आवडला. अजुन असे लेख येउ देत :)

-ऋषिकेश

धन्यवाद पण

इथे प्रकाशनाच्या सोयी अजून थोड्या जास्त असायला हव्या होत्या. तालिका स्वरुपातील (table format) मजकुर इथे डकवला की तालिका गायब होते. सगळे शब्द एकापुढे एक येतात.

मला तर काय करावे तेच कळत नाही.

दोन उपाय

१. तालिकेचे चित्र बनवून लावा.
२. एचटीएमएलचा वापर करा.

दुसरा उपाय करण्यास सुरूवातीला कटकटीचे ठरू शकेल पण सवयीने सहज जमेल.

उदाहरण येथे पहा.

प्रकाशनाला अडचणी येत असतील तर त्या विचारत जा. अनेक सदस्य पुढे येऊन मदत करतील, अडचणींमुळे खोळंबा नको.

शुभेच्छा!

प्रियालीबाई शतश: धन्यवाद.

१. तालिकेचे चित्र बनवून लावा.

ही कल्पना मस्त आहे.

२. एचटीएमएलचा वापर करा.

ह्या विषयी जरा सविस्तर सांगाल का?

आपल्या उपकाराच्या ओझ्याखाली वारंवार दबण्याची अपेक्षा करणारा,
ऋजु.

उत्तम

इथे संस्कृतचे बरेच तज्ञ आहेत आणि त्यांना हा लेख तितका महत्वाचा वाटणार नाही. हे साहजिकच आहे. सचिनला स्ट्रेट ड्राइव्ह कसा मारायचा याच्या प्रशिक्षणात काय इंटरेस्ट असणार? पण माझ्यासारख्यांना (आम्ही दुसरी भाषा हिंदी घेतली, ग़ालिबच्या नादाला लागलो आणि आता दुसरीकडे बघावेसे वाटत नाही, असो.) असे लेख महत्वपूर्ण वाटतात. तरी हा उपक्रम चालू ठेवावा ही विनंती.
----
"Those are my principles. If you don't like them, I have others." -- Groucho Marx

हा हा हा

इथे संस्कृतचे बरेच तज्ञ आहेत आणि त्यांना हा लेख तितका महत्वाचा वाटणार नाही. हे साहजिकच आहे. सचिनला स्ट्रेट ड्राइव्ह कसा मारायचा याच्या प्रशिक्षणात काय इंटरेस्ट असणार?

म्हणूनच धोक्याची सूचना मी सुरुवातीलाच देऊन ठेवली आहे. नंतर कोणी म्हणायला नको की लेख वाचून विरस झाला, आमच्या पी.एच्.डी. शिक्षणात हे काय मध्येच "कमल घर बघ, शरद बदक बघ".

मंडळी

वरचा माझा प्रतिसाद 'टंग-इन-चीक' अशा पद्धतीचा असणे अपेक्षित होते. उपक्रमावरील संस्कृततज्ञांबद्दल मला नितांत आदर आहे आणि यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास क्षमस्व.
----
"Those are my principles. If you don't like them, I have others." -- Groucho Marx
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

उपक्रमावरील संस्कृततज्ञ

असे कोणी तज्ज्ञ इथे असतील तर मलाही आदरच आहे पण मी म्हणेन की संस्कृत भाषातज्ज्ञ हे पाणिनी इ. अधिकारी व्यक्तींनाच म्हणता येईल. मला अंतर्भूत करून इथे सर्व विद्यार्थीच असावेत

(अपवाद फक्त प्रियालीबाईंचा असावा कारण मी त्यांचे इथे अनेक लेख पाहूणे बनून वाचले आणि त्यांच्या ज्ञानाची खोली मला उमगली. त्यांचे कूटप्रश्न तर झकासच असतात, आपण तर बुवा खल्लास. माझी त्यांना जाहीत विनंती की त्यांनी 'परिभाषेन्दु शेखर' वर चार शब्द लिहावेत म्हणजे माझ्या सारख्या नव-अभ्यासकाला बरे पडेल).

असो. पाहूणे ह्या मराठी अपभ्रंशाचा मूळ संस्कृत शब्द प्राहूणिक आणि जेवण ह्या शब्दाचा जेमन.
म्हणूनच गुजरातीत म्हणत असावेत 'जमवा चालो'.

पाहूणिक?

काहीतरी घोटाळा होतो आहे. स्युरावेशिक आगन्तुरतिथिर्ना गृहागते । प्राघूर्णिक:प्राघुणकश्च...अमरकोश २.७.३४
पाहुणा शब्द संस्कृतमधील प्राघुण, प्राघुणक, प्राघुणिक, प्राघूर्णक, प्राघूर्णिक इत्यादी 'अभ्यागत' अशा अर्थांच्या शब्दापासून आला असावा.
जे विशिष्ट तिथी (किंवा उत्सव )सोडून केव्हाही येतात ते अतिथी आणि बाकीचे पाहुणे अशी व्याख्या आहे. पहा:
तिथिपर्वोत्सवा: सर्वे त्यक्ता येन महात्मना । सोऽतिथि: सर्वभूतानाम् शेष: प्राघुणिक: स्मृत: ॥--वाचक्‍नवी

सहमत

तुम्ही म्हणताय ते अगदी मान्य. मी अमरकोश पुन्हा पाहिन.

अपवाद कसला?

अपवाद फक्त प्रियालीबाईंचा असावा कारण मी त्यांचे इथे अनेक लेख पाहूणे बनून वाचले आणि त्यांच्या ज्ञानाची खोली मला उमगली. त्यांचे कूटप्रश्न तर झकासच असतात, आपण तर बुवा खल्लास. माझी त्यांना जाहीत विनंती की त्यांनी 'परिभाषेन्दु शेखर' वर चार शब्द लिहावेत म्हणजे माझ्या सारख्या नव-अभ्यासकाला बरे पडेल

ऋजू, तुम्ही माझी विकेट घेताय. माझं संस्कृताचं ज्ञान यथा-तथा म्हणण्यापेक्षाही कमी. तेव्हा, तुमच्याकडून काही शिकायला मिळाले तर उपयोग करता यावा या स्वार्थातूनच मदत करते आहे, आणि कृपया, ज्ञानाची खोली वगैरे म्हणू नका ही विनंती. इतर सदस्यांच्या विनोदाचा विषय व्हायचा. :)))

उपक्रमावर एकापेक्षा एक वरचढ अभ्यासू आणि तज्ज्ञ व्यक्ती आहेत. आपलेही स्वागत असो!

उत्तम

लेख. उपक्रम स्तुत्य आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

मूळात

उपक्रम ह्या वेबसाईटचा उपक्रमच स्तुत्य आहे. कुठेही छचोरपणा नाही. लिहिणारे गंभीर आणि वाचणारे सुद्धा.

बरे

कुठेही छचोरपणा नाही. लिहिणारे गंभीर आणि वाचणारे सुद्धा.

यात 'कधी कधी लिहिणारे गंभीर आणि कधी कधी वाचणारे सुद्धा' असं म्हणायला काय हरकत आहे?

आपला
गुंडोपंत

खरं आहे!

उपक्रम ह्या वेबसाईटचा उपक्रमच स्तुत्य आहे. कुठेही छचोरपणा नाही. लिहिणारे गंभीर आणि वाचणारे सुद्धा.

हम्म! खरं आहे तुमचं म्हणणं..!

बाय द वे, छचोर या शब्दाची व्युत्पत्ती काय हो?

मूळ शब्द संस्कृत आहे का? नसल्यास 'छचोर'ला संस्कृतमध्ये काय म्हणतात हो? नाही, संस्कृत भाषेसंबंधीच हे सदर आहे म्हणून म्हटलं जरा विचारून घ्यावं! संस्कृतमधून एक निबंध लिहीन म्हणतोय, त्यात कदाचित मला हा शब्द वापरावा लागेल!

आपला,
(गंभीर) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

छचोर संस्कृत-उद्भवच, मलाही आश्चर्य वाटले

अग्निहोत्र्यांच्या शब्दकोशात व्युत्पत्तीचे मूळ "छित्वर" हा संस्कृत शब्द दिला आहे.

मला आजवर हा शब्द फारसीमधून आला असेल असे उगाच वाटायचे. तुमच्या प्रश्नामुळे कोश बघण्याची प्रेरणा मिळाली, त्याबद्दल आभार.

:)

तुमच्या प्रश्नामुळे कोश बघण्याची प्रेरणा मिळाली, त्याबद्दल आभार.

धत् तेरीकी! अहो मी तर मस्करी केली होती, पण बघा मस्करी केली म्हणून बरं झालं की नाही? आपल्याला छचोर हा शब्द कुठून आला याचा शोध तरी लागला! :)

चला, आता माझ्या संस्कृतच्या निबंधात हा शब्द मला बिनधास्त वापरता येईल!

आपला,
तात्या मिसळपावकर.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

नाही वापरता येणार

छचोर(किंवा छछोर) आणि छित्वर यांचे अर्थ भिन्न आहेत, त्यामुळे संस्कृत निबंधात हे शब्द नीट अर्थ माहीत नसताना वापरता येणार नाहीत.
म्हणून छचोरची व्युत्पत्ती विवादास्पद वाटते.--वाचक्‍नवी

पहिला धडा

राजेंद्र ---> मम नाम राजेंद्रः | भवतः नाम किम् ?
नंदन---> मम नाम नंदनः |

नंदन ---> भवत्या: नाम किम् ?
चित्रा ---> मम नाम चित्रा |

(एक शंका : येथे "नाम" मधल्या म चा उच्चार पूर्ण करायचा काय ? ऋजुगुरुजी ?)

हो

नाम चा उच्चार पूर्ण आणि सुस्पष्ट करायचा अगदी जर्मन लोक करतात तसा. आपले हिंदीभाषिक बांधव करतात तसा नव्हे.

सुलभतेने संस्कृत शिकण्यासाठी...

कृपया इथे भेट द्यावी.

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

संस्कृतस्य महिमवर्णनेन नास्ति साधितम् । सततसंभाषणेन तस्य जीवनं स्थिरम् ।।

पाठ दुसरा

कः मनुष्यः ? एषः बालकः | सः वृद्धः | (कुठला माणूस ? हा बालक. तो वृद्ध.)
का बालिका ? एषा चंदा | सा मंदा | (कुठली मुलगी ? ही चंदा. ती मंदा.)
किम् पुस्तकम् ? एतत् पुस्तकम् | तत् पुस्तकम् | (कुठले पुस्तक ? हे पुस्तक. ते पुस्तक.)

(चुकत असल्यास कान धरणे.)

बरे झाले

तुम्हीच इथेच सुरुवात केलीत. मी तर विचार करत होतो कधी मला वेळ मिळेल आणि कधी
मी पहिला लेख लिहेन. असो.

तुम्हाला या व्यासपीठावरील इतर संस्कृत तज्ज्ञ मदत करतीलच आणि चुकलात तर तत्काळ कान ही पकडतील (मला तर कान पकडणे म्हटले की लग्नात वधूचा भाऊ वराचे कान पिळतो तेच आठवते).

उत्तम ऋजुवात

वा! उत्तम ऋजुवात घालताय संस्कृतची!
आमचे गर्गे मास्तर तुमच्या सारखे असते तर आम्हीही दोन चार निबंध नक्कीच लिहिले असते.
असो, अजुन वेळ गेलेली नाही जमेल तसे करूच... :)
आपला
गुंडोपंत

पाठ तीन

सा बालिका वा ? आम्, सा बालिका | (ती मुलगी का ? हो, ती मुलगी.)
सा वृद्धा वा ? न , सा बालिका | (ती वृद्धा का ? नाही , ती मुलगी.)

सः सैनिकः वा ? आम् , सः सैनिकः | (तो सैनिक का ? हो, तो सैनिक.)
सः शिक्षकः वा ? न, सः सैनिकः | (तो शिक्षक का ? नाही, तो सैनिक.)

एतत् पुष्पम् वा ? आम् , एतत् पुष्पम् | (ते फूल का ? हो, ते पुष्प.)
एतत् गृहम् वा ? न , एतत् पुष्पम् | (ते घर का ? नाही, ते फूल.)

पाठ चार

पुस्तकम् कुत्र अस्ति ? पुस्तकम् अत्र अस्ति | विद्युद्दीपः अत्र नास्ति| विद्युद्दीपः तत्र अस्ति | उपनेत्रम् अन्यत्र अस्ति | ईशः सर्वत्र अस्ति | सर्वा: बालका: एकत्र संति |
(पुस्तक कुठे आहे ? पुस्तक इथे आहे. दिवा इथे नाही. दिवा तिथे आहे. चष्मा इतर ठिकाणी आहे. देव सर्वत्र आहे. सर्व मुले एकत्र आहेत.)

;-)

कुत्राSपि पतितम् हाडम् सर्किटम् प्रतिगच्छति |

एका सुहृदाने पाठविलेला एक उच्च कोटीचा प्रतिसाद

>>>> हा हा हा ! आधी घर कुठले फुल कुठले, सैनिक कुठला, शिक्षक कुठला हेच जर समजले नाही तर एखादी भाषा कमी आली तरी फारसे बिघणार् नाही हो !!

;-)

अहो मुक्तसुनीतभौ,

त्यालाच बहुधा म्हणतात, सगळे रामायण झाले तरी रामाची सीता कोण?

तालिका रुपात १

विभक्ती प्रत्यय मराठी प्रत्यय अर्थ
प्रथमा सूर्य: - सूर्य
द्वितीया सूर्यम् ला सूर्याला
तृतीया सूर्येण ने सूर्याने
चतुर्थी सूर्याय साठी करिता सूर्यासाठी
पञ्चमी सूर्यात् ऊन, हून, पासून सूर्यापासून
षष्ठी सूर्यस्य चा सूर्याचा
सप्तमी सूर्ये सूर्यात
सम्बोधन हे सूर्य हे, अरे हे सूर्या

तालिका संरचना सौजन्य - प्रियालीताई.

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

संस्कृतस्य महिमवर्णनेन नास्ति साधितम् । सततसंभाषणेन तस्य जीवनं स्थिरम् ।।

विभक्ती

आम्ही शाळेत एक तक्ता पठ केला होता त्याची आठवण झाली
एकवचन.... अनेकवचन
--------------------
स ला ते........स ला ना ते
ने ही ए शी........ने ही ए शी
स ला ते........स ला ना ते
उन हून ..... उन हून
चा ची चे... चे च्या ची
त आत मध्ये... त आत मध्ये
भो रे अरे... भो रे अरे

:)

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

हो

तोच तक्ता इथे लिहिला आहे. कारण मराठी भाषिक विद्यार्थांसाठी संस्कृत शब्द / वाक्य रचना समजून घेण्याचा तोच एक चांगला मार्ग आहे.

मात्र तो लिहिताना थोडी काटछाट केली. उदा. स, ला, ते मधील आणि ते आता फार कमी वापरले जातात. ला प्रत्यय अधिक वापरला जातो.

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

संस्कृतस्य महिमवर्णनेन नास्ति साधितम् । सततसंभाषणेन तस्य जीवनं स्थिरम् ।।

तालिका रुपात २

प्रथमा कर्ता - सूर्य: नाम मम प्रियदेव: । सूर्य: नाम उर्जादाता।
द्वितीया कर्म परित:, प्रति, अभित:, विना सूर्यं परित: ग्रहा: चलन्ति । सूर्यं प्रति मम भक्ति ।
तृतीया साधन विना, सह, किम्, अलम् सूर्येण विना जीवनं कठिनम् । आकाशे सूर्येण सह चन्द्र:, खगा:, तारका: ।
चतुर्थी सम्प्रदान नम:, स्वस्ति, दा, रुच्, स्पृह् सूर्याय नम: । अहं सूर्याय अर्घ्यं ददामि ।
पञ्चमी वियोग, अपादान विना, ऋते, बहि:, प्रभृति, आ,
आरभ्य
सूर्यात् वयं प्रकाशं प्राप्नुम: । सूर्यात् उष्मा आगच्छति ।
षष्ठी स्वामित्व कृते, उपरी, अध:, पश्चात् सूर्यस्य उपरि जीव: नास्ति । सूर्यस्य द्वितीयनाम भास्कर: । सूर्यस्य उपरि गर्ता: ।
सप्तमी स्थानदर्शक व कालदर्शक स्निह्, पत् सूर्ये अहं स्निह्यामि । सूर्ये मम श्रद्धा ।
सम्बोधन सम्बोधन (अरे, अग, अहो) - हे सूर्य, रक्ष माम् । हे सूर्य, त्राहि माम् । हे सूर्य, अहं तं नमामि ।

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

संस्कृतस्य महिमवर्णनेन नास्ति साधितम् । सततसंभाषणेन तस्य जीवनं स्थिरम् ।।

विभक्ती आणि कारक यांच्यात गोंधळ

अनेकदा भाषा शिकवताना "कारक" आणि "विभक्ती" या कल्पनांमध्ये गोंधळ केल जातो.

स्वभाषा (म्हणजे मराठी) किंवा प्रचलित अन्यभाषा (म्हणजे हिंदी, इंग्रजी, वगैरे) बोलताना या कल्पना नाहीतरी मनात न आणताच, सरावामुळे योग्य व्यवहार होतो. एखाद्याचे संस्कृतमधेही तसेच सरावाचे बोलणे होते. त्यामुळे या गोंधळाचा फार बाऊ करून घेऊ नये. पण या कल्पनांचा उपयोग करायचा असल्यास, मनात गोंधळ नसणे बरे असते.

प्रथमा ही विभक्ती आहे. कर्ता हे कारक आहे. संस्कृतमध्ये कर्ता हा कधीकधी प्रथमा विभक्तीत दिसतो, तर कधीकधी तृतीयेत.
कर्म हे कारक आहे. संस्कृतमध्ये कर्म हे कधीकधी प्रथमेत दिसते तर कधीकधी द्वितीयेत.

मराठीमधे किती विभक्ती आहेत त्याबद्दल अजून एकमत नाही. पण मराठी ही प्रचलित भाषा असल्यामुळे एकमत असल्या-नसल्याचा काही फरक पडत नाही. आई-वडलांचे बोलणे ऐकून तसेच बोलणे हा गाडी रुळावर ठेवण्याचा उत्तम मार्ग.

मान्य अगदी मान्य

संस्कृतमध्ये कर्ता हा कधीकधी प्रथमा विभक्तीत दिसतो, तर कधीकधी तृतीयेत.

कर्मणि प्रयोगात कर्ता तृतीयेत सुद्धा असतो. पण असे निबंध लेखन शिकवताना सांगून विद्यार्थ्यांच्या मनांत किती गोंधळ वाढवायचा. हे काही कोणी संस्कृत एम. ए. वा
पी.एच.डी. चे विद्यार्थ्यी नव्हेत. ८ वी, ९ वी, १० वीच्या विद्यार्थ्यांना संस्कृत हे सुलभ
करूनच सांगितले पाहिजे ह्या मताचा मी आहे.

कर्ता हे कारक प्रथमा व तृतीया दोन्हीला लागू पडते हे पूर्णपणे सत्य आहे. पण
लौकिक जगांत कधी कधी अर्ध सत्य सुद्धा तितकेच उपयोगी पडते. निदान,
निबंध लेखनात तरी.

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

संस्कृतस्य महिमवर्णनेन नास्ति साधितम् । सततसंभाषणेन तस्य जीवनं स्थिरम् ।।

 
^ वर