दहन, दफन आणि इतिहास
काल मी मीना प्रभुंचे ग्रीकांजली वाचायला सुरवात केली. (पूर्ण नाहि केले हा भाग अलाहिदा). त्यात सुरुवातीलाच त्यांनी दहन आणि दफन यावर एक् टिप्पणी केली आहे.आता माझ्याकडे ते पुस्तक नाहि पण तो परिच्छेद साधारण असा होता
"मला अपली दहन संस्कृती फार जवळची वाटायची. आणि हीच योग्य आहे असेही वाटायचे. मनुष्य गेल्यावर, त्याचा देह सांभाळा, तो पुरा, त्याला दरवर्षी फुले वहा असे कोणतेही बंधन आपल्यावर नाही. शिवाय दफन केल्यावर ती जाग पुढे कोणत्याही कार्यासाठी वापरता येत नाहि.........."
अश्या आशयाच्या एका परिच्छेदा नंतर पुढे लेखिका म्हणते की
"इथे (ग्रीसला/अथेन्सला) आल्यावर मात्र जाणवलं की माझी ही समजुत तितकीशी बरोबर नाही. इथे मेलेल्या माणसाला पुरताना बरोबर त्याची भांडी, वस्त्रे, शस्त्रे आदि गोष्टी पुरल्या जात. त्यामुळे दफन केवळ देहाचा सांभाळ नसून त्या पिढीचा सांभाळ होतो. देहाबरोबर त्याकाळचा इतिहासही सांभाळला जातो. मला तेव्हाच्या वस्तु, भांडी, पुतळे, दागिने बघताना नेहेमी वाटत होते की राम कश्या प्रकारचे कपडे घालत असेल? सीता कोणते अलंकार वापरत असेल? देह हा केवळ पोशाख असुन आत्मा चिरंतन आहे या विश्वासावर आपण आपला मौलिक इतिहास गमावून बसलो आहोत..."
हे वाचल्यावर काहि विचार मनात आले.
१. दहन संस्कृतीमुळे आपण इतिहासाचे काहि संदर्भ हरवून बसलो आहोत हे खरे. पण खरच आपल्याला माहित आहे का रामकाळात जनतेचा पेहराव कसा होता? कोणते अलंकार प्रचलित होते?
२. आपल्याकडील वारसा टिकून राहण्यासाठी निदान आता काहि करता येईल का?
३. दहन संस्कृती चांगली आहेच. पण या संस्कृतीने खरच इतका तोटा केला आहे का? का होणार्या फयद्यापुढे हा तोटा शुल्लक आहे?
Comments
दहन
दहन हे धार्मिक संस्कृतीत अग्नि देवाच्या प्रभावात असल्याने, तसेच व्यावहारिक दृष्ट्या सोयीचे असल्याने त्याला मान्यता मिळाली असावी. वाळवंट प्रदेशात दफन हे सोयीचे असल्याने तिक्डील प्रदेशात द्फनाची परंपरा निर्माण झाली असावी.
प्रकाश घाटपांडे
वैकुंठ
पुण्यातील वैकुंठ स्मशान भुमीतील विद्युत दाहिनी जवळ हा फलक.
प्रकाश घाटपांडे
काही भौगोलिक कारणे.
काही भौगोलिक कारणे.
माझ्या माहितीप्रमाणे, दहनविधीस लोकमान्यता मिळणे ह्यास धार्मिक कारणांपेक्षा काही भौगोलिक कारणे असावीत. भारतातील सर्वत्र असणारे समशीतोष्ण वातावरण हे ह्यात एक मुख्य कारण असावे. अशा वातावरणामुळे येथे ना-ना प्रकारच्या व्याधी निर्माण झाल्या ज्यामुळे पिढ्याच्या पिढ्या प्रभावित झाल्याची उदाहरणे इतिहासात आहेत. (अर्थात ह्यात अनेक प्रकारच्या संसर्गजन्य व्याधी आल्याच.) दफनविधीमुळे, मृत मनुष्याच्या देहासोबत अशा संसर्गजन्य व्याधींचे विषाणुदेखील जतन होणे शक्य आहे. ते टाळण्यासाठी दहनविधी सर्वमान्य झाला असावा. (वाळवंटी प्रदेशात, किंवा शीतप्रदेशात, जेथे सध्या दफनविधी प्रचारात आहे, तेथील वातावरणामुळे त्यांना ह्याप्रकारचे प्रश्न उद्भवत नसावेत.)
दुसरे म्हणजे भारत हा पूर्वापार एक शेतीप्रधान देश असल्याकारणे, ज्या भूमितून आपण पिके घेतो, ती भूमि शक्यतो शुद्ध असावी अशी शुद्धतेची संकल्पनादेखील असावी. मनुष्य काय, किंवा इतर प्राणी काय, मृत्युनंतर मृतदेहाचे decomposition होते. ते बहुधा शेतीसाठी उपयुक्त नसावे. 'पेराल तसे उगवते' असे म्हणतात, तसेच 'पुराल तसे उगवते' सुद्धा म्हणत असतील!
ह्याचबरोबर, आपले तत्त्वज्ञान हे निव्वळ भौतिकतेकडे झुकणारे नसून आध्यात्माकडे झुकणारे आहे. आध्यात्मामध्ये मनुष्याच्या मृत देहाला काडीमत्र मूल्य नाही. मृत्युनंतरही पुन्हा कशाला जागा अडवा? असा विचार करून आपल्या पूर्वजांनी दहनविधीचा प्रचार केला असावा.
रामायणकालीन मंडळी काय वेषभूषा करीत होती इ. इ., झाले बहि:रंगपरीक्षण. आपल्याकडे मुख्यत: अंत:रंगपरीक्षण करण्याची व्यवस्था होती. असो. आपल्याकडील वारसा आचारापेक्षा विचारांच्याच रूपाने टिकवून ठेचण्यात आपल्या पूर्वजांना स्वारस्य असावे.
लोकसत्तेत अशातच ह्या विषयावर चर्चा झाली. पण तेंव्हा मला 'उपक्रम' माहिती नव्हता.
अलिकडे इतर देशांतही दहनविधीचे पुरस्कर्ते निर्माण होऊ लागले आहेत असे ऐकून आहे.
हैयो हैयैयो!
पंचतत्व
अजून एक ऐकलेले कारण म्हणजे...
आपल्या तत्वज्ञानाप्रमाणे चराचर पृथ्वी, तेज, जल, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांपासून बनलेले असते. त्यातील प्राण सोडताना पृथ्वीशी संबंध जातो (पृथ्वीचा भाग पृथ्वीला मिळाला), आत्मा वायूरूप होवून आकाशात (अवकाशात) जातो, आगीतून (दहनामधून) "तेज" त्याचा भाग घेतो, अस्थीविसर्जनामधून पाणि त्याचा भाग घेते.
बाकी...
ख्रिश्चनांमधे पण "ऍशेस टू ऍशेस, डस्ट टू डस्ट" म्हणण्याची प्रथा आहे. (ऐकीवः) अमेरिकेत चर्चसिस्टीममुळे आधी दहन वगैरे प्रकाराला बंदी होती. पण आता पर्यावरण, जागांचे भाव लक्षात घेत बरीच माणसे दहन करतात. (नंतर "मीट द पेरेन्टस" मधे दाखवल्याप्रमाणे, त्यांचे नातेवाईक त्यांच्या अस्थी कपाटात कुठेतरी ठेवून देतात तर कधी कधी त्या घेयलाच जात नाहीत आणि मग इथल्या फ्युनरल होम्स ना त्याचे काय करायचे ते समजत नाही...)
ज्यूंमधे जरी दफन होत असले तरी ते त्या पार्थिवदेहाला नुसतेच कापडात गुंडाळतात आणि पुरतात. त्यांचे कारण असते की माणूस येताना जसा येतो तसाच जाताना असला पाहीजे.
बर्याचदा सिमेटरीज् मधे कुटूंबे एकाच जागी अनेकांना पुरतात (एकाच्यावर दुसरा असे..). त्यांची सर्व नावे त्या चिरेवर कोरलेली दिसतात.
हं
भारतातील ख्रिश्चन मित्राकडे चौकशी केली असता समजले की त्यांचे नाव एका चर्च मधे नोंदले असते. ते चर्च परंपरागतरित्या चालत आले असते. जो पर्यंत तुम्ही त्या गावात आहात / तुमचे कोणी कुटुंबिय तिथे आहेत; दफन त्या गावातील चर्चच्याच दफनभुमीत होते. इथे प्रत्येक नोंदलेल्या कुटुंबाची एक जागा रखीव असते. मग त्या कुटुंबातील व्यक्ती गेल्या नंतर दरवेळी त्या विशिष्ट जागीच दफन केले जाते. (जर एकाच कुटुंबात एकापेक्षा अधिक व्यक्ती फार थोड्या फरकाने दगावल्या तरच विशिष्ठ परिस्थिती म्हणून त्यांना वेगळी जागा मिळते.
वरील बरिचशी मते दहनाचे फायदे दर्शवतात. बाकी दहन आणि दफन यांच्यामधील तुलना करताना दहनाचा पर्यावरणाच्या दृष्टीने फायदा निर्विवाद आहे. प्रश्न आहे वारसा जपुन न ठेवण्याच्या संस्कृतीचा. आपल्याला आपली १० वर्षांपूर्वीची वस्तु, फोटो सुद्धा बरेच काहि सांगुन जाते. आपल्य आईवडिलांचे लग्नातले फोटो आणि हल्लीच्या लग्नांतील फोटो बरेच सामाजिक, सांस्कृतीक, आर्थिक बदल अधोरेखित करतात.
असो, अश्या वेळी (जे झाले ते झाले असे म्हणून) आता वारसा जपण्यासाठी काय करता येईल. डिजीटल पद्धतीने खुपसा विदा संग्रहीत आहेच. पण १००० वर्षांनी काय परिस्थिती असेल कोणास ठाऊक? कदाचित सगळे बेचिराख होऊन पुनश्च हरि ओम करायची वेळ येऊ शकेल. त्याही परिस्थितीत भौतिक (रिअल / नॉनवर्च्युअल) वारसा कसा जपता येईल?
ऋषिकेश
शोकांतिका
प्रश्न आहे वारसा जपुन न ठेवण्याच्या संस्कृतीचा.
ते खरेच. वारसा आहे असे समजले तर तो जपून ठेवणार, ना?
कुठच्याही गोष्टीला वारसा समजलाच जात नाही हीच तरी खरी शोकांतिका आहे.
बाकी दहन/दफन यांचे दोन्हीचे "फायदे" आहेत हे खरे.
वृत्ती
पण १००० वर्षांनी काय परिस्थिती असेल कोणास ठाऊक? कदाचित सगळे बेचिराख होऊन पुनश्च हरि ओम करायची वेळ येऊ शकेल. त्याही परिस्थितीत भौतिक (रिअल / नॉनवर्च्युअल) वारसा कसा जपता येईल?
किस्सा थोडा वेगळा आहे पण बरेच काही सांगून जातो:
पंधराएक वर्षांपुर्वीची गोष्ट आहे (तेंव्हा आम्हाला आमच्या प्राध्यापकांनी सांगितली होती) . अमेरिकेत हॅझार्डस वेस्ट लँडफिल्स हा प्रकार तसेच न्युक्लिअर वेस्टपण बर्याच ठिकाणि साठवले जाते. तेंव्हा एन्व्हॉयरमेंटल प्रोटेक्शन एजन्सी मधे चित्रलिपी/भाषालिपीवरून संशोधन चालू होते की (मधल्याकाळात अचानक झालेल्या प्रसंगांमुळे )अजून १००० वर्षांनी जर सगळेच बदलेले असले तर त्या वेळच्या समाजाला पण आजची भाषा अथवा माहीती कशी समजावून सांगता येईल इत्यादी...
७०च्या दशकात जेंव्हा पायोनिअर यान नासाने पाठवले (जे आता ग्रहमाला सोडून आकाशगंगेत निघून गेले) तेंव्हा बाहेरील समाजाला आपण कोण आहोत ते समजण्यासाठी त्यात बायनरी लिपित तसेच चित्रलिपित पृथ्वीवरील माहीती (त्यात सात आश्चर्यांपैकी एक म्हणून ताजमहाल पण होता) दिली होती. (नारळीकरांच्या "यक्षाचा प्रश्न" या पुस्तकात त्याव्रून "ट्रॉयचा घोडा" म्हणून कथा होती)
असं झालं असावं...
की आपल्या पूर्वजांनी इतका दूरवर विचार केला नसावा ;-) म्हणजे आपण काहीतरी पुरून ठेवलेले आपले वंशज उकरून काढतील असा... ह. घ्या.
वर दिल्याप्रमाणे भौगोलिक कारण आहेच पण तत्कालीन संस्कृतींनी मृत्यूपश्चात जीवन कसे पाहिले यावरही अंत्यविधी अवलंबून होते. जसे, भारतीयांना आत्मा शरीर बदलतो, तो नश्वर आहे त्यामुळे जुन्या शरीराची त्याला गरज नाही असे मानले तर इजिप्शियनांनी त्या उलट विचार केला. पारशांच्या मते मृतदेह हा दूषित होतो, त्याचा ताबा वाईट शक्ती घेतात त्यामुळे तो नष्ट करणे गरजेचे होते आणि त्याला टॉवर ऑफ सायलेन्सवर ठेवले जाते. रिजरेक्शनच्या विश्वासातून ख्रिश्चनांनी आपले देह पुरून ठेवायला सुरूवात केली.
मृत्यूपश्चात जीवन आहे असे समजणार्या संस्कृतींनी मृतदेहासमवेत भांडी, खेळणी, कपडे, आभूषणे इ. पुरून ठेवली. भारतीयांचे तत्वज्ञान त्या प्रकारचे नसल्याने त्यांनी हे करून ठेवणे शक्य नसावे.
प्राचीन ग्रीक आणि रोमन जगतात दफनासह दहन विधी हा सर्वमान्य होता. होमरच्या इलियडमध्ये अकिलिस आणि त्याचा मित्र पेट्रोक्लस या दोघांच्या दहनाचे वर्णन आहे. त्यात चिता रचून त्यांना अग्नी कसा दिला गेला, नंतर त्यांचे अवशेष भांड्यात - "अर्न"मध्ये कसे ठेवले गेले इ. इ. चे वर्णन आहे. तेव्हा त्याकाळात मृत्यूपश्चात मृतदेहाची विल्हेवाट लावणे ऐच्छिक असावे. (चू. भू. दे. घे)
अबूधाबीला असताना माझ्या मित्रमंडळींपैकी कोणीतरी मला सांगितल्याचे आठवते की तेथील दफनभूमी काही वर्षांसाठी (उदा. ५० वर्षे इ.) राखली जाते. यानंतर, ती खोदून साफ केली जाते आणि इतर कार्यासाठी वापरली जाते. या कथेची विश्वासार्हता मला माहित नाही पण वाळवंटातील वस्तीच्या थोडक्या परिसरामुळे असे केले जाते असे ऐकून आहे.
राम आणि सीता कसे कपडे घालत होते याचे समग्र वर्णन रामायणात येतेच. परंतु, राम आणि सीता या ऐतिहासिक व्यक्ती मानल्या तर त्या महाकाव्यात वर्णिल्याप्रमाणेच वस्त्रे आणि आभूषणे घालत होते यावर बेधडक विश्वास ठेवता येईल की नाही हे सांगता येत नाही. त्यातून रामायणाचा काळ ६-७००० वर्षांपूर्वीचा काढला तर पटकन विधान करणे कठीण वाटते.
.
.
.
.
.
.
.
.
इ.स.पूर्व २५००-३००० वर्षांपूर्वी (म्हणजे सुमारे ५००० वर्षांपूर्वी) मात्र भारतीय अशा गोष्टी, वस्त्रे, आभूषणे वापरत असावेत. शोधले तर बर्याच गोष्टी मिळून जातात.
महत्वाचा मुद्दा
वर दिल्याप्रमाणे भौगोलिक कारण आहेच पण तत्कालीन संस्कृतींनी मृत्यूपश्चात जीवन कसे पाहिले यावरही अंत्यविधी अवलंबून होते.
हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे असे वाटते. किंबहुना यामुळेच विविध संस्कृतींमध्ये वेगवेगळे अंत्यविधी आले असावेत.
अवांतर : यामुळे पाश्चात्य संस्कृतीमध्ये टूम्बस्टोन आणि एपिटॅफ ह्या कल्पना आल्या ज्यांचा बर्याच वेगवेगळ्या संदर्भात वापर केला जातो.
----
"Those are my principles. If you don't like them, I have others." -- Groucho Marx
कयामत
दफनाबाबत अजून एक गोष्ट जी अब्राहमिक रिलीजन्समधे आहे ती म्हणजे, जगाच्या अंताला त्यांचा प्रेषित का देवदूत येणार आणि सर्वांना उठवणार आणि मग त्यांच्या पापपुण्यांचा हिशेब करून त्यांच्या स्वर्ग/नरकातील जागांचे ठरवणार.
कदाचीत हिंदूना स्वत्;च्या पापपुण्यांचा "पुरावा" कोणाला मिळून् नये वाटत असावे म्हणून "जाळावा" असे ठरवण्यात आले असावे...:-)