बर्फाची लादी आणि लोहगोलक

(हे भौतिकशास्त्रातील कोडे आहे.)

कॉलेजमधली मुली-मुले वात्रट असतात, हे एक सर्वमान्य सत्य आहे. त्याचा प्रत्यय हल्लीच आमच्या वनभोजनात आला.

वनभोजनासाठी गोळाफेक संघातील अनेक मुली आल्या. त्यांनी सर्वांवर छाप मारायची ठरवली. आणि दोन फेकायचे लोखंडाचे गोळे आणले.

वनभोजनाच्या ठिकाणी पोचलो, आईस्क्रीम थंड ठेवण्यासाठी मोठाल्या बर्फाच्या लाद्या आणल्या होत्या त्या आईस्क्रीमच्या खोक्यांवर ठेवल्या. जणूकाही एखादे टेबलच झाले त्या लादीचे. तिकडे खिचडी शिजवण्यासाठी मोठी चूल पेटवली.

अर्ध्या-एक तासाने मुली गोळाफेकीचे प्रदर्शन करण्यासाठी गोळे शोधू लागल्या तसा एकही गोळा सापडेना! मग कोणाच्यातरी लक्षात आले की चुलीच्या जाळात कोणीतरी लोहगोलक टाकला आहे, आणि तो तापून लालबुंद झालेला आहे. अशा या वात्रट खोड्या! मुली हिरमुसल्या. मला एक कल्पना सुचली - "अरे, हा गोळा बर्फाच्या लादीवर ठेवला तर लगेच थंड होईल." मग आमच्यातील एक बलदंड (पण 'ढ') मुलाने फावड्यात तो गोळा उचलला आणि बर्फाच्या "टेबलापाशी" नेला.

तिथे गेलो तर काय! त्या खोडकर विदूषकाने दुसरा गोळा बर्फाच्या लादीवर ठेवलेला होता. म्हणजे एक गोळा अतितप्त म्हणून वापरता येऊ नये, एक अति गार म्हणून!

त्या 'ढ' मुलाच्या तोंडून एक 'ढ' शंका बाहेर आली. "ए स्कॉलर! या तापलेल्या गोळ्याने बर्फ वितळून गोळा आईस्क्रीमच्या खोक्यावर जाईल की!"

मी त्याला समजावले. "अरे, हा 'अनॉमॅलस केमिस्ट्री ऑफ आईसचा' प्रश्न नाही. साधा 'स्टॅटिक मेकॅनिक्सचा' आहे. आपल्याला विचार फक्त वजनाचा करायचा आहे. ही बर्फाची लादी एका लोहगोळ्याचे वजन पेलण्यास समर्थ आहे, हे आपल्याला दिसतेच आहे. न्यूटनच्या तिसर्‍या नियमाप्रमाणे जितके वजन गोळा लादीवर टाकतो, त्याच्या बरोबर उलट, तंतोतंत तितकेच बल लादी गोळ्यावर देते. म्हणूनच तर तो थंड लोहगोळा तिथे स्तब्ध आहे, हलत नाही. तो गोळा ढकलून टाकू, आणि बरोबर त्याच ठिकाणी हा तापलेला गोळा ठेवू. याचेही वजन त्या गोळ्या इतकेच, समसमान नॉर्मल रिऍक्शनचे बल यालाही तसेच पेलून धरेल."

शेजारी उभ्या असलेल्या वर्गमित्राने म्हटले - "गोळा आईसक्रीमला लागला तर तू पूर्ण खोकेभरून आईस्क्रीम खायचे, स्कॉलर!" खोडकर हाच असावा, हे मी चटकन ताडले. पण हे फारच - खुद्द न्यूटनविरुद्ध पैज! मी त्याला म्हटले - "पैज स्वीकारली! गोळा मुळीच खाली जाणार नाही. तू दर आठवड्याला मला एक प्लेट आईसक्रीम खिलवायचेस, सुट्या येईपर्यंत..."
"ओके!"

प्रश्न : मी अनेक आठवडे एक-एक प्लेट आईस्क्रीम खाल्ले की त्या एकाच दिवशी ओ येईपर्यंत खाल्ले?

लेखनविषय: दुवे:

Comments

बर्फातून थंडपणा लोहगोळ्यात न जाता लोहगोळ्यातील उष्णता बर्फाच्या लादीकडे जात असल्याने लादी वितळण्यास सुरुवात होऊन लोहगोळा रुतेल असे वाटते. (आईस्क्रीमला लागेल की नाही हे लादीच्या जाडीवर व खोक्याच्या सामानावर अवलंबून असावे.)

'ढ'

तपशील

बर्फाच्या लादीची जाडी २० सेमी (ही मी येथे देणे जरूर आहे.) बर्फाचे तापमान -४ डिग्री सेल्सियस. घटनाक्रमाच्या मुदतीत ताप हवेत विरून गेला नाही असे मानावे. खोक्याला लागले तर आईसक्रीमला लागले असे मानावे.

पुढील माहिती इंटर्नेटवरून गोळा केली :
शॉट पुटच्या गोळ्याचे वजन ४ किलो. त्रिज्या ५ सेमी.
लोहाची स्पेसिफिक हीट (विशिष्ट तापवाहन??) ०.११ कॅलरी/ग्रॅम
गोळ्याचे तापमान ५०० डिग्री सेल्सियस (४५०-५०० डिग्री लाकडाची चूल जळते)
बर्फाची लेटंट हीट ८० कॅलरी/ग्रॅम
बर्फ उत्तम तापरोधक (इन्स्युलेटर) आहे असे मानण्यास हरकत नाही - बर्फाचे इग्लू बनवतात ते आठवावे.

येथे न्यूटनचा तिसरा कायदा थंड गोळ्याला आणि गरम गोळ्याला एकसारखा लागू होतो का? वेगळेपण असल्यास काय? ही कारणमीमांसा चर्चेत आल्यास उत्तम.

अवांतर

तपशीलात वेळेचे बंधन नसल्याने गोळा 'शेवटी' बर्फ वितळून (पृथ्वीवरील साधारण तापमान पाहता) गोळा खोक्याला लागेल. (आत आईस्क्रीम असेल असे मानण्यात फार अर्थ नाही.)

'इंटर्नेट' वरून गोळा केलेल्या माहितीकडे पाहता आपला (तपशीलात न जाता), गोळ्याला तोलून धरण्याचा इरादा दिसतो.
(ह. घ्या.)

फार अवघड प्रश्न आहे.

लोहगोळा शून्य अंशापर्यंत थंड होताना ४०००*५००*०.११=२,२०,००० कॅलरी उष्णता बर्फाला देईल. गोळा बर्फात शिरून खोक्याला टेकताना १०*१०*२० घ.सें. बर्फ वितळवील. त्याला १०*१०*२०*(८०+४)=१६८००० कॅलरी उष्णता लागेल. म्हणजे कमी. त्यामुळे गोळा आइस्क्रीमच्या खोक्याला चिकटेल. न्यूटनच्या तिसर्‍या कायद्याचे इथे काय द्याचे?--वाचक्‍नवी

कोडे लिहिण्याचे कारण

गुरुत्वाकर्षणाविषयीच्या चर्चेत दोन प्रतिसादांत विरोधाभास होता :

मला वाटतं Normal Reaction हाही एक असाच स्यूडोफोर्स् आहे ज्यामुळे टेबलावर ठेवलेल्या वस्तूवर गुरुत्वीय बल कार्यरत असूनही ती टेबलाचा पृष्ठभाग फोडून खाली पडत नाही. बरोबर आहे का? (दुवा) या वाक्यावर दोन सुरुवातीला सारखे, शेवटी वेगळे प्रतिसाद आले :
१. टेबलावर ठेवलेल्या (टेबल न फोडणार्‍या) वस्तूवरचा रिऍक्शन बल हे स्युडो बल नसते. ते सामान्य ओळखीतले विद्युच्चुंबकीय* (इलेक्ट्रोमॅग्नेटिक) बल असते. (दुवा)
२. नॉर्मल रीऍक्शन हा खराखुरा भौतिक (फिजिकल) फोर्स आहे. हा फोर्स टेबलावरील वस्तूवर ऊर्ध्व दिशेने (व्हर्टिकली अप) कार्यरत असतो. हे बल (फोर्स) आणि वस्तूला खाली ओढणारे पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल ही ई॑क्वल, अपोझिट, कोलीनिअर बले वस्तूला स्थिर (इक्विलिब्रियम मधे)ठेवतात. नॉर्मल रीऍक्शन हे विद्युत्चुंबकीय बल नव्हे. (दुवा)

यावरून असे दिसते की न्यूटनच्या तिसरा नियम (रिऍक्शन) "टेबलावर ठेवलेली वस्तू" या संदर्भात कार्यरत असावा (दोन्ही प्रतिसादांतले साम्य). वरील प्रतिसादांतील विरोधाबाबत गणित सोडवताना तुमचे काय मत झाले?

ढ^२ मुलाचे उत्तर

लोहगोल (आदर्श घनगोल समजू) बर्फलादीच्या वरच्या पृष्ठभागाला (आदर्श प्रतल समजू) एका आणि फक्त एकाच बिंदूत सर्वप्रथम स्पर्श करेल.
येथे 'अनॉमॅलस केमिस्ट्री ऑफ आईसचा' प्रश्न नाही.

बर्फाची उष्मावाहकता कमी असल्याने फक्त त्या बिंदूवरचे बर्फ वितळेल. इथे बर्फ वितळण्याची लेटंट हीट गोळ्याकडून घेतली जाईल. त्याचे पाणी बनेल. हे पाणी शंभर अंश से. इतके तापेल. मग बाष्पीभवनाची लेटंट हीट (६०० कॅल/ ग्रॅ )गोळ्याकडून घेतली जाईल.
पुढे गोळा जसजसा लादीत घुसत जाईल तसतसे वक्रतेच्या घनप्रमाणात अधिकाधिक बर्फ विरघळेल आणि त्या पाण्याचे बाष्प होण्याची प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया गोळा शंभर अंशांपेक्षा थंड होईपर्यंत (किंवा गोळ्यातील उष्मा विस्थापित पाण्याला बाष्पीभूत करण्यास असमर्थ होईपर्यंत) चालेल.

गोळ्यातील एकूण उर्जा (अंदाजे): २,२०,००० कॅलरी

६००+१००+८० = ७८० कॅलरी = १ घ. से.मी. बर्फाचे वाफेत रुपांतर करण्यास लागणारी ऊर्जा.
१०० अंश सें पर्यंत(५००-१००)*०.११*४००० = १७६००० कॅलरी.(??)
बर्फाचे विस्थापित (बाष्पीभूत) आकारमान = १७६०००/ ७८० कॅलरी/ग्रॅ. =२२५.६४ घ. से. मी.
(= गोळा त्रिज्येपेक्षा कमी अंतराइतका लादीत घुसला.)

१०० ते -४ पर्यंत १८० कॅलरीज = १ घ.से.मी. बर्फाचे १०० अंश से पाण्यात रुपांतर करण्यास लागणारी ऊर्जा
(१००--४)*०.११*४०००=४५००० कॅलरी
बर्फाचे द्रविभूत आकारमान = ४५०००/१८० = २५० घ. से. मी.
अधिक २५० घ.से.मी. पाण्यास -४ अंशापर्यंत थंड करण्यास लागलेली ऊर्जा = २५४ कॅलरी
वितळलेले बर्फ = २५४/८०= ३ घ.से.मी.
एकूण वितळलेले बर्फ = २२५+२५०+३=४७८ घ. से. मी.
पण गोळा लादीतून बाहेर पडण्यासाठी त्याने विस्थापलेले बर्फाचे आकारमान = पाय*त्रि^२*लादीची जाडी = १५७० घ. से.मी.
गोळा अंदाजे ४७८/पाय*त्रि^२ = ६ से. मी. लादीत घुसला. लादी २० से.मी. जाड आहे.

त्यामुळे गोळा लादीतच अडकून राहील.
त्यामुळे श्री. धनंजयांनी अनेक आठवडे एकेक प्लेट आईसक्रीम खाल्ले असावे असे वाटते.

न्यूटनचा तिसरा नियम गोळ्याला लागू होतो. पण बर्फ विरघळल्यावर आर्किमिडिजचा सिद्धान्तही लागू होईल असे वाटते.

(एका ढ^२ मुलाचे उत्तर! :))

बर्फ वितळला तरी पुरे

विसुनाना लिहितात :
> ६००+१००+८० = ७८० कॅलरी = १ घ. से.मी. बर्फाचे वाफेत रुपांतर करण्यास लागणारी ऊर्जा.

पण बर्फ वितळला की त्याचे पाणी लगेच बाजूला सरेल, बाष्पीभूत होण्याइतपत वेळ गोळ्याजवळ राहाणार नाही. त्यामुळे पाण्याचे पूर्ण बाष्पीभवन होण्यापर्यंत ऊर्जेचा हिशोब करू नये.

(किंवा पाणी बाजूला सरणार नसेल तर त्याची कारणमीमांसा द्यावी. तीही चालेल.)

उत्तर

बर्फाच्या खाली जाऊन खोक्याला टेकण्यासाठी गोळा २० से.मी. खाली जावा लागेल. त्यामुळे १५ से.मी.उंची, ५ सेमी त्रिज्येचा दंडगोल बाष्पीभूत किंवा कमीतकमी वितळावा लागेल + ५ सेमी त्रिज्येचा अर्धगोलक केवळ ० डिग्रीपर्यंत वितळावा लागेल.

ऊर्जेचा हिशोब :

गोळ्यात ० डिग्रीपर्यंतची उतरेपर्यंत ऊर्जा : ४०००ग्रॅ*०.११कॅ/ग्रॅ*५००डिग्री = २,२०,००० कॅलरी

५ सेमी त्रिज्येचा अर्धगोल वितळून पाणी बाजूला होते (बाष्पीभूत होत नाही) : २६२सीसी*४डिग्री*०.५कॅलरी/सीसी + २६२सीसी*८०कॅलरी/सीसी = ५२४+२०९४५ = २१, ४६९ कॅलरी

दंडगोलाचे घनमान = ११७८ सीसी
ते ० डिग्रीस (पाणी म्हणून) आणणे = ९६,५९६ कॅ

आतापर्यंत शिल्लक ऊर्जा = २,२०,००० - २१,४६९ -९६५९६ = १,०१,९३५
पैकी १०० डिग्रीपर्यंत येईल तोवर गोळ्यातील ऊर्जा (० डिग्रीवर पाणी वितळलेले पाणी): १००*०.११*४००० = ४४,०००
बाष्पीभवनासाठी उपलब्ध ऊर्जा १,०१,९३५-४४,००० = ५७,९३५
बाष्पीभवन झालेले पाणी = ५७,९३५/(१००+५४०) = ९० सीसी
दंडगोलात बाष्प न होता राहिलेले पाणी = १०८८ सीसी = १०८८ ग्रॅम
पाण्याचे आणि गोळ्याचे तापमान ४४,०००/(४,०००*०.११ + १०८८)= २९ डिग्री (शून्य नव्हे)

म्हणजे अजून गोळा रुतून थिजलेला नाही २९ डिग्रीचा गोळा आणखी -४ डिग्रीचा बर्फ वितळवू शकतो.

गोळा खोक्याला लागला. "मी" पात्राला त्याच दिवशी ओ येईपर्यंत आईसक्रीम खावे लागले. "मी" पात्राने खूप गयावया केली, पण त्याने कॉलेजमधली पोरे बधतायत का? छे. सुरुवातीलाच म्हटले आहे ना? कॉलेजमधली मुली-मुले वात्रट असतात, हे एक सर्वमान्य सत्य आहे.

पण २९ डिग्रीचा गोळा गोळाफेकवाल्या मुली हाताने सहज, हसतखेळत, उचलू शकल्या.

उगीच काथ्याकूट

आपला प्रश्न फार साधा होता, गोळा खोक्याला वाजवी वेळात टेकेल की नाही? मला वाटते,त्यासाठी इतकी सूक्ष्म, सखोल, व्यापक आणि किचकट आकडेमोड करायची गरज नव्हती. गोळ्याचे अंतिम तापमान मुलींना त्याच्याशी खेळण्याइतपत सौम्य असेल का नसेल याची उठाठेव करायचे काय कारण? तापमान सोईस्कर असेल तर मुली गोळा खेळतील, नाहीतर झिम्मा-फुगडी, आपल्याला काय त्याचे?
उत्तर सुलभ रीतीने मिळविण्यासाठी, पूर्ण चुकीच्या मार्गापासून सुरक्षित अंतरावर राहून काही गृहीतके मानली की, आकडेमोड स्थूल असल्याने सोपी होईल.
पहिले गृहीतक-गोळा गोल नसून १० सेंमी लांबी-रुंदी-उंचीचा ठोकळा आहे, आणि तरी त्याचे वजन ४ किलो आहे.
ठोकळा बर्फाला वितळवून खोक्याला टेकताना १०*१०*२० सेंमी मापाचा, उणे चार अंश सेल्सियस तापमानाचा बर्फ कापेल. त्याला ऊर्जा लागेल -१०*१०*२०*(४+८०)=१,६८,००० कॅलरी. ठोकळ्याकडे बर्फाला देण्यासाठी ऊर्जा आहे: ४०००*०.११*(५००-०)=२,२२,००० कॅलरी. बर्फ उष्णतेचा दुर्वाहक आहे , आणि वातावरणातही ऊर्जा विरत नाही असे गृहीतक, त्यामुळे बर्फाचे पाणीमात्र करायला एवढी ऊर्जा पुरून उरेल. अर्थात ठोकळा खोक्याला टेकेल. गोळ्याचे आकारमान ठोकळ्यापेक्षा कमी, पण वजन तेच. म्हणून गोळ्याला जरा कमीच बर्फ कापावा लागेल आणि त्यासाठी आणखीनच कमी ऊर्जा खर्च होईल.
आता इथे यापूर्वी मी विचारलेला प्रश्न परत एकदा विचारणे योग्य दिसेल. या सर्व प्रकरणात न्यूटनच्या तिसर्‍या कायद्याचे काय द्याचे घ्याचे?--वाचक्‍नवी

मूळ उद्देश्य वरती दिले आहे

गणित केवळ काथ्याकूट हे बरोबर.

मूळ उद्देश्य वरती दिले आहे :
मागे एक ठिकाणी मी म्हटले होते की वस्तू टेबलावर ठेवली की जे "नॉर्मल रेऍक्शन"चे बल असते ते विद्युच्चुंबकीय असते. त्याला दुसर्‍या कोणी उत्तर दिले, की हे बल विद्युच्चुंबकीय नसते.

हे कोडे त्या विरोधाबाबत "रेडुक्टियो आड आब्सुर्डुम" (उच्चार सुधारित) पद्धतीचा विचार आहे.
आता असे गृहीतक मानूया की "नॉर्मल रेऍक्शन"चे बल विद्युच्चुंबकीय नसते, आपोआप तिसर्‍या कायद्याने निर्माण होणारे असते. मग कुठलेच गणित करायची गरज पडली नसती.
तुमच्या वरच्या विवेचनात तुम्ही लादीवरच्या पहिल्या गोळ्याबाबतचा तपशील का वापरला नाही ते ठाऊक नाही. पण आधी लादीवर प्रथम ठेवलेल्या गोळ्याबाबत विचार करावा. त्याचे वजन नामक बल खालच्या दिशेने त्याला ओढत असते. नॉर्मल रिऍक्शन नामक बल त्याला वर ढकलत असते (समान राशी विरुद्ध दिशा). टेबलावर दोन बले कार्यरत असतात, इ.इ., सर्व मिळून संतुलित आहेत असे दिसते. (कारण पहिला गोळा बर्फाच्या लादीवर निश्चल होता.) या विचारधारेत गोळ्याच्या तापमानाचा काहीच संदर्भ आला नाही - कारण "नॉर्मल रिऍक्शन" हा रासायनिक/आण्विक तत्त्वांशी संबंधित नाही असे आपले गृहीतक आहे. त्या अर्थी त्या वजनाची, त्या आकाराची कुठलीही वस्तू त्या लादीवर ठेवली तरी ती तशीच निश्चल राहायला पाहिजे. तापमानाचे (जे रासायनिक/आण्विक तत्त्व होय, त्याचे) काही काम नाही. पहिला गोळा निश्चल राहिला, तसा दुसरा गोळा निश्चल राहावा.

असा विचार कोणीच केला नाही, कारण आपल्या अनुभवाशी ते विसंगत आहे. (गोळा पूर्ण खाली गेला नसेल तरी रुतला तरी असेल, हे आपल्याला अनुभवावरून गणित न करता समजले असते.) त्यामुळे आपले गृहीतक चूक असल्याचे लक्षात यावे. निष्कर्ष : हे असत्य आहे की "नॉर्मल रिऍक्शन"चे बल विद्युच्चुंबकीय नसते, आपोआप तिसर्‍या कायद्याने निर्माण होणारे असते.

मूळ कोड्याचा हा उद्देश होता. म्हणून "मी" मोठ्या बढाईखोरपणे पैज वाढवून घेतो की "पैज स्वीकारली! गोळा मुळीच खाली जाणार नाही.". गोळा एक तसूभरही खाली गेला तर "मी" पात्र पैज हरला. मुळात कोडे इतके सोपे होते. कुठल्याही आकडेमोडीची आवश्यकता नव्हती अपेक्षित चर्चा ही की "नॉर्मल रिऍक्शन"चे बल विद्युच्चुंबकीयच असते. ते कसे काय...

बर्फाच्या"टणकपणा" हा त्यांच्यामधील रेणूंमधल्या विद्युच्चुंबकीय आकर्षणामुळे असतो. गोळ्याच्या तापमानाने बर्फाच्या रेणूंना अधिक चल ऊर्जा प्राप्त होते. त्यामुळे विद्युच्चुंबकीय आकर्षणावर मात होते, आणि बर्फाचे (आता पाण्याचे) रेणू एकमेकांपासून दूर सरकू शकतात. गोळा खालीखाली सरकू लागतो. गरम गोळ्याच्या संदर्भात नॉर्मल रिऍक्शनची राशी वजनाच्या राशीपेक्षा कमी असते. तात्पर्य : टेबलामधल्या विद्युच्चुंबकीय बलांमुळे (ती पर्याप्त असलीत तर) नॉर्मल रिऍक्शन दिसून येते. न्यूटनच्या तिसर्‍या कायद्यामुळे निर्माण होणारे ते जादूचे बळ नाही. (त्याचा हा अर्थ नाही की तिसरा कायदा मऊ टेबलावर अकार्यरत होतो. त्याचा हिशोब "नॉर्मल रिऍक्शनने" लागत नाही, त्याचा हिशोब गोळ्याच्या दिशेने पूर्ण पृथ्वीला जे आकर्षक बल जाणवते, त्यात लावावा लागतो.)

पण अनेक उपक्रमींना बर्फाच्या बाष्पीभवनाचा हिशोब करण्याची इच्छा झाली. मग मुद्दामून बर्फाची जाडी वगैरे तपशील दिलेत. मुद्दामून खाली पोचेल/पोचणार नाही त्या सीमेवरील तपशील दिलेत. बर्फाची लादी काही थोडेच सेमी अधिक जाड असती, तर गोळा खालपर्यंत पोचला नसता, हे तुमच्या लक्षात आलेच असेल.

वा ! वा ! शिकवण्याची अचाट पद्धत

धनंजय,
तुमची ही शिकवण्याची पद्धत अचाट आहे हे शतशः मान्य करतो. पण हेही खरे की शेवटाचा प्रतिसाद तुम्ही लिहिला नसता तर आमच्यासारख्यांच्या मनात स्पष्ट व सर्वांगीण बोध झाला नसता.
म्हणून एक विनंती की इतरांच्या बुद्धीची मर्यादित झेप जाणून, आता जसा केलात तसा पडदा संपूर्ण उघडून दाखवून नेहमीच समारोप करावा.
(त्या निमित्ताने "रिडक्सिओ आड् आब्सर्डुम्" चा योग्य उच्चार कळला हा आमचा आणखी एक लाभ, धन्यवाद.)

- दिगम्भा

समजले.

आता समजले. तिसरा कायदा इथे का उपटला त्याचे कारण आत्ता समजले. स्पष्टीकरण सहज पटण्यासारखे. धन्यवाद!--वाचक्‍नवी

 
^ वर