सरबजीतला १ एप्रिल रोजी फाशी देणार
सरबजीतला १ एप्रिल रोजी फाशी देणार
दहशतवादी असल्याच्या कथित आरोपांवरून पाकिस्तानच्या तुरुंगांमध्ये १९९० सालापासून खितपत पडलेल्या श्री. सरबजित सिंग यांना १ एप्रिल रोजी फाशी देण्याचा आदेश तेथील कारागृह अधिकार्यांना मिळाला आहे. (भारतीय नागरिकांना फाशी दिली, तरी काँग्रेसप्रणीत भारत सरकारला त्याचे काहीही सोयरसुतक नसणार व भारत काहीही करणार नाही, हे माहीत असल्यानेच पाकिस्तान अशी कृती करण्यास धजावतो. एखाद्या पाकिस्तान्याला फाशी देण्याची भारताने निवळ घोषणा जरी केली असती, तरी पाकने आंतरराष्ट्रीय स्तरावर किती गहजब केला असता, हे सांगायला नको !) त्यांच्यावर चार बाँबस्फोट घडवून आणल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. श्री. सरबजित सिंग यांनी त्यांच्या जबानीत म्हटले होते, ``१९९० साली दारूच्या नशेत चुकून माझ्याकडून सीमा ओलांडली गेली होती.'' पाकिस्तानी न्यायालयाने मात्र ती जबानी नाकारली होती.
श्री. सरबजित सिंग यांची फाशी रद्द व्हावी, यासाठी मार्च २००६ व मार्च २००८ मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्याकडे माफीनामा पाठवण्यात आला होता; मात्र हे दोन्ही माफीनामे मुशर्रफ यांनी फेटाळले होते. ७ दिवसांपूर्वी पाकने श्री. सिंग यांची फाशी निश्चित केली होती; परंतु त्याची तारीख ठरवली नव्हती.
अफझलची सुटका न केल्यास होळीच्या दिवशी रेल्वेस्थानके उडवू - लष्कर-ए-तोयबाची धमकी
२००१ मध्ये संसदेवर हल्ला केल्याच्या प्रकरणातील आरोपी महंमद अफझल याची मुक्तता करण्यात यावी अन्यथा होळीच्या दिवशी देशातील प्रमुख रेल्वेस्थानकांवर भीषण बाँबस्फोट घडवण्यात येतील, अशी धमकी लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याने पत्रांद्वारे दिली आहे. धमकीच्या आशयाची पत्रे जुन्या दिल्लीसह इतर रेल्वेस्थानकांवर आढळून आली आहेत. पत्रे लिहिणार्याने स्वत:ला लष्कर-ए-तोयबाचा समर्थक म्हटले आहे, असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
ही पत्रे कोठे छापण्यात आली आणि ती रेल्वेस्थानकांपर्यंत कोणामार्फत पोहोचवण्यात आली, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. ही धमकी खरी ठरण्याची शक्यता लक्षात घेऊन दिल्लीतील सर्व स्थानकांवरील इलेक्ट्रॉनिक टेहळणी यंत्रांमध्ये वाढ करण्यात आली आहे, असे उत्तर रेल्वेच्या जनसंपर्क अधिकार्याने सांगितले. (मूठभर दहशतवाद्यांना ठार मारण्याऐवजी सुरक्षायंत्रणेमध्ये वाढ करणारे बौद्धिक दिवाळखोर केंद्र सरकार ! )`होळीच्या दिवशी भीती निर्माण करणे', हा या धमकीमागचा उद्देश असू शकतो. तथापी २००५ मध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत स्फोट घडवून आणण्यात आले होते. हा अनुभव लक्षात घेऊन रेल्वे पोलिसांनी राज्य पोलिसांच्या मदतीने सर्व लहान-मोठ्या रेल्वेस्थानकांवर बारीक नजर ठेवल्याचे त्यांनी पुढे सांगितले.
Comments
कंदाहार आणि जसवंतसिंग
काही आठवते का? या मूठभर दहशतवाद्यांचा पत्ता ठाऊक असल्यास सरकारला कळवावा म्हणजे ते त्यांना तेथे जाऊन उडवतील.
-- आजानुकर्ण
अर्थ
श्री. सरबजित सिंग यांनी त्यांच्या जबानीत म्हटले होते, ``१९९० साली दारूच्या नशेत चुकून माझ्याकडून सीमा ओलांडली गेली होती.''
म्हणजे काय?
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका, विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.
खालिद महमूद
येथे पाकिस्तानचा निषेध केला पाहिजे, हे खरेच. देहदंड एक रानटी प्रथा आहे.
खरे म्हणजे त्यानंतर तुम्ही म्हटलेले :
"एखाद्या पाकिस्तान्याला फाशी देण्याची भारताने निवळ घोषणा जरी केली असती, तरी पाकने आंतरराष्ट्रीय स्तरावर किती गहजब केला असता, हे सांगायला नको !"
निव्वळ अप्रस्तुत आहे. कारण या वाक्याचे या संदर्भात काही काम असते तर कोणी म्हणू शकेल की कदाचित या पुढील बातमीचे उट्टे काढण्याचा हा पाशवी (पाकिस्तानच्या मते जशास तसा) प्रयत्न असू शकेल काय?
असोसिएटेड प्रेसची पूर्ण बातमी इंटर्नॅशनल हेराल्ड ट्रिब्यूनच्या संकेतस्थळावर बघावी. (दुवा)
शिवाय सुटल्यानंतर काश्मिर सिंगच्या "मी गुप्तहेर आहे" वक्तव्यामुळे भारत सरकारचे सरबजित सिंगला वाचवायचे प्रयत्न फोल ठरले असाही एक विचार टाइम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केला आहे. (दुवा)
याबाबत भारत सरकार काही करत आहे असे दिसते. (दुवा)
तरी "काँग्रेसप्रणीत भारत सरकारला त्याचे काहीही सोयरसुतक नसणार व भारत काहीही करणार नाही" व "एखाद्या पाकिस्तान्याला फाशी देण्याची भारताने निवळ घोषणा जरी केली असती" या टिप्पण्या विषयाला बाधक आहेत.
फाशीची घोषणा पाशवी आहे, या पटण्यासारख्या मुद्द्याच्या आड तुमची संदर्भरहित भाषा जाते, तसे होऊ नये.
सहमत
देहदंड देणे अयोग्य आहे. उद्या सरबजितसिंग निर्दोष असल्याचे पुरावे मिळाले तर त्याचा प्राण परत आणण्याची क्षमता कोणाकडे आहे का?
-- आजानुकर्ण
हं
देहदंडच का? ह्याच न्यायाने कुणालाही कसलीही शिक्षा देणे अयोग्य आहे.. कारण समजा एखाद्याला (देहदंडा ऐवजी) तुरुंगवासाची शिक्षा जरी दिली आणि नंतर तिच व्यक्ती निर्दोष असल्याचे पुरावे मिळाले तर त्या व्यक्तीचे तुरुंगात गेलेले दिवस परत करण्याची तरी क्षमता कुणाकडे आहे का?
मृत्यूच्या तुलनेत
मृत्यूच्या तुलनेत तुरुंगात गेलेली काही वर्षे ही निश्चितच भरपाई करता येण्याजोगी गोष्ट आहे. मात्र पुन्हा जीवदान देणे सर्वस्वी अशक्य.
-- आजानुकर्ण
कशी काय?
कशी काय?
विचार
काय भरपाई द्यायची यावर तो कैदी व सरकार यांना सल्लामसलत करता येईल. एखाद्याला भरपाई नकोही असेल. निर्दोष सुटलो हेच चांगले झाले असेही कोणी म्हणेल.
-- आजानुकर्ण
जसा जीव तसाच काळ
त्याने गेलेल्या वर्षांची भरपाई होणार नाहि.. ती कशी करायची ?.. जसा जीव परत येणार नाहि तसाच गेलेला काळ सुद्धा असे मला म्हणायचे होते इतकेच
(वरील गोष्टींनी उर्वरीत काळ सुखात जाऊ शकेलही.. पण तरी आयुष्यातून 'हरवलेला' काळ गेला तो गेलाच.. काहि परिस्थितीत त्याहरवलेल्या काळाचे भयंकर परिणाम असु शकतात)
जीव तसाच काळ
आज दुपारी मी एक तास झोपलो. तो एक तास मला परत कधीच मिलणार नाही याबद्दल मला वैषम्य वाटत आहे. त्याऐवजी मेलो असतो तरी काय - जसा काळ तसा जीव. :-)
हरवलेल्या जीवाने पुढचा पूर्ण संभाव्य जीवनकाळ अवश्यमेव हरवतो. (बाय वन गेट द अदर फ्री.) हरवलेल्या काळाने जीव अवश्यमेव हरवत नाही. हरवलेल्या काळाचे जे काय भयंकर परिणाम असतात ते हरवलेल्या जीवात अंतर्भूत असतात. त्यामुळे हरवलेला जीव हरवलेल्या काळापेक्षा नेहमीच अधिक तोट्याचा.
काळ हा थोडा अधिक एकासारखा-एक मानला जातो - काही व्यावसायिक तासाने/दिवसाच्या हिशोबाने वेतन घेतात. काम ८-ते-५ करा किंवा ९-ते-६, नोकरीच्या बाबतीत एकच मानले जाते. "शनिवार-रविवार सुटी घ्या, किंवा बुधवार-रविवार, वेतन/भरपाई एकच," असे कधीकधी ऐकायला मिळते. "माझा पहिला जीव घेतला काय आणि दुसरा जीव घेतला काय, एकच," असे मात्र फारसे ऐकू येत नाही. त्यामुळे "जसा जीव तसा काळ" हे निरीक्षण सामान्य जीवनात फारसे लागू नाही असे वाटते.
दंड
ह्म्म. सॉक्रेटिस् ने अशाच कारणांनी 'मी देहदंडाच्या ऐवजी 'दंड' भरेन.' अशी सुचवणी केल्याचे दिसते.
असहमत!
असहमत!
देहदंड हे कायद्याच्या राज्यातील कायद्याच्या हातातील सर्वात प्रभावशाली हत्यार आहे. हे हत्यार जे राज्य जितक्यावेळा विनाकारण चालवते तितके ते राज्य अमानुषतेकडे, रानटीपणाकडे झुकले आहे असे मला वाटते. पण म्हणून देहदंडाच्या प्रथेला रानटी ठरवू नये असे वाटते. (ज्या समाजात न्याय म्हणून हा दंड द्यायची वेळ येते त्या समाजाने आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे असे वाटते. असो... हा अनादी काळापासून चालत आलेला वादजन्य मुद्दा आहे याची कल्पना आहे तरी असहमती दर्शवल्याशिवाय राहावले नाही :) )
ऋषिकेश
सकारण/विनाकारण मधील फरक कसा जाणावा?
सकारण/विनाकारण मधील फरक कसा जाणावा? हे हत्यार सकारण चालवणार्या राज्याचे उदाहरण माहीत आहे का?
हे हत्यार खाली ठेवलेल्या राज्यांमध्ये कायदा दुर्बल झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे ते हत्यार प्रभावशाली असो-नसो, अनिवार्य नाही हेच दिसते.
हत्याराच्या प्रभावाचे मोजमाप काय? प्रभाव आरोपीवर/गुन्हेगारावर मोजावा की संभाव्य आरोपी/गुन्हेगारावरती? (खुद्द गुन्हेगारावर देहदंडाचा खूपच मोठा प्रभाव होतो, हे मान्य. पण हालहाल करून जिवंत ठेवण्याचा अधिक प्रभाव होऊ शकेल असा विचार मनात येतो. त्यामुळे "सर्वात प्रभावी" कसे हे कळत नाही.) संभाव्य गुन्हेगारांवर काय परिणाम होतो सांगता येत नाही. (संभाव्य गुन्हेगारांवर परिणाम करायचा असेल तर चौकात दगड मारून, किंवा सुळावर चढवून देहदंड देणे अधिक प्रभावशाली ठरेल असे वाटते.)
कुठलाही दंड देण्याचे कारण काय - राज्य गुन्हेगारावर सूड उगवू बघते, भविष्यकाळातील संभाव्य गुन्हे रोखू बघते, की अन्य काही हशील करू बघते?
हे सर्व प्रश्न विचार करण्याजोगे आहेत. नाहीतर "प्रभावी" शब्दाचा अर्थ संदिग्ध राहील.
(माझ्या मूळ प्रतिसादात "रानटी"/"पाशवी" शब्द तितकेच संदिग्ध आहेत हे मान्य, पण माझा मुख्य मुद्दा लेखाच्या अनुषंगाने वेगळा होता.)
एप्रिल फूल
अरे फाशी वगैरे काही होणार नाही. मुशर्रफ एप्रिल फूल बनवतोय आपल्याला. ;-)
अभिजित...
अरे वा!
अभिजितला एसएमएस केला होता काय परवेझने?
-- आजानुकर्ण
एक महीना पुढे
फाशी एक महिना पुढे ढकलली आहे..
उगाच नव्ह्तो सांगत...परवेझभैंनी एप्रिल फूल केला म्हणून.
महम्मद अफझल व सरबजितसिंग
काय सांगावे, तुम्ही महम्मद अफझल ला सोडा आम्ही सरबजितसिंग ला सोडतो असा प्रस्ताव मुशर्रफ मांडतील. हे अजूनच धोकादायक ठरू शकते.
नितीन
सरबजीतच्या फाशीला स्थगिती
सरबजीतच्या फाशीला स्थगिती
इस्लामाबाद ,
मटा ऑनलाइन वृत्त
पाकिस्तानी जेलमध्ये असलेला भारतीय नागरिक सरबजीत सिंग याची फाशी एक महिन्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे. पंजाबमध्ये राहणा-या सरबजीतला पाकिस्तानी सैनिकांनी हेरगिरीचा आरोप ठेऊन अटक केली होती. तसंच पाकिस्तानात २००० साली झालेल्या बॉम्बस्फोटात हात असल्याचाही त्याच्यावर आरोप होता. या आरोपांखाली त्याला एक एप्रिल रोजी फाशी देण्यात येणार होती.
अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्यावर देशातील सर्व मानवाधिकार संघटनांनी दबाव टाकायला सुरुवात केली. सरबजीतच्या बहिणीने भारतातील पाकिस्तानी दुतावासामार्फत भावाच्या फाशीवर पुनर्विचार करण्याची विनंती केली होती. भारत सरकारनंही ही फाशी रद्द करण्याचं आवाहन पाक सरकारला केलं होतं. या सर्व बाबींचा विचार करून, मुशर्रफ यांनी शिक्षेची अंमलबजावणी एक महिन्यासाठी पुढे ढकलली. पाकिस्तानमध्ये नवे सरकार लवकरच शपथ घेणार असून, त्यांनीच यासंदर्भात निर्णय घेणं योग्य ठरेल, असे ते म्हणाले.
सरबजीतने आपण रात्रीच्या अंधारात दारुच्या नशेत सीमा ओलांडल्याचा दावा केला होता. मात्र त्याचा हा दावा पाकिस्तानने अमान्य केला होता. सखोल चौकशी केल्यानंतर त्याच्यावर १९९० मध्ये लाहोर आणि मुल्तान येथे झालेल्या स्फोटांशी संबंधित असल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. मात्र भारताने हा बनावट आरोप असल्याचे सांगून सरबजीतच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले होते.
काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानने काश्मिर सिंग या भारतीय नागरिकास मायदेशी परत पाठवले होते. त्यामुळे सरकारने सरबजीतच्या सुटकेसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले. मात्र त्याचसुमारास काश्मिर सिंग यांनी आपण हेरगिरीसाठी पाकिस्तानात गेलो होतो असे जाहीर केल्यामुळे पाकिस्तानने सरबजीतच्या सुटकेला नकार दिला आणि तातडीने त्याच्या फाशीचा दिवस निश्चित केला. फाशी टाळण्यासाठी सरबजीतने केलेला दयेचा अर्ज अध्यक्ष मुशर्रफ यांनी फेटाळला.
पाकिस्तानने घेतलेल्या या पवित्र्यामुळे धक्का बसलेल्या सरबजीतच्या कुटुंबाने फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी झाली तर आत्महत्येची धमकी दिली. त्याचवेळी प्रमुख राजकिय पक्षांनीही मनमोहन सिंग सरकारवर सरबजीतला वाचवण्यासाठी प्रयत्न करावा यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली. अखेर सरकारने पाकिस्तानशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला.
"त्यांच्या" चष्म्यातून ..
सरबतजीतच नव्हे तर एकूणच फाशीच्या शिक्षेबाबत द न्यूज ह्या पाकिस्तानी वृत्तपत्रात आज (दि. १९ मार्च) आलेले संपादकीय.
न्यायदानात मानवी चुका होण्याची शक्यता आणि फाशीच्या शिक्षेची अपरिवर्तनीयता लक्षात घेता भारतातही ह्या शिक्षेविरुद्ध लिहिले - बोलले जाते. परंतु सीमेपलीकडूनदेखील असे विचार ऐकू आले याचे अप्रूप!
http://www.thenews.com.pk/daily_detail.asp?id=102018
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
आनंद
आनंद झाला.
-- आजानुकर्ण