महर्षी ते गौरी (स्त्री-स्वातंत्र्याची वाटचाल)

महर्षी ते गौरी पुस्तकात मंगला आठल्येकर महर्षी कर्वे, र. धों आणि गौरी देशपांडे या कर्व्यांच्या तीन पिढ्यांच्या स्त्री विषयक कार्याचा आढावा घेतात. खरेतर कर्व्यांच्या काळापुढचा विचार करण्याच्या वृत्तीचा ठाव घ्यायचा म्हणजे अवघड कार्य आहे. पण मंगला आठल्येकरांनी हे शिवधनुष्य यशस्वीरित्या पेललेले आहे हे पुस्तक वाचताना वारंवार जाणवते. आणि त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तितके थोडेच आहे.

पुस्तकाच्या सुरुवातीला प्रस्तावना आणि पार्श्वभूमी मधून त्यांने १८५० नंतर समाजसुधारणेची चळवळ कशी फोफावत गेली याचा सर्वंकष मागोवा घेतलेला आहे. इंग्रजांच्या आगमनानंतर एतद्देशीय तरुणांच्या मानसिकतेत झालेला बदल अधोरेखित करताना त्या म्हणतात की सगळं जग पुढारलेलं असताना मी मात्र अजूनही पापपुण्याच्या, धर्म-अधर्माच्या चुकीच्या कल्पनांना कवटाळून माझ्याच आई-बहीण, मुलीवर अन्याय करतो आहे ही जाणीव तरुणांनाही बंड करण्यास प्रवृत्त करु लागली आणि त्यातून बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, आगरकर, महात्मा फुले, महर्षी कर्वे अशा बंडखोर विचारवंतांची फळी निर्माण झाली.

महर्षी कर्व्यांच्या आयुष्यावर लहानपणी ऐकलेल्या विधवाविवाहाच्या बातमीचा तसेच जवळच्या नात्यातील स्त्रियांचा दु:खद जीवनाचा परिणाम ठळकपणे दिसून येतो. पुस्तकात महर्षी कर्व्यांचा विधवाविवाहाकडून विधवाशिक्षण आणि स्त्रीशिक्षणाकडे झालेला प्रवास त्यामागच्या हेतूसह सविस्तर मांडलेला आहे. स्त्रीच्या आयुष्यात पुनर्विवाहापेक्षा शिक्षणाचे महत्त्व जास्त आहे हे ओळखून कर्व्यांनी आपल्या पूर्वीच्या तत्त्वांशी तडजोड केली. प्रसंगी पुनर्विवाहाच्या कार्यात मदत करणार्‍यांचा विरोधही पत्करला. कर्व्यांच्या सामाजसुधारणेच्या कार्याशी आपली ओळख होत असतानाच लेखिकेने त्यांचे काही दोष ही सांगितले आहेत. वादग्रस्त मुद्द्यांवर ते न्याय्य बाजू न घेता तटस्थ रहात. 'रधों'वर समाज तुटून पडला असताना आणि त्यांच्या निस्पृह वृत्तीची जाणीव असतानाही कर्व्यांनी रधोंची बाजू घेतली नाही. किंबहुना रधोंची बाजू घेण्याने त्यांच्या शिक्षण संस्थेवर परिणाम होईल याची पूरेपूर माहिती असल्याने ते गप्प बसले. त्याचबरोबर जसे लोकविलक्षण कार्य करणारे सुधारक कुटुंबियाच्या वाट्याला फारसे येत नाहीत तसे महर्षी कधी त्यांच्या बायकोमुलांच्या वाट्याला आले नाहीत.

रघुनाथ म्हणजेच 'रधों'चे बालपण कोकणातल्या घरांत सोळा सोळा मुले असलेली कुटुंबे पाहत दारिद्रयात गेले. त्यामुळे देशहितासाठी म्हणून नव्हे तर कमीत कमी वैयक्तिक हितासाठी तरी संततीनियमन करावे असे त्यांचे मत होते. गणित विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले तरी परदेशात वास्तव्य केल्याने लैंगिक स्वातंत्र्याविषयी झालेल्या वाचनाचा प्रभाव त्यांच्या संततीनियमनाच्या प्रसारात दिसून येतो. फ्रान्समधून परत आल्यावर प्रोफेसर म्हणून नोकरी करत असतानाच संततीनियमनाची साधने विकण्यास सुरुवात केली. ख्रिश्चन धर्मात असलेल्या संततीनियमन विरोधामुळे त्यांना विल्सन कॉलेजची नोकरी सोडावी लागली. आर्थिक ओढाताण होत असतानाही १९२३ साली मराठीतलं 'संततीनियमन' हे या विषयावरचं पहिलं पुस्तक त्यांनी प्रसिद्ध केलं. जुलै १९२७ मध्ये त्यांनी आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी 'समाजस्वास्थ्य' हे मासिक चालवलं. रधोंने स्वत:बद्दल फार लिहिले नसले तरे 'समाजस्वास्थ्य'चे अंक त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा होता. पुढच्या महिन्याचा अंक आधी काढून ठेवण्याच्या शिस्तीमुळे मृत्युनंतरही एक महिन्याचा 'समाजस्वास्थ्य'चा अंक वर्गणीदारांकाडे पोहोचला होता. लोकांना अडाणीपणातून बाहेर काढण्यासाठी आपण संततीनियमनाची शास्त्रीय माहिती देण्यास तयार असता लोकांने खुळचट धार्मिक कल्पनांचा बाऊ करावा याचे रधोंना वैषम्य वाटे. लेखिकेच्या मते रधोंसारख्या विलक्षण बुद्धिप्रामाण्यवादी आणि तर्कशुद्ध विचारवंताच्या संततीनियमन, समागमस्वातंत्र्य, श्लील-अश्लीलता, विवाहसंस्था, व्यक्तिस्वातंत्र्याच्या विचारांची आजच्या ही पिढीला ओळख नसणे हे दुर्दैव आहे. अत्यंत तर्कशुद्ध विचार असल्याने त्यांच्या आयुष्यात विसंगती फार कमी होत्या. समाजाच्या रुढीप्रियतेवर कडाडून प्रहार केल्यामुळे म्हणा वा लैंगिक स्वातंत्र्यासारख्या समाजाच्या दृष्टीने अनिर्मळ विषयावर विचार प्रकट केल्याने रधोंच्या वाट्याला जी उपेक्षा आली तीच आजच्या पिढीला ते माहीत नसण्यातून प्रतीत होत आहे. लेखिकेच्या मते आजच्या काळातही रधोंचे विचार जर धक्कादायक, नवीन आणि पुरोगामी वाटत असतील तर याचा अर्थ आपल्या समाजाचे विचार नीती-अनीतीच्या, धर्म-अधर्माच्या पारंपारिक कल्पनांना सोडून पुढे गेलेले नाहीत.

पुस्तकाच्या सुरुवातीला लेखिका महर्षी आणि रधोंच्या बरोबर या पुस्तकात गौरी देशपांडेंचा समावेश का केला याचा खुलासा करतात. 'साहित्य' या माध्यमाद्वारे स्त्रीच्या जगण्याचा विचार गौरी आपल्या लेखनातून मांडतात. वैचारिक लेख लिहून रधोंनी 'समाजस्वास्थ्या'तून जे सांगितलं तेच गौरींनी आपल्या कथा-कादंबर्यांतून काल्पनिक जग निर्माण करून सांगितलं. व्यक्तिरेखा काल्पनिक असल्या तरी त्यांचे प्रश्न वास्तव आहेत. त्यांच्या कथांतील स्त्रिया विवाहित असतात आणि नवरा, मुलगा यांवर प्रेम करत असतानाही आपल्या मनाच्या हाकेकडे त्या दुर्लक्ष करत नाहीत. रधोंप्रमाणेच गौरी देशपांड्यांनाही नीती-अनीतीची पुरुष आणि स्त्रियांसाठी वेगवेगळी चौकट मंजूर नाही. शेवटी लेखिका म्हणते की गौरी देशपांड्यांचे सारे लेखन स्त्रीच्याच नव्हे तर स्त्रीच्या आणि त्यायोगे पुरुषाच्या जीवनात येऊ शकणार्‍या समस्यांचा विचार आहे. हा तोडगा नसून तोडग्याच्या दिशेने व्यक्तिस्वातंत्र्याचा हात धरुन केलेली वाटचाल आहे.

पुस्तकाच्या शेवटी दिलेली गौरी देशपांड्यांची मुलाखत वाचनीय आहे. महर्षी तसेच रधों बरोबरच त्यांच्या स्वत:च्या कादंबर्‍यांवर विचारलेल्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरे त्यांनी दिली आहेत. त्याचबरोबर परखड प्रश्न विचारण्याचे लेखिकेचे कसब वाखाणण्यासारखे आहे. गौरी देशपांड्यांचे साहित्य ज्यांनी वाचलेले नाही त्यांना पुस्तकातील गौरी देशपांडे प्रकरण थोडे रुक्ष वाटण्याचा संभव आहे. रधों, कर्व्यांच्या एखाद्या विषयावरील मतांबरोबरच लेखिकेने केलेले विवेचनही तितकेच तोडीचे आहे. रधों, महर्षी कर्वे तसेच गौरींची अवतरणे संदर्भासहीत देऊन लेखिकेने कसल्याही शंकेस वाव ठेवलेला नाही. विधवाविवाह, विधवाशिक्षण, आर्थिक स्वातंत्र्य, संततीनियमन, समागम स्वातंत्र्य, विवाहसंस्था, व्यक्तिस्वातंत्र्य अशा स्त्रीशी निगडीत प्रश्नांचा कृतिशील पाठपुरावा करण्यार्‍या कर्वे कुटुंबियाचा परिचय होण्यासाठी हे पुस्तक नक्कीच संग्रही असावे.

महर्षी ते गौरी
(स्त्री-स्वातंत्र्याची वाटचाल)
मंगला आठल्येकर
राजहंस प्रकाशन.

Comments

छान!

एका चांगल्या पुस्तकाची ओळख करून दिलीत. लेख वाचून पुस्तक नक्कीच संग्रही असावे असे वाटते. धन्यवाद!

असेच

एका चांगल्या पुस्तकाची ओळख करून दिलीत. लेख वाचून पुस्तक नक्कीच संग्रही असावे असे वाटते. धन्यवाद!

हेच म्हणते. र. धों. कर्वे यांच्यावरचे एक पुस्तक लहानपणी वाचले होते - नाव आता आठवत नाही - त्यांच्या पत्नी - मला आठवते त्याप्रमाणे मालतीबाई - त्यांना संतती प्रतिबंधक साधनांची माहिती लोकांना करून देण्याच्या कार्यात मदत करीत असत.

मालतीबाई

होय. मालतीबाईंनी या कामी रधोंना खूप् मदत केली. एक दुर्धर रोगामुळे त्यांना अपंगत्व आले तेव्हा समाजातील् कर्मठ लोकाम्नी हे अपंगत्व संततीनियमनाची साधने वापरल्याने आले असं म्हणायला कमी केले नाही.

मालतीबाइंबरोबर रधोंना 'समाजस्वास्थ्य' चालवण्यास रँग्लर परांजप्यांची मुलगी शकुंतलाबाई परांजपे यांची मदत झाली.

अभिजित...

+१

असेच म्हणतो. उत्तम परीक्षण ! असेच आणखी येऊ द्या !

आठलेकरांच्या काही कथा वाचल्या आहेत आणि काही लेखही. "तिची कथा" नावाचा एक स्त्रीलेखिकांच्या कथांचा संग्रह त्यानी संपादित केलेला वाचनात आला आहे. तुमचे परीक्षण वाचून हे पुस्तक लवकरात लवकर मागवतो !

(आठलेकरांच्या इतर लिखाणाबद्दल सविस्तर लिहिता आले तर पहा :-) )

धोंडो केशवांच्या पत्नीची भूमिका आणि त्यांच्या जीवनाची कहाणी "हिमालयाची सावली" या नाटकात कानेटकरानी फारच मार्मिकपणे रेखाटली आहे. डॉ. लागूंची ही भूमिका त्यांच्या सरस भूमिकांपैकी एक. सुदैवाने हे नाटक डीवीडी वर उपलब्ध आहे.

छान

चांगल्या पुस्तकाची ओळख. पुस्तक संग्रही असावे असे वाटत आहे.

महर्षी ते गौरी एक चित्र :

गौरीबाईंचे काही फोटो येथे.
-- आजानुकर्ण

सहमत

प्रतिसादांशी सहमत आहे. एका वाचनीय आणि संग्राह्य पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. गौरी देशपांडेचे लेखन वाचलेले नाही. लेख वाचल्यानंतर त्याबद्दलही उत्सुकता आहे.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका, विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

गौरी देशपांडे

गौरी देशपांडेंचे दुस्तर हा घाट, उत्खनन, तेरुओ वगैरे मीही वाचलेलं नाही. पण त्यांचं 'आहे हे असं आहे' आणि 'विंचुर्णीचे धडे' वाचलेलं आहे.

पाल्हाळ न लावता मोजक्या शब्दात आशय वाचकापर्यंत पोहोचता करणं हे त्यांच मला जाणवलेलं वैशिष्ट्य.

अभिजित

महर्षी कर्वे

महर्षी कर्व्यांचा फोटो मी आमच्या गावाकडे घरच्या जुन्या फोटोत मला एकदा दिसला. वडिलांनी बी टी ला असताना काढला होता असे समजले. एवढ्या मोठ्या माणसाचा फोटो आपल्या कडे आहे याचे मला कौतुक वाटे. इथे पहा.
प्रकाश घाटपांडे

उत्तम

परीक्षण. थोड्या वेगळ्या विषयावरील ह्या पुस्तकाचा परिचय करुन दिल्याबद्दल आभार. महर्षी कर्व्यांच्या पहिल्या पत्नींचे (र. धों.च्या मातोश्री) बाळंतपणात निधन झाले होते. संततिनियमनाच्या विषयाबद्दल त्यांना आस्था, कळकळ निर्माण होण्यात ह्या गोष्टीचाही मोठा हात होता, असे वाचल्याचे आठवते.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

कारावासातील पत्रे - मध्य डळमळीत - एकेक पान गळावया

या तिच्या कादंबरिका एक एक वर्षाच्या अंतराने वाचायला मिळाल्या तेव्हापासूनच गौरी माझी एक आवडती लेखिका होऊन गेली (या तिन्ही एका पुस्तकाच्या रूपातही आता उपलब्ध आहेत).
आतून वाटणार्‍या भावनांची थेट अभिव्यक्ती, भाडभीड न ठेवता सांगितलेले अत्यंत स्पष्ट विचार व मते.
स्त्रीमुक्तीपेक्षाही एक मुक्त स्त्री दिसली.
वर दिलेल्या त्रयीत एका विवाहित संसारी पण रूढिजन्य नीती न मानणार्‍या स्त्रीचे तरुणपण-मध्यम वय-वृद्धत्व यांतून जातानाचे मानसिक (की वैचारिक?) जीवन येते.
पुढेही गौरीचे जे जे लेखन वाचनात आले ते आवडत गेले आहे. तिचे अरेबियन नाइट्स् चे (अन् सेन्सॉर्ड्) भाषांतरसुद्धा सुरुवातीला रोचक वाटले होते, नंतर उरलेले १० खंड वाचण्याची हिम्मत होईना - पण ते काही झाले तरी भाषांतर.
एकूण गौरीचे लिखाण म्हणजे माझ्या बाबतीत तरी न चुकवण्याची गोष्ट, एक ट्रीट होती.

- दिगम्भा

एकेक पान गळावया

'एकेक पान गळावया' वाचणे हा एक हादरवून टाकणारा अनुभव आहे.

कारावासातील पत्रे आणि मध्य डळमळीत या पुस्तकांविषयी प्रथमच ऐकले. यांचे प्रकाशक कोण आहेत हे माहिती आहे का?

निरगाठी/चंद्रिके गं सारिके गं वगळता गौरीबाईंची सर्व पुस्तके वाचली आणि अत्यंत आवडली आहेत. मोकळेपणाने स्पष्ट विचार मांडणारे त्यांचे लेखन फार आवडते.

-- आजानुकर्ण

व्यक्तिस्वातंत्र्य

स्त्रीमुक्तीपेक्षाही एक मुक्त स्त्री दिसली.

अगदी बरोबर.. एकंदरीत सगळेच मुक्त फक्त स्त्री नव्हे. व्यक्तिस्वातंत्र्य आणि समाधानाच्या पारंपारिक कल्पना यात स्त्रीची होणारी वैचारिक ओढाताण त्यांच्या लेखनात दिसून येते.

अभिजित...

इरावती कर्वेंबद्दलही हवे होते.

इरावती कर्वे या माझ्या अल्पवाचनाच्या मते थोर अश्या विदुशी होत्या. त्याबद्दलही या पुस्तकात यायला हवे होते.

बाकी काल परवा दूरदर्शनावर ध्यासपर्व पाहिला आणि रधों चे कार्य मनात विशेष भावले.

लेखिकेची भूमिका

लेखिकेला ह्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीनंतर काही जणांनी यात गौरी देशपांडेंचा समावेश का केला असे विचारले. त्याला उत्तर देताना त्या म्हणतात की जर गौरींच्या लिखाणाचा विषय 'जल आणि मृदसंधारण' किंवा '१०१ पाककला' असा असता तर त्यांचाही समावेश या पुस्तकात झाला नसता. वर लिहिल्याप्रमाणे हे पुस्तक स्त्री-स्वातंत्र्यातील कर्वे मंडळींच्या योगदानाचा आढावा घेते. इरावती कर्वे थोर विदुषी आहेतच पण माझ्यामते त्यांच्या संशोधनाचा विषय (मुख्यतः)स्त्री-केंद्रित नसल्यामुळे त्यांचा समावेश इथे नसावा.

अभिजित...

धन्यवाद

अभिजीत,

फारच उत्तम परीक्षण केले आहेस. वाचून पुस्तक वाचायची सहज इच्छा होते.
मी गौरी देशपांड्यांविषयी ऐकून आहे. वाचन फारसे नाही - म्हणजे गेली काही वर्षे कोणत्याच मराठी पुस्तकांचे नाही; पण अशी परिक्षणे वाचली की रूखरूख लागते.

पुढील लेखनासाठी अनेक शुभेच्छा!

उत्तम परीक्षण

आणि आपल्या इतिहासातला महत्त्वाचा विषय. या गुणी कुटुंबाबाबत मला फारच कमी माहिती आहे.

धोंडो केशवांबाबत शाळेत एक धडा तरी होता. इरावती कर्व्यांचे युगांत लहानपणी वाचनात आले - पौराणिक कथांकडे बघण्याचा एक नव-विचारपूर्ण दृष्टिकोन असू शकतो असा साक्षात्कार झाला. त्यांचे "गंगाजळ" हल्लीच वाचले.

गौरी देशपांड्यांची काही पुस्तके गेल्या दहा वर्षांत वाचण्यात आली. आधी मला ती थिल्लर आधुनिकता वाटली, पण पुन्हा वाचता अत्यंत कुशल व्यक्तिचित्रणे वाटली.

र धों कर्व्यांविषयी मात्र काहीच ज्ञान नव्हते (संततिनियमन + विवाहपूर्व संबंधांस मान्यता, ही इतकी उथळ माहिती होती.) मग काही महिन्यांपूर्वी एअर इंडिया च्या विमानात (!!) अमोल पालेकर यांचा "ध्यासपर्व" हा रधों यांवरचा चित्रपट बघितला. जुजबी, तरी भारावून जाण्यासारखी काही माहिती मिळाली.

तुम्ही परीक्षण केलेले पुस्तक वाचण्याची उत्सूकता वाटत आहे. धन्यवाद.

पुस्तक परीक्षण

पुस्तक हातात पडल्यावर आधाशासारखे वाचून काढले. पण पूर्ण वाचल्यावर यावर काहीतरे लिहिले पाहीजे हे आतून वाटत राहिले. म्हणून पुन्हा एकदा वाचले. एक लेख म्हणून लिहीत गेलो. आणि मध्येमध्ये लेखिकेच्या मतांचा उल्लेख करणे आवश्यक वाटले. आपण काही चांगले वाचले आहे आणि ते दुसर्‍यांनी आवर्जून वाचावे यासाठी केलेला खटाटोप.

पुस्तकात न्या. रानड्यांचे एक मार्मिक उदाहरण दिले आहे. पुरोगामी विचार पटत असले तरी ते अमलात आणणे येरागबाळ्याचे काम नाही. रानड्यांसारखे समाजसुधारणेचे नेतृत्व केलेले लोक स्वतःवर वेळ आली की कुमारिकांशी विवाह करतात. रानडे स्वतः कर्व्यांना म्हणाले होते,"आम्ही लंगडी माणसे. तुम्ही पुढे चला आम्ही येतो लंगडत खुरडत मागून. " बालविवाहप्रतिबंधक कायदा आला तेव्हा टिळकांनीही त्याला शास्त्राचा आधार घेऊन विरोध केला होता. खुद्द महर्षी कर्व्यांनी विधवाविवाहामध्ये देशस्थ, कोकणस्थ, कराडे यांपलिकडे जाऊ नये असे सांगितले होते. ह्या आणि अशा बर्‍याच गोष्टी सदर पुस्तक वाचनातून समोर येतात. हे पुस्तक म्हणजे कर्व्यांचा आंधळेपणाने केलेला उदोउदो नसून एक सर्वांगीण समीक्षाच आहे.

सर्व प्रतिक्रियांबद्दल आणि प्रशंसेबद्दल धन्यवाद. अजानुकर्ण तसेच कर्व्यांबद्दल नवीन दुवे आणि चित्रे पुरवणार्‍यांचे आभार.

अभिजित यादव
मु. पो. कर्‍हाड.

छायाचित्रांविषयी

गौरीची आपण वापरत असलेली सर्व छायाचित्रे आप्ण कोठुन मिळवलीत.?? ती सर्व छायाचित्रे जर माझ्या Google Picasa album मधुन घेतली असतील तर त्याआधी आपण मला एक निरोप पाठवणे गरजेचे होते. मीही ही सर्व छायाचित्रे ’मिळुन सा-यजणीं’ची परवानगी घेऊन upload केलेली आहेत. परवानगी नसताना व न विचारता आपण ही छायाचित्रे घेतली असतील तर तुम्ही काढुन टाकावीत. U may write me on amityadav8@gmail.com. Thank You.!

छायाचित्रांविषयी

तसं नसेल तर प्रश्न मिटला.

 
^ वर