पाडवा सण मोठा आणि नाही आनंदाला तोटा....
प्रिय मित्रांनो,
चैत्र पाडवा हा सण आपल्या सर्वांच्या दृष्टीने एक आनंदाचा आणि मगंलदायक असा सण असतो. या वर्षाचा गूढीपाडवा १ चैत्र शके १९३० अथवा इसवी सन दिनांक ६ एप्रिल २००८ या दिवशी येत आहे.
जगाचे वैश्विककरण ज्या गतीने होत आहे आणि त्यात अनेक बर्यावाईट गोष्टी कळत नकळत घडत आहेत. या सर्वांमध्ये एक म्हणजे जगात अनेक प्रादेशिक भाषांचा बळी जात आहेत अथवा त्या अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहेत.
त्यातच एक असे आपल्या मराठी भाषेच्या बाबतीत घडत आहेत. वर्षाच्या सूरवातीस किती मराठी शाळा बंद पडत आहे हे वर्तमान न चुकता वाचावे लागते. व्यवहारात / घरात अनेक मराठी शब्दांची जागा इंग्रजी भाषेने गिळंकृत केलेली आहे. वर्तमान पत्रात अनेक शिर्षके, मथळे, जाहिराती इतर भाषेत वाचाव्या लागतात, असे अनेक प्रकार आपणासर्वांना माहित आहेत.
अर्थातच ही एक बाजू आहे आणि त्याच बरोबर अनेक मराठी भाषिकांनी अनेक उपक्रम राबवुन / चालू ठेवुन आपला मराठी भाषेचा लढा आपापल्या परीने लढण्याचा प्रयत्न करत आहे ही आपणा सर्वांसाठी आनंदाची आणि गौरवाची बाब आहे. या सर्व बांधवांचा गौरव व्हावा, यांचे ऋण आपण मान्य करावे असे माझ्या आणि माझ्यासारख्या बर्याच लोकांच्या मनात आहे.
या चैत्र पाडव्याला अश्या असंख्य उपक्रमींना आपण सन्मान पत्र, रोख रक्कम आणि स्मृती चिन्ह द्यावे असे आमच्या मनात धाटत आहे.
यासाठी आपणा सर्वांना खालीलप्रमाणे विनंती करण्यात येत आहे.
१. आपणास असे उपक्रमी ठाऊक असतील तर ते त्वरित कळविणे.
२. सध्या प्राप्त स्थितीत बराच कमी काळ शिल्लक आहे, तरीही आपण एखादा सार्वजनिक कार्यक्रम करु शकलो तर आपण त्यात निवेदन, निमंत्रणे, गाठी भेटी इत्यादी करु शकाल काय हे कळविणे. कार्यक्रमाचे स्वरुप कसे असावे हे सांगणे.
३. आपण योग्य अश्या उपक्रमींची निवड करण्यात भाग घेऊ शकाल का हे कळविणे.
४. आपण यात काही योगदान अथवा अर्थसाह्य करण्यास तयार आहे काय हे कळविणे.
५. सर्वात महत्वाचे आपल्या काही सूचना आहेत काय की जेणे योगे हा विचार आपल्या मराठी भाषेसाठी नवसंजीवन देणारा घडेल हे आवर्जून कळविणे.
आपल्या सर्वच सूचनांची आम्ही वाट पाहत आहोत,
कळावे, लोभ आहेच तो वाढवत राहणे,
आपले,
मराठी - संरक्षण, संगोपन आणि संवर्धन.
Comments
एक माहिती असलेला प्रकार
यापैकी कुणीही "उपक्रमी" असतील असे वाटत नाही.
आश्चर्य
खाली असलेली प्रसिद्ध नावे पहाता ही गंभीर चूक कुणाच्याही लक्षात येऊ नये याचे सखेद आश्चर्य वाटले.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.
प्रतिक्रिया
वाक्यरचनेच्या गफलतीचा दोष उलगडवून दाखविणे हा गमतीचा भाग झाला. मूळ उद्देश आणि कार्याबद्दल कसलीच प्रतिक्रिया न देता वाटणारा खेद म्हणजे छिद्रान्वेषण. :-)
हम्म
हे बरय बॉ. तुम्ही केली तर गंमत आणि आम्ही केलं तर छिद्रान्वेषण. :-) (कारण फक्त खेद वाटणे म्हणजेच छिद्रान्वेषण हे पटत नाही. )
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.
मूळ उद्देश
मराठी वाचवण्याची ओरड ही पुर्वीही होती आज ही आहे. तरी पण त्यामागे मराठीबद्दलचे प्रेम आहे हे नाकारता येत नाही. त्यानिमित्त एकत्र येणे हा द्वारकानाथ यांचा हेतू आहे. पण कार्यक्रम संयोजन हे कुशल काम आहे. त्यामुळे उपक्रमाच्याच कट्यावर आपले योगदान द्यावे.
प्रकाश घाटपांडे
सहमत आहे.
मराठीच्या प्रेमापोटी मराठी वाचवण्याचे प्रयत्न होतात हे खरे आहे. त्यानिमित्ताने ज्याला-त्याला आपापल्यापरीने हातभार लावावासा वाटणेही सहज आहे. परंतु, थोडके उपक्रमी आणि त्यातील बरीचशी परदेशस्थ मंडळी पाहता इतक्या कमी काळात हा कार्यक्रम सफल कसा होऊ शकतो याबद्दल शंका वाटली.
पाडव्याचाच दिवस निश्चित न करता निदान, या उपक्रमाच्या दिशेने त्या दिवशी वाटचाल सुरू केली तरी चालेल असे वाटते.