शिवाजीराजांना तलवार कोणी दिली ?

आजही तरूणांचं आदरस्थान म्हणून पहिलं नाव शिवाजी महाराजांचं घेतलं जातं . इतिहासात अभ्यासासाठी असूनही शिवाजीराजे कोणाला नकोसे झाले नाहीत . मोबाइलच्या स्क्रीन सेव्हरपासून ऑरकुटच्या साइटवरही ते आरूढ झाले . पण ... शिवाजीराजांची एवढी क्रेझ असूनही त्यांची माहिती फारच थोड्यांना आहे . शिवाजी महाराजांनी अफझलखानाची बोटं कापली असा शोध कोणी लावतं , कोणासाठी ते ' लीडर ' आहेत , तर कोणासाठी ' ग्रेट राजा '!
.........................

' शिवरायांचा आठवावा प्रताप ,' असं आपण म्हणत असलो तरी आपल्याला तो आठवावा लागत नाही . त्यांनी घडवलेला इतिहास केवळ पुस्तकापुरता नाही , तर तो आजही सगळ्यांना स्फूर्ती देणाराच ठरतो . त्यांनी केलेला प्रताप , त्यांनी घडवलेला इतिहास सगळ्यांनाच माहित आहे , असं आपण गृहित धरतो .

ज्या काळात हिंदूंना कोणी त्राता नव्हता , त्या काळात शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचं साम्राज्य उभं राहिलं . स्वराज्याचं सुराज्य करणाऱ्या या राजाच्या दूरदृष्टीमुळे शत्रूलाही सळो की पळो करुन सोडलं होतं . या कर्तव्यदक्ष राजाचा प्रताप आणि त्याची न्यायप्रियता यावर त्या काळात हिंदूच नाही , तर अन्य धमिर्यांनाही विश्वास होता . मराठी माणसाला अभिमान वाटावा असाच हा कालखंड . आपल्या प्रजेची काळजी वाहणाऱ्या या राजाला आपल्या सर्वांचा मानाचा मुजरा .

खरं सांगायचं तर शिवरायांना आठवायला आपल्याकडे निमित्त लागत नाही . त्यांचा अभिमान बाळगायला केवळ मराठी असण्याची गरज नाही . भाषणात त्यांची उदाहरणं देण्यासाठी अमुक एका पक्षाची उमेदवारी करावी लागत नाही . इतिहासात अभ्यासायला आले किंवा भाषेच्या पुस्तकात त्यांच्यावर एखादा धडा होता , म्हणून मुलांना ते कधीच नकोसे झाले नाहीत . आजच्या आयटी युगातही ते ' सॉल्लिड पॉप्युलर ' आहेत . तरुणांनी ऑरकुटवर त्यांची कम्युनिटी आणि एक साइटही आणलीय . मोबाइलचा स्क्रीन सेव्हरवर म्हणूनही ते सेट झाले आहेत . एकंदरीत छत्रपती शिवराय लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे लाडके आहेत . आवडता राजा म्हणून आजही त्यांचाच पहिला नंबर लागतो . पण जेव्हा वेळ येते त्यांच्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं देण्याची तेव्हा ... तेव्हा मात्र कपाळाला हात लावायची पाळी येते . हे हवेतले तीर नाहीत . कॉलेजमधल्या काही मुलांशी गप्पा मारल्या . म्हटलं , जाणून घेऊयात शिवाजी महाराजांचा आदर करणाऱ्या या ' मराठ्यां ' ना शिवाजी महाराजांबद्दल कितपत माहिती आहे ते ! म्हणून शिवजयंतीच्या निमित्ताने त्यांच्याशी गप्पा मारल्या तेव्हा आलेला अनुभव अतिशय धक्कादायक होता . आपल्या माहितीसाठी एक नमुना पेश है -

प्रश्न : शिवाजी महाराज कोण होते ?

उत्तर : लीडर

प्रश्न : शिवरायांचा राज्याभिषेक कोणी

केला ?

उत्तर : शहाजीराजांनी (' हो ना ?'

आपल्यालाच उलट प्रश्न

विचारण्यात येतो .)

प्रश्न : शिवाजी महाराजांनी कोणाची बोटं

कापली ?

उत्तर : अफझलखानाची (' ए चुकलं तर

चालेल ना ?')

प्रश्न : शिवाजीराजांना तलवार कोणी

दिली ?

उत्तर :( अरे , आम्हाला हा प्रश्न होता !)

औरंगजेबाने

प्रश्न : शिवरायांनी कोणता युद्धप्रकार

आणला ?

उत्तर : गुरिला वॉर ( मराठीत काय

म्हणतात ते आठवत नाही )

इतिहास कच्चा होता किंवा इतिहासातील काही आठवत नाही , असं म्हणत आपल्या अज्ञानाचं समर्थन करायला मात्र कोणी विसरत नाही . शिवाजी महाराजांचे गुरू कोण , शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातल्या व्यक्तींची नावं काय , गड आला पण सिंह गेला असे उद्गार त्यांनी कोणाला उद्देशून काढले , असे प्रश्न म्हणजे मुलांना परत एकदा परीक्षा द्यायला लावण्यासारखंच होतं . या प्रश्नांना बरोबर उत्तरं देणारी फारच कमी मुलं होती . चुकीची उत्तरं ऐकून आपण चक्रावून गेलो नाही , तरच नवल !

या प्रश्नांना मिळणा-या चमत्कारिक उत्तरांनंतर खरं तर अनेकजण निराश होतील . अशा वेळेला आजच्या मुलांना इतिहासाचं महत्त्व ते काय कळणार , जन्मत : च स्वातंत्र्य मिळालेल्या या मुलांना स्वातंत्र्याची किंमत काय कळणार अशा प्रतिक्रिया साहजिकच व्यक्त होतात . यापेक्षा आणखी भयंकर उत्तरं न मिळता काहीतरी बरं ऐकू येईल या आशेवर आपण आणखी प्रश्न विचारत राहतो . महाराजांमधला कोणता गुण तुम्हाला आवडतो किंवा महाराजांना तुमच्या लेखी एवढं महत्व का हा प्रश्न मुलांना विचारताच जवळजवळ सर्वच मुलांनी महाराजांच्या न्यायप्रियतेचा आणि परस्त्रीला सन्मान देण्याच्या गुणांचं कौतुक केलं . त्यांच्यातील याच गुणामुळे आपण महाराजांचे फॅन , ओह सॉरी महाराजांचा आदर करतो असं सांगितलं . शिवाजी महाराज , मराठी भाषा , मायबोलीचा डंका पिटणाऱ्यांच्या राज्यात ' वाघिणीचं दूध ' पिण्याची भलतीच ओढ दिसून येते . त्यामुळे बोलताना भाषेची गल्लत होतच होती . परस्त्रीला ' इज्जत द्यायचे ,' शिवाजी महाराज म्हणजे ' अरे , सॉलिड राजा . मानतो आपण त्यांना ! ग्रेट माणूस यार ,' अशी तरुणांच्या बोलीभाषेची गरुडझेप दिसत होती . पण त्यात शिवरायांचा अपमान करण्याची भावना नव्हती . उलट , ज्यांना उत्तरं देता आली नाहीत , महाराजांबद्दल आपल्याला माहिती नाही म्हणून वाटणारी खंत त्यांच्या चेह-यावर स्पष्ट दिसत असते . कुठलीही परीक्षा नाही , जाहीर सभा नाही , सहज चालणा-या गप्पातही आपल्या तोंडून शिवरायांबद्दल अपशब्द उच्चारला जाऊ नये म्हणून मुलांना काळजी वाटत असते . तरीही संभाषण संपवताना सगळे सांगायला विसरत नाहीत , ए , कूल , वी लव हिम !

साभार : हर्षदा परब

लेखनविषय: दुवे:

Comments

शिवाजीराजांना तलवार कोणी दिली ?


चित्र साभार

प्रश्न : शिवाजीराजांना तलवार कोणी दिली ?

उत्तर : भवानी मातेने

कुठली तलवार?

कुठली भवानी तलवार?

कुठली तलवार?

कुठली भवानी तलवार?

अरे बापरे ! गोंधळ

दुव्यावरील लेख वाचून पार गोंधळ उडाला. म्हणजे भवानी नक्की कोणती हेच निश्चित नाही तर ! त्यामुळे ती कोणाकडे आहे हे पाहणे अजूननच दूरची गोष्ट.

मी जेव्हा लंडन ला जायला निघालो तेव्हा मला एका स्नेह्याने सांगितले की तेथल्या नॅशनल म्युझियम मध्ये महराजांची वाघनखे आहेत आणि बकिंगहॅम पॅलेस मध्ये भवानी. यातील दोहोंच्या स्थानाबद्दल त्याचा थोडा गोंधळ होता. पण मी म्हटले की १० पौंडाचे तिकीट असले तरी मी ते काढेन पण भवानी किंवा वाघनखे जे तेथे असेल ते पाहिने. भवानी पहायची (ती लंडनला आहे असे लहानपणा पासून ऐकून होतो) फार इच्छा होती. तर आमचे हे संभाषण ऐकणार्‍या एका मित्राने 'भवानी तलवार काय आहे?' असा प्रश्न विचारला. मराठी-पुणेकर अश्या इसमाकडून हा प्रश्न ऐ़कून आम्ही पुरते गार झालो. काय करावे !

भवानी पाहण्याचा योग आलाच नाही. राणीचे संग्रहालय म्हणे काहीच दिवस खुले असते. (पुढे भवानी तलवार ही विजय मल्ल्या यांच्या संग्रहात आहे अशीही माहिती कानावर आली. :)

-- लिखाळ.
हरितात्या असते तर असे प्रश्न चुटकी सरशी सुटले असते. :)

एलिझाबेथ (२)

दुर्दैवी एलिझाबेथ (२)
सगळे साम्राज्य लयाला गेलेले बघावे लागले. व निव्वळ एक बेट उरले...
अर्थात राजवाड्यात मौजमजा करत बसलेल्यांचे अजून काय वेगळे होणार?

आपला
गुंडोपंत

मौजमजा?

कुठले राजपुत्र (नावाला का होईना) सैन्यात भरती होऊन लढायला जातात? सध्याच्या एलिझाबेथ सुद्धा म्हणजे महायुद्धात गाड्या दुरुस्ती की असेच काहीतरी करायच्या.

अवांतर - द क्वीन पाहता आल्यास जरूर पाहा.

एलिझाबेथ

सध्याच्या एलिझाबेथ सुद्धा म्हणजे महायुद्धात गाड्या दुरुस्ती की असेच काहीतरी करायच्या.

हे ऐकले नव्हते, पण दूसर्‍या महायुद्धाच्या वेळेस त्यांचा मूळ वंश जर्मन असल्याने, चर्चिलने त्यांच्या मागे पण पाळत ठेवली होती असे ऐकले होते.

माल्या

माल्या यांनी एका लिलावातून भारतात आणली ती तलवार 'टिपू सुल्तानची'. 'भवानी' तलवार आणणार होते अंतुले.

आस्क तो.

यापुढे काहीही ऐतिहासिक शंका आली की 'आस्क जीव्हज्' या धर्तीवर 'आस्क तो' करायला हवे. तोंना धन्यवाद.--वाचक्‍नवी

कच्चा इतिहास

आपल्या देशातील बहुसंख्य लोकांचा इतिहास कच्चाच आहे असं म्हणणं कदाचित धाडसी होईल परंतु धादांत चुकीचे होणार नाही. खरंतर, इतका सखोल इतिहास माहित असण्याची प्रत्येकाला गरज असते असे वाटत नाही. इतिहास हा जुजबी माहित असणे आणि त्यानंतर एखाद्याच्या आवडीनुसार, त्याने स्वतःहून अभ्यासक्रमासाठी त्याची निवड करणे ठीक वाटते. फक्त वाईट याचं वाटतं की अर्धवट ज्ञानाने लोक वाट्टेल ती ठोकंठोक करतात किंवा कुणा साहित्यिकाच्या कथा-कादंबर्‍या वाचून त्यालाच इतिहास समजतात.

इतिहासाची आवड अभ्यासक्रमाची पुस्तके वाचून निर्माण होणे कठीण असते. त्यासाठी मुलांना संग्रहालये, ऐतिहासिक स्थळे यांच्या सहली काढून प्रोत्साहन द्यायला हवे. अभ्यासक्रमातील पुस्तकांखेरीज इतर पुस्तके वाचून त्यावर प्रकल्प करण्यास उत्साहित करायला हवे. आपल्याकडे एकंदरीतच या विषयावर इतकी उदासीनता आहे की पोरांना नावे ठेवणे बरे वाटत नाही. स्थानके, विमानतळे यांना नावे देऊन आणि पुतळे बांधून इतिहास कळतोच असे नाही.

तसेही शिवाजी महाराजांविषयी आदर निर्माण होण्यास फारसा इतिहास माहित असण्याची गरज वाटत नाही.

आता एका प्रश्नाला माझे उत्तरः

प्रश्न : शिवाजी महाराज कोण होते ?

एक उत्तम राजकारणी होते. त्यांच्याकडून शिकण्यासारखे बरेच आहे.

अवांतरः एकंदरीत लेख आवडला परंतु लेखकाने तो कुठून आणला हे ही लिहायला हवे होते. लेखाखाली "हर्षदा परब" असे लेखिकेचे नाव दिसते. असा लेख, जशाच्या तसा छापणे योग्य आहे असे वाटत नाही.

दंतकथा.

भवानी तलवार ही बहुधा दंतकथा असावी.

अफजलखानाच्या विरोधात सर्वच मावळ्यांचे धैर्य गळालेले होते. सला करावा की युद्ध करावे यावर लोकांच्या मनातून कौल लागत नव्हता. अखेरीस शिवाजी महाराजही थोडेफार निराश व्हायला लागले. अशाच एका रात्री त्यांना तंद्री लागली आणि काय दृष्टांत झाला माहित नाही पण महाराज म्हणाले, की आई जगदंबेने कौल दिला आहे आणि तिचे तेज या खड्गात सामावलेले आहे. असे म्हणताच सर्व मावळ्यांचे मनोधैर्य परत आले आणि आता युद्धच करावे असा धोषा त्यांनी लावला. पूढे इतिहास घडला. ( महाराजांचे वय २८ वर्ष होते.)

म्यान व ढाल कुठे आहेत काय ?

महाराजांची म्यान व ढाल या बद्दल काही माहीती उपलब्ध आहे काय ?
कुणी सांगावे, कदचीत् तिन्ही गोष्टी ए़खाद्या गडावर गुप्त ठिकाणी जतन केलेल्या असतील ?

जास्ती ब्लौगींग करणे मनुष्याला कर्महीन, निरर्थक आणि पोकळ बनवते.

 
^ वर