काही नाही ठीक

लेखाचे शीर्षक वाचून काहीच उलगडा नाही ना झाला? महाविद्यालयात असताना कोणती गाडी घेणार अस म्हटलं की आमचं एक उत्तर असायचं - काही नाही ठीक. अरे हे काही नाही ठीक म्हणजे काय? मग आम्ही सांगायचो, काही नाही ठीक म्हणजे कायनेटिक. :)

भारतीय वाहन बाजारावर एके काळी अधिराज्य गाजवणारा हा उद्योग समूह आणि त्यांची एक गाडी जी फक्त कंपनीच्या नावानेच आजवर ओळखली गेली/जाते, त्या गाडीची थोडी माहिती वाचण्या पूर्वी, या कंपनी बद्दल थोडे फार ...

Luna TFR Luna Super भारतीय वाहन उद्योगात फिरोदिया कुटुंबीयांचे एक वेगळे स्थान आहे. आजची फोर्स मोटर्स (अभय फिरोदिया) आणि कायनेटिक मोटर कंपनी (अरुण फिरोदिया) या दोन फिरोदिया कुटुंबीयांच्या मालकीच्या कंपन्या आहेत. दुचाकी वाहनांच्या निर्मिती आणि विक्रीच्या उद्देशाने एच. के. फिरोदियांनी कायनेटिक वाहन उद्योगाची स्थापना केली. सर्व प्रथम १९७२ ला कायनेटिक लुनाचे उत्पादन सुरू झाले आणि मोपेड या वाहन क्षेत्रात कायनेटिकने आपले पाय घट्ट रोवले.

Kinetic Honda DX and ZX मग लुनाचे अनेक प्रकार झाले. लुना टिएफआर (एकाच व्यक्तीकरिता), लुना डबल प्लस, मॅग्नम, सुपर असेच आणि काही प्रकार झाले. खरंतर लुना हा वाहन प्रकार सायकलला पर्याय असा पुढे आला म्हणायला काही हरकत नसावी. एरवी आपोआप चालणारी अन गरज लागल्यास खरोखरच्या सायकल सारखी सुद्धा चालवण्याची सोय या वाहनात होती/आहे. या वाहनाला एकच स्पर्धक होता तो म्हणजे टिव्हीएस ५०. लुना नंतर कायनेटिक सफारी आली. पण कायनेटिक हे नाव जास्त लोकप्रिय झाले म्हणा अथवा त्यांचे जे वाहन फक्त कंपनीच्या नावानेच ओळखले गेले ती म्हणजे कायनेटिक स्कूटर होय. सायकल सदृश गाड्यांना, अवजड अन तोल सांभाळायला अवघड अश्या बजाज, एलएमएलच्या स्कूटर्सना सशक्त पर्याय म्हणजे कायनेटिकची स्कूटर. या गाडीचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या गाडीने शहरातल्या  स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवला.

भारतीत वाहन उद्योगात ८० चे दशक म्हणजे बजाजच्या स्कूटरचा सुकाळ होता. काही पैसे भरून, 4S वाट पाहून बजाजांची स्कूटर मिळवणे म्हणजे लोकांना प्रचंड कौतुक होते. या काळातच स्त्रिया सुद्धा आत्मविश्वासाने कार्यालयीन नोकरी करू लागल्या होत्या. पण त्यांचा रोजचा प्रवास म्हणजे स्वतःच्या "ह्यांच्या" स्कूटर वरून, बसने अथवा रिक्षाने. एखादी जास्त स्वावलंबी स्त्री असेल तर लुना. पण स्कूटर म्हणजे परिवाराची गाडी होती. बदका सारखा आकार, सामान ठेवायला थोडी जागा, मोपेड पेक्षा जास्त शक्ती, सोबत गियर्स आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पती, पत्नी, एक पुढे उभे राहणारे मूल आणि एक आईच्या मांडीवर बसणारे लहान मूल अशा चौकोनी कुटुंबाला वाहून नेण्याची क्षमता ही या स्कूटर्सची ठळक वैशिष्ट्ये होती.

याच काळात भारतीय वाहन उद्योगात जपानी कंपन्यांनी प्रवेश केला. १९८४ साली कायनेटिकने जगप्रसिद्ध होंडा कंपनी बरोबर सामंजस्य स्वीकारले आणि स्कूटरचे उत्पादन सुरू केले. वर लिहिल्या प्रमाणे बजाज- एलएमएलच्या स्कूटरची ठळक वैशिष्ट्ये होतीच. पण त्याच सोबत काही वेळा स्कूटर्सची अशी काही वैशिष्ट्ये होती की जी डोके दुखी ठरायची. त्यातली काही Nova 135 म्हणजे, डाव्या हाताला सगळे गिअर्स आणि क्लच, पाय ठेवायच्या सपाट जागेत मध्येच डोके वर काढणारा मागच्या चाकाचा ब्रेक, एका बाजूला असलेले इंजिन आणि फक्त मधले स्टँड. तसेच बंद पडल्यास चालकाच्या बसण्याच्या जागे जवळ असलेला पेट्रोलचा नियंत्रक आणि चोक यांच्या मदतीने स्कूटर सुरू न झाल्यास, रस्त्यातच स्कूटर तिरकी करणे आणि मग पाय दुखे पर्यंत किक मारणे हा एक मोठा त्रासदायक मुद्दा असायचा.  या सर्व त्रासदायक बाबी लक्षात घेऊन आणि खास करून नोकरदार स्त्रिया हा ग्राहकवर्ग डोळ्यासमोर ठेवून कायनेटिक होंडाने आपली स्कूटर बाजारात आणली.

कमी पसारा असलेली, दिसायला सुंदर, काही तरी नवे वाहन असा ठसा उमटवणारी, मुख्य म्हणजे, इंजिन मध्यभागी असल्याने तोल सांभाळायला सोपी, गिअर विरहित, त्यामुळे चालवायला सहज सोपी, बसायला एकसंध आणि मोठी सीट, पेट्रोल नियंत्रकाची - चोकची कटकट नसलेली, वाहनक्षमता स्कूटर इतकीच असलेली, एका बाजूला कलून Flyte लावण्याची व्यवस्था असलेली, स्कूटर इतकीच शक्तिशाली अन सुसाट धावणारी आणि मुख्य म्हणजे किक अथवा फक्त एक खटका दाबून सुरू होणारी अशी हि स्कूटर अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाली. या स्कूटरने, या वाहन प्रकारात, फक्त एक खटका दाबून सुरू होणे, गिअर बॉक्स ऐवजी व्हेरीएटर (गिअर्स टाळण्या करिता), दोन्ही ब्रेक हातात, हि नवीन वैशिष्ट्ये बाजारात आणली. कायनेटिक होंडा डिएक्स आणि झेडएक्स असे दोन प्रकार उपलब्ध होते. ९८ घनसेमी क्षमतेच्या आणि टू स्ट्रोक इंजिन असलेल्या या स्कूटरमध्ये पहिला बदल झाला तो २००१ साली. इंजिनाची क्षमता ११० घनसेमी झाली. पण बाकी सगळे तेच होते. मधल्या काळात १९९८ साली होंडा कंपनीने साथ सोडली. अन स्वतःची भारतात वेगळी चूल मांडायचे मनसुबे सत्यात आणायला सुरुवात केली. मग २००५ साली कायनेटिकने बाह्य स्वरूप तेच ठेवून ११३ घनसेमी क्षमतेचे फोर स्ट्रोक इंजिन वाली हिच स्कूटर ग्राहकांसमोर आणली.  पण तोवर उशीर झाला होता. अनेक स्पर्धकांनी आपापल्या अशाच गाड्या, स्कूटरेट बाजारात आणल्या होत्या. खुद्द होंडाने ऍक्टिव्हा आणली जी ग्राहकांना आवडली.

कायनेटिकने स्पर्धा म्हणावी तेवढी योग्य प्रकार हाताळली नाही. मग ती स्कूटरेट प्रकारातली प्राइड असो,  कायनी, नोवा अथवा त्यांच्या मोटर सायकल असोत, अथवा स्टेप थ्रु,  अथवा आयात केलेल्या इतर कंपन्यांच्या गाड्या. ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यात कायनेटिक म्हणावी तेवढी यशस्वी ठरली नाही. आज सुद्धा कायनेटिक नव्या गाड्या सादर करत आहे.

बिपाशा बसूला घेऊन केलेल्या जाहिरातीमुळे फ्लाईट नावाची स्कूटरेट थोडी फार विकली जात आहे. पण तीन गिनेज रेकॉर्ड करणार्‍या कायनेटिक होंडाच्या स्कूटरच्या यशाची उंची गाठणे अवघडच दिसते आहे.

अरुण फिरोदियांच्या कन्या, सुलज्जा फिरोदिया-मोटवानी या कंपनीची कमान सांभाळत आहेत. पण पूर्वीचे यश अन आजची स्पर्धा पाहिल्यावर जर त्यांना कोणी विचारलं, कस काय चाललंय सगळं तर त्या नक्कीच म्हणती, फार खास असं, काही नाही ठीक.....




Comments

सुंदर लेख

गाड्यांबद्दल असे लेख वाचनात फार येत नाहीत आजकाल.

अभिजित...

धन्यवाद

धन्यवाद अभिजीत.





+१

तुमचा या विषयातला हातखंडा आहे. धन्यवाद.

उत्तम असा लेख.

लेख उत्तम असा जमला आहे.

लेखाचे शिर्षक वेगळे असायला हवे होते.

भारताच्या इतिहासात कायनेटिक होंडा आणि मारुती यांनी आपला दृष्टीकोन बदलला असे समजले जाते.

आणि बजाज?

हमारा बजाज..

अभिजित...

बुलंद

नक्की काय म्हणायचे आहे? बजाजचा वाटा उत्पादना पेक्षा वाहन खरेदिसाठी अर्थपुरवठा हा जास्त आहे.





म्हणजे काय?

प्रतिसादा बद्दल धन्यवाद.
लेखाचे शिर्षक वेगळे असायला हवे होते. म्हणजे नक्की काय हवे होते? मला वाटतं तुमची काही अपेक्षा असेलच शीर्षका बद्दल. ती इथे मांडल्यास आपले म्हणणे समजणे सोपे पडेल.

भारताच्या इतिहासात कायनेटिक होंडा आणि मारुती यांनी आपला दृष्टीकोन बदलला असे समजले जाते.
मला वाटतं की भारताचा इतिहास ही फार मोठी गोष्ट आहे. आपल्याला असे म्हणायचे आहे का? की, भारतीय ग्राहकांचा वाहन संबंधीत विचारांचा दृष्टीकोन बदलण्याचे ऐतिहासिक श्रेय कायनेटिक-होंडा आणि मारुती-सुझूकी या दोन कंपन्यांकडे जाते?

मला व्यक्तिशः अस वाटते की, आता वाहनांचा बाजार हा ग्राहकाभिमुख झाला आहे. पुर्वी तो तसा नव्हता. बाजारात पर्यायच उपलब्ध नव्हते.





स्पष्टीकरण.

सध्या उपक्रमवर शिर्षक वाचून काही वाचायला जावे तर उद्वेग निर्माण व्हावा असे लिखाण असते. त्या पार्श्वभूमीवर मी दचकत दचकतच आपला लेख वाचला आणि खरेच सांगतो मला हा लेख आवडला. ( अभ्यासपूर्ण आणि रोचक). म्हणून वाटले की शिर्षक वेगळे असायला हवे होते.

आपला दृष्टीकोनासंबंधीचे विवेचन आवडले. मुख्य म्हणजे गुणवत्ता, आरामदायी, सुखदायी या कल्पना या दोन्ही वाहनानी भारतीयांच्या मनात रुजवल्या असे म्हणायला प्रत्यवाय नसावा.

बाजार ग्राहकाभिमुख झाला आहे हेही खरे.

लेख

खरच छान झाला आहे. एकेकाळी टीएफआर ला पॅडलींग करुन करुन जिव जायचा, ते आठवले.

वा

लेख छान ! कायनेटिकने गिनिजचा मान मिळवला होता हे माहित नव्हते.

आम्ही सुद्धा काय-नाय-ठिक = कायनेटिक असेच म्हणत असू :)

कोलॅबोरेशन ला सामंजस्य हा शब्द आवडला.
कमान सांभाळणे हा हिंदी वाकप्रयोग असे वाटले. आपण शक्यतो धुरा वाहणे असे काही म्हणतो. पण हा मुद्दा गौण.

लेख चांगलाच.
--लिखाळ.

माहितीपूर्ण लेख

कायनेटीकचा सचित्र लेख माहितीपूर्ण आहे आणि तो आवडला.

सहमत

लेख आवडला. यापूर्वीचेही वहानांवरचे लेख आवडले होते (पण तसे जाहीर लिहिण्यास वेळ झाला नाही :(). असे वेगळ्या विषयांवरचे लेख येऊ द्यात.

प्रतिसाद

बिरूटे गुरूजी आणि प्रियाली यांचे प्रतिसाद आवडले. एकदम मोजक्या शब्दात त्यांना सांगायची सर्व माहिती दिली आहे. :)

असे वेगळ्या विषयांवरचे लेख येऊ द्यात.

प्रयत्न करू :)





उत्तम लेख

वाहनांची सचित्र माहिती देण्याबरोबर त्यांच्या घडणीचा इतिहास, त्या त्या काळाचा संदर्भ दिल्याने या सर्व लेखाना निराळी उंची मिळते.

चाणाक्य यांच्या लिखाणाची नेहमी प्रतीक्षा करतो. आणि ते कधीच निराश करत नाहीत.

मस्त

धन्यवाद चाणक्यराव!

काही नाही ठीक म्हणत तुम्ही ठीक गोष्टी दाखवून दिल्यात! माहीतीपूर्ण आणि सोपा लेख.

असेच वेगळ्या विषयावर लेख येउंदेत!

विकास

सुरेख लेख

स्कूटर तिरकी हा उल्लेख एकदम झटका देऊन गेला (माझ्याकडे स्कूटर कधीच नव्हती पण कधी कोणा मित्राची घेतली की किक् उलटी नडगीवर आपटलीच म्हणून समजा)

भाषा हलकी फुलकी असली तरी अनेक बारकावे टिपलेले जाणवतात. लेखाची सांगता -- फिरोदियांची "काही नाही ठीक" ही प्रतिक्रिया -- बोलकी आहे.

मस्त लेख आहे.

वा मस्त आणि वेगळ्या विषयावरचा लेख.
या गदारोळातही आपले लिखाणातले वेगळेपण वाचवल्याबद्दल अभिनंदन!

बाकी त्यांचा रोजचा प्रवास म्हणजे स्वतःच्या "ह्यांच्या" स्कूटर वरून, बसने अथवा रिक्षाने.
ही बाकी खरे. आमच्या ही ला मी खुपवेळा म्हंटलं की तु माझी बुलेट चालवत जा जरा.
पण हीने काही कधी ऐकले नाही. तीला चालू करायला जमायची पण पुढे दर गियर नंतर न्युट्रल होणे फार अवघड वाटायचे चालवायला.
शिवाय तीला वाटायचे की ती बुलेट खुप जड आहे. तर मी म्हणायचो की तु पण व्यायामशाळेत येत जा. दोन चार दिवसात बुलेटपण फुलासारखी हलकी फुलकी वाटायला लागेल. पण ही काय आमचे ऐकणार? :))))

जाऊ द्या तेंव्हा मीच स्कूटर किंवा ही कायनेटीक घ्यायला हवी होती. हल्ली तर माझेही चालवणे होत नाही. पडलीये नुसतीच. :(

रस्त्यातच स्कूटर तिरकी करणे आणि मग पाय दुखे पर्यंत किक मारणे हा एक मोठा त्रासदायक मुद्दा असायचा.
अरे बहुतेक वेळा स्कूटर ओव्हरफ्लो झालेली असायची... पन्नास एक किका मारल्या की मगच चालू व्हायची. माझा एक मित्र यात एकदम एक्सपर्ट होता. तो आणि त्याची बजाज वन फिफ्टी एकदम सही जोडी होती ती.

खुद्द होंडाने ऍक्टिव्हा आणली जी ग्राहकांना आवडली.
ही गाडी खरच चांगली आहे असे वाटते.

पण एक काळ या कायनेटीकने राज्यच केले यात शंका नाही.
उत्तम लेख काहीतरी वेगळे वाचायला मिळाले.
तु जरा आपलं लिखाण जरा वाढव बरं!
(असंच त्या धनंजयालाही सांगायला पाहिजे म्हणजे इतह्ले विषय बदलतील... )

आपला
गुंडोपंत

छान

लेख आवडला. सोप्या भाषेतला, वाचनीय आणि माहितीपूर्ण.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
(http://marathisahitya.blogspot.com)
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

चारचाकी.. तीनचाकी.. दुचाकी.. आता?

वा वा मस्त लेख.. अतिशय नेटका, चित्रमय, अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण :)

बाकी चारचाकी.. तीनचाकी.. दुचाकी.. आता? विमान, याने, उपग्रह वगैरेंचा बिनचाकी प्रवास आवडेल वाचायला..

-ऋषिकेश

बिनचाकी

विमान, याने, उपग्रह वगैरेंचा बिनचाकी प्रवास आवडेल वाचायला..

विमान बिनचाकी?.. आकाराच्या मानाने बरीच लहान असली तरी विमानाला चाके असतात हो! :)

पोटात

उडताना (गतीशील असताना) चाके पोटात घेते म्हणून बिनचाकी म्हटलं इतकंच.. :)

लक्ष्मी लुना

पुर्वी लक्ष्मी लुना होती ती कुणाची होती?

लक्ष्मी नंतर पुढे (मधे बराच काळ जावून मग )हिरो ने हिरो मॅजेस्टीक आणली होती.

शिवाय लुनाचे हे चमत्कारीक डिझाईन कुठून आयात झाले होते?
जगात अजून कुठेकुठे या गाड्या वापरल्या जात असत?

आपला
गुंडोपंत

लक्ष्मी

लक्ष्मी, विकी (गाडी). हे लेखनाचे आणि त्या पुर्वी अभ्यासाचे विषय आहेत. कायनेटिकने लुना, सफारी निर्यात केल्या आहेत. शोधायला हवे कुठे ते.





चेन्नई

चेन्नई मध्ये टी व्ही एस च्या मोपेड इत्क्या प्रमाणात वापरल्या जातात की, हिरो-होंडा पेक्षा त्यांची संख्या जास्त भरावी.

भौगोलिक प्रमाण

भारताच्या भौगोलिक विस्ताराचा आणि त्या त्या भागतल्या त्या त्या कंपनीच्या विक्री पश्चात सेवा केंद्रांची उपलब्धता पाहता, हे असणे सहाजीकच आहे. टि व्ही एस च्या स्कुटीने मात्र भारतभर वाहवा मिळवली आहे.





लक्ष्मी मोपेडबद्दल

५० सी.सी. टू-स्ट्रोक इंजिन आणि तीन गियर असलेली उंटासारखी दिसणारी ही मोपेड गवळ्यांची लाडकी होती.
ती बनवली होती - कोल्हापुरच्या घाटगे पाटील उद्योग समुहाने. दिसायला बेढब असली तरी चांगलीच मजबूत होती.(चारचार (पितळी)घागरीभरून(घागरींसकट) दूध आणि एक मिशावाला पैलवान गवळी यांना ताशी ४० किमी वेगाने नेणारी ही एकमेव मोपेड असावी. तीही ५० सीसी.

याच काळात जपानी यामहा कंपनीचे 'पर्ल' नावाचे एक मॉडेल (त्याला मिस्त्रीच्या भाषेत 'पर्ल्यामा' म्हटले जाई) कधीकधी दिसे.
ही गाडी जशीच्या तशी कॉपी करून (मक्खी-टू-मक्खी) बजाजने एम्५० आणि एम्८० काढली हे बहुतेकांना माहित नसेल.

:)

खरे आहे. लक्ष्मी काही वर्षांपुर्वी रस्त्यावर धावताना पाहिली आहे. लक्ष्मी प्रमाणेच विकी हि सुद्धा अशीच गिअरवाली गाडी होती. मिळाल्यास एखादा फोटो देईन येथे.
काही गाड्या काही कंपन्यांनी बनवल्या आणि तेवढ्याच बनवुन त्यांनी उत्पादन बंद केले. वाहन क्षेत्रात त्यांनी पुढे वाटचाल केली नाही. ट्रॅक्टर क्षेत्रात किर्लोस्करांनी सुद्धा ट्रॅक्टर बनवला/विकला. पण आता त्याचे नामोनिशाण नाही. आता किर्लोस्करांचा टोयोटा बरोबर सामंजस्य करार आहे.





आणि हा पर्ल्यामाचा फोटो -

यामहा पर्ल -

आणि हा पण

सध्या ही पहा पर्ल यामाहा.

पर्ल यामाहा
पर्ल यामाहा




नाही हो, ही सुवेगा

असे काय करताय? ही तर सुवेगा... हिचे इंजिन ऍक्सरलरेटर वाढवल्या-कमी केल्यावर झोके घेत असे.

अगदी बरुबर

सुवेगाच् ती आता या गाड्या अदृष्य झाल्या. आता बॅट्रीच्या दुचाकी यो बाईक, ई बाईक अशा गाड्या दिसु लागल्या आहेत. त्याच्या किमती मात्र अजुन आकर्षक नाही. यो बाईक् साधारण ३०,०००/- ला आहे.
प्रकाश घाटपांडे

अगदी बरुबर

सुवेगाच् ती आता या गाड्या अदृष्य झाल्या. आता बॅट्रीच्या दुचाकी यो बाईक, ई बाईक अशा गाड्या दिसु लागल्या आहेत. त्याच्या किमती मात्र अजुन आकर्षक नाही. यो बाईक् साधारण ३०,०००/- ला आहे.
प्रकाश घाटपांडे

चार्ज

चार्ज करायला वीज सुद्धा हवी ना? :) मला स्वतःला या गाड्या फारश्या नाहीत आवडल्या. गरजेच्या वेळी वेग घेणार नाहीत असे वाटते. अनुभव घेतला नाही अजुन. :) हायब्रीड गाड्या चांगल्या असे वाटते.





ताकद

मलापण वाटते की डबलसीट असताना पुलावरून जाणे अवघड होइल.(घाट चढणे ही कल्पनाच करायला नको)

ह्म्म्म्म

बर बर सुवेगा... :)





सुवेगा

ही वरची सुवेगा गाडी री-बिल्ट, रि-पेंट केलेली वाटते आहे.
शिवाय मागच्या बॅकग्राऊंडच्या गाड्यापण!
कोणता इव्हेंट होता हा?

आपला
गुंडोपंत

विकी

पुण्यात लक्ष्मी रस्त्यालगतच्या गल्लीत विकी पाहीली. हि पहा





विकी

आम्ही त्याला व्हीकी म्हणायचो. पन याच ह्यांडल वळावल तरी हेडलाईट सरळ हे काहीतरी विचित्र वाटत. म्हणजे धड वळवुन सरळ चालणार्‍या वाकड्या मानेच्या माणसाला पाहयलावर जस वाटेल तसे. पर्ल यामात तस नाही . वडिल लहानपणी सांगायचे कि दुसर्‍या महायुद्धात म्हणे घडीच्या फटपट्या होत्या. त्या पाठीवर टाकून थोडस जाता येईल अस ते वाहन असायचे.
प्रकाश घाटपांडे

हँडल वळवलं तरी हेडलाईट सरळ

हँडल वळवलं तर गाडीच वळेल आणि हेडलाईटही वळेलच की. असेच मॉडेल होंडाचेही एक आहे ज्यात हँडल आणि हेडलाईट यांचा थेट संबंध नाही.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

होंडा डिओ

ती दुचाकी होंडा डिओ आहे. ही पहा





होय हीच ती

नाव आठवत नव्हतं.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
 
^ वर