तथाकथित विज्ञानवादी आणि देव/अध्यात्मवादी.

उपक्रम, मनोगत या संकेतस्थळांवर भटकताना मला काही प्नश्न पडले. विशेषतः तिथल्या तथाकथित विज्ञानवादी आणि देव/अध्यात्मवादींमुळे.
माझे प्रश्न नंतर पण त्या आधी हे खालील २ प्रसंग..

प्रसंग १:

माणूस १ (मा. १) : अरे, समाधीमधे काय सुख आहे. समाधीमुळे असीम शांतता मिळते.
माणूस २ (मा. २) : हो? खरच? तू कधी घेतलास त्याचा प्रत्यय ?
मा. १: नाही रे, माझ तेव्हढा अध्यात्माचा अभ्यास नाही. पण आमचे एक् गुरू घरी आले होते. ते सांगत होते. त्यांनी त्यांच्या ग्रंथात पण त्याचे उल्लेख केले आहेत्.
मा. २: कोण हे मी तर त्यांना ओळखतच नाही. ते जाऊ दे, तुझा तर अभ्यास नाही, पण तुला ज्यांनी सांगितलं त्यांचा तर खूप् दांडगा अभ्यास असेल ना?
मा. १: मला स्वःताला काही अनुभव नाही. त्यांना पण अजून घेता आली नाही , ते त्या मार्गावर आहेत. पण ते सांगतात ते नक्कीच खरं आहे. त्यांच्या ओळखीच्या इतर अनेक संताना तसा अनुभव आला आहे.
मा. २: हां, म्हणजे तेच. तुझा स्वःताचा तर काही अभ्यास नाही. तू ज्यांच्यबद्दल सांगतोस त्यांचा पुरेसा अभ्यास नाही. इतर लोकं सांगतात म्हणून तू विश्वास ठेवतोस. यालाच "बाबा वाक्यम् प्रमाणम्" म्हणतात. तुला अंधश्रद्ध् का म्हणू नये?

प्रसंग २:
माणूस ३(मा. ३): अरे, तुला माहिती आहे का? आता विश्वाच्या एका टोकापासून् दुसर्‍या टोकाकडे वर्महोलने गेलो ना तर फारच कमी वेळ लागतो.
मा. २: हो? खरच? तू कधी घेतलास त्याचा प्रत्यय ?
मा. ३: मी नाही घेतला आणि माझा काही त्या विषयाचा फारसा अभ्यास नाही. पण् काल आमच्या कॉलेजमधे ते नामवंत शास्त्रज्ञ आले होते ना ते सांगत होते. त्यांनी नुकतच एक विज्ञानाला वाहिलेलं पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्याचा उल्लेख केला आहे.
मा. २: कोण हे मी तर त्यांना ओळखतच नाही. ते जाऊ दे, तुझा तर अभ्यास नाही, पण तुला ज्यांनी सांगितलं त्यांचा तर खूप् दांडगा अभ्यास असेल ना?
मा. ३: त्यांचा किती अभ्यास आहे माहित नाही कारण त्यांच्या संशोधनाचा मूळ् विषय वेगळा आहे. पण ते सांगत होते त्यांच्या इन्स्टिट्यूट मधे इतर शास्त्रज्ञ ती शक्यता वर्तवत आहेत.
मा. २:हां, म्हणजे तेच. तुझा स्वःताचा तर काही अभ्यास नाही. तू ज्यांच्यबद्दल सांगतोस त्यांचा पुरेसा अभ्यास नाही. इतर लोकं सांगतात म्हणून तू विश्वास ठेवतोस. यालाच "बाबा वाक्यम् प्रमाणम्" म्हणतात. तुला अंधश्रद्ध् का म्हणू नये?

मंडळी आता माझे प्रश्नः
१. या दोन्ही प्रसंगात तुम्हाला काही साम्य आढळलं का?
२. माझ्या प्रमाणेच माणूस १ आणि माणूस २ अश्या व्यक्ति तुम्हालाही आढळल्या का?
३. तुम्ही नोटीस केलतं का? बहुतेक संकेतस्थळांवर मा. १ आणि मा. ३ एकमेकांशी भांडताना आढळतात.मा.३, मा.२ ला "अंधश्रद्ध्" म्हणतो आणि मा. २, मा.३ ला निरीश्वरवादी म्हणून हिणवतो. आणि माझा स्वःताचा अनुभव असा आहे की मा. ३ ही जरा जास्त ऍग्रेसीव्ह् जमात आहे. तुमचं काय निरीक्षण आहे?

Comments

किती पैसे खर्च करतात त्यावर अवलंबून

तुमच्या दिलेल्या उदाहरणादाखल संवादांवरून मा१ आणि मा३ अंधश्रद्ध आहेत की नाहीत हे सांगता येत नाही, पण बहुधा नसावेत. ते कुठल्याच गांभीर्याने विचार न करता माहिती ऐकत आहेत. उद्या त्यांना त्याच स्रोतांनी काही वेगळे सांगितले, तर ते तितक्याच आस्थेने ऐकतील. हा साहित्यिक आनंद आहे. म्हणजे एखादी कविता ऐकताना, त्यातील तपशील खरे आहेत, असे मानल्यास अधिक आनंद मिळतो. आणि यात काहीच वाईट नाही. तो आनंद मिळवण्यासाठी मा१ आणि मा३ नी त्यांच्या त्यांच्या मित्रांना चहापोहे खाऊ घातले असतील. २५-५० रुपयांचे पुस्तक विकत घेतले असेल. हा त्या आनंदासाठी वाजवी खर्च वाटतो.

माझ्या मते मा१ आणि मा३ हे त्यात्या विषयाबद्दल साहित्यिक आनंद घेत असले तर अंधश्रद्ध नाहीत. त्या साहित्यिक आनंदाबद्दल ते जितके काही मूल्य चुकवत असतील (म्हणजे वेळ किंवा पैसा), ते "वाजवी" असावे, हे महत्त्वाचे.

बिगरसाहित्यिक कार्यशील उपयोग करून घेत असतील तर फायदा-तोट्याचा प्रश्न आला.

मा३ हा कामधंदा सोडून अशा प्रकारचा वर्महोल शोधू लागला, तर त्याचा अभ्यास अधिक असला पाहिजे. माहिती नसल्यास, आणि वेळ-पैसा वाया घालवल्यास अंधश्रद्धा.

मा१ हा कामधंदा सोडून समाधिस्थ झाला तर त्याचा अभ्यास अधिक असला पाहिजे. माहिती नसल्यास, आणि वेळ-पैसा वाया घालवल्यास अंधश्रद्धा.

मा२ हा खरा व्यक्ती नसून "स्टॉक कॅरॅक्टर" (एकांगी पात्र) वाटतो. अशा प्रकारचा, केवळ प्रश्न विचारून दुसर्‍याला अंधश्रद्ध म्हणणारा हाडामासाचा व्यक्ती बहुदा अस्तित्वात नसावा. मी पाहिलेला नाही. मा१ आणि मा३ एकमेकांना समजून न घेतल्यास एकमेकांस मा२ प्रमाणे बघतात, हे शक्य आहे.

मा१ किंवा मा३, तुमच्या संवादापुरते तरी आक्रमक वाटत नाहीत.

आक्रमक असण्यास दुसर्‍याला "तुम्ही वायफळ/अवाच्यासवा खर्च करीत आहात" असे पटवणे आले. ही शक्यता असेल की गुरूला घरी बोलावण्यात किंवा त्यांचा प्रसाद घेण्यात अधिक खर्च होत असेल (म्हणजे "ब्रीफ हिस्टरी ऑफ टाईम" विकत घेण्यापेक्षा). किंवा पत्रिका न जुळल्यामुळे लग्न मोडले तर त्याहून अधिक पैसे खर्च होत असावेत. त्यामुळे शाश्वती नसून असे वागणे म्हणजे गैरवाजवी तोटा आहे, असे हिरिरीने म्हणणारे तुमच्या पाहाण्यात अधिक आले असतील.

ख्रिस्तकृपेने अत्यंत आक्रमकपणे बोलणारे मा१ मला बरेचदा भेटतात (आणि घरी गेल्यावर रामकृपेने). ख्रिस्तकृपेने मी वर्तमानपत्रात वाचतो की असे अनेक आक्रमक मा१ लोक अल्लाकृपेने बोलतात. कारण त्या मा१ च्या दृष्टीने अमुकतमुक मानून माझ्या आत्म्याचे हनन होत आहे, हा गैरवाजवी खर्च आहे, आणि ते मला तसे पटवायचा जोरदार प्रयत्न करतात.

मस्त

भटक्यांच्या चर्चेला उत्तर वेगळे देतो. पण काही अंशी आपल्याशी सहमत.

ख्रिस्तकृपेने अत्यंत आक्रमकपणे बोलणारे मा१ मला बरेचदा भेटतात (आणि घरी गेल्यावर रामकृपेने). ख्रिस्तकृपेने मी वर्तमानपत्रात वाचतो की असे अनेक आक्रमक मा१ लोक अल्लाकृपेने बोलतात. कारण त्या मा१ च्या दृष्टीने अमुकतमुक मानून माझ्या आत्म्याचे हनन होत आहे, हा गैरवाजवी खर्च आहे, आणि ते मला तसे पटवायचा जोरदार प्रयत्न करतात.

हे अगदी मान्य!

अवांतर, एक ख्रिस्तकृपेचा अनुभव (उगाच आधीपण सांगीतल्यासारखा वाटतोय): मला पूर्वी येथे विद्यार्थी असताना बर्‍याचदा जेसुहा विटनेसची लोकं भेटायची. आपल्याला कल्पना करायला वेळ लागणार नाही, की कसा वाद घालत असेन ते! तर असेच एकदा दोन युवक आमच्या युनिव्हर्सिटीच्या सबवे स्टेशनजवळ भेटले आणि मला विचारले की जिझस ख्राईस्ट माहीत आहे का? आता मी काही ख्रिस्ताच्या विरुद्ध नाही पण असल्या लोकांच्या नक्कीच विरोधात असल्याने जरा तिरके उत्तर (ख्रिस्ताचा अपमान न करता) दिले. त्यांना त्यातला तिरकेपणा कळला का ते माहीत नाही. पण मला सांगायला लागले की बायबल वाच खूप छान असते. मी म्हणले गीता पण चांगली आहे अजूनपण असे अनेक ग्रंथ आहेत. तेंव्हा त्यातला एक रावड्या, मला प्रेमाने म्हणाला की, "बायबल खूपच छान आहे, आम्ही तुरूंगात असताना ते वाचले आणि खूप आवडले, परीणाम झाला वगैरे..." माझ्यातले हिंदूत्व मी लगेच तात्पुरते "बॅकबर्नरवर" टाकले आणि मनोमन "आगे भी नही पिछे भी, दाये भी नही बाहे भी, उपरही नही निचे भी बघत" त्यांना म्हणालो की हो हो छानच आहे, फक्त आता माझी वर्गाला जायची वेळ झाली आहे (स्वर्गाला नाही!) आणि काढता पाय घेतला....

जेसुहा

जेसुहा विटनेसची लोकं कधीकधी माझ्या घरी येऊन मला उत्क्रांती कशी खोटी आहे ते पटवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना अनेक प्रकारांनी सांगून बघितले की हे मला पटणे शक्य नाही, अजून तरी फरक पडलेला नाही.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

पहाण्यासारखे माहीतीपूर्ण सर्वेक्षण

जेसुहा विटनेसची लोकं कधीकधी माझ्या घरी येऊन मला उत्क्रांती कशी खोटी आहे ते पटवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना अनेक प्रकारांनी सांगून बघितले की हे मला पटणे शक्य नाही, अजून तरी फरक पडलेला नाही.

अमेरिकेत प्यू (pew) रिसर्च सेंटरचा धर्मावरील सर्व्हे पहाण्यासारखा आहे. खूपच छान आणि इंटरऍक्टीव्ह आहे. त्यातील वरील संदर्भात एक निरिक्षण असे मांडले आहे की: लहान पणी जेसोहा विटनेस या पंथातील लोकं सर्वात जास्त मोठेपणी त्यांचा धर्म सोडणारी झाली आहेत.

हिंदूंसंदर्भात (त्यात अर्थात जास्त भारतीय आहेत जरी इतर वांशिक पण काही अंशी असले तरी) ठळक निरीक्षण म्हणजे सर्वात जास्त (लहान असताना असलेले) हिंदू ,त्यांचा धर्म मोठेपणी पण सोडत नाहीत. तसेच सर्वात जास्त शिकलेले आणि जास्त पैसे वाले (ज्यूज सर्वात जास्त पैसे वाले आहेत पण शिक्षणाने थोडे कमी) असे अल्पसंख्य आहेत.

ख्रिस्तकृपेने

माझ्यातले हिंदूत्व मी लगेच तात्पुरते "बॅकबर्नरवर" टाकले आणि मनोमन "आगे भी नही पिछे भी, दाये भी नही बाहे भी, उपरही नही निचे भी बघत" त्यांना म्हणालो की हो हो छानच आहे, फक्त आता माझी वर्गाला जायची वेळ झाली आहे (स्वर्गाला नाही!) आणि काढता पाय घेतला....

ख्रिस्तकृपेने मी वेगळा मार्ग चोखळते. म्हणजे चेहर्‍यावर ओढून-ताणून दु:खी भाव आणते आणि "तुम्ही तुमच्या धर्माला माझ्या धर्मापेक्षा सरस आहे सांगून माझ्या भावना दुखवत आहात. हे योग्य नाही. ख्रिस्ताला हे पटले असते काय? तेव्हा कृपया चालू लागा आणि पुन्हा येण्याची तसदी घेऊ नका." असे त्यांच्याहून गोड शब्दांत सांगते

आता

माझा अनुभव हा १५ वर्षांपुर्वीचा विद्यार्थी असतानाचा आहे. आता मी त्यांना घराबाहेर पण उभे करत नाही - अर्थात पोलाईटली सांगून की मी हिंदू आहे. तू तुझ्या घरी आणि मी माझ्या घरी सुखी आहोत. शिवाय लिबरल भागात रहात असल्यामुळे असेल कदाचीत पण गेल्या काही वर्षात असल्या कॅरेक्टर्स दिसलेल्या नाहीत.

 
^ वर