आयुष्यातला रसच संपलाय हो जसा काही!

आयुष्यातला रसच संपलाय हो जसा काही!

आजही गुडोपंतांना त्या तत्वाने ग्रासले होते. अधुन मधून असेच होते. काही करण्याची इच्छा रहात नाही. जगापासून वेगळेच झालो आहोत अशी भावना येते. आणि ही भावना काही तात्पुरती नसते बरं. ही अशी कायम स्वरूपी डोक्यात बसून राहते कुठे तरी मागे. काम ही धड होत नाही. आणि खूप कामं पण आहेत.

खालच्या रबर मॅटस् बदलायच्या आहेत. नवीन वजनं आणायला झाली आहेत. एकदा व्यायामशाळेला रंग देवून घ्यायचा आहे. शिवाय मुलांना फीची आठवण करून द्यायची आहे. दोन वेळा वजनं आणायला म्हणून मुंबई ला जाण्यासाठी पंचवटीचं रिझर्वेशन केलं पण दोन्ही वेळा गेलेच नाहीत.
पुर्वी सारखं हल्ली लिखाणही होत नाही.

ही भावना म्हणजे एखाद्या अचानक पणे घडलेल्या गोष्टीचा परिणाम नाहीये. काहीच करण्याची इच्छा नाही. म्हणजे अगदीच डाउन वाटणे. आयुष्यातला रसच संपलाय हो जसा काही!

अरे ही काय भानगड आहे?

याला नैराश्य म्हणतात. हे बहुतेक सगळ्यांनाच कधी ना कधी ग्रासते.
निराशपणा कधी जाणवून जातो?
१. काही करण्याची इच्छाझात नाही
२. जेंव्हा तुम्हाला तुम्ही उदास आहात हे जाणवतं
३. उगाच दु:खी राहता
४. किंवा एकप्रकारचं रितेपण मनात भरून जातं

हे सगळ्यांनाच जाणवतं. मग काय त्यात?

पण हे जर सलग दोन आठवड्यांच्या पेक्षा जास्त काळ असेल तर नैराश्य आहे असे मानायला जागा आहे.
नैराश्यात खालील महत्वाची लक्षणं दिसतात.

१. वजनात लक्षणीय बदल घडतो (कमी होते/वाढते)
२. मनोवृत्ती चंचल होतात, एकतर गोष्टी करायची खूप घाई होते किंवा अगदीच ३. ढीलेपणा येतो.
४. अकारणच थकवा जाणवतो.
५. एखाद्या गोष्टीवर लक्ष देवून काम करणे जमत नाही. गोष्टींचा सलग विचार करता येत नाही.
६. छे! या पेक्षा मृत्यु काय वाईट? जगाने आपल्यावर सूड उगवला आहे, किंवा आपण या जगाच्या लायकीचेच नाही आहोत असे विचार मनात यायला लागतात.

म्हणजे एकाच वेळी सगळं जाणवतं?
नाही, यातले काही विचार मनात येवून जातात. याची व्याप्ती किती ते नैराश्याची पातळी किती आहे नि कोनत्या प्रकारचे नैराश्य आहे यावर अवलंबून असते. आपल्याला असे का वाटते याची कारणे बाहेरच्या जगात शोधत किंवा
नैराश्य घेवून अनेक लोक वर्षानुवर्षे जगत राहतात.
पण या भावनेवर काही उत्तर असू शकते.

म्हणजे हे जे काही वाटतं ते एक प्रकारचं आजारपण आहे?

अर्थात! हा एक आजारच आहे. फक्त मनाला झालेला आजार.

कसा बॉ बरा करायचा हा आजार मग?

खालच्या काही गोष्टी केल्या तर हा आजार चटकन आटोक्यात येण्यासारखा आहे.

मात्र जर आयुष्यातला रस संपून आता हे आयुष्य सगळं संपवण्याचे विचार मनात असतील लगेच तुमच्या डॉक्टरला भेटा व त्याला सांगा की मला निराश वाटतंय. या क्षणाला हे बाहेरून मदत घेणे अतिशय महत्वाचे आहे!

असो, अगदी संपवण्यासरखे नाही पण उदासी जात मात्र नाही मग काय करायचे या साठी खालचे उपाय करून पहा.
१. बोला - 'हे' सगळं बोलण्यासाठी कुणालातरी शोधा. मन कुणापाशी तरी मोकळं करा. मित्र, मैत्रिण, आई, वडील कुणीतरी जे तुम्हाला समजून घेईल. कुणीच जवळ नसेल तर तुम्ही सरळ एक मनोविकास तज्ञ गाठा व त्याच्याशी बोला!

२. जेवण - जेवणाला नियंत्रणात आणा. त्याल एक वेळ ठरवून घ्या. किती जेवणे योग्य आहे याचा ताळा घ्या. काय जेवतो आहोत याचा विचार करा. योग्य ते प्रोटिन्स व व्हिटॅमिन्स मिळत आहेत की नाही हे एकवार तपासा.

३. व्यायामाला लागा. व्यायामासारखा उपाय नाहीळीखाला मैदानी खेळ, लांब फिरायला जाणे, सायकलींगला जाणे, पोहोणे किंवा योगासने करणे यातून शरीराची गतीमान हालचाल होवून मेंदू आनंददायी द्रव्ये स्रवतो. यामुळे मनाला बरे वाटू लागते. म्हणजे निसर्गाने शरीर व मन हे एकत्रच बांधलेले आहे!

४. लिखाण - जे काही वातते ते सगळे लिहुन काढा. तुम्ही काय लिहिता आहात याचा विचार करू नका. फक्त रोज लिहित जा. मागे पाने उलटून कधी पाहिलेतच तर कळेल की काय कारणांमुले उदास वातत होतं ते.

हे उपाय करून पहा.
या शिवायही अजूनही अनेक उपाय असु शकतात. हे शक्य होत नसेल तर त्वरित तज्ञांचे मार्ग दर्शन घ्या!
हे करायला लागल्यावर काही दिवसातच फरक जाणवेलच. एक प्रकारचा उत्साह मनाला जाणवू लागेल. परत आनंदाचे दिवस येतील.
काही तरी करावंसं वाटायला लागेल.

आपला
गुंडोपंत

Comments

औषध- पुष्पौषधी

योग्य माणसाकडून समुपदेशन + पुष्पौषधी (http://www.bachcentre.com/found/firstpag.htm) हे सुद्धा चांगले आहे.
या पुष्पौषधींचे काही इतर नकोसे परिणाम नसतात आणि अनेकदा त्यातून नैराश्य अथवा इतर मनोकायिक आजारावार चांगले परिणामकारक कायमस्वरुपी उपाययोजना होवू शकते.
ती औषधे ऍलोपथीच्या औषधांसारखी जहाल नसतात त्यामूळे रोग परवडला पण औषध नको असे होत नाही.

(ऐकिव माहिती आणि ऐकिव अनुभवावर आधारित.)
--लिखाळ.

'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

मंत्र

किस्मतपे रोनेका नै, केलेंडर बदलते रहने का!!

थोडक्यात 'हे ही दिवस जातील' हा मंत्र नैराश्यावरील उत्तम उपाय!! (सम्राट अकबराने म्हणे त्याच्या अंगठीवर हा मंत्र कोरुन घेतला होता, जो यश्याच्या आणि अपयशाच्या दोनही प्रसंगी त्याच्या कामी यायचा!)

इट् ड्जन्ट् मॅटर इफ यू विन ऑर लूज्, व्हॉट मॅटर्स् इज् हाऊ यू कॅरी ऑन-- (बहुदा) विन्स्टन चर्चिल

पाडगावकर

थोडक्यात 'हे ही दिवस जातील' हा मंत्र नैराश्यावरील उत्तम उपाय!!

यावरून मंगेश पाडगावकरांच्या "बोलगाणी" मधील खालची चारोळी आठवली:

कधी कधी कसं सर्वच चुकत जातं
नको ते हातात येतं, हवं ते हुकत जात
अशा वेळीस काय कराव?
सुकलेल्या झाडाला न बोलता पाणी घालावं

:)

थोडक्यात 'हे ही दिवस जातील' हा मंत्र नैराश्यावरील उत्तम उपाय!! (सम्राट अकबराने म्हणे त्याच्या अंगठीवर हा मंत्र कोरुन घेतला होता, जो यश्याच्या आणि अपयशाच्या दोनही प्रसंगी त्याच्या कामी यायचा!)

रोमन मंत्र

रोमन सम्राटाच्या साम्राज्याभिषेकाच्या वरातीत, भावी सम्राटाच्या पाठीमागे एक गुलाम उभा राही, आणि एक कानमंत्र म्हणे :
तो नेमका काय आहे ते ठाऊक नाही, पण पैकी एक पाठभेद असा :
"पाठीमागे बघ, आणि आपण मनुष्य आहोत असे लक्षात ठेव"
हा मंत्र अकबराच्या मंत्रासारखाच हर्षातिरेकासाखा नैराश्यातिरेकाच्या वेळीही कामी यावा.

पाठीमागे, गतआयुष्याकडे वळून बघ - मनुष्य म्हणून आशाही आहे!

(साहित्यात या मंत्राचा दुसरा एक पाठभेद अधिक प्रचलित आहे "मेमेंतो मोरि" = "आपण मर्त्य असल्याची आठवण ठेव", पण मला आदला पाठभेद अधिक हरकाम्या वाटतो. विकीवरचा दुवा.)

 
^ वर