ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .. प्रश्नोत्तरातून सुसंवाद - एका ज्योतिषाचे परिक्षण
ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीचे 'ग्रहांकित' या ज्योतिषविषयक मासिकात एका ज्योतिषाने केलेले परिक्षण
ज्योतिष्याकडे जाण्यापूर्वी ....प्रश्नोत्तरातून सुसंवाद हे पुस्तक वाचल्यावर ज्योतिषाकडे जाउ नका हाच संदेश त्यातून मिळतो. ज्योतिषाविषयी चिकित्सा या नावाखाली संदेह निर्माण करणे हाच या पुस्तकाचा हेतू असावा. मनोगतामध्ये लेखक म्हणतो की हे पुस्तक चिकित्सकांनी सर्वसामान्यांच्या चष्म्यातून वाचावे, सर्वसामान्यांनी चिकित्सकांच्या चष्म्यातून वाचावे आणि ज्योतिषांनी अंतर्मुख होउन वाचावे. याच मनोगतात लेखक म्हणतो परिवर्तनवादी चळवळीतल्या लोकंना सुद्धा तुमचा ज्योतिषावर विश्वास आहे का? हा प्र्रश्न अडचणीचा वाटतो. मग पुरोगामी लोकांचा सुद्धा ज्योतिषावरचा अविश्वास डळमळीत आहे तर मग लेखक सर्वसामान्यांनी चिकित्सेच्या चष्म्यातून वाचावे अशी अपेक्षा कशी करतो? लेखक असेही म्हणतो ज्योतिषी आणि जातक यांचे नाते डॉक्टर आणि रूग्णासारखे आहे. तिथे अपेक्षा असते समीक्षा नसते.
पुस्तकात अनेक प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे की उत्तरातून नवीन प्रश्न निर्माण केले आहेत हेच समजत नाही. फलज्योतिष शास्त्र आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना लेखकाने ते 'सायन्स` नाही असे सांगितले आहे. लेखकाला 'सायन्स` हा शब्द भौतिक विज्ञान या अर्थाने वापरायचा असावा. कारण ऑक्सफर्ड डिक्शनरी मध्ये सायन्स या शब्दाचे जे अनेक अर्थ दिले आहे त्यात ज्योतिष हा विषय सायन्स या अर्थाने आणता येतो. शास्त्र आणि विज्ञान याला इंग्रजीत सायन्स हाच शब्द वापरला जातो. मराठी विज्ञान पत्रिकेच्या दिवाळी २००१ च्या अंकात ज्येष्ठ ज्योतिषी श्री. व.दा.भट यांनी स्पष्ट पणे असे म्हटले आहे '' फलज्योतिष हे शास्त्र नाहीच असे म्हणणाऱ्या व्यक्तिंचा वैचारिक गोंधळ स्पष्ट होतो. वास्तविक त्यांना हे 'भौतिक` शास्त्र नाही असे म्हणायचे असते. पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र वगैरे प्रकारच्या भौतिक शास्त्रांचा एक गट व मानवी जीवनाशी शरिराशी, मनाशी निगडीत शास्त्रांचा एक गट कल्पिला तर ज्योतिषशास्त्र हे पहिल्या गटाशी संबंधीत शास्त्र निश्चित नाही.`` व.दा.भटांनी या पुस्तकाचे खऱ्या अर्थाने अप्रत्यक्ष रित्या खंडन केले आहे. ते म्हणतात ''ज्योतिषशास्त्रा बद्दल जे काही आक्षेप, शंका, गैरसमज आहेत त्याचे मूळ कारण एखाद्या नवीन गोष्टीकडे पाहताना आपण ज्ञात ज्ञानाशी त्याची तुलना करतो त्यात आहे. माझया दृष्टिने इथेच खरी चूक होते. ज्योतिषशास्त्राला संपूर्णपणे वेगळा, स्वतंत्र असा आकृतीबंध आहे. इतर कोणत्याही शास्त्राच्या जवळ असे ते नाही. आपल्या पूर्वीच्या संकल्पना, परिमाणे, कसोटया या शास्त्रास लागू करण्याचा खटाटोप करणे चूक ठरेल.`` आचार्य रजनीश सुद्धा फलज्योतिषाला अद्वैताचे विज्ञान म्हणतात. केवळ काही लोकांच्या धंदेवाईक दृष्टिकोणामुळे म्हणा किंवा अपरिपक्व ज्ञानामुळे म्हणा फलज्योतिषाला अभिप्रेत नसलेल्या गोष्टी चिकटल्या आहेत. पण म्हणून सरसकट फलज्योतिषाला त्यासाठी वेठीस धरणे गैर आहे. वैज्ञानिक तरी व्यक्तीगत जीवनात किती वैज्ञानिक दृष्टिकोण बाळगत असतात? वनस्पतीपासून पेट्रोल तयार करणाऱ्या रमर पिल्लेने वैज्ञानिकांना काही काळ मूर्ख बनविलेच ना? मानसशास्त्र हे व्यक्तिसापेक्ष व अमूर्त आहे हे मानसशास्त्रज्ञच सांगतात तरीही ते विज्ञान ठरते पण फलज्योतिष हे पिंडाचा विचार करते असे म्हटले तर लेखक 'सोयीचा भाग` म्हणून शिक्का मारायला मोकळा. मनुष्य काही फक्त विचारांनेच जगतो का? त्याला भावना ही आहेतच की! जगात शास्त्रज्ञ निर्माण झाले म्हणून काही कवी व साहित्यिकांची गरज संपली का? 'लोकांना अनुभव येतो म्हणूनच हे शास्त्र टिकले ना? नाहीतर ते एक निरुपयोगी शास्त्र म्हणून फेकले गेले नसते का?` या विवेचनात उपयुक्तता खोडून काढण्यासाठी लेखक म्हणतो
चुकला तर ज्योतिषी चुकला कारण तो माणूस आहे, त्याच्या ज्ञानाला मर्यादा आहेत पण बरोबर आले तर फलज्योतिष बरोबर आले ही मानसिकता ज्योतिषांनी रुजविली आहे. मग आम्ही म्हणतो जर डॉक्टर चुकला तर त्या वैद्यकशास्त्राच्या मर्यादा! नाही तर रुग्ण अमर झाले असते? पण रुग्ण बरा झाला तर मात्र माझ्या उपचारामुळे झाला तरी ही वैद्यकशास्त्र महान!
जुळया मुलांच्या कुंडल्याबाबत लेखक डॉ.बी.एन. पुरंदऱ्यांचे उदाहरण देतो. पंधरा मिनिटांच्या फरकाने जन्मलेल्या एकाच वारेच्या जुळया मुलींचे नक्षत्र त्या काळात बदलल्याने त्यांच्या वर्णात फरक पडला. या प्रतिपादनाचा उहापोह केला आहे. कुंडली एक असली तरी हस्तरेषा मात्र वेगळया असतात हा हस्तसामुद्रिकांचा दावा लेखक उदृधत करतो. लेखकाची चिकित्सा मान्य केली तरी एकाच घरात, एकाच संस्कारात, एकाच सामाजिक, आर्थिक, भौगोलिक परिस्थितीत असलेली जुळी मुले ही स्वभाव, बौद्धिक क्षमता, आवडीनिवडी यांनी भिन्न का असू शकतात? याचा उल्लेख लेखक कुठेही करत नाही. डॉ.बी.एन.पुरंदरे यांनी आपले संशोधन कुठल्या मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित केले आहे असे लेखक विचारतो? मग डॉ.देव यांनी येरवडा मनोरुग्णालयातील अमावस्या पौर्णिमेचा मनोरुग्णावर परिणाम होतो या समजूतीत तथ्य नसल्याचा निष्कर्ष तरी कुठल्या मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे? त्याचा संदर्भ लेखकाने कुठेही दिला नाही.
प्र्रश्नकुंडलीबाबत लेखक पं. महादेवशास्त्री जोशी यांचे आत्मपुराण मधील उदाहरण देतो. महादेव शास्त्री गुरुकुल पद्धतीतून धर्माचे अंग म्हणून ज्योतिष शिकले. पणजीत त्यांनी ज्योतिष व्यवसाय चालू केला पण महादेवशास्त्रींनी ग्रंथाधारे जरी सांगितले तरी त्यांची भविष्यवाणी खरी उतरत नसे. त्याच गावातील दुसऱ्या ज्येष्ठ ज्योतिषाकडे मात्र गर्दी हटत नसे. हे महाशय पृच्छकालाच बोलायला लावीत. ज्योतिष ही एक कला आहे. पं महादेवशास्त्रींना ती जमली नाही इतकेच. देश, कालवर्तमान, तर्कशास्त्र व तारतम्याचा विचार त्यात आवश्यक आहे हे शास्त्रातच सांगितले आहे. डॉक्टरकडे आपण गेलो तर मला काय झालयं हे सांगा? असे आपण डॉक्टरांना विचारतो का? आपण आपल्याला काय होतयं हे सांगितल्यावरच डॉक्टरला उपचार करणे सोपे जाते. मग ज्योतिषाला आपली माहिती जातकाने सांगितल्याशिवाय तो योग्य मार्गदर्शन कसे करू शकेल?
विद्यापीठात सुद्धा हा विषय शिकविला जातो? याचे उत्तर देताना लेखकाने 'वेद, पुराण, या विषयांवर पी एचडी सुद्धा करता येते आणि ज्योतिष हे वेदांग आहे.` असे म्हटले आहे. आता विद्यापीठात या विषयासाठी यूजीसीने स्वतंत्र अभ्यासक्रम म्हणून मान्यता दिली आहे. एकोणीस विद्यापीठांचा त्यात समावेश आहे. महाराष्ट्रातील एकाचाही त्यात आजतरी सामावेश नाही. अमेरिकेतील वॉशिंग्टन स्टेट मध्ये केप्लर कॉलेज ऑफ अस्ट्रॉलॉजीकल आर्टस ऍण्ड सायन्सेस मध्ये एम.ए व बी.ए चे पूर्ण अभ्यासक्रम आहेत. तिकडचे संशयवादीसुद्धा हा विषय प्रयोग वा संशोधनासाठी वर्ज मानीत नाही. आपल्या कडच्या कुठल्यातरी विद्यापीठाने खोटे ठरविण्यासाठी का होईना या विषयावर संशोधन वा सर्व्हे केला आहे का? डॉ.नारळीकरांनासुद्धा मिशिगन स्टेट विद्यापीठाचे गुळगुळीत झालेले उदाहरण द्यावे लागते. गोकॅलीनचे संशोधन ज्याप्रकारे झाले तसे या संगणक युगातसुद्धा आपल्याकडे नाही याचे कारण व्यक्तिगत पातळीवर ही बाब शक्य नसते आणि विद्यापीठ पातळीवर दर्जा नाही.आपल्याला विचार आणि संदर्भसुद्धा आयात करावे लागतात.
फलज्योतिषाचा मानसिक आधार म्हणून वापर होत असेल तर त्यात गैर काय? याचे उत्तर देताना लेखकाने फलज्योतिषाची उपयुक्तता अप्रत्यक्षरित्या मान्यच केलेली आहे. पण ज्योतिष रंजल्या गांजल्यांचा आधार आहे हे खोडून काढण्यासाठी 'दारु,गांजा यामुळे माणूस काही काळ का होईना दु:ख विसरतात म्हणून त्यात बुडून जाणे हा काय त्यावरचा उपाय झाला का?` असे लेखक विचारतो. मग कर्करोगाच्या रुग्णाला मॉर्फिनची औषधे दिली जातात हा काय त्या रोगावरचा ईलाज झाला का? असे आम्ही म्हणू शकतो. काही ज्योतिषी लोकांच्या अगतिकतेचा फायदा घेतात असे लेखक म्हणतो. हे जरी खरे असले तरी हाच युक्तिवाद वकील आणि अशिल, डॉक्टर आणि रुग्ण, व्यापारी आणि ग्राहक, यांचे बाबतही म्हणता येईल. समाजात या शोषणाच्या प्रवृत्ती सर्व ठिकाणी आढळतात. तसेच सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या प्रवृत्तीही आढळतात. लेखक अशा उपयुक्ततेचे उदाहरण कुठेही देत नाही. कित्येक ज्योतिषी नाममात्र मानधन घेउन, प्रसंगी मोफतसुद्धा मार्गदर्शन करीत असतात.
लेखकाने ५८ प्रश्नात नाडी ज्योतिष, मेदनिय, भृगूसंहिता, मृत्यूषडाष्टक, गुणमेलन, साडेसाती, मंगळदोष, मुहूर्त, कालसर्पयोग, नारायण नागबली, ग्रहांची रत्ने, नॉस्ट्रॅडॅमस असे कितीतरी विषयाचा अंतर्भाव केला आहे. लेखक हा मनोगतात म्हटल्याप्रमाणे एकअर्थाने ज्योतिषीच असल्याने चिकित्सा ही काठाकाठाने न करता प्रवाहात राहूनच केलेली आहे ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे. लेखकाने केलेली चिकीत्सा ही ज्योतिषांना अंतर्मुख बनवून ज्योतिषाच्या प्रगतीसाठी उपयुक्तच ठरावी अशी अपेक्षा आहे.
Comments
हं
ही समिक्षा/परिक्षण मला पूर्वग्रहदुषित वाटली.तशी ती मासिकाचे नाव बघून अपेक्षितच होती म्हणा :)
असो. इतर परिक्षणहि आली असतीलच तीही टाकावीत
दुसरि आवृत्ति
सदर परिक्षण हे प्रथमावृत्तीवर होते. त्यात भाग दोन समाविष्ट नव्हता. तसेच प्रश्नसंख्या ५८ होती. दुसर्या आवृत्तीत ती सुधारणा आहे. काही भाग अनुत्तरीत राहिला आहे हे मात्र मी मानतो. मला वाटतं कुठल्याही विषयाला पुर्णविराम नसतो.
प्रकाश घाटपांडे