सृजनशीलता - तंत्र व मंत्र

प्रस्तावना:

सृजनशीलता हे प्रत्येक माणसांत वसत असलेल्या विचारशक्तीचा विशिष्ट प्रकारे वापर करण्याचे एक तंत्र आहे. त्यांत चाकोरीबाहेर विचार करण्याचा भाग येतो. त्याचा उपयोग करणार्‍या माणसाकडून नवनिर्मिति होते. थोर शास्त्रज्ञ, क्रांतिकारक विचारवंत, संशोधक व साहित्यिक यांच्याकडून आपल्या कार्यांत व निर्मितींत कोणत्यातरी टप्प्यावर या तंत्राचा वापर झाल्याचे आढळून येते.
याचा अर्थ असा नाही की सृजनशीलता सर्वसाधारण माणसाच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. खरेतर आपल्यापैकी प्रत्येकजण कधी ना कधी त्या तंत्राचा वापर करतो. मात्र त्यामुळे मिळणारे यश अनपेक्षित वाटते व आपण त्याचे श्रेय नशीबाला देऊन नंतर कधी त्याचा कार्यकारणभाव शोधण्याचा प्रयत्न करीत नाही. तसे विश्लेषण केल्यास आपण प्रयत्न करीत असतांना केव्हातरी अभावितपणे चाकोरीबाहेरचा विचार केला होता असे आढळून येईल. या तंत्राचा हेतुपूर्वक उपयोग करण्याचा सराव केल्यास असे भाग्यशाली क्षण ही आपल्या बाबतींत नित्याची बाब होऊन बसेल. शिवाय एक असामान्य व्यक्ति म्हणून आपली कीर्ति होईल.
ज्याप्रमाणे पोहोणे, सायकल चालवणे, गाडी चालवणे, संगणक वापरणे या गोष्टी अभ्यासाने आत्मसात करता येतात त्याचप्रमाणे सृजनशीलतेचे तंत्रही आत्मसात करता येते. दैनंदिन आयुष्य जगत असतांनाही आपण दखलपात्र सृजनशील कसे होऊ शकतो हे सांगण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखमालेंत केला आहे.

अनुक्रमणिका

सृजनशीलता - भाग १ - उगमस्थान

सृजनशीलता म्हणजे नवनिर्मितीची क्षमता. सृजनशीलता खालील चार प्रकारांत दिसून येते.
१) एखादी अगोदर अस्तित्वांत नसलेली अशी गोष्ट निर्माण करणे जी व्यवहारोपयोगी ठरेल.
२) नेहमी ठराविक पद्धतीने केली जाणारी गोष्ट निराळ्या पद्धतीने करणे, ज्यायोगे वेळ, श्रम व पैसा यांची बचत होईल.
३) एखादी अशक्य समजली जाणारी समस्या सोडविणे.
४) न सापडलेली नवीन तर्कसंगति शोधून काढणे. यामुळे विज्ञान/तंत्रज्ञानांत नवीन शोध लागतात, तर साहित्यांत त्यामुळे कधीकधी विनोदनिर्मिति होते.

प्रतिभावंत माणसे सृजनशील असतात. प्रत्येकाला इतरांनी आपल्याला प्रतिभावंत म्हणावे असे वाटत असते. त्याचबरोबर त्यासाठी लागणारी सृजनशीलता आपल्यांत नाही असे बहुतेकांना वाटत असते. प्रतिभा ही दैवी देणगी आहे, प्रतिभावंत जन्माला यावा लागतो, अशी त्यांची समजूत असते. प्रयत्नाने आपणही प्रतिभावंत होऊ शकतो यावर कोणाचा विश्वास नसतो.

वास्तविक सृजनशीलता हे मानवी मेंदूचे कार्य आहे. प्रत्येकाला जवळजवळ सारख्याच वजनाचा मेंदू लाभला आहे. तरीदेखील काही थोडी माणसे प्रतिभावान व इतर बहुसंख्य त्या सामर्थ्यापासून वंचित, असे का?

आपणापैकी बहुतेक जणांना मानवी मेंदूचे उजवा मेंदू व डावा मेंदू असे दोन भाग असतात हे ठाऊक असेल. त्यापैकी उजवा मेंदू नवीन नवीन कल्पना निर्माण करतो (त्यांच्या परिणामांचा विचार करीत नाही) व डावा मेंदू अनुभवावर व माहितीवर आधारित व्यावहारिक तर्काधिष्ठित विचार करतो. दैनंदिन जीवन चाकोरीबद्ध असते व त्यांत व्यावहारिकतेला महत्त्व असते. म्हणून सर्वसामान्य प्रौढ माणसे डाव्या मेंदूचा अधिकतम वापर करतात. किंबहुना त्यांच्या विचारप्रक्रियेंत उजव्या मेंदूचा वापर जवळजवळ नसतोच असे म्हंटले तरी चालेल. असे का होते?

(क्रमशः)

सृजनशीलता - भाग २ - गेलेले परत मिळवणे

मागील भागांत म्हंटल्याप्रमाणे सर्वसामान्य प्रौढ माणसांच्या विचारप्रक्रियेंत उजव्या मेंदूचा वापर जवळजवळ नसतोच. हे कसे घडून येते?

मनुष्य लहान असतांना मेंदूच्या दोन्ही भागांचा व्यवस्थित वापर करीत असतो. रस्त्यावर गाडी चालवण्याची कल्पना करणारा मुलगा समोरून ट्रक येतांना दिसला तर बाजूला होतो. पण भोवतालची वडीलधारी माणसे, ज्यांच्यावर तो अवलंबून असतो, ते त्याच्या त्यांना अवास्तव वाटणार्‍या कल्पनांना फारसे उत्तेजन देतांना आढळून येत नाहीत. इतकेच नाही तर कित्येक वेळा त्याबद्दल तो इतरांच्या टीकेचा व उपहासाचा विषय होतो. अशा परिस्थितींत इतरांबरोबर टिकून राहण्यासाठी तो ज्या तडजोडी करतो त्यांत उजव्या मेंदूचा वापर न करणे ही एक तडजोड असते. जसजसा माणूस मोठा होत जातो तसतसे व्यावहारिकतेचे दडपण वाढत जाते. या वाढत्या दडपणाखाली कुठलीही नवीन कल्पना (पर्याय) अव्यवहार्य, वेळेचा अपव्यय करणारी, वाटून ती झिडकारली जाते. त्यामुळे माणसाचे जीवन चाकोरीबद्ध होऊन जाते; इतके की चाकोरीबाहेरच्या कल्पना/पर्याय त्याला सुचतही नाहीत. नेहमींच्या व्यवहारांतील उदाहरणे घेऊन सांगायचे तर रोज ऑफिसला जाणारा मनुष्य ठराविक रस्त्यानेच मार्गक्रमण करतो. परिस्थितीने लादल्याशिवाय आपणहून तो कधी बदल म्हणून दुसर्‍या मार्गाने जात नाही. घरांतील फर्निचर व जेवणाचे टेबल यांच्या जागा बदलण्याचा विचारही सहसा त्याच्या मनांत येत नाही. हॉटेलमध्ये गेल्यावर तो काही ठराविक पदार्थांपैकीच पदार्थ मागवतो. मेनूकार्डावरील तीस चाळीस पदार्थांमधून कधी न चाखलेला पदार्थ मागवण्याचा तो विचार करीत नाही. (बरोबर असलेल्या त्याच्या लहान मुलाने वेगळा पदार्थ सांगितला तर त्याची प्रतिक्रिया काय असते ते वेगळे सांगायला नको). असे का करीत नाही म्हणून त्याला विचारल्यास आपल्या चाकोरीबद्ध निवडीचे तो काही तरी (चाकोरीबद्ध) समर्थनही देतो.

अर्थात् ही परिस्थिति बदलता येणार नाही असे नाही. मात्र त्यासाठी सुस्त झालेल्या उजव्या मेंदूला कार्यप्रवण करावे लागेल. ही गोष्ट प्रत्येकाच्या आयुष्यांत अपघाताने कधीकधी तात्पुरती होत असते. पण प्रतिभावंतांप्रमाणे सृजनशीलता हा आपला स्वभाव व्हायला हवा असेल तर असे अपघाती अनुभव पुरेसे होणार नाहीत. त्यासाठी प्रयत्नाने ते कौशल्य पुनरुज्जीवित करावे लागेल.

प्रतिभावंतांचे सृजन व्यवहारापलीकडे विचार न करणार्‍यांनाही पसंत पडते. ते तर्काला सोडून किंवा अव्यावहारिक असते तर तसे झाले नसते. याचा अर्थ सृजनशीलतेंत मेंदूच्या दोन्ही भागांचा सहभाग असला पाहिजे.

स्वतःमधली सृजनशीलता विकसित करण्यासाठी मेंदूच्या दोन्ही भागांचा वापर करण्याचा सराव कसा करावा याचे तंत्र एडवर्ड् बोनो यांनी आपल्या 'सीरियस् क्रिएटिव्हिटी' या पुस्तकांत दिले आहे. त्याविषयी पुढील भागांत पाहू.

(क्रमश:)

सृजनशीलता - भाग ३ - मेंदूला व्यायाम

मागील भागांत म्हंटल्याप्रमाणे स्वतःमधली सृजनशीलता विकसित करण्यासाठी मेंदूच्या दोन्ही भागांचा वापर करण्याचा सराव कसा करावा हे एडवर्ड् बोनो यांनी आपल्या "सीरियस् क्रिएटिव्हिटी" या पुस्तकांत दिले आहे. हा एक मेंदूसाठी व्यायाम आहे. त्याचे टप्पे खालीलप्रमाणे आहेत :

१) 'मी आता चाकोरीबाहेरचा विचार करणार आहे' असे ठरवून चालू असलेला चाकोरीबद्ध विचारप्रवाह थांबवणे. याला बोनो यांनी 'क्रिएटिव्ह् पॉज्' असे म्हंटले आहे. हे काहीसे परेडच्या अगोदर 'दक्ष' स्थितींत येण्यासारखे आहे.
२) सृजनशील विचारांसाठी एखादा विषय घेणे. यासाठी अक्षरश: कुठलाही विषय उचलणे. उदा. बॉलपेनचे टोपण, रीफिल्, यांसारख्या क्षुल्लक गोष्टींपासून ते जागतिक शांततेपर्यंत. एखादा विषय चांगला म्हणून निवडू नये. कारण आपल्याला चांगल्या वाटणार्‍या विषयांत बर्‍याच कल्पना चाकोरीबद्ध असण्याची शक्यता असते. त्याचबरोबर सुरवातीला सराव करतांना आपली तातडीची समस्या घेऊ नये. कारण तिच्यांतून लवकरांत लवकर बाहेर पडायला अधीर असल्यामुळे आपण नवीन नवीन कल्पना शोधण्यांत 'वेळ दवडायला' तयार होणार नाही. अर्थात् आपला अंतिम उद्देश आपली सृजनशीलता खर्‍या आयुष्यांतील समस्या सोडवण्यासाठी वापरणे हाच आहे. पण आपल्यांत पुरेशी क्षमता आल्यावर.
३) घेतलेल्या विषयाबद्दल 'हे असेच का असायला हवे?' किंवा 'हे असेच का करायचे?' असा आव्हानात्मक विचार करणे. अगदी सुरळीत चाललेल्या गोष्टींबद्दलही असा विचार करता यायला पाहिजे.
४) विचारार्थ घेतलेली गोष्ट वेगळी कशी असू शकेल, कशी असावी किंवा वेगळ्या तर्‍हेने कशी करता येईल याबद्दल पर्याय शोधणे. साधारणपणे कुठल्याही गोष्टीसाठी पर्याय पाहण्याची आपल्याला संवय नसते. बहुतेक गोष्टी आहे तशाच स्वीकारण्याकडे किंवा चालू ठेवण्याकडे आपली प्रवृत्ति असते. कुठलाही नवीन पर्याय चुकून डोक्यांत आला किंवा दुसर्‍या कोणी सुचवला की डाव्या मेंदूकडून तो विनाविलंब अव्यावहारिक म्हणून बाजूला सारला जातो. त्यासाठी व्यवहार्यतेबरोबरच 'लोक काय म्हणतील', 'असलेल्या पर्यायापेक्षा अधिक चांगला पर्याय असता तर तो अगोदरच व्यवहारांत आला नसता का' असाही विचार केला जातो. असे वारंवार होऊ लागले की त्याची परिणती नवीन पर्याय न सुचण्यांत म्हणजेच उजव्या मेंदूचे कार्य बंद पडण्यांत होते. ही सवय बदलली पाहिजे. त्यासाठी नवीन कल्पना/पर्याय निर्माण करतांना आपल्याला डाव्या मेंदूचे कार्य तात्पुरते बंद करण्याचा सराव करावा लागेल. म्हणजेच सुचलेल्या पर्यायाच्या व्यवहार्यतेबद्दल ताबडतोब विचार करण्याचा मोह टाळावा लागेल. (आणि त्यांत कठीण काही नाही. कारण जोपर्यंत आपण तो अमलांत आणीत नाही तोपर्यंत त्याच्या परिणामांची काळजी करण्याचे कारण नाही). म्हणजे मग एकामागून एक पर्याय सुचत जातील. पर्याय नुसते मनांत ठेवण्यापेक्षा ते कागदावर लिहून काढावेत. नुसते तोंडी सांगतांना किंवा मनांत नोंद ठेवल्याने जेवढे पर्याय सुचतात त्यापेक्षा कितीतरी अधिक पर्याय लिहितांना सुचतात असा अनुभव आहे. पर्याय तीन प्रकारचे असतात. एक, सहज सुचणारे, दुसरे डोक्याला थोडा ताण देऊन सुचणारे व तिसरे चमत्कारिक वाटणारे. उदा. चोवीस तास पाणी पुरवठा असलेल्या ठिकाणी दिवसांतून ठराविक वेळी दोन तास पाणी पुरवठा होऊ लागला तर निर्माण होणार्‍या समस्येवर तोडगा म्हणून पाण्याच्या वेळेंत सर्व कामे उरकून घेणे, पाणी साठवून ठेवणे, हे पर्याय पहिल्या प्रकारांत मोडतात. प्यायचे पाणी विकत घेणे हा पर्याय दुसर्‍या प्रकारांत मोडतो तर पाण्याऐवजी शीतपेये वापरणे, पाण्याशिवाय राहण्याचा सराव करणे, हॉटेलमध्ये गेल्यावर तेथे मिळणारे पाणी आपल्या बाटलींत भरून आणणे हे पर्याय तिसर्‍या प्रकारांत मोडतात. पर्याय लिहिण्यासाठी ठराविक अवधीच ठरवावा (समजा दहा मिनिटे). ज्यास्त अवधी असला म्हणजे ज्यास्त पर्याय सुचतात असे नाही. ठरवलेल्या अवधींत ज्यास्तींत ज्यास्त पर्याय लिहिण्याचा निश्चय करावा. त्यामुळे व्यावहारिक विचार आपोआपच कमी होईल. पर्याय जितके अधिक तितकी चाकोरीबाहेरचे विचार सुचण्याची क्षमता अधिक. आपला उजवा मेंदू किती कार्यरत झाला याचे ते निदर्शक आहे.

पर्याय शोधल्यानंतर त्यांच्या व्यावहारिकतेबद्दल विचार करण्यासाठी व त्यांना व्यवहार्य स्वरूप देण्यासाठी (आत्तापर्यंत बंद ठेवलेला) डावा मेंदू कसा वापरावा ते पुढील भागांत पाहू.

(क्रमश:)

सृजनशीलता - भाग ४ - पर्यायांची व्यवहार्यता

(मागील भागावरून पुढे)
५) पर्याय शोधल्यावर कुठल्याही पर्यायाच्या व्यवहार्यतेबद्दल विचार करण्यासाठी व त्याला व्यवहार्य स्वरूप देण्यासाठी डाव्या मेंदूचा वापर करतांना खालील क्रम ठेवावा.
(अ) पर्याय नवीन असल्यामुळे ताबडतोब त्याचे तोटे व त्यासंबंधी प्रतिकूल मुद्देच प्रथम डोक्यांत येतील. त्यांना बाजूला सारून प्रयत्नपूर्वक प्रथम त्याचे फक्त फायदे व अनुकूल मुद्देच लक्षांत घ्यावेत. (लिहून काढावेत)
(ब) नंतर त्या पर्यायाचे तोटे, त्यांतील अडचणी, त्याच्या व्यवहारांतील मर्यादा, इत्यादि प्रतिकूल मुद्द्यांची यादी करावी.
(क) वरील प्रतिकूल मुद्द्यांवर मात करण्याचे व्यावहारिक मार्ग काय असतील त्याचा शोध घ्यावा व ते विचारांत घेऊन त्या पर्यायाला व्यवहार्य स्वरूप द्यावे.
(ड) वरीलप्रमाणे व्यवहार्य स्वरूप दिलेला पर्याय आपल्याला पाहिजे त्या कामासाठी फारसा समाधानकारक वाटत नसला तर त्याचा दुसरीकडे कुठे उपयोग होऊ शकेल का ते पहावे.

वर मेंदूच्या व्यायामाचे पाच टप्पे दिले आहेत. त्यांतील कुठल्याही टप्प्यापासून सुरवात करता येईल. शिवाय प्रत्येक टप्पा हाही एक स्वतंत्र व्यायाम प्रकार आहे.

आता उदाहरणादाखल एक विषय घेऊन वरील सूचनांप्रमाणे त्यावर कसा विचार करता येईल ते पाहू.

विषय : आपल्याला एक उपहारगृह काढायचे आहे.

पर्याय :
१) महराष्ट्रीयन खाद्यपदार्थ देणारे
२) दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ देणारे
३) पंजाबी खाद्यपदार्थ देणारे
४) वरीलपैकी कोणत्याही दोन प्रकारचे पदार्थ देणारे - या अंतर्गत तीन पर्याय असतील
५) कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ न देणारे

वरील पर्यायांपैकी शेवटचा - कोणतेही खाद्यपदार्थ न देणार्‍या उपहारगृहाचा - पर्याय विचारार्थ घेऊ.

सर्वसामान्य समजुतीप्रमाणे आपण येणार्‍या गिर्हाइकाला आपल्याकडे कोणते पदार्थ खायला मिळतील त्याची यादी देणार. गिर्हाइक त्याप्रमाणे हवे ते मागवणार. आपण ते पुरवणार व त्याचे खाऊन झाल्यावर आपण त्याला बिल् देऊन पैसे घेणार. आता आपल्या उपहारगृहांत टेबले, खुर्च्या, पंखे, लाइट्स्, सर्व काही असेल. फक्त आपण खाद्यपदार्थ देणार नाही. ताबडतोब मग आपल्या हॉटेलमध्ये कोण कशाला येईल व आपल्याला पैसे कसे मिळणार असे व्यावहारिक विचार सुचतील व एक मूर्खपणाचा पर्याय म्हणून आपण तो सोडून देऊ.

पण थांबा. आपण त्यावर वरील ५व्या टप्प्यांत सांगितल्याप्रमाणे विचार करू.

अनुकूल व फायद्याचे मुद्दे :
१. भटारखाना, आचारी, अन्नधान्य, इंधन, यांची गरज लागणार नाही. साहजिकच त्यांच्यामुळे निर्माण होणार्‍या समस्याही नसतील.
२. चोर्‍या व उरलेल्या खाद्यपदार्थांचे काय करावे हे प्रश्न राहणार नाहीत.
३. काचेच्या प्लेट्स्, कपबशा, लागणार नाहीत.
४. वेटर्स् ची गरज लागणार नाही. त्यामुळे त्यांच्या युनियनमुळे होणार्‍या समस्याही नसतील. पाणी द्यायचे असेल तर एक-दोन माणसे पुरतील.

वरील फायदे दुर्लक्ष करण्यासारखे नाहीत.

आता प्रतिकूल मुद्दे पाहू.
मुख्य मुद्दा म्हणजे खाद्यपदार्थच नसतील तर हॉटेलमध्ये लोक येणार नाहीत व आपल्याला पैसे मिळणार नाहीत.

यावर व्यावहारिक उपाय :
हॉटेलवर "आपल्याला लागणारे खाद्यपदार्थ स्वतः आणावे" अशी गिर्हाइकांसाठी सूचना लिहावी. येणार्‍या गिर्हाइकांना अर्थातच बसायला जागा म्हणजे टेबल, खुर्ची, मिळेल. लाइट् व पंखे असतील. लोकांना दुकानांतून विकत घेतलेले पदार्थ या हॉटेलांत खाता येतील. दारोदार फिरण्याचे काम करणार्‍या कर्मचार्‍यांना स्वतःचा घरून आणलेला डबा खाण्यासाठी व्यवस्थित जागा मिळेल. हॉटेलांतील सोयींसाठी गिर्‍हाइकांना वेळेप्रमाणे भाडे आकारता येईल.

पुढच्या भागांत आणखी एक विषय घेऊ.

(क्रमश:)

सृजनशीलता - भाग ५ - सरावासाठी आणखी एक विषय

(मागील भागावरून पुढे)

आता मेंदूच्या व्यायामासाठी आणखी एक विषय घेऊ.

समजा, आपण पाचव्या मजल्यावर राहात आहोत. बाहेर जाण्यासाठी आपल्याला खाली रस्त्यावर उतरायचे आहे.

तसे आपण नेहमी उतरत असतो. त्यांत कधीही कुठलीही अडचण आलेली नाही. तरीही आपण मेंदूला वरील सूचनांप्रमाणे व्यायाम घडवणार आहोत.

पाचव्या मजल्यावरून खाली कसे यायचे यासंबंधी पर्याय :
१) लिफ्टने
२) जिन्याने
३) काही मजले लिफ्टने, उरलेले जिन्याने
४) पाईपच्या आधाराने
५) खिडकीच्या गजाला पुरेशा लांबीचा दोरखंड बांधून त्याच्या साह्याने
६) खिडकींतून थेट खाली उडी मारून (डाव्या मेंदूला गप्प करा)

वरीलपैकी पर्याय (१) व (२) बद्दल काही वाटणार नाही. पर्याय (३) हा निरर्थक उद्योग वाटण्याची शक्यता आहे. पर्याय (४) व (५) बद्दल लोक आपल्याकडे चमत्कारिक नजरेने पाहतील हे डोक्यांत येईल तर पर्याय (६) आपल्या मानसिक संतुलनाविषयी लोकांच्या मनांत शंका उत्पन्न करणारा वाटेल.

आपण पर्याय (६)वर डाव्या मेंदूच्या साह्याने व्यावहारिक विश्लेषणाचे तंत्र वापरू व काय होते ते पाहू. त्यासाठी प्रथम त्याबाबत ताबडतोब डोक्यांत येणारा स्वतःच्या सुरक्षिततेचा विचार तात्पुरता बाजूला ठेवून फक्त अनुकूल मुद्दे पाहू. ते असे असतील -
१) इतर मार्गांच्या मानाने अगदी थोड्या वेळांत खाली पोहोचू.
२) आपली काहीच शक्ति खर्च होणार नाही.
३) अनुभव थरारक असेल. (मुलांना सोफ्याच्या डनलॉप कुशनवर नाचताना क्षणभर हवेंत राहण्याचा आनंद कसा मिळतो ते आठवा).

प्रतिकूल मुद्दा : स्वतःच्या शरीराच्या सुरक्षिततेला धोका.
त्यावर व्यावहारिक उपाय : पॅराशूटच्या साह्याने उडी मारणे.
त्यांतील अडचण : इतक्या कमी उंचीवरून उडी मारतांना खाली पडेपर्यंत पॅराशूट उघडणार नाही.
या अडचणीवर उपाय : लगेच उघडणारे किंवा उडी मारण्यापूर्वी छत्रीसारखे उघडता येणारे पॅराशूट तयार करणे. एरोडायनॅमिक्स् विज्ञान व तंत्रज्ञानाच्या साह्याने असे पॅराशूट तयार (डिझाइन्) करणे अशक्य नाही असे वाटते. आजपर्यंत कुणी केले नसले तरी आता ते करता येणार नाही असे थोडेच आहे?

आता असे पॅराशूट फक्त खाली उतरण्यासाठीच वापरता येईल पण वर जाण्यासाठी त्याचा काहीच उपयोग नाही म्हणून फारसे उपयोगाचे नाही असे वाटत असल्यास वरील सूचना क्रमांक ५ (ड) मध्ये म्हंटल्याप्रमाणे हे नवे पॅराशूट दुसरीकडे कोठे व आणखी कशासाठी उपयोगी पडते का ते पाहू. त्याच्या काही शक्यता :
१) वर अनुकूल मुद्द्यांतर्गत म्हंटल्याप्रमाणे हवेंतून निव्वळ गुरुत्वाकर्षणाने वरून खाली येण्याचा अनुभव थरारक असेल. सर्वसामान्यांना ही गंमत अनुभवता यावी म्हणून अशी पॅराशूट मोठ्या प्रमाणावर तयार करून ती मुलांना (व मोठ्या माणसांनाही) खेळण्यासाठी पुरवता येतील. त्यासाठी, पोहोण्याच्या तलावावर जशी निरनिराळ्या उंचीवरून सूर मारण्याची व्यवस्था असते तशी, सार्वजनिक बागांतून निरनिराळ्या उंचीवरून उड्या मारण्यासाठी योग्य असे कठडे बांधता येतील.
२) बहुमजली इमारतींत खालच्या मजल्यांवर आग लागल्यामुळे लिफ्ट किंवा जिन्याने येणे शक्य नसेल तर वरच्या मजल्यावरील रहिवाशांना या पॅराशूटच्या साह्याने खाली उड्या मारता येतील. बहुमजली हॉटेल्समध्ये तळमजला सोडून इतर मजल्यांवर प्रत्येक खोलींत (विमानांतील रक्षा जॅकेटप्रमाणे) असे पॅराशूट ठेवणे सक्तीचे करता येईल.

या लेखमालेच्या भाग (३) व (४) मध्ये दिलेल्या मेंदूला व्यायाम द्यायच्या सूचनांवरून असे दिसून येईल की खालील चांगल्या समजल्या जाणार्‍या संवयी सृजनशीलतेसाठीही पोषक आहेत.
१) कुठलीही समस्या नाही, सर्व काही सुरळीत चालू आहे असे वाटत असेल तर सुस्ती येऊ न देणे.
२) सतत अधिकाधिक चांगल्या पर्यायांच्या शोधांत राहणे.
३) एखादी कल्पना कितीही मूर्खपणाची वाटली तरी ताबडतोब बाजूला न सारणे.
४) कुठल्याही गोष्टीबद्दल सकारात्मक विचार करणे. तिच्यांतील अनुकूल मुद्दे आवर्जून पाहणे.
५) प्रतिकूल बाबींवर मार्ग काढण्याचा प्रयत्न करणे.

सृजनशीलतेंत नवीन कल्पनांना महत्त्व असल्यामुळे त्या निर्माण करण्याचे काही मार्ग आपण पुढल्या भागांत पाहू.

(क्रमश:)

सृजनशीलता - भाग ६ - नवीन कल्पना सुचण्यासाठी

(मागील भागावरून पुढे)

नवीन कल्पना सुचण्यासाठी मेंदूला चालना देण्याचे काही मार्ग :
१) विचारार्थ घेतलेल्या गोष्टीचे चित्र मनश्चक्षूंसमोर आणणे : इसापाच्या ओझ्याची गोष्ट सर्वांना ठाऊक आसेल. कधी कधी बोलतांना असे चित्र मनांत असेल तर बोलणे अधिक परिणामकारक होते. एकदा एका माणसाला बाकीचे उलट सुलट सूचना देत होते. त्यामुळे नक्की काय करावे हे त्याला कळत नव्हते. आपल्या या अवस्थेचे वर्णन करतांना तो म्हणाला, " माझ्या डोक्यांत ट्राफिक जॅम झालाय."
२) चालू परिस्थितींतील अडचणी लक्षांत घेऊन पर्यायी साधने किंवा पद्धती शोधणे : तंत्रज्ञानांतील प्रगति बर्‍याच अंशी अशीच होत असते. पूर्वी वीज वितरणासाठी तांब्याच्या तारा वापरत असत. तांब्याला मोडींत चांगला भाव येत असल्यामुळे त्यांची चोरी होऊ लागली म्हणून मोडींत फारशी किंमत येणार नाही अशा ऍल्युमिनियमच्या तारा वापरायला सुरवात झाली.
३) विचाराधीन असलेल्या विषयाशी संबंधित नसलेल्या गोष्टीचा संबंध लावण्याचा प्रयत्न करणे : याला "रँडम् इन्पुट्" असे म्हणतात. ग्रह-तार्‍यांच्या गतीचा अभ्यास करणार्‍या न्यूटनला झाडावरून सफरचंद पडतांना पाहून गुरुत्वीय बलाची कल्पना सुचली असे म्हणतात. पुष्कळांना त्यांच्या मनांत घोळणार्‍या प्रश्नाचे उत्तर अनपेक्षित ठिकाणाहून किंवा एखाद्या व्यक्तीच्या दुसर्‍याच विषयावरील बोलण्यावरून अनपेक्षितपणे मिळते. बोनो यांच्या "सीरीयस् क्रिएटिव्हिटी" मध्ये याची काही मनोरंजक उदाहरणे दिली आहेत ती पहावी. (विस्तारभयास्तव ती येथे देता येत नाहीत).
४) एखादा भाग वगळल्याने किंवा कमी केल्याने काय होईल त्याची कल्पना करणे : बहुतेक वेळा कुठलीही गोष्ट आहे तशीच चालू ठेवण्याकडे आपला कल असतो. त्यांतील एखादा भाग वगळल्यास काय होईल यावर विचार केल्यास पुष्कळदा काही बिघडत नाही असे आढळून येईल. सुरवातीला दुचाकी वाहनांना पायाचा ब्रेक व गियर्स् होते. आता हे भाग नसलेल्या दुचाकी वापरांत आलेल्या आहेत. गियर्स् नसलेल्या चारचाकी मोटारगाड्याही येऊ लागल्या आहेत.
वानगीदाखल आणखी एक उदाहरण घेऊ:
आपण रोज जेवण घेतो. त्यासाठी आपण बाजारांतून अन्नधान्य आणतो, ते शिजवतो व शिजवलेले अन्न खातो. यांपैकी अन्न शिजवणे हा भाग वगळून टाकू. म्हणजे आपण अनधान्य न शिजवता खाणार आहोत अशी कल्पना करू. ही कल्पना व्यवहार्य बनविण्यासाठी आपण तिच्यावर भाग ४ सूचना क्रमांक ५ प्रमाणे विचार करू.
प्रथम फक्त अनुकूल मुद्दे :
(अ) वेळ, श्रम व इंधनासाठी लागणारा पैसा यांची बचत
(ब) पोषक द्रव्ये व जीवनसत्त्वे नष्ट होणार नाहीत.
(क) फारशी भांडीकुंडी लागणार नाहीत.
(ड) भांडी घासण्यासाठी नोकर माणूस लागणार नाही.
आता प्रतिकूल मुद्दे :
(अ) चावायला कठीण.
(ब) चव लागणार नाही.
(क) आपली पचनसंस्था (कदाचित) कच्चे अन्न पचवू शकणार नाही.
प्रतिकूल बाबींवर उपाय :
(अ) चावायला कठीण : खायचे अन्नधान्य 'जेवणाच्या' वेळेपूर्वी काही तास पाण्यांत भिजत ठेवावे. म्हणजे ते आपल्याला चावण्यासारखे मऊ होईल. ते वाटून त्याची पेस्ट् ही बनवता येईल.
(ब) चव लागणार नाही : चव ही मुख्यत: मसाल्यांमुळे येते. वरीलप्रमाणे भिजलेल्या अन्नासाठी वापरायला योग्य असे मसाले तयार करता येतील.
(क) आपली पचनसंस्था कच्चे अन्न पचवू शकणार नाही : वर सांगितल्याप्रमाणे भिजवल्यामुळे या समस्येची तीव्रता थोडी कमी होईल असे वाटते. शिवाय हा संवयीचा प्रश्न आहे. ही संवय हळूहळू बदलता येईल. प्रथम काही दिवस थोडे कमी शिजवलेले अन्न खाऊन ते पचवायची क्षमता आणावी. पुढे टप्प्याटप्प्याने खायचे अन्न कमी कमी शिजवत जावे व शेवटी वरील (अ) व (ब) प्रमाणे बनवलेल्या कच्च्या अन्नावर यावे. (कुठलीही जुनी संवय मोडून नवी संवय लागायला दहा आठवड्यांचा काळ लागतो असे म्हणतात).
वरील मुद्दे विचारांत घेऊन आपल्याला जेवणाच्या प्रकारांत बदल करण्याची योजना आखता येईल व आपल्या दैनंदिन जीवनांतून अन्न शिजवण्याचा भाग काढून टाकता येईल. त्याचे फायदे अनुकूल मुद्द्यांतर्गत दिलेच आहेत.
५) एखाद्या वस्तूचा, उपकरणाचा आकार, आकारमान आपल्या सोयीप्रमाणे बदलण्यासंबंधांत विचार करणे : पन्नास वर्षांपूर्वी वापरांत असलेली विजेची बटणे व सध्या वापरांत असलेली विजेची बटणे, सुरवातीचे रेडियो व नंतर आलेले ट्रांझिस्टर यांतील फरक लक्षांत घ्या.

वर दिलेल्या उदाहरणांपेक्षा अधिक चांगली उदाहरणे आपल्याकडे असण्याची शक्यता आहे. कृपया या लेखाच्या निमित्ताने त्यांची नोंद घ्या व इच्छा असल्यास प्रतिसादांत लिहा.

पुढील भागांत आपण भन्नाट कल्पनांविषयी पाहू.

(क्रमश:)

सृजनशीलता - भाग ७ - भन्नाट कल्पना

(मागील भागावरून पुढे चालू)

नवीन नवीन कल्पना हा नवनिर्मितीचा कच्चा माल आहे. त्यांतील काही भन्नाट असतात. बर्‍याच वेळा त्या हास्यास्पद व वेडगळपणाच्या वाटतात. त्या मांडणारा लोकांच्या उपहासाचा विषय होतो. त्यामुळे बहुतेक वेळा अशा कल्पना शब्दरूप घेण्यापूर्वीच निकालांत निघतात. तथापि मनुष्यजातीच्या प्रगतीचा इतिहास पाहिला तर अनेक क्रांतिकारक बदलांच्या मुळाशी एकेकाळी भन्नाट वाटणार्‍या कल्पना होत्या असे दिसून येते. आपल्याला पक्ष्यांप्रमाणे हवेंत उडता यायला हवे ही कल्पना कोणाच्या तरी डोक्यांत आली, त्याने ती मांडली म्हणून विमानाचा शोध लागला. त्यामुळे भन्नाट कल्पनांची निर्मिति करता येणे हा सृजनशीलतेंतील महत्त्वाचा भाग आहे. अशा कल्पना निर्माण करण्याच्या मुख्यत: तीन पद्धती आहेत.
१) एखादी प्रचलित, नेहमींच्या व्यवहारांतील कल्पना शब्दबद्ध करून ती उलट करणे : यांत उलट करणे म्हणजे होकारात्मक विधान नकारात्मक करणे नव्हे, तर त्यांतील क्रम, तर्कसंगति, घटकांचा परस्परसंबंध उलट करणे होय. उदहरणार्थ, माणूस बस पकडतो याच्या उलट कल्पना माणूस बस पकडत नाही अशी नसून बस माणसाला पकडते अशी आहे. अशाच आणखी काही परस्पर विरोधी कल्पनांच्या जोड्या:
अ) मी शीतपेय पितो याउलट शीतपेय मला पिते.
ब) दुकानदार/उत्पादक वस्तूची किंमत ठरवतो व गिर्‍हाइक त्या किंमतीला ती वस्तू विकत घेते याउलट गिर्‍हाइक वस्तूची किंमत ठरवते व दुकानदार/उत्पादक त्या किंमतीला ती वस्तू गिर्‍हाइकाला विकतो.
वरीलपैकी उलट कल्पना (ब) च्या व्यवहार्यतेबद्दल आपण विचार करू.
अनुकूल मुद्दा : विक्रीमध्ये "आवाजवी किंमत" हा अडसर राहणार नाही.
प्रतिकूल मुद्दा : गिर्‍हाइक इतकी कमी किंमत सांगेल की त्यांतून उत्पादन खर्चही निघणार नाही.
आता याबद्दल काय करता येईल ते पाहू. किंमतीबाबत एक वस्तुस्थिति लक्षांत घेतली पाहिजे. ती म्हणजे उत्पादक जी किंमत ठरवतो ती उत्पादन खर्च व इतर खर्च निघून काही नफा मिळावा या हिशोबाने ठरवतो. सर्वसाधारण गिर्‍हाइक वस्तूची किंमत त्या वस्तूचा त्याला कितपत उपयोग आहे त्याप्रमाणे ठरवते. तिच्या उत्पादकाला ती बनवण्यासाठी किती खर्च आला याच्याशी गिर्हाइकाला काही देणेघेणे नसते. यांतून पुढीलप्रमाणे मार्ग काढता येईल.उत्पादकाने चाचणी म्हणून मालाची एक बॅच काढायची व आपल्या पद्धतीने प्रत्येक नगाची विक्रीची किंमत ठरवायची. मात्र विक्रेत्यांना त्या किंमतीवर अडून न राहता गिर्‍हाइक जी किंमत द्यायला तयार असेल त्या किमतीला त्याला ती विकण्याची मुभा द्यायची. त्यांत निरनिराळ्या किंमतींना किती किती नग विकले गेले ते समजेल. ज्या किंमतीमुळे विक्रीचे ज्यास्तींत ज्यास्त उत्पन्न आले असेल ती किंवा तिच्यापेक्षा कमी इतकी गिर्‍हाइकासाठी विक्रीची किंमत ठरवून टाकायची व उलटा हिशोब करून उत्पादन खर्चांत कपात करायची. हे कच्चा माल मोठ्या प्रमाणावर किफायतशीर दराने घेऊन, उत्पादन प्रक्रियेंत सुधारणा करून व प्रत्येक बॅचमधल्या नगांची संख्या वाढवून करता येईल. पहा आपण कुठून कुठे पोचलो ते!
२) एखाद्या गोष्टींतील महत्वाचा किंवा त्रासदायक भाग वगळून आपला हेतु कसा साध्य करता येईल याचा विचार करणे : यासंबंधीची दोन उदाहरणे पूर्वी दिलेली आहेत. (पहा : भाग ४ मधील "खाद्यपदार्थांशिवाय उपहारगृह" व भाग ६ मधील "अन्न न शिजवता खाणे")
३) इच्छानुवर्ति विचार व स्वप्नरंजन (wishful thinking) : पुष्कळदा अमुक एक गोष्ट जगांत असती तर बरे झाले असते असे आपल्याला वाटते. अशा काही (सध्यातरी) भन्नाट वाटणार्‍या कल्पना :
अ) मानवी रक्त तयार करणारे कारखाने असावेत व पाहिजे त्या गटाचे रक्त केमिस्टकडे मिळावे.
ब) समुद्राच्या पाण्यावर शेती करता यावी.
क) लहान मुले आत बसून स्वत: उडवू शकतील अशी विमाने असावीत.
ड) लढाईच्या दिवसांत अणुबाँबपासून रक्षण व्हावे म्हणून अवकाशांत एखादे संरक्षक छत्र निर्माण करता यावे.
वरील सर्व कल्पनांत एक सामायिक अनुकूल मुद्दा आहे. तो म्हणजे त्यामुळे सध्याच्या अनेक काळज्या दूर होणार आहेत. त्यांतील प्रतिकूल मुद्दा म्हणजे उपलब्ध तंत्रज्ञानाने ते अशक्य दिसते. त्याची कारणे शोधून त्यावर व्यवहार्य उपाय शोधल्यास वरील भन्नाट कल्पना कोणत्या ना कोणत्या तरी रुपांत प्रत्यक्षांत येऊ शकतात.

वरील तिन्ही प्रकारांत न बसणार्‍या भन्नाट कल्पना :
१) मोटार गाडीचे इंजिन गाडीच्या टपावर बसवणे : अनुकूल मुद्दे - इंजिन थंड ठेवणे सोपे जाईल, गाडींत ज्यास्त लोकांना बसायला जागा मिळेल, इंजिनची दुरुस्ती करणे सोपे जाईल, गाड्यांची टक्कर झाल्यास इंजिन सुरक्षित राहील, पावसाळ्यांत रस्त्यांत पाणी साठले तरी इंजिनांत पाणी शिरणार नाही. प्रतिकूल मुद्दे - कोणालाही सुचतील. त्यावर उपाय - प्रयत्न करून पहा.
२) मोटारगाडीला चौरसाकार चाके : या कल्पनेवरून एडवर्ड् बोनो यांनी आपल्या पुस्तकांत Intelligent Suspension ची संकल्पना मांडली आहे. हे suspension नेहमींच्या वर्तुळाकार चाके असलेल्या मोटरगाडीस वापरल्यास गाडी खडबडीत रस्त्यावरून धावतांनाही आंत बसलेल्यांना आजिबात धक्के जाणवणार नाहीत.

आपण सतर्क राहिल्यास आपल्याला सृजनशीलतेची अनेक उदाहरणे स्वतःच्या व इतरांच्या अनुभवांतून मिळू शकतात. त्याशिवाय साहित्यांत विशेषत: विनोदी लेखन, चातुर्यकथा, बोधवाक्ये यांत व कधीकधी दृक्श्राव्य माध्यमांतील कार्यक्रमांतही सृजनशीलता आढळून येते. अशी काही उदाहरणे पुढील भागांत पाहू.

(क्रमश:)

सृजनशीलता - भाग ८ - मला दिसलेली

(मागील भागावरून पुढे चालू)

मागील भागांत म्हंटल्याप्रमाणे सृजनशीलतेची अनेक उदाहरणे स्वत:च्या व इतरांच्या अनुभवांत तसेच वा़ड्मयांत - विशेषत: विनोदांत व चातुर्यकथांत आढळून येतात. त्यांतील काही उदाहरणे खाली दिली आहेत.

१) सर्वसाधारण माणसांना चाकोरीबद्ध विचार करण्याची संवय असते. याचा (गैर)फायदा घेऊन काही चतुर माणसे इतरांना विशिष्ट विचारशृंखलेंत अडकवून आपल्या अनपेक्षित कृतीने त्यांना चकित करतात.
अ) आग्र्याच्या कैदेंतून सुटण्यासाठी शिवाजी महाराजांनी पहारेकर्‍यांचे विचार पेटार्‍यांभोवती घुटमळत राहतील अशी योजना केली व स्वत: पेटारे वाहून नेणार्‍या भोयाच्या वेषांत सटकले (असे म्हणतात). दुसर्‍या प्रसंगी शाहिस्तेखानाची बोटे कापल्यावर पाठलाग करणार्‍या मोंगल सैन्याला बैलांच्या शिंगांना जळते पलिते बांधून कात्रजच्या घाटांत चकवले होते.
ब) अशाच प्रकारची आणखी एक चातुर्यकथा पहा.
एकदा एका राजपुत्राने आपल्याला तलवारयुद्धाची कला शिकवलेल्या गुरूला द्वंद्वाचे आव्हान दिले. गुरूंनी ते शांतपणे स्वीकारले.
राजाज्ञेप्रमाणे द्वंद्वाचा दिवस ठरला. त्याअगोदर काही दिवस गुरूंनी राज्यांतील लोहाराकडे आपल्या तलवारीसाठी नेहमींच्या चौपट लांबीचे म्यान करायला टाकल्याची बातमी राजपुत्राच्या कानांवर आली. आपल्या गुरूंचा स्वत:च्या लांब तलवारीने लांबूनच आपला पराभव करायचा विचार आहे हे राजपुत्राच्या लक्षांत आले म्हणून त्यानेही लोहाराकडे स्वत:साठी चौपट लांबीची तलवार व तिच्यासाठी म्यान तयार करायला टाकले.
द्वंद्वाच्या दिवशी राज्यांतील सर्वजण ठरलेल्या ठिकाणी गोळा झाले. गुरू व राजपुत्र दोघेही कमरेला लटकणार्‍या लांबलचक तलवारींनिशी हजर झाले. द्वंद्व सुरू होण्याचा इशारा होताच दोघेही तलवार काढू लागले. राजपुत्राला आपली मुद्दाम बनवून घेतलेली चौपट लांबीची तलवार म्यानांतून पूर्ण बाहेर काढता येईना. गुरूंना मात्र आपली तलवार झटकन काढता आली कारण म्यान चौपट लांबीचे होते तरी त्यांत असलेली गुरूंची तलवार नेहमींच्याच लांबीची होती. शेवटी तलवारही काढता न आल्यामुळे राजपुत्राचा पराभव झाला.
२) इतरांच्या सहजासहजी लक्षांत न येणार्‍या तर्कसंगतीचा वापर करून साहित्यांत कधीकधी विनोद निर्माण केला जातो (भाग - १).
अ) चिं.वि.जोशी यांच्या "उन्हाळा आला" या लेखांत एका गप्पिष्ट टोळक्यांतील संभाषण दिले आहे. त्यांत एकजण म्हणतो, 'आपण कोकिळेचा आवाज चांगला व कावळ्याचा आवाज वाईट म्हणतो कारण पूर्वींपासून कवी व लेखकांनी लोकांना ठरवून मूर्ख बनवलय्.' त्यावर दुसरा म्हणतो, 'म्हणजे तुला असं म्हणायचंय का की साहित्यिकांनी लोकांना बनवण्याच्या हेतूने कोकिळेला विनकारण हरभर्‍याच्या झाडावर चढवले?' त्यावर तिसरा विचारतो, 'चढवलं का उतरवलं? कारण कोकिळा आंब्याच्या झाडावर असते आणि हरभर्‍याचं झाड आंब्याच्या झाडापेक्षा ठेंगणं असतं.'
ब) पु.ल.देशपांडे यांनी खानावळीवर लिहिलेल्या लेखांत म्हंटले आहे की, 'अन्न हे पूर्ण ब्रह्म' असं म्हणणारा ऋषि वेदकालीन खानावळीचा मेंबर असावा. खानावळीचं अन्न खाऊन ज्याला ब्रह्म आठवलं नाही असा मेंबर विरळा.
३) विचारार्थ घेतलेल्या गोष्टीचे चित्र मन:चक्षूंसमोर आणण्यामुळे एरवी न सुचणारी कल्पना सुचू शकते (भाग - ६).
अ) इसापाच्या ओझ्याची गोष्ट सर्वांना ठाऊक असेलच.
ब) अशीच आणखी एक गोष्ट पाहू.
एका गावांत भागीदारींत कापसाचा व्यापार करणार्‍या चार व्यापार्‍यांचे गोडाऊन होते. एकदा त्या गोडाऊनमध्ये एक मांजर राहायला आली आणि त्या दिवसापासून त्यांच्या व्यापाराला तेजी आली. म्हणून त्यांनी ती शकुनाची मांजर पाळायचे ठरवले. तिचा खाण्यापिण्याचा खर्च आपसांत वाटून घ्यायचे ठरले व औषधपाण्यासाठी त्यांनी तिच्या शरीराची वाटणी करून घेतली. त्यांत त्यांनी प्रत्येकाच्या वाटणीचा पाय ठरवून टाकला.
एकदा त्या मांजरीच्या एका पायाला अपघात झाला. ज्याच्या वाटणीचा तो पाय होता तो व्यापारी तिला पशुवैद्याकडे घेऊन गेला व आपल्या खर्चाने त्याला बँडेज बांधले. त्या अवस्थेंत ती मांजर तीन पायांवर लंगडत फिरू लगली.
एके दिवशी एका घरासमोर लावलेल्या पणतीच्या बाजूला सरकल्यामुळे तिच्या बँडेजच्या थोड्या सैल झालेल्या टोकाने पेट घेतला. त्याबरोबर मांजर घाबरली व पटकन् आपल्या सुरक्षित घरांत अर्थात् गोडाऊनमधे गेली. पायाला लागलेली आग आंतील कापसाला लागली व सर्व कापूस माजरीसह जळून खाक झाला.
ज्या पायाच्या बँडेजमुळे आग लागली होती त्या पायाच्या मालकाला इतरांनी जबाबदार धरले व त्याच्याकडे नुकसानभरपाईची मागणी केली. पण दुखावलेल्या पायाच्या मालकाला ते मान्य झाले नाही व तो कोर्टांत गेला.
झालेल्या घटनेवर विचार करून कोर्टाने निर्णय दिला की दुखावलेल्या पायाच्या बँडेजला लागलेल्या आगीमुळे कापूस जळला असला तरी बँडेजला आग गोडाऊन बाहेर लागली होती. या बाहेर लागलेल्या आगीला गोडाऊनमधे नेण्याचे काम बाकीच्या तीन पायांनी केले कारण मांजर दुखावलेल्या पायाने चालू शकत नव्हती. म्हणून नुकसानाची जबाबदारी चांगल्या पायांचे मालक असलेल्यांवर आहे. त्यांनीच सर्व नुकसान सोसायला पाहिजे.
४) इच्छानुवर्ती विचार (wishful thinking) :
अ) एक लघु उद्योजक डीझेलवर चालणार्‍या विद्युत्जनित्रांसाठी विद्युत्दाब नियामक उपकरणे बनवीत असत. ही उपकरणे स्वत:ची विद्युत् जनित्रे असणार्‍या साखर कारखान्यांना लागतात. सदर उद्योजक ऑर्डर मिळवण्यासाठी अशाच एका कारखान्यांत गेले. त्यांत चार वेगवेगळ्या क्षमतेची जनित्रे होती. नियामकाचे डिझाइन् ज्या जनित्रासाठी ते वापरायचे त्याच्या क्षमतेवर अवलंबून असल्यामुळे सदर गृहस्थांनी कारखान्याच्या व्यवस्थापनाला प्रत्येक जनित्रासाठी दोन (एक वापरांत व तो बिघडल्यास काम अडू नये म्हणून एक ज्यास्तीचा) नियामक घ्या असे सुचवले. त्यावर व्यवस्थापनाने त्यांना, कुठल्याही मशीनवर लावता येईल असे उपकरण (wishful thinking) दिलेत तर आम्हाला ज्यास्तीचा एक नग ठेवला तरी पुरे होईल कारण सर्व नियामक काही एकदम बिघडणार नाहीत, असे सांगितले. याचा अर्थ कारखान्याला आठाऐवजी पाचच नग घेऊन चालले असते. जनित्राच्या क्षमतेप्रमाणे उपकरणाच्या आकारांत होणारा बदल त्यांतील काही घटकांच्या बदलणार्‍या क्षमतेमुळे होता, हे लक्षांत घेऊन सदर उद्योजकाने असे घटक ज्यास्तींत ज्यास्त क्षमतेचे घेऊन त्यावर हवी तितकी क्षमता निवडण्याची सोय (tapping) करण्याचा मार्ग काढला व व्यवस्थापनाची सूचना मान्य केली. त्यामुळे प्रतिनग किंमत थोडी वाढत होती. पण आठाऐवजी पाचच नग पुरत असल्यामुळे गिर्‍हाइकाचा त्यांत फायदा होता. त्या उद्योजकाला पाच नगांची ऑर्डर मिळाली.
ब) एका कंजूष व्यापार्‍याने मरणासन्न असतांना मरणोत्तर आपल्याला चांगली गति मिळावी म्हणून एका ब्राह्मणाच्या सांगण्यावरून आपल्या मृत्यूनंतर आपला घोडा विकून जी किंमत येईल ती ब्राह्मणाला दान करावी अशी इच्छा व्यक्त केली. त्याच्या मृत्यूनंतर ती अखेरची इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी त्याच्या बायकोवर येऊन पडली. तिची घोड्याच्या किंमतीएवढी मोठी रक्कम - जी त्याकाळी १०० रुपये होती - दान करण्याची बिलकुल इच्छा नव्हती. पण ती नवर्‍याला तसे वचन देऊन बसली होती. काही दिवसांनी लोकांकडून व ब्राह्मणाकडून सारखी विचारणा होऊ लागल्यावर नवर्‍याची इच्छा पूर्ण करण्यासाठी ती घोड्याला विकायला बाजारांत घेऊन गेली. त्याच्या गळ्यांत लावलेल्या पाटीवर तिने घोड्याची किंमत १ रुपया अशी लिहिली. इतक्या स्वस्तांत घोडा मिळ्तोय् हे पाहिल्यावर अनेक गिर्‍हाइके चौकशीला आली. आलेल्या प्रत्येक गिर्‍हाइकाला ती आपल्या हातांतील मांजर दाखवून सांगे, ' जो माझी ही मांजर ९९ रुपयांना घेईल त्यालाच घोडा १ रुपयाला मिळेल'. तसाही घोडा १०० रुपयांना वाईट नव्हता म्हणून एक गिर्‍हाइक तयार झाले. व्यापार्‍याच्या बायकोने घोडा विकून आलेला एक रुपया ब्राह्मणाला दान केला.

वरीलप्रमाणे अजून कित्येक उदाहरणे आहेत. पण हा भाग अगोदरच फार लांबल्याने आवरता घेतो.

आत्तापर्यंत आपण वैयक्तिक पातळीवरील सृजनशीलतेविषयी पाहिले. एखादा गट किंवा समूह एकत्रितपणे सृजनशील कसा होऊ शकतो ते पुढील भागांत पाहू.

(क्रमश:)

सृजनशीलता - भाग ९ - सामूहिक पातळीवर

(मागील भागावरून पुढे चालू)

आत्तापर्यंत आपण वैयक्तिक सृजनशीलतेबद्दल पाहिले. आता गटाच्या किंवा समूहाच्या एकत्रित सृजनशीलतेबद्दल पाहू.

तसे पाहिले तर व्यक्तीच्या तुलनेंत गटाची किंवा समूहाची सृजनशीलता कितीतरी अधिक असायला पाहिजे. कारण गटांत जितकी माणसे तितके डावे मेंदू व उजवे मेंदू उपलब्ध असतात ज्यामुळे कल्पना व पर्याय खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण होऊ शकतात व कल्पना व्यवहार्य बनवण्यासाठी सर्वांचा विविध प्रकारचा व्यावहारिक अनुभवही हाताशी असतो. तरी देखील गटांतील सभासदांना योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण नसेल तर त्याचा फायदा करून घेणे शक्य होत नाही. असे का होते?

भाग - ३ मध्ये म्हंटल्याप्रमाणे व्यक्तीच्या बाबतींतही नवीन पर्याय/कल्पना डाव्या मेंदूकडून 'अव्यवहार्य' म्हणून झिडकारली जाते. गटामध्ये पर्याय/कल्पना मांडणार्‍याच्या डाव्या मेंदूबरोबर इतरांचेही डावे मेंदू कार्यरत असतात. त्यामुळे एकामागून एक कल्पना झिडकारण्याचे प्रमाणही वाढते व कल्पना निर्माण करण्याचे कार्य बंद पडण्याची शक्यता असते. सृजनशीलतेंत हा एक मोठा अडसर ठरतो.

यावर उपाय शोधण्यासाठी आपण शारीरिक श्रमांचे उदाहरण घेऊ.

ज्या कामासाठी एका माणसाची ताकद पुरेशी नसते त्यासाठी आपण एकापेक्षा ज्यास्त माणसे लावतो. समजा, एखादी अवजड गोष्ट एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी हलवायची आहे आणि त्यासाठी आवश्यक असलेली पाच माणसे आपण लावली आहेत. ह्या माणसांनी आपली ताकद वेगवेगळ्या दिशांनी लावली तर परिणमत: एकाच्या विरोधांत बाकीच्यांची ताकद लागल्यामुळे ती वस्तू जागची हलणार नाही. म्हणजे सर्वांनी आपली ताकद एकाच दिशेने लावणे गरजेचे आहे. तसेच प्रत्येकाने एकाच दिशेने लावलेली ताकद वेगवेगळ्या वेळी लावली तरीही वस्तू जागची हलणार नाही. याचा अर्थ वस्तू हलवायची असेल तर सर्वांची ताकद एकाच वेळेला व एकाच दिशेने लागणे आवश्यक आहे.

सृजनशीलतेसाठी लागणार्‍या वैचारिक श्रमांचेही असेच आहे. भाग - ३ व भाग - ४ मध्ये म्हंटल्याप्रमाणे हे वैचारिक श्रम प्रामुख्याने पर्याय शोधणे, त्यांच्या मूल्यमापनासाठी अनुकूल व प्रतिकूल मुद्दे पाहणे व पर्याय व्यवहार्य करण्यासाठी प्रतिकूल मुद्द्यांवर व्यावहारिक उपाय शोधून कृतीचा आराखडा बनवणे यांसाठी लागतात. गटांत होणार्‍या चर्चेंत वाद-प्रतिवाद होत असल्यामुळे गटांतील सदस्यांचे बरेचसे वैचारिक श्रम एकमेकांच्या कल्पना हाणून पाडण्यांत खर्च होतात. पण गटांतील सर्वांनी ठरवून एका वेळी एका ठराविक दिशेने विचार केल्यास गटाचे वैचारिक श्रम अधिक फलदायी होतात. या पद्धतीला एडवर्ड् बोनो यांनी समांतर विचार पद्धति (Parallel Thinking) असे नाव दिले आहे. त्याचा वापर करण्यासाठी त्यांनी Six Thinking Hats नावाचे चर्चा-तंत्र विकसित केले आहे. त्यावर त्यांचे एक वेगळे पुस्तकही आहे. त्याची तपशीलवार माहिती द्यायची म्हंटले तर स्वतंत्र लेखमाला लागेल.

तथापि काही ठिकाणी समांतर विचार पद्धति ढोबळ स्वरुपांत कशी अमलांत आणली जाते ते पाहू.

आपल्याकडे आधुनिक व्यवस्थापन असलेल्या काही औद्योगिक संस्थांमधून गुणवत्ता मंडळे (Quality Circles) असतात. गुणवत्ता मंडळ म्हणजे एकाच खात्यांत एकाच ठिकाणी किंवा एकाच कार्यशाळेंत काम करणार्‍या आठ-दहा लोकांचे मंडळ असते. त्याचे उद्दिष्ट आपल्या खात्याच्या कामांतील समस्या सोडवणे व त्याची कार्यक्षमता वाढवणे हे असते. त्यासाठी या मंडळाच्या ठराविक मुदतीच्या अंतराने बैठका होतात. या बैठकांमध्ये ठराविक वेळ हाती घेतलेल्या समस्येच्या उकलीचे वेगवेगळे पर्याय सुचवण्यासाठी ठेवलेला असतो. त्यांत प्रत्येक सदस्याने त्याचा पर्याय मांडावा अशी अपेक्षा असते. एखादा सदस्य पर्याय मांडत असतांना दुसर्‍या सदस्यांनी त्याला अडवायचे नाही व सर्वांचे पर्याय मांडणे संपेपर्यंत कोणत्याही पर्यायावर टीकाटिप्पणी करायची नाही हा नियम असतो (रोको मत, टोको मत). तसे होतांना दिसले तर टीका करणार्‍याला इतर सदस्य नियमाची आठवण करून देतात. सर्व पर्यायांची लिखित नोंद ठेवली जाते. याला Brain Storming Sessionअसे म्हणतात.
जो पर्याय पुढील विचारासाठी घेतला जातो त्याला अनुकूल मुद्दे मांडतांनाही प्रत्येकाने फक्त अनुकूल मुद्देच मांडायचे असतात. इतर काही बोलायचे नाही हा नियम असतो. त्यामुळे अनुकूल मुद्दे मोठ्या संख्येने पुढे येतात.
प्रतिकूल मुद्दे मांडतांना प्रत्येकाने फक्त प्रतिकूलच बोलायचे हा नियम असतो. एखादा सदस्य आपल्याच पर्यायाच्या विरोधांतही बोलू शकतो. सर्वांना फक्त प्रतिकूल बोलण्याची सूचना असते. त्यामुळे प्रतिकूल मुद्देही मोठ्या संख्येने पुढे येतात.
अशा तर्‍हेने सर्वांचे वैचारिक श्रम एका वेळी एकाच दिशेने (एकाच प्रकारच्या विचार पद्धतींत) लागत असल्यामुळे गटांतील सदस्यांच्या संख्येचा फायदा मिळून निर्णय अधिक अचूक व परिपूर्ण होऊ शकतो.
वरील समांतर विचार पद्धति औद्योगिक संस्थांतच उपयोगी आहे असे नाही. कुटुंबांतही एखादा महत्वाचा निर्णय घेण्यासाठी कुटुंब सदस्यांचा गट वरील नियम पाळून या पद्धतीचा वापर करू शकतो.
समांतर विचार पद्धतीचा मुख्य फायदा म्हणजे चर्चेचा वेळ एकदम कमी होतो. बोनो यांनी Six Thinking Hats च्या प्रस्तावनेंत म्हंटल्याप्रमाणे ABB, IBM, यांसारख्या अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या महत्वाचे निर्णय घेतांना समांतर विचार पद्धतीवर आधारित Six Thinking Hats तंत्राचा अवलंब करीत आहेत. त्यामुळे ABB च्या बाबतींत आंतरराष्ट्रीय प्रकल्पांवरील चर्चेचा कालावधी तीस दिवसांवरून दोन दिवसांवर आला आहे तर IBMच्या बाबतींत meetingsचा वेळ एक चतुर्थांश झाला आहे असा बोनो यांचा दावा आहे.

सृजनशीलतेविषयी उरले सुरले मुद्दे पुढील भागांत पाहू.

(क्रमश:)

सृजनशीलता - भाग १० - पूर्णाहुती

(मागील भागावरून पुढे चालू)

काही किरकोळ मुद्दे :
१) चुकांमधून नवनिर्मिति: संगणक चूक करू शकत नाही. पण मानवी मेंदूंत चुका करण्याची "क्षमता" असते, या क्षमतेमुळे काही क्रांतिकारक शोध लागले आहेत, असे Edward Bono यांनी म्हंटले आहे. त्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी आपल्या Serious Creativity त खालील उदाहरणे दिली आहेत :
क) लुई पाश्चरच्या सहाय्यकाने प्रयोगासाठी घेतलेल्या कोंबड्यांना कॉलर्‍याच्या जंतूंचा चुकून ठरलेल्या डोसापेक्षा Weak Dose दिला. ती चूक सुधारण्यासाठी नंतर ठरलेला Strong Dose दिला पण त्याचा इच्छित परिणाम झाला नाही. त्यावरून Immunology च्या प्रक्रियेचा शोध लागला.
ख) कोलंबस (पृथ्वी गोल आहे हे माहीत असल्यामुळे) पश्चिमेकडून भारताला यायला निघाला. त्यावेळी त्याने Ptolemy चे पृथ्वीच्या परीघाचे चुकीचे मोजमाप हिशेबांत घेतले. त्याऐवजी जर त्याने Ptolemy अगोदरच्या Eratosthenes ने दिलेले खरे मोजमाप घेतले असते (जे Ptolemy ने दिलेल्या मोजमापापेक्षा बरेच ज्यास्त होते) तर तो सफरीवर निघालाच नसता. कारण जहाजांत तेवढ्या अंतरासाठी खाण्यापिण्याची तरतूद करणे शक्य नाही हे त्याच्या लक्षांत आले असते. या चुकीचा परिणाम अमेरिकेचा शोध लागण्यांत झाला.
ग) संपूर्ण Electronic उद्योग हा Lee de Forrest ने प्रयोग शाळेंतील एका निरीक्षणाचा चुकीचा अर्थ लावल्यामुळे उदयाला आला. (याबद्दलची तपशीलवार माहिती वरील संदर्भांत दिली आहे. तिचे सुलभ भाषांतर करणे अवघड आहे - निदान मला तरी).
२) सृजनशीलता - नसता उपद्व्याप? नाही. सृजनशीलतेची काही तंत्रे वापरून नेहमींच्या पद्धतीने न सुटणार्‍या समस्या सुटू शकतात. शिवाय आजकाल सर्वच क्षेत्रांत स्पर्धा इतकी वाढली आहे की चाकोरीबाहेरचा विचार केल्याशिवाय स्पर्धेंत टिकून राहणे अशक्य आहे.
३) आपल्यांतील निद्रिस्त सृजनशीलतेला जागृत करण्यासाठी काही उपयुक्त संवयी:
क) स्वत:च्या सृजनशीलतेच्या अकल्पित रीत्या आलेल्या अनुभवांची दैनंदिनी ठेवावी. त्यांत अनुभवाचा संपूर्ण तपशील लिहावा. हे अनुभव जसजसे साठत जातील तसतसा स्वत:च्या सृजनशीलतेविषयी आत्मविश्वास वाढत जाईल. त्यांचे विश्लेषण करून कोणत्या परिस्थितींत व कोणत्या कारणांमुळे किंवा Random Input मुळे आपल्यांतील ही शक्ति जागृत होते याचा शोध लागेल.
ख) इतरांच्या सृजनशीलतेला प्रामाणिकपणे दाद द्या. त्यामुळे तुमच्याविषयी त्यांचे मत चांगले होईल व त्यांना उत्तेजन मिळून त्यांच्याकडून अधिकाधिक निर्मिति तुमच्यापुढे सादर होईल. सहसंवेदनामुळे तुमच्याकडूनही निर्मिति होऊ लागेल.
ग) चित्रपट, साहित्यिक कलाकृति, विनोद, बोधवाक्ये, यांत आढळणार्‍या सृजनशीलतेची जमेल तितकी नोंद ठेवा व त्यांचा गप्पांमध्ये वापर करा. त्यामुळे गप्पाष्टकांत तुमचे स्वागत होईल. त्यांतून नवनिर्मितीसाठी तुम्हाला भरपूर सामुग्री मिळेल. (बहुतेक साहित्यिक कलाकार गप्पिष्ट होते).

असो. आता लेखमालेच्या लिखाणाविषयी थोडेसे :

प्रथम हा विषय (वाचकांची सहनशीलता लक्षांत घेऊन) प्रत्येकी साडेतीनशे ते चारशे शब्दांच्या चार भागांत संपवायचा विचार होता. पण काही ठिकाणी ज्यास्त तपशील व प्रत्येक भागांतील वैचारिक सलगता कायम ठेवणे आवश्यक वाटल्यामुळे पहिल्या दोन भागांनंतर ही शब्दमर्यादा पाळणे शक्य झाले नाही. तरीदेखील लेखमाला आवर्जून वाचणार्‍या उपक्रमींचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. प्रतिसाद अतिशय उत्साहवर्धक होते. पण त्यामुळे प्रत्येक नवीन भाग लिहितांना अगोदरच्या प्रतिसादांतील प्रशंसेमुळे लिहायला घेतलेला भाग चांगला उतरायला हवा असे दडपणही येत होते. एकूण लेखमाला वाचनीय झाली असेल तर ती मुख्यत: या दडपणामुळे.

लिखाण करतांना उपयोगी पडलेले संदर्भ:
१) Lateral Thinking by Edward Bono
२) Serious Creativity by Edward Bono
३) क्वॉलिटी सर्कल् - ले. चन्द्रशेखर बुलाख, पुणे विभागीय उत्पादकता मंडळ.
४) मराठींतील विनोदी साहित्य, चांदोबा व पाठ्यपुस्तकांतील कथा, इत्यादि.

समाप्त