शब्द हवे आहेत!

एखादे शब्दकोडे सोडवताना किंवा काही लिहीत असताना कधी कधी नेमके शब्द आठवत नाहीत. "अरे आता जीभेच्या टोकावर होता ... " अशी अवस्था होते बर्‍याचदा. "समूहाची एकूण बुद्धिमत्ता एकेका व्यक्तीपेक्षा जास्त असते" असे म्हणतात ते जर खरे असेल (म्हणजे आहेच हो!) तर सामुहिक प्रयत्नाने हे शब्द सापडतात का पाहावे म्हणून ही चर्चा. आपल्याला अडलेले शब्द (कोणत्याही भाषेतील) इथे द्यावेत आणि इतरांना अडलेल्या शब्दांविषयी आपल्याला काही ठाऊक असेल तर इथे सांगावे असे स्वरूप ठेऊ.

सुरूवात म्हणून काही शब्दप्रश्न (?) विचारतो.

१. साप्ताहिक सकाळच्या नव्या अंकातले शब्दकोडे सोडवताना अडलेला शब्द "कोरडी भिक्षा मागणे या क्रियेला तीन अक्षरी शब्द" पुन्हा त्याच कोड्यात वरील शब्दाला तीन अक्षरी प्रतिशब्द विचारला आहे. म्हणजे "कोरडी भिक्षा मागणे" या अर्थाचे तीन अक्षरी दोन शब्द हवेत.

२. अँबिडेक्स्ट्रस, म्हणजे जो दोन्ही हात (डावे व उजवे) सारख्याच कौशल्याने वापरू शकतो त्याला संस्कृतात/मराठीत एक शब्द आहे. (मला एकेकाळी माहीत होता पण आता विसरलो आहे :प) तो कोणता?

लेखनविषय: दुवे:

Comments

सव्यसाची

२. अँबिडेक्स्ट्रस, म्हणजे जो दोन्ही हात (डावे व उजवे) सारख्याच कौशल्याने वापरू शकतो त्याला संस्कृतात/मराठीत एक शब्द आहे. (मला एकेकाळी माहीत होता पण आता विसरलो आहे :प) तो कोणता?

मला वाटतं सव्यसाची. अर्जुन दोन्ही हातांनी धनुष्य बाण चालवण्यात प्रवीण होता. त्याला सव्यसाची म्हटले जाते.

सव्यसाची, धन्यवाद!

सव्यसाची हाच तो शब्द, धन्यवाद!

कोरडी भिक्षा

कोरडी भिक्षा-शिधा, अपक्व, अपाका, आमान्‍न. परंतु 'कोरडी भिक्षा मागणे 'याला एक शब्द सांगणे कठीण आहे. उत्तर समजल्यावर जरूर कळवा.
मराठीत 'निर्लेप' असा एक शब्द आहे, अर्थ पाण्यात न शिजवलेले (पण दुधात किंवा उसाच्या रसात शिजवलेले) अन्‍न .

दोन्ही हात सफाईने वापरणारा:-सव्यसाचिन्‌, उभयसाचिन्‌ --वाचक्‍नवी

शिधा

शिधा हा शब्द सहसा रेशन या अर्थी वापरला जातो असं वाटतं. तो भिक्षा या अर्थीही वापरला जातो का? पण एक खरं की शिधा म्हणजे सहसा न शिजवलेले अन्न किंवा कोरडे अन्न.

शिधा आणि शिदोरी

दोन्ही शब्द सिद्ध(=तयार, बनविलेले) या संस्कृत शब्दापासून झाले, पण अर्थ उलटसुलट. पहिल्याचा शिजवण्यासाठी तयार ठेवलेले किंवा भिक्षा (दान) म्हणून द्यावयाचे कोरडे अन्‍न. सरकारने ठरवलेल्या नियंत्रित दरात मिळणारे रेशनचे धान्य कोरडेच असते. म्हणून ते विकणार्‍या दुकानाला शिधा वाटप केन्द्र म्हणत असले पाहिजेत.
दुसरा शब्द शिदोरी. म्हणजे शिजवलेले अन्‍न. हे फडक्यात ठेवून दोरीने बांधतात आणि प्रवासासाठी घेऊन जातात. चातुर्मासात स्त्रिया शिजविलेल्या अन्‍नाचे जे ताट ब्राह्मणांना देतात, त्यालापण शिदोरी म्हणतात.-वाचक्‍नवी

साप्ताहिक सकाळ, फिटनेस विशेषांक

>> परंतु 'कोरडी भिक्षा मागणे 'याला एक शब्द सांगणे कठीण आहे. उत्तर समजल्यावर जरूर कळवा.

हे शब्दकोडे साप्ताहिक सकाळच्या फिटनेस विशेषांकात आहे. पुढच्या अंकात उत्तर येईल ते पाहून कळवतो. पूर्वी साप्ताहिक सकाळची स्वतःची साइट होती असे आठवतेय, पण आता खूप शोध घेऊनही दिसत नाही :(

निर्लेप

निर्लेप - ज्यावर दुसरा लेप राहत नाही असा तो.

निर्लेप म्हणजे टेफलॉनचा लेप दिलेला, ज्याने तव्यावर पाककलेचा ठसा उमटत नाही असा तवा असे तो समजत असे.

काही उलटे प्रश्न

१. संप्रेषण या शब्दाचा नेमका अर्थ काय ?

२. परात्मभाव हा शब्द मी समीक्षेत वाचलाय्. "एलियनेशन" या अर्थाने तो वापरलेला दिसतो. हा अर्थ बरोबर् आहे का ? याशिवाय दुसरा कुठला अर्थ त्याला (अन्य संदर्भात ) आहे का ?

संप्रेषण?

एलियनेशन ला सोपे प्रतिशब्द- दुजाभाव, आपपरभाव, फारकत.
संप्रेषण कधी ऐकला नाही, पण ढोबळ अर्थ एकत्र करून पाठवणे. (ब्रॉडबॅन्ड ट्रान्स्मिशन ला चालेल?). संस्कृतमध्ये सम्प्रैष: असा शब्द आहे. अर्थ- आज्ञागमन, हुकमानुसार जाणे. त्यामुळे संप्रेषण चा अर्थ ऑर्डर्ली ट्रान्स्मिशन असा होऊ शकेल.--वाचक्‍नवी

परात्मभाव

"परात्मभाव" सकृतदर्शनी तरी "आपपरभावा"चा समानार्थी वाटतो आहे. "पर-आत्म-भाव", "आत्म(आप)-पर-भाव".

जोगवा?

पहिल्या प्रश्नाचे उत्तर म्हणून डोक्यात पटकन 'जोगवा' हा शब्द आला. कितपत बरोबर आहे ते ठाऊक नाही, कारण हा शब्द बहुधा केवळ देवीच्या नावाने मागितलेल्या भिक्षेसाठी राखीव असावा.

परात्मभाव शब्दभांडारात सापडला - अस्तित्ववादाच्या संदर्भात. त्यावरून गूगलले असता हा दुवा मिळाला. त्यात दिलेल्या एलिअनेशनच्या व्याख्येला अनुसरून मराठीत 'परात्मभाव' वापरला आहे का? [पर+आत्मभाव = परक्याच्या ठिकाणी जाणवणारी स्वतःची ओळख किंवा ज्याला एम्पथी म्हणतात तसे असण्याची कितपत शक्यता आहे?]

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
(http://marathisahitya.blogspot.com)

जोगवा? छे!

जोगवा शब्द संस्कृत योगेश्वरीवरून आला. अर्थात त्याचा संबंध देवीशी आहे. पुन्हा जोगवा हे नाम आहे, आपल्याला कोरडी भिक्षा मागणे ह्याला एक शब्द हवा, म्हणजे णे-कारान्त धातूतरी हवा किंवा धातुसाधित नाम.
दुव्यात एलियनेशन साठी संन्यास(रिक्ल्यूशन, रिनन्सिएशन), निवृत्ती , परकेपणा किंवा समाजापासून फटकून राहण्याची प्रवृत्ती, फकिरी वृत्ती हे अर्थ दिसताहेत. याच्याशी वर दिलेले दुजाभाव, फ़ारकत हे अर्थ जुळतात. परात्मभाव असा अर्थ असेलसे वाटत नाही. --वाचक्‍नवी

शब्दज्ञान

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. वाचक्नवी यांचे शब्दज्ञान अफाट आहे. त्यांच्याकडे सर्व संदर्भ सदैव सिद्ध असतात असे दिसते.श्री.वाचक्नवी यांनी शब्दांविषयीं लिहिलेले सर्वकाही विश्वासार्ह असते असे मला वाटते.

सहमत आहे

यनावालांशी शब्दशः सहमत आहे!

भलतेच!

माझ्यापेक्षा अधिक शब्दज्ञान असलेले अनेकजण उपक्रमावर आहेत. मला शब्दांविषयी प्रेम आहे, असे फारतर म्हणता येईल. साहित्याची आणि ज्ञानाची अनेक क्षेत्रे अशी आहेत की त्यांत वापरणार्‍या शब्दांबद्दल मला ढिम्म समजते. त्यामुळे मी काहीही लिहिले तर ते बरोबर असेलच असा ग्रह कुणी करून घेऊ नये!--वाचक्‍नवी

माझे प्रश्न

चर्चेच्या अनुषंगाने माझे प्रश्न.
बर्‍याचदा काही शब्दांना 'अधि' व 'परि' असे prefix लावले जाते. यामागे काय लॉजिक आहे?
उदा. अधि़क्षेत्र, परिमंडळ, परियोजना, इत्यादी.
शासकीय व्यवहारात या शब्दांचा (prefix) प्रामुख्याने वापर होतो.
जयेश

अधि, परि इत्यादी

हे दोन्ही संस्कृत उपसर्ग. असे एकूण २२ उपसर्ग आहेत. उपसर्गामुळे धातूंचे अर्थ बदलतात.

उपसर्गेण धात्वर्थो बलात्‌ अन्यत्र नीयते। प्रहाराहारसंहारविहारपरिहारवत्‌ । किंवा,
धात्वर्थम्‌‌ बाधते कश्चित्कश्चित्तमनुवर्तते । तमेव विशिनष्ट्यन्य उपसर्गगतिस्त्रिधा॥

शब्दाच्या अगोदर लागणारे हे उपसर्ग संस्कृत धातू किंवा धातुसाधित शब्दांचे अर्थ सुधारतात, प्रखर करतात, पूर्णपणे बदलतात किंवा कधीकधी तसेच ठेवतात.
ढोबळ अर्थाने अधि म्हणजे जास्त किंवा वरचा. अधिकारी -जास्त किंवा वरच्या दर्जाचे काम करणारा.. अधिभोजन--जास्त जेवण. अधिक्षेत्र-अधिकाराखालचे क्षेत्र. वगैरे.
परि म्हणे बहुधा सभोवार, पूर्ण, अति, अदमासे वगैरे.. परिक्षेत्र- भोवतालचे क्षेत्र. परिमंडल--तसेच. परिसीमा--अतिसीमा. इ.इ.
--वाचक्‍नवी

"आशुतोष" व "आशुलिपी"

मला कधीकधी सरकारी मराठी शब्दांबद्दल तिटकारा येतो. खासकरून मुद्दाम बनविलेल्या मराठी शब्दांचा. सरकारी मराठी शब्दाचा मूळ इंग्रजी शब्द काय असावा हा प्रश्न मला नेहमी पडायचा व अजूनही पडतो.

"आशुलिपी" हा शब्द मी प्रथम ऐकला तेव्हा मला त्याचा अर्थ काय असा प्रश्न पडला. सावकाशीने जेव्हा "short hand"म्हणजे "आशुलिपी" हे कळले तेव्हा हा शब्द कसा तयार झाला असावा असा प्रश्न मला पडला. बरेच दिवस काही उत्तर सापडेना, मला चैन पडेना. अचानक एके दिवशी "आशुतोष" हे शंकराचे नाव आहे असे मला समजले. हे नाव असे का याला उत्तर सापडेना. या दोन शब्दांचा कहीतरी संबंध असावा असे वाटत होते पण काही तर्क करता येत नव्हता. माझी आई संस्कृतची निवृत्त शिक्षिका आहे, तिला मी आशुतोष ची व्युत्पत्ती विचारली तेव्हा कळले की "आशु" म्हणजे चटकन. चटकन प्रसन्न होणारा तो "आशुतोष"म्हणजे शंकर. मला चटकन "आशुलिपी" ची व्युत्पत्ती समजली. मी मनोमन हा शब्द बनविणा-याला शतशः प्रणाम केले.

ही व्युत्पत्ती आपल्या पर्यंत पोचविण्यासाठी हा प्रपंच.
नितीन

शीघ्र

या अर्थामुळेच आशुलिपीला शीघ्रलिपीसुद्धा म्हणतात. पण आशुलिपी अधिक सोपा शब्द. आखूड हात असे भाषांतर न करण्याबद्दल शब्दनिर्मात्याला धन्यवाद!--वाचक्‍नवी

इंग्रजी

मला माझ्या इंग्रजी माध्यमातील मुलाने प्रश्न विचारला "बाबा, "English" ला मराठीत इंग्रजी का म्हणतात?" खरच कोणी सांगेल काय?

सरकारी मराठी वरून सरकारी हिंदी आठवली. एकदा गोरखपूर रेल्वे स्थानकावर एक चौकी पाहिली. त्यावर सरकारी हिंदी पाटी होती "परिवेदना केंद्र". डोक्याला अनेक वेदना देऊन सुध्दा हे भाषांतर कश्याचे असावे याचा अंदाज बांधता येइना. त्या चौकीच्या पलीकडल्या बाजूस पाटी होती "Grievances Center". या भाषांतराची व्युत्पत्ती कोणी सांगू शकेल काय?
नितीन

इंग्लिश/इंग्रजी

इंग्रजी हे अंग्रेजी या हिंदी शब्दाचे धेडगुजरी मराठीकरण आहे. इंग्लिश हे विशेषनाम आहे. विशेषनामाचे भाषांतर शक्यतोवर करू नये असे म्हणतात. त्यामुळे इंग्लिश हेच बरोबर.

इंग्लिश ला इंग्रजी म्हणणे म्हणजे कर्नाटकातील कन्नड या भाषेला कर्नाटकी किंवा कन्नडिगी असे म्हटल्यासारखे वाटते.

-- आजानुकर्ण

'इंग्रजी' का नको?

'इंग्रजी' हा शब्द बरीच वर्षे प्रचारात असल्याने तो बरोबर की चूक हा प्रश्न गैरलागू ठरतो तरीही "इंग्रजांची भाषा ती इंग्रजी" अशी सोपी व्युत्पत्ती आहे. विशेषनाम असले तरी त्याने फारसा फरक पडू नये. युके/ब्रिटन, जर्मनी/डेउश्लँड (उच्चार चुकीचा असल्यास कृपया सुधारा), सारखे इंग्लिश/इंग्रजी असे दोन्ही शब्द प्रचारात राहिले तरी चालण्यासारखे आहे.

बरोबर असावे

इंग्रेज / इंग्रज हा शब्द पोर्तुगिजातून मराठीत आला. तो चांगला रुळला असल्यामुळे तो घालवायची तातडीची गरज नाही. आजकाल पुष्कळ लोक "इंग्लिश" असेच म्हणतात. त्यामुळे आपोआप हा बदल होण्याची शक्यता आहे, आणि मग "इंग्रजी" शब्द कालबाह्य होईल.

इंग्‍लिश आणि कानडी

इंग्‍लिश हे विशेष नाम आहे हे खरेच पण ते विशेषणसुद्धा आहे. अर्थात दोनही प्रकारात त्यातला ई कॅपिटल काढतात. इंग्‍लिश हे जेव्हा क्रियापद असते तेव्हा साहजिकच ई कॅपिटल नसतो.
>>इंग्रजी हे अंग्रेजी या हिंदी शब्दाचे धेडगुजरी मराठीकरण आहे. <<
हे मात्र पटण्यासारखे नाही. अंग्रेज हा शब्द पोर्तुगीजमधून हिन्दीत गेला तसाच तो 'इंग्रज 'बनून मराठीत आला, हे श्री. धनंजयांनी लिहिलेच आहे. जपान्यांची भाषा ती जपानी, तसेच इंग्रजांची इंग्रजी. बोलताना शहरी लोक 'इंग्‍लिश' म्हणत असतील पण ग्रामीण भागात आणि एकंदर लिखाणात इंग्रजी हाच शब्द अजून तरी आहे. आणि तो जाण्याची शक्यता कमीच!
>> विशेषनामाचे भाषांतर शक्यतोवर करू नये असे म्हणतात. त्यामुळे इंग्लिश हेच बरोबर.<<
यात शक्यतो लिहिले हे योग्यच केले. विशेष नामांची अनेकदा भाषांतरे होतात. निप्पॉनचे जपान , डॉइच्‌चे जर्मन, जीजस क्राइस्टचे येशू ख्रिस्त किंवा ईसा मसीहा वगैरे. जर्मनीला संस्कृतमध्ये शार्मण्यदेश असे नाव आहे.
>>इंग्लिश ला इंग्रजी म्हणणे म्हणजे कर्नाटकातील कन्नड या भाषेला कर्नाटकी किंवा कन्नडिगी असे म्हटल्यासारखे वाटते. <<
आपण कन्‍नडला कानडी म्हणतोच. इतर भाषेत आणखी काही म्हणत असतील.
जर्मन भाषेत sch(श्‌), tsch(च्‌), dtsch(ज्‌), ach-och-uch(ख़), ich-ig(इश़) असे उच्चार होतात. त्याप्रमाणे Deutschचा उच्चार डॉइच्‌ व्हावा, म्हणून डॉइच्‌लॅन्ड हे खरे उच्चारण असावे. (चू.भू.द्या.घ्या.)---वाचक्‍नवी

परिवेदना?

परिवेदन म्हणजे ज्येष्ठ बंधूच्या अगोदर कनिष्ठाचे लग्न होणे . हेच Grievanceचे कारण असेल तर गोष्ट वेगळी. परंतु मला वाटते, हा शब्द चुकीचा रंगवलेला असेल किंवा चुकीचा वाचला गेला असेल . परिदेवन/परिदेवना म्हणजे दु:ख, शोक वगैरे. परि+दू(४ आ) या संस्कृत धातूपासून झालेला शब्द. परिदेवना-कारण म्हणजे दु:खाचे कारण, तक्रार; अन्याय, अर्थात ग्रीव्हन्स. --वाचक्‍नवी

साक्षात्कार!

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
असेच एकदा केंद्र सरकारच्या एका कार्यालयात गेलो होतो तेव्हा एका अधिकार्‍याच्या कक्षाच्या दारावरची पाटी पाहिली.
"साक्षात्कारका समय.... अमूक अमूक"
हा "साक्षात्कार" काय असतो हे बराच वेळ कळेना. नंतर कळले की "भेटीची वेळ"
आम्हाला साक्षात्कार म्हटले की "बोधिवृक्षाखाली सिद्धार्थाला(बुद्धाला) झालेला साक्षात्कार" अथवा "न्युटनला सफरचंदाच्या झाडाखाली झालेला साक्षात्कार" च आठवतो.

साक्षात्‌

साक्षात्‌ म्हणजे संस्कृतमध्ये स्वत:, प्रत्यक्ष, मूर्तिमंत वगैरे. त्यामुळे साक्षात्कार म्हणजे प्रत्यक्ष अनुभव किंवा प्रत्यक्ष ज्ञान. प्रत्यक्ष भेट या अर्थी हा शब्द कसा वापरला, कोण जाणे!
असाच एक शब्द-कर्मठ. हिन्दीत याचा अर्थ कामसू. मराठीतला माहीत आहेच. --वाचक्‍नवी

व-हाडी मराठी

मराठी भाषा दर १२ मैलांवर बदलते असे आपण म्हणतो. माझा जेव्हा व-हाडी मराठी भाषेशी प्रथम संबंध आला तेव्हा काहीसे चमत्कारीक वाटले. साधारणपणे मुंबई, पुण्याकडे आपण समोरपुढे हे समानार्थी वापरत असलो तरी संदर्भामध्ये थोडा फरक पडतो.

व-हाडी मराठी भाषेत "माझ्या समोर एक माणूस उभा आहे" म्हणजे "माझ्या पुढे एक माणूस उभा आहे".

एकदम मान्य आहे, पण

"माझे घड्याळ १० मिनिटे समोर आहे" म्हणजे "माझे घड्याळ १० मिनिटे पुढे आहे" हे मला पचायला जरा जड गेले.

नितीन

बारा कोस.

मराठीच नाही , तर कुठलीही भाषा दर बारा कोसावर बदलते असे म्हणतात. मला वाटते, ही समजूत जेव्हापासून आहे, तेव्हा मैल हे अंतर मोजण्याचे एकक नसावे. --वाचक्‍नवी

अध्वर्यू आणि उद्गाता

अध्वर्यू आणि उद्गाता या शब्दांचा नेमका अर्थ काय आहे आणि त्यांचा वाक्यात उपयोग कसा केला जातो? यांची व्युत्पत्ती सांगता आली तर फारच चांगले.

अध्वर्यू

अध्वर्यू-- यज्ञ करणार्‍या अनेकांतला एक ऋत्विक्‌(पुरोहित). याचे काम जमीन मोजणे, वेदी बांधणे, पाणी आणणे, जाळावयाची लाकडे गोळा करणे, अग्नि पेटवणे, आहुति देणे इत्यादी. रूढ अर्थ : संस्थाप्रमुख. संस्थेतील सर्वेसर्वा.
उद्गाता--सामवेद म्हणणारा. याचे तीन सहकारी असतात--प्रस्तोता, प्रतिहंता आणि सुब्रह्मण्य. रूढ अर्थ- प्रवर्तक(?), चालना देणारा(?), पुरस्कर्ता(?).--वाचक्‍नवी

'पायोनियर' साठी काय?

धन्यवाद वाचक्नवी! 'पायोनियर' साठी अध्वर्यू/उद्गाता यापैकी किंवा इतर कोणता शब्द वापरता येईल?

पायोनियर

अग्रेसर; आदिपुरुष/आद्य(सं)स्थापक/आदिकर्ता, आद्यचालक, वगैरे, संदर्भानुसार. --वाचक्‍नवी

यादृच्छिक

यादृच्छिक या शब्दाचा नेमका अर्थ काय? हा शब्द रँडम् या अर्थाने वापरतात का?

रँडम किंवा आर्बिट्ररी

अशा दोन्ही अर्थांनी वापरला जातो. तरी :

"यदृच्छा"ला "रँडम"ची अधिक अर्थच्छटा असावी,
"स्वैर"ला "आर्बिट्ररी"ची अधिक अर्थच्छटा असावी

दोन अर्थच्छटांमधला फरक हा :
"रँडम" मध्ये जे मिळते ते मिळते, वाटेल ते घेता येत नाही
"आर्बिट्ररी" मध्ये वाटेल ते घेता येते, ते वाटणे अहेतुक का असेना.

१. "छाप" किंवा "काटा" वाटेल ते मनात ठरवू : (यानंतर मनात जे ठरवू ती वस्तू "आर्बिट्ररी" असते)
२. नाणेफेकीत "छाप" किंवा "काटा" येईल : (नाणे फेकल्यानंतर जे येते ते रँडम असते)

यदृच्छा


"यदृच्छा"ला "रँडम"ची अधिक अर्थच्छटा असावी,


"यदृच्छेशिवाय झाडाचे पान सुद्धा हलत नाही" या वाक्यात ही छटा नाही . येथे हा शब्द इश्वरेच्छा या अर्थी वापरला गेला आहे.
प्रकाश घाटपांडे

यदृछा!

यदृच्छा= परमेश्वराची इच्छा, स्वेच्छा.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

 
^ वर