मंगळावरची बाई

आज ही बातमी वाचलीत का अथवा फोटो पाहिलात का, जो बर्‍याच वृत्तपत्रात जगभर आला आहे?

मंगळावरची बाई असे याला समजले जात आहे! हा दुवा वाचा.

लेखनविषय: दुवे:

Comments

बाई कि ?

सकाळ मध्ये आजच वाचले. ही बघा दैनिक सकाळची बातमी दि.२४/०१/२००८

मंगळावर मानवाचे अस्तित्व

न्यूयॉर्क, ता. २३ - मंगळावर मानवाचे अस्तित्व असल्याचे दर्शविणारे छायाचित्र "नासा'ला पाठविण्यात आल्याने मंगळाचे गूढ अधिकच वाढले आहे. ......
मंगळावरील एका टेकडीवर एक विवस्त्र महिला चालत असल्याचे छायाचित्र "नासा'ला पाठविण्यात आल्याचे वृत्त "डेली मेल'ने दिले आहे. या महिलेचे हात ताणलेले आहेत. याबाबत "नासा'ने अधिकृतपणे कोणतीही टिपण्णी केलेली नाही. या छायाचित्रात दिसणारी महिला खरी आहे की मंगळावरील एखादा दगड आहे यावर "नासा'ने काहीही सांगितले नाही. एका वेबसाईटच्या हवाल्याने हे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. हे छायाचित्र पाहिल्यावर आमचा विश्वासच बसला नाही. विवस्त्र स्वरूपातील एक परजीव पाहून आम्हाला धक्‍का बसला, असे एका नागरिकाने या वेबसाईटला पाठविलेल्या मेलमध्ये म्हटले आहे.

फ्रान्सच्या शास्त्रज्ञांनी काही दिवसांपूर्वीच मंगळावर कोरड्या बर्फाचे ढग असल्याचे म्हटले होते. त्या पार्श्‍वभूमीवर हे वृत्त अधिकच गूढ निर्माण करणारे आहे. मंगळावरील बर्फाचे ढग काही वेळा इतके दाट होतात, की त्यामुळे मंगळावर गडद सावली पडते. मंगळावर कार्बन-डाय-ऑक्‍साईड असल्याचा पुरावा प्रथमच देणारे छायाचित्र या शास्त्रज्ञांनी दिले आहे.

प्रकाश घाटपांडे

मंगळी

दुवा बातमी ऐवजी चित्राचा आहे. बाई 'मंगळी' असाव्यात.

आधीही

याआधीही मंगळावर मानवी चेहेर्‍यासदृश आकार दिसले होते. यात आपल्या परसेप्शनचा भाग अधिक असतो असे वाटते. आपल्याला जे आकार परिचित आहेत, ते आपल्याला आपोआप दिसू लागतात. दगडात देव दिसणे हे अजून एक उदाहरण. मंगळावर जीवसृष्टी नसेलच असे नाही, पण एकदम बाई कशी आली याचाही विचार करायला हवा. आणि खरेच बाई असेल तर आणखी खुणा दिसायला हव्यात. तिचे सहकारी, ते दुसरीकडून आले असतील तर त्यांचे यान इत्यादी.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

हम्म्

ह्म्म! 'बाईच' दिसली...
एखादा जाडा बुवा नाही बरं का ;)

आपला
गुंडोपंत बुवा

मंगळी आणि बिगफूट

मंगळीला पाहून अमेरिकन बिगफूट (सॅसक्वॅच)ची आठवण झाली. मंगळी अगदी त्याच आविर्भावात चालत्ये. ;-)

असो. मंगळीचा रंग आजूबाजूंच्या खडकांशी मिळता जुळता आहे.

अवांतरः नारायण धारप यांचे मंगळावरील माणसे असे काहीसे पुस्तक होते बहुधा. खूप लहानपणी वाचलेले होते, अतिशय मजेदार. त्यातील मंगळे हिरव्या रंगाचे असतात. वरील चित्रातील मंगळीच्या रंगाशी साधर्म्य साधणारे. ;-) धारपही सूक्ष्मदेहाने मंगळावर गेले होते का काय असा गूढ प्रश्न पडला. :))

पटले

मंगळीला पाहून अमेरिकन बिगफूट (सॅसक्वॅच)ची आठवण झाली. मंगळी अगदी त्याच आविर्भावात चालत्ये. ;-)

अगदी, मला पण तशीच आठवण झाली. कधी यटी (यती?) कधी बिगफूट वगैरे बोलले जाते.

बाकी कदाचीत थट्टा होईल पण तरी देखील परत वर्तक आठवतात! त्यांनी मंगळावरील दगडावर कसे "कार्बन" झालेले शेवाळे स्पर्श करून वर्णीले होते कुठलेही मशीन तेथे जाण्याआधी. वर "क्लेम" केला होता की आंतराळयान नंतर ते (तेंव्हाचे) तपासू शकले नाही कारण त्याच्या टेस्ट्स मधे तो भाग नव्हता! :-)
--------------

प वि वर्तक आणी मंगळ

हे बघा
Copy of Picture 134

आणि आता हे बघा.
Copy of Picture 133
प्रकाश घाटपांडे

प्रकाशराव,

तुम्ही (नेहेमीप्रमाणे) उत्तम कात्रणे डकवलेली आहेत. धन्यवाद!

अवांतरः तुमच्या या कात्रण काढून ठेवायच्या सवयीचा नेहेमीच अचंबा आणि आदर वाटतो. आणि दरवेळी नेमके कात्रण शोधायच्या क्षमतेवर आश्चर्य!

-ऋषिकेश

प्रकाशराव एक शंका...

अवांतरः तुमच्या या कात्रण काढून ठेवायच्या सवयीचा नेहेमीच अचंबा आणि आदर वाटतो. आणि दरवेळी नेमके कात्रण शोधायच्या क्षमतेवर आश्चर्य!

या ऋषिकेश यांच्या मताशी एकदम सहमत! फक्त एक शंका मनात आली, गुप्त पोलीस म्हणून प्रकाशराव, वर्तक मंगळावर काय करत आहेत ते बघायला वर्तकांच्या मागे मागे तर गेले नव्हते ना! :-)

--------------

कात्रण कसे मिळवले?

सदर कात्रण मिळवण्यासाठी मी संतकृपा च्या कार्यालयात गेलो होतो. तेव्हा वर्तक व गोडबाबा असा विषय वर्तमानपत्रात चालला होता. तेव्हा साहजिकच "सुक्ष्म लिंगदेहाने मंगळावर हा विषय आला होता." प्रासंगिक लेखांत संदर्भ म्हणुन संतकृपा चा हा अंक दिला होता. संदर्भ दिले कि वाचक भारावून जातो . कुणी त्याची शहानिशा करायला जात नाही . संदर्भ जेवढा जुना तेवढी त्याची परिणांमकारकता जास्त. कार्यालयात एका आजोबांनी पुणेरी स्वागत(?) केले. मी सखाराम गटणे डोळ्यासमोर आणला. संतकृपेने मी भारावून गेलो आहे असे दाखवले. त्याबरोबर मला बसायला खुर्ची मिळाली. मग आजोबांनी मला "अध्यात्म आणि विज्ञान" या विषयावर लेक्चर मारले. मी पुरेसा "भारावून" गेलो आहे याची आजोबांना खात्री पटल्यावर मी हळुच या अंकाचा विषय काढला. त्यांनी तो तत्परतेने जुन्या गट्ठ्यातून काढला. मग मी जरा झेरॉक्स काढतो असे म्हणुन बघितले. "हो हो पण झेरॉक्स काढल्यावर लगेच परत आणायचा बरं का?" मी पडत्या फळाची आज्ञा घेउन तेथून सटकलो. प्रामाणिकपणे कमी पैशात जिथे झेरॉक्स करुन मिळते असे दुकान शोधून तीन अंकांच्या मंगळ विषयावरील लेखाच्या झेरॉक्स काढल्या व अंक परत केला.
आता 'जुन' च्या अंकातील ती "एक व्यक्ती" म्हणजे दस्तुरखुद्द प.वि वर्तक च होत याचा खुलासा 'सप्टेंबर'च्या अंकात होतो.
प्रकाश घाटपांडे

हे मात्र भारी आहे

संदर्भ जेवढा जुना तेवढी त्याची परिणांमकारकता जास्त. हे मात्र भारी आहे!!!
तुम्ही त्या वर्तकांच्या मागे का लागला आहात?
काही काही गोष्टी भारीच लिहितात ते हे मन्य करायला काय हरकत आहे?

असो, आता आवांतर -
असेही कुठल्या तरी दूरवरच्या अमेरिकेने यान पाठवले की नाही हे तरी आम्हाला कुठे खरंच माहीत असते?
तुम्ही तरी पाहिले आहे का ते डोळ्यानी? नाहीच ना?
मग त्यांच्यावर तरी का विश्वास ठेवता? त्यावर नाही काही बोलत? मागे अमेरिकेचे चंद्रावर उतरलेल्या यानाचे फोटो पाहीले होते. त्यात यानाखाली यानावर कुठेही धूळ उडालेली नव्हती. हे कसे शक्य आहे आहे? म्हणजे यान उतरतांना त्यांना काहीच फोर्स लागला नाही?

"चंद्रावर जावून भारतीय तिरंगा रोवणारे अंतराळवीर प्रकाश घाटपांडे" असा फोटो मलाही फोटोशॉप मध्ये बनवता येईल त्यात काय!
सगळे डिटेल्स नीट बघून अगदी खराखुरा बनवायला फार तर ३ तास!
मग असे असतांना कशावरून नासा ही एक जनतेचे मत/लक्ष अचानकपणे बदलण्यासाठी बनवलेली एक संस्था नाहीये?

आपला
प.वि. गुंडोपंत
(सूर्य परिक्रमा व नवग्रह रिटर्न्ड)

कोणता मानू चंद्रमा?

असेही कुठल्या तरी दूरवरच्या अमेरिकेने यान पाठवले की नाही हे तरी आम्हाला कुठे खरंच माहीत असते?

ह्या संदर्भात "ल्युनार मिशन" हा खोटारडेपणा आहे ह्यावर जालावर अनेक माहीती मिळू शकते. त्यातील विकीचा दुवा आपण पाहू शकता.

खरे खोटे जाऊंदेत पण पाश्चिमात्यांशी तत्कालीन आपली तुलना करणार्‍या, सोपानदेव चौधरींच्या कवितेतील ओळी आठवल्या: (अर्थात आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे... तरी पण विचार करायला लावणारी...)

...स्फुटनिकांचा संचार चंद्रलोकावर, कागदी बाण उडवणार्‍या आम्हाला काय त्याची तमा?
आम्ही फक्त गात राहीलो, कोणता मानू चंद्रमा,भूवरीचा की नभिचा!
नभिचा चंद्र राहीला नभांतरी आणि भूवरीच्या चंद्रावरच आमची स्वारी!
ते आंतर्रीक्षात, आम्ही? आम्ही ऑटोरीक्षात!
त्यांचा संचार आंतराळात, दृष्टी आंतरगोलपटावर आणि आम्ही मात्र उभे या पृथ्वीच्या सालपटावर
सर्व प्रमुख शोधांचे धनी, पाश्चिमात्य विज्ञानयोगी
आम्ही? आम्ही फक्त उपभोगी
संशोधक, निर्माते, सारे तिर्‍हाईत, आम्ही मात्र राहीलो फक्त गिर्‍हाईक, फक्त गिर्‍हाईक, फक्त गिर्‍हाईक!

चांद्रवीर

"चंद्रावर जावून भारतीय तिरंगा रोवणारे अंतराळवीर प्रकाश घाटपांडे" असा फोटो मलाही फोटोशॉप मध्ये बनवता येईल त्यात काय!
सगळे डिटेल्स नीट बघून अगदी खराखुरा बनवायला फार तर ३ तास!

निरभ्र व मोकळ्या आकाशात लहान पणी जेव्हा आमच्या शेतातून मी पौर्णिमेचे चंद्रबिंब पाही त्यावेळी माझ्या मनात जगातल्या सर्व सुतारांनी अनेक शिड्या एकमेकांना जोडून त्या चंद्रावर टेकवायच्या मग आपण त्या शिडीवरुन चंद्रावर जायचे अशी कल्पना डोक्यात असे. त्यानंतर बालबुद्धीचा(?) थोडा विकास झाल्यावर ईमायनात् भरपूर इंधन भरायचे अगदी ठासून मग डायर्रेक् चंद्रावर जायचे . लई लांब असला तर आठवडा जाईन, तेवढ्या भाकरी बांधुन घ्यायच्या. अशी कल्पना विस्तारली.
प्रकाश घाटपांडे

सहमत - कात्रणांची व्यवस्था औरच

याबाबत कौतुक करावे तितके थोडके!

कौतुक

लेखाच्या निमित्ताने कात्रणे सादर करणे, याबाबत घाटपांडेंचे कौतुक करावे तितके थोडेच आहे!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मीगळी आणि ससा

मला तरी एखादा दगडाचा आकार वाटतोय.. हे म्हणजे चंद्रवरच्या सशाची गत झाली :प्
बाकी मंगळावरील भेगा कालवे नाहित हे सिद्ध करायला इतकी वर्षे गेली. तर् हि इतकीशी मंगळी बरी दिसली त्यांना

-ऋषिकेश

बाई??

आधीच हे चित्र इतकं छोटं आणि धुसर आहे की त्यातली ती आकृती बाईचीच आहे कशाच्या आधारावर सांगत आहेत?
मलातर तो आपल्या धोनीसारखा बुवा वाटत आहे बॉ.

बुवा तेथे बाया !!

मलातर तो आपल्या धोनीसारखा बुवा वाटत आहे बॉ.

बुवा आहे म्हणजे बाई कुठेतरी असणारच, नाही का???

(बायांच्या शोधात असलेला बुवा) सुनील

झगा आणि स्की मुखवटा घातलेली बाई

ही जोगीण (नन) बँक लुटण्याचा विचार करीत आहे - मुखवट्याचा आकार समोरून ढगळ असता तर बुरखा मानला असता.
तरी चालण्याच्या ढबेवरून ननचा वेष केलेला एक कापुचिन भिक्षुक (पुरुष) असण्याची शक्यता नकारता येत नाही.

ती बाई असणे केवळ अशक्य

कारण मेन आर फ्रॉम मार्स अँड विमेन आर फ्रॉम विनस. त्यामुळे ती मंगळावरची बाई कशी असेल? ;-) ह. घ्या.

मंगला

कारण मेन आर फ्रॉम मार्स अँड विमेन आर फ्रॉम विनस. त्यामुळे ती मंगळावरची बाई कशी असेल?

मस्त! पण त्याच बरोबर असाही विचार माझ्या मनात आला की, आपल्याकडे "मंगला" हे जे नाव आहे ते मंगळावरील बाईमुळेच तर आले नसेल? :)

--------------

मंगळचित्र : प्लॅन की एलेव्हेशन?

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
हे चित्र मंगळावर उतरलेल्या यानाने घेतले की मंगळाभोवती फिरणार्‍या? या विषयी मी अनभिज्ञ आहे.
भ्रमण करणार्‍या यानातून घेतले असेल तर ते एका खड्ड्याचे चित्र असावे.आपल्याला परिचित असतात तेच आकार दिसतात. या श्री.राजेंद्र यांच्या विचाराशी मी सहमत आहे. बहुतेक वेळा आपल्याला मानवी आकार दिसतो.
(अज्ञानी)...यनावाला.

घृणाक्षरन्याय

म.टा.च्या खालील अग्रलेखातील "घृणाक्षरन्याय" हा शब्द मला आवडला.

मंगळावरील छायाखेळ
26 Jan 2008, 0010 hrs IST

लाल रंगाने सर्वांचेच लक्ष वेधून घेणारा मंगळ हा ग्रह पुन्हा चर्चेत आला आहे. काही लोक कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रसिद्धीच्या झोतात राहात असतात. मंगळाचेही तसेच आहे. या ग्रहाबाबत भारतीय जनमानसात धाक असला, तरी त्याची कारणे निराळी आहेत. परंतु गमतीचा भाग असा की ही भीती असतानाच त्या ग्रहाबाबतचे सुप्त आकर्षणही लोकांत आहे आणि ते जगभरच आहे. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे या ग्रहावर सजीवसृष्टी असावी, आता नसली तरी पूवीर् असावी, असा एक ठाम समज आहे. या समजातूनच या ग्रहाची निरीक्षणे करणाऱ्यांना तिथे अकस्मातपणे काहीतरी आढळते. तसेच ते आताही दिसले आहे. यावेळी निरीक्षकांना आपला हात लांब केलेली एक नग्न महिलाच दिसली आहे. असे काही दिसण्याची ही पहिलीच वेळ नाही. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीला मंगळावर सजीवसृष्टी असण्याची शक्यता आहे, असे काही खगोलशास्त्रज्ञांना वाटत होते. पेसिर्व्हल लॉवेल या खगोलशास्त्रज्ञाने तर मंगळावर सजीवसृष्टी आहे; पण ती मरणाच्या वाटेवर आहे, असे आपल्या ग्रंथात म्हटले होते. त्यावेळी जगभर खळबळ उडाली. हौशी खगोल निरीक्षकांच्या दुबिर्णी मंगळाकडे रोखल्या गेल्या. मग कोणाला मंगळावर रेषा आहेत आणि त्या रेषांमध्ये परमेश्वराचे नाव कोरले आहे असे दिसू लागले. कोणाला मंगळवासीयांनी समस्त विश्वालाच पाठविलेला संदेश त्या रेषांमध्ये दिसू लागला. मंगळावर कालवे आहेत, असाही काहींचा समज होता. या साऱ्याला छेद मिळत गेला, तो गेल्या शतकामध्ये नासा या अमेरिकेच्या संस्थेने मंगळाचे जवळून निरीक्षण करायचे ठरवल्यावर. नासाचे मरीनर ४ हे अवकाशयान जुलै १९६५मध्ये मंगळाजवळ पोचले. त्या आणि नंतरच्या मरीनर ६ आणि ७ या यानांनी पाठविलेल्या छायाचित्रांवरून त्या ग्रहाबाबतचे सर्व अंदाज खोटे ठरवले. तरीसुद्धा मंगळाचा शोध सुरूच राहिला. आता तर मंगळावर माणूस पाठविण्याच्या गोष्टी होऊ लागल्या आहेत. त्या ग्रहाची जी छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत, त्यावरून तिथे सारे वैराणच असल्याचे दिसते. तरीही काही निरीक्षकांना अधूनमधून आशा पल्लवित करणाऱ्या गोष्टी दिसतात. परंतु संस्कृतमध्ये जे विविध न्याय सांगितले आहेत, त्यामध्ये घृणाक्षरन्याय आहे. हा न्याय असे सांगतो की किड्याने कोरलेल्या लाकडाच्या चित्रविचित्र आकृतीमध्ये एखादेवेळी एखाद्या अक्षराचे साम्य सहजगत्या आढळून आले तर तरी केवळ योगायोगाची गोष्ट समजायची. मंगळ या ग्रहावर आता दिसलेली हात लांब केलेल्या महिलेची आकृती अशीच योगायोगाची गोष्ट आहे. हा योगायोग घडण्यास त्या ग्रहाच्या आकाशामध्ये असलेले कार्बन डायऑक्साइडचे दाट ढग कारणीभूत असावेत, असा अंदाज आहे. या ढगांची सावली मंगळाच्या पृष्ठभागावर पडते. सावलीतून काही आकार तयार होतात. लहान मुलांना रमविण्यासाठी मोठी माणसे हाताने हरीण, उडणारा पक्षी अशा आकृती भिंतीवर दाखवतात. तो छायाप्रकाशाचा खेळ असतो. मंगळावरही यदृच्छेने छायाप्रकाशाचा हा खेळ चालू आहे आणि या विश्वात आपल्याला कोणी शेजारी आहे काय, याचा शोध घेणाऱ्या माणसाला त्यात आपल्या शेजाऱ्यांच्या सावल्या दिसू लागल्या आहेत. सहाशे कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या माणसाला या अंतहीन विश्वाच्या अंधाऱ्या पोकळीत अंतर्यामी किती एकाकी वाटते आहे, त्याची ही एक लहानशी खूण आहे. या एकाकीपणातूनच त्याला छायाप्रकाशाचा खेळ मोहित करतो आणि मंगळावरच्या चर्चांना पुन्हा उधाण येते. सध्या ज्ञात असलेल्या माहितीच्या उजेडामध्ये मंगळाबाबतच्या ताज्या बातमीचा हाच अन्वयार्थ आहे.

 
^ वर