विद्रोही ब्राह्मण (१)

(किस्त्रीम दिवाळी २००७ च्या अंकात लेखक ह.मो.मराठे यांचा वरील शीर्षकाचा लेख आहे. त्या लेखातील काही भाग.)
.................................................................................
किर्लोस्कर मासिकाचा "एक हजार एकावा " अंक २००६ साली प्रसिद्ध झाला.तो पाच भागांत असून त्याची १००१ पृष्ठे आहेत. किर्लोस्कर मधे १९३० ते १९५० या कालावधीत झालेले काही प्रसिद्ध या विशेषांकांत पुनर्मुद्रित केले आहेत.ते पुरोगामी विचारसरणीचे आहेत.त्यांत पुराणमतवाद्यांवर कठोर टीका आहे. अशी टीका करणारे कांही लेखक : स्वा. सावरकर, गु.प्र. ओगले.,ह.रा. महाजनी, महादेवशास्त्री दिवेकर, वा. ना.देवधर,सदाशिवशास्त्री भिडे, दि.य. देशपांडे इत्यादि. म्हण्जे सर्व ब्रह्मण. ह.मो. मराठे यांनी या ब्राह्मणांना "विद्रोही ब्रह्मण " म्हटले आहे.
...
*दिवेकरशास्त्री लिहितातः
...."..वैदिक मंत्रसिद्धीने सर्वकाही होते या नादानेच छ.संभाजी कनोजी कब्जीच्या अधीन झाला. तसेच शेवटचा बाजीराव भटजींच्या मालिकेत शिरला. दुवक्तां संध्या, अर्घ्य,होम,हवन, ब्रह्मण भोजने सारखी चालल्यावर शस्त्र,शिस्त,जूट,यंकडे दुर्लक्ष करून रावबाजी स्वस्थ बसला. शेवटी त्याला राज्याचे उदक इंग्रजांच्या हातावर सोडावे लागले....म्हणून वैदिक मंत्र तंत्र सोडून शारीरशिक्षण ,निशणबाजी,संशोधन,सायन्स, अशा क्षेत्रांत अवश्य प्रवेश करायला हवा."

लेखनविषय: दुवे:

Comments

दलित ब्राह्मण

शरणकुमार लिंबाळे यांचा 'दलित ब्राह्मण' हा कथासंग्रह दिलिपराज प्रकाशन, यांनी प्रकाशित केला . तो वाचनिय आहे. त्यात सुसंस्कृत झालेला, विवेकातुन विद्रोह विसरलेल्या दलित माणसाच्या घुसमटीच्या कथा आहे. अशाच प्रकारे सदानंद मोरे यांचे 'उजळल्या दिशा' हे नाटक देखील याच विषयावर आहे.

प्रकाश घाटपांडे

विद्रोही ब्राह्मण (२)

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
किर्लोस्कर १९३६ च्या अंकात गु. प्र. ओगले लिहितात:--
..."गेल्या एक हजार वर्षांपासून मराठी ही लोकभाषा म्हणून प्रचारात आहे.तिच्यातील ग्रंथसंपत्ती पाहिली तर ती अगदी एकांगीच आहे असे दिसते. संतमंडळीच्या पारमार्थिक ग्रथांशिवाय व्यवहारोपयोगी , जीवनोपयोगी, विद्यांवर आणि कलांवर किती ग्रंथ गेल्या हजार वर्षांत महाराष्ट्रात निर्माण झाले?
जवळ जवळ नाहीच.
....वेद, महाभारत,रामायण यांतील प्रकरणांचे भाषांतर करून संतांनी त्या वाहवलेल्या पौराणिक संस्कृतीलाच बळकटी आणली. असे दिसून येते.संतमंडळी भक्तिरसाच्या कैफात देवाशी भातुकलीचा खेळ जवळ जवळ हजार वर्षे खेळत होते.पण त्याच वेळी चाललेल्या परकीय आक्रमणांची त्यांना दादही नव्हती आणि फिकीरही नव्हती.
कर्ता करविता परमेश्वर आहे अशी नपुंसक मनोवृत्ती स्वीकारून ते परमार्थाच्या कैफात धुंद होते.
....संतानी परमेश्वराशी फारच सलगी केली. इतकी की तो त्यांच्या घरी राबूं लागला.इतके असूनही संतांच्या बायका पोरांना अन्नाविना तडफडून मरावे लागले हे त्यांच्याच चरित्रांत नमूद आहे.संतांच्या भक्तिमार्गाने अज्ञानाचा फैलाव साथीच्या रोगा सारखा झपाट्याने झाला.
...संतमंडळाने अभंगांचे कारखानेच काढले होते. ऐहिक जीवन हे शास्त्रे,विद्या, कला आणि व्यापार यांजवर अवलंबून असते हे कळण्याला शुद्धीवर होतेच कोण?
संतांच्या शुद्ध चारित्याबद्दल,सदिच्छेबद्दल, तळमळी बद्दल आम्हाला शंका नाही. पण जग कशाच्या आधारे प्रगती करते याचा त्यांना पत्ताच नव्हता.आडरानात शिरलेल्या संस्कृती बरोबर ते वहावत गेले."

संत महात्म्य...

मान्य. भाग दोन जास्त आवडला.खास करुन..

असे दिसून येते.संतमंडळी भक्तिरसाच्या कैफात देवाशी भातुकलीचा खेळ जवळ जवळ हजार वर्षे खेळत होते.पण त्याच वेळी चाललेल्या परकीय आक्रमणांची त्यांना दादही नव्हती आणि फिकीरही नव्हती.
कर्ता करविता परमेश्वर आहे अशी नपुंसक मनोवृत्ती स्वीकारून ते परमार्थाच्या कैफात धुंद होते.
इतिहासाचार्य राजवाडे

इतिहासाचार्य वि.का राजवाडे यांनी त्याकाळी एकदा संतांना 'टाळकुटे' म्हणले होते. त्यावेळी त्यांनी अनेकांचा रोष ओढवून घेतला होता.
प्रकाश घाटपांडे

भाग (२)

भाग दोन जास्त आवडला.
कुठे वाचला? मला वाटते, भाग दोन अजून यायचा आहे.
जो संत असतो तो राजकारणी असूच शकत नाही, हे सध्याच्या राजकारण्यांवरून स्पष्ट होते. जे राजकारणावर लिहितात असे सावरकरांसारखे ललित लेखक-कवी फारच थोडे असतात. रामदासांची बरोबरी कुठलाही संत करू शकणार नाही. --वाचक्‍नवी

संत, संता़ळे वगैरे...

राजवाड्यांनी संतसंप्रदायाला वैतागून "संताळे" असे म्हणल्याचेही ऐकले आहे. त्यांनी फक्त यात अपवाद हा "समर्थ रामदासांचा" केला.

सावरकर म्हणाले होते की , "अल्लाउद्दीने खिल्जी स्वारी करून येत आहे, इतके सांगायचे (कान उघडणी या अर्थी) साधे पोस्टमनचे काम देखील ज्ञानेश्वरांना करता आले नाही का?" अर्थात सावरकर राजकारणाप्रमाणेच समाजकारणी होते त्यामुळे त्यांनी हे लिहीताना तत्कालीन लोकांच्या डोळ्यावरची झापडे उडवायला केले असावे असे वाटते.

अर्थात वरील दोन्ही (खर्‍या अर्थी) विद्वानांचे जितके पटते तितकेच असेही म्हणले जाते की जेंव्हा मुस्लीम आक्रमण आणि राज्याने, राष्ट्राच्या आयुष्याच्या कालरेषेत (टाईमलाईन??) कळस गाठला होता (आणि शब्दशः कळस उध्वस्त केले जात होते) त्या ३००-४०० वर्षाच्या काळरात्रीत सामान्यांना धीर देताना हा संतसंप्रदाय अर्थात भक्तीसंप्रदाय तयार झाला. त्याचेच एक सामाजीक फळ म्हणजे "शिवाजी" आणि नंतर झालेला मराठी सत्तेचा उदय. (मला पुस्तक शोधावे लागेल, लेखकाचे नाव पटकन आठवत नाही पण, पुस्तकाचे नाव काहीसे असे आहे, "राजकारणी संत समर्थ रामदास").

मला त्यावरून इतकेच म्हणावेसे वाटते की यातील प्रत्येक संत हा अर्थातच पारमार्थीक स्वभावाचा होता पण त्याचबरोबर एक चांगला साहीत्यिक देखील देखील होता. (तेच स्त्री संतांविषयी). समाजात अनेक समस्या होत्या. परकीय आक्रमणे ही एक तर दुसरीकडे आंतर्गत चुकीच्या रूढी - मुख्य जातीयता आणि विषमता. एखाद्या "सजग" माणसाने आणि त्याच्या अंगी असलेल्या नेतृत्वाच्या कौशल्याने त्यातले काय घ्यावे आणि त्यात समाजात जागृकता कशी करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. म्हणूनच एका काळातच जन्माला आलेल्या संत तुकारामास ज्या पद्धतीने विठ्ठल दिसला तसा रामदासांना राम दिसला नाही पण दोघांनी वैयक्तिक जीवन कसे असावे यावर सांगीतले. एक जण "नाठाळाच्या माथी हाणू काठी", असे म्हणत होता तर दुसरा, "आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, तेथे आळस करू नका विवेकी हो" असे म्हणत मुर्खांची लक्षणेपण सांगीतली आणि "उद्धटासी उध्दट" होयला पण सांगीतले. त्यांना लोकप्रियता मिळाली कारण समाज पिढ्यानपिढ्या गांजलेला होता. स्वकीय राज्यकर्ते आणि त्यांचे "नपुंसक" नसलेले सरदार एकमेकांशी लढण्यात आणि बाहेरून आलेल्या मोघल आणि अनेक शाह्यांची चाकरी करण्यातच धन्यता मानत होते.

पुढच्या काळात जसा टिळक-आगरकर वाद झाला ज्यात समाजसुधारणा आधी की स्वराज्य आधी हा वाद झाला. ज्यात आगरकरांनीस्वतःचे कौशल्य आणि प्रभाव सकारात्मक वापरायच्या ऐवजी विरोधात्मक वापरला. परीणामी जे फळ मिळायला हवे होते ते मिळाले नाही (जसे ते राजा राममोहन रॉय यांनी मिळवून दाखवले). त्या उलट संतांनी त्यांना हव्यात्या सामाजीक सुधारणा करण्यासाठी अथवा निव्वळ भक्ती (टू किप सॅनिटी ऑफ माइंड )साठी स्वतःपुरते करत राहीले. लोकांना ते आवडले आणि तसे इतरांचे आवडले नाही हा काही संतांचा दोष होत नाही. तर त्यावेळे असलेला योग्य नेतृत्वाचा अभाव हे कारण आहे. जेंव्हा तसे नेतृत्व उदयास आले तेंव्हा तीच सामान्य जनता तळहातावर शीर घेऊन लढण्यास तयार झाली. उद्या कोणी म्हणाले की पुल अथवा कुसुमाग्रज यांनी नुसते लिहून लोकांना गुंगवत ठेवले, त्याऐवजी त्यांनी राजकारणात यायला हवे होते तर जसे ते असंबद्ध विधान ठरेल तितकेच ३०० -४०० वर्षाच्या कालावधीत जे काही १०-१५ संत तयार झाले त्यांच्याबद्दल जे उलट सुलट बोललेल् जाते त्याबद्दल म्हणता येईल .

या बाबतीत "आउट ऑफ कॉन्टेक्स्ट" हा शब्द कधी कधी योग्य वाटतो कारण सर्व दोष संतांना दिला जातो ज्यांनी (विशेष करून मराठी संतांनी) कधी नुसतीच भक्ती शिकवली नाही.

  1. ज्ञानेश्वर या बाबतीत मराठीजगतातील आद्य सामाजीक क्रांतीकारक (१३वे शतक) - भागवत धर्म आणि वारकरी संप्रदाय, चोखामेळा पण स्वतःच्या शेतीतच पंढरपूर मानत होता (कशास जाऊ दूर, इथेच माझे पंढरपूर),
  2. १४-१५ शतक विशेष कोणी नव्हतेच फक्त आक्रमणे. (चु.भू. द्या.घ्या.)
  3. १६ वे शतक तेच काम प्रचंड पद्धतीने तत्कालीन समाजव्यवस्थेत पुढे नेले ते एकनाथांनी
  4. १७ वे शतक तुकाराम-रामदासांविषयी वर लिहीले आहेच. म्हणून तुका झालासे कळस असे उगीच म्हणत नाहीत.

थोडक्यात ज्या काळात पंचक्रोशीच्या बाहेर सरळ जाणेपण अवघड होते, मोबाईल्स आणि इमेल्स नव्हत्या, किर्लोस्कर अथवा धर्मभास्कर सारखी मासिके नव्हती तेंव्हा या संतमंडळींनी तयार केलेले वाड्मय जर अजूनही लक्षात राहत असेल तर त्यात त्यांचे साहीत्यिक म्हणून कर्तुत्व आहे. बरं ज्या काही वाईट चालीरीती - अंधश्रद्धा होत्या त्यातील एकही या संतांनी आणली नाही (अमूक केले नाही तर तमु़क होईल इत्यादी). मग तो दोष हा संतांचा नसतो तर त्यांच्या साहीत्याचा सोयीस्कर अर्थ लावणार्‍या समाजाचा असतो - ज्याचा तुम्ही आणि मी ही भाग आहोत.

--------------

पुल-

उद्या कोणी म्हणाले की पुल अथवा कुसुमाग्रज यांनी नुसते लिहून लोकांना गुंगवत ठेवले, त्याऐवजी त्यांनी राजकारणात यायला हवे होते तर जसे ते असंबद्ध विधान ठरेल तितकेच ३०० -४०० वर्षाच्या कालावधीत जे काही १०-१५ संत तयार झाले त्यांच्याबद्दल जे उलट सुलट बोललेल् जाते त्याबद्दल म्हणता येईल .

खर आहे. पुल एकदा बाळासाहेबांना लागेल असे राजकारणाविषयी बोलले होते. (साहित्यसंमेलनात असावे ) बाळासाहेबांनी त्यावे़ळी पुलंवर तोफ डागली होती. 'आमचच खाउन आमच्यावर तंगड्या वर करतात' अशा पद्धतीचे त्यावेळी काहीतरी ते बोलले होते. तेव्हा महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर बाळासाहेब पुलंच्या पायावर डोक ठेवताना पेपरात फोटो आला आन सार चिडिचुप.
प्रकाश घाटपांडे

अवांतरः पुल / ठाकरे किस्सा

खर आहे. पुल एकदा बाळासाहेबांना लागेल असे राजकारणाविषयी बोलले होते.

केवळ अवांतर म्हणून सांगत आहे. कोण बरोबर कोण चूक म्हणून नाही. दोन्ही व्यक्तिमत्वे मला आवडतात जरी मी दोघांच्या नावाने "टाळ कुटत" नसलो तरी :)

युती सरकारने महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार चालू केला आणि ठाकर्‍यांचा "बाळ हट्टा" ला जागून तो प्रथम पुरस्कार मानाच्या मराठी माणसाच्या लाडक्या व्यक्तीस म्हणजे पुलंना दिला. त्यावेळेस खंडणीचे प्रकार आणि त्यामुळे युतीसरकारवर टिका चालू होती. त्या संदर्भात पुलंनी पुरस्कार समारंभात ज्यांच्याकडून पुरस्कार मिळत होता त्यांच्यावर टिका केली.

अर्थातच ठाकरे चिडले आणि स्वतःच्या खास शैलीत (या अर्थाचे) लिहीले की, "एखाद्या माणसास जेवायला बोलवले, ताटाभोवती रांगोळी काढली, उदबत्ती लावली, पंचपक्वानांनी भरलेल्या ताटासमोर यजमान म्हणून आलेल्या अतिथ्यास बसायची विनंती करतो. आणि हा अतिथी तिथे बसतो आणि ताटात पचापचा थुंकतो, तर त्याला काय म्हणाल? तशी आमची अवस्था झाली. झक मारली आणि यांना महाराष्ट्रभूषण म्हणले!"

त्यानंतर एकीकडे संत पु.ल. देशपांडे यांच्या तमाम अनुयायांची अस्मिता जागृक झाली तर दुसरीकडे सरदार ठाकर्‍यांच्यामावळ्यांची. ठाकरे द्वेषी त्याचा अजूनच फायदा घेऊ लागले. पणदोन्हीकडच्या अनुयायांच्या एक लक्षात येत नव्हते की ती पुल आणि ठाकरे ही काही दैवते नाहीत, असामान्य आहेत पण माणसेच आहेत. आणि मजा म्हणजे हे सर्व चालू असताना दोघांचे विसंवाद संपून परत पहील्यासारखे संबंध पण सरळ झाले. कारण काही झाले तरी ते स्वतःतील गुरूशिष्याचे नाते विसरलेले नव्हते. (मला वाटते पुल ठाकर्‍यांचे कुठेतरी शिक्षक होते)...

बालकवींच्या छान ओळी आहेतः सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबुनी घ्यावे, चैतन्याच्या गोड कोवळ्या उन्हात हिंडावे.

पण आपण (सामान्य जनता - विशेष करून माध्यमरूपी बुद्धीभेद्यांमुळे) मात्र त्यांच्यातील सुंदर/चांगले विचार, चैतन्यरुपी कर्तुत्व आणि धमक घेण्याऐवजी ते कसे चुकले, काय बोलायला हवे यावर वाद घालत बसतो... ना धड विचार ना धड आचार.

--------------

रामदास अपवाद का ?

रामदास ब्राम्हण आहे आणि इतर संत बहुजन आहेत म्हणुन राजवाडे याने असं विधान केलं. " गुरु तो सकळासी ब्राम्हण, जरी तो जाला क्रियाहिन, तरी तयासिच शरण, अनन्यभावे असावे." असं म्हणणारा रामदास त्यांना प्रिय नसेल का ?

सामाजिक परिस्थितीचाही विचार व्हावा.

संतमंडळी भक्तिरसाच्या कैफात देवाशी भातुकलीचा खेळ जवळ जवळ हजार वर्षे खेळत होते.पण त्याच वेळी चाललेल्या परकीय आक्रमणांची त्यांना दादही नव्हती आणि फिकीरही नव्हती.
कर्ता करविता परमेश्वर आहे अशी नपुंसक मनोवृत्ती स्वीकारून ते परमार्थाच्या कैफात धुंद होते.

याबाबतीत आमचे मत असे आहे, ( वरील प्रतिसादात विकासरावांनी त्याचा उल्लेख केलाच आहे ) की याच काळाच्या बाबतीत मध्ययुगीन धर्मसाधनेचा विचार करायवयास हवा. जसे की, याच काळात शिवाच्या उपासनेखाली मद्य,मांस,मैथुन इत्यादी बाबींची चलती झाली होती. मांत्रिक सिद्धांच्या झुंडीच्या झुंडी अनाचाराच्या मार्गाने या साधनेत घुसल्या होत्या. पापाचारण, प्राणी हत्या, परद्रव्य हरण, व्यभिचार तांत्रिक साधना पवित्र होत होती. आणि तेव्हाच धर्मसाधनेचा असा बो-या वाजत असतांना इस्लामी राजवटींमुळे राजवंशही पार बदलून गेले होते. अपरिचितांची राजवट संतभुमीच्या मानेवर जोखड होऊन बसलेली होती. शासनात फक्त मुसलमानांना महत्वाची पदे होती. त्यामुळेच इथल्या क्षत्रीयांनी तलवार सोडून नांगर धरावा लागला, त्यामुळेच शिलाहाराचे शेलार, परमारचे पवार, कदांबाचे कदम, चालुक्याचे चाळके आणि यादवांचे जाधव असे रुपांतर झाल्याची इतिहासात नोंद आहे.

संस्कृतच्या विद्वानांचा इथे कचरा व्हायला लागल्यामुळे ते काशी, प्रयाग,विजयनगर इथे पळून गेले असे आम्ही म्हणनार नाही. ( ते अभ्यासाला गेले :) ) नोकरी मिळवण्यासाठी लोक फारशी भाषा शिकू लागले. मराठी भाषेवर फारशी स्वार झाली. त्याचा परिणाम म्हणजे मुलांची नावे शहाजी, शरीफजी, हिम्मतराव, अशी फारशी स्वरुपाची झाली. न्यायाची जागा इन्साफाने घेतली. भोजनाची जागा मेजवानीने घेतली,गडक-यांची जागा किल्लेदाराने घेतली. असे अनेक बद्ल इथे झाले.

एकदा अस्मिता गमावून लाचारी सुरु झाल्यावर त्याची सीमा कोणती हे सांगता येणार नाही. मुस्लीम राज्यकर्त्यांना खूष करण्यासाठी बहूसंख्य़ हिंदू इस्लामच्या फकीर, पीर, अवलियांचे शिष्यत्व पत्करु लागले. सख्ख्या भावाचे उष्टे अन्न न चालणारे अवलियांचे उष्टे अन्न हे प्रसाद म्हणुन खाऊ लागले. व्यावसायिक लाभासाठी धर्मांतर करु लागले. आणि त्याचा प्रभाव इतका जबरदस्त असावा की, हिंदू संस्क्रुती नष्ट होते की काय अशी भिती धर्म व संस्कृतीच्या लोकांना वाटत होती आणि तेव्हाच संतांनी आहे तो धर्म टिकवणे आणि हिंदू संस्कृती वाढवण्याचे फार मोठे कार्य केले असे आमचे मत आहे.

मौलिक विचार

डॉक्टर साहेब,

आपले तसेच श्री विकास यांचे विचार १००% पटले.

आपला,
(सहमत) भास्कर
आम्ही येथे वसतो.

+१

सहमत.

काही मुठभर संत, त्यांचे पारमार्थीक विचार हे लक्षावधी लोकांच्या मरगळीस कारणीभूत म्हणणे हा देखील सोपा पलायनवाद असे वाटते.

यनावालासर हा चर्चाविषय मांडायचे नेमके कारण (तुम्ही फक्त किर्लोस्कर मासिकातल्या लेखात काय लिहले आहे ते इथे टंकले असे वाटते. म्हणजे तुम्हाला नक्की चर्चा काय अपेक्षित आहे हे कळले नाही म्हणून विचारतोय), तसेच श्री. विकास व डॉक्टरसाहेब यांच्या प्रतिक्रियांवरील आपले मत कळु शकेल काय? :-)

तसेच शिर्षकात "विद्रोही ब्राह्मण (१)" लिहले आहे आणि पुढे म्हण्जे सर्व ब्रह्मण. ह.मो. मराठे यांनी या ब्राह्मणांना "विद्रोही ब्रह्मण " म्हटले आहे. कृपया ब्राह्मण व ब्रह्मण मधील फरक सांगा.

किर्लोस्कर

(तुम्ही फक्त किर्लोस्कर मासिकातल्या लेखात काय लिहले आहे ते इथे टंकले असे वाटते. म्हणजे तुम्हाला नक्की चर्चा काय अपेक्षित आहे हे कळले नाही म्हणून विचारतोय),

मला वाटते यनावालांनी इतरांची मते काय आहेत याची चर्चा व्हावी या उद्देशाने हे टंकले आहे. त्यांनी उधृत केलेला किर्लोस्कर मधील मजकुर यापुर्वी अनेकांनी वाचला नसेल म्हणुन टंकित केले. माहिती म्हणुन त्याचे महत्व आपल्याला आहेच. अन्यथा कोण १९३६ सालातला किर्लोस्कर वाचायला जातो? फक्त अभ्यासकच ना?त्यांनी स्वतःची मते अद्याप मांडलेली नाहीत. ते ती यथावकाश मांडतीलच. नाही मांडली तरी काही फरक पडत नाही. आपल्या मतांची पिंक टाकायला आपण मोकळे आहोतच.
प्रकाश घाटपांडे

ब्रह्मण

ब्रह्म, ब्रह्मण्य, ब्रह्मिष्ठ, ब्रह्मन्‌, ब्राह्मण, ब्राह्मण्य हे शब्द ऐकले-वाचले आहेत, ब्रह्मण नाही. कदाचित हा शब्द टंकताना गलती झाली असावी.--वाचक्‍नवी

अगदी अगदी

असेच वाटते. फार उत्तम विश्लेषण, बिरुटेसाहेब.
शिवाय बौद्ध धर्माच्या चालीरितींचा प्रभावही कमी होण्यासाठी महानुभाव चक्रधरस्वामींसारखा मूळ गुजराती संतही या मराठी मातीतच रुजावा लागला. साधारण याच काळात गुजरातेत वल्लभाचार्य, दक्षिणेत मध्व,रामानुज, पुरंदरदास असे संत (वैष्णव) भक्तीमार्गाचीच द्वाही फिरवित होते. (चु.भू.द्या.घ्या.)... हिंदू धर्मावरील सांस्कृतिक आक्रमण थोपवून त्यातून विजयनगर आणि रायगड अशा हिंदवी राजधान्या निर्माण होऊ शकल्या कारण शक्ती निर्माण करू शकणारी भक्ती अस्तित्वात राहिली.

सहमत !!!

काही मुठभर संत, त्यांचे पारमार्थीक विचार हे लक्षावधी लोकांच्या मरगळीस कारणीभूत म्हणणे हा देखील सोपा पलायनवाद असे वाटते.

सहजरावांच्या विचारांशी १००% सहमत !!!
यना सर, शिर्षक वाचून आम्हाला नेहमीप्रमाणे हे कोडे आहे, असे वाटले आणि मग वाचून कोड्यात पडलो तुम्ही विद्रोही ब्राम्हण (१) या भानगडीत का पडला, हे कोडे अगोदर सोडवा. उत्तरे व्य. नि. ने नको इथेच लिहा. : ) ( ह.घ्या )

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वैचारीक विषय आणि चर्चा

वैचारीक विषय आणि चर्चा आवडली. चर्चेला गालबोट लागू नये ही मनापासून इच्छा !

आपला
कॉ.विकि

 
^ वर