कसा जागवला जातो

भारताने सोळा डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तान बरोबरील युद्धात विजय मिळवला होता.
हा दिवस विजय दिन म्हणून साजरा केला जातो.
भारतीय सैन्याने जे काही अतुलनिय शौर्य या युद्धात दाखवले नि पाकिस्तानच्या सैन्याला पाणी पाजले, हे भारतीय जनता कदापी विसरू शकणार नाही असे म्हंटले गेले.
मात्र आज परिस्थिती पाहता, असे काही झाले होते याची आठवण करून देण्याची वेळ आली आहे की काय असे वाटते. कारगील युद्धाच्या वेळी चर्चगेटला, जीन्स ची स्टायलीश फाटकी पँट, अंगात यु एस ए लिहिलेला टी शर्ट व हातात पेप्सि ची कॅन घेवून "हेय व्हॉट्स् कागील?" असे विचारणारे लोक होते ते लोण आता सगळीकडेच पोहोचले आहे की काय असे वाटावे, अशी परिस्थिती दिसून येते आहे.
असे काही दिन आले की (माझ्या सारख्या काही)लोकांना जाग मग नंतर, "मरोत ते सीमेवरील सैनीक, पैले पैसा दिखाव"; असा काहीसा भाव असलेला समाज पाहून अजूनच अस्वस्थ व्हायला होते.

या सगळ्या पार्श्वभूमीवर, एकेकाळी सगळ्या राष्ट्राला महत्व असलेले हे दिन; आज मात्र काय साधतात असाच प्रश्न माझ्या मनाला पडला आहे.
म्हणजे दर वेळेला यामुळे काही खळबळ उडावी असे नाही. पण या दिनांनिमित्त काही विधायक कार्ये दर वर्षी घडली तर समाजाला याची किंमत राहील असे वाटून गेल्या शिवाय् रहावत नाही.

आज उपक्रमावरचे अनेक सदस्य वेगवेगळ्या देशांत आहेत. त्या त्या देशात असे काही विजय दिनही असणार. हे दिन कसे साजरे केले जातात या विषयी काही माहिती देवू शकलात, चर्चा करू शकलात तर आवडेल. तसेच या देशातल्या नागरीकांचीला आपल्याला वर्तमानपत्रे आदीतून कळलेली मत-मतांतरेही यात आली तरी चालतील.

इतर देशांत कसा जागवला जातो देशाभिमान?

आपला
गुंडोपंत

लेखनविषय: दुवे:

Comments

देशाभिमान

प्रथम विजनदिना निमित्त शुर जवानांच्या पुण्यस्मुतीस वंदन करतो. व इतकी समयोचित चर्चा सुरु केल्याबद्दल गुंडोपंतांचे आभार!!

मी भारताव्यतिरिक्त केवळ अमेरिका पाहिली आहे. अमेरिका व आयर्लंड हे जगातील नं.१ देशाभिमानी देश समजले जातात*. मला तरी अमेरिकेत लोकं 'जबाबदार' वाटली. देशाभिमान हा फक्त युद्धाशीच निगडित आहे असं मला तरी वाटत नाही. व्यक्तीच्या रोजच्या वागण्यातून देशविघातक होऊ नये हे भान असणं हा देशाभिमान असं मी मानतो. यात मला केवळ सुरक्षेच्या दृष्टीने विघातक म्हणायचं नसून, प्रत्येक बाबतीत म्हणायचं आहे.
अमेरिकेतील जागोजागी अभिमानाने फडकते झेंडे हे देशाभिमान जागृत ठेवण्यात मोलाचा वाटा उचलतात असं मला वाटतं. अगदी लायब्ररीपासून ते कॅपिटलहाऊस पर्यंत जवळ जवळ प्रत्येक सरकारी ठिकाणी झेंडे तर् दिसतातच; पण अनेक घरांबाहेरही झेंडे लावलेले आढळतात. आणि या राष्ट्रध्वजाचा अपमान झालेला कुठेही दिसत नाही. प्रत्येक रस्त्यावरच्या ३०-४०% घराबाहेर अमेरिकन फ्लॅग फडकताना आढळतील. (तुलना करायची तर आपल्याकडेचे रस्त्यावर धुळ खाणारे, गटारांमधे पडलेले, फाटलेले झेंडे आठवतात :-( )

याशिवाय लोकांचा न्यायसंस्थेतील वाटा यालाही मी देशाभिमान जागवण्यात मोलाचं स्थान देईन. इथे प्रत्येक नागरीकाला "ज्युरी"सदस्य म्हणून वर्षातील एक दिवस न्यायदानात भाग घ्यावा लागतो. यात कायद्याचं ज्ञान आवश्यक नसलं तरी "देशाचा नागरीक" म्हणून असलेल्या हक्का बरोबरच् अशी कर्तव्ये पार पाडायला लावल्याने देशाचा नागरीक म्हणून असलेली जबाबदारी अंगात भिनते.

मात्र सरकारतर्फे साजरे होत असलेले दिवस मात्र केवळ सुट्टी या नजरेनेच पाहिलं जातं. अपवाद स्वातंत्र्यदिनाचा. इथे यानिमित्त नेत्यांच्या भाषणबाजीऐवजी नागरीकच उत्स्फुर्ततेने हा दिवस साजरा करतात. मोठ्यामोठ्या व्यावसायिकांतर्फे आतषबाजी होते.(आपल्याकडेही आधिच्या पिढितली लोकं अजूनहि स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व राखुन आहेत. आजी असे पर्यंत आमच्या घरी यादिवशी खास पंचपक्वान्न होत असत. आता हेच प्रमाण एखाद्या गोड पदार्थावर आलय :-( ).

तसेच बर्‍याच ठिकाणी युद्धात कामी आलेल्या सैनिकांनी स्मृतीस्थळं बांधुन त्यांचं पावित्र्य बर्‍याचदा राखलेलं दिसतं. याशिवाय देशात आखुन दिलेले नियम मग ते व्यावसायिक कायदे असोत वा वाहतुकीचे नियम पाळण्याचा कटाक्ष मी तरी देशाभिमानामुळेच भिनतो असं मानतो.

*पहिले १० देशाभिमानी नागरीक (कंसात देशातिल कीती % लोकांना आपण या देशाचा नागरिक असल्याचा अभिमान वाटतो ते दिले आहे. अर्थात पहिल्या दहात भारतीय नाहित)
१) अमेरिका (७७%)
१) आयर्लंड (७७%)
३) ऑस्ट्रेलिया (७०%)
४) कॅनडा (६०%)
५) ऑस्ट्रीया (५३%)
६) यु.के. (५३%)
७) नॉर्वे (४८%)
८) फिनलंड (४४%)
९) स्वीडन (४३%)
१०)डेन्मार्क (४२%)

वा!

वा पहिलाच छान प्रतिसाद.
देशाभिमानाचे विवेचनही उत्तम केले आहेस, आवडले!

मात्र ही यादी कोणत्या ठिकाणाहून आणली आहेस?
तसेच या यादीचे देशप्रेमाचे निकष काय होते हे पाहणेही महत्वाचे ठरेल.

बहुतेक पाश्चात्य नावे या ठिकाणी पाहून ही कुणा पाश्चात्य प्रसार माध्यमाची यादी असावी की काय असे वाटले.

आपला
गुंडोपंत

विदा

ही टक्केवारी केवळ एकाच प्रश्नाच्या उत्तराची आहे. "तुम्हाला स्वतः "क्ष" देशाचा नागरीक असल्याचा अभिमान वाटतो का?". अर्थात या प्रश्नाच्या उत्तरावरून केवळ देशाभिमान दिसतो. पण देशप्रेम अथवा राष्ट्र्वाद दिसत नाही.
तरीही यात भारत नाही याचे मला तरी आश्चर्य वाटले नाही
-ऋषिकेश

देशाभिमान

कुठल्याही संकल्पनेप्रमाणेच , "देशाभिमान" या संकल्पनेचाही आदर करायचा तो त्याबद्दलच्या जागरूकतेने ; असे मला वाटते. अगदी व्यक्तिगत पातळीवर "देशप्रेम या कल्पनेबद्दल तुम्हाला काय वाटते ?" "तुमच्या जन्मभू वा कर्मभूबद्द्ल राष्ट्रप्रेम या कलमाखाली तुम्ही नक्की काय करता ?" या प्रश्नाची नेमकी उत्तरे मला एकदम एका फटक्यात नाही देता येणार. माझे माझ्या भाषेवर , ज्या प्रदेशात मी वाढलो त्या माझ्या प्रदेशावर , तिथल्या लोकांवर प्रेम आहे. त्यांच्याबद्द्लच्या बर्‍यावाईट गोष्टींशी , सुख-दु:खांशी मी नाते सांगू शकतो. पण हेच क्षितिज "देश" , "राष्ट्र" या पातळीपर्यंत रुंदावले की मला भांबावल्यासारखे होते. राष्ट्र्प्रेम करायचे म्हणजे (मराठी प्रदेश वगळता , यात गोवा आलाच . आणि हो , बेळगाव-धारवाडही.) नक्की कुणावर प्रेम करायचे ? यू पी , बिहार वर ? तमिळ-तेलुगुवर ?आणि कसल्या पायावर ?

माझ्या वाढत्या वयात अनेक अमराठी लोकांशी मैत्रीचे , व्यवसायानिमित्त , अणि इतर कारणाने सौहार्दाचे संबन्ध प्रस्थापित झाले. माझ्या वकूबाप्रमाणे मी त्यांची जीवनसरणी, त्यांचे साहित्य , त्यांचे हर्षमर्ष जाणून घेतो. त्याना माझ्या वैयक्तिक आयुष्याबरोबर माझ्या "मराठी'पणाच्या अंगाचे दर्शन नक्की घडले असेल. हे सर्व खरे असले तरी गाडी "राष्ट्र्प्रेमाच्य" रुळांवर आली की थोडा गोंधळ हा उडतोच.

येथे एक स्पष्टीकरण द्यायला हवे. मी काही फुटिरतावादी नाही. "अनेकता मे एकता" "युनायटेड् वी स्टॅंड" , "मेरा भारत महान"आदि गोष्टींची मला नव्याने ओळख नको. माझे उत्तर एका अगदी छोट्या (पण कोत्या नव्हे ! :-) ) माणसाचे एक प्रामणिक असे प्रतिबिंब आहे.

यावर थोडे अजून बोलता येईल. एकूण चर्चेच्या ओघाने हे पुढे कदाचित् येईलही. तुम्हाला काय वाटते ?

सुरेख

अतिशय सुरेख प्रतिसाद. लोकशाहीप्रमाणेच देशप्रेम या शब्दालाही अनेक कंगोरे व छटा आहेत! सध्याच्या संक्रमणामध्ये राष्ट्रवाद म्हणजे देशप्रेम मानणे गुंतागुंतीचे होईल.

नाहीच..

सध्याच्या संक्रमणामध्ये राष्ट्रवाद म्हणजे देशप्रेम मानणे गुंतागुंतीचे होईल.

राष्ट्रवाद म्हणजे बहुसंख्यांकाचा जमातवाद, त्याला देशप्रेम मानणे चुकीचेच!

(देशप्रेमी) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सहमत

मुक्तसुनितशी सहमत आहे. यावर पंकज कुरुलकरांचाही एक लेख साधना तसेच अनुभव मध्ये वाचला होता. माझ्याकडे ते लेख संग्रही असणारच. पण ते स्कॅनकरुन टाकावे लागतील. उपक्रमींना तो लेख अतिशय आवडेल.
प्रकाश घाटपांडे

खरे आहे

आपले म्हणणे खरे आहे असे जाणवते.
सामाजिक जाणीवेच्या भावनांच्या सुक्ष्म पातळ्या अलगदपणे उलगडल्या आहेत आपण असे वाटते.
आणि रोजच्या जीवनात आपण सगळेच उपरोल्लेखीत भावनांचा अनुभव घेतच असतो.

पण त्यातही जेंव्हा देशावर एखादे युद्धासारखे संकट उभे राहते, तेंव्हा या भींती ही अंतरे चटकन विरघळतात हे पण तितकेच खरे.

आपला
गुंडोपंत

देशाभिमान

दुसर्‍या महायुद्धात जेव्हा ब्रिटनच्या सैनिकांना युद्धकैदी म्हणून पकडण्यात आले. त्यावेळी युद्धकैद्यांकडून पूल बांधून घेत. त्यावेळी ब्रिगेडच्या अधिकार्‍याने आपल्या सहकार्‍यांना सांगितले . पूल असा बांधा कि जेणेकरुन जगाच्या इतिहासात त्याची नोंद झाली पाहिजे "हा पूल सहजा सहजी कोसळणार नाही . कारण तो "ब्रिटनच्या" युद्धकैद्यांनी बांधला आहे. कारण युद्धकैदी हे काम करताना "कंन्स्ट्र्क्शन" चे करतात पण संधी मिळाली कि विचार मात्र "डिस्ट्र्क्शन" चे असतात. कारण ते काम म्हणजे शिक्षा असते. पुल कसा कोसळेल हाच विचार मनात असतो.
पण पुण्यातील संगम पूल हा ब्रिटिश कंपनीने बांधला होता. पुलाचे आयुष्य त्यांचे करारानुसार संपल्यावर त्याचे पुणे महानगरपालिकेला पत्र आले कि आता सदर पुलाची आमची "हमी" सम्पलेली आहे. ही बातमी मात्र मी वर्तमानपत्रात वाचली होती.
अवांतर- पहिल्या किस्सा हा मी पुण्यातील विद्वज्जनांकडून ऐकलेला आहे त्याचे संदर्भमात्र माझेकडे उपलब्ध नाही.
प्रकाश घाटपांडे

बहुधा

जर मी चुकत नसेन तर पहिला किस्सा 'द ब्रिज ऑन द रिव्हर' क्वाय या चित्रपटाची कहाणी आहे. (चूभूद्याघ्या)

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलासुद्धा सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका...विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

हा म्हणजे

राजेंद्रा,
हा चित्रपट म्हणजे म्हणजे, पुर्वे कडील देशात, म्यानमार की थायलंड च्या एका नदीवर बांधल्या जाणार्‍या पुलाचे नाट्य आहे का?
तोच असेल तर, मी मागे वाचले होते की या चित्रपटाचा शेवट काल्पनिक आहे.
मी स्वत: पाहिला नाहीये हा चित्रपट, पण बघायची इच्छा आहे.

आपला
गुंडोपंत

द ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय

पंत,

हा चित्रपट झकास आहे. मला तर बा आवडला. सैनिकांच्या मनातील घालमेल. पूल बांधून शत्रूला मदत करावी की "ब्रिटीश" सैन्याची छाप सोडावी या द्वंद्वातून या मरगळलेल्या युद्धकैद्यांना जीवंत करणारा त्यांचा अधिकारी तर मस्तच. नक्की बघा.

आपला,
भास्कर
आम्ही येथे वसतो.

आठवत नाही..

पंत,
हा चित्रपट पाहून बरेच दिवस झाले, त्यामुळे कथानक आणि शेवट विशेष आठवत नाही. तसेच कितपत सत्य आणि कितपत काल्पनिक याबद्दलही माहिती नाही.
कलोअ,
----
मजकूर संपादित.

अवघड

मी बर्‍याच अंशी मुक्तसुनीत यांच्याशी सहमत आहे. आमच्या पिढीने स्वातंत्राच्या फक्त गोष्टी ऐकल्या/वाचल्या, पारतंत्रामध्ये रहाणे नेमके कसे असते याचा अनुभव नाही. युद्ध पाहिले ते फक्त कारगिलचे, तेही न्यूझ चॅनेलवरून.
अशा पार्श्वभूमीवर देशप्रेम, देशाभिमान असे शब्द ऐकले की गुदमरायला होते. कृपया याचा उलटा अर्थ काढू नये. भारत-पाकिस्तान म्याच असेल तर १०००% भारत जिंकावा असेच वाटते. पण आजकाल देशाभिमान किंवा भाषेचा अभिमान या गोष्टींमुळे तोटे जास्त होतात असे वाटते.

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलासुद्धा सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका...विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

आपण

आपण देशाभिमानाच्या बेगडी स्वरूपामुळे तसे म्हणत आहात का?
अतिशय दिखावटी स्वरूपाच्या तद्दन क मालिकांमध्ये शोभणार्‍या पद्धतीचे तात्पुरते 'देशाभिमानी' (?)
प्रकार पाहिले की नकोच तो देशाभिमान असेच वाटायला लागते!

पण त्याच वेळी कारगील च्या काळात देश संघटीतपणे कसा उभा राहू शकतो हे पण तर अनुभवले असेलच.
असो,
आपण ज्या देशात आहात तेथे काय परिस्थिती आहे? तेथेही याचे राजकिय भांडवल केले जातेच का?
अस्मिता जागती ठेवण्यासाठी नक्की काय करतात तेथले लोक?

आपला
गुंडोपंत

खुलासा

पंत,
माझा आधीचा प्रतिसाद त्रोटक होता त्यामुळे त्यावरून गैरसमज होण्याची शक्यता जास्त.
आधी म्हटल्याप्रमाणे प्रत्यक्ष युद्ध अनुभवण्याचा प्रसंग कधी आला नाही. जे युद्धाचे कव्हरेज बघितले त्यामध्ये वाहिन्यांचा आपली रेटींग वाढवण्याचाच प्रयत्न दिसला. कारगिलचे युद्ध टाळता येणे शक्य नव्हते कारण ती सरळ घुसखोरी होती. सुदैवाने भारताने कधीही, कुणावर युद्ध लादलेले नाही. (बांग्लादेशच्या बाबत यावर दुमत होऊ शकेल पण ते विषयांतर होईल.) पण सध्या इराकचा जो फियास्को चालला आहे त्यामुळे युद्ध या संकल्पनेविषयी नावड निर्माण होते आहे.
आता मुख्य विषय, देशाभिमान. आपल्या देशाविषयी, संस्कृतीविषयी आपुलकी वाटणे साहजिक आहे, पण अभिमान वाटत नाही. कारण अभिमान म्हटला की आमचेच फक्त चांगले आणि तुमचे वाइट ही भावना येते. आपली रेघ मोठी करण्यासाठी दुसर्‍याची रेघ लहान करणे अपेक्षित असते. परत भारतात इतक्या प्रांतामध्ये जे निरनिराळे वाद आहेत त्याची आणि या अभिमानाची सांगड कशी घालायची हे अजून झेपलेले नाही. उदा. एखादा यूपीमधला सैनिक सीमेवर शौयाने लढला तर मला त्याचा अभिमान वाटतो. पण तोच सैनिक मुंबईत कामधंदा शोधायला आला तर परप्रांतीय म्हणून त्याला हाकलून द्यायचे हे गणित मला जमत नाही.
युद्धात लढणाया सैनिकांबद्दल मला नेहेमीच आदर आहे, मग तो कुठल्याही देशाचा असो. अडचण ही आहे की आपण का लढतो आहोत याचा बहुतेक वेळा सैनिकांना पत्ताही नसतो कारण युद्ध का करायचे हा निर्णय राजकारण्यांच्या हातात असतो. इराकमध्ये आता जी जीवीतहानी झाली त्याचा काहीही गरज नव्हती. या युद्धात विजय़ी वीरांना शूर म्हणण्याऐवजी दुर्दैवी म्हणावेसे वाटते कारण युद्धाचा निर्णय ज्यांना माणूस म्हणवून घेण्याचीही लायकी नाही अशांनी घेतला आहे. हे सर्व पाहिल्यावर ९९% वेळा युद्ध टाळता येते असे वाटू लागते. विशेषत: अमेरिकेची 'बॉम्ब फर्स्ट, आस्क क्वेश्चन्स लेटर' ही नीती पाहिल्यावर.
आता युद्ध सोडून बाकीच्या गोष्टींकडे पाहू. एखाद्या भारतीयाने काही केले तर त्याचा अभिमान वाटतो का? अभिमान नाही वाटत, कौतुक म्हणता येईल. पण मग यात देश कसाकाय येतो? सुनिता विल्यम्सचा दूरान्वयाने भारताशी संबंध म्हणून लगेच तिचा अभिमान का वाटला पाहिजे? एखादी चांगली गोष्ट कुणीही केली तर त्याचा आनंद वाटायला हरकत नाही. मग तो/ती ग्वाटेमालात असो की रशियात.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर की इथे काय परिस्थिती आहे. इटली फारसा युद्धाच्या भानगडीत पडत नाही. तरीही इराकमध्ये पाठवलेले सैनिक परत आले की त्यांचा सत्कार वगैरे होतो. यातही नवीन पिढीचे काय मत आहे याची कल्पना नाही. इटालियन लोकांना त्यांच्या कल्चरचा मात्र अभिमान आहे.

आपला,

----
मजकूर संपादित. व्यक्तिगत स्वरूपाच्या आणि विषयाशी संबंधित नसणार्‍या टिप्पणी करता खरडवही किंवा व्य. नि.चा वापर करावा. - संपादन मंडळ.

घाटपांडे काका

पंकज कुरुलकरांचा लेख टाकाच ! आणि हो , त्या जखोटियांचा टाकलात तरीसुद्धा मजा येईल.

अरे!

अरे!
अमेरिके विषयी ऋषिकेश ने लिहिले. हे चमत्कारिक आहे खरे.
इतक्या देशांचे नागरिक तेथे येतात तेथलेच होतात, नि परत आपल्या देशावर प्रेम करत अमेरिकन अभिमानही जपतात. मला उलगडत नाही बॉ!
अमेरिकेत नागरिक असलेल्या इराकी लोकांना नक्की काय भावना असतील?
काय घडत असते या द्विधा मनांमध्ये अशा वेळी?

इतर देशांत देशाभिमानाविषयी काय चालते ते कुणी तर लिहा?
जर्मनी? युके? इटली? ऑस्ट्रेलिया?
शिवाय चीन?
कुणी आफ्रिकेतून?

शिवाय अरबांचे काय? ते तर अति कडवट...
नि इस्राएल?
मला माहित आहे, येथे आपले उपक्रमी लोक आहेत ते! :))
मी तुलना करण्याचाही प्रयत्न करतोय... पण कुणी सांगितलेच नाही तर कसे कळणार की कसे आहे देशाभिमानाचे स्वरूप?
अर्थात त्यासाठे इतिहासही पाहावच लागेल त्या त्या देशाचा तुम्हाला... पण तो तर काय बोलत बोलतही मिळतोच की...

आपला
गुंडोपंत

दोन किस्से

अमेरिकेत टेक्सास राज्यात मेक्सीको देशाच्या सिमेलगत असलेल्या गावांना 'बॉर्डर टाउन्स' म्हणतात. ही गावे म्हणजे मुख्यता अमेरिकन नागरीक असणार्‍या मूळच्या मेक्सिकन लोकांची बहुसंख्य वसती असणारी गावे आहेत. आमच्या इथे तिथून आलेला एक (मेक्सिकोत जन्म घेतलेला) माझा मित्र आहे. त्याच्याशी गप्पा मारताना मी त्याला विचारले होते की, तुम्ही मेक्सिकोला इतके खेटून आहात, तरीही अमेरिकेचे नागरीक आहात तेव्हा तुम्हाला नक्की कशाचे प्रेम/अभिमान वाटतो? त्यावर त्याने, 'कुणाचाही नाही !!'असे म्हणून 'आय हेट् मेक्सिकन्स्' ह्या उद्गाराने वाक्य संपवले.

दुसरा किस्सा एकदा इथल्या जन्माने अमेरिन नागरीक असणार्‍या भारतीय वंशाच्या मित्राचा. एकदा बार मध्ये आम्ही बसलेलो असताना तिथली एक वेट्रेस आम्हाला मुद्दाम नीट सेवा देत नाही आहे असे तो म्हणाला. मला काही तसे जाणवले नव्हते, पण मी म्हणालो हे रेसिजम मूळे का? त्यावर तोच ,' मला भारताचा अभिमान आहे, पण टीप वगैरे देण्याच्या कंजुष पणामूळे आणि सतत फुकटात जास्तीत जास्त उकळू पहाण्याच्या वृत्तीमूळे, इंडीयन्स आर् नोन ऍज चीप बास्टर्ड्स् , आय हेट देम!' असेही म्हणाला.

हे माझ्या निरिक्षणात आलेले दोन व्यक्तिंचे वैयक्तिक उद्गार आहेत. कृपया त्याचे जनरलायझेशन करू नये

वैयक्तिक अनुभव

एकदा बार मध्ये आम्ही बसलेलो असताना तिथली एक वेट्रेस आम्हाला मुद्दाम नीट सेवा देत नाही आहे असे तो म्हणाला. मला काही तसे जाणवले नव्हते, पण मी म्हणालो हे रेसिजम मूळे का? त्यावर तोच ,' मला भारताचा अभिमान आहे, पण टीप वगैरे देण्याच्या कंजुष पणामूळे आणि सतत फुकटात जास्तीत जास्त उकळू पहाण्याच्या वृत्तीमूळे, इंडीयन्स आर् नोन ऍज चीप बास्टर्ड्स् , आय हेट देम!' असेही म्हणाला.

असे अनुभव आम्हीही घेतलेले आहेत. विशेषतः, चांगल्या रेस्टॉरंट्समध्ये १५% पेक्षा कमी टिप्स देण्याच्या म्हणजे खाणे ५० डॉ.चे आणि टिप २ डॉ.ची असे करणारे भारतीय पाहिले आहेत. :( त्यामुळे भारतीयांना बरेचदा चांगली वागणूक मिळत नाही असे खुद्द माझ्या नवर्‍याचे मत आहे. परंतु हे देखिल जनरलायझेशन नाही, वैयक्तिक अनुभव आहेत याची नोंद घ्यावी.

मला आपल्या देशाबद्दल जिव्हाळा वाटतो, अमेरिकेबद्दलही वाटतो. अभिमान सहसा वाटत नाही.

देशाभिमान

मलाही ऋषिकेशप्रमाणेच काहीसे वाटते. " मला तरी अमेरिकेत लोकं 'जबाबदार' वाटली. देशाभिमान हा फक्त युद्धाशीच निगडित आहे असं मला तरी वाटत नाही. व्यक्तीच्या रोजच्या वागण्यातून देशविघातक होऊ नये हे भान असणं हा देशाभिमान असं मी मानतो. यात मला केवळ सुरक्षेच्या दृष्टीने विघातक म्हणायचं नसून, प्रत्येक बाबतीत म्हणायचं आहे."

अमेरिका हे तसे नवीन जग.

नव्या जगात जेव्हा असलेली बंधने शिथिल होत जातात, सीमा अस्पष्ट होत जातात तेव्हा दुसरीकडे नव्या बंधनांची/ नव्या सीमांची निर्मिती होते. या सर्वात माणसाला स्वतःचे काही तरी असण्याची, कुठेतरी स्वतःची मुळे असण्याची गरज वाटत असते. पण दुसरीकडे काळ एवढा बदलत असताना आपण न बदलून चालणार नाही, याचीही जाणीव असते. तसेच सर्वच सोडून दिल्यास सर्वसाधारण माणसाला "आयडेंटिटी" क्रायसिस तयार होईल असेही वाटते. अमेरिकेतील इमिग्रंट या सर्वातून गेले असावेत आणि जातात. त्यांना सध्याच्या अमेरिकेत त्यांच्या देशांच्या संस्कृती सुजाणपणे जपायला विरोध होत नाही हे माझे सामान्य निरीक्षण आहे. कुणाचा असा विरोध असला तरी त्याला कायद्याची संमती नाही आणि कायदे (बर्‍यापैकी) पाळले जातात.

लहान मुलांना शाळेत रोज प्रतिज्ञा वगैरे भारतातल्या शाळेसारखेच असते. झेंडे वगैरे असतातच पण अशा वरवरच्या प्रतिकांपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशात नव्याने आलेल्या व्यक्तीला देशाचे नियम/ कायदेकानू समजून घेता येतात एवढी व्यवस्था आहे. त्याप्रमाणे वागणे भाग पडते असेही आहे. आपण म्हणतो "परंपरांचा अभिमान" तो या अर्थाने इथेही आहे हे सांगावेसे वाटते. फक्त त्या परंपरा वेगळ्या आहेत.

विश्वम् कारणे...

नमस्कार गुंडोपंत,
हा चांगला विषय होता, पण टंकायला विशेष वेळ न मिळाल्याने १६ डिसेंबरनंतर उत्तर देत आहे. वास्तवीक १६ डिसेंबर सारखेच मला १३ डिसेंबर पण लक्षात राहतो... का ते समजले असेलच.

चर्चा बर्‍यापैकी देशाभिमान योग्य का वगैरे विषयावर जास्त चालू आहे म्हणून त्यासंबधीच मर्यादीत प्रतिसाद लिहीतो. आपला मूळ प्रश्न आहे की, "इतर देशांत कसा जागवला जातो देशाभिमान?". याचे सरळ उत्तर देण्याऐवजी, असा विचार करा की ज्याला "नॉर्मल सर्कमस्टन्सेस" म्हणता येतील त्या बाबतीत आपल्याला स्वतःबद्दल्, स्वतःच्या आई-वडील-कुटूंबाबद्दल, मोठे झाल्यावर बायका-पोरांबद्दल कधी प्रेम या अर्थाने (आणि येथे देशाभिमान हा शब्द मी देशप्रेमाशी समानार्थी समजत आहे) कधी शिकवावे लागते का? अर्थातच नाही... उद्या कोणी रस्त्यावरून जाणारा आपल्याला, अथवा आपला शेजारी - आपल्या घराच्यांबाबत, काहीतरी गैरभाषा वापरू लागला तर आपण ऐकू का? निदान मी तरी नाही... याचा अर्थ व्यक्तिगत पातळीवर ज्या काही रिऍक्शन्स या नागरी(सिव्हीलीटी) पद्धतीने देता येतील त्या देऊ, तेथे लढाई करायचा प्रश्न येत नाही! पण थोडक्यात आपल्याला तेथे स्वाभिमान, कुटूंबाचा अभिमान शिकवावा लागत नाही, तो आपसूकच येतो. (थोडासा पीजे: उद्या कुणा लग्न झालेल्या व्यक्तीस विचारले की तुमचे तुमच्या नवर्‍यावर/बायकोवर प्रेम आहे का. आणि त्यावर कोणी असे उत्तर दिले की त्याचं काय आहे, जगात इतके स्त्री/पुरूष आहेत की असे मी माझ्य बायकोवर प्रेम करतो/नवर्‍यावर प्रेम करते असे म्हणणे म्हणजे क्षूद्रपणा होतो!, तर विचार करा हे घरी समजल्यावर काय होईल..)

देशप्रेम करणारे कसे चुकीचे आणि त्याची गरज कशी नाही, ह्यावरचा वाद, एका मुलीच्या तोंडून ऐकताना, "काश्मिरी बायकांवर-पुरूषांवर (हिंदू म्हणून) अत्याचार झाले म्हणून संपूर्ण देशाने (नागरीकांनी) ओरडण्याची काय गरज आणि जगाला प्रेम 'कसे' अर्पावे", इत्यादी ऐकल्यावर, तिला जेंव्हा विचारले गेले की तुला जर कोणी कानाखाली वाजवले तर काय करशील तेंव्हा तात्काळ उत्तर आले की खून करीन! उत्तर चूक नव्हते. त्या मुलीने कुणाचा खून केला नसता पण रीऍक्शन नक्कीच दिली असती. थोडक्यात देशाभिमान ही एक जगण्यातील सुसंस्कृत राहण्याची एक विशिष्ठ पातळी आहे असे मला वाटते. जो स्व्त:चा आणि स्वतःच्या कुटूंबाचा विचार करू शकणार नाही तो समाजासाठी काय करणार आणि जो समाजासाठी/देशासाठी प्रेम ठेवू शकणार नाही तो जगासाठी थोडेच ठेवू शकणार आहे!

असो. ह्या नमनाला घडाभर तेल लावण्याचे कारण इतकेच की देशाभिमान आहे याचा अर्थ आपण आक्रस्ताळे आहोत, कोत्या मनोवृत्तीचे आहोत अथवा इतरांचा द्वेष करतो असा घेण्याचे कारण नाही. वर चर्चेत आल्याप्रमाणे अमेरिकन्सना देशाभिमान असतो. अगदी परस्परविरोधी मते असणार्‍या लेफ्टीस्ट (अमेरिकन लिबरल्स - भारतीय कम्यूनिस्ट नाही!) आणि राईटीस्ट (अमेरिकन कॉन्झर्वेटीव्हज् - पण सर्वसाधारणपणे प्रोबिझनेस) मधेपण जेंव्हा देशाबाबत निर्णय घेण्याची / देशाचा स्वार्थ बघण्याची वेळ येते तेंव्हा एकमेकांच्या विरोधात नसतात. आणि हो कॉलींग स्पेड अ स्पेड हे करताना मतैक्य असते, त्याला उत्तर शोधताना मतांतरे असली तरी. (उ.दा. इराणच्या बाबतीत अथवा क्यूबाच्या बाबतीत कोणीच त्यांना काय वाटेल याचा विचार करत प्रेम अर्पण्याची भाषा करत नाहीत). तर अशा अमेरिक्न्सना अथवा इतर प्र्गत राष्ट्रातील नागरीकांना जर असे म्हणालात की मी "ह्युमॅनिस्ट" आहे आणि मी देशापेक्षा जगाला मानतो वगैरे तर ते मनात हसतील आणि म्हणतील "नो वंडर..."

आपल्याकडे एक छान संस्कृत वाक्य आहे, ते वर म्हणलेल्या पायर्‍यापायर्‍यांनी मोठे होण्याबद्दल बोलते: (जसे आठवते तसे लिहीत आहे..)

गृहं कारणे स्वय्ं त्यजेत्
ग्रामंकारणे गृहं त्यजेत्
राष्ट्रम् कारणे ग्रामम् त्यजेत् (याच्या आधी आत्ताच्या पद्धतीने राज्यपण येऊ शकेल)
विश्वम् कारणे राष्ट्रम् त्यजेत्

अर्थ सोपा असल्याने येथे लिहीत नाही. पण वरील सर्व वचनांऐवजी, भारतीयांना फक्त "स्वयं कारणे सर्वम् त्यजेत्" असेच म्हणायची (अर्थात मनातल्या मनात) सवय लागली आहे... परीणामी बर्‍याचदा ना धड आप्तस्वकीयांचे ना धड देशाचे आणि ना धड विश्वाचे पडलेले असते...

शेव्टी एकच सांगावेसे वाटते की जगात दोन थोर "पॅसिफिस्ट" व्यक्ती २०-२१ व्या शतकात होऊन गेल्या आहेत (त्यातील एक सुदैवाने हयात आहे): एक अर्थातच महात्मा गांधी आणि दुसरे दलाई लामा. जगाला प्रेम अर्पावे म्हणणार्‍या या दोनही विभूतींना ब्रिटीशांविरुद्ध आणि चीन विरूद्ध लढावे लागले/लागत आहे. प्रेमाचा संदेश देत असताना पण स्वतःच्या माणसांचा आणि देशाचाच/प्र्देशाचाच विचार करावा लागला - लागत आहे/स्वार्थ ठेवावा लागला - लागत आहे, तेथे तुम्ही आम्ही कोण लागून गेलो!

 
^ वर