कथा मायक्रोवेव्ह भट्टीची

आज बऱ्याच घराघरातून 'प्रतिष्ठेचे चिन्ह' म्हणून खरेदी केली जाणारी, 'मी मायक्रोवेव्हमध्ये शेंगदाणे भाजते/भाज्या बनवते/बटाटे उकडते','आम्ही हल्ली चहा कॉफी पण मायक्रोवेव्हमध्ये करतो.' असे शेजारणीपाजारणींना अभिमानाने सांगावेसे वाटावे अशी हीच ती 'सूक्ष्मलहरी भट्टी' उर्फ मायक्रोवेव्ह ओव्हन.

'सूक्ष्म लहरींचा उपयोग खाणं शिजवण्यासाठी केला जाऊ शकतो' हा शोध मात्र योगायोगानेच लागला. १९४६ सालच्या एका दिवशी पर्सी स्पेन्सर नामक अमेरिकन संशोधक रडारसाठी लागणाऱ्या 'मॅग्नेट्रॉन' या उपकरणावर प्रयोग करत होता. अचानक त्याने पाहिले की त्याच्या खिशातला खाद्यपदार्थ वितळत होता. स्पेन्सरला वाटलं की हा नक्की मॅग्नेट्रॉनमधून निघालेल्या सूक्ष्मलहरींचा परिणाम आहे. त्याचं कुतूहल चाळवलं आणि त्याने मॅग्नेट्रॉनजवळ थोडे मक्याचे कोरडे दाणे ठेवून पाहिले. क्षणात ते तडतडून त्यांच्या लाह्या बनल्या.

दुसऱ्या दिवशी स्पेन्सरने परत हाच प्रयोग करण्याचं ठरवलं. यावेळी त्याचा एक उत्साही सहकारी पण त्याच्याबरोबरच होता. त्यांनी एक अंडं मॅग्नेट्रॉनजवळ ठेवलं. अंडं काही क्षणात थरथरायला लागलं. अर्थातच अंड्याच्या आतला द्रव उष्णतेने विचलित झाल्याने ते हालत होतं. स्पेन्सरचा सहकारी जरा नीट पाहायला जवळ सरकला आणि .. त्या अंड्याचा स्फोट होऊन आतला ऐवज त्याच्या चेहऱ्यावर उडाला! जर सूक्ष्मलहरींनी अंडे इतक्या लवकर शिजले तर इतर अन्न का नाही? यातूनच आणखी प्रयोगांना चालना मिळाली. नंतर स्पेन्सरने एक धातूचं खोकं तयार करून त्यात अन्न ठेवलं आणि त्या खोक्याला ठेवलेल्या छिद्रातून सूक्ष्मलहरी आत अन्नावर सोडल्या. काही सेकंदातच अन्न गरम झालं.

स्पेन्सरच्या शोधाने खाद्यक्षेत्रात एक नवी क्रांती केली होती. १९४७ मध्ये जगातली पहिली मायक्रोवेव्ह भट्टी 'रडारेंज' नावाने बाजारात आली. ही नवीन भट्टी आकाराने मात्र आजच्या मायक्रोवेव्ह भट्ट्यांपेक्षा बरीच अवाढव्य होती. ही अशी दिसायची ६ फूट उंचीची आणि जवळजवळ ३४० किलो वजनाची पहिली मायक्रोवेव्ह भट्टी:

अर्थातच सुरुवातीला या शोधाला विशेष प्रतिसाद मिळाला नाही.ही भट्टी गैरसोयीची वाटण्यामागे एक कारण हेही होतं की मॅग्नेट्रॉन चे तापमान नियंत्रित करायला पाणी वापरलं जात होतं. पण लवकरच मायक्रोवेव्ह भट्टीच्या आकारात सुधारणा झाल्या, पाण्याऐवजी शीतलनासाठी (कूलिंगसाठी) हवा वापरणारे मॅग्नेट्रॉन वापरून भट्ट्या बनवल्या. आणि मायक्रोवेव्ह भट्टीचा शोध प्रसिद्ध झाला.१९५८ च्या 'रिडर्स डायजेस्ट' मध्ये स्पेन्सरवर लेख छापून आला.

मायक्रोवेव्ह भट्ट्यांच्या वाढत्या लोकप्रियतेबरोबरच लोकांनी या भट्टीचे निरनिराळे कल्पक उपयोग शोधायला सुरुवात केली. बटाट्याचे वेफर मायक्रोवेव्हमध्ये वाळवणे, कॉफीच्या बिया भाजणे, शेंगदाणे भाजणे, गोठलेले मांस वितळवणे, मांस शिजवणे हे झाले खाद्यक्षेत्रातील काही उपयोग. अनेक क्षेत्रात कागद वाळवणे, चामडे वाळवणे, चिनीमातीच्या वस्तू वाळवणे,काडेपेट्यांची गुलं वाळवणे यासाठीही मायक्रोवेव्ह भट्टी वापरली जाऊ लागली. सुरुवातीला मायक्रोवेव्ह भट्टी आणि या सूक्ष्मलहरींचे शरीरावर विपरीत परिणाम याबद्दल बऱ्याच भीतीयुक्त समजुती होत्या. पण नवनवीन सोयींबरोबर ही भीती कमी होत गेली. १९७५ पर्यंत मायक्रोवेव्ह भट्टीची विक्री बरीच वाढली होती.

'सूक्ष्मलहरींनी खाद्यपदार्थ शिजतो' म्हणजे नेमकं काय होतं बरं? जास्त वारंवारतेच्या सूक्ष्मलहरी जेव्हा खाद्यपदार्थातील पाण्याच्या रेणूंतून जातात तेव्हा 'डायइलेक्ट्रिक हिटिंग' या गुणधर्माने त्या पाण्याचे तापमान वाढते. आणि ही पाण्यातील उष्णता पदार्थ शिजवते.
१. पाण्याच्या रेणूच्या एका टोकाला धनभार आणि एका टोकाला ऋणभार असतो.(याला आंग्लभाषेत 'डायपोल' असे म्हणतात.)
२. सूक्ष्मलहरी पदार्थाच्या आजूबाजूला खेळवल्यावर विद्युतक्षेत्र तयार होते. हे विद्युतक्षेत्र सूक्ष्मलहरींची वारंवारता (फ्रीक्वेन्सी) जास्त असल्याने वेगाने दिशा(पोलॅरीटी) बदलत असते.
३. पाण्याचे रेणू विद्युतक्षेत्राच्या दिशेप्रमाणे आपली धन आणि ऋण टोके योग्य रितीने लावून घेण्यासाठी हालचाल करतात.
४. विद्युतक्षेत्र प्रचंड वेगाने दिशा बदलत असल्याने पाण्याचे रेणूही सारखी आपली दिशा क्षेत्राच्या अनुकूल बनवण्यासाठी उलटसुलट हालचाल करतात आणि या प्रक्रियेत फिरतात.
५. असे फिरणारे अनेक रेणू एकमेकांना घासतात/एकमेकांवर आपटतात. या घर्षणाने उष्णता निर्माण होते.

आज बाजारात असलेल्या मायक्रोवेव्ह भट्ट्यांत वेगवेगळ्या पदार्थांसाठी वेगवेगळे तापमान/मायक्रोवेव्हच्या शक्तीची वेगवेगळी टक्केवारी ठेवण्याची सोय असते. मूळ सूक्ष्मलहरींची वारंवारता मात्र त्यासाठी बदलली जात नाही. एकाच वारंवारतेच्या सूक्ष्मलहरी कमी/जास्त वेळ चालू बंद करून हा कमी अथवा जास्त तापमान ठेवण्याचा परिणाम साधला जातो.

मायक्रोवेव्ह भट्टीचे फायदे:
१. ठरवलेल्या शिजण्याच्या वेळेनंतर भट्टी आपोआप बंद होत असल्याने पदार्थ ठेवून विसरल्यासही आग इ. दुर्घटना घडत नाहीत, ज्या विस्तवावर पदार्थ विसरल्यास घडू शकतात.
२. पेट्रोलियम इंधनाची बचत
३. पदार्थ तळण्यापेक्षा भाजल्याने त्यात चरबीचे प्रमाण कमी.

मायक्रोवेव्हच्या काही त्रुटीही अनुभवांती आढळून आल्या:
१. उष्णनाचे (हिटींगचे) प्रमाण भट्टीच्या अंतर्भागात सर्वत्र समान प्रमाणात नाही. तसेच पदार्थ मायक्रोवेव्ह भट्टीच्या अगदी मध्यभागी ठेवल्यास तो सर्वत्र समान शिजत नाही कारण फिरणाऱ्या त्या बशीवर मध्यभागी ठेवल्याने तो फिरत नाही आणि काही भागांनाच जास्त उष्णता मिळते.
२. सूक्ष्मलहरी बर्फावर पाण्याइतक्या तीव्रतेने काम करत नाहीत, कारण बर्फाचे रेणू ठराविक रचनेत पक्के बांधलेले असल्याने ते सूक्ष्मलहरींनी हालचाल करत नाहीत. परीणामतः अत्यंत गोठलेले मांस/पदार्थ जिथे बर्फ साठलेला असेल त्या भागात लवकर शिजत नाही.
३. सुरक्षितता: मायक्रोवेव्ह भट्टीत तापलेले पाणी/द्रव बाहेरच्या भांड्याला स्पर्श केल्यास तितकेसे गरम लागत नाही पण आतून सूक्ष्म लहरींच्या उष्णतेने प्रचंड गरम झालेले असते. असे द्रव चुकून घाईने प्यायल्यास/स्पर्श केल्यास भाजण्याची शक्यता अधिक.
४. सुरक्षितता: अंडे, किंवा बंद डबा यांचा सूक्ष्मलहरींनी जास्त तापवल्यास स्फोट होऊ शकतो.
५. धातूचे भांडे/वर्ख/कपबश्यांची सोनेरी नक्षी सूक्ष्मलहरींच्या सानिध्यात प्रभावी वाहक म्हणून काम करतात व ठिणगी पडण्याची/काही विषारी वायू निर्माण होण्याची शक्यता असते.
६. तळणे ही क्रिया मायक्रोवेव्ह भट्टीत करता येत नाही.
७. भारतीय पदार्थ, ज्यात उकडणे, फोडणी, तळणे अशा बऱ्याच क्रिया अंतर्भूत असतात ते मायक्रोवेव्ह भट्टीने करायला जास्त वेळ लागतो.

तरीही मायक्रोवेव्ह भट्टीची वाढती लोकप्रियता आणि पेट्रोलियम इंधनांचा भविष्यातील तुटवडा लक्षात घेता मायक्रोवेव्ह भट्टी गॅस इंधनाला मागे टाकण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

(अनुराधा कुलकर्णी)
संदर्भ:
१. विकिपीडियावरील माहिती
२. एक्स्प्लेन दॅट स्टफ वरील माहिती
३. मायक्रोवेव्हचा इतिहास
४. कोलोराडोतील संकेतस्थळावरील माहिती

(डिस्क्लेमर:
१. हा लेख कोणतीही नवी माहिती पुरवतो असा लेखिकेचा दावा नाही.
२. लेखातील माहिती व चित्रे यांचा उपयोग फक्त अव्यावसायिक किंवा शैक्षणिक उद्देशासाठीच केला जावा.
३. लेखातील माहिती १००% सत्य व अचूक आहे असा लेखिकेचा दावा नाही.
४. हा लेख सर्वप्रथम मनोगत डॉट कॉम वर प्रकाशित)

Comments

चांगली माहिती

लेख छान आहे अनु. चांगली माहिती देतो.

पल्लवी

छान लेख

लेख छानच आहे.
शीर्षक पाहुन वाटले की आपले काही मजेदार 'अनु'भव असतील. अर्थात हा लेख सुद्धा चांगलाच आहे. (मनोगतावर पाहिला नव्हता.)
पाण्याच्या रेणूंची चित्रे फार मजेदार, आवडली :)
--लिखाळ.

उत्तम माहिती

उत्तम माहिती, लेख आवडला.

दोन फायद्यांसाठी मायक्रोवेव विशेष आवडतो.

१. डिफ्रॉस्टींग (वितळण्याची क्रिया)
२. रिहिटींग (अन्न पुनश्च गरम करण्याची क्रिया)

असेच लेख येऊ देत.

अवांतरः तापलेला पाण्याचा रेणू फारच आवडला. :))

माहितीपूर्ण लेख

लेख छान आहे. चित्रेही खूप आवडली.
डिस्क्लेमरमधील शेवटचा मुद्दा अनावश्यक वाटला.

छान!

छान माहितीपूर्ण लेख. चित्रांमुळे अधिकच चांगला झाला आहे. असेच आणखी लेख येऊद्यात.

अवांतर १ - पहिल्याा डिस्क्लेमची विशेष आवश्यकता आहे असे वाटत नाही.
अवांतर २ - घर्षणाने तापलेल्या पाण्याच्या रेणुचे चित्र मस्त आहे :)

सुंदर लेख

लेख माहितीपूर्ण आहे. "मायक्रोवेव्ह भट्टीत तापलेले पाणी..." हा भाग विशेष उपयोगी वाटला.

अतिउष्ण पाणी

"मायक्रोवेव्ह मध्ये तापवलेले पाणी अतिउष्ण (superheated) पातळीवर जाते आणि मायक्रोवेव्ह मधून बाहेर काढताच उसळी मारून वर येते" असा एक समज आहे. त्यामुळे फक्त पाणी मायक्रोवेव्ह मध्ये ठेवणे कितपत सुरक्षित आहे याबाबत कोणाला माहिती आहे का?

मी सुद्धा..

मी सुद्धा हे ऐकले आहे. पाणीच नव्हे तर कोणतेही द्रव उसळते. उदा. कोरा चहा, कोरी कॉफी इ. त्यात दूध असेल तर उतू जाते (हा अनुभव आहे :) आणि नसेल तर आपण भांडे हलवायला गेलो की उसळते. हा अनुभव सुदैवाने नाही :) त्यामुळे मी अशा वेळेला अधून मधून लक्ष ठेवतो आणि वेळीच उत्तरवतो. कोणी अनुभवससिद्ध माहिती दिली तर बरेच होईल.
--लिखाळ.

अंडी उकडणे..

....हा प्रकार कुणी मायक्रोवेव्ह मध्ये करून बघितला आहे का? त्यानंतर २ दिवस मायक्रोवेव्ह (आतून) घासत बसायाची तयारी असेल तर जरूर करुन बघावा :-)... अस्मादिकानी ह्या अनुभवातील थरार घेतला आहे :-))

नवे तंत्रज्ञान

हा लेख याच समुदायात टाकायचा होता. पण समुदायाचे सदस्यत्व लेख सुपूर्त केल्यावर घेतले. आणि नंतर लेख संपादनाची सोय सापडली नाही. उपक्रमरावांनी हा प्रतिसाद पाहिला तर हा लेख त्या समुदायत हलवावा ही विनंती.

बरं बरं! ;)

४. हा लेख सर्वप्रथम मनोगत डॉट कॉम वर प्रकाशित)

बरं बरं! ;)

इथेही टाकलात ते बरं केलंत. त्यामुळे आम्हालाही वाचता आला!

असो, लेख माहितीपूर्ण आहे.

तात्या.

मस्त

छान माहिती मिळाली.

अशी माहिती अभ्यासाच्या पुस्तकात मिळाली असती तर आम्हीही कुठे पोचलो असतो....

योगेशराजे.

प्रयत्न

संबंधित माहिती विकीवर पाहता एका रेणूमधील अणूंच्या वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकणार्‍या हालचालींमुळे रेणू तापतो असे कळले. हे पाहता रेणू स्वतःहून तापण्यास समर्थ आहे असे वरकरणी वाटते.

औष्मिक हालचाल (विकीपीडिया वरून साभार)

अर्थात ही झाली 'वाचीव' माहिती, तज्ञ्यांच्या स्पष्टिकरणाच्या प्रतिक्षेत,
~ तो ~

विकीवरिल दुवे

विकिवरील दुवे शोधण्याचा सोपा उपाय म्हणजे http://en.wikipedia.org/wiki/Heat प्रमाणे / नंतर शेवटी माहिती हवा असलेला विषय टाकणे! :)
इथे दुवा देताना काहीतरी अडचण येत आहे :(
~ तो ~

आभार

सर्वांच्या प्रतिसादांबद्दल आभार. हे पाहून उत्साह वाढून आणखी एखादा तांत्रिक लेख येण्याची शक्यता आहे! सावधान!
टग्यारावांच्या प्रश्नाचे उत्तर् माझ्या अंदाजाप्रमाणे 'पाण्याचे रेणू तापतात' हे असावे. या लेखाच्या प्रतिसादांतून मलाही बरीच नविन माहिती मिळाली.

वा! वा!

हे पाहून उत्साह वाढून आणखी एखादा तांत्रिक लेख येण्याची शक्यता आहे! सावधान!

वा वा! छानच..

याही वेळेस मनोगत डॉट कॉम वर सर्वप्रथम प्रकाशित केलात की लगेच इथेही करा. म्हणजे आम्हा उपक्रमींनाही वाचता येईल! ;)

आपला,
(उपक्रमी!) तात्या.

माहिती उत्तम

मोहन पाठक
आपण दिलेली माहिती उपयुक्त आहे.

छान,माहीतीपर लेख

मायक्रोवेव वरचा लेख खूपच आवडला. मायक्रोवेव वर नवीनच स्वयपाक करण्यास तर ते फारच उपयुक्त आहे.
सायली

अन्य उपयोग >

आता वाचता वाचता हसायचे नाही.

हे उपकरण झटपट् कपडे वाळवण्या साठी अत्यंत उपयोगी आहे.

प्रत्यक्ष अनुभवाचे आकडे देत आहे >

ओले कपडे वाळवण्या साठी लागणारा वेळ >

बनीयन : ३ मिनिट
अंडरवियर : २.३० मिनिट्
जिन्स् : १० मिनिट

प्रतिक्रिया देण्या आधी कमीत कमी रुमाल तरी वाळवून खात्री करा .

नंतर् खुप हसा !!

जास्ती ब्लौगींग करणे मनुष्याला कर्महीन, निरर्थक आणि पोकळ बनवते.

धन्यवाद

़़खुपच छान माहिती.

 
^ वर