भिंत, इंग्रज आणि आपण

आज म.टा. मधे ही बातमी वाचनात आली. चर्चेच्या सोयीसाठी इथे देत आहे:

मीठ चोळणारी ब्रिटीश कुंपणनीती
-योगेश मेहेंदळे, मुंबई

भारतीय भूमी आपल्या टाचांखाली आणून मनगटशाहीवर राज्यशकट हाकणाऱ्या ब्रिटिशांनी मिठावर कर आकारण्यासाठी रावळपिंडी ते ओरिसा अशी सुमारे १५०० मैल लांबीची भिंत उभारून सामान्य भारतीयांची कमालीची कोंडी केली होती, हा आतापर्यंत इंग्रजी पुस्तकातच असलेला आणि सर्वसामान्यांसांठी अज्ञात असलेला इतिहास महिनाअखेरीस मराठीजनांपुढे येत आहे.

महात्मा गांधींनी मार्च १९३०मध्ये मिठावरील कराविरोधात दांडी सत्याग्रह पुकारला. परंतु मिठाच्या माध्यमातून भारतीयांना वेठीस धरण्याची नीती ब्रिटिशांनी त्याआधीच हाती घेतली होती. सन १८४० ते १८८० दरम्यानच्या या इतिहासाचा लंडन युनिव्हसिर्टीतील इतिहासतज्ज्ञ रॉय मॉक्सम यांनी अथक परिश्रमाने शोध घेतला. ब्रिटिशांनी बंगालमध्ये पाय रोवल्यावर पूर्व भारतात त्यांची हुकुमत निर्माण झाली. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरून देशभरात अत्यावश्यक अशा मिठाचा पुरवठा होत असे. ब्रिटिशांनी त्यावर कर लादला होता. तो कुणी चुकवू नये, म्हणून रावळपिंडी ते ओरिसापर्यंतचा प्रदेश 'कस्टम लाइन'च्या माध्यमातून वेगळा करण्यात आला. दगडी भिंती, काटेरी झाडेझुडपे, तारांचे कुंपण अशा वेगवेगळ्या माध्यमातून सुमारे १५०० मैलांची एक भिंतच त्यांनी उभारली. तिचे रक्षण आणि करवसुलीसाठी १२०० सुरक्षारक्षकही तैनात करण्यात आले होते! भारतीय काँग्रेसची स्थापना करणारे अॅलन ह्यूम या प्रकल्पाच्या प्रमुखपदी होते.

हा इतिहास कुठेही नोंदलेला नाही. परंतु मॉक्सम यांनी गेल्या दशकात त्यावर अथक संशोधन केले. त्यासाठी अनेकदा ते भारतात आले. ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिमच्या (जीपीएस) आधारे शोध घेतला. उत्तर प्रदेशातील इटवाह जिह्यात त्यांना या भिंतीचे अवशेषही सापडले. या सगळ्या मेहनतीतून २००१मध्ये मॉक्सम यांचा 'दी ग्रेट हेज ऑफ इंडिया' हा ग्रंथ सिद्ध झाला.

मराठीतील ग्रंथ अनुवादक आनंद अभ्यंकर इंग्लंडला आपल्या मुलाकडे गेले होते. त्यावेळी 'दी ग्रेट हेज ऑफ इंडिया' त्यांच्या वाचनात आला. त्यातून निर्माण झालेली अस्वस्थता घेऊनच ते परतले. डोंबिवलीतील 'मोरया प्रकाशन'चे दिलीप महाजन यांच्याशी यावर चर्चा झाल्यावर आणि पुढे मॉक्सम यांची परवानगी मिळाल्यावर 'मीठ' : ब्रिटिश अमानुषतेची कुंपणनीती हा त्यांचा अनुवादित ग्रंथ साकारला. महिनाअखेरीस अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन होत आहे.

==========
१) कोणी 'दि ग्रेट हेज ऑफ इंडिया' पुस्तक वाचले आहे का? (आमच्या ग्रंथालयामधे तरी हे उपलब्ध नाही). असल्यास त्यात या भिंतीबद्दल असे कोणते पुरावे आहेत?
२) जर अशी १५००मैल लांबीची भिंत बांधली गेली तर् त्याचे उल्लेख समकालीन भारतीय लेखनात मिळतात का? या भिंतीचे नाव होते का?
३) जर अशी भिंत अस्तित्वात होती तर ती आपोआप काळाच्या पडद्याआड गेली की तोडण्यात आली? यावर कोणी प्रकाश टाकू शकेल काय? इतकी मोठी (लांब) भिंत हा ऐतिहासिक ठेव्याबरोबरच स्थापत्याच्या बाबतीतही अनमोल होता. बरिक सारिक गोष्टी जसेच्या तसे सांभाळणार्‍या इंग्रजांनी भिंत तोडली असेल असे वाटत नाही.
४) इंग्रजांनी अश्या इतर महत्वाच्या इमारती/स्थापत्ये तोडली आहेत का?

पहा जर रामसेतू तोडला तर नंतर इतिहाससंशोधकांना तो होता हे सिद्धकरावे लागेल हो ;)

Comments

ऐकले नाही

मी ऐकले नाही तरी नाहीये बॉ असे कुंपणा विषयी काही.
पण तसे इतिहासात, किंवा लोका कथांत तरी यायला हवे होते असे वाटते. पण दाबलेही असेल काय सांगावे?

पण इंग्रज आक्ख्या व्हिएतनाम कंबोडिया नि चीन ला अफूच्या व्यसनात अडकवून बरबाद करू शकतात तर मिठ क्या चीज है.
पैश्यासाठी नि राणीच्या मर्जीसाठी वाटेल ते करणारी जमात आहे ती!
कमाल या राजघराण्याची (कोनते घराणे? कुणाचीही पोरे कुणीही होती की ;)) की अशी लॉयल लोकं मिळाली.

आपला
काहीसा द्वेष्टा
गुंडोपंत

दिसले नाही

या बातमी बद्दल धन्यवाद.

हे पुस्तक माहीत तर नव्हतेच पण आत्ताच ऍमेझॉन आणि गुगल बुक्स वर शोधले आणि मिळाले नाही. आमेझॉन वर "The Great Arc: The Dramatic Tale of How India Was Mapped and Everest Was Named by John Keay " हे पुस्तक दिसले. त्याचा लेखक मात्र वेगळा आहे. यात पण ब्रिटीशांनी कर आकारणी वगैरे कशी नकाशे तयार करून चालू केली वगैरेची माहीती आहे, पण एकंदरीतच ते ब्रिटीशांच्या बाजूने "पॉझीटीव्ह" पुस्तक वाटले.

अविश्वसनीय

खरं सांगायचं तर प्रथम वाचून विश्वास बसला नाही. कारण एवढी लांबलचक तटबंदी उभारणे, तिची निगराणी करणे हे आर्थिकदृष्ट्या कितपत व्यवहार्य होते याबद्दल शंका होती. पण गूगलल्यावर बरेच दुवे सापडले.

दुसरे महत्त्वाचे म्हणजे हेज ला भिंत हा प्रतिशब्द थोडा मिसलिडिंग आहे. कारण १५०० मैलांची सलग भिंत बांधली गेली आणि ती अद्याप कुणालाच माहीत नाही असा बातमी वरवर वाचल्यावर समज होतो. झाडाझुडपांचा कुंपण म्हणून केलेला वापर असे याचे स्वरुप असावे.

गूगल बुक्सवर सापडलेले मुखपृष्ठ या अंदाजाला दुजोरा देते -

असेच

>>खरं सांगायचं तर प्रथम वाचून विश्वास बसला नाही
माझा पण!! याचा उल्लेख केवळ इतिहासातील दस्ताऐवजात नाही पण लोककथांमधेतरी हवा असे वाटले.
पण जरी हे कुंपण असले तरी देश दुभागणारे हे कुंपण होते.. आणि इंग्रज असं काहि बांधतील आणि बांधुन ते तोडतील असं वाटत नाही :( पण असंही बवाटतं, की जर हे असे कुंपण असेल तर कदाचीत कालौघात नष्ट झाले असेल.
उगाच आपल्याकडच् काहितरी हरवलय असं कोणीतरी सांगावं पण ते आपल्याकडे होतं यावरच विश्वास बसु नये असं काहितरी झालय :)

कदाचित..

कदाचित ही भिंत म्हणजे रावलपिंडी ते ओरीसा (कुठले शहर?) अशी अखंड नसावी. अन्यथा चीनच्या भिंतीप्रमाणे त्याचीदेखील नोंद घेतली गेली असती.

ते कदाचित मिठावरील उत्पादन शुल्क वसूल करण्यासाठी उभारलेले "चेक नाके" असावेत. उदा. मुंबई आणि ठाण्यामध्ये भिंत नाही परंतु महत्वाच्या वाहतूक रस्त्यांवर जकात वसूलीसाठी "चेक नाके" उभारलेले आहेत तसे.

कोडे सुटले ?

१) कोणी 'दि ग्रेट हेज ऑफ इंडिया' पुस्तक वाचले आहे का? (आमच्या ग्रंथालयामधे तरी हे उपलब्ध नाही). असल्यास त्यात या भिंतीबद्दल असे कोणते पुरावे आहेत?
२) जर अशी १५००मैल लांबीची भिंत बांधली गेली तर् त्याचे उल्लेख समकालीन भारतीय लेखनात मिळतात का? या भिंतीचे नाव होते का?
३) जर अशी भिंत अस्तित्वात होती तर ती आपोआप काळाच्या पडद्याआड गेली की तोडण्यात आली? यावर कोणी प्रकाश टाकू शकेल काय? इतकी मोठी (लांब) भिंत हा ऐतिहासिक ठेव्याबरोबरच स्थापत्याच्या बाबतीतही अनमोल होता. बरिक सारिक गोष्टी जसेच्या तसे सांभाळणार्‍या इंग्रजांनी भिंत तोडली असेल असे वाटत नाही.

यातील तिसर्‍या प्रश्नाचे उत्तर मिळाले असे मला वाटते.

धन्यवाद गुगल!

मॉक्समच्या पुस्तकावरून गुगलत एका महत्त्वाच्या दुव्यापर्यंत आलो. त्यावरून माझी निरीक्षणे पुढे देत आहे.

ब्रिटिशांनी भिंत उभारली नाही तर एक कुंपण तयार केले असावे. ब्रिटिश म्हणजे 'इस्ट ईंडिया कं'.

१६०० काळात पॉटेशियम नायट्रेटला (मीठ) इंधन वा दारूगोळा म्हणून युरोपात मोठ्या प्रमाणावर मागणी होती. आणि भारतातील बिहार, पंजाब इ. भागात "नुनीया" (Nuniah) जातीची कुटुंबं एप्रिल ते जूनच्या उन्हाळी मौसमात नापीक जमीनीतून हे मीठ मिळवण्याचा उद्योग करत असतं. कं. ह्या मीठाचा व्यापार करत असे. हे मीठ निर्यात करायची इंग्लडला.

कं. नीला त्यांच्याकडून मिळवलेल्या मीठाची वाहतूक करताना स्थानिक लोकांचा मोठ्या प्रमाणावर उपद्रव होत असे. जसा की खंडणी मागणे, लूटालूट, वाह्तूक करणार्‍याची आपआपसातील भांडणं इ.
ह्या आगलाव्या मीठाला मौल्यवान अशा कापूस, रेशीम, मसाल्याचे पदार्थ वस्तूंबरोबर ठेवणे हे जहाजवाल्यांनाही मान्य नव्हते.

तरी अशा दारूगोळा बनवण्याच्या कामात ह्या मीठाला मोठी मागणी होती. इंग्लडात दारूगोळा बनवण्याचे काम एकाच व्यावसायिक कुटुंबाची मक्तेदारी होती. शिवाय कं. नीचीही दारूगोळा बनवण्याचा उद्योग होता आणि कं. नीला ठराविक हिस्सा राजाला विकावा लागत. राजाला विकायचा म्हणजे, राजा म्हणेल त्या किंमतीत राजाला द्यायचा. (पण फुकट नाही). त्यातून माल चांगला असला पाहिजे.

या उद्योगामध्ये कं. फारच अडचणीत सापडली, इतकी की, त्यांच्या इंग्लडमधून होणार्‍या चांदीच्या निर्याती वर त्यांना कर भरावा लागून, राजाधिराजांकडून सर्व कृपादृष्टीला पारखं व्हावं लागलं असतं.

यातून सर जॉन बँक्स ने राजा व कं. मध्ये मध्यस्थी घडवून आणली. या मध्यस्थी नुसार कं. राजाला ठराविक मीठ लिलावाद्वारे विकणार. या लिलावाची मुदत एका मेणबत्तीवर अवलंबून असे. एक इंच लांबीची मेणबत्ती जळेपर्यंत लिलाव चालू राहणार. या मध्यस्थीमुळे कं. मीठ निर्यात करू शकणार होती. हे कं. नीला व्यावसायिक दृष्ट्या लाभदायक होतं. लागोपाठ दोन वर्ष १६७२-१६७३ बँक्सने मध्यस्थी करवून कं. नीला अडचणीतून बाहेर काढले. याच काळात युरोपात युद्धे चालू असल्यामुळे मीठाला मागणीही मोठी होती.
असा हा व्यवसाय कं. नीचा चालू होता. (या काळात हे कुंपण घातले गेले असणार)

१८८० साली स्विस व फ्रेंच शास्त्रज्ञांनी कापूस दारूत मिसळून दारूगोळा तयार केला त्याआधी जर्मनीतील खाणींमध्ये या मीठाचा साठा सापडला. पुढे हेबर- बॉश यांनी पॉटेशियम नायट्रेट निर्माण करण्याची प्रक्रीया शोधून काढल्यावर नैसर्गिक मीठाची गरज संपुष्टात आली. भारतीय मीठाच्या व्यापाराचे कं. साठी महत्व १८८० नंतर उरले नाही.

हा सर्व इतिहास पाहता, ते कुंपण ई.ई.कं. नी ने स्वतःच्या व्यवसायासाठी घातलेले होते. त्याची व्यावसायिक गरज संपल्यावर कं. नी ने पूर्णपणे दुर्लक्षित करणे हे त्यांच्या व्यावसायिकतेशी मिळतेजुळते आहे. त्यामुळे कुंपणाचे अस्तित्व आता दिसत नाही.

आणखी एक, हे कुंपण भारताच्या मध्यभागात अफगाणिस्तानापासून ओरिसापर्यंत होते. (मीठ म्हट्लं की एकदम किनारपट्टीचा प्रदेश डोळ्यासमोर येतो तर तसे नाहिये.)

टिपः मी कुठलाही इतिहास तज्ञ नाही. त्यातून इंग्रजीच्या लेखाचा अनुवाद करण्याचा अनुभव नसून प्रयत्न आहे. गुगल मातेच्या शक्तीमुळे हा इतिहास माझ्यासमोर उभा राहिला तसा सर्वांसमोर मांडावा या दृष्टीने हा लेख. चू.भू.दे.घे.

श्रेय आव्हेरः मुळातून संदर्भ समजून घेण्यासाठी संदर्भ १ वाचावा.

संदर्भः

http://www.salt.org.il/frame_india.html
http://www.salt.org.il/saltpet.html
http://www.tax-news.com/archive/story/The_Best_Tax_Is_A_Dead_Tax_xxxx145...
http://www.rmoxham.freeserve.co.uk/salt%20starvation.htm Inland Customs Department. 1869. Report on the administration of the Inland Customs Department, 1868-69. Allahabad: Government Press.

धन्यवाद

व्वा!!बर्‍याचशा गोष्टी स्पष्ट झाल्या.
अवन,
इतक्या तपशिलवार अभ्यासाबद्दल आणि तो इथे मांडल्याबद्दाल अनेक आभार

-ऋषिकेश

व्वा..

छान माहिती शोधून काढलीत. आम्ही आपले खाण्याचे मीठ समजत होतो.

पण एक शंका आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे हे कुंपण १६७२-१६७३ च्या दरम्यान घातले गेले. एवढे लांब कुंपण बर्‍याच राज्यांमधून गेले असणार. आता सतराव्या शतकात इस्ट इंडिया कंपनीचा प्रभाव एवढ्या मोठ्या प्रदेशावर होता की त्यांनी खुशाल कुंपण घालावे आणि राखावे?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

कुंपण

१६७२-७३ मध्ये कुंपण घातले गेले असा अर्थ होतोय. पण याच काळात कुंपण घातले गेले म्हणजे १६७२ पासून पुढे, जो पर्यंत कं. नीला या व्यवसायाची गरज होती तो पर्यंत. असा अर्थ घ्या.

बातमी

ही बातमी (नव्याने) कळली आणि कुतूहलास्पद वाटली. अवन यांच्या प्रतिसादाने शंका दूर झाली तरी सुनील यांच्यासारखा प्रश्न

एवढे लांब कुंपण बर्‍याच राज्यांमधून गेले असणार. आता सतराव्या शतकात इस्ट इंडिया कंपनीचा प्रभाव एवढ्या मोठ्या प्रदेशावर होता की त्यांनी खुशाल कुंपण घालावे आणि राखावे?

मलाही पडला. म्हणजे याकाळात कंपनीचा प्रभाव इतका मोठा असावा का? स्वतः महाराज १६२७ ते १६८० वगैरे, याच काळत औरंगझेब, पुढे पेशवे, पहिले बाजीराव, पानिपतचे तिसरे युद्ध झाले १७६१ साली. सतराव्या शतकात मुघल साम्राज्य मोडकळीला आले तरी संपले नव्हते. तेव्हा या काळात ही भिंत बांधली गेली असावी हे थोडे शंकास्पद वाटते. ती बर्‍याच नंतर बांधली असावी किंवा ती खटकण्या इतपत सलग भिंत इ. नसावी असे वाटते.

१७४०

सतराव्या शतकात मुघल साम्राज्य मोडकळीला आले तरी संपले नव्हते. तेव्हा या काळात ही भिंत बांधली गेली असावी हे थोडे शंकास्पद वाटते. ती बर्‍याच नंतर बांधली असावी किंवा ती खटकण्या इतपत सलग भिंत इ. नसावी असे वाटते.

प्लासीच्या लढाईच्या आधी, १७४० मधे ब्रिटीशांनी कलकत्त्यात नवाब अली वर्दी खानाच्या परवानगीने, मराठ्यांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी म्हणून मोठा खंदक उभारला होता. त्याचे मुळ कारण हे ब्रिटीश आणि त्यांना मदत करणारे (न्वाब आणि काही मारवाडी) हे स्थानीक संपत्तीच्या व्यापाराच्या बाबतीत मोनोपॉली करून बसले होते. त्यांना भय मराठ्यांचे होते. त्याला आजपण मराठा ट्रेंच असे म्हणले जाते. अर्थात याचा हळू हळू उपयोग करत शेवटी प्लासीच्या लढाईची परीनती होवून त्यांनी कलकत्त्यात बस्तान बसवले.

कदाचीत अशाच प्रकारातून हा भिंतींचा प्रकार अथवा (तथ्य असलेली पण) "थियरी" तयार झाली असावी..

 
^ वर