म टा, "म", "मा", "मि" आणि "उ" - काही सैल विचार

मटाच्या (त्यांच्या दाव्यानुसार) पहिल्या ऑनलाइन दिवाळी अंकावरून जवळपास सर्वच मराठी संकेतस्थळांवर जोरदार चर्चा सुरू आहेत. या निमित्ताने मटाच्या बदललेल्या स्वरूपाविषयी आणि त्यांच्या अतिरंजीत दाव्याविषयी मनात आलेले काही सैल विचार (stray thoughts).

बदललेले स्वरूप
आमच्या घरी मटा येत असे. मटा वाचण्याची सवय बालपणापासूनच. त्यामुळे आजदेखील जालावर मटा वाचला जातोच पण तो केवळ एक सवय म्हणून. त्यात पूर्वीची मजा नाही. त्यावेळच्या छापील मटाचे स्वरूप आणि भाषा एखाद्या घरंदाज स्त्रीसारखी असे. आजच्या मटाचे स्वरूप आणि भाषा ही मुंबईच्या बार डान्सरसारखी आहे!

पण अधिक विचार करता हे असे होणे अपरिहार्यच आहे, हे लक्षात येते. मटाचा बहुतांश वाचकवर्ग हा मुंबई आणि परिसरातील. या भागातील बर्‍याच मराठी भाषी मध्यम/उच्च-मध्यम वर्गाच्या घरातील मुले ही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातात. जेव्हा मराठी माध्यमातून शिकलेली मटा वाचणारी पिढी अस्तंगत होईल तेव्हा मटाला वाचकवर्गच उरणार नाही. तेव्हा उद्याचा वाचकवर्ग निर्माण करायचा असेल तर त्यांना जे हवे ते त्यांच्याच भाषेत द्यायला हवे (अन्यथा त्यांना इंग्रजी पर्याय उपलब्ध आहेतच!).

हा विचार केला तर मटा (किंवा लोकसताचा विवा) यांची मिंग्लिश वापरण्यामागची अगतिकता लक्षात येईल. त्यांच्या संपादक मंडळींना हे जरूर खटकत असेल पण मार्केटींगवाल्यांपुढे त्यांचे काही चालत नसावे.

सकाळ, लोकमत इ. वर्तमानपत्रे ज्या भागात वाचली जातात तेथे परिस्थिती इतकी भीषण नसावी. म्हणून त्यांची भाषा अद्याप "बिघडलेली" नाही.

अतिरंजीत दावा आणि अन्य मराठी संकेतस्थळे
आता मटाच्या दाव्याविषयी. साधारण ३ वर्षांपूर्वी माझी "मा" या मराठी संकेतस्थळाशी ओळख झाली. तोवर मराठी लिहिण्याची सवय पार गेली होती. शाळा संपल्यापासून मराठीचा संबंध केवळ वाचण्यापूरताच राहिला होता. अशावेळी मराठीतून टंकण्याची सुविधा देणारे हे स्थळ फार आवडू लागले. "मा"चे गणपती आणि दिवाळी अंक हे निश्चितपणे पहिले ऑनलाईन आहेत यात शंका नाही.

"मा" नंतर ओळख झाली ती "म" शी, ती सुमारे दोन वर्षांपूर्वी.

"उ" आणि "मि" येथे त्यामानाने मी नवखाच. त्यामुळे "उ" आणि "मि" विषयी मी फार काही बोलणे योग्य होणार नाही.

आजही कचेरीत संगणकावर दर्शनी भागात एखादी prj किंवा xls नाहीतर ppt चालू ठेऊन अंतर्भागात "म", "मा", मि" आणि "उ" असे उड्या मारणे चालू असते!

"म" हे थोडेसे शिष्ठ. यावर वावरताना दिवाणखान्यात पाहुण्यांशी बोलत असल्यासारखे वाटते. "मा" हे बरेचसे अनौपचारीक. म्हणजे संध्याकाळी नाक्यावर उभे राहून शिग्रेटी फूंकत इकडे-तिकडे (म्हणजे कुठे ते जाणकारास सांगण्याची गरज नाही) पाहत गप्पा हाणणार्‍या टोळक्यासारखे! शिव्या तर इथे खुल्लमखुल्ला दिल्या जातात - घेतल्या जातात. उगाचच "ह घ्या" चा औपचारीकपणा नाही!
अर्थात कोणत्यायी प्रकारच्या गंभीर लिखाणासाठी "मा" हे काही योग्य स्थळ नव्हे. पण गप्पा-टप्पा करायला त्यासारखे दुसरे काही नाही!

"उ" ने किंचित "म" कडे झुकलेला, "म" आणि "मा" यांतील मध्यममार्ग स्वीकारावा

आणि "मि" ने किंचित "मा" कडे झुकलेला, "म" आणि "मा" यांतील मध्यममार्ग स्वीकारावा, मात्र असे वाटते

Comments

अवघड.

काही संदर्भ समजण्यास अवघड झाले आहे.

मराठीची प्रगती.

या सर्व संकेतस्थळांनी मराठीची अतिशय उत्तम सेवा केली आहे हे नक्की.

माझ्या मनात याबाबत खालील विचार येत असतात.

१. नेपाळी, हिंदी, संस्कृत आणि मराठी भाषेची लिपी एकच असल्यामुळे असे चर्चा स्थळ या भाषेनांही उपकारक ठरावेत.
२. येथे असणार्‍या लोकांची संख्या खरोखरच अल्प आहे. यात वाढ व्हायला हवी.
३. जाहिरातीचे उत्पन्नाचाही विचार करायला हवा.

माझी पसंती म -> उ -> मि -> मा

 
^ वर