पन्नूमावशीचे बाळ (मुलांसाठी सिगारेटविषयी वैद्यकीय माहीती)

आज घरी दुपारी अगदी गडबड गडबड होती. म्हणून मिनलचे बाबा दारात आल्या आल्या मिनल त्यांना म्हणाली, "बाबा आज किती गंमत! अंकिता दुपारी आपल्याकडेच होती खेळायला."
बाबा म्हणाले, "हो का?"
"पन्नूमावशीला नं, बाळ होणार म्हणून हॉस्पिटलमध्ये नेलंय!"
"अग सुनिता! काय म्हणतेय आपली मिनल?"
मिनलची आई बाहेरच्या खोलीत येत म्हणाली , "अरे, पर्णालीला तडकाफडकी सिझेरिनला नेलं, मी तिथे हॉस्पिटलातून अर्धा दिवस सुटी घेतली. मिनल-अंकिताना शाळेनंतर आपल्या घरी आणले. प्रणेश तिकडे हॉस्पिटलातच आहे. तुला काय कळवणार, तुझा सेलफोन पडलाय तिथे टेबलावर!"
"अरेरे, मग कुठे आहे आता अंकिता?"
"तिची आजी घेऊन गेली तिला," मिनल म्हणाली.
"सुनिल, मी सांगून बघितलं रे कशाळकर काकूंना, तुम्हाला काकांच्या तब्येतीची काळजी आहे, राहू द्या अंकिताला इथेच. पण त्यांनी ऐकलं नाही."
बाबा विचारात पडले - "पर्णालीचा हा तर सातवाच महिना..."
"बाबा, बाबा, मग उद्या लवकरच पन्नूमावशीची बेबी येणार का घरी?"
आईनेच उत्तर दिले - "नाही मिने, मी सांगितलं की नाही, मावशीची बेबी खूप छोटी आहे? तिला हॉस्पिटलमध्ये थोडी मोठी होऊ देतील... खूप काळजी वाटते आहे रे सुनिल. सिझेरिननंतर डॉक्टर म्हणाले की पाच-सहा आठवडे तरी बाळाला ऑक्सिजन लागेल..."
"आई ग, आई ग! पन्नूमावशीची बेबी अशी छोटी का झाली?"
"कोणास ठाऊक, का होतात या गोष्टी?"
"सुनिता, मला माहीत आहे की अशा वाईट वेळप्रसंगी तू कोणाला दोष देत नाही आहेस. पण मी किती वेळा प्रणेशला सांगितलंय की बाळ होईपर्यंत घरात सिगारेटी ओढू नकोस. धुराने बाळाला इजा होते. प्रणेश सगळेच हसण्यावारी नेणार किंवा चिडून घेणार. मग मी आपला गप्प बसलो."
"बाबा, सिग्रेटीच्या धुराने बाळाला बाऊ होतो का?"
"हो, मिने, खरंय ते."
"मग अंकिताही बेबी होती तेव्हा अशी खूप छोटी होती का? प्रणेशकाका आधीपण सिग्रेट प्याचा ना?"
"मिनुली, असं नसतं काही. दूध गटागटा प्यालं तर दरवेळी ठसका लागतो का? पण घाईनी प्यालं तर कधीकधी ठसका लागतो, म्हणून आपण नाही का काळजी घेत?"
"बाबा, पण प्रणेशकाका सिग्रेटच्या धुराचे गोल मस्त काढतो."
"हं."
"सुनिल, हं काय म्हणतोस नुसता? धुराचे गोल काढण्यात मस्त काय आहे?"
"हं नाही म्हणू तर काय म्हणू सुनिता? पर्णाली खुद्दच नाही का भुलली त्याच्या हिरो स्टाईलला."
"आमची पर्णाली अगदी तशी ’ही’ नाही आहे बरं का! हिरो म्हणजे नुसता सिगारेटीने होतो का? प्रणेश किशोरची गाणी काय छान गायचा. तुझ्या कॉलेजमध्ये क्रिकेट टीमचा कॅप्टन होता..."
"कॅप्टन होता ते बारावीपर्यंतच. आणि त्याचा खाकरून खरखरीत आवाज ऐकलायस का? आता कसला गातोय. किशोरची गाणी नाही की सैगलची गाणी नाही. इंजिनियरिंगला आला, तर लगेच त्याला टीममध्ये घेतलं आम्ही. चेंडूपाठीमागे धावताना दम लागायचा. याच्या फील्डिंगच्या दिशेला बॉल गेला की चौकार नक्की. त्याला एक्स्ट्रा करून बाजूला बसवला तर तिथेपण एकापाठोपाठ एक सिगारेटी फुंकणार. दुसऱ्या वर्षी मैदानावर यायचा बंद झाला. आणि तोपर्यंत पटवली होती आपल्या पर्णालीला..."
"सुनिल श्श्श्." आईने डोळे वटारून मिनलच्या दिशेने मान तुकवली.
"आई ग, मी नं एकदा पन्नूमावशीला पण बाल्कनीत रात्री सिग्रेट पीताना बघितले."
"करा नवऱ्याला श्श्श् सुनितादेवी. पर्णाली तिच्या डॉक्टरीणताईपुढे लपवते, तरी भाचीच्या नजरेतून काही सुटत नाही."
"बाबा, प्रणेशकाकाला माहीत नव्हतं का सिग्रेट प्यायचं नाही ते?"
"माहिती तर असायलाच पाहिजे होते. पण घरी काय बघितलं त्याने? कशाळकर काकांची दिवसाला दोन पाकिटे खतम व्हायची. पण काकांना किती लवकर पहिला हार्ट अटॅक आला. तेव्हा तरी प्रणेशने आपल्या सवयीकडे लक्ष द्यायला हवे होते. काकांना त्यांच्या डॉक्टरांनी सांगितलं की सिगारेट पिऊ नका. पण त्यांनी सोडली नाही. प्रणेशची आणि काकांची एकमेकांना साथ. जायचे तर शानसे जाऊ, म्हणे. प्रणेश खोकतो तो खोकतोच! पण आता बाळाला झालं त्यात कसली शान? आता हा काकांचा दुसरा हार्ट अटॅक. काकूंना होणार्‍या त्रासात कसली शान? छे, बुवा... यांना काय सांगावं."
"अंकिताच्या आजोबांना हार्ट अटॅक म्हणजे काय हो झाले बाबा?"
"मिनूताई, आपलं हृदय असतं ना - छातीत धडकधडक करतं ते? त्याला अन्न, ऑक्सिजन, वगैरे उपयोगी वस्तू रक्तातून वेगळ्या पुरवाव्या लागतात. त्यासाठी असं एक नळ्यानळ्यांचं जाळं असतं. अं, आईच्या पुस्तकातलं हे चित्र... हे बघ.

हृदय - चित्र
हृदयावरील धमन्यांचे जाळे - (NIH, no copyright)

या नळ्यांना म्हणतात धमन्या. रक्तात जर तुपकट कचरा असला तर तो कधीकधी धमनीच्या आत चिकटतो. बघ चित्रातल्या धमनीत ही तुपकट थप्पी. त्याच्यावर रक्ताची गुठळी अडकली. मग हृदयाला अन्न मिळत नाही. प्राणवायू मिळत नाही."
"बाबा, प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन ना? शाळेत मला बाईंनी सांगितलं."
"बरोबर. प्राणवायू मिळाला नाही, तर हृदय बंद पडते. जर लवकर उपचार केला नाही, तर जीवपण जातो."
"बाबा, सिग्रेटमुळे धमनीत कचरा कसा चिकटतो?"
"डॉक्टरीणबाई! सांगता का तुमच्या मुलीला?"
"मिनलबाळ, सिगारेटच्या धुरात खूपखूप वेगवेगळी विषं असतात. ती अगदी थोडीथोडीशी असतात, म्हणून एक सिगारेट प्याल्यावर लगेच काही होत नाही. पण धूर छातीत गेला, की छातीच्या आतला नाजुक भाग हळूहळू जळतो. अगदी थोडाथोडा जळतो, पण मग खूप महिन्यांनी, वर्षांनी, श्वास घ्यायला त्रास होतो. सारखी सारखी धाप लागली की मग व्यायाम नाही करता येत. व्यायाम केल्याने रक्त सळसळ फिरते, धमन्या लवचीक होत असतात. पण व्यायाम कमी झाला की मग धमनी कडक होते. तिच्यात ओशटपणा चिकटायला लागतो. शिवाय सिगारेटमधल्या विषाने रक्तच जास्त चिकट होते. मग त्याच्या गुठळ्या होऊन धमनीत अडकतात. शिवाय आत चिकटलेला ओशट थर काढून टाकणारा रक्ताचा गुण असतो, तोही सिगारेटीतल्या विषाने कमी होतो. ओशट थर कितीतरी वर्षे साचून साचून हृदयाच्या धमन्या खूप चिंचोळ्या होतात. कधी एक धमनी बंद होते कधी दुसरी."
"मग आई, अंकिताचे आजोबा थांबवत का नाही सिग्रेट पिणं?"
"ही सगळी छातीत, हृदयात जाणारी विषं आहेत, पण सगळ्यात वाईट विष आहे ते डोक्यात जातं! त्याचं नाव निकोटीन. हे चढलं की आधी छानछान वाटतं, पण उतरलं की एकदम वाईट. डोकं दुखतं, धाकधूक वाटते, मळमळायला होतं... पुन्हा सिग्रेट प्याल्याशिवाय बरं वाटत नाही. असं हे विचित्र विष आहे निकोटीन. याची सवय लागते, आणि मग याच्याशिवाय करमत नाही. मग त्या एका खोट्या सुखासाठी लोक बाकी सगळी वाईट वाईट विषं धुरातून ओढत राहातात. लहानपणी ही सवय लागली, तर सुटायला खूपच कठिण."
"आई, मग कोणालाच सिग्रेट सोडता येत नाही का?"
"नाही, नाही... खूप प्रयत्न करावा लागतो, पण सुटते. आधी त्रास होतो, पण मग स्वच्छ हवा छातीत जायला लागते, ताजेपणा वाटतो."
"मग आई, प्रणेशकाकाने प्रयत्न केला तर त्याची सिग्रेटही सुटेल का?"
"सुटेल तर. पण त्याला सांगणार कोण?"
"मी सांगणार. आणि अंकिता सांगेल. आणि उद्या आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ, तर छोट्या बेबीला आमच्या बाजूला करून घेऊ."
बाबा म्हणाले, "शाहाणी आहे बाळ माझी. सुनिता, हेच खरे. तुझ्या माझ्या सांगून उपयोग झाला नाही. पण त्या छोट्या बाळाचे हाल बघून प्रणेश-पर्णालीच्या डोक्यात प्रकाश पडेल वाटते."
"मिनूबाळ, आपल्याला उद्या पर्णालीताईला बघायला हॉस्पिटलात लवकर जायचं ना? जेवायचं, झोपायचं... खेळ आवरा पाहू पटापट..."

लेखनविषय: दुवे:

Comments

छान

लिहिलंय. खास करून धमन्यांवर होणार्‍या परिणामाविषयी. लहान मुलांच्या दृष्टिकोनातून पाहता - अभिनेत्यांनी सिगरेट ओढणे वगैरे गोष्टी त्यांना 'कूल' वाटू शकतात (धुराच्या वर्तुळांचे उदाहरण वर दिले आहे तसे). तेव्हा लगेचच त्याचे खंडन/दुष्परिणामांचे वर्णन पुढच्या वाक्यांत होते, हेही उत्तम.

ब्राव्हो!!!!!

फारच छान.. अगदी नेमक्या गोष्टी सोप्या शब्दात समजावून सांगितल्या आहेत.. मुख्य म्हणजे अतिशय परिणामकारक शब्द आहेत. "धमनीतला कचरा" शब्द अगदी आवडला मुलांना लगेच समजेल असा. लहान मुलांचं घरात बारिकसारिक गोष्टींवर असलेलं लक्ष आणि एक मस्त शेवट असं सगळं जमुन आलय अगदी!!
अभिनंदन आणि शुभेच्छा!!!

केवळ एक् सुचवणी: सुरवातीला खुप पात्रांची नावं एकदम आल्याने नक्की कोण कोण आहे हे मुलांना समजायला थोडा वेळ लागेल अशी शंका आहे. अर्थात शैली उत्तम आहे त्यामुळे मुलांना त्याने काहि फारसा फरक पडत नाही. हवा तो संदेश अगदी लख्ख पोचतो आहे पण मला याबाबतीत मात्र पात्रांची नावं कमी असावीत अथवा काहि वेळाने यावीत असं वाटले.

ऋषिकेश

खूप नावे

हे बरोबर आहे. कदाचित अंकिताचे बाबा, आजी-आजोबा, असे म्हणून अर्धी नावे कमी करता येतील.
(यात काही ठिकाणी तुमच्या शैलीचे अनुकरण केले आहे :-) तुम्हाला कळलेच असेल.)

लेख

सोपी भाषा, आणि चित्र यामुळे समजायला सोपा आहे. १२-१३ वर्षांची मुले नक्कीच समजू शकतील असे वाटते.

पर्णालीमावशी स्वतः कधीकधी सिगरेट ओढते त्यामुळे बाळाला त्रास झाला असेल की प्रणेशकाकाच्या सिगरेटच्या धुरामुळे - याही प्रश्नाचे उत्तर यात आले तर चालेल असे वाटते.

दोन्ही

गरोदर स्त्रीच्या खुद्द केलेल्या धूम्रपानाचा जास्त दुष्परिणाम होतो. तेही वाक्य टाकता आले तर संवादात घालायचा प्रयत्न करतो. किंवा मुले ते तर्काने समजतील का बघितले पाहिजे.
या ठिकाणी प्रणेशच्या साखळीवजा धूम्रपानाची मात्रा जास्त पडली असू शकेल.

आजच्या जमान्यात (मध्य/उच्च वर्गाच्या) काही स्त्रियाही धूम्रपान करतात ते दर्शवायचे होते. म्हणजे वाचणार्‍या मुलांना/मुलींना दोघांना माहिती स्वतःला लागू पडते असे वाटेल.

मस्त

धनंजयराव ,

एकदम मस्त लेख आहे. लहानांनाच काय सिगरेट ओढण्यात "स्टाईल" मानणार्‍या मोठ्यांसाठी आणि बिड्या फु़ंकणार्‍यांच्या गर्वारशी बायकांसाठी पण "इन्ट्रोडक्टरी" म्हणून चांगला लेख होऊ शकेल....

आपण एनआयएच चा संदर्भ देऊन एक चित्र दिले आहे. मी पण अशी काही चित्रे पाहीली होती. एक खाली दाखवतो आहे जे कदाचीत विशिष्ठ वयाच्या वरच्या मुलांसाठी चांगले असू शकते. तसेच न्यू यॉर्क स्टेटचे सिगरेट विरोधातील कँपेनपण मोठे आहे. (अवांतरः आता तर न्यूयॉर्क शहराने - ब्लुमबर्गने सार्वजनीक रेस्टॉरंटमधे ट्रान्सफॅट असलेल्या फूडप्रॉडक्टसना बंदी घातलेली माहीती असेलच).

विकास

हे पण पहाण्यासारखे: http://doingyoudamage.com/truthaboutyoursmokes.htm (हा दुवा येथील मुलांसाठी विशेष करून चांगला आहे)

Heros lost to smoking

Why celebrate the birthday of a product that has killed 2.3 Million people since 1954?

फार उपयुक्त दुवे

माझ्या एका मित्राला विचारले की लहानपणी तुला धूम्रपानविरोधी शिक्षणातले, प्रचारातले काय आठवते? तर तो म्हणाला की धुराने काळी पडलेली फुप्फुसे.
अशा प्रकारे धूम्रपानात "कूल" असे काही नाही असे पटवून परिणाम साधेल. (तुम्ही न्यू यॉर्क राज्याच्या सिगारेट विरोधी विभागाच्या वेगवेगळ्या पोस्टरचा दुवा दिला आहे, त्यात अनेक अशीच परिणाम करतात.)
वेगवेगळ्या वयाच्या मुलांच्या मानसिकतेच्या दृष्टीने त्यांना वेगवेगळ्या प्रकारे पटवावे लागते, हे तुमचे निरीक्षण अचूक आहे.
१३-१८ वर्षांच्या मुलांना "कोणी आपल्याला लेक्चर देत आहे" असे वाटले तर अगदी उलट परिणाम होऊ शकेल. बंड करण्यासाठी त्यांना आणखी एक साधन सापडल्यासारखे वाटायला नको!

अतिशय उपयुक्त लेख

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. धनंजय यांचा लेख आबालवृद्धांसाठी अतिशय उपयुक्त आहे. मुलांसाठी अशाकरिता की ती आपल्या पालकांना धुराचे दुष्परिणाम पटवू शकतात. (लेखात हे आले आहेच).
लेखन अशा शैलीत आहे की वाचता वाचता सगळे पटत जाते. श्री. धनंजय यांना धूम्रपानाच्या दुष्परिणांमांविषयी कळकल वाटते म्हणून लेखन इतके परिणामकारक झाले आहे.(दॅट व्हिच कम्स् फ्रॉम द हार्ट गोज टु द हार्ट् )
वाईट इतकेच वाटते की इथे वाचकसंख्या अगदीच मर्यादित आहे. सकाळ, लोकसत्ता,लोकमत अशा वृत्तपत्रांत हा लेख प्रसिद्ध व्हायलाच हवा. आपण उपक्रमी या संदर्भात काही करू शकू काय? माझ्या मनात एक कल्पना आली.विचार करून नंतर सविस्तर मांडतो.

मुले आणि अचाट तर्कशुद्धता

ज्या वयात मुले "पण आईबाबा, का?" म्हणतात, त्या वयात काही बाबतीत कधीकधी मुले अतिरेकी तर्कशुद्ध असतात.
मग त्यांना सांगितले की "अमुक केल्यास तमुक होईल," तर ओळखीचे प्रत्युदाहरण देऊन आपले म्हणणे खोटे पाडतात. त्यामुळे सिगारेटचे दुष्परिणाम हे आकडेशास्त्रीय आहेत, असे वेगळ्या शब्दांत सांगायचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक बाळ अपरिपक्व जन्मणार नाही, प्रत्येकाला लगेच हृदयविकाराचा झटका येणार नाही, पण या सर्व आजारांची शक्यता वाढेल, असे सुचवायचा प्रयत्न केला आहे.
लिहिताना ८-१२ वर्षे वयोगट मनात धरला होता. म्हणजे "ऑक्सिजन"बद्दल ऐकले असेल पण "कार्बन मोनॉक्साईड"शी परिचय नसेल, असा वयोगट. कोणी लहान मुलांनी वाचून अभिप्राय दिला (खास करून, १. न कंटाळता गोष्ट संपवता आली का, आणि २. तर्कशुद्ध बालबुद्धीस पटले की नाही) तर ऐकायला आवडेल.

यना, कौतुकाबद्दल धन्यवाद! इथे वाचकांचे प्रतिसाद लक्षात घेऊन, योग्य ते बदल करून, छापील माध्यमांत उपक्रमावरचे लेख नेता आले, तर चांगले होईल. तुमच्या याबाबत कल्पना ऐकायला आवडतील.

रंजक आणि उद्बोधक

धन्यवाद !

खुपच छान

धनंजय,
खुपच छान!
वर प्रतिसादात आलेला 'टीन एज मधली मुले रेबेल' होण्याचा मुद्दा खुपच महत्वाचा आहे.
किंवा त्या मुद्यावरच विकसनशील देशात बरेचदा सिगारेट्स खपवल्या गेल्या आहेत. (व्हिएतनाम नि कंबोडियाची यातील स्थीती गंभीर आहे असे म्हणतात.)
तसेच ज्यांचे आई वडील सिगरेट ओढत नाहीत ती मुले पण असे रिबेल होण्याचा धोका आहेच, नाही का? जे ओढतात त्यांचे काय असाही प्रश्न आहेच.
'या टीन एज मानसिकतेशी कसे व्यवहार केले पाहिजेत' यावरही काही लिखाण हवे आहे.
हा फार अवघड विभाग आहे. इथे येणारा प्रत्येक शब्द कधी छटा बदलून
भलताच 'मेसेज' देवून जाईल हे सांगता येत नाही. शिवाय माध्यमांचा सगळ्यात जास्त प्रभाव याच काळात असतो.

असो काही आवंतर मुद्दे:
१. सिगरेटच्या पाकिटावर परिणाम झालेल्या फुफुसाचेच चित्र छापले तर कसे राहील?
किंवा तंबाखुच्या कँसरने कापलेल्या जबड्याचे?
(प्रिणामांचे चित्र छापणे हे सक्तीचे करणे अतिशय आवश्यक आहे. )
२. तसेच कोण्त्याही प्रकारे पाकिटावर नावे (ब्रँड नेम्स) घालायलाही बंदी हवी.
३. पाकिटावर फक्त ५% जागा या नावासाठी ब्रँडसाठी द्यायला हवी.
४. कोणत्याही सिगरेट कंपनी कडून सक्तीने सार्वजनिक आरोग्य करही वसूल केला पाहिजे.

(असे छप्पन उपाय अनेक लोक नि संस्था सुचवतात... पण या तंबाकुच्या कंपन्या हे सगळे कोळून प्यायलेत. त्यांना निट माहीत असते की राजकारण्यांना नेमक्या वेळी कसे गुंडाळायचे ते.)

भारत सरकार फार काही करेल ही आशा ठेवण्यात अर्थ नाहीये हे मात्र खरे!

आपला
(सिगरेट कंपन्यांचे विक्री तंत्र कसे 'सटल लेव्हलला' चालते हे जवळून पाहिलेला)
गुंडोपंत

अभिनंदन, डॉ. धनंजय

अत्यंत बाळबोध, रसाळ तरीही उद्बोधक लेख. वयोगट १० ते १५ वर्षे मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठीही सिग्रेटच्या (सिगारेटचे मराठीकरण!:) ) दुष्परिणामांविषयी सखोल माहिती.
(टार,कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, फुप्फुसांच्या कर्करोगाविषयी , दम्याविषयी आणि इतर श्वसनरोगांविषयी थोडे उल्लेख आले तर आणखी उत्तम).
एक गमतीदार वाक्य आठवले - सिग्रेटच्या एका टोकाला विस्तव आणि दुसर्‍या टोकाला एका मूर्ख व्यक्तीचे ओठ असतात.:)

चांगला लेख

लेख (प्रसंग) आवडला. छोटीशी नाटुकलीही तयार करता येईल यावर मुलांना घेऊन.

अमेरिकेत एक जाहिरात येते, आई कळकळीने धुम्रपानाचे दुष्परिणाम सांगत असते. जेव्हा कॅमेरा मुलावर येतो तेव्हा ते हायचेअरवर बीब लावून बसलेले बाळ असते. शेवटी ती म्हणते, 'तू मोठा झालास की पुन्हा बोलू.'

एकंदरीत : कॅच देम यंग...

लेख आवडला !!

डॉ. धनंजय
लेख आवडला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वेगळा विचार करावा लागला

नेहमीसारखाच हा विचार करावा लागला की कमीतकमी तपशील असून पुरेसे तपशील म्हणजे किती? मग कथाप्रसंग काय असावा हे ठरवण्यात बराच वेळ लागला.

बाकी या गोष्टी एकदा ठरल्या की मग नाट्यछटा नेहमीसारखीच लिहिली - म्हणजे संवादातले प्रत्येक वाक्य १. इच्छित उपविषय सांगते, किंवा २. पुढच्या उपविषयाकडे जायचा "नैसर्गिक" दुवा आहे. सुरुवातीचा परिच्छेद आणि शेवटचा परिच्छेद यांचा विषय एकच करणे ही माझी "सही" वगैरे नेहमीच्या क्रमाने आलेच. लेखाचा आराखडा, सांगाडा करायला वेळ लागतो. मला मात्र एकदा लिहायला घेतले की एका दमात लेख पूर्ण लिहावा लागतो. जर चारपाच ओळी लिहून सोडून मग पुन्हा लिहायला आलो, तर अनेकदा पुन्हा अथ पासून सुरुवात करावी लागते.

मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी लिहिण्यात आराखडा बांधण्यात हा एक मोठा वेळखाऊ फरक मला वाटला - मोठ्यांसाठी वैचारिक लिहिताना हे माझ्या मनात असते, की आपल्याला जो विषय आवडतो, तो पुष्कळांना आवडीचा नसणार. "तुम्हाला शिकवतो, माझे वाचा" अशी भुणभुण न लावण्यातच माझ्या वाचक नसलेल्यांच्या स्वातंत्र्याचा आदर आहे. त्यामुळे ज्यांना रस आहे, त्यांच्यासाठी सरळ मुद्द्याचे लिहिता येते. मुलांसाठी (किंवा लोकशिक्षणासाठी लिहायचे असले म्हणा) तर आपल्या बोलण्यात रस नसलेल्या वाचकांत तो आधी निर्माण करायचा, मगच माहिती देता येईल, अशी दुहेरी जबाबदारी अंगावर पडते. ते कसे करावे, याबाबत फार विचार करावा लागतो, आणि जमेल याची खात्री नसते.

वेगळा विभाग

च्यालेंज-उचलेंजच्या खेळात मुलांसाठी ज्या उत्साहात लेख लिहिले जाताहेत (सर्कीटरावांचे ही लाट आणण्याबद्दल आभार आणि अभिनंदन) . तेव्हा उपक्रमवर "बालसाहित्य" किंवा "बालोद्यान" अश्या नावाचा वेगळा लेखन विषय लेख आणि चर्चेचा प्रस्ताव या दोन्ही लेखनप्रकारांत टाकता येईल काय?
-ऋषिकेश

नवीन समुदाय बनवण्याविषयी

नवीन समुदाय बनवण्याविषयी मार्गदर्शन इथे उपलब्ध आहे.

 
^ वर