पालखी: वाचलेच पाहिजे असे काही

दि.बा.मोकाशींच्या कथा काही वाचकांना परिचित असल्या तरी त्यांचे लेखन म्हणावे तितके प्रसिद्ध झाले नाही. त्यांच्या कथांकडे झालेले दुर्लक्ष पाहता त्यांनी प्रवासवर्णनांमध्ये केलेली मुशाफिरी मात्र उपेक्षितच राहिली आहे या बाबीचा खेद वाटला तरी आश्चर्य वाटत नाही. पुण्यापासून पंढरपूरपर्यंत वारकर्‍यांसोबत केलेल्या वारीची मोकाशींच्या अनोख्या शैलीतील "पालखी" ही "वाचलेच पाहिजे असे काही" प्रकारातील नोंद.

खरे म्हणजे "पालखी"च्या पार्श्वभूमीवर एखादी कादंबरी लिहावी अशी मोकाशींची फार इच्छा. त्यांच्या कल्पनेतल्या कादंबरीतील एका वारकर्‍याच्या डॉक्टर मुलाला, वडिलांच्याऐवजी, वारीला जावं लागतं. पालखी सुरू होते तेव्हा कादंबरी सुरू होते आणि पालखीबरोबरच ती संपते. ही कादंबरी लिहिणे मोकाशींना शक्य झाले नाही. मात्र पालखीबाबतचे आकर्षण मनात मात्र कायम राहिले. एक महिना व्यवसाय बंद करून, महिन्याभरासाठी संसाराची रक्कम व पालखीबरोबरचा खर्च यांची तरतूद करून जावे लागेल या कारणाने काही वर्षे पालखीला जाण्याचे त्यांनी टाळले. मोकाशींच्याच भाषेत सांगायचे तर "यंदा तगमग अतिशय वाढली. काळे ढग आले. पाऊस कोसळू लागला. हवा कुंद झाली. वारकरी दिसू लागले. एके दिवशी लौकर दुकान बंद करून घरी आलो आणि जाहीर केलं - काही झालं तरी यंदा पालखीला जाणार!"

मोकाशी रूढ अर्थाने वारकरी किंवा भक्त नव्हेत. किंबहुना वारी किंवा तीर्थक्षेत्रेच नव्हे तर समाजात सर्वच ठिकाणी चालणार्‍या अनिष्ट प्रथांबाबतची नाराजी त्यांनी त्यांच्या कथांमधून सौम्य रीतीने व्यक्त केली आहे. त्यांच्या कथांमधूनही त्यांची पुरोगामी वैज्ञानिक दृष्टी ठळकपणे दिसते. ही वारी करण्याची कल्पना पालखीची आकडेवारी काढावी अशी होती. वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व थरांतले व प्रांतातले लोक एकत्र येतात. त्यांना दिलेल्या प्रश्नावलीच्या उत्तरांमधून समाजाचाच एक आरसा दिसेल अशी मोकाशींची कल्पना. वारीसोबत जाणार्‍या चिवडा विकणारे, केशकर्तन करणारे, बांगड्या विकणारे यांसोबतच आपला व्यवसाय वारीच्या निमित्ताने चालू ठेवण्याचे ठरवत मोकाशी वारीत सामील झाले.

हातात प्रश्नावलींचे कागद व गळ्यात कॅमेरा लटकवल्याने इतर वारकर्‍यांपेक्षा वेगळ्या दिसणार्‍या मोकाशींना आपल्या शांत,सौम्य,प्रसन्न व सात्त्विक व्यक्तिमत्त्वाने अनेक वारकर्‍यांशी खुलून संवाद साधता आला. प्रश्नावली बाजूला ठेवून सुपारी-तंबाखूच्या साथीने मोकाशींनी वारकर्‍यांशी मारलेल्या गप्पांमधून वारीचे अंतरंग प्रकट झाले आहेत. वारीमध्ये परमेश्वराच्या दर्शनासाठी येणारे वारकरी आपल्या सांसरिक व्यथा चिंता सोबत वागवत येतात हे मोकाशींना खटकते. मात्र वारीच्या कालावधीतच पुराने थैमान घातलेल्या पुण्याची बातमी कळताच कुटुंबाची काळजी वाटून पुण्याकडे परत धाव घेतल्याचे मोकाशी प्रांजळपणे मान्य करतात. घरच्या माणसांना "धडा शिकवण्याच्या" उद्देशाने पालखीत येणारे वारकरी इथे आहेत तर पालखीच्या वाटेवरच देह ठेवण्याचा निश्चय करणारे नव्वद वर्षे ओलांडलेले काही वारकरी इथे आहेत.

दीडशे मैलाच्या पायपिटीतील सासवड-जेजुरी-वाल्हे-लोणंद-पुणे-फलटण-बरडगाव-नातेपुते-माळशिरस-वेळापूर-शेगाव-वाखरी-पंढरपूर अशा प्रत्येक मुकामाच्या ठिकाणी मोकाशींना आलेले अनुभव, त्रयस्थ दृष्टीकोणातून वारीकडे पाहत त्यांनी केलेली टिपणे, लहानसहान प्रसंगात पालखीतील वारकर्‍यांच्या वर्तणुकीचे अर्थ लावण्याचे त्यांचे कौशल्य "पालखी" मध्ये प्रतिबिंबित झाले आहे.

शेगाव येईपर्यंत वारीमध्ये आलेल्या अनुभवांवरूनही वारकर्‍यांप्रती असलेली मनाची ओल कायम ठेवणार्‍या मोकाशींच्या मनातील वारकर्‍याच्या प्रतिमेला शेगावमधील लाह्यांच्या व फुगडीच्या प्रसंगानंतर खरा धक्का बसतो. वाखरीमध्ये भेटलेला एक म्हातारा या भंग झालेल्या प्रतिमेला अधोरेखित करणारी संत तुकारामांची कथा त्यांना सांगतो आणि आयुष्याबद्दल तारतम्य आलेल्या एका खर्‍या वारकर्‍याची त्यांना ओळख पटते. पालखीत सोनोपंत दांडेकर, धर्मप्रसार करण्यासाठी आलेले ख्रिस्ती मिशनरी, जैतुनबाई सारख्या मुसलमान वारकरी बाई मोकाशींना भेटतात. फुगड्या, रिंगण यासारख्या विजोड प्रथांसोबत कृष्णलीला करणारे एक बोवाजींशीही मोकाशींची भेट होते. आणि हे पुस्तक पालखीचे दर्शन न राहता जीवनाच्या वारीचेच दर्शन होऊन जाते. मोकाशींच्या लेखणीला प्रिय असलेली संथ गती पुस्तकाला आहे. क्वचितच असलेला सौम्य विनोद पुस्तकाच्या प्रकृतीशी पूरक आहे.

पुस्तकातील आवडलेला उतारा द्यायचा म्हटला तर सगळेच पुस्तक इथे टंकावे लागेल. पण तरीही मला आवडलेला एक उतारा देतो.

"चित्रपटातला देखावा बदलावा तसा सगळा परिसर बदलला आहे. खडूसचा ओढा टाकला नि रस्ते सरळ आकाशापर्यंत धावत गेले आहेत. रस्त्याला वळण येतं ते सुद्धा केवढं पसरट! पालखीची दोन मैलांची मिरवणूक संपूर्ण दिसते आहे. इतकी लांब की डोळ्यांत मावत नाही. पावसानं काळपटलेल्या मातीवर स्त्रीपुरूषांची रंगीत रांग रांगोळीसारखी वाटत आहे.

रस्त्याच्या रुंदीत वारकरी आता मावत नाहीत. सासवडहून निघताना एका रांगेत चार वारकरी होते. आता बारापर्यंत गेले आहेत. उदार हातांनी माप भरावं तसं पालखीनं वारकर्‍यांचं माप पृथ्वीवर भरपेट ओतलेलं आहे. चालताना उभं राहणं जड जात आहे. बाजूच्या शेतांतून लगबगीनं वारकरी चालत आहेत. पालखी रंगात घुमू लागली आहे. खरं पाहता मी भाबडा झालो आहे. यातले खरे वारकरी किती, ढोंगी किती, आयुष्यभर दुसर्‍यांना लुबाडत राहून देव-देव करायला आलेले किती - असलं काही मनात येत नाही. तसंच, बाहेर स्पुटनिक उडताहेत, लढायांच्या तयार्‍या सुरू आहेत नि इथं हे काय चाललं आहे - असंही मनात येत नाही.

मी एकदम मागील काळात जातो. आत्ता आत्ता माणूस केवळ जगण्यासाठी एकमेकांना फाडून खात होता आणि आज इथं माझ्या डोळ्यांसमोर गुण्यागोविंदानं भजन म्हणत हजारो माणसं एकत्र चालली आहेत. केवढा भव्य देखावा हा! केवढी प्रगती ही!"

आता थोडेसे पुस्तकाच्या सजावटीविषयी. पुस्तकाचे लक्षवेधक मुखपृष्ठ आकर्षक आहे. शिवाय पुस्तकाच्या मलपृष्ठावरील आणि पुस्तकाच्या आतील रविमुकुल यांनी काढलेली वारकर्‍यांची रेखाचित्रे सुरेख आहेत. पुस्तकाच्या प्रारंभी असलेल्या मोकाशींच्या रेखाचित्रातून "किंचित कुरळे व उलटे फिरवलेले केस, स्नेहाळ डोळे, जाडसर जिवणी व गोलसर चेहरा ही प्रथमदर्शनी अनुकूल ग्रह करणारी" त्यांची आकृती समोर उभी राहते. पुस्तकासाठी वापरलेला कुरूकुरू वाजणारा कागदही उत्तम. त्यामुळे पुढील पानावरील अक्षरे मागील पानावर फारसा गोंधळ घालत नाहीत.

१९६१ साली प्रथम प्रकाशित झालेल्या मौज प्रकाशनाच्या या पुस्तकाची ही तिसरी आवृत्ती. किंमत १०० रुपये.

(सर्व चित्रे पुस्तकातील)

- (वाचक) आजानुकर्ण

Comments

वारकरी

जो "वार" करतो (प्रहार या अर्थाने) तो वारकरी. असे आता वारकरी म्हणतो. तुकारामा विषयी शालेय प्रश्नपत्रिकेत आलेल्या परिच्छेदावरुन जे वादळ गेल्या वर्षी झाल त्या पार्श्वभूमीवर. वारकरी ही राजकारण्यांनी वोटिंग बँक बनवली आहे. दि.बा. मोकाशींमुळेच शामभट्ट व त्याचा शिष्य बटो यांचा वृत्तांत पुस्तक पुन्हा प्रकाशित झाले असे वरदा वुक्सचे ह.अ. भावे सांगतात हे मी http://mr.upakram.org/node/465 येथे मांडले होतेच. गेल्या दहा वर्षात झालेले पालखीत झालेले बदल हे आपण बघतो आहोत. हौशे गवशे व नवशे यांचे प्रमाण पालखीत किती आहे हे सांगणे अवघड आहे किंवा हायपोथेटीकलच आहे. केवळ पोटापाण्याची सोय होते आहे म्हणुन येणारे देखील खुप आहेत हे भीषण वास्तव नाकारुन चालणार नाही. सगळी कडे अन्नदान फुकट आहे. त्यातून पुण्य मिळत. अनेक राजकीय गुंड असे "पुण्य" मिळवतात. मोबाईलधारी वारकर्‍याचे फोटो आता कौतुकाने पेपरात येतात. वर्तमानपत्र हे शेवटी समाजाचे प्रतिबिंब आहे.वारीबंदोबस्ता करिता माझा रेल्वे पोलीस मधील सहकारी नेहमीच (नाईलाजाने) पंढरपुरला पाठवावा लागे. त्यामुळे तेथील गुन्हेगारी बद्द्ल मला माहिती मिळे. काही वारकरी गुन्ह्याचे नकळत वाहकच बनतात. त्यात नवल ते काय? तरी देखील प्रतिनिधिक वारकरी हा विठूभक्त आहे. भाबडा आहे. पंढरपूरचे विठ्ठलमंदिर हे हरिजनांसाठी सुद्धा खुल व्हाव यासाठी साने गुरुजींनी सत्याग्रह केला होता. नंतरच ते खूल झाल.
(गावात पालखी साठी वारकर्‍यांना भाकर्‍या घेउन जाणारा)
अवांतर- दशमी का नाही? असे कोणीतरी तिकडे कुजबुजत आहे
प्रकाश घाटपांडे

"वार" करणारा

जो "वार" करतो (प्रहार या अर्थाने) तो वारकरी.

खरी व्यूत्पत्ती कशी आली आहे ते मला माहीत नाही. पण ज्ञानेश्वरांनी भागवत धर्म आणि त्यात वारकरी संप्रदायाची सुरवात केली असे सर्वसामान्यपणे म्हणले जाते. त्यांनी या संप्रदायाकरवी जातीभेद मर्यादीत अर्थाने का होईना काढून टाकला. त्यामुळे हा शब्द त्याकाळात कोणी "कॉईन" केला ते माहीत नाही पण "जातीभेदांवर" वार करणारे ते वारकरी असा अर्थ मी समजत आलो.

वारकरी

ही बातमी दै. सकाळ मधील असून प्रतिसादातील नमूद पार्श्वभूमीवर आहे. व्युतपत्तीशास्त्रातील नव्हे. त्यावेळी (बहुतेक) दहावीच्या प्रश्न पत्रिकेत परिच्छेदातील मजकुरामुळे तुकाराम महाराजांची बदनामी झाली. त्या वरुन उठलेले राजकीय वादळ . या अनुषंगाने. इतिहासाच्या अस्मितेतून काही लोकांनी जातीभेदाची दरी मिटवण्या ऐवजी वाढवली. ग्यानबा तुकाराम हा 'द्वंद्व समास' 'तत्पुरुष' केला.
( संत साहित्यामुळे अंनिसचे काम अधिक सोपे झाले आहे असे मानणारा )
प्रकाश घाटपांडे

वाचायला आवडेल

हे पुस्तक नक्कीच वाचायला आवडेल. पुस्तक परीचयाबद्दल धन्यवाद!

असेच

म्हणतो. एका वाचनीय पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत

छानच!

कर्णा,
सुरेख परिक्षण(?) केले आहेस या पुस्तकाचे. अगदी त्वरित मिळवून वाचावेसे वाटते आहे.
चित्रे टाकल्याने वेधक झाले आहे.
वारीचे जगाचे आकर्षण नेहमीच राहिले आहे.
ओळख करून दिल्या बद्दल धन्यवाद!
किमान तीरावरून तरी हे सगळे पाहणे होईल...

आपला
गुंडोपंत

सुंदर व नेमके परिक्षण

माझं बरचसं वाचन हे 'चालू घडामोडी' (करंट अफेअर्स) या प्रकातरातलं असल्याने (किंवा त्याची आवड असल्याने) कथा, कादंबर्‍या (फिक्शन) या प्रकाराकडे अगदी अलिकडे पर्यंत वळलो नव्हतो. दोन वर्षांपूर्वी एका मैत्रीणीने 'रारंग ढांग' वाचावयास दिले आणि कथा वाचन सूरू झाले. उपक्रमावर आल्यावर मागे एकदा लंपन बद्दल कूणी (बहुतेक नंदन वा निनाद) लिहलं होतं, तेंव्हा प्रकाश नारायण संतांची पुस्तक वाचली. आजच्या तुझ्या या परिक्षणाने पालखी वाचण्याची उत्कटता निर्माण झाली आहे. खूप सुंदर व नेमके लिहले आहेस. वाचकांना हे पुस्तक वाचण्याची उत्कंठा निर्माण होते हेच तुझ्या लेखनाचे यश आहे. लगे रहो!

जयेश

असेच

वाचकांना हे पुस्तक वाचण्याची उत्कंठा निर्माण होते हेच तुझ्या लेखनाचे यश आहे
असेच म्हणतो.. सुंदर परिक्षण.. शुभेच्छा

हेच

पुस्तक वाचावेसे वाटते आहे.

सुंदर

पुस्तक परिक्षण.

आता वाचलेच पाहिजे हे पुस्तक.

[थोडे अवांतर: चांगली पुस्तके हातात येण्यालाही भाग्य लागते. गेली दोन वर्षे द. ता. भोसल्यांचे 'बाळमुठीतले दिवस' शोधून थकलो, अजुन मिळाले नाही. ह्यावेळच्या अत्यंत धावत्या मुंबईभेटीत 'उलटसुलट'च्या बाबतीतही निराशाच पदरी पडली. दादरच्या एका जुन्या (पुढच्या भागात गाईड्स व् शालोपयोगी माल, आतल्या भागात इतर पुस्तके, काउंटरच्या मागे अर्थातच)अणि नावाजलेल्या दुकानात 'प्रकाशक कोण?' अशी विचारणा झाली. नशीब हे की त्यांना हातकणंगलेकर माहिती होते (तसे म्हणाले तरी!). ह्याच दुकानात काही वर्षांपूर्वी 'अनिल अवचटांचे नवीन काहीही आहे का?' असे विचारल्यावर 'अवचट? लिहीतात?" असे ऐकून् घ्यावे लागले होते].

पुस्तक परिचय आवडला.

सुंदर परिक्षण.... पुस्तक मिळाले तर वाचुन काढीन.
नाहीच मिळाले तरी, या पुस्तकाबद्दल आम्हाला आपल्या परिक्षणाने अधिकाराने बोलण्याची सोय झाली आहे, धन्यवाद !!!

अवांतर ;) सध्या काय वाचताहेत, असे कोणी विचारल्यावर मोकाशी यांचे पालखी वाचले अशी च्याट मारायला आम्ही मोकळे.

आपला...!!!
अंदाज पाहुन च्याटा मारणारा. ;)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इरावती कर्वे / दुर्गा भागवत...

नेमके आठवत नाही पण, या लेखिकांचे पालखीवरील लेख / लिखाण वाचनीय आहे.

आजच वाचले

आजच हे पुस्तक वाचायला घेतले व खाली न ठेवता फडशा पडला.. बर्‍याच दिवसांनी एका बैठकीत पुस्तक वाचून काढले.. बरे वाटले..
एका छान पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल अनेक आभार.
पंढरीची वारीची १९६१मधील असली तरी कुठेही संदर्भ न लागल्यासारखे होतं नाही.
प्रत्येकाने आवर्जून वाचण्यासारखे पुस्तक इतकेच म्हणतो

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

दि.बा.मोकाशीं

दि.बा.मोकाशींची देव चालले ही देखील एक अप्रतिम कादंबरी आहे

 
^ वर