चीनी कम

चीनी कम - शीर्षक वाचुन अमिताभ बच्चन - तबु यांनी भुमिका केलेल्या चित्रपटासंबंधीत लेख वाटला असेल तर ते साफ चुक आहे. चीन आपल्यापेक्षा प्रगत आहे असे माझे नाही, अलिकडेच भेट देउन आलेल्या सोनिया गांधींचे मत आहे. त्यांच्या म्हणजे सोनिया गांधींच्या वक्त्यव्यांवर - चीनशी तुलना करणे अयोग्य आहे असे नाना परळकर यांचे महाराष्ट्र टाइम्स असे मत असलेला लेख आहे. तो जसाच्या तसा येथे देत आहे.


चीनशी तुलना करणे अयोग्य


सोनिया गांधी यांच्या अलीकडच्या चीन दौऱ्यादरम्यान त्यांना तेथील राष्ट्राची आथिर्क प्रगती, तसेच तेथील बहुतेक क्षेत्रात झालेल्या सुधारणा दिसल्या. त्या पाहून सोनिया गांधी प्रभावित झाल्या व चीनकडून भारताला बरेच काही शिकण्यासारखे आहे असे वक्तव्य त्यांनी केले. वास्तविक पाहाता आपल्या देशाचे नागरिक विशेषता: पुरुष व महिला, विद्याथीर्वर्ग, शैक्षणिक क्षेत्रात, विज्ञानात तसेच इतर क्षेत्रांत, अन्य देशांपेक्षा पुष्कळच प्रगतिपथावर आहेत. दुसरे असे की चीन देशाची तुलना आपण आपल्या देशाशी करू शकत नाही. कारण चीनमध्ये भ्रष्टाचाराला मुळीच थारा नाही. जरा कोणी इकडचे तिकडे केल्यास त्यास अत्यंत कडक शिक्षा दिली जाते. असे खटले झटपट निकालातही काढले जातात. याउलट आपल्या देशात भ्रष्टाचाराची पाळेमुळे एवढी खोलवर रुजली आहेत की कालचा साधा नागरिक राजकारणात जाऊन पाच वर्षांत सामान्याचा करोडपती होतो. तसेच ज्यांच्यावर गुन्हेगारीचे खटले चालू आहेत, त्यांना तो गुन्हा सिद्ध होईपर्यंत रेल्वेसारख्या कुरणात चरण्यासाठी, मंत्रीपद बहाल केले जाते. देशासाठी आखलेल्या पंचवाषिर्क योजनांमुळेही आपण हवी तशी आणि तितकी प्रगती करू शकलो नाही. याचे कारण अशा योजनेतील काही रक्कम दुसरीकडे वाम मार्गाने वळती केली जाते. देशाची आथिर्क गंगा आपल्या घराण्यात कशी वळती करता येईल याची स्वप्ने अनेकजण पहातात. तसेच अशा रीतीने आलेल्या पैशाची टिमकी आपल्याच जनतेसमोर वाजविण्यामध्ये ते धन्यता मानतात. आपल्या मुलामुलींची लग्ने इतक्या थाटात करतात की त्यापुढे टाटा, बिर्ला, गोदरेज, अंबानी यासारखे उद्योगपती तोंडात बोटे घालतील!

असे चित्र डोळ्यासमोर असतानाही देशात मिळणाऱ्या गव्हाच्या किमतीपेक्षा जास्त किमतीचा सडका लाल गहू आयात केला जातो व त्याबद्दल जनतेमध्ये उदेक झाल्यावर तो गहू गोदामात सडत पडतो. परंतु अशा प्रकरणात सत्य शोधून, असे करण्यामागे देशाचे होणारे नुकसानीसाठी संबंधितावर कारवाईच होत नाही.

अशा पद्धतीची अनेक प्रकरणे देशात चालू असताना, चीन देशाबरोबर आपल्या देशाच्या आथिर्क बाबींची तुलना कशी कराल? परंतु त्याउलट विचार केल्यास आपल्या देशातील लोकनियुक्त राजकारणी लोकांची आथिर्क प्रगती चीनमधील राजकारण्यांपेक्षा कितीतरी पटीने अधिक झालेली आहे. हे मात्र निश्चित!

यावर आपली काय मते आहेत? खरच चीनशी तुलना करावी का? आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेकदा हि तुलना केली जाते. पण जेंव्हा आपल्यासारख्या सामान्य व्यक्तिचा विचार घेतला जातो त्यावेळी एक तुलना म्हणुन नक्किच योग्य वाटते पण खोलात जाउन विचार केल्यास आमचे राजकारणी (सगळ्याच पक्षाचे) किती धुळफेक करतात? हा विचार मनात येतोच. तसेच आमच्या राजकारण्यांचे विचार आणि त्यांची कृती हे किती परस्पर विरोधी आहे हे हि दिसुन येते.

मी जेंव्हा एका चीनी माणसाची आणि भारतीय माणसाची तुलना करतो त्यावेळी मला चीनी कम कधीच वाटत नाही. निदान त्यांचा आत्मविश्वास आमच्यापेक्षा नक्कीच जास्त असतो असा आजवरचा अनुभव आहे.

Comments

भारतियांची प्रगती !


चीन च्या अंतराळ संशोधकांनी नुकतेच स्वतः विकसित केलेल्या यानाने चंद्राची काही चित्रे पाठविली याचे आम्हाला भारतीय म्हणून काहीच आश्चर्य वाटले नाही. कारण आम्ही त्यांच्या पुढे आहोत. त्या तुलनेत ते फार मागे वाटतात. मुक्त अर्थव्यवस्थेमुळे आम्हीही चीनच्या पुढे आहोत. आणि सरकारी कामात येऊ लागलेली पारदर्शकता आणि त्यात होत असलेली सुधारणा, आणि भ्रष्टाचाराच्या बाबतीत आमची खाली गेलेली क्रमवारी, भारतीय म्हणून आत्मविश्वास वाढविणारी घटना वाटते.

बाकी चीनचा काही विकासाचा विदा, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक असा उपलब्ध असता तर त्याची तुलना करता आली असती असे वाटते ! बाकी, राजकारण्यांना काय वाटते या पेक्षा सामान्य माणसाच्या प्रतिक्रिया महत्वाच्या मानाव्यात असे वाटते ! कारण, राजकीय व्यक्ती असे विधाने करतात तेव्हा त्या मागे राजकीय खलबते, आंतरराष्ट्रीय धोरणांचा भाग अधिक असतो, असे वाटते. बाकी प्रतिक्रियांची आम्हीही वाट पाहतोय.

अवांतर :) चिनी कम शिर्षक वाचल्यावर वाटले, आपणही चित्रपटाची समिक्षा करायला लागलात की काय ? ( ह. घ्या. )

अधिक अवांतर :- पहिला प्रतिसाद टंकला गेला की, काही संशोधक, तो प्रतिसाद किती वेळात आला. तो येण्याची कारणे, आणि काय काय शोधत असतात. तेव्हा, आमच्या प्रतिसादाकडे संशोधनाचा विदा या नजरेने पाहू नये ही नम्र विनंती.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चीन-भारत

चीन आज कितीही म्हणले तरी कम्यूनिस्ट हुकूमशाही अमलात आणणारा देश आहे. अमेरिकेत येणार्‍या काही "फूड प्रॉडक्टस" मधे चुका आढळल्याचे समजताच अन्न-उत्पादन वगैरेशी संबंधीत खात्याच्या प्रमुखास ८ लाख का असेच काही डॉलर्सच्या भ्रष्टाचाराशी संबंध असल्याच्या नावाखाली ताबडतोब मारून टाकले. (तशा अजूनही अनेक गोष्टी त्यावेळेस बाहेर आल्या होत्या, पण राजकीय दृष्ट्या कमकूवत माणूस ह्या संबंधात असावा). असे जर कायदे भारतात वापरायचे ठरवले तर आपला भ्रष्टाचाराचा प्रश्न कदाचीत संपणार नाही (कारण चीन मधे भ्रष्टाचार नाही म्हणणे हा एक विनोद आहे ) पण लोकसंख्या मात्र नक्कीच कमी होईल!

मी काही सोनीयाजींना भेटलो नाही की त्यांचे चीनमहात्म्याचे भाषण ऐकले नाही. पण त्यांच्या तुलनेत सामान्य भारतीय व्यक्ती (अमेरिकेतील) चीन मधे जाऊन भारवलेल्या पाहील्या आहेत. त्याच पद्धतीने बोलणे चालते. तुलना करावी अथवा नाही हा प्रश्न बाजूला ठेवल्यास तसे वाटायला "वरकरणी" प्रगती पाहून अचंबीत होणारे म्हणजे कम्यूनिझम आल्यावर सर्वजण समान होणार अशा भ्रामक आशा ठेवणार्‍यांची पुढची पिढी वाटते.

प्रगती कशी असावी आणि करावी हे चीन कडून शिकण्याऐवजी सोनीयाजींनी गांधीजींकडून शिकले आणि त्यांच्या बाजारबुणग्या फौजेस दमदाटी करून आमलात आणायला लावले तर बरे होईल. त्यात कॉग्रेसी नसलेले पण ज्यांना चीन सरकारने पण निमंत्रीत केले होते त्या दत्तोपंत ठेंगडी ह्या विचारवंताचे विचार (आम्हाला अधुनिकीकरण हवे आहे, आंधळे पाश्चात्यिकरण नको) जर हातात हात घालून घेतले तर अधिक उपयुक्त आहे. तसे अनेकताअपल्या देशात आहेत - वेगवेगळ्या विचारधारांचे आहेत - पण इतरांचा अनुनय सोडल्यासच ते शक्य आहे.

बाकी चायना डेव्हलप होतोय म्हणताना - त्यांची प्रदुषित उत्पादने ही अमेरिकेत बंद करण्याची काहीतरी यंत्रणा आहे. ती तिकडे खपत नाहीत म्हणल्यावर आपल्याकडे आणणे सहजसाध्य होऊ शकते. त्यांच्या कडे वाढणार्‍या आणि इतर जगाच्या तुलनेत अनिर्बंध असलेल्या प्रदुषणाचा जसा अमेरिकेत वेस्ट कोस्टला सरळ त्रास होत आहे आणि वाढणार आहे, तसाच आपल्याला पण त्रास होऊ शकतो, होत असेल पण आपली डाव्या विचारांची अथवा त्यांचे मित्र असलेली प्रसारमाध्यमे याबाबत काही बोलणार नाहीत.

चीनबद्दल कौतूक वगैरे वाटून घेण्या ऐवजी आणि तुलना करत बसण्या ऐवजी आपण चीन पासून संरक्षणाच्या दृष्टीकोनातून सावध असणे महत्वाचे आहे. त्यांची लोकसंख्या वाढत आहे, महत्वाकांक्षापण वाढत आहे. या लोकसंख्येत आलेली श्रीमंती आणि वाढणारी गरीबी यांचा मेळ लावल्यास कम्यूनिझम कधीच "रेस्ट इन पिस" झाल्याचे कळून चुकेल पण "पोपट मेला" असे सरळ कोणी बोलणार नाही इतकेच. पण जेंव्हा हा प्रश्न वाढत जाईल तेंव्हा परत अरूणाचलप्रदेश, आसाम वगैरे भागात परत त्यांच्या कुरबुरी वाढल्या तर आश्चर्य वाटायचे कारण नाही पण त्याची खबरदारी आणि म्हणून चीन - पाकीस्तान, चीन-बांग्लादेश, चीन-ब्रम्हदेश, चीन-श्रीलंका, यांच्या मैत्रीपूर्ण संबंधाचा आपल्याला काय त्रास होऊ शकेल यावर केवळ राजकारण्यांनीच नव्हे तर समाजातील विचारवंत आणि जाणत्यांनी प्रकट विचार केले पाहीजेत असे वाटते. ही काळजी काही फुकाची नाही, "असे आता होईल असे वाटत नाही , जग बदलले आहे" असे कोणी म्हणू शकेलही. पण त्यांनी नव्वदाव्या शतकातील अमेरिकन शांती आणि वैभव बघितल्यानंतर आज कायचालले आहे ते पहावे म्हणजे लक्षात येईल की "बदल हा जास्त कायमस्वरूपी असतो (nothing is constant but change) हे खरे आहे इतके वाटते.

बाकी राहीला मूळ प्रश्न चीनशी तुलना - आपण आपल्या जीवावर मोठे होत आहोत, त्यातले बरेचसे आक्षेपार्ह असले तरी ते आपल्यास योग्य पद्धतीने बदलले पाहीजे आणि महत्वाकांक्षा पूर्ण करायला संयमाने वागले पाहीजे असे वाटते. म्हणून नक्कले पेक्षा केवळ आपला "पोटॅन्शियल आणि रीअल लाईफ काँपिटीटर नेबर" म्हणून चीन कडे जास्त बघत स्वतःच्या विकासाकडे लक्ष देणे महत्वाचे वाटते. कारण नक्कल ही शेवटी आपल्याला बहुरूपी करेल पण मोठे करणार नाही...

चीन पासून संरक्षण ?

चीन पासून संरक्षणाच्या दृष्टीकोनातून सावध असणे महत्वाचे आहे.
विकासराव,
आंतरराष्ट्रीय राजकारणातले आम्ही काही जाणकार नाही.पण, आपण चीनला टरकून असल्यासारखे का वागतो.
आपला बळकावलेला काही भुभाग आपण त्यांना मागू शकत नाही. किंवा त्या प्रश्नांकडे भिजत घोंगडे ठेवण्याचे कारणही समजत नाही.
आपण संरक्षणाच्या बाबतीत त्यांच्या तुलनेत कमी तर नाही ना ? की पुन्हा आपले कचखाऊ राजकारण आड येते !

संरक्षण

आंतरराष्ट्रीय राजकारणातले आम्ही काही जाणकार नाही.पण, आपण चीनला टरकून असल्यासारखे का वागतो. आपला बळकावलेला काही भुभाग आपण त्यांना मागू शकत नाही. किंवा त्या प्रश्नांकडे भिजत घोंगडे ठेवण्याचे कारणही समजत नाही. आपण संरक्षणाच्या बाबतीत त्यांच्या तुलनेत कमी तर नाही ना ? की पुन्हा आपले कचखाऊ राजकारण आड येते !

जाणकार मी पण नाही आहे, थोडीफार (अथवा "फार थोडी!") माहीती वाचून आहे इतकेच. संरक्षणाच्या बाबबतीत मला वाटत नाही की आपण टरकून असावे अथवा तसे वागतो. मी संरक्षण हा शब्द "स्ट्रॅटेजीक सिक्यूरीटी" या अर्थाने वापरत होतो.

आपले राजकारण कचखाऊ असण्यापे़क्षा पैसेखाऊ भ्रष्ट आहे आणि स्वस्वार्थासाठी टरकून वागायचेच असेल तर त्याला वागावे. कारण देवगिरीचा किल्ला हा अनेक शतके अभेद्य होता. त्याचा भेद झाला तेंव्हा कारण किल्ला कमी पडला नाही तर दारूगोळ्याच्या ठिकाणी मिठाची पोती भरलेली मिळाली हे होते.

+१

आपल्यापेक्षा अधिक आण्विक शक्ती, जास्त मोठं सैन्य, त्यांना निसर्गाने दिलेली 'वरची' जागा (उंचीच्या दृष्टीने म्हणतोय), प्रचंड लोकसंख्या, वरचढ जीडीपी, एकपक्षी धोरणामुळे दिशानिश्चिती इ. गोष्टींमुळे आपण टरकलो नाही तरच् नवल! टरकून का होईना पण या गोष्टीत प्रगती करणे, बिनधास्त पावले टाकुन पाय खड्ड्यात टाकण्यापेक्षा कधीही उत्तम नाही का?
-ऋषिकेश

महत्वाकांक्षा

विकास यांनी त्यांच्या प्रतिसादात महत्वाकांक्षेचा उल्लेख केला आहे. मला वाटतं हा एक कळीचा मुद्दा आहे. मुळातच भारतीय खरचं महत्वाकांक्षी आहेत का? फार फार पुर्वी असतील फारतर. इसवीसना पुर्वीपासुन आम्ही आक्रमण न करता आक्रमणे थोपवतच आलो आहोत. त्यामुळे आमचा बराचसा काळ हा नेहमीच प्रतिकार करण्यात गेला. मग महत्वाकांक्षा तर दुरच राहिली. या उलट असे अनेक देश आहेत ज्यांच्या नागरिकांमध्ये उपजत महत्वाकांक्षा असतात. आमच्याकडे असे राज्यकर्ते आहेत का ज्यांना भारतीय नागरीकांना सर्व प्रकारे महत्वाकांक्षी बनवायचे आहे? हां, राज्यकर्त्यांच्या स्वतःच्या खिसे भरायच्या महत्वाकांक्षा आहेत. अर्थात सगळा दोष राज्यकर्त्यांचा नाही हे सुद्धा सत्य आहे.

मराठीत लिहा. वापरा.

भामटे

मी जेंव्हा एका चीनी माणसाची आणि भारतीय माणसाची तुलना करतो त्यावेळी मला चीनी कम कधीच वाटत नाही. निदान त्यांचा आत्मविश्वास आमच्यापेक्षा नक्कीच जास्त असतो असा आजवरचा अनुभव आहे.

माझ्या अनुभवा प्रमाणे आत्मविश्वास काहीसा डळमळीत असतो. त्यामुळे अनेकदा विचारून खात्री करून घेण्याकडे कल असतो. तुमच्यावर 'कोणत्याही प्रकारचा' विश्वास चीनी माणूस कधीच टाकत नसतो. शिवाय उघड वागण्या बरोबरच, वेगळ्याच धोरणाची एक गुप्त भामटी व्युहरचना चीनी मनात आकार घेत असतेच असा अनुभव आहे. ही माणसे कधी दगाबाजी करतीला याचा कोणताही भरवसा नाही. (हे धाडसी वाक्य आहे, पण व्यक्तिगत अनुभवाचे आहे.)

या उलट सर्वसाधारण भारतीय माणसाला उगाचच खूप आत्मविश्वास असतो. बरेचदा तो अनाठाईपण असतो असे दिसते. (हे ही धाडसी वाक्य, न पटल्यास सोडून द्यावे)
पण प्राप्त परिस्थितीत मार्ग काढण्यात भारतीय माणूस चांगला असतो असे वाटते.

------
मुळ मुद्दा: माझ्या ऐकीव माहितीप्रमाणे चीनचे काही विभाग हे खरंच उत्तम सुधारलेले आहेत.
पण तसे भारतातही आहेतच. त्यात काय खास? तसे तर सा. आफ्रिकेचे जोहानेसबर्गही सुधारलेले म्हणता येईल... त्यामुळे सो.गा. नी बडबड केली म्हणून ती काही मनावर घेतलीच पाहिजे असे काही नाही.
गेल्या १० वर्षात सुधारणेच्या वाटेवर असलेल्या बहुतेक देशात अशी बेटे तयारझाली आहेत असे दिसते.

चीन

चीनी माणूस या पातळीवर माझी नोंद ही अशी...

  • ही माणसे प्रचंडकष्ट करतात हे अगदी जागोजागी दिसते.
  • तल्लखही असतात.
  • तसेच एकमेकाला सांभाळून घेणारी माणसे आहेत.

चीन-भारत संबंधाबाबत माझे मत हे असे...

  • भारताने सावध असायला हवे (फक्त चीनपासून नाही तर कोणाहीपासून) हे खरे परंतु चीन हा उत्तरसीमेवर बसलेला शत्रू आहे हे चित्र म्हणजे बागुलबुवा आहे.
  • एखाददुसरा अपवाद सोडला तर अभ्यासशून्य असलेल्या भारतीय राजकारण्यांचा चीनी मुत्सद्यांसमोर निभाव लागत नाही याने गैरसमजांना आणि वितुष्टांना हातभार लागतो. हे एकमेव कारण आहे असे सूचित करण्याचा मानस बिलकुल नाही. अधिक उत्सुकता असल्यास इंडिआज् चायना वॉर किंवा तत्सम पुस्तक वाचावे. बहुदा भारतात यावर बंदी आहे.
  • जागतिक राजकारणात भारताच्या प्रभावाची तुलना चीनशी होउ शकत नाही. खेदजनक असले तरीही हे सत्य आहे. दोन किस्से:
    1. ते स्थान मिळविणे आणि लक्ष वेधून घेणे हा भारतीय अणुचाचणीमागील एक महत्वाची प्रेरणा होती.
    2. कोण्यातरी चायनीज मंत्र्याची मुलाखत वाचण्यात आली होती त्यातील टिपण्णी -- भारताशी नेहमी होणारी तुलना हा चीनला जणू हलकी वागणूक देण्यासारखे आहे आणि अपमान करण्यासारखे आहे.)

चूभूद्याघ्या

(तिबेटी) एकलव्य

परराष्ट्र्मंत्री अँटोनी

याच संदर्भातील China is far ahead ही बातमी वाचा. आपल्या राजकारण्यांना मानभावीपणे बोलण्याव्यतिरीक्त काही वाटत नाही...

मूळ विषयाशी काहीसे असंलग्न

मी असे ऐकले की मुंबईमध्ये (आणि बहुदा भारतातल्या इतर काही शहरांमधून) चायनीज् भाषा शिकण्याची टूम निघाली आहे म्हणा , फॅशन आली आहे म्हणा , किंवा स्पेक्युलेटीव् गुंतवणुकीच्या धर्तीवर भविष्यावर नजर ठेवून ती शिकण्यामागे अनेक लोक जात आहेत असे म्हणा.

हे खरे काय ? तसे असल्यास ती भाषा शिकण्यामागे असे बरेच लोक लागण्याची मीमांसा काय करता येईल ?

खरे आहे

होय खरे आहे. चीनी भाषा चित्र लिपी असल्याने व माझ्या मुलीला (शाळेत) चित्रकलेत व भाषा या विषयात रस असल्याने. किमान तसा समज असल्याने , तिला चीनी बनवण्याचा तिच्या आईने व माझ्या बायकोने (द्वंद्व समास) घाट घातला आहे.
प्रकाश घाटपांडे

अमेरिकेतपण

चीनशी व्यापार उदीम वाढतच जाणार ह्या "एक्स्ट्रापोलेशनने" अमेरिकेत पण थोड्याफार प्रमाणात चीनी भाषा मुलांना शिकवणे चालू झाले आहे असे मधे नॅशनल पब्लीक रेडीओ वर ऐकले आहे.

 
^ वर