बहुसांस्कृतिकता

दैनिक सकाळ २७/११/२००७ मधील हा राज्यश्री क्षीरसागर यांचा लेख. आपणास काय वाटत भारतातील परिस्थितिबाबत?

जर्मनीला पेच बहुसांस्कृतिकतेचा

(राज्यश्री क्षीरसागर)
स्थलांतरितांना सामावून घेण्याच्या मुद्‌द्‌यावरून युरोपीय देशांमध्ये बहुसांस्कृतिकतेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्या राष्ट्रवादी भूमिकेमुळे जर्मनीतही हा विषय वादग्रस्त बनला आहे.
सांस्कृतिक विविधता हाडीमाशी खिळलेल्या भारतीय समाजात बहुसांस्कृतिकता (मल्टिकल्चरॅलिझम) हा वादाचा मुद्दा बनला नसला, तरी पाश्‍चात्त्य देशांत त्यावरून चर्चेचे मोहोळ उठले आहे. बहुसांस्कृतिकतेच्या मुद्‌द्‌यावरून युरोपीय देश एका अवघड वळणावर येऊन पोचले आहेत. या देशांसमोर "त्यां'चा, म्हणजे स्थलांतरितांचा (विशेषतः मुस्लिम) प्रश्‍न उभा ठाकला आहे. नेदरलॅंड्‌स, ब्रिटन या देशांप्रमाणेच जर्मनीतही या विषयावर चर्चा घडू लागली आहे. फ्रान्समध्येही हा विषय आहे; मात्र त्यावर चर्चा होत नाही. स्थलांतरितांना त्यांच्या संस्कृतीप्रमाणे वागण्याची मुभा देऊन जर्मनीने बहुसांस्कृतिकता मान्य करायची की स्थलांतरितांनी जर्मनीमधील समाजजीवनात एकरूप होण्यासाठी राष्ट्रवादाकडे झुकणाऱ्या जर्मन नागरिकत्वाच्या अटी मान्य करायच्या, असा हा पेच आहे. या संदर्भात जर्मनीने एकीकडे राष्ट्रवादाला महत्त्व देऊन स्थलांतरितांसाठी असलेल्या कायद्यात बदल केले आहेत. तर दुसरीकडे, स्थलांतरितांसाठी काही योजनाही आखल्या आहेत. मात्र या विषयाशी संबंधित कमिशनर मारिया ब्योहमर यांनी जर्मनीत बहुसांस्कृतिकतेचे स्वप्न साकार होऊ शकलेले नाही, असे स्पष्ट केले आहे.

या संदर्भात जर्मनीत अलीकडे "एकात्मता परिषदे'चे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने हे मुद्दे उपस्थित झाले. मुख्य म्हणजे या परिषदेवर तुर्कस्तानातील गटांनी बहिष्कार घातला होता, तरी या शिखर परिषदेचा उल्लेख "मैलाचा दगड' असा करण्यात आला आहे. जर्मनीतील स्थलांतरितांमध्ये तुर्कस्तानातील मुस्लिम स्थलांतरितांची संख्या सर्वाधिक (सुमारे २५ लाख) आहे; तथापि, तेथील नागरिकांचे स्थलांतर आजचे नाही. त्यामागे सुमारे ५० वर्षांचा इतिहास आहे.

१९६० च्या दशकात जर्मनीने "गेस्ट वर्कर्स'ना आपल्या देशात येण्याचे निमंत्रण दिले (कारण तेव्हा जर्मनीला मनुष्यबळाची गरज होती) त्या वेळी तुर्कस्तानातील अनेक नागरिकांनी उदरनिर्वाहाचा एक मार्ग म्हणून जर्मनीत स्थलांतर केले; पण जर्मनीत राहूनही ते आपली संस्कृती जपून होते. दरम्यान, पाश्‍चात्त्य देशांत सर्वप्रथम कॅनडाने बहुसांस्कृतिकतेची संकल्पना स्वीकारली. विविध संस्कृतींच्या नागरिकांनी परस्परांचा आदर करणे हे या संकल्पनेत अपेक्षित आहे. मात्र बहुसांस्कृतिकतेद्वारे व्यक्तींच्या मनात असलेले एका विशिष्ट संस्कृतीला जोपासण्याचे महत्त्व, तसेच इतरांपेक्षा आपण कोणी वेगळे आहोत ही भावना, या दोन बाबी अधोरेखित होतात. त्यामुळे इतर समाज-संस्कृतींमध्ये सामावून जाणे, त्यांच्याशी एकरूप होणे अवघड बनू शकते, असे म्हटले जाते.

जर्मनीत १९८० च्या दशकात बहुसांस्कृतिकतेची कल्पना उचलून धरण्यात आली. मात्र या संकल्पनेबाबत तेथे फारशी स्पष्टता झाली नाही. बर्लिनची भिंत पडल्यानंतर तेथील स्थलांतरितांची संख्या वाढली. १९९० च्या दशकात, जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत जर्मनीत वांशिक भिन्नता अधिक प्रमाणात आढळू लागली. मग अमेरिकेतील "मोल्टिंग पॉट'प्रमाणे (सुरवातीच्या काळात स्थलांतरितांनी आपली संस्कृती जपणे व हळूहळू अमेरिकी समाजजीवनात एकरूप होणे) जर्मनीतही तसे घडावे, अशी अपेक्षा करण्यात आली; पण जर्मनीत तसे कधी घडले नाही. स्थलांतरितांची अस्मिता, संस्कृती व त्यानुसार त्यांचे जीवनव्यवहार हे मुद्दे त्यांच्यासाठी नेहमीच महत्त्वाचे ठरत गेले. दुसरीकडे, सरकारनेही या समाजाने एकरूप व्हावे, यासाठी खूप प्रयत्न केले नाहीत.

दरम्यान, ११ सप्टेंबरची घटना घडली आणि दहशतवादाचा मुद्दा प्राधान्याचा बनला. त्या वेळी झालेली "क्‍लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्स'ची चर्चा, फ्रान्समधील मुस्लिम तरुणींनी हिजाब बांधण्यावरून उठलेले वादळ, मुस्लिमांच्या भावना दुखावल्यावरून डच चित्रपट निर्माते व कलाकार थिओ वॅन गोग यांची करण्यात आलेली हत्या, महंमद पैगंबर यांच्या व्यंगचित्रांवरून जगभर झालेला हिंसाचार, लंडनमधील बॉंबस्फोट इत्यादी घटनांमुळे पाश्‍चात्त्य देशांत मुस्लिमांच्या विरोधात वातावरण बनले. या पार्श्‍वभूमीवर जर्मनीत बहुसांस्कृतिकतेची चर्चा ऐरणीवर आली.

या चर्चेत सहभागी होताना तेव्हा (२००४) विरोधी पक्षात असणाऱ्या नेत्या अँजेला मर्केल यांनी, जर्मनीतील बहुसांस्कृतिकतेची संकल्पना संपुष्टात आली असल्याचे मत व्यक्त केले होते. हे मत मांडल्यानंतर त्या निवडून आल्या हे येथे उल्लेखनीय. यापूर्वी एका राजकीय नेत्याने जर्मनीत "लीडिंग कल्चर' असावे, असे म्हटले तेव्हा त्यांच्यावर भरपूर टीका झाली होती. माजी चॅन्सेलर जेरार्ड श्रोइडर यांनी लोकशाही देशात कायद्याचे महत्त्व अधोरेखित करून समांतर समाजव्यवस्था असू शकत नाही, असे मत मांडले होते. १९६० च्या दशकात जर्मनीने "गेस्ट वर्कर्स'ना निमंत्रण देण्याची चूकच केली, असे विधान माजी चॅन्सलर हेल्मुट श्‍मिड्‌ट यांनी करून चर्चेत वेगळी भर घातली, तर जन्मापासून जर्मनीत असलेल्या एरॉल ओझकाराका या तुर्कवंशीय वकिलांनी जर्मनीत बहुसांस्कृतिकतेला कधीच संधी देण्यात आली नाही, असे मत मांडले. जर्मन भाषा शिकत नाहीत असा आरोप करण्यात येतो, पण जर्मनीने स्थलांतरितांसाठी जर्मन भाषा शिकण्याच्या सोयीच उपलब्ध करून दिल्या नाहीत, असेही ते म्हणतात. या पार्श्‍वभूमीवर चॅन्सलरपदी निवडून आल्यानंतर अँजेला मर्केल यांनी राष्ट्रवादाची कास धरून स्थलांतरितांबाबतच्या कायद्यात केलेले बदल व "एकात्मता परिषदे'ची दिशा समजून घेता येईल. कायद्यातील प्रमुख बदलांनुसार, नोकरदारांना आपल्या जोडीदाराला जर्मनीत आणायचे असल्यास त्या जोडीदाराला जर्मन भाषेची परीक्षा द्यावी लागणार आहे. तसेच जोडीदाराचे वय किमान १८ वर्षे पूर्ण असावे लागेल. कारण स्थलांतरित मुस्लिम नागरिकांमध्ये अल्पवयीन मुलींची संमती न घेताच विवाह होतात. यामुळे आळा बसेल असा अंदाज आहे. स्थलांतरितांना जर्मनीचे नागरिकत्व देताना, त्यांना नोकरी असणे व त्यांच्या मुलांना शाळेत प्रवेश मिळणे, या दोन निकषांना प्राधान्य देण्यात येणार आहे. हे
बदल तुर्कवंशीयांना अडचणीचे ठरू शकतात. त्यांच्या मते, या बदलांचा अर्थ जर्मनीला तुर्कवंशीय नको आहेत, असा होतो.

खरे तर अनेक तुर्कवंशीयांनी जर्मनीत चांगली प्रगती केली असून, तेथील समाजजीवनात ते सामावूनही गेले आहेत; पण ही संख्या अजून वाढू शकते. अभ्यासकांच्या निरीक्षणानुसार स्थलांतरितांच्या मुलांना शिक्षण देणाऱ्या शाळा त्यांना किमान कौशल्य मिळविण्याची संधी देतात. जर्मन मुलांच्या तुलनेत त्यांना उच्च शिक्षणाच्या, जर्मन भाषाशिक्षणाच्या सोयी मिळत नाहीत, म्हणून त्यांना उत्तम रोजगार देऊ शकणाऱ्या संधीही उपलब्ध होत नाहीत. परिणामी, स्थलांतरित व जर्मन नागरिक यांच्यातील आर्थिक व सामाजिक दरी रुंदावतच जाते. स्थलांतरितांमधील तरुण गट गुन्हेगारीकडे वळतो, धार्मिक कारणासाठी शाळेतील काही तास हे विद्यार्थी बुडवतात, अशा तक्रारी नोंदविल्या जातात. जर्मनी व टर्की या दोन्ही देशांचे नागरिकत्व घेता येत नसल्याने स्थलांतरितांमधील अंदाजे एकतृतीयांश नागरिकांनीच जर्मनीचे नागरिकत्व स्वीकारले आहे. त्यांच्यातील काही तरुण आपल्या पालकांपेक्षा कट्टरतेकडे अधिक झुकलेले आढळतात, त्यामुळे मूलतत्त्ववाद वाढीस लागण्याची शक्‍यता निर्माण होते.

या पार्श्‍वभूमीवर, स्थलांतरितांच्या प्रतिनिधींशी चर्चा न करता, सरकारने कायद्यात बदल केल्याने नाराज झालेल्या गटांनी चॅन्सलर अँजेला मर्केल यांनी आयोजित केलेल्या दुसऱ्या "एकात्मता परिषदे'वर बहिष्कार घातला. मर्केल यांच्या राष्ट्रवादी भूमिकेमुळे बहुसांस्कृतिकतेपासून जर्मनी आणखी दूरच गेला आहे, असे दिसते.

Comments

फरक

भारतात "बहुसंस्कृतिकते" पेक्षा बहूधार्मिकता आहे. "अनेकतेमधे एकता" हे चावून चावून चोथा झालेले वाक्य असले तरी त्यात तथ्य आहे. भारतीय म्हणा हिंदू म्हणा पण या संस्कृतीच्याच चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रभावात आपल्या येथे सव्र धर्म कमी अधीक प्रभावाने नांदतात. या संदर्भात एक ऐकीव गोष्ट: पोप जॉन पॉल जेंव्हा ७० का ८० च्या दशकात भारतात प्रथमच येऊन गेले, तेंव्हा नजरेने प्रत्यक्ष पाहील्यावर त्यांच्या आधी केलेल्या घरच्या अभ्यासात भर पडून समजून चुकले की येथील जनता ही येथील संस्कृतीच्याच प्रभावात आहे. परीणामी त्यांनी नंतर त्यांच्या सहकार्‍यांना सांगीतले की जर येथे (भारतात) ख्रिस्ती धर्म प्रसार करायचा असेल तर त्यांनी "हिंदूआईज ख्रिश्चॅनिटी" केली पाहीजे. पूर्व भागात या स्वरूपात अशी चर्चेस दिसतात की ज्यांची ठेवण देवळासमान आहे. लोक रस्त्यावरून जाताना वगैरे हळूच छातीपाशी हात लावून नमस्कार करत पुढे जातात इत्यादी. मुसलमानांच्या बाबतीतपण आत्ता जे काही "विदेशी हाताच्या" प्रभावामुळे चालले आहे ते सोडल्यास बर्‍याच गोष्टि या सरळसोट राहू शकतात. बाकी कायद्यासमोर सर्व समान हे जर प्रामाणीकपणे आहे त्या कायद्यांसाठी पण पाळले तरी बरेच प्रश्न सुटतील.

एक स्वतःची आठवणः अमेरिकेत आल्यावर प्रथमच भारतात दिडदोन वर्षाच्या कालावधीनंतर गेलो होतो. मोठ्या भावासारखा असलेल्या एका ख्रिश्चन मित्राकडे भेटायला गेलो होतो. त्याची पंच्याहत्तरीच्या वरची आई पण बसली होती. खाणे-पिणे, गप्पा वगैरे झाल्यावर जाताना त्यांना (आईला) नमस्कार केला. तो पर्यंत गप्पांवर आणि तक्रार न करता खाल्याबद्दल खूश झालेली त्याची आई तात्काळ म्हणाली की "विकास, बाहेर राहीलास तरी आपली संस्कृती जपलेली पाहून आनंद झाला." या वाक्यात सामान्यांच्या डोक्यात असलेली समानता सहज दिसून येते.

बाकी विचारच केला तर पहा, अनेकजण स्वार्‍या करून गेले. जे कोणी उरले ते बहुतांशी आपले झाले. थोडासा अपवाद इस्लामचा असेलही पण त्याला आपले टोकाचे राजकारणी आणि बाहेरचा नकारात्मक प्रभाव ही कारणे आहेत असे वाटते. नाहीतर बघाना, आज कोण शक आहेत, हुण आहेत, ग्रीक आहेत ते सांगता तरी येते का?

बाकी आज या सर्वावर पाणि फिरवणारा सुडोसेक्युलॅरीझम, सुडोइंटलेक्च्युअल्स आणि अर्थातच मुक्तार्थव्यवस्थेमुळे इतक्या वर्षाच्या भुकेचे हवस असल्यासारखे होत असलेले अधुनिकीकरणापेक्षा पाश्चात्यकरण मात्र काळजी करण्यासारखा आहे कारण त्याने मात्र समाजस्वास्थ्य बिघडत आहे आणि विषमता वाढत आहे. अशी विषमताच मग सामाजीक प्रश्न तयार करते. त्यांचे मूळ मग आर्थीक जरी असले तरी धर्म, संस्कृती इत्यादीमधेते पटकन दृश्य स्वरूपात येतात. मग त्या कधी जातीय दंगली असतील, अतिरेकी हल्ले असतील तर कधी सिद्धीविनायकाच्या बाहेर लागलेल्या श्रद्धेपेक्षा उद्याचा दिवस जगण्याच्या भितीतून पलायनवादी मार्ग काढणार्‍या रांगा असतील.

अभ्यासपूर्ण प्रतिसाद

श्री विकास,

आपले लेखन नेहमीच संतुलीत असते. हा तर एक परिपूर्ण म्हणावा असा अभ्यासपूर्ण प्रतिसाद आहे.

आपला,
(प्रभावित) भास्कर
आम्ही येथे वसतो.

अनेकता मे एकता

"अनेकतेमधे एकता" हे चावून चावून चोथा झालेले वाक्य असले तरी त्यात तथ्य आहे. भारतीय म्हणा हिंदू म्हणा पण या संस्कृतीच्याच चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रभावात आपल्या येथे सव्र धर्म कमी अधीक प्रभावाने नांदतात.

समानता,समता,समरुपता,एकता,एकरुपता,विषमता,विविधता,बहुरुपता, या शब्दांचा शब्दोच्छल करुन आपण आपले विचार मांडत असतो.भांडत असतो. प्रत्येक जण माझे विचार कसे समतोल आहेत,हे अभिनिवेशाने [तसा अभिनिवेश नसल्यचा आव आणून]सांगतो.जेव्हा आपले विचार दुस-यांना पटत नाहीत त्यावेळी तो समोरच्या माणसाच्या 'आकलनाच्या मर्यादा' बुद्धीचा तोकडेपणा' 'बौद्धिक दिवाळखोरी' इ. विशेषणे लावून, समजून घेण्यासाठी सुद्धा बौद्धिक पात्रता लागते असे म्हणून आपला अहंकार कुरवाळत बसतो. ते स्वाभाविक देखिल आहे. जेव्हा एखादी गोष्ट दुस-यासमान नसते त्यावेळी ती त्यासम नाही म्हणजेच विषम आहे हे वास्तव आहे. पण विषमतेला अन्याय, शोषण अशा अर्थाच्या छटा चिकटल्या असल्याने पुरोगामी लोकांना तो शब्द खटकतो.त्याच स्पष्टीकरण देणं अवघड जातं. मग अशी विषमता पचवायला अवघड गेली कि त्याला विविधता म्हणून मोकळ व्हायचं." विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे" असे आपण प्रतिद्न्येत म्हणतो ते यासाठीच.(हॉ हॉ....)
आणी 'काळ-पांढरं' 'पाप-पुण्य' 'राम-रावण' 'चांगलं-वाइट' अशा रस्सी खेच करणा-या दोनच बाजूने न बघता विविधरंगी दृष्टीने पाहिले तर? आपण म्हणता त्यात नक्कीच तथ्य आहे.सौंदर्य आहे.

प्रकाश घाटपांडे

भारतातील विषवल्ली

जातिभेद, धर्मभेद वगैरे विषवल्ली पोसण्याचे काम आपल्याकडे धर्मगुरू आणि राजकीय पक्ष करतात. धार्मिक शिक्षण देणारे मदरसे, चर्च,आणि मशिदी यातून सतत सांप्रदायिक प्रचार होत असतो. पाद्री गरीब वस्तीमध्ये घरोघरी हिंडून हिंदुधर्म कसा वाईट आहे हे सांगत असतात.
मुस्लिम लीग, रिपब्‍लिकन पक्ष, संभाजी ब्रिगेड, बहुजनसमाज पक्ष आणि आर्‌एस्‌एसच्या काही उपसंघटना ह्या जाति-धर्मभेदावर बनल्या आहेत. रिपब्‍लिकन पक्षात ९९ टक्के पूर्वाश्रमीचे महार आणि सध्याचे, झाले किंवा न झालेले, पण स्वत:ला तसे समजणारे नवबौद्ध आहेत. संभाजी ब्रिगेड फक्त मराठा जातीची. बहुजनसमाज पक्षात ब्राम्हण, सोनार, सीकेपी-सारस्वत सोडून उरलेले. मुस्लिम लीगमध्ये एकतरी हिंदु-ख्रिश्चन असेल का? अशा लोकांमुळे आपला समाज एकरूप होणे शक्य नाही.
समाज एकरूप करायचा असेल तर:
फक्त मुसलमानांसाठी असलेले मदरसे आणि उर्दू शाळा बंद करा.
कॉन्व्हेन्ट शाळात इतर मुलांच्या फीमधून ख्रिश्चन मुलांचे होणारे फुकट शिक्षण बंद करा. त्यांच्या शाळेत बिगरख्रिश्चन मुख्याध्यापक नेमा.
उर्दू, पर्शियन, अरबी शिकण्यासाठी सध्याच्या बिगरमुसलमान मुलांच्या शाळेत सोय करा.
आंबेडकर, पैगंबर, येशू ख्रिस्त यांच्यावरचे सर्व धडे पुस्तकातून काढून टाका.
संतांचा परिचय करून देताना त्यांची जात सांगू नका. त्यांना उच्चवर्णियांनी कसा त्रास दिला ह्याचा अजिबात उल्लेख नको.
शाळेतला मुलगा/मुलगी नववीत दाखल झाल्यावर रजिस्टरमध्ये पक्की नोंद करण्यासाठी त्यांची जात विचारली जाते. मुंबईत पन्नास टक्के मराठी मुलांना त्यांची जात माहीत नसते. आईला विचारून उद्या सांग असे म्हणावे लागते. काही मुले जात सांगायला कानाशी येऊन हळूच कुजबुजतात. हे काय सरकारी शिक्षणाधिकार्‍यांना माहीत नसेल? नारायणन राष्ट्र्पती झाल्यावर सर्व वर्तमानपत्रात एक हरिजन राष्ट्रपती झाला असे आवर्जून लिहिले होते. जातिभेदाची मुळे खतपाणी देऊन घट्ट रुजवायला आपली सरकारे जबाबदार आहेत. ---वाचक्‍नवी

नरेंद्र जाधव


नारायणन राष्ट्र्पती झाल्यावर सर्व वर्तमानपत्रात एक हरिजन राष्ट्रपती झाला असे आवर्जून लिहिले होते.


या पार्श्वभूमीवर नरेंद्र जाधव यांचे कुलगुरु पदावर विराजमान झाल्यावर मिडियाने " दलित कुलगुरु' असा उल्लेख केला तेव्हा यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले मला " फलित कुलगुरु" अस म्हणवून घ्यायला आवडेल.
प्रकाश घाटपांडे

"एकरूप समाज"

वाचक्‍नवी यांच्या प्रतिसादातील काही मुद्दे पटले. काही मुद्द्यांबद्दल प्रश्न पडले.

१. "एकरूप समाज बनवणे" म्हणजे नक्की काय ? जातिभेद, धर्मभेद, वंशभेद, भाषिक वाद ही सामाजिक, ऐतिहासिक वास्तवे आहेत. त्यांचे स्वरूप आणि संदर्भ समजून घेण्याच्या प्रक्रियेतून आपण त्यांच्यातून उद्भवणारे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू शकतो. परंतु त्या सर्वांचा एकजिनसी पदार्थ बनवणे हा उपाय काही योग्य वाटत नाही.

२. >> आंबेडकर, पैगंबर, येशू ख्रिस्त यांच्यावरचे सर्व धडे पुस्तकातून काढून टाका.
का बरे ? मला असे वाटते की, यांच्याबरोबर सावरकर, बुद्ध , नानक (आणि इतर अनेक ) यांच्याबद्दलचीसुद्धा माहिती हवी. माहितीचा हात आखडता नको, तर एक समतोल चित्र हवे.

३. >> संतांचा परिचय करून देताना त्यांची जात सांगू नका. त्यांना उच्चवर्णियांनी कसा त्रास दिला ह्याचा अजिबात उल्लेख नको.

असे का ? शतकानुशतके शोषण झाले हे खरे ना ? एक मोठी, शोषणावर आधारलेली व्यवस्था अस्तित्वात होती ना ? मग त्याचा उल्लेखसुद्धा नको ?

एकरूप समाज

१. "एकरूप समाज बनवणे" म्हणजे नक्की काय ?
दैनंदिन व्यवहारात केवळ जात, धर्म वंश इत्यादींवरून व्यक्तीचे मूल्यमापन करू नये. वेगळ्या जातिधर्माच्या माणसाला कमी लेखू नका. सार्वजनिक ठिकाणी बोलताना योग्य ती पथ्ये पाळा. माणसाचे अनेक गुणदोष जातिनिहाय असले तरी तसे ते गृहीत धरू नका. ते व्यक्तिसापेक्ष भिन्न असू शकतात. असे केले की समाज एकरूप भासेल.
. >> आंबेडकर, पैगंबर, येशू ख्रिस्त यांच्यावरचे सर्व धडे पुस्तकातून काढून टाका.
का बरे ?
कारण या धड्यांतून आपली जात, आपला धर्म वेगळा आहे याची मुलांना समज येते. शालेय स्तरावर जातीचा उल्लेख कुठल्याही पाठात असता कामा नये. मुले मोठी झाली की अधिक वाचनान्ती त्यांना इतिहासाचे ज्ञान होईल, आणि सध्याची माणसे 'तशी 'नाहीत याची जाणीव होईल.
३. >> संतांचा परिचय करून देताना त्यांची जात सांगू नका. त्यांना उच्चवर्णियांनी कसा त्रास दिला ह्याचा अजिबात उल्लेख नको.
असे करणे म्हणजे जातिजातींमध्ये द्वेष फैलावणे आहे. उच्चवर्णियाची जात न सांगता संतांचा परिचय करून देता येतो. तुकाराम डॉट कॉम नावाच्या संकेतस्थळावर पहिल्या वाक्यातच जातीचा उल्लेख आहे. ते संकेतस्थळ मी पहिल्या ओळीच्या पुढे वाचले नाही.--वाचक्‍नवी

 
^ वर