लोकरीचे 'गरम' कपडे

"थंडीत आपण लोकरी कपडे का वापरतो? "
"कारण लोकरीचे कपडे गरम असतात."
"लोकरीचे कपडे खरोखरच गरम असतात का ? हा तापमापी (थर्मामीटर ) या खोलीचे तापमान समजा २८ अंश सेंटिग्रेड दाखवतो. आता एक लोकरीस्वेटर घेतला. त्यात हा तापमापी गुंडाळून काही वेळ ठेवला. तर तापमापी वाढीव तापमान दाखवील काय?"
" लोकरी स्वेटर गरम असल्याने तापमापीच्या वाचनात (रीडिंग) वाढ होईल असे मला वाटते."
"मुळीच वाढ होणार नाही. जे खोलीचे तापमान तेच स्वेटरचे. तापमापी तेच दाखवील.आता गरम सोडा, लोकरी कपडे थंड असतात का ते पाहू."
"थंड कसे असतील?"
"समजा आपण प्रयोग करू. या प्लॅस्टिकच्या दोन रिकाम्या पिशव्या आहेत. (दुधाच्या पिशव्यां सारख्या). आता फ्रिज मधून सहा हिमघन (आईस क्युब्ज) घेऊ. प्रत्येक पिशवीत तीन तीन भरून पिशव्या मेणबत्तीने बंद करू."
"बरं पुढे?"
"एक पिशवी या टेबलावरील बशीत ठेवू. दुसरी लोकरी स्वेटर मधे गुंडाळून ठेवू. बशीतील बर्फखडे वितळायला आले की स्वेटर मधील पिशवी पाहू. काय आढळेल? "
"काय?"
"त्या पिशवीतील बर्फ अजून वितळले नाही असेच दिसेल.खरे तर 'गरम' स्वेटर मधील बर्फ लौकर वितळले पाहिजे. तसे होत नाही. म्हणजे स्वेटरमधे उष्णता नसून थंडी आहे असाच निष्कर्ष निघतो."
"म्हणजे थंडीत लोकरी कपडे घालू नये की काय?"
" अवश्य घालावे."
"का?"
" ते तुम्हीच सांगा."
..................................................................................................................
मूलस्रोत : फिजिक्स फॉर एंटरटेनमेंट ..ले. या. पेरेलमान

लेखनविषय: दुवे:

Comments

लोकर

तज्ज्ञमंडळी योग्य शास्त्रीय परिभाषेत प्रश्नाचे उत्तर देतीलच. (मी ती विसरले आहे.) परंतु 'लेमॅन'च्या भाषेत सांगायचे झाले तर लोकर उष्णता/ थंडी निर्माण करत नाही तर उष्णतेला/ थंडीला (तापमानाला) केवळ पकडून ठेवते किंवा ती वाहून जाण्याला विरोध करते. (insulation)

लोकरीच्या गुंतलेल्या केसांत हवेचे अनेक कप्पे तयार होतात आणि अडकून राहतात. त्यामुळे लोकरीच्या आतील वस्तूचे तापमान (की आर्द्रता?) शोषून तेच कायम राखण्याचे काम केले जाते. त्यामुळे खोलीचे तापमान २८ डी असेल तर लोकरीच्या कपड्या आत २८च दाखवेल पण त्या कपड्याआत शरीर असेल तर ते बहुधा ३६ अंश से. दाखवेल. - चू. भू. दे. घे.

मध्य आशियातील भटक्या जमाती आपल्या तंबूंना लोकरीचे इन्स्युलेशन देतात. यामुळे उन्हाळ्यात घरात थंडावा जाणवतो तर हिवाळ्यात उब असे वाचले होते. द. अमेरिकेत आढळणारा 'यामा' (किंवा लामा) या प्राण्याची लोकर मेंढीच्या लोकरीपेक्षा अधिक मऊ असते असे आपले मला वाटते. या यामाचे एक चित्र इथे लावते. लांब मानेच्या किंवा चिमुकल्या केसाळ उंटाप्रमाणे दिसणार्‍या या प्राण्याला कुरवाळण्याची अनुभूती लाजवाब असते असा अनुभव आहे.

DSC00516

थर्मास फ्लास्क

प्रियालींनी तंबूला लोकरीचे अस्तर लावण्याची दिलेली माहिती वाचून नवल वाटले. धन्यवाद.

या बाबतीत लहानपणी वाटलेले नवल मला आठवतो. आमच्या घरी थर्मास फ्लास्कचा उपयोग प्रवासात चहा कॉफी गरम ठेवण्यासाठी होई. त्यामुळे "थर्मास गरम पेयांसाठी असतो" अशी माझ्या बालमनात कल्पना झाली. पुढे एकदा कोणी बर्फाचे पाणी थर्मासमधून आणले त्याचे नवल वाटले.

पेरेलमानचे 'स्वेटरमध्ये गुंडाळलेले बर्फाचे तुकडे' (आणि प्रियालींचा थंडगार लोकरी तंबू) यांवरून आणखी एक गमतीदार प्रश्न विचारता येईल - स्वेटर जर थंड वस्तू थंड राखतो, तर उन्हाळ्यातल्या गरम दिवशी स्वेटर घालावा का? (उत्तर : नाही) पण का? उत्तर हे यनावालांच्या वरील चर्चाप्रश्नाचेच.

अमेरिकेतही

लाकडी घरांना थर्मल इन्स्युलेशन दिले जातेच की. तेही खर्‍या लोकरीचे नसले तरी लोकरसदृशच असते. ;-)

प्रियालींनी तंबूला लोकरीचे अस्तर लावण्याची दिलेली माहिती वाचून नवल वाटले.

तशी ही मूळ मंगोलियन पद्धत. तिथे 'गेर' या तंबूंना हे अस्तर लावले जाते.

हम्म

लहानपणी भौतिकशास्त्राच्या तासाला हमखास विचारण्यात येणारा प्रश्न:
एका माणसाने अंगावर फक्त लोकरी घोंगडी घेतली आहे तर दुसर्‍याने दोन सुती चादरी घेतल्या आहेत तर कोणाला जास्त थंडी वाजेल?

सांगा पाहू.

हेच अपेक्षित उत्तर

पण ते अशा शब्दात द्यावे की यनावालांच्या आणि माझ्या प्रश्नाचे एकाच वेळी उत्तर असावे, अशी अपेक्षा.

विनोद

विषयांतर नाही.

एकदा एका सरदाराला त्याच्या मित्राने थर्मास फ्लास्क भेट दिला.
तर सरदार एका दुसर्‍या मित्रासाठी चहा व तिसर्‍या मित्रासाठी लस्सी त्या थर्मासमध्ये घालून घेऊन गेला.
तर त्या मित्राने विचारले अरे तू असे का केलेस?
तर सरदार म्हणाला, ओय तुणेही बताया था की इसमे गर्म चीज गर्म और ठंडी चीज ठंडी रहती है.

उष्णतेचा मंदवाहक

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
प्रियाली यांनी दिलेली कारणमीमांसा अगदी बरोबर आहे. लोकरीचे कपडे उष्णता निर्माण करू शकत नाहीत. शरीर ती निर्माण करते. लोकर हा पदार्थ उष्णतेचा मंदवाहक असल्याने लोकरी कपडे घातल्यास अंगातील उष्णता चटकन बाहेर जात नाही. टिकून राहाते. त्यामुळे ऊबदार वाटते.
प्रियाली लिहितात,"......कपड्याआत शरीर असेल तर ते बहुधा ३६ अंश से. दाखवेल. - चू. भू. दे. घे." ठीक आहे. पण माझ्यामते यापेक्षा थोडे कमी दाखवील. कारण कारण माणसाच्या शरीराचे सामान्य (नॉर्मल) तापमान ९७.५ अंश फॅ. म्हणजे ३६.४ अंश से. असते. { इथे एक उपप्रश्न : असे कोणते तापमान असू शकेल का की जे फॅ. आणि सें. मधे सारखेच असते? म्हणजे क्ष अंश फॅ.= क्ष अंश सें.}
श्री. धनंजय आणि श्री. टग्या यांनी केलेले विवेचन भौतिकीला (फिजिक्स) धरूनच आहे.

-४० डी

ज्यांनी थोड्याफार संगणकीय भाषा शिकल्या आहेत त्यांना तापमान बदलण्याचे हे सूत्र माहित असतेच.

डी.से = (डी.फॅ.-३२) *५/९ आणि डी.फॅ= डी.से*९/५ +३२

असे कोणते तापमान असू शकेल का की जे फॅ. आणि सें. मधे सारखेच असते? म्हणजे क्ष अंश फॅ.= क्ष अंश सें

डी.से. = डी.फॅ करण्यासाठी वरील सूत्रे वापरता येतील.

डी.से.= डी.से*९/५+३२
डी.से- (डी.से*९/५)=३२
-४डी.से./५ = ३२
डी.से.=-३२*५/४
डी.से.=-४०

हे उलटे केल्यास, म्हणजे डी.फॅ=(डी.फॅ.-३२)*५/९ ही उत्तर -४० येते.

-40 अंश

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
प्रियाली यांचे उत्तर [-40 अंश] हे बरोबर आहेच. दोन मिन्न परिमाणात एकाच तापमानाची सारखीच किंमत यावी हे आपाततः (प्रथमदर्शनी) विस्मयकारक वाटते, म्हणून हा उपप्रश्न दिला होता.

किती लांबण?

9x + 32 = x.... Hence x = -40.--वाचक्‍नवी
5

लांबण अशासाठी की

यनांचा प्रश्न एखाद्या ८-१० वर्षांच्या पोरालाही पडू शकतो आणि त्याला सर्व पायर्‍यांनिशी सोडवून दिलेले गणित अधिक सोपे वाटेल.

सोपे?

कदाचित अवघड आणि कंटाळवाणे. कुणास ठाऊक कसे वाटेल ते? यनावालांना विचारले पाहिजे. --वाचक्‍नवी

विस्मयकारक ते काय?

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
" एक लांबी फूटपट्टीने मोजली तर क्ष फूट भरते. तीच मिटरपट्टीने मोजली तरी क्ष मीटरच भरते. " हे चटकन खरे वाटत नाही. क्ष ची एक किंमत अशी आहे की क्ष फूट्= क्ष मीटर हे नंतर ध्यानात येते. इथे तर -४० अंश ही शून्येतर किंमत आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी विस्मय वाटला. (कारण मंदगती विचार). नंतर लक्षात आले.
.. तापमानाची अशी कोणतीही किंमत (व्हॅल्यू) नसावी जी केल्व्हिन आणि सेल्शियस या दोन परिमाणांत सारखीच असेल.
तद्वतच केल्व्हिन आणि फॅ. ही जोडी.

 
^ वर