प्रमोदजी नवलकर

आत्ताच प्रमोदजी नवलकर गेल्याची बातमी वाचली. सर्वप्रथम आठवले ते त्यांचे मागच्या अधिवेशनातले दोन तसाचे तडाखेबंद भाषण. "मरायच्या अगोदर मला माझ्या मराठीवर बोलू द्या हो," अशी साद घालून सर्व सदस्यांना आपल्या भावनीक पण अर्थपूर्ण व अभ्यासपूर्ण भाषणाने प्रभावीत करुन मंथन करायला लावणारे प्रमोदजी आज अचानक आपल्यातून निघून गेले.

माझ्यातर्फे या तळमळीच्या मराठी नेत्यास भावपूर्ण श्रद्धांजली!

नवलकर हे बाळासाहेबांच्या अगदी सुरुवातीपासूनच्या शिलेदारांपैकी एक. शिवसेनेला मोठे करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता हे तर आपण जाणतोच. प्रमोदजींच्या भाषणांप्रमाणेच त्यांचे लेख व पुस्तके सुद्धा हृदयस्पर्षी असत. आपण आपल्या आठवणीतील संचितांना बाहेर काढून त्यांना श्रद्धांजली अर्पित करु या.

लेखनविषय: दुवे:

Comments

अरेरे

वाईट वाटलं.. फाल्तू प्रसिद्धिच्या मागे न लागता एक मनापासून लिहिणारा स्तंभलेखक गमावला म्हणून आणि वाईट वाटलं

ओळख

प्रमोद नवलकरांचे नाव भटक्याच्या भ्रमंती आणि मध्यमवर्गीय विचारसरणीस धक्का देणार्‍या विषयांवर लेखनामुळे जास्त माहीत होते. त्यातील काही म्हणजे वेश्याव्यवसाय, अंडरवर्ल्ड आणि हिजडे. त्यांचे लेखन (थोडे वाचले आहे) जरी प्रस्थापीत स्थानीक "कल्चर" पेक्षा वेगळे असले तरी भडक/उत्शृंखल अथवा "चीप" वाटले नाही, तर सर्ववर्गात उपेक्षीत असलेल्यांच्या जीवनाबद्दल माहीती देणारे वाटले. सर्वपक्षिय मित्र असणारा हा राजकारणी (स्वपक्षिय विचारांमधे चपखल बसणार्‍या) बिनधास्त वृत्तीचा होता.

त्यांची म.टा. मधील माहीती खाली देत आहे.

विकास

पुढारी, भटक्या आणि कल्चरल पोलिस

रुढार्थाने राजकीय पुढारी असले तरी प्रमोद नवलकरांची ओळख महाराष्ट्राला होती ती सांस्कृतिक व्यक्तिमत्त्व म्हणून. रेकॉर्डब्रेक स्तंभलेखक , खुशखुशीत वक्ता, बातमी राहणारा सामाजिक कार्यकर्ता, मराठीतल्या स्टिंग ऑपरेशनचा जनक आणि मुंबईचा ज्ञानकोष अशी त्यांची चतुरस्त्र ओळख होती.

नवलकर जन्माने मुंबईकर. अधिक तपशिलात गिरगावकर. जन्म २३ जानेवारी १९३५चा. त्यांचा कॉलेजचा काळ हा संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामुळे भारलेला. थोडीफार सामाजिक जाणीव असणारा कुणीही गिरगावकर त्यापासून दूर राहणं शक्यच नव्हतं. नवलकर तर नाहीच नाही. गिरगाव युवक सभा नावाची संस्थाही सुरु केली होती. सुरुवातीच्या काळात ते समाजवादी विचारांनी प्रभावित झाले होते. प्रजासमाजवादी पक्षात ते कार्यरतही होते.

शिवसेनेच्या उदयानंतर ते अनेक मुंबईकर मराठी माणसांप्रमाणे बाळासाहेब ठाकरेंकडे ओढले गेले. तोपर्यंत ते शैलीदार लेखक आणि धडपडणारे कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध होतेच. सेनेच्या स्थापनेनंतरची मुंबई महापालिकेची पहिली निवडणूक त्यांनी लढवली. ६८ साली ते नगरसेवक झाले. दोन वर्षांत मानाच्या बेस्ट समितीचे अध्यक्ष बनले. लगेचच ७२ साली जनसंघाच्या जयवंतीबेन मेहतांना हरवून ते आमदार झाले. विधानसभेवर निवडून जाण्याची ती पहिलीच आणि एकमेव वेळ. तेव्हापासून मनोहर जोशी , सुधीर जोशी आणि नवलकरांचं त्रिकुट जमलं.

१९८० ते ८६ , १९८८ ते २००६ असे सतत पदवीधर मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून आले. एक उत्कृष्ठ संसदपटू म्हणून ते गाजले. त्यांनी विविध गौप्यस्फोट करत महाराष्ट्राचं राजकारण गाजवलं. सर्व पक्षात त्यांच्याविषयी कायम आदर व्यक्त होत असे. शिवसेना युतीची सत्ता येताच सास्कृतिक मंत्री म्हणून इतर कुणाचा विचारदेखील होणे शक्य नव्हते. उच्छृंखलतेवर बंदी घालण्याच्या प्रयत्नांमुळे कल्चरल पोलिस म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. ते २००६ साली वृद्धत्वामुळे स्वतःहून आमदारकीपासून दूर झाले.

एक राजकीय नेता म्हणूनही गिरगाव चौपाटीचं केलेलं सुशोभिकरण आणि त्याहीपेक्षा नाना नानी पार्कचा निर्माता अशी मुलखावेगळी कामं त्यांनी केली. लेखक म्हणून त्यांची अनेक पुस्तक आलीत. पण त्यापैकी अनेक त्यांच्या सदरांच्या लेखांचे संग्रह आहेत. नवशक्तीत तब्बल ३९ वर्ष त्यांनी भटक्याची भ्रमंती हे सदर चालवलं. तो रेकॉर्ड लिम्का बूकमधे नोंदवलाही गेलाय. पण सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना धक्का देत अंडरवर्ल्ड , वेश्याव्यवसाय असे विषय त्यांनी पहिल्यांदाच मराठीत आणले. महाराष्ट्र टाइम्समधेही त्यांचे झपाटलेली लेखणी हे सदर गाजले .

नेमका

नलवलकरांच्या किर्तीवर प्रकाश टाकणारा म. टा. मधला हा छोटा पण नेमका हा लेख यथायोग्यच आहे. लेख येथे दिल्यबद्दल आभार!

प्रमोद नवलकर

प्रमोद नवलकर आम्हाला कधीच प्रमोदजी वाटले नाहीत. हे प्रत्येकाच्या नावामागे मा. आणि पुढे जी लावायची पद्धत महाराष्ट्रात नाही हे किती बरे आहे. असे करणे म्हणजे हांजीहांजी केल्यासारखे वाटते. --वाचक्‍नवी

मागे मा. आणि पुढे जी

बरोब्बर म्हणालात. मला सुद्धा "प्रमोदजी" लिहिताना जरा अवघडल्यासारखे वाटत होते पण येवढ्या मोठ्या व जेष्ठ नेत्याला श्रद्धांजली वाहताना एकेरीत केवळ प्रमोद नवलकर म्हणावे का हा प्रश्न पडला अन मग जी लावले गेले.

आपल्या सारख्यांच्या या भावनांतूनच जनमानसातले प्रमोद नवलकरांबद्दलचे प्रेम लक्षात येते.

आपला,
(सहमत) भास्कर
आम्ही येथे वसतो.

हेच

हेच म्हणणार होतो.


आम्हाला येथे भेट द्या.

मटाचे दुवे

म.टा. ने बरेच् लेख इथे एकत्र दिले आहेत.

भटक्याची भ्रमंती

खूप लहानपणी (चोरून) घरात आलेले हे मासिक वाचले होते. त्यात हिजड्यांविषयी लिहिलेले वाचून आश्चर्य/ भीती अशा अनेक भावनांचा डोक्यात कल्लोळ झालेला आठवतो पण त्याच बरोबर कालांतराने नवलकरांच्या आगळ्यावेगळ्या लेखनाचे फॅन झाल्याचेही आठवते.

योगायोग

बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद नवलकरांचा वाढदिवस एकाच दिवशी म्हणजे २३ जानेवारीचा आहे. आज प्रबोधनकार ठाकर्‍यांची पुण्यतिथी होती आणि त्याच दिवशी नवलकर गेले..

भटकंती !

शिकत असतांना भटकंती वाचण्याचे वेड लागले होते, त्यांच्यामुळे सामान्यांच्या नंतरही आणखी एक जग जगत असते, त्याची ओळख भटकंतीमधून पहिल्यांदाच झाली ,भटकंती वाचायला फार आवडायचे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मरायच्या अगोदर मला माझ्या मराठीवर बोलू द्या हो

हे दिवाकर रावतेंचे वाक्य आहे. प्रमोद नवलकरांचे नाही असे वाटते.


आम्हाला येथे भेट द्या.

हेच् म्हणतो

सहमत्.

नवलकरांना श्रद्धांजली.

अभिजित...

मध्यरात्रीची मुंबई

"मध्यरात्रीची मुंबई" हे प्रमोद नवलकरांचेच ना? नंतर पण त्याच नावाने सदर की काही तरी अन्य कोणाचे वाचल्याचे आठवते? कुणाला माहित आहे का?
प्रकाश घाटपांडे

आदरांजली..

नवलकरसाहेबांना माझ्यातर्फेही विनम्र आदरांजली...

तात्या.

--
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

श्रद्धांजली

प्रमोद नवलकरांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

शैलेश

नवलकर साहित्य

नवलकर आपल्यात नाहीत. एक मराठीचा शिलेदार आपण गमावला आहे.
आपल्या लेखणीने यांनी आपल्याला वेगळ्या जगाची ओळख करून दिली.

नवलकरांच्या प्रकाशित साहित्याची यादी कुणी जाणकार, प्रकाशकांसहीत, येथे देवू शकेल का?
त्यांचे आजवरचे स्तंभ-लेखन समग्रपणे जालावर मराठीत कोठे उपलब्ध आहे का?

आपला
गुंडोपंत

खरी श्रद्धांजली.

विचारांचा मागोवा ही खरी श्रद्धांजली आहे.

शेवटी गीतेत सागिंतल्या प्रमाणे आपण जसे जीर्ण वस्त्र बदल असतो तसेच आत्मा हा शरीर बदलत असतो.

त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उत्तम पत्रकार असा पुरस्कार दिला तर त्यांचे यथोचित स्मरण केल्या सारखे होईल.

शेवटचा लेख

नवलकरांचा शेवटचा लेख (जो लिहील्यानंतर काही वेळात त्यांचे निधन झाले) तो येथे वाचता येईल: http://www.saamana.com/2007/Nov/25/Link/Utsav_2.htm

सामन्याचे फाँट वेगळे असल्यने संपूर्ण लेख चिकटवता आला नाही पण त्यातील त्यांचे (आणि लेखाचे) शेवटचे वाक्य खालील प्रमाणे:

"...म्हणून हात जोडून ही अखेरची विनंती, की 'मुंबई वाचवा'!"

 
^ वर