डॉ. चंद्रशेखर खरे यांना फर्मा पुरस्कार जाहीर

प्रसिद्ध फ्रेन्च गणिती फर्माच्या नावाने नंबर थिअरी, कॅल्क्युलस आणि प्रोबॅबिलिटी या क्षेत्रांतील गणितातील उल्लेखनीय संशोधनासाठी वय वर्षे ४५ च्या आतील तरुण संशोधकांना दिला जाणारा पुसरस्कार डॉ. चंद्रशेखर खरे या मराठी प्राध्यापकास जाहीर झाल्याची बातमी वाचनात आली. मुंबईतून शालेय तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून मग उच्च शिक्षणासाठी इंलंडच्या वाटेवर असलेल्या डॉ. खर्‍यांनी ऑक्सफर्ड विद्यापिठातून डॉक्टरेट मिळवली. त्यानंतर टाटा मूलभूत संशोधन केंद्रात काही वर्षे काम केल्यानंतर अमेरिकेत प्राध्यापकी चालू केली.
पुरस्काराबद्दल डॉ. खरे यांचे आणि ही बातमी छापून आणल्याबद्दल दै. लोकसत्ताचे हार्दिक अभिनंदन.
सविस्तर वृत्त येथे वाचता येईल.
या वृत्ताच्या अनुषंगाने पडलेले काही प्रश्न पुढीलप्रमाणे. प्रस्तुत चर्चेच्या माध्यमातून त्यांवर उपयुक्त चर्चा होईल, अशी आशा आहे.
१. तंत्रज्ञान, संगणक, अभियांत्रिकी, वैद्यकीय इ. प्रकारच्या व्यवसायाभिमुख शिक्षणाबरोबरच कला, वाणिज्य, मूलभूत विज्ञान इ. क्षेत्रांतील उच्च शिक्षणाबाबत असलेल्या उदासीनतेचे कारण काय असावे?
२. डॉ. खर्‍यांसारख्या, डॉ. जयंत नारळीकर, डॉ. मीना गोखले, डॉ. अमर्त्य सेन यांसारख्यांची उदाहरणे डोळ्यांसमोर असतानाही कला, वाणिज्य किंव अमूलभूत विज्ञान अशा अपारंपारीक (खरे तर अप्रसिद्ध!) शिक्षणक्षेत्रांमध्ये उच्च शिक्षण तसेच संशोधनात मिळणारी प्रेरणा कमी पडते आहे का? असल्यास ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण काय करू शकतो? आणि प्रेरणेची कमी नसेल, तर मग उदासीनतेचे कारण काय?
३. अशा शिक्षणशाखांमध्ये उच्च शिक्षण अगर संशोधनानंतर उपलब्ध असलेल्या संधींची कमतरता (पगार, बढतीबदलीच्या संधी, प्रतिष्ठादी मुद्दे) भारतात अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया अशा इतर देशांच्या तुलनेने कमी असण्याचे कारण काय?
या प्रश्नांची उत्तरे शोधण्याबरोबरच वाचकांच्या मनात इतरही काही प्रश्न असतील, तर ते येथे मांडून साधकबाधक चर्चा घडावी, अशी अपेक्षा आहे.
धन्यवाद.

Comments

दुरुस्ती

तिसरा प्रश्न कृपया ...संधींची कमतरता (पगार, बढतीबदलीच्या संधी, प्रतिष्ठादी मुद्दे) भारतात अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया अशा इतर देशांच्या तुलनेने जास्त असण्याचे कारण काय? असा वाचावा. चुकीने कमी असे टंकित झाल्याबद्दल दिलगीर आहे.

माहिती

कोणाचेच कसे उत्तर आले नाही अजून?

माहितीबद्दल आभार. डॉ. खरे यांचे अभिनंदन करण्यासारखे आहे. पण नक्की संशोधन कशावर होते त्यासाठी
ही बातमी वाचा.

बाकी शिक्षणासंबंधी उदासिनता, कमी संधी यांची कारणे अनेक असावीत. पुढे शिकण्याचा/संशोधनाचा/ उपयोग काय अशा विचारापापासून ते पैसे नसणे, किंवा नंतरच्या संधीबाबत खात्री नसणे. त्यापेक्षा हातात आहे ती नोकरी नीट करू असा विचार असावा. शिवाय ह्या संधी इतर देशात बर्‍याच वरच्या पगाराने उपलब्ध असताना भारतात त्यासाठी थांबणारे कमी.

आकडेवारी

डॉ. खरे यांचे पुरस्काराबद्दल अभिनंदन.
भारतात मूलभूत संशोधनाची आवड कमी आहे याबद्दल आकडेवारी मिळवणे मनोरंजक ठरावे. बरेचदा, भारतात शिक्षण घेउन शास्त्रज्ञ भारताबाहेर स्थायिक होतात आणि चांगली कामगिरी करतात. भारतात काम करण्याबद्दलचे तोटे म्हणजे लाल फित, संशोधन क्षेत्रातील राजकारण आणि सहकार्‍यांची उदासीनता. याशिवाय जर तुम्ही एखाद्या 'स्टेट ऑफ द आर्ट' विषयात काम करत असाल, तर साधारणपणे भारतातील संशोधन त्या विषयात कमीत कमी ३ ते ५ वर्षे मागे असते. (याला अपवाद आहेत.)
ही परिस्थिती बदलण्यासाठी काय करावे हा अवघड प्रश्न आहे. मी पुणे विद्यापीठात पदार्थविज्ञानात पीएचडी करत असताना आम्ही विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींचे एक पॅनेल डिस्कशन आयोजित केले होते. यात वर दिलेल्यांसारखेच मुद्दे चर्चेला आले होते. अडचण ही आहे की डिस्कशन करताना सर्व लोक हे बदलायला हवे वगैरे बोलतात. पण डायसवरून खाली उतरल्यावर परिस्थिती जैसे थे.
आता भारताची आर्थिक परिस्थिती बदलते आहे. पण जोपर्यंत हे मूलभूत प्रश्न सोडवले जात नाहीत तोपर्यंत भारतीय संशोधन क्षेत्रातील परिस्थिती बदलेल असे वाटत नाही.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

संशोधन, आकडेवारी, अनास्था

भारत व संशोधन म्हटल्यावर हा लेख आठवला. (अर्थात इथे मुलभूत संशोधन विषय नसला तरी रोचक आकडेवारी सापडू शकेल.)
>भारतात मूलभूत संशोधनाची आवड कमी आहे याबद्दल आकडेवारी मिळवणे मनोरंजक ठरावे.
संशोधनावरच्या खर्चाबद्दलची एक आकडेवारी नुकतीच वाचनात आली.

स्रोतः हा लेख.

ओईसीडीचा सदस्य नसल्याने भारत या यादीत नाही.

धन्यवाद

त्याचे दोन्ही दुवे आंग्लभाषेत ज्याला स्पॉट ऑन म्हणतात असे आहेत. या यादीत भारत कुठे बसतो हे बघणे मनोरंजक ठरावे. (गेल्या एक-दोन वर्षात भारतीय सरकारने नॅनोटेक्नॉलॉजी इनिशिएटिव्ह या नावाखाली बराच निधी उपलब्ध केल्याचे ऐकले आहे.)
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

आणखी एक बातमी

गणिताच्या आणखी एका प्राध्यापकास आंतरराष्ट्रीय कीर्तीचा पुरस्कार मिळाल्याची बातमी नुकतीच वाचनत आली. आंतरजालावरील लोकसत्ताच्या रविवार २५ नोव्हेंबर २००७ च्या आवृत्तीच्या मुखपृष्ठावर तळाशी ही बातमी वाचता येईल. डॉ. खरेंपाठोपाठ आणखी एका संशोधकास असा पुरस्कार मिळाल्याने गणितात संशोधन करणार्‍या भारतीय संशोधकांचा विशेषतः महाराष्ट्रीय / मराठी भाषक संशोधकांचा उत्साह द्विगुणित होईल, असे वाटते.

 
^ वर