(२००००) वरुण
सन २८ नोव्हेंबर २०००, बरोब्बर सात वर्षांपुर्वी डॉ. रॉबर्ट मॅकमिलन एक परीक्षण पुर्ण करून उत्साहात होते. हाच तो शोध होता जो त्यांना खगोलाभ्यासकांत मान मिळवून देणार होता. गेले वर्षे ऍरिझोना विद्यापिठात चालणाऱ्या "स्पेसवॉच" या उपक्रमाचे ते प्रमुख होते. 'नेपच्युनबाह्य वस्तु' या विषयावर काम करणाऱ्या ह्या उपक्रमाच्या नावावर आजपर्यंत "६०५५८ सेशल्स", "५१४५ फोलस", "स्पेसवॉच धुमकेतु" इ. शोध होते. मात्र आज डॉक्टरसाहेबांना मिळालेली वस्तु एका नव्या "लघुग्रहसदृश गोला"चा जन्म होता.
डॉ. मॅकमिलन, यांना हा शोध मानवी पडताळणी करताना लागला. सद्ध्या वापरण्यात येणारी मानवरहित निरिक्षण प्रणाली, इतक्या अंतरावतील इतक्या कमी वेगात फिरणारी वस्तू ओळखू शकत नाही. (त्यासाठी एक दुसरी प्रणाली वर्षाकाठी वापरली जाते.) पण असा हा किचकट शोध डॉ. साहेबांनी मानवी निरिक्षणशक्तीच्या जोरावर लावला. सन २००१ मध्ये याला नेपच्यूनबाह्य लघुग्रहाचा दर्जा देण्यात आला. तेव्हा नेपच्यूनच्या पुढचा प्लुटो आणि शॅरोन (प्लुटोचा उपग्रह) नंतरचा वरूण हा सगळ्यात मोठा ज्ञात गोल होता.
याला लघुग्रह म्हनून मान्यता मिळाल्याने त्याला स्वतःच नाव असण्यास मान्यता मिळाली. वेगवेगळी नावं पुढे आली पण लघुग्रहांच्या नामकरण संस्थेने एम. साराभाई यांनी सुचवलेलं "वरूण" हे नाव निवडलं! "(२००००) वरुण"! आकाश, पर्जन्य, नदी आणि सागराची हिंदू देवता "वरुण" यावरून या गोलाचं नाव वरुण ठेवलं गेलं. तर अश्या या आद्य वरुणाची ही थोडिशी माहीती!
गेल्या दहा वर्षात, नेपच्यून ग्रहाच्या पुढे असणाऱ्या लहानमोठ्या वस्तुंबद्दल बरीच माहिती गोळा होत आहे. या दशकात अश्या सुर्याभोवती फिरणाऱ्या पण आकाराने ग्रहांच्या मानाने लहान पण लघुग्रहांच्या मानाने मोठ्या अश्या गोलांची संख्या वाढतेच आहे. अश्या 'नेपच्युनबाह्य वस्तु' खगोलाभ्यासकांत 'कुपर पट्यातील वस्तु' म्हणून ओळखल्या जातात. या पट्ट्याकडे शास्त्रज्ञांचं आणि खगोल अभ्यासकांचं लक्ष गेलं ते त्याच्या विशिष्ठ गुणधर्मामुळे. याच पट्ट्यातून 'अल्पजीवी धुमकेतुं चा जन्म होतो असा शास्त्रज्ञांचा कयास होता व आहे. त्यानिमित्ताने सूर्यमालेच्या या भागाचे निरिक्षण करता करता असे अनेक गोल सापडले ज्यामुळे हे सिद्ध झालं की "ग्रह" या शब्दाच्या जुन्या (२००६ पुर्वीच्या) व्याखेत हे सगळेच गोल येतात.
यासाठी सन २००६ मध्ये 'बटुग्रह'१ (ड्वार्फ प्लॅनेटस) नावाची संज्ञा तयार केली गेली. आणि या व्याखेत बसणारे आतापर्यंत तीन गोल सूर्यमालेत आहेत, प्लुटो, सेरिझ, आणि इरिज. सन २००६ नंतर प्लुटो हा ग्रह उरला नाही तर बटुग्रह आहे. यापैकी इरिज हा सर्वात मोठा बटुग्रह आहे. इरिझ हा प्लुटोच्याही पुढे 'विखुरलेल्या गोलांच्या पट्ट्यात' येतो.[हाच तो ज्याने दहावा ग्रह असल्याचा 'ग्रह' पसरवला होता] आणि सेरिझ हा लघुग्रहाच्या पट्ट्यातील सर्वात मोठा लघुग्रह (त्याला २००६ नंतर बटुग्रह संबोधण्यात आलं).
सध्या वरुण हा सूर्याभोवती फिरणाऱ्या नेपच्यूनबाह्य वस्तुंमधील आठवा मोठा गोल आहे. हा गोलसदृश (पण लंबगोलाकार नाही) मार्गातून भ्रमण करत असून त्याचा बृहदअक्ष ४३ ख.ए. (खगोलिय एकक) इतका आहे. वर दिलेल्या आकृती मध्ये निळया रंगांत वरुणाची कक्षा, लाल रंगात प्लुटोची कक्षा आणि करड्या रंगात नेपच्यूनची कक्षा दाखवली आहे. आकृतीत दाखवल्याप्रमाणे प्लूटो आणि वरुणाचा झुकाव मात्र जवळ जवळ एकसारखा असला तरी वरुणाची कक्षा ही नेपच्युनला बऱ्याच अंशी समांतर असून प्लुटो मात्र नेपच्यूनकक्षेला छेदतो.
वरुणाचे परिभ्रमण २८३ पृथ्वी-वर्षे आहे तर परिवलन ३.१७ पृथ्वी-तास इतके जलद आहे. इतक्या जलद गतीने परिवलन करणारा गोल अंडाकृती असला पाहिजे अशीच शात्रज्ञांची समजुत होती. परंतु नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार अशी शक्यता कमी दिसते. याचं कारण म्हणजे नुकतच यावर्षी दाखल झालेलं एक श्वेतपत्र! त्यानुसार, वरुणाची घनता केवळ १००० कि.मी./मी३ इतकी कमी आहे. (याच कारण वरूण छिद्रमय असल्याचं बोललं जातय.) वरुणाचा पृष्ठभाग हा बऱ्याच अंशी लाल आहे. पण हा गोल क्युपिअर पट्ट्यातील इतर गोलांच्यामानाने फारच गडद आहे. याचाच अर्थ त्यावर बराच बर्फ आहे असा लावला गेलाय. पण हा शुष्क बर्फ आहे की पाण्याने बनलेला हे कळलं नसलं तरी यागोलावर पाण्याने बनलेला बर्फ काही प्रमाणात नक्की आहे हे सिद्ध झालं आहे.
जर हा गोल चौथा बटुग्रह म्हणून सिद्ध झाला तर आपल्या सूर्येमालेतील क्रमात प्लुटो आणि इरिज मध्ये हा वरूण नावाच्या एका भारतीय नाव असलेल्या गोलाची भर पडेल.
१ :
बटुग्रहाची व्याख्या:
एखादी खगोलिय वस्तू बटुग्रह म्हणून संबोधली जावी जेव्हा,
अ. ती सूर्याभोवती फिरते.
ब. त्याचे स्वीय गुरुत्वाकर्षण घटक पदार्थांच्या ताठपणावर मात करण्यास पर्याप्त असावे. अशा प्रकारे द्रवस्थितिशास्त्राचा समतोल साधणारा त्याचा आकार (म्हणजे जवळपास घन गोलाकार) असावा.
क. त्याने आपला परिवलन मार्ग मोकळा केला नसल्याने गुरुत्वीय स्वातंत्र्य मिळालेलं नाही.
ड. हा उपग्रह नाही.
ग्रह आणि बटुग्रहात फरक म्हणजे व्याख्येतील 'क' हा घटक. ग्रहांनी गुरुत्वीय स्वातंत्र्य मिळवलेलं असतं. प्लुटोने असे स्वातंत्र्य मिळवलेले नाही. इतर 'प्लुटोनियन्स' अजून मार्गिकेत आहेत.
२ :
सद्ध्या आपली सूर्यमाला पुढील प्रमाणे आहे:
सूर्य (मुख्य तारा) - बुध (ग्रह) - शुक्र(ग्रह) - पृथ्वी(ग्रह) - मंगळ (ग्रह) - लघुग्रहांचा पट्टा - सेरिझ (बटुग्रह) - गुरू (ग्रह) - शनी (ग्रह) - युरेनस (ग्रह) - नेपच्यून (ग्रह) - प्लुटो (बटुग्रह) - एरिझ (बटुग्रह) [याशिवाय अनेक धुमकेतू आहेतच]
- संदर्भसुची
विकिपिडिया
स्पेसवॉच ऍरिझोना यांचे संकेतस्थळा
डेव जेविट यांच्या संकेतस्थळावरील श्वेतपत्र
**हा माझा शास्त्रिय विषयावरचा पहिलाच लेख आहे. यासाठी उपक्रमावरचे श्री. धनंजय व श्री.टग्या यांची मदत झाली - खरंतरं हा लेख २८तारखेलाच टाकणार होतो. पण आधीच पूर्ण झाला त्यामुळे उत्सुकतेपोटी लगेच मनोगत व उपक्रमावर टाकतो आहे.
Comments
अत्यंत माहितीपूर्ण
जेव्हा प्लुटो हा ग्रह नसून बटुग्रह आहे असे नामकरण खगोलशास्त्रज्ञांनी केले तेव्हा ही गोष्ट वर्तमानपत्रांत, रेडियोवर प्रसारित झाली. पण बातम्या अधिककरून "उबळ" (गट-फीलिंग)च्याच प्रकारच्या होत्या - म्हणजे असे पुनर्नामकरण करण्याचा कोणाला अधिकार आहे का? वगैरे.
वरील माहितीने याबाबत झालेला विचार कळतो, आणि तर्क स्पष्ट होतात. "वरुण" या बटुग्रहाच्या माहितीबद्दल धन्यवाद!
छान
बटुग्रह या संकल्पनेची आणि वरुण या नव्या होऊ घातलेल्या बटुग्रहाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.
राधिका
सुरेख
सोप्या भाषेतला माहितीपूर्ण लेख. बटूग्रहांबद्दल खूपच रोचक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
हा लेख मराठी विकिवरही चढवता येईल असे सुचवावेसे वाटते.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
मस्त !
सोप्या भाषेतला माहितीपूर्ण लेख. बटूग्रहांबद्दल खूपच रोचक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
असेच म्हणतो !
कसे?
सगळ्यांचे प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
राजेंद्र,
मला विकीवर लेख चढवायला नक्कीच आवडेल. पण तो चढवतात कसा हे माहीत नाही :( कृपया मार्गदर्शन कराल का?
कसा
शोध 'मानवी पडताळणी ' ने कसा लागला या विषयी काही लिहिलेत तर अजून योग्य राहील.
हाच मुद्दा पुढे विकसित करून 'आजचे खगोलशास्त्राचे विश्व व शोधाच्या पद्धती' यावर एक लेख होवू शकेल का?
नक्की प्रयत्न करीन
मानवी पडताळणी ही तशी जूनी पद्धत आहे. यात दुर्बिणीने घेतलेली अनेक चित्रांच्या पडताळणीच्या क्रिया अक्षरशः कोणत्याही संगणकीय आद्न्यावलीशिवाय केल्या जातात. (अर्थात वेळखाऊ). मी यावर अथवा तत्सम विषयावर लेख लिहायचा नक्की प्रयत्न करीन.. पण याधी वरदाताईंचा मनोगताच्या दिवाळी अंकातील हा लेख वाचलाय का?
प्रतिसाद आणि सुचवणी बद्दल धन्यवाद:)
छ्या!
छ्या!
असतील हो हे छटाकभर ग्रह इकडे तिकडे फिरत... काय उपयोग त्याचा?
खरे ग्रह तेच, जे ज्योतिष्याने वर्णीले आहेत. त्याचाच मानवी आयुष्यावर खोलवर परीणाम आहे...
(त्यामुळेच घाट्पांडे साहेबांना लिखाणाची उर्मी येते... लिखाणातून प्रसिद्धी मिळते! काय बरोबर ना?)
बाकी सगळे असेच!
बाकी तुमच्या या आता या नवीन ग्रहामूळे अँटी ज्योतिषवाल्यांना आयतेच कोलित! ;)
आपला
कुडमुड्या जोतिषी
गुंडोपंत
हा हा हा
> बाकी तुमच्या या आता या नवीन ग्रहामूळे अँटी ज्योतिषवाल्यांना आयतेच कोलित! ;)
हा हा हा.. या वरुणाचा कुंडलीतील वरुणाशी संबंध नाही लावला म्हणजे नशीब
सुरेख माहिती
वरूण या बटुग्रहाबद्दल दिलेली माहिती आवडली. खगोलशास्त्रात अशा अनेक रोचक घटना/ माहिती असेल ती भविष्यातही अशा लेखांतून यावी.
(२००००) वरुण पैकी २०००० चा अर्थ काय असावा?
अवांतरः बटुग्रहाच्या व्याख्येतील क. मुद्दा मला मराठीतून काही केल्या समजला नाही. विकीवर जाऊन इंग्रजी व्याख्या वाचावी लागली. :(
२००००
नेपच्यून बाह्य ग्रहांना सुरवातीला केवळ क्रमांक दिले जातात. पुढे जर हा गोल एका ठराविक आकारापेक्षा अधिक व संबोधायला सोपा जावा अशी वेळ आली की एक केंद्रिय नामकरण समिती त्याच्यासाठी वेगवेगळ्या नावाचे प्रस्ताव मागवते.
वरुण हा वरुण होण्याआधी 2000 WR106 होता. व वरूण नाव मिळण्याआधी त्यास २०K म्हणायचे (एक् शुन्य कसा वाढला ते मात्र मिळालं नाही :( )
आणि क चं भाषांतराबद्दल बोलाल तर मान्य ! पण मला याहून जास्त जमेना हो :)
उत्तम
स्तुत्य माहितीपूर्ण लेख आहे. लेखाची संरचना आदर्श तांत्रिक लेखाला साजेशीच आहे. आणि असा शास्त्रीय लेख पूर्ण शुद्ध मराठी भाषेत आणि शास्त्रीय संज्ञांच्या मराठीकरणातून साकारला आहे, ही बाब कौतुकास्पद वाटते. या विषयावर अन्यही काही लेख असतील, तर येथे नक्की लिहा.
असेच
उत्तम लेख..
असेच
हेच म्हणतो.
आम्हाला येथे भेट द्या.
लेख आवडला.
लेख आवडला.मुख्य म्हणजे पहिल्यांदा वाचून कळला. (म्हणून काही प्रश्नही आहेत.)
"ड. हा उपग्रह नाही."
उपग्रह आणि बटुग्रह यात नक्की फरक कोणता?
३.१७ पृथ्वी तास परीवलन म्हणजे वरुणावर दर सव्वातीन तासाने दिवसरात्र होत असेल काय?
"वरुणाचा पृष्ठभाग हा बऱ्याच अंशी लाल आहे. पण हा गोल क्युपिअर पट्ट्यातील इतर गोलांच्यामानाने फारच गडद आहे. याचाच अर्थ त्यावर बराच बर्फ आहे असा लावला गेलाय. पण हा शुष्क बर्फ आहे की पाण्याने बनलेला हे कळलं नसलं तरी यागोलावर पाण्याने बनलेला बर्फ काही प्रमाणात नक्की आहे हे सिद्ध झालं आहे."
बर्फ असला तर पांढरेपणाने गोल इतर गोलांच्यामानाने फिका दिसायला हवा ना?(अज्ञ प्रश्न.)
प्रयत्न
>"ड. हा उपग्रह नाही."
>उपग्रह आणि बटुग्रह यात नक्की फरक कोणता?
उपग्रह एखाद्या ग्रहाभोवती फिरतो. तर बटुग्रह तार्याभोवती.
>३.१७ पृथ्वी तास परीवलन म्हणजे वरुणावर दर सव्वातीन तासाने दिवसरात्र होत असेल काय?
होय असेच होते. दर अव्वतीन तासात सूर्य परत उगवलेला असतो. पण एक वर्ष मात्र पृथ्वीवरील २८३ वर्पांनी होते :) म्हणजे आपला पहिला वाढदिवसही इथे सजरा होणार नाही :)
>"वरुणाचा पृष्ठभाग हा बऱ्याच अंशी लाल आहे. पण हा गोल क्युपिअर पट्ट्यातील इतर गोलांच्यामानाने फारच गडद आहे. याचाच अर्थ त्यावर बराच बर्फ आहे असा लावला गेलाय. पण >हा शुष्क बर्फ आहे की पाण्याने बनलेला हे कळलं नसलं तरी यागोलावर पाण्याने बनलेला बर्फ काही प्रमाणात नक्की आहे हे सिद्ध झालं आहे."
>बर्फ असला तर पांढरेपणाने गोल इतर गोलांच्यामानाने फिका दिसायला हवा ना?(अज्ञ प्रश्न.)
बर्फ असल्याने गडगपणा आला आहे असा कयास आहे. पण हा बर्फ कशाने बनला आहे आणि तो सफेद आहे की स्फटिकासारखा की आणखिन कसा हे कळायला कठीण आहे. तरीही या प्रश्नाचं उत्तर मला आत्ता तरी माहीत नाही.. शोधुन बघतो मिळालं तर.. कोणाला माहित असेल तर नक्की द्या :)
लेख,
छान आहे हो! वाचून मजा वाटली...
तात्या.
--
आम्हाला येथे भेट द्या.
लेख आवडला आणि एकपश्न
लेख आणि माहीती छानच आहे. नवीन माहीती बद्दल धन्यवाद.
आपणापैकी कुणास होते का त्याची कल्पना नाही, पण एका (म. शिक्षण मंडळ) भुगोलाच्या पुस्तकात सुर्याभोवती १० ग्रह फिरतात असे लिहीले होते. कुणा विद्वानाचा तो शोध होता माहीत नाही! पण त्यातील दहाव्या ग्रहाचे नाव "पॉसिडॉन" असे आमच्याकडून घोकून घेतले जायचे असे आठवते. तर या "पॉसिडॉन" बद्दल काही माहीती आहे का? (पुस्तकात चूक होते ते माहीत आहे, पण तसा काही बटू ग्रह वगिअरे आहे का ते).
तसेच लघुग्रह आणि बटू ग्रह मधील फरक काय?
धन्यवाद
पॉसिडॉन हे गुरुच्या उपग्रहाचे नाव
मला जितकी माहीती आहे त्यासनुसार पॉसिडॉन हे गुरुच्या एका उपग्रहाचे नाव आहे. (याची कक्षा अनियमित आहे. तसं तर गुरुच्या प्रत्येक उपग्रहावर एक लेख् होऊ शकतो इतकी रोचकता प्रत्येकात आहे..:प्)
लघुग्रह आणि बटुग्रह यात फरक असा की लघुग्रह हे बटुग्रहा प्रमाणे लेखात दिलेला 'ब' हा निकष पूर्ण करत नाहीत. (थोडक्यात ते फारच लहान असतात कींवा त्याचा आकार घन गोलाकार नसतो)
सहमत
तसं तर गुरुच्या प्रत्येक उपग्रहावर एक लेख् होऊ शकतो इतकी रोचकता प्रत्येकात आहे..:प्)
सहमत आहे. असेच गुरू प्रूथ्वीपेक्षा किती मोठा आहे याची जाणीव जेव्हा पहिल्यांदा झाली होती, (आणि सूर्य त्याहून किती मोठा आहे, इ.) तेव्हा विश्वरूपदर्शन झाल्यासारखे वाटले होते.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
९३६ कि.मी. इतकाच
९३६^२३६ कि.मी. नव्हे तर ९३६ कि.मी. इतका आहे. बाकी फरक (+२३६) इतका असु शकतो. (व्यास अजुनही पुर्णपणे निश्चित करता आलेला नाही. तापकिरणंचे उत्सर्जन (thermal emission) व प्रकाशाचे परावर्तन यावरून केवळ् अंदाज बांधता येतो.)
कौतुकास्पद
परीवश म्हणतात त्याप्रमाणे, "स्तुत्य माहितीपूर्ण लेख आहे. लेखाची संरचना आदर्श तांत्रिक लेखाला साजेशीच आहे. आणि असा शास्त्रीय लेख पूर्ण शुद्ध मराठी भाषेत आणि शास्त्रीय संज्ञांच्या मराठीकरणातून साकारला आहे, ही बाब कौतुकास्पद वाटते. या विषयावर अन्यही काही लेख असतील, तर येथे नक्की लिहा."
तसेच आपण सर्वांच्या प्रश्नांना लगोलग उत्तरे देत आहात याबद्दल आपले कौतुक केले पाहिजे.
आपला,
(भुगोलार्थी) भास्कर
आम्ही येथे वसतो.
चांगली माहिती
उत्तम् लेख.
अनिरुद्ध दातार