रोखठोक - संजय राउत (आपण किती नियम आणि शिस्त पाळतो? चा पुढील भाग)
दारुण सत्य पचवायचे कसे?
थिल्लर राष्ट्रभक्तीचे उदंड पीक देशात आले. टिळकांनी क्रांतीला तर गांधींनी सत्याला परमेश्वर मानले. आज लढणारे कोणी नाहीत व गांधींच्या सत्यवचनास रामराम करणारेही कोणी उरले नाहीत. खोटेपणाचा आश्रय सगळेच घेतात. कारण झटपट यशाचा तो मार्ग. हे दारुण सत्य पचवायचे कसे?
लोकमान्य टिळकांच्या विद्यार्थीदशेतील एक आठवण मोठी उद्बोधक आहे. त्यांच्या कॉलेजातील काही विद्यार्थी देशभक्तीची आणि राज्यक्रांतीची भडक भाषा बोलणारे होते. त्यांपैकी काही जणांनी एका खोलीत जमून व्हिक्टोरिया राणीचे चित्र विद्रूप करण्याचा कार्यक्रम मोठ्या आवेशाने पार पाडला. कोणी राणीचे (म्हणजे राणीच्या चित्राचे!) डोळे फोडले, कुणी नाक कापले, कोणी पोटात चाकू खुपसला व हे असे केल्याने आपण फार मोठी राष्ट्रसेवा किंवा क्रांतिकार्य केल्याच्या समाधानात विद्यार्थी घरी गेले. हे कार्य जेव्हा टिळकांच्या कानी गेले तेव्हा त्या पुचाट मित्रांना म्हणाले, ``अरे, तुम्ही हे काय केले? तुमच्या मनोदौर्बल्याचे हे प्रदर्शन झाले. त्या बिचाऱ्या चित्राने तुमचा काय अपराध केला? असे चित्र विद्रूप करण्याची थिल्लर देशभक्ती दाखविण्याऐवजी लंडनच्या तख्तावर घण हाणण्याची महत्त्वाकांक्षा बाळगा!...'' अशा थिल्लर राष्ट्रभक्तीचे उदंड पीक सध्या सर्वत्र माजले आहे व कुणी याचे पुतळे जाळतात, तर कुणी त्याची प्रेतयात्रा काढून `फोटूगिरी'चा कार्यक्रम उरकतात कुणी मनुस्मृतीचे दहन करतात, तर कुणी राज्यघटना जाळून निषेध व्यक्त करतात कुणी उपोषणाचा फार्स करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात, तर कुणी आत्मदहनाचे इशारे देतात. त्यामुळे कोणते प्रश्न मार्गी लागणार आहेत व यापूर्वी लागले ते मात्र कळत नाही.
श्रीमंतांचे कायदे वेगळे
कायदे कोणासाठी? असा प्रश्न आज निदान सामान्य जनतेला तरी पदोपदी पडतो. दारू पिऊन गाडी चालविणाऱ्यांविरुद्ध आणि मोबाईल फोनवर बोलत गाडी चालविणाऱ्यांविरुद्ध मुंबईच्या पोलिसांनी मोहीम उघडली. ती यशस्वी झाली. अशा प्रकारे गाडी चालविणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल झाले. एक तर ते तुरुंगात गेले, नाही तर त्यांना मोठा दंड भरावा लागला. पोलिसांनी जे केले ते लोकांच्याच भल्यासाठी. त्यामुळे रोज होणारे अपघात व जीवितहानी टळली, पण पोलिसांचे वर्तन योग्य नाही व ते फारच अरेरावीने वागतात अशी तक्रार काही जण करू लागले. कायदा म्हणजे हातोडाच असायला हवा, लोण्याचा गोळा असू नये. पूर्वी पोलिसांना चिरीमिरी दिली की सहज सुटता येत असे. आता ते घडत नाही. त्यामुळे स्वत:स सुजाण म्हणविणारे श्रीमंत नागरिक हवालदिल झाले. त्यांचे म्हणणे काय, तर मुंबईच्या रस्त्यांवरील ट्रॅफिक कोण आवरणार? रस्त्यांवरील खड्डे कोण बुजविणार? दादरवरून सांताक्रुझ विमानतळावर पोहोचण्यासाठी २५ मिनिटे लागतात, पण ट्रॅफिक असे भयंकर की अनेकदा या प्रवासासाठी दोन तासही अपुरे पडावेत. अशावेळी मोबाईल फोनवर बोलतच कामे आटपावी लागतात. पोलिसांनी ट्रॅफिक नियंत्रणात आणावे, रस्ते नीट करावेत व मगच कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी असे काही मुंबईकरांना वाटत असले तरी त्याचे समर्थन करता येणार नाही. लोकांचे म्हणणे असे की, `आज देशात कोण गुन्हा करीत नाही? आज सिग्नलवरील ट्रॅफिक पोलिसाने आडवा केलेला हात न जुमानता तुम्ही गाडी पुढे नेता. हा गुन्हाच आहे. या देशातले पुढारी सत्तेचा फायदा घेऊन कोट्यवधी रुपये कमवतात व इन्कम टॅक्स भरत नाहीत. त्यांची सगळीच संपत्ती बेनामी असते हा गुन्हा नाही काय? आपण सर्वच देशाभिमानाच्या गोष्टी आतडी पिळवटून करतो, पण तिकडे हिंदुस्थान-पाकिस्तानच्या आणि बांगलादेशच्या सीमेवरून पैसे घेऊन `घुसखोरी'स प्रोत्साहन दिले जाते. हा गुन्हा नाही काय? क्वात्रोची हा बोफोर्सची दलाली पचवून सहज सटकतो व देशाचे कायदे खातेच त्याच्या सुटकेच्या वाटेवरील काटे दूर करते. हा अपराध नाही काय? हा अपराध करणारेच पुन्हा देशाभिमानाच्या गोष्टी जरा मोठ्याच आवाजात करतात म्हणून त्यांना टिळकांचे उदाहरण दिले.
हे तर भाईबंद!
लोक भ्रष्टाचाराबद्दल नेहमीच तक्रार करीत असतात, परंतु भ्रष्टाचार शेवटी कोण करतो? आपलेच भाईबंद तो करीत असतात. दोन बातम्यांकडे खास लक्ष वेधतो -
१) `अॅट्रॉसिटीची फिर्याद मागे घेतो दोन लाख रुपये खंडणी द्या' अशी वारंवार मागणी करून गावगुंडांनी मानसिक छळ केल्याने दक्षिण सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. नारायण गुंड असे त्या शेतकऱ्याचे नाव. पत्नी व दोन मुलांसह तो राहत होता. गावातील महादेव कांबळेशी त्याचे भांडण झाले. या भांडणातून कांबळे यांनी पोलीस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळ (अॅट्रॉसिटी) केल्याची फिर्याद केली. पोलिसांनी कारवाई सुरू केली. त्यानंतर अॅट्रॉसिटी मागे घेण्यासाठीच दोन लाख रुपयांची मागणी होऊ लागली. कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केली.
२) दुसरी बातमीही सोलापूर जिल्ह्यातीलच आहे. संजय गांधी निराधार योजनेमध्ये सोलापूर जिल्ह्यातच ७५ लाखांचा गैरव्यवहार झाला. हा सरकारी आकडा. प्रत्यक्षात भ्रष्टाचाराचा आकडा १६ कोटींचा आहे. ही योजना गरीबांसाठी. ती सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गिळून ढेकर दिली. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत हा भ्रष्टाचार झाला.
भ्रष्टाचार, खून व गुन्हे फक्त सामान्य माणूसच करतो असे नाही. दिल्लीच्या तिहार तुरुंगात आज सुशिक्षित व चांगल्या घरातील गुन्हेगारांची संख्या जास्त आहे. खासदार, आमदार, अधिकारी या तुरुंगात आहेत. राष्ट्रसेवेशी त्यांचा संबंध नाही. धारावीतील गलिच्छ-गरीब वस्त्यांतील व्यभिचारानेही शरमेने झोपडीत तोंड लपवावे असे व्यभिचार कुलाबा, मलबार हिलमधील पॉश फ्लॅटस्मध्ये होत आहेत. संपत्तीसाठी श्रीमंतांची मुले वृद्ध माता-पित्यांना घराबाहेर काढतात. झोपडपट्टीतील अशिक्षित दादांच्या खूनबाजीने थक्क व्हावे असे मनुष्यवध श्रीमंतांच्या वस्त्यांत घडताहेत.
सरकार नेहमीच खोटेपणा करते व स्वत:ची कातडी वाचवते. लोकमान्य टिळकांच्या गोष्टीने लेखाची सुरुवात केली. क्रांतीचा व लढण्याचा विचार टिळकांनी दिला. सत्य हाच परमेश्वर मानणारे गांधीजी. कुसुमाग्रजांची एक सुरेख कविता आहे. महात्मा गांधींचे दु:ख त्यांनी त्या कवितेत मांडले आहे. या देशातील प्रत्येक नेत्याला त्याची जात आधार देते. त्यामुळे त्याचे मोठेपण टिकून आहे; परंतु गांधीजी म्हणतात, ``माझ्या वाट्याला फक्त सरकारी भिंत आहे. जिच्या आधारावर मी टिकून आहे!'' हे दारुण सत्य म्हणजे पुन्हा शोकांतिकाच. ती सर्वत्र चालली आहे.
दारुण सत्य पचवायचे कसे? कुणी उत्तर शोधील काय?
-संजय राऊत
( सामना १९ आक्टोबर २००७ )
Comments
शिर्षक थोडे चुकले का?
रोखठोक - संजय राउत (महाराष्ट्र व त्यातील शहरे -येत्या काही वर्षात चा पुढिल भाग) पेक्षा (आपण किती नियम आणि शिस्त पाळतो? चा पुढील भाग) याच्याशी जास्त सुसंगत आहे असे मला वाटते.
प्रकाश घाटपांडे
चलता है...
हा लेख वाचताना "उद्धवा अजब तुझे सरकार, लहरी राजा, प्रजा आंधळी अधांतरी दरबार" अशी कुठेतरी आपली अवस्था होत नाही आहे ना असा अस्वस्थ करणारा प्रश्न पडला आहे. अर्थातच दुसरीकडे असेही वाटते की सर्वच काही अगदी वाईट नाही. सात्वीकतेच्या बुरख्याखालील सामाजीक तामसीकता आत्ताशी जायला लागली आहे असे वाटते. वरील लेखाच्या सुरवातीस राऊत यांनी म्हणले आहे की, दारूण सत्य कसे पचवायचे? वास्तवीक ते पचवायचे नाही आहे तर हळू हळू बदलायचे आहे. शाळा कॉलेजात असताना "डँबिसपणा" म्हणून काही प्रकारचे नियम मोडणे आणि नागरीकशास्त्रच धाब्यावर बसवणे यात फरक आहे.
बीबीसीचा माजी पत्रकार मार्क टलीचे "नो फूलस्टॉप्स टू इंडीया" वाचा (अमेरिकेत वाचायचे असेल तर हेच पुस्तक "डिफिट ऑफ ए काँग्रेसमन" या नावाने आहे). एकीकडे भारतातील वाईट गोष्टींबद्दल लेख लिहीत असताना दुसरीकडे आशावादपण आहे. पण त्यात एक चांगले निरीक्षण आहे, ते म्हणजे, भारतातील लोकांचा एक दोष: ते कुठल्याही गोष्टीस "चलता है" असे म्हणतात. हा "चलता है" च या सर्व रोगाचे मूळ होऊन बसला आहे असे वाटते. म्हणूनच जेंव्हा येथे कधी कधी सुधारणांवर चर्चा केली जाते तेंव्हा सतत एकच सांगावेसे वाटते (आणि तसे सांगतोपण) की प्रथम आपण नागरीकम्हणून शक्यतितकी जबाबदारी घरात चालू करूया. तो प्रकार जितका वाढेल तितके सरकार जबाबदार होऊ शकेल कारण ते शेवटी आपल्यातूनच निवडलेले लोकं आहेत...
तुटक
घाटपांडे साहेब,
नियम आणि शिस्तीवरील हा पुढचा भाग चांगला आहे. पण एखाद्या अग्रणी वृत्तपत्राच्या संपादकाकडून असणार्या अपेक्षा तो पूर्ण करत नाही. वाक्य चांगली आहेत पण त्यांची जोडणी व्यवस्थित न झाल्याने लेखात आवश्यक असणारा "फ्लो" त्यात नाही असे वाटते. एक काळ असा होता की सामनाचे संपादकीय अग्रलेख खुसखुशीत मेजवाणी सोबतच विचारांना सुद्धा चांगली किक् (चालना) देत असत. आता संघटनेप्रमाणेच त्यांच्या मुखपत्रात सुद्धा पूर्वीची धमक राहिली नाही असे वाटते. विषेशत। बाळासहेबांच्या नावाने कोण्या सोम्या-गोम्याने लिहिलेले लेख तर केविलवाने असतात. त्यांच्यात काही नावांचा सतत होणारा बिनाकामाचा उदो-उदो तर काहींच्या नावे असणारी ठराविक बोंबाबोंब सुद्धा कंटाळवानी असते. असो. विषयांतराबद्दल क्षमस्व.
समाजिक विषयांवर प्रकाश टाकणारे आपले लेखन प्रेरणादायी व काहीतरी नवीन शिकवणुक देणारे असते. पुढील भाग येऊ द्या.
आपला,
(नियमांचा अदर करणारा नागरिक) भास्कर
आहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,
महाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥
हाच् तो विषय
.
पुण्यात पत्रकार भवन मध्ये एकदा हाच विषय मध्यवर्ती घेउन नवोदित पत्र कारांकरता त्यांचे भाषण तिन चार महिन्यांपुर्वी ऐकले होते, त्यात याची उत्तर सापडतात. ते ऐकण्यासारखे होते. रोखठोक
प्रकाश घाटपांडे
ऐकण्यासारखे...
पुण्यात पत्रकार भवन मध्ये एकदा हाच विषय मध्यवर्ती घेउन नवोदित पत्र कारांकरता त्यांचे भाषण तिन चार महिन्यांपुर्वी ऐकले होते, त्यात याची उत्तर सापडतात. ते ऐकण्यासारखे होते. रोखठोक
--तर लिहा ना मग आमच्या साठी. आम्हाला वाचायला आवडेल.
पुण्यातील भाषणे
पुन्यात लई भारी भारी भाशंन् फुकाट ऐकायला भेटतात. पण संयोजक त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग आताशी कुठ उली उली ठेवाया लागलीये. जे लोक ते बघु शकत नाहीत त्यांना ती व्हीसीडी / डिव्हीडि स्वरुपात पघायला भेटली पाहिजे. असे मनापासून वाटते यु टयुबवर् मर्यादा पडतात. पुन्याच्या बाहेर्च्या मान्सांना लई दाखवावस वाटत. मपल्या हार्ड डिस्क वर उतारल्यात. काही आयडिया असन त सांगा?
प्रकाश घाटपांडे
हम्म
यावर काय म्हणायचे? खरेच आहे. पण पुढे काय?
नियमभंग करण्यातच सुख असते असे नाही, ते पाळले तर अनेकदा आयुष्य सुखकर होऊ शकते. पण प्रत्येकजण दुसर्याला सांगतो अरे बाबा/अग बाई हे असंच चालणार - लोक नियम तोडणार, मग आपणच का ते पाळायचे? आपण आपल्यापुरते बघायचे म्हणजे झाले. हे बोलणार्या प्रत्येकाने नियम पाळून पाहिलेले असते का हे बघण्यासारखे असेल - का नुसते स्वतःच्या वागण्याचे (नकळत) समर्थन असते हे माहिती नाही. त्यामुळे काही सुधारणा होऊ शकतात त्याही होत नाहीत.