आमची सिक्कीम दार्जिलिंग सफर - भाग १

दि. ११ मे शुक्रवार रोजी सिक्कीम दार्जिलिंग यात्रेसाठी आम्ही घराबाहेर पडलो. त्याआधी सुमारे २ महिन्यांपासून तयारी सुरू होती. इंटरनेटवरून, पुस्तके, मासिके, लेख इ. वरून माहिती काढणे; जाउन आलेल्या मंडळींना त्यांचे अनुभव विचारणे, केसरी - प्रसन्न टूर्स इ. कडे चौकशा करणे असं चाललं होतं. पण तरीही समाधानकारक अशी माहिती व मार्गदर्शन कुठूनच मिळत नव्हतं. yatra.com, cleartrip या वेब साइटस वरूनही चौकशी केली होती. सर्वजण वेगवेगळी बजेटसदेत होते. पुण्याला वासंती घैसास या प्रवास विषयक सल्ला व मार्गदर्शन देणा-या लेखिका आहेत. त्यांच्याशी सुद्धा फोनवरून बोललो. त्यांनी मे महिन्यात त्या प्रदेशात पाउस असतो असे सांगितल्याने जरा धाकधुक वाटू लागली. पण ठरलेल्या तारखा सर्व दृष्टीने सोयिस्कर असल्याने त्यात बदल न करता AC III Tier ची जाण्या येण्याची तिकिटे काढून घेतली.
आता प्रश्न आला हॉटेलच्या बुकिंगचा. त्यासाठी Rotary ची मदत घ्यायचे ठरवले. Rotary च्या वेबसाइटवरून दार्जिलिंग, सिक्कीम, सिलिगुडी इ. ठिकाणच्या रोटरी क्लबांच्या पदाधिका-यांचे फोन नंबर मिळवून त्यांना sms केले. Rotary Club of Siligudiच्या In coming President रो. डॉ. इकबाल यांचा रिप्लाय आला. त्यांना ई मेल करून विनंती केली. त्यांनी कळवलं की R.C. of Darjiling चा In coming President रो. ताशी हा स्वत:च Hotel Seven Seventeen चा मालक आहे. त्याचा फोन नं त्यांनी दिला. त्याच्याशी फोन वर बोललो. ई मेल करून तारखा कळवल्या आणि एडवान्स म्हणून UTI Bank च्या जळगाव शाखेत ५००० रू. जमा सुद्धा केले. त्यानुसार सावकाशपणे २ दिवस गांतोक (Hotel Chumbi Residency), २ दिवस पेलिंग (Hotel Sonamchen) आणि ३ दिवस दार्जिलिंग (Hotel Seven Seventeen) असे बुकिंग रो. ताशीने करून ई मेल द्वारा कळवले. येताना कोलकाताला २ दिवस थांबायचे असल्याने महाराष्ट्र मंडळात फोन करून बुकिंग करून ठेवले. ५०० रू.ची मनी ओर्डर सुद्धा करून ठेवली. पण कोलकाताला खूप उकाडा असल्यास AC Hotel मधे जाण्याची पण तयारी राहू दिली.
अशी सर्व तयारी झाल्याने प्रवासाचे काही फारसे टेन्शन नव्हते. पण तरीही सामान गोळा करणे, काय घ्यावे काय नको याचा शेवटच्या क्षणापर्यन्त गोंधळ, खाण्याचे पदार्थ काय काय घ्यावे याची शेवटच्या क्षणापर्यन्त सुरू असलेली तयारी. अनीकाची बॅग भरणे तर महिनाभर सुरू होते. गंमत म्हणजे माझ्यासाठी पुण्याच्या मॉलमधून जे कपडे खास या ट्रिपसाठी आणले होते त्यातल्या ट्राउजर्स मला खूप घट्ट होते होत्या. त्यामुळे त्या रद्द झाल्या आणि पॅण्ट शर्ट घ्यावे लागले. तरीही बायकोने इथल्या दुकानातून एक खाकी रंगाची कार्गो आणलीच.

लेखनविषय: दुवे:

Comments

छान

भाग १ ओळख आवडली.

आता भाग २ जरा आधीक तपशीलवार व रेखीव (माहीतीपर तसेच वर्णनात्मक, सचित्र)येऊ देत. :-)

मराठीवर अतिक्रमण?

मलाही ओळख आवडली पण हा लेख कोणत्या भाषेतला आहे ते कळले नाही. फोनला फोन म्हणावे, पँटीला पँट, शर्टाला शर्ट, मॉलला मॉल कारण बहुधा ते बहुपरिचित शब्द आहेत असे मीच म्हणतो पण बुकींग, रिप्लाय, ट्राउजर्स, बजेट, प्रेसिडेंट, AC III Tier, In coming President, Rotary वाचून वाचून मराठी शब्दांना इंग्रजी प्रतिशब्द कधी आणि केव्हा टाकावेत की हे असं मराठीवर अतिक्रमण करून इंग्रजी लिहित राहावे हा प्रश्न पडला.

म्हणजे लेखातील पहिले वाक्य -

दि. ११ मे शुक्रवार रोजी सिक्कीम दार्जिलिंग यात्रेसाठी आम्ही घराबाहेर पडलो. त्याआधी सुमारे २ महिन्यांपासून तयारी सुरू होती. इंटरनेटवरून, पुस्तके, मासिके, लेख इ. वरून माहिती काढणे; जाउन आलेल्या मंडळींना त्यांचे अनुभव विचारणे, केसरी - प्रसन्न टूर्स इ. कडे चौकशा करणे असं चाललं होतं.

असं लिहिलं असतं तर -

दिं, ११ मे फ्रायडेला सिक्किम दार्जिलिंग ट्रीपसाठी आम्ही घराबाहेर पडलो. त्याआधी ऍप्रॉक्जिमेटली २ महिन्यांपासून प्लॅनिंग सुरु होतं. इंटरेनेटवरून, बुक्स, मॅग्झिन्स, आर्टीकल्स इ. वरून इन्फो गोळा करणे, जाऊन आलेल्या मंडळींचा एक्सपिरिअन्स गोळा करणे, केसरी- प्रसन्न टूर्स इ. कडे इन्क्वायरी करणे असं चाललं होतं.

मोगॅम्बो वाईट वाटून घेऊ नका, लेख वाचून मला खरंच कळेना की माणसाने कोठे आणि कसे इंग्रजी शब्द वापरावे आणि टाळावे.

पु.ले.शु., तुमच्या "ट्रिप"ची माहिती वाचायला आवडेल तेव्हा लवकर लिहा.

- राजीव.

इतके काही अतिरेकी इंग्रजीमिश्रण वाटले नाही

एक-दोनच शब्द खटकले, बाकी ठीक वाटले.

ट्राउजर्स ऐवजी पँट (इंग्रजीच, पण परिचयाचा) शब्द आवडला असता. "डॉ. इकबाल यांचा रिप्लाय"च्या ठिकाणी "...यांचे उत्तर..." सोपे वाटले असते. यात माझे अज्ञान असेल - ट्राउजर्स आणि पँट हे दोन वेगवेगळे कपड्यांचे प्रकार असतील तर वेगवेगळे शब्द ठीकच आहेत.

बाकी सर्व ठीक वाटते - रोटरी त्या संस्थेचे विशेष नाव आहे, ते तसेच घ्यावे लागणार. इन्कमिंग प्रेसिडेंट हे पदनाम कदाचित विशेष नाव म्हणून खपवून घेऊ. (पण मराठी "आगामी अध्यक्ष", "नवे अध्यक्ष", "नवे मुख्य", ...रोटरीचे डॉ. इकबाल [पदनाम न देता], असे अनेक पर्याय वाचायला सोपे गेले असते - माझे वैयक्तिक मत.)

"टेन्शन"ऐवजी मी स्वतः पुष्कळदा "तणाव" असा शब्द वापरतो, पण त्यातून नेमका अर्थ निघत नाही. त्यामुळे "टेन्शन" मराठीत वापरायला माझा पूर्ण पाठिंबा आहे. बाकी मोगँबोसाहेब बर्‍यापैकी मराठमोळे शब्द वापरतात, (तेव्हा राजीव, त्या एकदोन शब्दांचे गालबोट समजून, जरा काणाडोळा करून वाचा.).

मोगँबोसाहेब, फार धाकधूक न वाटून घेता, शैलीत केलाच तर अगदी थोडा बदल करून, प्रवासवर्णनाचा पुढचा हफ्ता आम्हाला वाचू द्या. या लेखात नुसते प्रास्ताविक दिलेले आहे, पुढच्यात वातावरणनिर्मिती, उत्कंठा वगैरे येईल असे दिसते.

विरस करायचानाही.

अहो धनंजय पंत, मला काही मोगँबोचा विरस करायचा नाही पण मराठी संस्थळावर लिहिताना योजनापूर्वक मराठी शब्द वापरले तर बिघडेल काय?

रोटरीबद्दल म्हणायचे होते की Rotary, Hotel Seven Seventeen, AC Hotel he sarv English madhye lihayachi garaj naahi. ;-) शास्त्रीय लेख लिहिल्यासारखं वाटलं.

आता पहा, ऍडवान्स ला आगाऊ, टेन्शनला मानसिक ताण (आवडला नाही म्हणून काय झालं? शब्द आहे ना आणि परिचितही आहे.) एसीला वातानुकूलित, टूर आणि ट्रिपला सहल असे साधेसुधे शब्द आहेत ना. तसंही आपण इतके इंग्रजी शब्द रोजच्या वापरात घेतो. बॅग, बँक, हॉटेल इ. इ. आपण टाळत नाही म्हणून आपलं मी म्हटलं की हे चालतात मग ऍडवान्स, टूर, ट्राऊजर, प्रेसिडेन्टही चालावेत असे कोणी म्हणायला लागले तर ठरवायचे कसे की किती शब्द घ्यावेत आणि किती नकोत? वरील लेखात संपूर्ण मराठीतील एकही वाक्य नाही.

एखादं आर्टिकल एडिट करताना किती परसेंट वर्डस मराठीत सबस्टिट्यूट करायचे असा प्रश्न माझ्या मनात आला.

लेखकाचा उपमर्द करायचा हेतू नव्हता. त्यांचा पुढचा भाग वाचायला आवडेल.

सहमत

१००% सहमत! मी तर शक्य तितके मराठी शब्द शोधायच्या विचारांना पूर्ण पाठींबा देतो.
मराठीत नसेल तर चर्चा करून आपणच एखादा शब्द प्रचलित करू शकतो. (उदा: पुलंनी भुरभुरणार्‍या शांत हिमवर्षावाला 'हिमसेक' हाशब्द तयार केला हा संस्कृतोत्भव नक्कीच नाही. खास पुलंचा. किंवा नारळीकरांनी बर्‍याच तांत्रिक शब्दांना प्रतिशब्द दिले आहेत )

अवांतर: मला काही प्रतिशब्द हवे आहेत. बरेच चांगले इथेआणि इथेहीआहेत

बाकी लेख छान पण मराठीचं तेवढं...

रोमन लिपी खटकते हे खरे

रोटरी वगैरे शब्द देवनागरीत लिहिले असते तर डोळ्यांना बरे वाटले असते - हे मात्र खरे.

आगामी अध्यक्ष

पण मराठी "आगामी अध्यक्ष", "नवे अध्यक्ष", "नवे मुख्य", ...रोटरीचे डॉ. इकबाल [पदनाम न देता], असे अनेक पर्याय वाचायला सोपे गेले असते - माझे वैयक्तिक मत.)

ह्यासाठी मराठी मध्ये आधिक चपखल असणारे शब्द म्हणजे उगवते अध्यक्ष (इनकमिंग प्रेसीडेंट) आणि मावळते अध्यक्ष (आउट गोइंग प्रेसीडेंट) दोनही शब्द रोजच्या वापरातले, चपखल आणि सोपे आहेत.

 
^ वर