स्माइल् थेरपी
मनांतल्या भावना चेहर्यावर दिसतात. मन आनंदी असेल तर चेहर्यावर हसू उमटते. मन अस्वस्थ असेल तर चेहरा चिंतातुर दिसतो. म्हणजे मनांत जी भावना असेल त्याप्रमाणे चेहर्याच्या स्नायूंची स्थिति बदलते.
माणसे जेव्हा एकमेकांच्या संपर्कांत येतात तेव्हा त्यांची एकमेकांशी शाब्दिक व शब्दातीत मेळ साधण्याची प्रवृत्ति असते. त्यासाठी माणसे कळत-नकळत एकमेकांच्या चेहर्यावरील स्नायूंच्या स्थितीची नक्कल करतात. मी तुमच्याकडे पाहून स्मित केले तर तुमची मनस्थिति कशीही असली तरी तुमच्या चेहर्यावरही काही क्षण व सूक्ष्मसे का होईना पण स्मित उमटते. (प्रायोगिक मानसशास्त्रांत electronic recorder च्या साह्याने याची नोंद घेता येते).
एखादा आनंदी माणूस जवळपास वावरत असेल तर आपले मनही उभारी घेते. म्हणजे भावना संसर्गजन्य असतात. येथे प्रथम आपण नकळत आनंदी माणसाच्या चेहर्याच्या स्नायूंच्या स्थितीची नक्कल करतो आणि त्यामुळे आपले मनही आनंदी होते. Malcolm Gladwell यांनी आपल्या The Tipping Point या पुस्तकांत मानसतज्ज्ञांच्या संशोधनाचा हवाला देऊन असे म्हंटले आहे, If I can make you smile I can make you happy....... Emotion in this sense is "outside-in". Gladwell यांनीच म्हंटल्याप्रमाणे हे काहीसे धक्कादायक आहे.
तात्पर्य, मन आनंदी असेल तर चेहर्यावर हसू उमटेल (inside-out) हे जितके खरे तितकेच चेहरा हसरा असेल तर मन आनंदी होईल (outside-in) हेही खरे. त्यामुळे सुखी होण्याचा सर्वांत सोपा मार्ग म्हणजे चेहरा हसरा ठेवणे.
आपणांस काय वाटते? (वि.सू. - लिहितांना चेहरा हसरा असू द्या).
Comments
सहमत
बर्याच अंशी सहमत आहे. लेखातील विचार कॉग्निटीव्ह थेरपीच्या विचारांशी बरेच जुळतात. उदा. बर्याचदा आपल्याला काहीच करावेसे वाटत नाही, फक्त अंथरूणात राहून झोपावेसे वाटते. अशा वेळी इन्स्पिरेशनची वाट न पहाता अंथरूणातून उठून कामाला लागल्यास आपोआप काम करण्याचा उत्साह निर्माण होतो. स्मितहास्याचेही असेच आहे. स्मित केल्याने, दुसर्याच्या (दुसरीच्या :) ) चेहेर्यावरील स्मित बघितल्याने आपल्यालाही उल्हासित वाटते. इतकेच काय, पण निरोपात, लेखात स्माईली बघितला तरीही बरे वाटते. :)
कार्नेजीच्या हाऊ टू विन अँड इन्फ्लुएन्स पीपल या पुस्तकात लोकप्रिय होण्याच्या उपायांमध्ये पहिला उपाय आहे, लोकांकडे पाहून स्मितहास्य करा. इतकेच नाही तर बर्याचदा ह्युमर इज द बेस्ट सोल्युशन याचा प्रत्यय येतो.
इतके स्माइली टाकल्यानंतर लेखातील शेवटची सूचना पाळली आहे हे उघड आहे. :)
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
हसरा चेहरा
सुखी होण्याचा सर्वांत सोपा मार्ग म्हणजे चेहरा हसरा ठेवणे.
पटण्या सारखे. बर्याच दिवसांनी कोर्डे साहेबांनी लेखन केले. (हल्ली उपक्रमाला विसरलात काय?) वाचून मन प्रसन्न झाले, वेहेर्यावरही हसू आले!
असो,
राजेंद्र साहेब,
आपण कॉग्निटीव्ह थेरपी वर काही लिहु शकाल काय? नक्कीच माहितीपूर्ण व उपयोगी असेल.
आपण डेल कार्नेजीचा दिलेलेला संदर्भ योग्य असेलही कार्नेजीच्या हाऊ टू विन अँड इन्फ्लुएन्स पीपल या पुस्तका बाबत मतभीन्न आहे, मला हे पुस्तक जरासे 'भामटे' व अप्रामाणीक वाटते.
त्या पेक्षा कोव्हे चे ७ हॅबीट्स चांगले, स्व्तःशी प्रामाणीक वाटते.
अर्थात हे माझे मत झाले! :)
आपला
गुंडोपंत
कार्नेजी
गुंडोपंत,
खर्डेघाशीला अजून एक विषय सुचवल्याबद्दल धन्यवाद. :)
कार्नेजीबद्दल काही अंशी सहमत आहे. एका दृष्टीकोनातून हे पुस्तक इन्शुरन्स सेल्समन साठी लिहील्यासारखे वाटते. आणि कार्नेजी पूर्वायुष्यात दारोदार जाऊन विक्री करत असे. हे पुस्तक त्याच्या या आणि अशा अनुभवांमधून आले आहे. हे पुस्तक जरा वरवरचे वाटल्यास नवल नाही. आपले रोजचे व्यवहारही बर्याच अंशी औपचारिक आणि वरवरचे असतात. एखादा अमेरिकन रोज सकाळी "हाय, हाउ यू डूइन?" म्हणतो त्याचप्रमाणे. ही औपचारिकता यंत्रामधल्या वंगणाप्रमाणे काम करते. यात तरबेज असलेल्या माणसांना नवीन माणसांशी रॅपो जमवताना अडचणी येत नाहीत. माझ्या मते प्रत्येक सेल्फ़हेल्प पुस्तकातील सर्वच्या सर्व आपल्याला पटतेच असे नाही. जे काही पटते आणि करणे शक्य आहे ते घेतले तर नक्कीच फायदा होतो.
(इथे कोव्हेच्या पुस्तकाबद्दल माझे मत होते, पण कोर्डेसाहेबांच्या खालील प्रतिसादानंतर मला ते बदलावेसे वाटत आहे. कोव्हेचे पुस्तक एकदाच वाचले आहे, त्यावरून त्यावर मत प्रदर्शित करणे योग्य नाही असे वाटते.)
त्यातूनही काही गोष्टी घेण्याचा प्रयत्न केला, कितपत सफल झाल बघायला हवे. :) कदाचित माझा दृष्टीकोन वेगळा असेल. आपण या पुस्तकावर काही लिहीलेत तर वाचायला नक्कीच आवडेल.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
कार्नेजीच्या पुस्तकाबद्दल
श्री. गुंडोपंत,
"हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल"हे आपल्याला पहिल्यांदा वरवरचे (भामटे म्हणा हवे तर) वाटू शकते. मला वाटते त्याची कारणे अशी असू शकतात....
१. कार्नेजीची संस्कृती आपल्यापेक्षा वेगळी असल्याने त्यांच्यातली औपचारिकता आपल्याला उसनी वाटते.
२. त्याने सांगितलेली काही उदाहरणे आपल्यासारख्याला अति वाटतात. त्यामुळे त्यात भामटेगिरी वाटते.
पण पुस्तक पुन्हा एकदा वाचल्यास त्याचे पटायला लागते. विषेशत। त्याने सांगितलेलया छोट्या-छोट्या क्लृप्त्या आंमलात आणायला लागलो तर जरा पटकन पटायला लागते. अर्थात प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो.
क.लो.अ.
आपला,
(वाचक) भास्कर
आहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,
महाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥
धन्यवाद
राजेंद्र व गुंडोपंत यांस,
प्रतिसादांबद्दल धन्यवाद.
स्टीफन् कोव्हे च्या सेवन् हॅबिट्स् बद्दल सांगायचे तर मी ते पुस्तक ५-६ वेळा तरी वाचले असेल. एकदा स्वतःचे स्वतः व बाकीच्या वेळी इतरांकडून वाचून घेतले. पहिल्या वाचनांत मलाही ते काहीसे वरवरचे व कर्पोरेट् जगासाठी लिहिलेले वाटले. पण नंतरच्या वाचनांत, ज्यांत चर्चाही होत असे, अधिकाधिक अर्थ उलगडत गेला. त्यावरून कोव्हेचे पुस्तक जीवनांतल्या सर्व अंगांना विशेषतः नातेसंबंधांना महत्व देणारे आहे हे लक्षांत आले. कुठलेही गंभीर विषयावरील पुस्तक एकदा वाचून पूर्ण समजत नाही. ते पुन्हा पुन्हा वाचल्यास त्याचे महत्व लक्षांत येते. अशा पुस्तकांबाबत एक गमतीचा अनुभव सांगतो. एरिक् बर्न् चे (What do you say after you say hello?) हे पुस्तक पहिल्यांदा वाचले तेव्हा महत्वाची वाटणारी काही वाक्ये अधोरेखित केली. काही दिवसांनी ते दुसर्यांदा वाचायला घेतले तेव्हा दुसरी काही वाक्येही अधोरेखित करायला हवी होती असे वाटले. माझी खात्री आहे हे अधोरेखन असेच चालू ठेवले असते तर ४-५ वाचनांनंतर सर्व पुस्तक अधोरेखित झाले असते.
एरिक बर्न
कुठलेही गंभीर विषयावरील पुस्तक एकदा वाचून पूर्ण समजत नाही. ते पुन्हा पुन्हा वाचल्यास त्याचे महत्व लक्षांत येते.
सहमत आहे. कोव्हेचे पुस्तकही परत वाचायला हवे. बर्नच्या या पुस्तकाबाबत माझा अनुभव काहिसा असाच आहे. पहिल्यांदा या पुस्तकाची पहिली २-३ पाने वाचली तेव्हा धक्क्यामागून धक्के बसत होते. संपूर्ण पुस्तक बरेच सखोल आहे. अजूनही परत वाचायला हवे असे वाटते.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
हे भारी आहे!
एकदा स्वतःचे स्वतः व बाकीच्या वेळी इतरांकडून वाचून घेतले.
इतरांकडून वाचून घेतले ही भारी आहे! हे कसे जमले बॉ?
म्हणजे इतर आपले ऐकतील हे कसे जमले? गुंडोपंताचे तर घरातला टॉमीही ऐकत नाही... त्यालाच एकदा मी पेपर मधले 'त्याचे भविष्य' वाचून दाखवत होतो तर चक्क अर्धेच झालेले असतांना झोपून गेला हो निर्लज्जपणे! तो मला काही वाचून दाखवेल हे काही शक्य वाटत नाही. बाकी कुणी गुंडोपंताचे ऐकतच नाही.
तर तुम्हाला हे कसे काय जमले?
कुठलेही गंभीर विषयावरील पुस्तक एकदा वाचून पूर्ण समजत नाही. ते पुन्हा पुन्हा वाचल्यास त्याचे महत्व लक्षांत येते.
हे मात्र मान्य! मी ही तसे करतो, करत असतो. डॉ. नाडकर्णींचे स्वभाव-विभाव वाचत असतो. परत काहीतरी नवीन कळल्यासारखे वाटते.
कोव्हे च्य ७ हॅबीट्स अतिप्रयत्नपुर्वक आणायचा प्रयत्न केला पण मेंदूवर कोणतीही सुरकूती नसल्याने परत घरंग़ळून गेल्या. प्रयत्न सुरु आहे! :))
तसा मला कोव्हे आपल्या संत वांङमयाला फार जवळचा वाटतो!
बाकी What do you say after you say hello? हे पुस्तक वाचले नाही. आता कुठून तरी मिळवायचा प्रयत्न करून पाहतो.
आपला
गुंडोपंत
सापडला!
एरिक बर्न चे
What do you say... सापडले आहे.
वाचून पाहतो. इंग्रजी पुस्तक वाचायचे म्हणजे फार कष्ट वाटतात.
त्यात ते बरे जाड पण आहे हो!
बाकी त्यातला स्क्रिप्ट चा किस्सा भारी वाटतो आहे!!!
तरी प्रयत्न करून बघु, या तुळतूळीत मेंदूवर एखादी सुरकुती उमटते का ते! :)
आपला
तुळतूळीत
गुंडोपंत
पुस्तक
खरंच चांगले आहे. पहिली ४०-४५ पानेच वाचू शकलो आहे. (ट्रंझॅक्शनवाली) पण आवडत चालले आहे.
डोळ्यांचे काही झाले की मग सगळेच वाचून टाकेन!
मग चर्चा करू या परत स्क्रिप्टस् वर!
आपला
स्क्रिप्टोपंत
टी.ए. आणि स्क्रिप्ट्
एरिक् बर्न् चे "व्हॉट् डू यू से........." वाचण्याआधी डॉ. हॅरिस् यांचे "I'm OK, You're OK" वाचल्यास अधिक चांगले
सहमत
सहमत आहे. फक्त या पुस्तकातील शेवटी धर्म आणि देवाशी याचा संबंध जोडण्याचा प्रयत्न फारसा पटला नाही. (हे माझे मत आहे. )
याच संदर्भात आणखी एक उत्तम पुस्तक म्हणजे बॉर्न टू विन (भारतातही उपलब्ध आहे.)
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
भावना संसर्गजन्य असतात
हे पटले.
आपला,
(आनंदी) भास्कर :)
आहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,
महाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥
२५०० रुपये मिळवा.
गीता प्रेसचे मानसिक दक्षता नावाचे पुस्तक आहे. ते वाचायचे आणि त्यापेक्षा चांगले पुस्तक असेल तर सुचवायचे. मुल्यमापनाचा निकष मुल्य, माहिती, प्रत मिळण्यात असलेला सोपेपणा, सारभूत माहिती असा आहे.
वरील बक्षिस आमच्या एका नागपूरच्या मित्रांनी ठेवले आहे. काही माहिती हवी असल्यास मला विचारणा करणे.
( वरील काही प्रतिसादात व्यक्तिमत्व विकासांच्या पुस्तकाची यादी आली म्हणून हा आगाऊ प्रतिसाद).