गैरसमजूती-अंधश्रद्धा रोजच्या व्यवहारात.

नमस्कार मंडळी,
नुकतेच युट्युबवर एक छोटी चित्रफित पाहिली आणि हा चर्चाप्रस्ताव आपणा समोर ठेवावा असे मनात आले.

अंधश्रद्धा हा फार मोठ्या परिघाचा विषय आहे. आपल्या रोजच्या जगण्यामध्ये आपला अनेक अश्या गोष्टींवर विश्वास असतो की अनेकदा ते एक 'सत्य' आहे असे आपल्याला वाटत असते. पण ते खरेच सत्य आहे की अनेकांनी अनेकांना सतत सांगितल्याने जोपासला गेलेला तो एक भ्रम आहे हे तपासून पाहायची आपल्याला कधी गरजच भासत नाही.

येथे मी जो दुवा देत आहे त्यात असे दाखवले आहे की पुण्यामधल्या स्वामीसमर्थांच्या एका मठातील औदूंबराच्या झाडाला फुल आले आहे. 'उंबराचे फुल' हे अनेक वर्षांतून एकदाच उगवते, ते पराती येवढ्या आकाराचे असते इत्यादी समज त्या फुला विषयी लोकांत आहेत.
http://www.youtube.com/watch?v=xoYf8xTcuPw&mode=user&search=
आता माझ्या समजूती प्रमाणे उंबर हे अंजीर वर्गातले सदाहरित झाड आहे. त्या वर्गात वड, पिंपळ, उंबर, रबर प्लँट. अंजीर इ. नेहमी दिसणारी झाडे येतात. ते द्विलिंगी असून त्याला वर्षातून दोनदा फुले येतात आणि पुनरुत्पादन होते. त्याचा फुलोरा बहुधा अनेक लहान फुले एकत्र येणारा असा असतो. तो फुलोरा म्हणजेच ते उंबराचे फळ. म्हणजे आपण ज्याला फळ म्हणतो तो एकत्र फुलोर्‍याचा कोठला तरी फुगीर भाग असतो अशी माझी माहिती आहे. आता फलधारणा कशी होते वगैरे वनस्पतिशास्त्रज्ञाकडूनच समजावून घ्यायला पाहिजे. नेटावर या विषयी माहिती आहे.
प्रस्तुत चित्रफितीमधील फुल हे फुल असून ते भूछत्र आहे असा माझा पक्का कयास आहे.

तर वरिल विषयावर आपल्याला काही माहिती असेल तर ती कृपया येथे द्यावी.

तसेच आपल्या दैनंदिन जीवनात अश्या तर्‍हेच्या ज्या समजूती असतात ज्या अनेकदा शास्त्रीय अंधश्रद्धा या अंतर्गत मोडतात त्याबद्दल आपण इथे लिहावे, त्याचे स्पष्टिकरण सुद्धा माहित असल्यास द्यावे, त्यावर उहापोह करावा, नाहीतर तज्ञांना आवाहन करावे अशी विनंती.

काळे कपडे उष्णता शोषून घेतात हे खरे. पण तोच काळा कपडा इतर कपड्यांच्या आत असेल तर उष्णता शोषतो का? मी थंडित काळे मोजे वापरणारे लोक पहिले आहेत ज्यांची समजूत वरिल प्रमाणे असते. पण मला तर वाटते की तो कपडा जर प्रकाश पाहत नसेल तर तो उष्णता कशी मिळवणार ?

या चर्चेत देव किंवा फार सज्जड अश्या विषयांवर न बोलता अश्या लहानसहान समजूती/गैरसमजूतींबद्दल बोलुया !
--लिखाळ.

लेखनविषय: दुवे:

Comments

खोडात फूल?

चित्रफितीत खोडात खोचलेले फूल दिसते तेच उंबराचे फूल का? अशा भरभक्कम खोडाला एक फूल लागते का? तशा वनस्पती असतात का? मलातरी ते भूछत्र (मश्रूम) वाटले पण वनस्पतीशास्त्राचे माझे ज्ञान अगाध आहे. :(

लहानसहान गैरसमजूतींबद्दल काही गोष्टी :

अमेरिकेत आल्यापासून माझ्या भारतातील काही वैद्यकीय समजूतींना तडा गेला आहे आणि काय खरे आणि काय खोटे या संभ्रमात मी अद्याप जगत आहे. (वाह्! जबराच वाक्य झाले. ;-))

१. थंड खाल्ल्याने सर्दी खोकला होतो. अमेरिकेतील डॉक्टर या वाक्यावर किती अडाणी बाई आहे या नजरेने बघतात.

२. थंड खाल्ल्याने घसा दुखू शकतो (हे थोडे नं.१ प्रमाणेच) पण डॉक्टरांचे म्हणणे - सर्दीने नाक चोंबते आणि माणूस तोंडाने श्वास घेतो. पर्यायाने घसा कोरडा होतो आणि दुखतो. :-( किंवा ऍसिडिटीमुळे रात्री आडवे पडल्याने ऍसिड उलट्या दिशेने संक्रमण करते आणि घसा दुखतो. थंड खाण्याचा आणि घसा दुखण्याचा काडीमात्र संबंध नाही.

३. केळे हे आपण रेचक मानतो, अमेरिकेत अनेकजण अगदी उलट मानतात. डायरिया होत असेल तर केळे खा असे कोणालातरी सांगताना ऐकले आहे. केळ्याने ऍसिडिटी वाढते हा दुसरा एक समज ऐकला आहे.

ह्म्म्म्

बरोबर !

सर्दी खोकला थंड खाल्ल्याने होत नाही. ते एक विषाणूजन्य इन्फेक्शन आहे, ते फक्त हवेतून संक्रमण झाले किंवा इन्फेक्टेड वस्तूबरोबर संबंध आला तरच होते. थंड वातावरणामुळे इन्फेक्शन वाढल्याचा देखिल ठोस पुरावा नाही आहे.

तेच घसा दुखी चे, हे देखिल विषाणूजन्य इन्फेक्शनच् आहे, ब-याच वेळा. (कधी कधी जीवाणू मुळेही होते, तेव्हा अँटीबायोटिक्स देतात.) तेही वरीलप्रमाणेच संक्रमित झाले तरच फक्त तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकते. गरम पाणी, सूप, वाफ हे सर्व तात्पुरते ईलाज आहेत, घसादुखी कमी करण्याचे.

केळे माझ्या माहितीप्रमाणे तरी ऍसिडिटी कमी करते. तसेच केळे डायरिया आणि कॉन्स्टिपेशन दोन्हीवर काम करते !! पिकलेले डायरियावर आणि हिरवे कॉन्स्टिपेशन वर.

तज्ञ अधिक खुलासा करतीलच !

******डिस्क्लेमर******
लेखक या विषयातील माहितगार नाही. वरील लेखन ऐकीव माहितीच्या आधारे केलेले आहे.

प्रेरक

सर्दी खोकला थंड खाल्ल्याने होत नाही. ते एक विषाणूजन्य इन्फेक्शन आहे, ते फक्त हवेतून संक्रमण झाले किंवा इन्फेक्टेड वस्तूबरोबर संबंध आला तरच होते. थंड वातावरणामुळे इन्फेक्शन वाढल्याचा देखिल ठोस पुरावा नाही आहे.

हे मलाही मान्य आहे. ऍलर्जी इ. ही फक्त थंड पदार्थ घशाला कोरेडेपणा किंवा इरिटेशन देऊन उत्प्रेरकाचे काम करतात का? असा प्रश्न विचारायला हवा होता.

भूछत्रच आहे, पटले

उंबराची फुले
> प्रस्तुत चित्रफितीमधील फुल हे फुल असून ते भूछत्र आहे असा माझा पक्का कयास आहे.
होय, पूर्णपणे पटले.

उंबराची फुले आणि फळे त्याच्या "फळासारख्या दिसणार्‍या इंद्रिया"त दडलेली असतात असे मीदेखील वनस्पतीशास्त्रात वाचले होते. खूप कच्चे अंजीर फोडल्यास आत सूक्ष्म फुले दिसतात, ती मी बघितलेली आहेत. उंबराचे कच्चे "फळ" मी फोडून बघितलेले नाही. पण पिकलेले "फळ" फोडले तर आतून अंजिरासारखेच असते, त्यामुळे त्याचीही आधी फुले दिसत असावीत.

काळे मोजे
काळे मोजे इन्फ्रारेड स्पेक्ट्रममध्ये देखील "काळे" असतील तर शरिरातून बाहेर पडणारी इन्फ्रारेड किरणे शोषून गरम होणे शक्य आहे. एकादी वस्तू इन्फ्रारेड स्पेक्ट्रममध्ये "काळी" आहे का ते डोळ्यांना दिसत नसले तरी थोडासा त्रासदायक पण घरगुती प्रयोग करून शोधून काढता येईल. दोन वेगवेगळ्या रंगाचे मोजे चुलीला न चिकटवता, चुलीची धग जाणवेल अशा ठिकाणी (पण हवा स्तब्ध हवी) ठेवा. बाजूला ठेवा - चुलीच्या वरती नाही! (धग वेगळी आणि आग वेगळी.) जो मोजा केवळ धगीने जास्त गरम होईल (पाहिजे तर ताप मोजायची कांडी वापरा) तो इन्फ्रारेड स्पेक्ट्रममध्ये त्यातल्या त्यात "काळा". थंडीसाठी वापरायचा असेल तर असा काळा मोजा लपलेलाच बरा. कारण काळा रंग उष्णता लवकर शोषतो आणि त्याचे उत्सर्जनही लवकर करतो. हा सर्व विचार सांगूनही आतले कपडे काळे वापरल्याचा फारसा फायदा होणार नाही असे मला वाटते.

उंबराची फुले-धृवीय अस्वले

धनंजय,
आपले निरिक्षण बरोबरच आहे. उंबराचे परागिभवन या वास्प (गांधिलमाश्या?) द्वारेच होते. त्या पराग कण इकडुनतिकडे नेतात आणि त्याबदल्यात स्वतःच्या पुढच्या पिढीला अन्न आणि घराची सोय त्या उंबरात करतात. अनेकदा एक् एक उंबराची जात आणि त्या वास्प ची जात ही ठराविकच असते. म्हणजे त्या दोहोंचे अस्तित्व एकमेकांवर अवलंबून असते.

काळ्या मोज्यांचा प्रयोग केला पाहिजे. पांढरे शुभ्र असलेले धृवीय अस्वल सुद्धा उष्णता शोषून घेते ते याच त्त्वावर. मागे एकदा नूशनल जिऑग्रफिक चूनेलवर त्यांच्या केसांतून उष्णत कशी प्रवाहित होते आणि त्वचेपर्यंत पोहोचते ते दाखवले होते.
--लिखाळ.

मला बरेच काही समजते असे मला बरेचदा वाटते हेच माझ्या असमंजसपणाचे निदर्शक आहे.

हे उंबराचे फुलच असेल!

हे फुलच असेल!
मला हवे तसे मी पाहतो आहे. मला हे (जे काय आहे ते) फुल म्हणूनच पहायचे आहे. कारण तसे पाहिल्याने मला माझ्या 'श्रद्धा' सबळ आहेत असे मानायला जागा मिळते आहे.
म्हणून मी फुलच मानणार!

काही फरक पडत नाही. मागे एका चर्चे मध्ये सत्य म्हणजे काय या विषयी चर्चा झाली. त्यावेळी आपल्या लेखात आलेच की सत्य म्हणजे 'त्या वेळी ही गोष्ट सत्य आहे असे वाटणारा विश्वास'. मग मला रोज व्यायामाला एकाच डंबेलानी सुरुवात करावेशी वाटते कारण माझा विश्वास की, त्यामुळे माझा व्यायाम चांगला होतो. मला गाडीवर एकाच बाजूने टांग टाकाविशी वाटते, महत्वाच्या कामाला जातांना मी एक खास शर्ट वापरतो, घरातला महत्वाचा विचार विनिमय करण्यासाठी एक ठिकाणच आवडते, झोपण्यासाठी एक खास जागाच बरी वाटते.
मी हे सगळे करतो.

आणी मला तसे करणे आवडते कारण, आयुष्यातली अनेक वर्षे 'माझ्या आयुष्याला मी जबाबदार' या न्यायाने व सर्व काही 'तुमच्या वैज्ञानिक सत्याच्या' कसोटीवर घासून घासून दमलो!

मग काही लोक गर्दी मध्येच सहजतेने राहतांना दिसले. तेही मजेत. मला वाटले की चला असेही पण तर राहताच येते! मग कशाला घासत बसायचे हे सारखे? काही स्वमंथन करून करून स्वता:ची तपासणी करत करत मी पण गर्दीत सामील झालो. आता चेहरा नाही. हे असे का विचारण्याची गरजही नाही... असेल बॉ, असे म्हणण्याची सोय झाली. अरे हे तर सगळे सोपे झाले.

मग मी रिलॅक्स झालो! वा सुख सुख म्हणतात ते हेच. अश्या श्रद्धांवर जगता येत असणं यात किती मोठं सुख आहे. काही लोक याला दुबळेपण म्हणतात. अचानक पणे मी 'या सगळ्याला कारणीभूत' हा प्रश्नच संपला. एक खास मानसीक मोकळे पण!
आता मी पुर्ण पणे सश्रद्ध आहे! मला आता कुणी 'मनापासून' काळेच काय पिवळे मोजे 'सांगितलेत' तरी मी घालेन! ;))

आपला
आता अडाणी नि बावळट असणे पसंत असलेला!
गुंडोपंत

विचार- माझी बाजू

गुंडोपंत,
आपला प्रतिसाद फारच चांगला आणि विचार करायला लावणारा आहे. सधारणतः सर्वच अंधश्रद्धा अशा टिकून असतात हे खरेच.

मला सुद्धा कोणाच्या श्रद्धांवर हल्ला करायचा नाही. कारण मी सुद्धा अंधश्रद्धच आहे अनेक बाबतीत. पण ज्या रोजच्या व्यवहारात आपल्या समजूती असतात, त्या समजा अयोग्य आहेत आणि त्याची सत्य बाजू ही कोणत्या फार गहन सिद्धांताने पटवून द्यायची नसून साध्या माहिती मध्ये दडलेली आहे असे दाखवून दिले तर आपण जास्त डोळस होवू आणि उगाच उराशी बाळगलेली ती समजूत टाकून देवू हाच या चर्चेचा उद्देश आहे.

--लिखाळ.

मला बरेच काही समजते असे मला बरेचदा वाटते हेच माझ्या असमंजसपणाचे निदर्शक आहे.

हाच तर लोच्या आहे!

आणि उगाच उराशी बाळगलेली ती समजूत टाकून देवू हाच या चर्चेचा उद्देश आहे.
"उगाच उराशी बाळगलेली" यात लोच्या आहे. आपण कोणतीच समजूत आपण उगाच उराशी बाळगत नाही! त्यात कोणतातरी 'कंफर्ट दडलेला' असतो. तो कधी स्प्ष्ट दिसतो कधी अस्प्ष्ट!
अस्प्ष्ट असतो तेंव्हा समजूत सोडणे थोडे तरी शक्य बनते. पण स्प्ष्ट असतो तेंव्हा मात्र अवघड असते असे वाटते.

अर्थात, समजूत सोडणे म्हणजे तो कंफर्ट झोन सोडणे... मग कोण कशाला सोडणार आपली जागा? त्यात एक उब असते... मला सापडली तशी चेहरा नसण्याची! 'का' असं न विचारावे लागण्याची!

जगातला कोणताही माणूस याला अपवाद नाही. अगदी अनिस चे दाभोळकरसाहेबही!
(ते सुद्धा कोणतातरी एकच बनियान चा ब्रँड वापरत असणार... हाच चांगला व टिकावू असतो अशा समजूतीने... सॉरी श्रद्धेने! ;) )

असो आपली चर्चा भरकटवत नाहीये अशी आशा! सॉरी श्रद्धा! ;))
आपला
गुंडोपंत

लोकभ्रम

मला हे वाचल्यावर 'लोकभ्रम' या पुस्तकाची आठवण झाली. आपल्यापैकी बहुतेकांनी त्याचा परिचय येथे वाचला असेलच. याच पद्धतीने झाडाच्या खोडाला असलेल्या गाठीचा गणपती होतो. स्वामी स्वरुपानंद पावस, जि. रत्नागिरि यांच्या मठातील झाडावर असा गणपती आहे. शेतकर्‍यांना बटाट्यात किंवा रताळ्यात गणपती दिसतो. त्याचे फोटो पण वर्तमानपत्रात येतात.अशी स्थानिक महात्म्य अनेक प्रकारची व ठिकठिकाणी दिसून येतात. गुंडोपंतांनी या श्रद्धेचे केलेले अचूक विश्लेषण अत्यंत मार्मिक आहे. विचार करायला लावणारे आहे.वैज्ञानिकांना 'शुक्रतारा मंद वारा' यात शुक्र हा ग्रह दिसतो, कविला तो 'तारा' किंवा ती 'चांदणी' दिसते.
प्रत्येक श्रध्दा ही अंधच आस्ते. अंधश्रद्धा म्हणणे म्हणजे पिवळा पितांबर म्हट्ल्यासरखे आहे. चिकित्सेशिवाय ठेवलेला विश्वास म्हणजे श्रद्धा. श्रद्धा ही व्यक्तिसापेक्ष समाजसापेक्ष, काळ सापेक्ष, स्थळसापेक्ष असते.विधायक की विघातक हा खरा प्रश्न आहे? मनुष्य हा काही विवेकवादाचे प्रोग्रामिन्ग केलेला जैवरासायनिक यन्त्रमानव नव्हे. श्रद्धा ही माणसाला अत्मिक बळ देते. अंधश्रद्धा निर्मूलनावर आमची श्रद्धा आहे असे देखिल म्हणता येईल. ही मांडणी मी नेहमीच करतो. गुंडोपंत हे श्रद्धा कोळून प्यालेले आहेत. ती जो पर्यंत त्यांना आत्मिक बळ देते तोपर्यंतच ते तिचा आधार घेणार. जेव्हा ती बळ देईनाशी होईल त्यावेळी ते तिला सोडून देणार.
अवांतर- गुंडोपंताचा चिकित्सेचा किडा भविष्यात पुन्हा वळवळणार हेच आमचे भाकित.
प्रकाश घाटपांडे

लै ग्वाड!

गुंडोपंतांनी या श्रद्धेचे केलेले अचूक विश्लेषण अत्यंत मार्मिक आहे. विचार करायला लावणारे आहे.

आपलं वाचून लई ग्वाड वाटलं!

गुंडोपंत हे श्रद्धा कोळून प्यालेले आहेत. ती जो पर्यंत त्यांना आत्मिक बळ देते तोपर्यंतच ते तिचा आधार घेणार. जेव्हा ती बळ देईनाशी होईल त्यावेळी ते तिला सोडून देणार.

मी ज्याला कंफर्ट झोन म्हणताय त्याला तुम्ही आत्मीक बळ म्हणताय! ओके! चालेल.
नक्कीच सोडणार... अहो गादी जुनी झाली, गोळे आले की टोचतेच, नवीन घ्यावीच लागते... तशीच श्रद्धा पण! फार काम देईनाशी झाली की बदलेली बरी! ;))

म्हणजे कधीतरी आमचे घाटपांडे साहेब, मारूती मंदिरात तेलाचा डबा घेऊन दिसू शकतील से म्हणायला जागा वाटते!

आपला
गुंडोपंत मार्मीक

निरंजन घाटे

म्हणजे कधीतरी आमचे घाटपांडे साहेब, मारूती मंदिरात तेलाचा डबा घेऊन दिसू शकतील से म्हणायला जागा वाटते!

आठ नउ वर्षां पुर्वी असेल. अंनिसच्या मिटींग मध्ये आमच्या एका कार्यकर्ता मित्राने निरंजन घाटे हे शनिपाराला तेल घेउन जाताना दिसले. त्याने लगेच मिटींगमध्ये टीकेची झोड उठवली . " निरंजन घाटे तुम्ही सुद्धा?" स्टाईलने. मग स्यूडो सायंटिस्ट, भंपक विज्ञानवादी अशी विशेषणे लावायला सुरुवात केली. थोडक्यात सगळ्यांनी त्यांना वाळीत टाकले. मी खालील मुद्दे मांडले
१) निरंजन घाटे हा ही माणूस च आहे
२) त्यांची त्या मागील भूमिका विचारुन न घेताच टीका करणे वैज्ञानिक दृष्टिकोनात बसत नाही व ते मला योग्य वाटत नाही.
३) एवढ्या एका कारणामुळे त्यांनी मराठी विज्ञान साहित्यात दिलेले योगदान लगेच विसरलात काय?
४) कुटुंबातील कुणाच्या तरी वतीने ते प्रतिनिधी या नात्याने पण आले असतील तर?
परिणामी मी निरंजन घाट्यांची वकिली करतो म्हणून मलाच वाळीत टाकायला सुरुवात केली.
अजुन एक प्रसंग अगदी अलिकडला
ग.प्र. प्रधान उर्फ प्रधान मास्तर हे साधना साप्ताहिकात लिखाण करतात. आता वयपरत्वे स्वतःचा वाडा संस्थेला दान करुन ते हडपसरला साधना ट्र्स्टच्या एका खोलीत रहायला गेले. त्यांच्या एका लेखात अज्ञेयवादाकडे झुकणारा कल आमच्या एका अंनिसच्या बुद्धिवादी मित्राला ( हल्लि आम्ही विवेकवादी शब्द वापरतो) खटकला. तो म्हणाला " प्रधान मास्तर ही तसलेच शेवटी. त्यांचा विवेकवाद डळमळीत झाला. वय झाले म्हणून काय झाले. शेवटपर्यंत कट्टर रहाणारे रॅशनालिस्ट होतेच कि काही लोक."

( विवेकवादी लेबल स्वतःला न लावणारा)
प्रकाश घाटपांडे

हा काय करतो आणी?

आमच्या एका कार्यकर्ता मित्राने
हा मित्र काय करतो आणी? तो कधी गेलाच नाही वाटतं मंदिरात? कोणत्यातरी स्वरूपात का होईना पण श्रद्ध असणारच आहे त्याचीही. अशी टीकेची झोड उठवणे खुप सोपे आहे, पण वागणे मात्र अतिशय कठीण!
इतके मोठे आव्हान पेलतांना अनेकांची फॅ फॅ उडते तिथे हा गुंड्या कोण लागून गेलाय हो!?

म्हणूनच 'ग्रह माझ्या आयुष्यावर सत्ता गाजवतात मी नाही' हे समिकरण (मला माझ्यापुरते तरी) बरे, कंफर्टेबल वाटते!
यात वेळोवेळी आलेले अपयश झाकण्याची उत्तम सोय आहे! श्रद्धा हा 'डिप्रेशन रिलिज' साठी असलेला हा एक 'सेफ्टी व्हॉल्व्ह आहे' असेही म्हणता येईल.
(शेवटचे वाक्य हा मोठाच विषय आहे...! :)) )

आपला
गुंडोपंत

पटले

श्रद्धा हा 'डिप्रेशन रिलिज' साठी असलेला हा एक 'सेफ्टी व्हॉल्व्ह आहे' असेही म्हणता येईल.

असेच पाहीजे किंवा तसेच पाहीजे पेक्षा काय् छान चालते (what works for me/us) महत्वाचे आहे. आपण नाही का म्हणतो हे काम तुच कर तु मस्त करतोस/करतेस्, मी दुसरे काहीतरी करतो/करते. अंतिम परीणाम चांगला झाला की मिळवले.

कोणाला श्रध्देमूळे, कोणाला दूसर्‍याच्या श्रध्देमूळे. अहो अंधश्रद्धा आहे म्हणून् निर्मूलनवाल्यांच कार्य आहे. ते बर्‍याच प्रमाणात योग्य, गरजेचे होते व आहे पण त्या आवेगात म्हणा किंवा अजून कशाने म्हणा ते जर का श्रद्धा पण मिटवायला उठले तर कठीण आहे. अहिंसावादी , वैयक्तिक समजूतीला जास्त प्रतिकार् करायची गरज नाही. ते उंबराचे फूल समजायचे तर समजा पण त्याला राष्ट्रीय फूलाचा दर्जा द्या म्हणालात तर मग आहे संघर्ष. लहान मुलांचे मोठी माणसे नाही का चालवून घेत तितपत ठिक्.....

हं

मला तरी ते उंबराचे फूल नसून फंगस वाटते आहे. विचारले तर तसेच सांगेन पण कोणी ते उंबराचे दुर्मीळ फूल च असा अट्टहास धरत असेल तर धरा बापू. :-)

अवांतर - एका विशीष्ट जातिचा किडा (वास्प ?? नक्की कूठला माहीत नाही) हा उंबराच्या फूलामधे, फूल अगदी प्रार्थमीक अवस्थेत असतानाच अंडी घालतो. कधी पाहीले असेल जेव्हा काही उंबराचे "फळ उघडतो तेव्हा अनेक किडे (त्याची पिल्ले)बाहेर येतात.

आपल म्हणजे ते सूटीत् लहान् मुलांना नाही का म्हणत् हे बघा घरातच, अंगणातच खेळा पण आमची झोपमोड करू नका, कोणाला काही लागून घेऊ / मारामारी करू / फोडाफाडी नका. मग तुम्हाला काय खेळायच ते खेळा. जो पर्यंत तसली अंधश्रध्दा आहे चालु द्या...

गूणदोष सगळ्यांच्यात् (अंधश्रध्दा / श्रध्दा) असतात, माणूस ओळखून त्याला "सांभाळून" घ्यायला शिकायच.

>>१. थंड खाल्ल्याने सर्दी खोकला होतो. अमेरिकेतील डॉक्टर या वाक्यावर किती अडाणी बाई आहे या नजरेने बघतात.

अमेरिकेतील डॉक्टर आहे बाई तुम्ही "अती"(किंवा जास्त प्रमाणात) हा शब्द सुरवातीला विसरलात तोच शब्द घालून म्हणा ते वाक्य, तरी नाही म्हणला तर करा "स्यू"आणी व्हा मिलियेनेर बघा.

केळे ह्या बद्दल असे ऐकले आहे की बॅलन्स करते म्हणजे खूप "होत" असेल तर कंट्रोल मधे आणते किंवा नसेल होत तर होइल असे काही तरी...खरे खोटे माहीत नाही.

वास्प आणि परागकण

सहजराव,
आपले निरिक्षण बरोबरच आहे. उंबराचे परागिभवन या वास्प (गांधिलमाश्या?) द्वारेच होते. त्या पराग कण इकडुनतिकडे नेतात आणि त्याबदल्यात स्वतःच्या पुढच्या पिढीला अन्न आणि घराची सोय त्या उंबरात करतात. अनेकदा एक् एक उंबराची जात आणि त्या वास्प ची जात ही ठराविकच असते. म्हणजे त्या दोहोंचे अस्तित्व एकमेकांवर अवलंबून असते.
--लिखाळ.

पिकलेले आणि अती पिकलेले!

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
अती पिकलेले केळे(केळी) खाल्ले तर हगवण(डायरिया) होण्याची शक्यता आहे. मात्र व्यवस्थित,प्रमाणात पिकलेले केळे खाल्ल्यास ते हगवण थांबवण्यास मदत करते.
सफरचंदाबद्दलही असेच म्हणतात(ऐकीव गोष्ट). अनुभव नाही.
तसेही भारतीय आयुर्वेद आणि पाश्चिमात्य ऍलोपाथी ह्यांचे नियम बहुदा हिंदू विरुद्ध मुसलमानात असणार्‍या प्रथांइतकेच परस्पर विरोधी असतात.

हे बाकी खरंय!

तसेही भारतीय आयुर्वेद आणि पाश्चिमात्य ऍलोपाथी ह्यांचे नियम बहुदा हिंदू विरुद्ध मुसलमानात असणार्‍या प्रथांइतकेच परस्पर विरोधी असतात.

त्यांना होमियोपॅथी ही तितकीच टोचते बरं!
मात्र मेडिकल कंपन्यांच्या रिसर्च डिपार्टमेंट्सना मात्र आयुर्वेद प्यारा असतो असे वाटते!

आपला
गुंडोपंत

आभार

प्रियाली, आवडाबाई, धनंजय, गुंडोपंत, घाटपांडे साहेब, सहज, प्रमोदकाका, आपल्या सर्वांचे सहभागासाठी आणी प्रतिसादांसाठी आभार.
आपल्यला सुद्ध काही अजून गैरसमजूती आढलेल्या असतील तर कृपया येथे मांडाव्यात ही विनंती.

-- लिखाळ.
मला बरेच काही समजते असे मला बरेचदा वाटते हेच माझ्या असमंजसपणाचे निदर्शक आहे.

उंबरावरचे भूछत्र

त्या देवळात जाणारे बहुसंख्य तथाकथित भाविक त्या फुलाचे खरे स्वरूप ओळखून असतील. त्यामुळे त्यावर चर्चा करणे निरर्थक आहे.

घरावर ठेवलेल्या पाणी साठवण्याच्या टाक्या बाहेरून काळ्या आणि आतून पांढर्‍या असतात. कारण उघड आहे, आतील पाणी उन्हाळ्यात गरम होऊ नये म्हणून. तीच टाकी आतूनही काळी असती तर पाणी उन्हाळ्यात गरम आणि हिवाळ्यात थंड मिळत असले पाहिजे. पांढ‍र्‍या शालीपेक्षा काळी शाल जास्त उबदार असते . पण मोजे जर आतून पांढरे आणि बाहेरून काळे असतील तर ते शरीरातील उष्णता बाहेर जाऊन देणार नाहीत आणि हिवाळ्यात अधिक उबदार वाटतील.--वाचक्‍नवी

एक अमेरिकेतली पद्धत

हे तुमच्या लहान सहान समजुतीत बसते की नाही माहिती नाही. पण इथे (अमेरिकेत) कोणी शिंकले तर त्याला/तिला ब्लेस यू (bless you) म्हणतात - आणि त्यावर शिंकलेल्या व्यक्तीने थँक यू म्हणण्याची पद्धत आहे! थोडीशी माहिती येथे. पूर्वीची कधीतरीची अंधश्रद्धा आता या एका उपचारात तिचे रूपांतर झाले आहे. आपले हातातले काम सोडून हे जाता येता ब्लेस यू म्हणण्याची पद्धत आधी खूपच विचित्र वाटायची, आता इतरांना त्यामुळे बरे वाटते, म्हणून मीही म्हणते!

अशी भानगड आहे तर!

ओहो आता कळले!
आमची एक मैत्रिण शिंकल्यावर अतिशय नाटकी पणे 'शतायुष्य' असे म्हणत बसायची.
मला काही कळायचे नाही. म्हणजे अगदी अगदी लहान मुलांनाही म्हणायची. मुलंच ती... दहा वेळा शिंकायची... ही पण दहा वेळा 'शतायुष्य' म्हणायची!
आता कळले की ते असे बावळटपणे केलेले भाषांतर होते...

आपला
गुंडोपंत

ब्लेस यू..

आमच्या कडे कोणी शिंकले की 'गेझुंड हाईट' म्हणतात.(म्हणजे थोडक्यात लवकर बरा हो..गुड हेल्थ या अर्थी!) आणि ज्याला गेझुंडहाईट म्हटले तो 'डांकं=धन्यवाद' म्हणतो.

लिखाळ बाबू,हा विषय मस्त आहे,
स्वाती

इथे

इटलीमध्ये शिंकल्यास सलुते म्हणतात, सलुते म्हणजे आरोग्य. यावर कधीकधी शिंकणारा/री गमतीने "से ने व्हा" असे म्हणतो/म्हणते, याचा अर्थ आरोग्य होते पण शिंकेवाटे गेले :)

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

आभार

वाचक्नवी, चित्रा, स्वातीताई, राजेंद्र, आपल्या सहभागाबद्दल आणि माहितीबद्दल आभारी आहे.

स्वास्थ्य शुभेच्छा देणे हे काही मला अंधविश्वासाच्या सदरात टाकावेसे वाटत नाही. थंड प्रदेशात अनेकांना सर्दी होताना दिसत असते त्यामुळे सर्दी-शिंक या विषयी हे लोक जास्त संवेदनशील असणे स्वाभाविक वाटते.

आपण सर्वांनी आपल्या पाहण्यात आलेल्या अशा गैरसमजूती येथे नोंदवा अशी विनंती.
--लिखाळ.
मला बरेच काही समजते असे मला बरेचदा वाटते हेच माझ्या असमंजसपणाचे निदर्शक आहे.

साप

साप या प्राण्याविषयी सुद्धा जनमानसात अनेक गैरसमज असतात. साप डुख धरतो, साप दूध पितो इत्यादी विषयी आपल्याला नागपंचमी जवळ आली वृत्तपत्रातून हे समज दूर करणारी माहिती मिळत असते.

  • सापाला तीन/चार फुटांपलिकडाचे दिसत नाही असे कुठेतरी वाचलेले स्मरते. अश्या स्थितीत तो व्यक्तीचा चेहरा पाहून लक्षात ठेवणे शक्य नाही असाही युक्तीवाद वाचलेला स्मरते.
  • सापांचे नैसर्गीक अन्न बेडुक, सरडे, पक्ष्यांची अंडी, साप इत्यादी असते. दूध हे त्याचे नैसर्गीक अन्न नाही. त्याला ते पचत सुद्धा नसावे.
  • माझ्या आसपासचा अनेकांकडून मी असे अनेकदा ऐकले आहे की बिनविषारी साप चावत नाही. हा अजून एक गैरसमज. बिनविषारी साप जसे की कवड्या, धामण, विरोळा हे चिडले की चावतात. पण त्यांच्याकडे विष नसल्याने माणसाचा जीव जात नाही. (धनुर्वाताचे इंजेक्शन घ्यावे लागते :).
  • मी सर्पतज्ञ नाही. माझ्या माहितीमध्ये त्रुटी आढळल्यास तज्ञांनी भर घालावी अथवा सुधारणा करावी ही विनंती. गैरसमजूतींची नोंद व्हावी आणि त्याचे निवारण व्हावे या हेतूने ही चर्चा सुरु केली आहे. आपला सहभाग मोलाचा आहे.
    --लिखाळ.
    मला बरेच काही समजते असे मला बरेचदा वाटते हेच माझ्या असमंजसपणाचे निदर्शक आहे.

     
    ^ वर