लोकभ्रम

right
लोकभ्रम
लोकभ्रम ले.रा.ज.गोखले.

आज चमत्कार सिद्ध करण्यासाठी भारतात अंधश्रद्धा निर्मूलन समिती सारख्या संघटनांचे वा अमेरिकेतल्या CSICOP (Commitee for scientific investigations for claims of paranormal सारख्या संघटनांचे आव्हान आज मोठ्या रक्कमांच्या बक्षीसांसह(आमिष म्हणा हवं तर) कायमस्वरुपी खुले आहे. पण यापुर्वी देखिल पुण्यात १९३० साली गूढचिकित्सामंडळ नावाने एक संस्था स्थापन झाली होती. संस्थेचा उद्देश हा कि कसलाहि चमत्कार ऐकला कि तो ख्रराच मानायचा असा जो भोळसटपणा अथवा फाजील श्रद्धाळूपणा लोकात आहे तो कमी करुन लोकांमध्ये चिकित्साबुद्धी व सावधगिरी वाढवणे. तशी माहिती १३.११.१९३० च्या केसरी मध्ये दिली होती.

पुण्यातील गूढचिकित्सामंडळ

"आजपर्यंत ज्ञानवृद्धीचा इतिहास पाहिला तर असे आढळून कि, ज्ञानाची उपपत्ती फार सावकाश होते.ज्याप्रमांणे शुद्ध धातु इतर अनेक पदार्थांबरोबर मिसळलेली असते व ती मोठ्या प्रयासाने अशुद्ध पदार्थापासून वेगळी करवी लागते त्या प्रमाणे ज्ञान अज्ञानाशी मिसळलेले असते, व ते मोठ्या प्रयत्नाने अज्ञानापासून वेगळे करावे लागते. ज्ञानाच्या या शुद्धीकरणास हजारो वर्षाचा कालावधी जावा लागतो.'कावळ्यास एक डोळा असतो.' कुंभारणीने भक्षणार्थ धरुन आणलेली आळी कुंभारणीच्या ध्यासाने कुंभारीण बनते.' 'ढगावर ढग आपटल्याने वीज निर्माण होते.' 'अध्यात्मिक किंवा मंत्राच्या सामर्थ्याने सत्पुरुष अग्नीची दाहकता नाहीशी करतात, तेव्हाच चरातील निखा-यावरुन मनुष्यास चालता येते नाहीतर चालता येत नाही.' इत्यादि शेकडो मिथ्या समज सुशिक्षित समाजामध्ये हजारो वर्षे
प्रचलीत आहेत. अज्ञान हे हानीस कारणीभूत होते. भोंदू लोक इतरांस कसे फसवतात याचे गोष्टी वर्तमानपत्रात वारंवार येतात.' ताईत' , 'कवच' इत्यादिकांचा जाहिरातींचा वर्तमानपत्रात एवढा सुळसुळाट आहे कि १९२०-२१ साली पुण्यात 'जर्मन बायांची' अथवा देवीची साथ होती, त्यावेळी बाया बोळवण्याच्या थोतांडापायी पुण्यातील मागासलेल्या लोकांचे निदान दहा वीस हजार रुपये खर्च झाले. यावरुन अज्ञानामुळे किती होते याची कल्पना होण्याजागी आहे.........."
चमत्कार सिद्ध करणा-यास त्यावेळी ५० रुपये बक्षीस हे मंडळाने ठेवले होते. मात्र ते दोन्ही बाजूने पैज या स्वरुपात होते व उभयमान्य संस्थेला देणगी या स्वरुपात होते. तशीच मंडळाची कार्यपद्धती व चमत्कारसंशोधनाच्या अटी या देखील केसरीत जाहीरपणे दिल्या होत्या. रा.ज.गोखले हे स्वतः मंडळाचे चिटणीस होते. त्या वेळेचे मान्यवर श्री.वा.म.जोशी, प्रो.वि.ब.नाईक,प्रो.व्ही.के.जोग, डॊ.दि.धो.कर्वे, श्री.कृ.म्हसकर, प्रो.जी,बी.कोल्हटकर इ. लोक मंडळाचे सन्माननीय सभासद होते.
पुस्तकात एकूण १४ प्रकरणे आहेत. पहिल्या चार प्रकरणात त्यांनी लोकभ्रम म्हणजे काय व त्याची सर्वसामान्य कारणे याचा उहापोह केला आहे. कल्पनाजन्य भ्रम, अवधानाभावजन्यभ्रम, विचार दोषजन्य अथवा अनुमानदोषजन्य भ्रम यांचे विवेचन केले आहे. अल्पानुभवामुळे उत्पन होणारे भ्रम यावर सोदाहरण टिप्प्ण्या केल्या आहेत.

right
भौमितिक

अनेक भौमितिक आकृत्याद्वारे दृष्टीभ्रमाचाही परिणामकारक उहापोह केला आहे. पौर्णिमा व अमावस्या यांचा मृत्यूसंख्येशी संबंध या बाबत त्यांनी श्री.दा.सातवळेकर यांच्या 'एकादशीचा उपवास' या पुस्तकात पुढील विधाने आहेत:- पान १० "मृत्यूंची संख्या द्वादशी पासून तृतीयेपर्यंत अधिक असते व याच तिथीला कृष्णपक्षात शुक्ल पक्षापेक्षा अधिक असते." मोठमोठ्या शहरातील मृत्युसंख्या चतुर्थीपासून एकादशीपर्यंत कमी व द्वादशी ते तृतीयेपर्यंत अधिक असते." हा लेख १९२८ सालातील होता. यावर लेखकाने १९२७ सालचे पुणे व मुंबई म्युन्सिपालटीचे रजिस्टर बघून वर्षभरातील या तिथींच्या मृत्युसंख्येचे संपूर्ण कोष्टकच छापले आहे.(खरं तर तोंडावर फेकले आहे) त्याची संख्याशास्त्रीय दृष्ट्या सरासरी काढून या भ्रमाचे निराकरण केले आहे.(अगदी युयुत्सू ष्टाईल)

right
कोष्टक

लेखक स्वतः शिक्षक असल्याने अशा प्रकारचे अनेक भ्रम त्यांनी 'हा सूर्य हा जयद्रथ' अशा प्रकारे फोड करुन दाखवले आहेत. भावनेचे परिणाम म्हणून निर्माण झालेले भ्रम, औषधोपयांविषयीचे भ्रम असे अनेक प्रकारचे भ्रम मानसशास्त्रीय पद्धतीने मांडले आहेत. ही सर्व मांडणी असंख्य मनोरंजक किस्से व चर्चा याद्वारे केली असल्याने वाचताना आपण एखाद्या गप्पांच्या मैफीलीतच बसलो आहोत कि काय? असे वाटते. अगदी खुर्द बुद्रुक पासून ते इंग्लंड अमेरिके पर्यंत, प्राचीन संस्कृत ग्रंथांपासून ते अर्वाचीन आंग्ल ग्रंथापर्यंत उदंड संदर्भासहित जागोजगी अवतरणे दिली आहेत हे या पुस्तकाचे प्रमुख वैशिष्ट्य. भूत पिशाच्च इत्यादिकांचे अस्तित्व व त्यासंबंधी चमत्कार, भानामती,भूतांचे अंगात येणे, अंगात आलेल्या माणसाची अद्भुत कृत्ये,मृतात्म्यांचे फोटो,मृतात्म्याशी संभाषण, लिंगदेहाचे अस्तित्व, (प.वि.वर्तकांची आठवण येते) परामानसशास्त्र, इत्यादि गोष्टींचा उहापोह केला आहे. लबाडी व हातचलाखी वापरुन केले जाणारे चमत्कार, चिट्ठीतील प्रश्न ओळखणे, पोटात शाळिग्राम ठेवणारे साधू, ताईत, कवच, मंतरलेला दोरा, अंगारा, त्रिकालदर्शी आरसा, स्फटिक अंगठी, विविध प्रकारची यंत्रे, अदभूत तेले. अंजन, भूत भविष्य जाणणारे, स्वप्न, सर्पविषयक समजुती, या सर्व बाबींचा भंडाफोड माहिती द्वारे केला आहे.लबाडांचा अथवा अंधश्रद्धांचा आधार संदिग्धता हाच असतो.ज्या भोंदूने संधी साधून हातचलाखीने सोने दुप्पट क्ररुन दाखवले आहे, तो चाणाक्ष माणसापुढे दंभस्फोट होण्याचा प्रसंग आला कि तो टाळण्यासाठी काय
सबबी सांगेल.१) आज दिवस चांगला नाही.२) ती वनस्पती आज खात्रीची मिळाली नाही,३) आज तब्येत ठीक नाही,४) काल विटाळशीचा शब्द ऐकल्याने सिद्धी गेली; ५) हा चमत्कार पुर्वी विशेष कारणास्तव करुन दाखवला, पण ते कारण आता राहिले नाही म्हणून आम्ही तो करुन दाखवू इच्छित नाही. ६) तो करण्यास आमच्या गुरुची परवानगी नाही.इ...
मृतात्म्यांचे भूलोकी आगमन होते व ते प्लॆंचेट वगैरे साधनांनी आपले विचार प्रकट करतात असे जे प्रतिपादन करतात त्यांना लेखकाने मृतागमनवादी अशी संज्ञा वापरली आहे. त्या काळात लोकमान्य टिळकांचा आत्मा प्लॆंचेटवर येतो अशी वदंता होती. त्यावेळी मध्यस्थास जर खाल्डियन भाषा वा उच्च गणित येत नसेल, तर त्या भाषेसंबंधाने वा उच्चगणितासंबंधाने विचारलेल्या अवघड प्रश्नास उत्तर मिळत नाहीच पण अगदी साध्या प्रश्नासही यथार्थ उत्तर मिळत नाही. असे केसरी ऒफीसात श्री ऋषी यांनी केलेल्या प्रयोगात दिसून आल्याचा संदर्भ ( १०.७.१९३४ च्या केसरीतील श्री न.चिं.केळकर यांचा लेख) लेखक देतो.खुळचट समजुती, कालबाह्य परंपरा, चिकित्सक दृष्टीचा अभाव यांचा खरपूस समाचार घेणारे हे खरे अंधश्रद्धा निर्मूलनाचेच पुस्तक आहे. शेवटच्या प्रकरणातील भ्रमांचा संकीर्ण संग्रह पाहिला कि अद्याप कायद्याच्या प्रतिक्षेत असलेल्या महाराष्ट्रातल्या जादूटोणा विरोधी विधेयकाची आठवण येते. १९३५ सालानंतर पुस्तकाची आवृत्ती कुणीच काढली नाही.त्या मुळे ते उपेक्षीत राहिले. असं हे दुर्मिळ पुस्तक काळाच्या पडद्याआड जाउ नये म्हणून या ग्रंथ परिचयाचा खटाटोप.

लेखक:- रा.ज.गोखले बी.ए.

पृष्ठे- ( ३१ अधिक २०१ )

मुद्रक व प्रकाशक - गणेश काशिनाथ गोखले, मालक श्रीगणेश प्रिंटिंग वर्क्स, ४९५-४९६ शनवार पेठ पुणे २

किंमत - १ रुपया

सन १९३५

Comments

सुंदर पुस्तक परिचय

घाटपांडे काका -

अगदीच नवीन आणि कौतुकास्पद माहिती मिळाली. मूळ पुस्तक संग्रही बाळगायला आवडेल.

आपले अनेक आभार.

(चिकित्सक) एकलव्य

पुस्तक परिचय आवडला.

अनेक गोष्टींची इतकी उत्सुकता वाटली की लेख अधिक मोठा हवा होता असे वाटले.

भूत पिशाच्च इत्यादिकांचे अस्तित्व व त्यासंबंधी चमत्कार, भानामती,भूतांचे अंगात येणे, अंगात आलेल्या माणसाची अद्भुत कृत्ये,मृतात्म्यांचे फोटो,मृतात्म्याशी संभाषण, लिंगदेहाचे अस्तित्व, (प.वि.वर्तकांची आठवण येते) परामानसशास्त्र

वा!वा!हे आमचे आवडीचे विषय. यावर अंनिसच्या नजरेतून अधिक विस्तृत लिखाण करणे शक्य असेल तर करावे.

अमेरिकन लोकांचा या विषयांवर कोण विश्वास.... दोन/ तीन वाहिन्या त्याला समर्पित आहेत. प्रांजळपणे सांगायचे झाले तर मी स्वतः या गोष्टी खर्‍या की खोट्या हे ठरवू शकत नाही.

उत्सुकता

अनेक गोष्टींची इतकी उत्सुकता वाटली की लेख अधिक मोठा हवा होता असे वाटले.

मलाही तसच वाटत. पण थोडक्यात व सुटसुटीत देणे सोयिस्कर. आणि उत्सुकता ताणायला नको का?
प्रकाश घाटपांडे

याचा आदी पुरूष

पुस्तक मस्त दिसतेयं! मला वाटते या सर्व (अंधश्रद्धा निर्मुलन, गुढचिकीत्सामंडळ आदींचा) आदी -पुरूष म्हणजे ज्याला सामान्य शब्दात बाप माणूस म्हणता येईल तो म्हणजे, ज्याला हिंदू संस्कृतीत एक दर्शनकार म्हणले आहे तो - चार्वाक ! चार्वाक म्हणे मंदीराच्या बाहेर वगैरे उभा राहून लोकांना सांगायचा की हे सारे थोतांड आहे वगैरे.

थोडे अवांतर पण, - त्याचे दर्शन अथवा निती ही सुसंस्कृतच होती पण रिलीजन या अर्थाने धर्म न मांडणारी होती. पण त्याचे प्रसिद्ध वाक्य/श्लोक मात्र मजेशीर आहे:

यावत् जीवेत् सुखम् जीवेत् ऋणम् कृत्वा घृतं पिबेत - (जो पर्यंत जीवन आहे तो पर्यंत मजा करा, कर्ज काढून तुप खा!)
भस्मै भूतश्च देहश्च, पुनरागमनंच कुतः (देहाचे शेवटी भस्मच होणार आहे, इथे - भूतलावर - कोण परत येतयं!)

चार्वाक

हा श्लोक असा नाही असे मनोगतावर यापूर्वी कोणीतरी सांगितले होते. तो मिळाला तर येथे टाकते. म्हटले तर खरेच वाटते चार्वाकाचे.

तार्वाक

संत तात्याबा मला आजचे तार्वाक सॉरी, चार्वाक वाटतात!
(म्हणून तर आपल्याला आवडतात... आणी ते इथुन जायला लागले तर गोधळ घालतो! ;) )

पण आवडले! एकुण चार्वाक भारी माणूस असला पाहिजे! आपल्याला तं लै आवडेल त्याचे काही असेल इथे वाचायला तर!
तेंव्हा विकास राव, जमलं तर एक मस्त लेख लिहा बॉ चार्वाकाच्या आयुष्यावर!

आपला
(त्वरीत कर्ज काढायला निघालेला ;) )
गुंडोपंत

लिहायला आवडेल पण...

धन्यवाद

अजून मी माहीती शोधत आहे. विकीवरचा लेख त्यांनाच पूर्ण नीट वाटत नाही आहे.

विकास

विकिवर

विकिवर लिहिलेली माहिती अपूर्ण आहे. त्यात जो श्लोक दिला आहे तो मी मनोगतावर मागे एकदा उद्धृत केला होता. तेव्हा विचक्षण नावाच्या एका मनोगतींनी तो सुधारून त्याचा अर्थ किंचित वेगळा काढून दिला होता. मनोगतावरील चर्चा आता गुगल ग्रुपमध्ये गेल्याने मला तो मिळाला नाही. :( परंतु त्या श्लोकाने त्याचे तत्वज्ञान अधिक पटण्याजोगे ठरते.

तार्ताक

तार्वाक न्हाई व्हं! तार्ताक.

- राजीव.

म्या खेडुताचा फ्यान हाय.

ओक्के!

ओक्के राजीव साहेब !!!

संत तार्ताक तत्वाचा विजय असो!

आपला
गुंडोपंत
(तात्याबांनी

माहीत नाही..

हा श्लोक असा नाही असे मनोगतावर यापूर्वी कोणीतरी सांगितले होते.

मला या श्लोकाची सत्यासत्यता माहीत नाही. पण नक्कीच करून घ्यायला आवडेल कारण चार्वाकाचे (त्याला कसे तरीही दर्शनकार म्हणले असे) कौतुक करणारे कायम हा श्लोक सांगतात...

विकास

आदि नाही

चार्वाक या अंधश्रद्धा निर्मुलकांचा आदिपुरुष म्हणता येईल असे वाटत नाही. त्याच्या आधीपासूनच परंपरेला आव्हान देणारी परंपरा अस्तित्वात होती याची दर्शने सापडावीत.

चार्वाक हा नास्तिकवादाचा बाप नक्कीच म्हणता येईल... पण कोणी आजोबांचा अवतार झालेला नसेलच याचीही खात्री नाही.

(दार्शनिक) एकलव्य

कदाचीत

त्याच्या आधीपासूनच परंपरेला आव्हान देणारी परंपरा अस्तित्वात होती याची दर्शने सापडावीत.

आपल्याला माहीती असल्यास अवश्य लिहावे मला जाणून घेण्याची नक्कीच उत्सुकता आहे.

चार्वाक दर्शन

चार्वाक दर्शन हे आ.ह.साळुंखे यांचे पुस्तक चांगले आहे, याव्यतिरिक्त चार्वाकावर अन्य लोकांची पण पुस्तके आहेत.
साधना मिडिया सेंटर शनिवार पेठ पोलिस चौकी समोर पुणे फोन नं ०२० २४४५९६३५ येथे व्यवस्थापक श्री माटे याम्चेकडे विषयवार सर्व यादी आहे.

प्रकाश घाटपांडे

ग्रेट!!

माहीती बद्दल धन्यवाद. मी या विषयावरचे पुस्तक शोधीतच होतो. नक्कीच ते आता मिळवीन.

विकास

परिचय आवडला

चिट्ठीतील प्रश्न ओळखणे, पोटात शाळिग्राम ठेवणारे साधू, ताईत, कवच, मंतरलेला दोरा, अंगारा, त्रिकालदर्शी आरसा, स्फटिक अंगठी, विविध प्रकारची यंत्रे, अदभूत तेले. अंजन, भूत भविष्य जाणणारे, स्वप्न, सर्पविषयक समजुती, या सर्व बाबींचा भंडाफोड माहिती द्वारे केला आहे.

घाटपांडेकाका, या विषयावर अधिक लेख वाचायला आवडतील.
पौगंडावस्थेत असताना वशीकरण, इंद्रजाल वगैरेशी संबंधित पुस्तके यष्टीष्ट्यांडवर विकत घेऊन वाचली होती. त्यांची आठवण झाली. :))

असेच!

पौगंडावस्थेत असताना वशीकरण, इंद्रजाल वगैरेशी संबंधित पुस्तके यष्टीष्ट्यांडवर विकत घेऊन वाचली होती. त्यांची आठवण झाली. :))

अगदी असेच!!!

पण पौगंडावस्था संपली का रे तुझी?
माझी तर आहे बॉ अजूनपण! ;)
आपला
गुंडोपंत

सुंदर

सुंदर परिचय. फक्त एकच शंका...
'ढगावर ढग आपटल्याने वीज निर्माण होते.' हा मिथ्या समज कसा काय बुवा?
सन्जोप राव

बरोबर

विजांचे बरेच प्रकार आहेत. त्यात दोन ढगांमध्ये कडाडणारी वीजही आहे. अगदी आपटले नाही तरी जवळ येतात तेव्हा धन आणि ऋण अधिभारामुळे वरच्यावर वीजा कडाडतात.

अभिजित

सुंदर पुस्तक परिचय

घाटपांडे साहेब,
पुस्तक परिचय उत्तम करुन दिला आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चार्वाक

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.विकास यांनी दिलेला चार्वाकाचा गणला जातो तो श्लोक आणि त्याचा मथितार्थ (मतितार्थ नव्हे) माझ्या माहिती प्रमाणे बरोबर आहे. संस्कृत सुभाषितात काही लेखन दोष राहिले आहेत ते सोडा. शुद्ध सुवचन असे आहे:

यावत्जीवेत् सुखं जीवेत् ऋणं कृत्वा घृतं पिबेत् |
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम् कुतः ||

हे सुवचन चार्वाकाचे मानले जाते. त्याला आद्य बुद्धिप्रामाण्यवादी मानता येईल असे वाटले. लोकायत तत्त्वज्ञान त्यानेच प्रथम मांडले असे म्हणतात.

धन्यवाद

शुद्धीकरणाबद्दल धन्यवाद. मी तो आठवणीतून लिहीला असल्याने चुका झाल्या..

लोकभ्रम

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी|
***********************************
या पुस्तकाचा परिचय श्री. प्रकाश घाटपांडे यांनी उत्तम प्रकारे करून दिलाच आहे. त्या पुस्तका विषयी आणखी थोडे.
पुण्याच्या वरदा प्रकाशनाचे श्री. ह.अ.भावे यांना जुनी महत्त्वाची पुस्तके गोळा करण्याचा छंद आहे. त्यांतील काही ते पुनर्प्रकाशित करतात.त्यांना 'लोकभ्रम ' हे पुस्तक फूटपाथ वर मिळाले. त्याची जुनी भाषा बदलावी, काही काटछाट करावी,त्यात काही नवीन माहिती घालावी,थोडक्यात म्हणजे त्याचे पुनर्लेखन करावे म्हणून त्यानी ते पुस्तक माझ्याकडे दिले.मी पहिल्या चार प्रकरणाचे पुनर्लेखन केले. पुढे काही अन्य कामामुळे मला विलंब होऊ लागला म्हणून दोन महिन्यांपूर्वीच ते पुस्तक त्यांना परत दिले. आजच त्याना त्या पुस्तका विषयी विचारले असता "आहे तसेच अथवा पुनर्लेखन करून लौकरच प्रसिद्ध करुया" असे म्हणाले.

 
^ वर