नि:संख्यता (निरक्षरतेच्यासारखा नवीन शब्द) आणि आरोग्य

आज एक व्याख्यान (का परिसंवाद) ऐकले त्यावरून ही चर्चा टाकावीशी वाटली. डॉ. Mary Margaret Huizinga या बोलल्या. "निरक्षरते"सारखे (illiteracy) संख्यांच्या ज्ञानाबाबत जाण नसणे = नि:संख्य (innumeracy), यामुळे त्यांच्या मधुमेहाच्या रुग्णांना होत असलेला त्रास, हा विषय. काहीकाही सुशिक्षित लोकही आकड्यांना नीट समजून घेत नाहीत - हा प्रकार निरक्षरतेपेक्षा वेगळा.

त्यांचा अभ्यास प्रकल्प मोठा होता, पण कधीकधी बारीकसारीक उदाहरणे लक्षात राहातात, त्यापैकी हे - रुग्णांना देण्याच्या पुस्तिकेतून काही वाक्ये आपल्या रुग्णांना नीट समजतात की नाही, याची चाचणी त्यांनी केली (पूर्ण चाचणी येथे) : उदा -

तुमच्या रक्तातील ग्लुकोजचे सुयोग्य प्रमाण ६० आणि १२० यांच्या मध्ये असावे. पुढीलपैकी कोणते आकडे यांच्या दरम्यान आहेत (त्यांच्याभोवती पेनने खुणा करा)? ५५, १४५, ११८

आश्चर्य म्हणजे २५% लोकांनी चुकीची उत्तरे दिली - यात सुशिक्षित लोकही होते. (सगळे मिळून किती रुग्ण होते, वगैरे लक्षात नाही, पण शे-दोनशे तरी होते. सर्वच साक्षर/शाळा शिकलेले होते.) ज्यांना आकडे समजत नव्हते त्यांच्यात पुढे औषधांनी मधुमेहावर नियंत्रण मिळवण्याचे प्रमाण कमी होते.

श्रोत्यांत चर्चा अशी झाली : (१) मधुमेह झालेल्या लोकांना खूप काळजी असते, वैद्य त्यांना बरीच काय काय माहिती धोधो देत असतात. तशात सोप्या सूचना सुद्धा कठिण वाटण्याची शक्यता आहे (२) इथे आपल्याला रुग्णाचा अपमान करायचा नाही, तर त्याला बरे व्हायची मदत करायची आहे. ग्लुकोजचे सुयोग्य प्रमाण [आणि अशी कितीतरी आकडेवार माहिती असते, वरील दुवा बघा] वेगळ्या प्रकारे सांगता येईल का? (३) शालेय शिक्षणात खूप लोके गणिताचा बाऊ करून आकडे समजण्यास स्वतःला असमर्थ समजतात. असे होऊ नये. (४) रुग्णाला उपचारात सर्वाधिक स्वाधीनता दिली पाहिजे - आपल्यावर वैद्य जुलूम करतो आहे असे वाटले तर त्या नाजुक परिस्थितीत चालायचे नाही. त्यामुळे ते आकडे म्हणजे काहीतरी अजब तांत्रिक प्रकार नसून, आपल्याला ते नीट समजून आपण स्वायत्तपणे उपचार अंगीकारतो आहोत, असे रुग्णाला मनापासून पटले पाहिजे.

तुम्हाला काय वाटते - (१) डॉक्टरांनी रुग्णाकडे आकडेफेक (!) कशी करावी, आणि (२) शालेय शिक्षणात आकड्यांची भीती काही लोकांना बसते, ती कमी कशी करावी?

लेखनविषय: दुवे:

Comments

नि:संख्यता.

उत्तम, वेगळा लेख/प्रस्ताव. नि:संख्यतेच्या (एखाद्या आकड्यावरुन त्यात अभिप्रेत असणारी माहिती ग्रहण करणे, या अर्थी) प्रश्नाचा डॉक्टर-रुग्ण यांतील आकडेफेक हा केवळ एक भाग असावा. त्याशिवाय खेळांतील सरासरी, वेगवेगळ्या अहवालांतील निष्कर्ष यांच्यातून खरी माहिती वेचून काढायची असेल तर त्या संख्येतील खरा अर्थ काय हे जाणणं महत्त्वाचं. शालेय शिक्षणात बसणारी आकड्यांची भीती हे एक कारण असू शकेल, पण दुसरे महत्त्वाचे म्हणजे बौद्धिक आळस किंवा कॅल्क्युलेटरसारख्या यंत्रांवर वाजवीपेक्षा जास्त अवलंबून राहणे. दुसऱ्या बाबतीत शिक्षणाचा संबंध येत नसावा. अपूर्वाईमध्ये पु.लं. नी जेव्हा आण्यांचे नवीन पैशांत रुपांतर झाले तेव्हा अशिक्षित भाजीवालीचे आणि सुशिक्षितांचे उदाहरण दिले आहे. शिकलेल्या लोकांचा बऱ्याचदा घोळ व्हायचा, पण भाजीवालीची रोजची कमाई या रुपांतरावर अवलंबून असल्याने तिला ते आत्मसात करायला फारसा वेळ लागला नाही.

हा कदाचित पुरेशा माहितीअभावी घाईघाईने काढलेला निष्कर्ष वाटेल कदाचित, पण मला वाटतं नि:संख्यतेचा प्रश्न भारतात कमी प्रमाणात असावा. अमेरिकेतली सारे काही सोपे करुन सांगायची प्रवृत्ती असेल किंवा शालेय शिक्षणात आकडेमोडीकडे विशेष लक्ष न देणे असेल, पण एक उदाहरण म्हणून सांगायचा मोह आवरत नाही. मुंबईच्या लोकल ट्रेनचे तिकीट काढताना जर मोजून ६ रुपये नसतील, तर ११ किंवा २१ रुपये देणे हा सर्वमान्य नियम आहे (किंवा वाण्याचे बिल समजा २७ रुपये झाले तर ३२ देणे वगैरे...). इकडे ३.७७ डॉलर्स बिल झाले आणि तुम्ही एक क्वार्टर मिळेल या आशेने (नाण्यांतला, पिण्यातला नव्हे :)) ४.०२ पुढे सरकवलेत, तर प्रथम एक प्रश्नचिन्ह चेहऱ्यावर उमटते. मग जादा २ सेंटस परत केले जातात आणि मशीनने दाखवलेले २३ सेंटस मोजून परत येतात. (सरसकट नाही, पण बऱ्याचदा येणारा अनुभव.) [विषयांतर वाटल्यास क्षमस्व.]

सहमत/ असहमत

शालेय शिक्षणात बसणारी आकड्यांची भीती हे एक कारण असू शकेल, पण दुसरे महत्त्वाचे म्हणजे बौद्धिक आळस किंवा कॅल्क्युलेटरसारख्या यंत्रांवर वाजवीपेक्षा जास्त अवलंबून राहणे.

याच्याशी सहमत.

मुंबईच्या लोकल ट्रेनचे तिकीट काढताना जर मोजून ६ रुपये नसतील, तर ११ किंवा २१ रुपये देणे हा सर्वमान्य नियम आहे (किंवा वाण्याचे बिल समजा २७ रुपये झाले तर ३२ देणे वगैरे...). इकडे ३.७७ डॉलर्स बिल झाले आणि तुम्ही एक क्वार्टर मिळेल या आशेने (नाण्यांतला, पिण्यातला नव्हे :)) ४.०२ पुढे सरकवलेत, तर प्रथम एक प्रश्नचिन्ह चेहऱ्यावर उमटते.

याच्याशी थोडी असहमती.या गोष्टीची जाणीव मलाही सर्वप्रथम येथे आल्यावर झाली होती. कालांतराने लक्षात आले की या देशात सुट्ट्या पैशांचा प्रश्न भारता इतका बिकट नसावा. आपल्याकडे ही सर्वमान्य पद्धत अशाने पडली की सुट्टे पैसे (एक्झॅक्ट चेंज) दिले नाही तर तुम्हाला काय ऐकून घ्यावे लागेल देवास ठाऊक!! आणि ११ च्या ऐवजी १० दिले तरीही आपल्यालाच ऐकून घ्यावे लागते, चार रु.साठी सुट्टे नसले कॅशियरकडे तर.

तुमच्याकडे सुट्टे सेंट/ डॉ. नसतील तर येथील कॅशीयर तुम्हाला हाकलून दिल्याच्या आविर्भावात येत नाही तर चटकन वळून सहकार्‍यांकडे सुट्ट्यांची मागणी करतो. त्यांना ४.०२ डॉ. कशासाठी पुढे सरकवले याचा अंदाज पटकन का यावा?

परंतु भावात बदल झाले किंवा मांडणीत बदल झाले तर ते गोंधळून जातात हे लक्षात येते. याला कदाचित अति-यांत्रिकीकरण कारणीभूत असावे.

हा हा

इकडे ३.७७ डॉलर्स बिल झाले आणि तुम्ही एक क्वार्टर मिळेल या आशेने (नाण्यांतला, पिण्यातला नव्हे :))
हाहाहा... चिअर्स!
सन्जोप राव

चांगला विषय!

धनंजय,
विषयाची निवड आवडली आणि त्याचा लोकांच्या आरोग्याशी जवळून संबंध असल्याने बर्‍याच लोकांना (जास्त) रूचेल असे वाटते.. (व्याकरणाचे लेखही आधी लिहील्याप्रमाणे हळूहळू वाचते आहे!).

आता तुम्ही जे दोन प्रश्न विचारताय - (१) डॉक्टरांनी रुग्णाकडे आकडेफेक (!) कशी करावी, आणि (२) शालेय शिक्षणात आकड्यांची भीती काही लोकांना बसते, ती कमी कशी करावी? - इथे साती ताई डॉक्टर आहेत, त्या यावर जास्त सांगू शकतील. पण माझे आपले दोन शब्द!

माझ्या मते मुख्य असे आहे, की आकड्यांपेक्षा डॉक्टर रूग्णाशी कसा बोलतो याला महत्त्व आहे - आकडेफेक तर करूच नये त्यानेच तो भुईसपाट व्हायचा.. अर्थात एखादा रूग्ण जर शिकलेला, समजशक्ती असलेला दिसला तर त्याला आकडे जरूर सांगावेत आणि ते कसे कमी/जास्त काय करायची गरज आहे, कसे करता येईल हेही सांगावे. (एखादा सुशिक्षित/समजदार रूग्ण भेटूनही हे अनेक डॉक्टर करत असताना दिसत नाहीत) पण जर रूग्ण किंवा त्याचे नातेवाईक हे अशिक्षित दिसले तर आकड्यांपेक्षा काय झाले आहे, त्याला कसे आटोक्यात आणायचे किंवा संधी/ शक्यता हे नीट समजून सांगावे.

शिक्षणात याला differentiated education / instruction असे म्हणतात. म्हणजे कोणतीही दोन मुले एकासारखी एक नसतात (एखाद्याला एकादा विषय पटकन समजतो तर दुसर्‍याला काही वेगळे प्रश्न आहेत) हे गृहित धरून त्यांना दोघांनाही न्याय देत विषयाचा मूळ गाभा समजावून सांगणे. हेच मोठ्या लोकांनाही लागू होते असे वाटते. कमी वेळात खूप माहिती देणे /दोन लोकांना सारख्याच प्रकारे एखादी गोष्ट सांगणे यापेक्षा प्रत्येक वेळी थोडी पचेल एवढीच माहिती दिली / ती समजायला विविध पर्याय (तक्ते, चित्रे, आकृती, मॉडेल्स) उपलब्ध करून दिले तर त्याचा जास्त परिणाम दिसेल.

तुम्ही दिलेला दुवा पाहिला. पण प्रयत्न स्तुत्य असला तरी ती प्रश्नमालिका रूग्णाला त्याच्या पुढे असलेल्या पर्यायांचा विचार करायला लावण्यापेक्षा math (गणित)कितपत येते आहे त्याची परीक्षा वाटली. रूग्णाला सिरींज किती भरावी, किती गोळ्या मार्च अमूक ते मे तमूक लागतील हे कागदावर मांडण्याची जरी अक्कल नसली तरी जर असे सांगितले की रोज काटेकोरपणे इतक्या गोळ्या घेतल्याच पाहिजेत किंवा सिरींज या खूण केलेल्या ठिकाणापर्यंतच भरली पाहिजे नाहीतर त्याचे परिणाम असे असे होतील तर ते समजून घेण्याची शक्ती बर्‍याच लोकांना असते. माझ्या मते ज्यांना अशा भाषेतही कळत नाही किंवा कळूनही वळत ते "आकडे"/"आकडेमोड" कळत नाहीत म्हणून नव्हे तर आरोग्याबद्दल अज्ञान आणि अनास्था असते म्हणून.

निष्काळजीपणा

आश्चर्य म्हणजे २५% लोकांनी चुकीची उत्तरे दिली - यात सुशिक्षित लोकही होते. (सगळे मिळून किती रुग्ण होते, वगैरे लक्षात नाही, पण शे-दोनशे तरी होते. सर्वच साक्षर/शाळा शिकलेले होते.) ज्यांना आकडे समजत नव्हते त्यांच्यात पुढे औषधांनी मधुमेहावर नियंत्रण मिळवण्याचे प्रमाण कमी होते.

मला वाटते याला नि:संख्यतेपेक्षा निष्काळजीपणा कारणीभूत असावा. भारतातही (केवळ सुशिक्षित वर्गात) अशी चाचणी घेतली तर ७५% पेक्षा अधिक लोक योग्य उत्तरे देतील असे वाटत नाही. मधुमेहावर नियंत्रण न ठेवता येणे हे ही निष्काळजीपणाचेच द्योतक वाटते.

चाचणी परीक्षा पाहिली. त्याबाबत चित्राताईंशी सहमत. मला वाटते येथे सवयीचा प्रश्नही आहे म्हणजे सुरुवातीला गफलत झाली नंतर अंगवळणी पडले असेही होत असावे.

मधुमेहींना आपले जगणे काटेकोरपणे जगावे लागते जे व्यावहारिक दृष्ट्या बरेचदा अशक्य होऊन जाते. त्यावेळी डॉक्टर आपल्यावर जुलूम करत आहेत अशी भावना मनात निर्माण होणे आणि त्यावर बंडखोरी भावना निर्माण होऊन निष्काळजीपणाकडे वृत्ती झुकणे शक्य वाटते.

(१) डॉक्टरांनी रुग्णाकडे आकडेफेक (!) कशी करावी

मला वाटते की रुग्णांना तक्ते बनवून देणे, त्यात त्यांना नियमीतपणे आकडे/ अनुमाने भरायला लावणे. नुसते आकडे दाखवण्यापेक्षा ग्राफ किंवा इतर चित्रमय दाखले देणे हा एक उपाय ठरू शकेल.

चांगले मुद्दे - ती गणिताची परीक्षाच होती!

तुमचे मुद्दे छान आहेत.

ती प्रश्नमालिका रूग्णाला त्याच्या पुढे असलेल्या पर्यायांचा विचार करायला लावण्यापेक्षा math (गणित)कितपत येते आहे त्याची परीक्षा वाटली.

एक स्पष्टीकरण : बरोबर आहे. ती गणिताची परीक्षाच होती. ती संशोधनासाठी म्हणून - रोजच्या रुग्णापुढे ठेवायची नाही! पण उदाहरणे (चाचणी प्रश्न सोडले तर) आजकाल रुग्णांना देतात त्या पुस्तकांतले होते.

पेशंटला रोजवापरासाठी द्यायची पुस्तिका अशी (दुवा) काहीशी असते.

चाचणी परीक्षेच्या बाबतीत संशोधक काही रुग्णांकडे गेले असणार आणि म्हणाले असणार :
"तुम्हाला जी रोजवापरासाठी माहितीपुस्तिका डॉक्टर देणार आहेत तिच्यात खूप आकडेवारी आहे. ती वापरात आणण्यासाठी तुम्हाला कधीकधी गणित करावे लागेल. तसल्या प्रकारचे गणित करणे आपल्या पेशंटना जमते की नाही हे आम्हाला कळावे म्हणून हे सर्वेक्षण आहे. त्यासाठी थोड्या पेशंटना आम्ही गणिताची परीक्षा घालणार आहोत. ही तुमची वैयक्तिक परीक्षा नसून माहितीपुस्तिकेची परीक्षा आहे. तसेच हे वैयक्तिक नसले, तरी सर्व पेशंटचे मिळून सर्वेक्षण आहे. तुमच्या सहभागाने पुढच्या पेशंटना कशा रीतीने माहिती द्यावी याबद्दल आम्हाला मार्गदर्शन मिळेल." अशाच कुठल्याशा शब्दांत पूर्ण सत्य सांगून, पूर्ण परवानगीनिशी काही पेशंटना ही चाचणी दिली असणार. पेशंटची वैयक्तिक उत्तरपत्रिका गोपनीय राहाणार हे आलेच.

हे मी सामान्य संशोधन-नैतिकतेविषयीच्या कायद्यावरून सांगतो आहे - मी त्यांची पेशंट-रिक्रूटमेंटची स्क्रिप्ट बघितलेली नाही! ही स्क्रिप्ट ८वी शिकलेल्या प्रौढाला कळली पाहिजे इतपत सोप्या इंग्रजीत/स्पॅनिश (पेशंटच्या भाषे)मध्ये असावी असे आमच्या विद्यापीठात मार्गदर्शक तत्त्व आहे.

स्पष्टीकरणाबद्दल

आभार. तुम्ही म्हणता तशाच प्रकारे गोपनीयता वगैरे ठेवून पूर्वचाचण्या केल्या जातात. परंतु तुमच्या स्पष्टीकरणावरून बहुतेक संशोधकबाईंना साधारण काय सिद्ध करायचे आहे त्याचा अंदाज आला. काम उपयुक्त होऊ शकते.

सीडीसी चा दुवा माहितीप्रद आहे.

परीक्षेचे टेन्शन?

मलापण आधी प्रियालीताई म्हणाल्याप्रमाणे निष्काळजीपणा कारणीभूत वाटला पण तुमच्या स्पष्टीकरणाने अजून एक मुद्दा वाटतो की अचानक घेतलेल्या परीक्षेचे टेन्शन तर नसेल? तुम्ही शिक्षक तुम्हाला जास्त माहीती असेल की एखादा विद्यार्थी तुमच्यामते त्याला समजले आहे पण दिसून येते की पेपरमधे गडबड केली आहे. काय् म्हणता?

आकडे आणि आजार.

पतंजलींच्या व्याकरण महाभाष्यात "शब्द म्हणजे काय? हे जसे सांगीतले आहे तसे इथे 'आकडे,डॉक्टर,रुग्ण,गणित, हे वेगवेगळ्या रंगसंगतीने दाखविले असते तर ही चर्चा समजून घेणे अधिक सोपे झाले असते. ;) बाय द वे डॉक्टरांनी रुग्णांना कोणताही आजार ज्यांना समजून सांगीतल्यावर ज्यांच्या मनस्थितीवर कोणताही परिणाम होणार नाही अशा रुग्णांनी तक्ते जरुर करावे तसेच डॉक्टरांनी धो धो माहिती देऊ नये असे वाटते आणि शालेय शिक्षणात गणित हा अवघड विषय आहे,असे बिंबविल्यामुळे आयुष्यभर तो त्या विषयाला जरा डचकूनच राहतो तेव्हा तो विषयही इतर विषयाप्रमाणे सोपा आहे,असे सांगीतले पाहिजे.

अवांतर;) वाहन चालक रहदारी चे नियम आणि पोलिसांचे योगदान या विषयावर डॉक्टरांची मते असा एक चर्चेला विषय टाकावा म्हणतो ? :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दोन शक्यता


आश्चर्य म्हणजे २५% लोकांनी चुकीची उत्तरे दिली - यात सुशिक्षित लोकही होते.

२५ % ही आकडेवारी नक्कीच काळजी करण्याजोगी आहे.. पण असे का झाले असेल ह्याच्या २ शक्यता इथे मांडत आहे-

१. त्यात सुशिक्षित लोकही होते ह्याचा अर्थ अशिक्षित लोकही होते का? तसे असल्यास २५% मध्ये त्यांचा सहभाग किती? कारण अशिशिक्षीत (निरक्षर) लोकांना आकडे ओळखता येणे कठीण आहे आणि त्यामुळे उत्तर चुकण्याची दाट शक्यता आहे

२. अश्या प्रकारच्या प्रकल्पासाठी उमेदवार मिळवण्यासाठी बर्‍याचदा लोकांना काही किरकोळ लालुच दाखवली जाते (जसे की ५-१० डॉलर्सचे गिफ्ट कार्ड) आणि त्यामुळे सहभागी होणार्‍यांमध्ये नेहेमी एक विशिष्ठ गट असा असतो की ज्यांना फक्त हे बक्षिस मिळवून पोबारा करायचा असतो आणि त्यामुळे सदर व्यक्ति प्रश्न निट न वाचताच काहीही उत्तरे भरुन बक्षिस घेउन पसार होतात.

तसेच

३. मुद्दामून चुकीची उत्तरे देणारे ;-)

तसेच

४. डॉक्टराने सर्व सर्व्हे कंपाउडरला सांगून अर्ध्या तासात अंदाजे तक्ते करणे.

नाही

ह्या क्षेत्रातील इथल्या थोड्या अनुभवावरुन सांगतो असे काही घडले असण्याची शक्यता संभवत नाही.

निरक्षर नव्हते

१. त्यात सुशिक्षित लोकही होते ह्याचा अर्थ अशिक्षित लोकही होते का? तसे असल्यास २५% मध्ये त्यांचा सहभाग किती? कारण अशिशिक्षीत (निरक्षर) लोकांना आकडे ओळखता येणे कठीण आहे आणि त्यामुळे उत्तर चुकण्याची दाट शक्यता आहे

निरक्षर लोक नव्हते. सुशिक्षित म्हणजे काही लोक पदवीधर वगैरे सुद्धा होते.

२. अश्या प्रकारच्या प्रकल्पासाठी उमेदवार मिळवण्यासाठी बर्‍याचदा लोकांना काही किरकोळ लालुच दाखवली जाते (जसे की ५-१० डॉलर्सचे गिफ्ट कार्ड) आणि त्यामुळे सहभागी होणार्‍यांमध्ये नेहेमी एक विशिष्ठ गट असा असतो की ज्यांना फक्त हे बक्षिस मिळवून पोबारा करायचा असतो आणि त्यामुळे सदर व्यक्ति प्रश्न निट न वाचताच काहीही उत्तरे भरुन बक्षिस घेउन पसार होतात.

हे लोक सर्व त्या ठिकाणी मधुमेहाचा इलाज करण्यासाठी आले होते. पैसे दिले नसते तरी त्या ठिकाणी त्यांना यायचे होते. शिवाय तशीच माहितीपुस्तिका त्यांना खरोखर स्वतःच्या आजारासाठी वापरायची होती. त्यामुळे या प्रकारात त्यांना रस असण्याची शक्यता होती. तरी डॉक्टरच्या ऑफिसचा कंटाळा येऊन घरी जायची घाई झाली असेल, ही शक्यता आहेच.

टेन्शन

हा प्रकार असू शकतो. डॉ. हुइझिन्गांच्या या अभ्यासाचा रिपोर्ट अजून छापून आलेला नाही. त्यामुळे सगळे तपशील शोधून सांगता येणार नाही. पण ज्या अर्थी उत्तरे कमी आलेले लोकांचा मधुमेह पुढे ताब्यात येत नाही, त्याचा असा अर्थ लावू शकतो की जे डॉक्टरच्या ऑफिसात आकडेमोडीचे टेन्शन घेतात ते मग घरी जाऊनही टेन्शन घेत असावेत. "पांढर्‍या कोटाचे हायब्लडप्रेशर" म्हणून म्हणतात त्याची आठवण येते. काही लोकांचा रक्तदाब डॉक्टर किंवा नर्स समोर राहून मोजत असले तर वाढते. स्वयंचलित यंत्राने मोजले तर नॉर्मल असते. अशा लोकांचे काय करावे, असा प्रश्न पूर्वी पडत असे. पण "पांढर्‍या कोटाचे हायब्लडप्रेशर" असलेल्या लोकांना पुष्कळदा काही वर्षांत पूर्णकाळचे हायब्लडप्रेशर होते. म्हणजे थोडेसे टेन्शन झाले की रक्तदाब वाढायची प्रवृत्ती ही पुढे नेहमीच रक्तदाब वाढू शकेल याचे द्योतक असेल. तसेच गणित करायच्या टेन्शन बद्दल असू शकेल.
दुसर्‍या एका हॉस्पिटलमधल्या डॉ. मोन्तोरी यांचा असाच एक लेख छपून प्रसिद्ध झालेला आहे. उद्या ग्रंथालयात सापडला तर त्यातील चाचणीविषयी तपशील दिलेले आहेत का ते बघतो.
तिथे त्यांना असे दिसले की मधुमेहाच्या रुग्णांपैकी (सर्व साक्षरतेच्या दृष्टीने ठीक) १०%ना घरी वापरायला दिलेल्या ग्लुकोज-मापक यंत्रातील आकडे समजण्यास त्रास झाला, आणि ४०% लोकांना रोजच्या (बदलत्या) जेवणानंतर किती इन्सुलिन घ्यायचे तो आकडा तक्त्यातून शोधून काढणे जमले नाही.

मेकॉलेची शिक्षणपद्धती

मलाएका कनेडियन गृहस्थांनी विचारले होते, की भारतातील मुले गणितात इतकी हुशार का? माझे उत्तर होते, भारतात अजूनही थोड्याफार प्रमाणात सुरू असलेली मेकॉलेची शिक्षणपद्धती. पाढे पाठ असल्याने आणि वजाबाकी करताना छोट्या आकड्यात मिळवायचा आकडा बोटाने मोजून शोधायची आपली पद्धत, अचूक उत्तर कमी श्रमात मिळवते. भारतातील कॉन्व्हेन्टची मुले ५ मधून ६ वजा करायचे असतील तर , अगोदर पाचामागे एक लिहितात आणि मग पंधरा, चौदा , तेरा असे करीत नऊपर्यंत येतात. मराठी माध्यमातला विद्यार्थी पाचापुढे बोटावर मोजायला सुरुवात करतो आणि पंधरा आले की उत्तर बोटांकडे पाहून ठरवतो. याच शिक्षणपद्धतीने आपल्याला भांडारकरांसारखे भाषापंडित, गोखले, टिळक, सावरकर, गांधींसारखे देशभक्त आणि र.पु. पराजपे, नारळीकर पितापुत्र आणि रामानुजमसारखे गणिती दिले. उच्च शिक्षणाकरिता कदाचित नसेल पण मूलभूत प्राथमिक अंकगणितासाठी हीच पद्धत चांगली. अभंग, श्लोक, व ओव्यांसारखी लोकगीते यांच्या पाठांतरांनी सुधारलेली स्मरणशक्ती आयुष्यभर उपयोगी पडते.

मात्र एक. सध्याच्या भारतीयाला तुमच्या त्या तसल्या वैद्यकीय परिपत्रकातली भाषा समजली तरच तो आपली गणिती चमक दाखवेल. सामान्यच काय पण अनेक शिकलेले मधुमेही असली पत्रके मुळीच वाचणार नाहीत आणि वाचली तर त्यातील अनेकांना त्यातून फारच थोडा बोध होईल.--वाचक्‍नवी

 
^ वर