उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
गो ना दातारशास्त्री आणि इतर रम्यकथाकार.
द्वारकानाथ
September 11, 2007 - 2:17 pm
आपल्या आयुष्यात काही क्षण असे येतात आणि आपले आयुष्य बदललेले असते. लहानपणी कधीतरी "शालिवाहन शक" असे पुस्तक वाचण्यात आले आणि त्याचा प्रभाव मला आजही माझ्यामनावर जाणवतो.
नंतर माझ्या माहितीत आले की या कांदबरीचे लेखक श्री. गो ना दातारशास्त्री या नावाचे जवळपास १०० वर्षापुर्वी झालेले आहे.
त्यांनी जवळपास १६ कांदबर्या लिहलेल्या आहेत. त्यातही वेगळेपण म्हणजे या कथा रुपातंरित असुन त्यांना पूर्णपणे मराठी साज चढवलेला आहे. कथा कोणत्या कांदबरीतून घेतल्या आहेत याचाही स्पष्ट उल्लेख आहे.
पुण्याचा वरदा प्रकाशनाने त्याचे प्रकाशन केलेले असुन मी जेंव्हा हे सर्व खंड विकत घेतले तेंव्हा एकूण ३०० लोकांनी हे खंड विकत घेतलेले आहे असे वरदाच्या मालकाकडून कळाले.
दुवे:
Comments
तर मग पुढे?
>>लहानपणी कधीतरी "शालिवाहन शक" असे पुस्तक वाचण्यात आले आणि त्याचा प्रभाव मला आजही माझ्यामनावर जाणवतो.
तो कसा? असे नेमके काय होते त्या पुस्तकात?
>>त्यांनी जवळपास १६ कांदबर्या लिहलेल्या आहेत. त्यातही वेगळेपण म्हणजे या कथा रुपातंरित असुन त्यांना पूर्णपणे मराठी साज चढवलेला आहे. कथा कोणत्या कांदबरीतून घेतल्या आहेत याचाही स्पष्ट उल्लेख आहे.
कोणत्या कादंबरीतून? पुस्तके विनोदी आहेत का? चर्चाप्रस्तावाचा विषय विनोद/ मनोरंजन असा आढळला.
>>पुण्याचा वरदा प्रकाशनाने त्याचे प्रकाशन केलेले असुन मी जेंव्हा हे सर्व खंड विकत घेतले तेंव्हा एकूण ३०० लोकांनी हे खंड विकत घेतलेले आहे असे वरदाच्या मालकाकडून कळाले.
कदाचित त्या ३०० पैकी एकही या उपक्रमावर नसला तर येथील लोकांसाठी चर्चाकाराने अधिक माहिती पुरवायला नको का? चर्चेत काय अपेक्षित आहे ते कळत नाही.
चर्चाकाराने सविस्तर माहिती लिहावी.
-राजीव.
प्रभाव.
<>लहानपणी कधीतरी "शालिवाहन शक" असे पुस्तक वाचण्यात आले आणि त्याचा प्रभाव मला आजही माझ्यामनावर जाणवतो.
तो कसा? असे नेमके काय होते त्या पुस्तकात?
आपल्या मनाच्या खोलवर किंवा गाभार्यात काही अतर्क्य, अगम्य आणि गूढ असणारे काहीतरी सदैव चालू असतेच. जेंव्हा आपण काही तरी असे आगळेवेगळे वाचतो ते मनाला साद घालत असते.
यात गोपालक नावाचे एक पात्र आहे. कथा २००० वर्षापूर्वीच्या शालिवाहन आणि शकांच्या संघर्षाच्या पार्श्वभुमीवर आहे. गोपालक हा शालिवाहनाच्या बाजुकडुन असतो. शकांचा विजय होत असतो. त्यावेळेस हा गोपालक सर्वसामान्य प्रजेमध्ये मिसळत असतो आणि प्रजेच्या अडीअडचणीमध्ये भाग घेत असतो. त्याचे हे व्यक्तिमत्व मला बरेच आवडले असावे. सध्या मराठीभाषेच्या संदर्भात मी विचार करत असतो तेंव्हा अश्याच प्रकारे मी काम करावे अशी कोठेतरी सुप्त इच्छा असावी.
मी इतक्या निरस पद्धतीने लिहले असल्याकारणे ते व्यक्तिमत्व कसे आहे हे प्रत्यक्ष कादंबरी वाचल्या खेरीज लक्षात येणे अवघड आहे. ( दातार आणि कलंत्रीतील मर्यादा हीच ती असावी.....)
वरदा बुक्स
प्रकाश घाटपांडे
अजून काही माहीती?
दुर्मिळ साहित्य प्रकाशित करणारा अवलिया श्री. ह.अ.भावे
अशा व्यक्तीच्या छायाचित्रासमवेत अजून काही माहीती असल्यास वाचायला आवडेल. येथे अथवा वेगळ्या लेखात.
कालिकामूर्ती
विषय चांगला असला तरी दुर्दैवाने द्वारकानाथांनी विशेष माहिती दिली नाही. असो.
अशा परिस्थितीत मला जी तुटपुंजी माहिती आहे ती येथे देऊ इच्छितो.
साधारणपणे ज्याला अव्वल इंग्रजी म्हणतात त्या काळात, म्हणजे इंग्रज राजवटीच्या सुरुवातीच्या काळात आपल्याकडे इंग्रजी पुस्तके वाचून त्यांची भाषांतरे व्हायला लागली होती, त्यापैकीच गो. ना. दातार यांच्या कादंबर्या.
इंग्रजीतील वॉल्टर् स्कॉट्, विल्की कॉलिन्स् वगैरे लेखकांच्या ऐतिहासिक रहस्यमय कादंबर्या लोकप्रिय होत्या. त्यांचीच भाषांतरे दातार यांनी केली. अर्थात् ती आपल्याकडेही लोकप्रिय झालीच.
"घोड्यावरून दौडत येणारा काळ्या कपड्यातील रहस्यमय पुरुष", अमावास्येची रात्र, दुष्ट व कपटकारस्थानी सरदार, तलवारीची द्वंद्वयुद्धे, सुंदर पण अज्ञात तरुणीवर आलेला दुर्धर प्रसंग व कथानायकाने तिची केलेली सुटका, अंधारकोठडीतून निघून एकदम किल्ल्यामध्ये बाहेर पडणारा भुयारी मार्ग, "आपला कथानायक या संकटात सापडला असताना तिकडे कालिकेच्या मंदिरात कोणते रहस्यमय प्रकार चाललेले होते ते पाहू."अशी टिपिकल् वाक्ये असा सगळा मालमसाला दातारांच्या कादंबर्यांत मिळत असे. माझ्या लहानपणी मुलांचा, कदाचित् मोठ्यांचाही, मोठा वाचकवर्ग दातारांना लाभला होता. त्यांच्या "कालिकामूर्ती "या कादंबरीतील तीक्ष्ण काटेरी बाहूंनी मिठी मारून हाल हाल करून ठार मारणार्या मूर्तीची तर आम्हाला फार भीती वाटायची.
पुढे पुष्कळ वर्षांनी ६० च्या दशकात दुसरे एक शशी भागवत नावाचे जबरदस्त लेखक आले त्यांनी याच प्रकारच्या पण नव्या झळाळीच्या जोरदार कादंबर्या लिहिल्या. त्यातील "मर्मभेद" नावाची द्विखंडात्मक कादंबरी मला अतिशय आवडली होती . त्यात त्यांनी ऐयार ही निंजाच्या जवळपास जाणारी संकल्पना माडली होती ती अजूनही चांगली आठवते
अशा प्रकारच्या कादंबर्या आवडीने वाचणारा एक विशिष्ट वाचकवर्ग असतो (त्यात मीही आलो). इतरांना, विशेषतः प्रगल्भ व उच्च अभिरुचीच्या वाचकांना बहुधा या कादबर्या आवडणार नाहीत असे वाटते. साहित्याच्या इतिहासातदेखील यांची कितपत नोंद राहील देव जाणे पण माझ्यासारख्या सामान्य वाचकाच्या जीवनात तरी या व अशा पुस्तकांनी रस आणला हे निश्चित.
- दिगम्भा
वीरधवल/ तीन शिलेदार
सही! नाथमाधवांचे वीरधवल वाचल्याचे आठवते. त्यात अशीच वाक्य असत.
अलेक्झांडर डु/दुमास (फ्रेंच उच्चार वेगळा असावा?) च्या थ्री मस्केटिर्सच मराठी भाषांतर तीन शिलेदार म्हणून कोणी केले ते आठवते का? लहानपणी ते मला अतिशय आवडायचे.
द्यूमाँ
अलेक्झांडर डु/दुमास (फ्रेंच उच्चार वेगळा असावा?)
द्यूमाँ असावा.
बरोबर! फ्रेंच उच्चार
द्यूमाँच असावा, कारण फ्रेंच शेवटचा s सायलेंट ठेवतात. जसे लुई.
लगे हाथ, Athos, Porthos, Aramis and D'Artagnan यांचे ही योग्य फ्रेंच उच्चार सांगता येतील का कोणाला?
लंगडा प्रयत्न
अख्रथॉ, पॉख्रथॉ, अख्रामी, दख्रान्तान्
ख्र (ख+र)चा उच्चार अरेबिक 'खा'लिद सारखा.
तिथे शेवटचा स च नव्हे बरीच व्यंजने गाळतात असे दिसते. बोकू beaucoup (बक्कळ) उदाहरणे असावीत.
फ्रेन्च मध्ये ह व र नाही म्हणे.. हर हर महादेव!!
प्रकाटाआ
प्रकाटाआ अवांतर
बरीच व्यंजने
बरीच म्हणजे पी, एस, टी, डी व एक्स. यांचा शब्दाच्या अखेरीस उच्चार कधीच केला जात नाही.
भलतेच विषयांतर झाले आहे. भाषा शिकण्याविषयी वेगळे उपक्रम असावेत ना?
अवांतरः पिन्क पॅन्थर 'गूद वन' आहे. स्टीव्ह मार्टीनच्या ऍम्ब्रोगर खासच.
वी माँसिअ! (?)
बरोबर! मूळाक्षरांनुसार बरेचसे उच्चार होत नाहीत असेही वाटते. किंवा फ्रेंच पद्धतीच वेगळी असावे. (Oui=वी)
अगदी!! आणि स्टीव मार्टीनचे नाकातले सर्व उच्चार मजेशीर. तसेही जीन रेनो असणार्या जवळ जवळ सर्व चित्रपटांत फ्रेंच उच्चार सापडतातच.
असो. उच्चारांसाठी त्याला आणि धनंजय यांना धन्यवाद!
शिलेदारांची नावे
आ-तो
पोह्-तो/पोर्तो (ह् आणि र् च्या मध्यंतरीचा एक वेगळाच उच्चार)
आह्रा-मि
दाह्-ता-न्याँ/दार्-ता-न्याँ (ह् आणि र् च्या मध्यंतरीचा एक वेगळाच उच्चार)
*(ह् आणि र् च्या मध्यंतरीचा एक वेगळाच उच्चार)* हा बहुतेक बिगर-फ्रेंच लोकांना खूपच गमतीदार वाटतो - "पिंक पँथर"चे चित्रपट कोणी बघितले असतील, त्यात फ्रंच उच्चारांची मस्त टर उडवलेली आहे.
दु-मा आणि द्यु-मा याचा मध्ये पडणारा उच्चार मुळात. मराठीत पैकी कुठलाही वापरू!
चर्चा
वरील काही प्रतिसादात चालेली चर्चा २ दिवसात फाडफाड फ्रेन्च वगैरे चर्चासत्रात चपखल बसली असती.
अभिजित...
कोंबडी पळाली गाण्यावर नाचलं की भरपूर व्यायाम होतो.
सहमत
या विषयीचे माझे अवांतर प्रतिसाद संपादक मंडळाने काढून टाकल्यास मी आभार मानेन. हा प्रकार खरडीत लिहायला हवा होता. क्षमस्व.
दुजोरा
धनंजय यांनी जास्तीत जास्त बरोबर उच्चार दिले आहेत. त्यांचा फ्रेंचचा चांगला अभ्यास दिसतो.
ज हा ज व श यांच्या मध्ये पडतो.
ऑ असा उच्चार फ्रेंचमध्ये बहुतकरून नसतो, सगळ्या ओ चा उच्चार ओ च होतो.
आँ किंवा अँ हा उच्चार बरेच वेळा आं मध्ये जातो.
र हा लॅटिनिक् भाषांत "ट्रिल्ड्" असतो. पण इटालियन्/स्पॅनिश/पोर्तुगीजमध्ये तो जिभेच्या टोकाने ट्रिल् करतात तर फ्रेंचमध्ये पडजिभेने. ख सारखा वाटतो खरा, पण त्याचा ह किंवा ख होऊ न देतादेखील र चा बरोबर उच्चार करता येतो. प्र, ब्र, ग्र, इ. मात्र पहिल्यांदा ऐकणार्याला चक्रावून टाकतात. यू चा उच्चार जर्मनच्या यू उम्लाउट् सारखा म्हणजे तोंडाचा ऊ असा आकार करून इ म्हणणे या पद्धतीने होतो. तसेच ईयू च्या उच्चाराचे (मराठीत जवळजवळ अ) जर्मन ओ उम्लाउट्शी साम्य आहे (तोंडाचा ओ असा आकार करून ए म्हणणे).
- दिगम्भा
बहुधा उषा साधले
जरी रॉबिन हूड् चे भाषांतर भा.रा. भागवतांनी केले तरी "तीन शिलेदार"च्या वेळी ते कुठे गेले होते कोण जाणे. तेव्हा उषा साधले यांनी चान्स मारला. "वीस वर्षांनंतर" सुद्धा बहुधा त्यांचेच.
त्यांना भागवतांएवढे चांगले सोडाच पण एकूणच फ्रेंचचे ज्ञान यथातथाच असावे. त्यामुळे डार्टा, ऑथा, पार्था, बॉन्सिअ असे तद्दन चुकीचे उच्चार आमच्या तोंडात बसले.
नंतर आम्ही ज्याला "जीन" समजायचो, त्याचा भा.रां नी "जाँ" असा जवळजवळ बरोबर उच्चार लिहिला तरी आमचा त्यावर विश्वास बसायला कठीण गेला.
मग प्रत्यक्ष फ्रेंच शिकताना हे साधलेबाईंनी शिकवलेले उच्चार विसरून पुढे जावे लागले.
तरी नशीब, तोपर्यंत द्युमाची पुस्तके इंग्रजीतून वाचली नव्हती नाहीतर डी'आर्टाग्नॅन्, ऍथॉस्, पोर्थॉस् वगैरे आणखी एक चुकीचा सेट् तोंडात बसून हालत आणखी खराब झाली असती.
- दिगम्भा
बहुधा उषा साधले
प्रतिसाद चुकून भलतीकडे गेला आहे कृपया येथे
पहावा.
- दिगम्भा
सहमत.
"विषय चांगला असला तरी दुर्दैवाने द्वारकानाथांनी विशेष माहिती दिली नाही. "
सहमत आहे.
अद्भूतरम्यकथाकारांची मला माहित असलेली परंपरा अशी असावी. दातारशास्त्री -> ह ना आपटे -> नाथमाधव -> शशी भागवत.
दातारशास्त्रींची पकड जबरदस्त अशीच होती. एकदा कादंबरी हातात घेतली की संपवल्याशिवाय स्वस्थ बसवत नसे.
कोणाला या कांदबर्या वाचायच्या असल्यास माझ्याशी संपर्क साधावा.
"विशेषतः प्रगल्भ व उच्च अभिरुचीच्या वाचकांना बहुधा या कादबर्या आवडणार नाहीत असे वाटते. साहित्याच्या इतिहासातदेखील यांची कितपत नोंद राहील देव जाणे पण माझ्यासारख्या सामान्य वाचकाच्या जीवनात तरी या व अशा पुस्तकांनी रस आणला हे निश्चित."
आजही ३०० लोकांपेक्षा लोकांनी विकत घेऊन वाचाव्यात यावरुन साहित्यमुल्याची किंमत लक्षात येऊ शकते. वि. वा. शिरवाडकर, कॉम्रेड डांगे यासारखे वाचक या कादंबर्यांना मिळाले यावरून यांचे महत्वही लक्षात यावयास हवे.
मराठी भाषेच्या दालनात या कथांचे महत्व डावळून चालणार नाही.
परंपरा एक दुरुस्ती.
हरिभाऊंच्या आसपास जे कादंबरीकार झाले त्यांचे किंवा नाथमाधवांचे समवयस्क,त्यात काशीताई कानिटकर,धनुर्धारी,गो.ना.दातार,प्रभाकर भसे,बा.स.गडकरी.वि.वा.हडप,वा.ग.लिमये यांच्या संबंधी आमच्या या पीढीतील मराठीचे थोडेफार जाणकार असे म्हणतात( यांच्यातल्या एकाच्याही कादंब-या आम्ही वाचलेल्या नाही) केवळ संखेने अधिक कादंब-या लिहिणारे हे कादंबरीकार होते.या कादंब-यांचे विषय नितीपर,मनोरंजक,प्रेमविषयक असे होते.या लेखकांनी वाचकांची अभिरुची पाहून कादंब-याची निर्मिती केली की वाचकांची अभिरुची बनवली असा प्रश्न विचारल्या जातो इतकाच काय तो - दिगम्भा म्हणतात तसे साहित्य इतिहासातील नोंद.
शशी भागवत
वरील चर्चेतून फ्रेंचचे तांदूळ निवडून मूळ विषयाचे खडे चाळले तर शशी भागवत हे एक दुर्लक्षित नाव दिसते. शशी भागवतांची तीन पुस्तके मी वाचली आहेत. रक्तरेखा, रत्नप्रतिमा आणि मर्मभेद. तीनही उत्तम. ऐयार, तडिताघात, गवाक्ष, सहस्त्ररश्मी , मेदिनी अशा अनेक शब्दांचा त्यांनीच परिचय करुन दिला. त्यांचे पुनःप्रहार हे पुस्तक प्रसिद्ध होण्याआधीच त्यांचे निधन झाले असे ऐकून आहे.
सन्जोप राव
ऐयार!
मला वाटते ऐयार हा शब्द, नव्हे त्याहीपेक्षा त्यामागची संकल्पना, शशी भागवतांनीच बनवली असावी.
यापूर्वीच्या लेखनात एखाद्या ठिकाणी हा शब्द वाचलेला आहे. पण तिथे त्याचा अर्थ फक्त लबाड धूर्त माणूस यापलीकडे काही खास नव्हता. मराठ्यांना मोगल किंवा अन्य मुस्लिम सताधीश ऐयार म्हणत असावेत असे काहीतरी आठवते आहे.
पण शशी भागवत यांनी "ऐयार" हा शब्द ज्या प्रकारे वापरला त्याने त्याला दसपट श्रीमंती आली. मी लिहून द्यायला तयार आहे की ज्याने "मर्मभेद" वाचली तो हा शब्द जन्मभर विसरू शकणार नाही.
ऐयार हा असा माणूस की ज्याला समाजात कोणी वेगळा ओळखू शकणार नाही, जो सहजपणे कुठलेही रूप घेऊ बदलू शकतो, जो सर्वशस्त्रविद्याप्रवीण आहे, त्याच्या हाती कुठलीही वस्तू शस्त्र बनू शकते, जो कुठेही घुसू शकतो - ज्याला कोणीही अडवू शकत नाही, जो अत्यंत चतुर बुद्धिमान आहेच पण तसे आहे याचा सुगावा कुणालाही लागणार नाही, जो काही क्षणात अनेक सैनिकांना निष्प्रभ करू शकतो, याला वयाचे लिंगाचे बंधन नाही -स्त्री किंवा पुरुष, तरुण किंवा वृद्ध कोणीही असू शकतो, ज्याचे नुसते नाव घेतले की लोकांच्या मनात भय निर्माण होते.
जणू काही निन्जाच, पण कॉपी नव्हे - निन्जा हा शब्द लोकांना माहीत होण्याच्या (तो शब्द प्रथम आला बहुधा आयन फ्लेमिंग यांच्या "यू ओन्ली लिव्ह ट्वाइस्" मध्ये) कितितरी वर्षे आधी आमच्या मनात अवतरलेला. आणि जपानीपणाचा वासही नसलेला.
शशी भागवतांनी घडवलेला हा ऐयार त्यांनी एखाद्या तरबेज ऐयाराच्या सफाईने व प्रभावीपणे आपल्या कादंबरीत कसा वापरला याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी रसिकांनी स्वतःच "मर्मभेद" वाचावे.
- दिगम्भा
सहमत.
दिगम्भा यांनी अतिशय अचूक असे ऐयारांचे वर्णन केले आहे. त्यात अजून एक गुण असायला हवा होता की ऐयारांची स्वामीनिष्ठा. ऐयार कोणाही इतर व्यक्तिचे रुप घेऊ शकत असे पण आपल्या स्वामीचे रुप घेत नसे. प्रसंगी आपला प्राणनाचे त्याग करण्याची त्याची इच्छा आणि तयारी असे. सर्वसाधारणपणे हिंसा त्याला वर्ज्य असावी लागे. प्रत्येक ऐयाराला आपला एक शिष्य बनवावा लागे.
सध्या ही सर्व पुस्तके बाजारात उपलब्ध नाही. वरदाच्या भावे साहेबांना मी विनंती केली होती की दातारांच्याच प्रमाणे ही सर्व पुस्तके परत प्रकाशित करावीत.
मी मर्मभेदची बरीच पारायणे केली आहेत आणि कादंबरीच्या कथानकाप्रमाणे हसत आणि रडत असे इतका याचा प्रभाव त्यावेळी माझ्यावर होता.
शशी भागवतांचे दर्शन मिळाले नाही याचा खेद माझ्या मनात सदैव राहील.
ऐयार् हा नवीन नाहिये
ऐयार हा शब्द फक्त शशी भागवतांच्याच् मर्मभेदात् नाही आलेला
ऐय्यार् हा देवकीनंदन खत्री यांच्या चंद्रकांता मधे आधी मी वाचला मग् शशी भागवतांची मर्मभेद वाचनात आली.
ऐय्यार् कोणाची देणगी हा वादाचा मुद्दा बाजूला ठेवला तरी शशी भागवतांची मर्मभेद केवळच् अद्वितीयच् आहे व त्यातील ऐयारांची करामात् केवळ् अद्वितीय आहे यात् दुमत् नाही...
अवांतरः हे पुस्तक विक्रिसाठी भारतात् कुठे उपलब्ध आहे काय्? आवडेल हे पुस्तक संग्रही ठेवायला :)
\
वा....
शशी भागवतांचे लोकांना स्मरण आहे, एवढेच नव्हे तर त्यांच्या लिखाणाचा दिगम्भा आणि द्वारकानाथांसारख्या जाणकार वाचकांचा अभ्यास आहे, हे वाचून बरे वाटले. आता त्यांनीच भागवतांच्या कादंबरीवर रसग्रहणात्मक काही लिहावे.
सन्जोप राव
रक्तरेखा
रक्तरेखाचे कथानक म्हणजे 'ओमेन'. हा निव्वळ योगायोग असणार नाही. यामागचे गूढ काय असावे? रक्तरेखाचा उपसंहार म्हणजे 'विंटेज भागवत'.
सन्जोप राव