मध्यम ते दीर्घ मुदतीची गुंतवणूक..

आमच्या काही देशीविदेशी मित्रांच्या आग्रहाखातर आमचे मौनव्रत सोडून हे लेखन आम्ही येथे करत आहोत. हे वाचून आमच्या मराठी बांधवाना चार पैसे मिळाले तर त्याचा आम्हास मनापासून आनंदच होईल! :)

डिल्क्लेमर : -

१) येथे उल्लेख केलेल्या कंपन्यांचे समभाग आमच्या संग्रही आहेत व त्यात आमचा आर्थिक स्वार्थ गुंतलेला आहे.

२) वाचकांनी मान्यताप्राप्त विद्यापिठाच्या सर्टिफाईड फायनशियल एनॅलिस्टच्या सल्ल्याने गुंतवणूक करावी.

३) या लेखातील सल्ल्यानुसार केल्या गेलेल्या गुंतवणुकीतून होणार्‍या फायद्याकरता अथवा तोट्याकरता उपक्रम या संकेतस्थळाचे चालक/मालक/प्रशासन तसेच तात्या अभ्यंकर हे कुठल्याही प्रकारे जबाबदार असणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी!

राम राम मंडळी,

निरनिराळ्या कंपन्यांच्या समभागाचा अभ्यास करणे, त्यातील गुंतवणूक योग्य समभाग शोधून काढणे हा आमच्या व्यवसायाचा एक भाग आहे. अलिकडेच केल्या गेलेल्या आमच्या अभ्यासानुसार आम्हाला खालील समभाग मध्यम ते दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीकरता योग्य वाटत आहेत त्याची माहिती आम्ही येथे देत आहोत. किंमत गुणोत्तर प्रमाण, गेल्या त्रैमासिकातील तसेच गेल्या वर्षातील निव्वळ नफा, प्रति समभाग उत्पन्न, डिव्हिडंड इत्यादी सर्वच निकषात खालील समभाग चांगल्या प्रकारे उतरत आहेत असे आमच्या निदर्शनास आले आहे.

1) Seshasayee Paper, CMP Rs 177 per share
2) Siyaram Silk, CMP Rs 116 per share
3) SRF CMP Rs 141 per share
4) Cheviot, CMP Rs 233 per share

(CMP = Current Market Price)

वरील सर्व समभाग CMP च्या भावात (दोनचार रुपये अलिकडे पलिकडे चालेल) खरेदी केल्यास येत्या वर्षभरात किमान २५ ते ३० % परतावा मिळू शकेल असे वाटते! :)

कळावे,

आपला,
तात्या अभ्यंकर,
दलालस्ट्रीट, मुंबई - २३.

लेखनविषय: दुवे:

Comments

अरे वा

टीप दिलीत तात्या.

मध्यम ते दीर्ध म्हणालात तात्या म्हणजे नेमका कालावधी तर सांगा हो.

शेवटचे वाक्य लक्षात ठेवून (येत्या वर्षभरात किमान २५ ते ३० % परतावा) किमान एका वर्षाची म्हणायचे आहे का?

ढोबळमानाने आम्हाला मध्यम म्हणजे ३ ते ५ वर्ष व दीर्घ म्हणजे ५ पेक्षा जास्त असा समज आहे.

अगदी तात्यांवर श्रद्धा ठेवून जरी कोणी डोळे झाकून घेणार असेल तरी कंबरडे मोडणार नाही इतपतच गुंतवणूक करा असा पण चौथा मुद्दा लिहा तात्या तुमच्या डिल्क्लेमर मधे ;-)

बाकी सर्वांचे भले होवो!!

लेवाणू अने भूल जावाणू...

मध्यम ते दीर्ध म्हणालात तात्या म्हणजे नेमका कालावधी तर सांगा हो.

साधारण एक वर्षभर तरी पकडा!

शेवटचे वाक्य लक्षात ठेवून (येत्या वर्षभरात किमान २५ ते ३० % परतावा) किमान एका वर्षाची म्हणायचे आहे का?

हो, शक्यतो वर्षाच्या आतच असा अंदाज आहे. अर्थात, वर्षापेक्षा जास्त कालावधीही लागू शकतो. परंतु माझ्यामते इथे कालावधीपेक्षा 'value buying' हे तत्व अधिक विचारात घ्यायला हवे. 'किंमत/उत्पन्न गुणोत्तर (P/E ratio)' हे तत्व विचारात घेतल्यास आपल्याला वरील कंपन्या सध्या 'value buying' च्या पातळीला आहेत हे लक्षात यावे.

'value buying' या गोड इंग्रजी नावाला आमच्या बाजाराच्या भाषेत 'अच्छा माल सस्तेके भावमे लेके चुपचाप बैठ जाओ' असं म्हणतात! :)

अगदी तात्यांवर श्रद्धा ठेवून जरी कोणी डोळे झाकून घेणार असेल तरी कंबरडे मोडणार नाही इतपतच गुंतवणूक करा असा पण चौथा मुद्दा लिहा तात्या तुमच्या डिल्क्लेमर मधे ;-)

बाजाराच्या बाबतीत तात्यावरच काय, पण कुणावरही श्रद्धा ठेवून चालत नाही. हा सगळा पैशांचा खेळ आहे आणि ज्याच्याकडे होल्डिंग कपॅसिटी आहे त्यानेच यात उतरावे. नाहीतर पोष्ट ऑफिस, बँकांची एफडीज, पीपीएफ हे प्रकार आहेतच! :)

आपला,
('लेवाणू अने भूल जावाणू' या तत्वावर श्रद्धा असलेला!) तात्या.

टिप ...

साठी धन्यवाद.

रिलायन्स एनर्जी बद्दल काय सांगू शकाल?

अजून एक..

Visaka Industries, CMP Rs 84.

आमच्या मार्केटच्या भाषेत सांगायचं तर 'माल लेके बैठ जाओ. अच्छा भाव मिलेगा!' :)

तात्या.

--

शेअरबाजार हे सट्ट्याचे किंवा स्पेक्युलेशनचे माध्यम नसून एक चांगला परतावा देणारे गुंतवणुकीचे साधन आहे अशी आमची श्रद्धा आहे. (या बाजारात सट्टा अथवा स्पेक्युलेशन करणारी मंडळी आम्ही आयुष्यातून उठून रस्त्यावर आलेली पाहिली आहेत! घरचे दागदागिने विकताना पाहिली आहेत, तसेच १५ व्या मजल्यावरून उडी मारतानाही पाहिली आहेत!) चढउतार हा तर बाजाराचा स्वाभाविक गुण! त्याचं विशेष काही नाही. पडत्या भावात खरेदी करणे व चढत्या भावात विकणे असा अगदी साधासुधा नियम बाजाराला लागू होतो. परंतु बरीचशी मंडळी नेमकं उलटं करताना आढळतात. चढत्या भावात माल खरेदी करून पडत्या भावात पॅनिकमध्ये विकतात असे १९९० पासून आमच्या पाहण्यात आहे. असो..

वसंतराव पटवर्धन

पुण्यात गुंतवणुकदारांचे सल्लागार म्हणजे वसंतराव पटवर्धन ८० व्या वर्षात देखिल उत्तम सल्ला देतात. परवाच एस एम जोशी सभागृहात एका गुंतवणुक जागृती कार्यक्रमात वसंतरावांच्या टिप्स साठी आसुसलेले श्रोते टिप्स म्हणले कि वह्या सरसावतात. ते ही तात्यांसारखाच डिस्क्लेमर देतात. परवा ५० शेअर्स ची टिप दिली. वरील कंपन्या वसंतरावांच्या यादीत पण आहेत.भारत सरकारची ही साईट बघितलीत का?
(भय व उत्सुकता यांचे मिश्रण असलेला कफल्लक गुंतवणुकदार)
प्रकाश घाटपांडे

वसंतराव

वसंतराव बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये उच्चपदावर होते व नावाजलेले अर्थतज्ज्ञ आहेत असे ऐकले आहे.
वसंतराव व आमचे बरेच विचार जुळतात. :)

लोकसत्तेत "लक्ष्मीची पावले" मध्ये ते देत असलेला सल्ला चांगला असतो. हॅवेल्स इंडिया, भेल व एल अँड टी हे तिन्ही आम्हा दोघांचे लाडके शेअर्स आहेत. मात्र बजाज ऑटो, आयव्हीआरसीएल इन्फ्रा. आणि आयडीबीआय बद्दल थोडे मतभेद आहेत. ;)

वसंतरावांचे व्याख्यान सुरेख असते यात शंकाच नाही.

(वसंतप्रेमी) आजानुकर्ण

आवडले नाही, व वाईटही वाटले!

घाटपांडेसाहेब,

भय व उत्सुकता यांचे मिश्रण असलेला कफल्लक गुंतवणुकदार

वरील ओळीतील कफल्लक हा शब्द मला आवडला नाही, in fact थोडेसे वाईटच वाटले! अहो आपण कशाला उगाच स्वतःला कफल्लक वगैरे म्हणवून घ्यायचं? अहो जो तो आपल्या घरचा श्रीमंत! खरं की नाही?

अहो तुमचा तो मुकेश अंबानी असेल लेकाचा कितीही पैसेवाला! परंतु मी माझ्या आणि तुम्ही तुमच्या घरचे मुकेश अंबानीच नाही का? :)

असो..

आपला,
(देवगडचा) तात्या गेटस्! :)

किंवा,

अहो तुमचा तो मुकेश अंबानी असेल लेकाचा कितीही पैसेवाला! परंतु मी माझ्या आणि तुम्ही तुमच्या घरचे मुकेश अंबानीच नाही का? :)

किंवा सहजरावांनी आमच्या खरडीत म्हटल्याप्रमाणे,

मुकेश हा त्याच्या घरचा मुकेश अभ्यंकर, आणि बिलगेटस् त्याच्या घरचा बिल घाटपांडे! :)

आपला,
रतन अभ्यंकर!

५० कंपन्या

तसा मीही माझ्यापरीने विष्लेषण करूनच गुंतवणूक करतो. आरपीएल, ग्लेनमार्क, पीटीसी पोर्टफोलिओ मध्ये साठवून आहे. पण वरील ५० कंपन्यांची सूची मिळाली तर बरे होईल जेणेकरून तेवढ्याच किंवा त्यातील आवडलेल्या कंपन्यांचा अभ्यास करता येईल.

अभिजित...
कोंबडी पळाली गाण्यावर नाचलं की भरपूर व्यायाम होतो.

पॉवरग्रिड कॉर्पोरेशन

च्या प्राथमिक समभाग विक्रीबाबत काय म्हणणे आहे? ५२ रुपयाला एक या भावाने बराच स्वस्त आहे. शिवाय व्यवसायातली ४५ टक्के मक्तेदारी व ऊर्जाक्षेत्रावर सरकार देत असलेले लक्ष गृहीत धरता पुढची ३ वर्षे तरी गुंतवणूक गोत्यात येण्याची शक्यता नाही.

पटण्यासारखे..

पुढची ३ वर्षे तरी गुंतवणूक गोत्यात येण्याची शक्यता नाही.

कर्णा, तू म्हणतोस ते पटण्यासारखे आहे. अर्थात, प्राथमिक बाजाराचा (प्रायमरी मार्केटचा) माझा फारसा अभ्यास नाही.

तरीही पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनचा एखाद् हजार समभागाचा माल भरून ठेवायला काही हरकत नाही! साला दो-तिनसौ का भाव होगा तो आधा माल फूक देंगे और बाकी बुढापेके लिये रख देंगे.:)

बाकी भेल, आयव्हीआरसीएल वगैरे कंपन्यांचे समभाग आम्ही किती स्वस्तातल्या भावात घेतले आहेत हे विचारूच नकोस. भेल म्हणजे अक्षरशः सोनं हो! माझी फार लाडकी कंपनी! :)

आरपीएल, आयडीएफसी, टेकमहिंद्रा यासारखे काही समभाग आम्ही म्हातारपणाकरता जमा करून ठेवले आहेत. या समभागांच्या बाबतीत आम्ही लाँग टर्मचा विचार करता अत्यंत बुलीश आहोत. साला, माल भरके रख्खा है. बेचेंगेही नही. देखो इन कंपनियोका कैसा तगडा भाव हो जाता है! :)

आपला,
(रस्ते का माल सस्तेमे या न्यायाने समभागात पैसे गुंतवणारा!) तात्या.

--
आम्हाला सांगण्यास अभिमान वाटतो की आम्ही अवघ्या ११ की १२ रुपयांच्या भावाने सेल या कंपनीचे (तेव्हा स्वस्त वाटला होता म्हणून एकदम १०००!) समभाग घेतले आहेत. साला उसको कभी बेचेंगेही नही! आनेवाले सालोमे उसका भाव साला पाचसौ रुपैय्या हो जायेगा! :)

लिखाण

तात्याबा,
लिखाण परत सुरू केल्या बद्दल मला अतिशय आनंद होतो आहे.
असेच वारंवार येवू देत!!

आपल्या लिखाणाचा चाहता
गुंड्याभाऊ

काही प्रश्न

तात्या, अजानुकर्ण आणि समस्त समभाग जाणकार,
काही मुलभूत प्रश्न विचारत आहे जमल्यास शंका निरसन करा -
एखाद्या कंपनीचा शेअर गेल्या काही वर्षात कसा परफॉर्म करतो आहे ह्याची माहिती कुठे मिळू शकते?
शेअर बाजारातल्या कंपन्यांच्या भावामध्ये झालेली चढ उतार (एकत्र) दाखवणारा तक्ता मिळू शकतो का?
ह्या व अश्या प्रकारच्या माहितीचे ऍनालेसीस करणारे संकेतस्थळ आहे का?

कोलबेरराव,

एखाद्या कंपनीचा शेअर गेल्या काही वर्षात कसा परफॉर्म करतो आहे ह्याची माहिती कुठे मिळू शकते?

हे त्या समभागाच्या तांत्रिक विश्लेषणाच्या तक्त्यावरून समजावे. ईंडियाबुलच्या संकेतस्थळावर दोन वर्षांपासूनचे तक्ते पाहता येतात. परंतु बहुतेक ठिकाणी वर्षभरापूर्वीचाच तक्ता उपलब्ध असतो. तांत्रिक विश्लेषणाकरता साधारणतः एका वर्षाचा तक्ता पुरेसा होतो.

शेअर बाजारातल्या कंपन्यांच्या भावामध्ये झालेली चढ उतार (एकत्र) दाखवणारा तक्ता मिळू शकतो का?

हा पाहा एक नमुन्यादाखल-

ह्या व अश्या प्रकारच्या माहितीचे ऍनालेसीस करणारे संकेतस्थळ आहे का?

अश्या प्रकारच्या (म्हणजे समभागाच्या भावाचे चढउतार पाहून) माहितीच्या एनलिसिसला 'तांत्रिक विश्लेषण' असे म्हणतात व त्याबाबबतची अनेक संकेतस्थळे उपलब्ध आहेत. 'टेक्निकल एनालिसिस' हा शब्द गुगलून पाहा! :)

आपला,
(टेक्नोफंडामेन्टल एनालिस्ट) तात्या अभ्यंकर, दलाल स्ट्रीट, मुंबई -२३
('प्रदीप भोजनालय' या मालवणी खानावळीजवळ! :)

बीएसई-चार्ट्स व इतर संकेतस्थळे

या दुव्यावर मुंबई बाजाराचे अधिकृत तक्ते पाहता येतील. कोणत्याही कंपनीबाबत हवी असलेली सर्व माहिती येथे(च) व एनएसईच्या संकेतस्थळावर मिळते.
अशा माहितीचे विश्लेषण करणारी अनेक संकेतस्थळे आहेत.
१. शेरखान डॉट कॉम
२. कॅपिटलमार्केट डॉट कॉम
३. मायआयरिस डॉट कॉम
४. आयसीआयसीआयडायरेक्ट डॉट कॉम
५. वे टू वेल्थ डॉट कॉम
६. मनीकंट्रोल डॉट कॉम
७. मनीपोर डॉट कॉम

याशिवाय आमचे स्वतःचे अत्यंत आवडते ब्लॉनेट डॉट कॉम व बिझिनेस स्टँडर्ड हे ही आहेतच.

टेक्नोफंडामेन्टल एनालिष्ट! :)

वरील एका प्रतिसादात आम्ही स्वतःला 'टेक्नोफंडामेन्टल एनालिस्ट' असे म्हणवून घेतले आहे.

उदाहरणार्थ,

वर आम्ही 'सियाराम सिल्क' या कंपनीच्या समभागाबदल लिहिले आहे. याचं क्षेत्र (कपडा उद्योग), प्रति समभाग उत्पन्न, समभागाची पुस्तकी किंमत (बुक व्हॅल्यू), किंमत/उत्पन्न गुणोत्तर (पीई रेश्यो) इत्यादीचा आम्ही उल्लेख केला आहे. हे झाले सर्व मूलभूत विश्लेषण, (ज्याला 'फंडामेन्टल एनालिसिस' असं म्हणता येईल.)

आता आपण याच्या किंमतीचा तक्ता पाहू. या तक्त्यावरून असे लक्षात येईल की हा समभाग गेले अनेक दिवस खालीखालीच येत चालला आहे व सध्या तो बर्‍याच खालच्या भावात उपलब्ध आहे. समभाग बाजारात 'अच्छा माल सस्तेमे लेके बैठ जाओ' हेच तत्व आम्ही बुजूर्गांकडून शिकल्यामुळे सदर समभाग आम्हाला खरेदीकरता आकर्षक वाटला व म्हणून तो आम्ही इथे सुचवला!

म्हणजे मूलभूत विश्लेषणही झाले आणि तांत्रिक विश्लेषणही झाले! :) एखादा समभाग का घ्यायचा हे मूलभूत विश्लेषणावरून समजते, व केव्हा घ्यायचा हे तांत्रिक विश्लेषणावरून समजते! आम्ही या दोन्ही बाबतीत 'लई शाणे' आहोत, म्हणून आम्ही स्वतःला 'टेक्नोफंडामेन्टल एनालिष्ट' असे म्हणवून घेतो! :))

हा पाहा सियारामचा तांत्रिक आलेख.

यात या समभागाची २३०/२४० पासून घसरण झालेली आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे हा समभाग गुंतवणुकीकरता आत्ता नाही घ्यायचा तर केव्हा घ्यायचा? (पुन्हा २३० च्या आसपास तो इसको दुबारा जानाही है! तेव्हा विकून टाकू! :)

आपला,
(सस्ते मे माल लेके चुपचाप बैठनेवाला!) तात्या मित्तल! :)

भय व उत्सुकता

परंतु बरीचशी मंडळी नेमकं उलटं करताना आढळतात. चढत्या भावात माल खरेदी करून पडत्या भावात पॅनिकमध्ये विकतात असे १९९० पासून आमच्या पाहण्यात आहे. असो..

कफल्लकता ही मानसिकता ,भय व उत्सुकता या मिश्रणातून निर्माण झालेली मानसिकता आहे. गुंतवणुकदारांच्या मानसिकतेविषयी तात्याने अधिक सविस्तर लिहावे यासाठी दिलेली किल्लि आहे.
(सध्या गृहकर्ज कमी करणे ही देखील गुंतवणूक आहे असे समजाणारा)
प्रकाश घाटपांडे

किल्ली!

कफल्लकता ही मानसिकता ,भय व उत्सुकता या मिश्रणातून निर्माण झालेली मानसिकता आहे.

उत्सुकतेबद्दल माहीत नाही, तो कदाचित मानवी स्वभावाचा एक भाग असावा. बाकी भयाबद्दल म्हणाल तर निद्रा, भय, आहार आणि मैथून ही कोणत्याही सजीव प्राणिमात्राची लक्षणे आहेत, तेव्हा त्याचं विशेष काही नाही! :))

गुंतवणुकदारांच्या मानसिकतेविषयी तात्याने अधिक सविस्तर लिहावे यासाठी दिलेली किल्लि आहे.

अच्छा! म्हणजे तात्याला किल्ल्या देता काय लेको! :)

असो,

घाटपांडेसाहेब,

शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या संदर्भातील मानसिकतेविषयी आम्ही खालील मुद्दे लिहू शकू.

१) आपण ज्या समभागात गुंतवणूक करतो त्या बाबतीत आपण ती का केली याची निदान आपल्याकडे तरी ठोस कारणं पाहिजेत, तसा अत्मविश्वास पाहिजे! कुणा टीप देणार्‍याने टीप दिली म्हणून केली की, काही एक अभ्यास करून केली? आम्ही बाजारात असे अनेक टिपर पाहिले आहेत. त्यांच्या ९ टिपस् चालतात व १० वी टीप सगळं साफ करून घेऊन जाते!

वरील कंपन्या, ही कुणाचीही टीप नसून आम्ही त्या अभ्यासाअंती निश्चित केल्या आहेत, व त्याची ठोस कारणे आमच्याकडे आहेत! आम्ही मागेच म्हटल्याप्रमाणे 'चढउतार' हा तर बाजाराचा गुणधर्मच आहे त्यामुळे आम्ही सांगितलेल्या कंपन्यांचे भावही खाली येऊ शकतात. (या बाजारात देव कुणीच नसतो व कुणी आभाळातूनही पडलेला नसतो!)

२) आपण गुंतवणूक केलेले शेअर खाली येऊ शकतात, तेव्हा त्याचं काही विशेष नाही व त्यामुळे पॅनिक होण्याचीही काही गरज नाही! जर आपण संबंधित कंपनीच्या बाबतीत कॉन्फिडन्ट असू तर खालच्या भावाला काही समभाग अजून खरेदी केले पाहिजेत. त्यामुळे सरसरी किंमत कमी तर होतेच, शिवाय हातामधल्या समभागांची संख्याही वाढते. खालच्या किंमतीला अजून काही समभाग खरेदी करण्याइतके पैसे जर आपल्या जवळ नसतील तर गप्प बसावे. पॅनिक होऊन नुकसानीमध्ये हातातला माल विकू नये!

३) सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जी रक्कम आपल्याला किमान पुढची दोन-तीन वर्षे तरी लागणार नाही, जिच्यावाचून आपलं काही एक अडणार नाही, केवळ अशीच रक्कम या बाजारात गुंतवावी. मग भले ती रक्कम कितीही कमी असली तरी चालेल. ज्या रक्कमेवर आपल्या पुढच्या भविष्यकालीन काही कमिटमेन्टस् अवलंबून आहेत अशी रक्कम या बाजारात गुंतवू नये. समभाग बाजार हे चांगला परतावा मिळवून देण्याचे साधन आहे हे निश्चित परंतु आपल्या प्रेडिक्शनस् प्रमाणेच हा बाजार चालतो हा गैरसमज असू नये.

आपला,
(समभाग बाजारावर मनापासून प्रेम असलेला) तात्या.

ता क - त्यातूनही जर भय वाटत असेल तर रोज रामरक्षा स्तोत्र म्हणावे. 'तात्यास्तोत्र' ही चालेल परंतु त्याची पुस्तकं सध्या बाजारात आऊट ऑफ स्टॉक आहेत! :))

एक दुवा

लेनेका.. बैठनेका.. और देखनेका फिर गिननेका ;-) अश्या खर्‍या होणार्‍या काही घटनांना पुष्टी देणारा हा घ्या दुवा व करा तुमचे स्वप्नरंजन सुरू. काही स्वप्न खरेच पुरी होतात बर का. अनुभवाने सांगतो.

हे महत्वाचे!

वर आलेला मुद्दा,
शेअर बाजारात आणण्याचे पैसे हे 'त्वरीत न लागणारे' असणे. हे फार महत्वाचे आहे असे मला वाटते.

आपला
गुंडोपंत

सीएफए

सर्टिफाईड फायनशियल एनॅलिस्ट
म्हणजे सीएफए की चार्टर्ड फायनान्शियल एनॅलिस्ट?
दोहोत फरक काय?
गुंतवणूकदारांसाठी बेसीक ते ऍड्व्हान्स असा सर्वसमावेशक कोर्स आहे का? पुण्यात सध्या अशा कोर्सेसचा सुळसूळाट झाला आहे. सगळे मॉड्यूलर कोर्सेस . मी रवींद्र कुलकर्णी यांचा 'लोकप्रिय' तसाच गलगली शेअर मार्केट अकादमीचा कोर्स पुर्वी केला (२००२) पण माझ्या ज्ञानात फारशी भर पडली नाही.

प्रकाश घाटपांडे

सब बकवास

>>पुण्यात सध्या अशा कोर्सेसचा सुळसूळाट झाला आहे

हा सगळा (लोकांकडून) पैसे कमवायचा प्रकार आहे. परदेशात हि फॅशन आहे म्हणून येथे आली. आधी नाही पिरीमीड / एम.एल.एम. / नेटवर्क मार्केटींग तसे सध्या हे कोर्सेस. आज् इंटरनेट मुळे ह्या "अशा कोर्सेस"मधे मिळणारी सगळी माहीती चकट्फू उपलब्ध आहेच की.

नशीब स्टॉक मार्केट हे एकमेव "सर्टीफीकेट/क्वॉलीफिकेशन"न मागता मला खेळू देणार (एकदम "मोकळा हात" अस मी म्हणत नाही. सेबीचे काम छान चालू आहे. ) पटांगण आहे. अर्थात इथे अभ्यास आपण करू तितका, आपण करु तेव्हा व खरा फायदा/तोटा हा केवळ आपल्या स्वतःच्या निर्णयाने होतो. माझी जबाबदारी फक्त माझ्यावर आहे. एकदम सुंदर स्वावलंबनाचा धडा आहे.

लाँग लिव्ह इक्वीटी मार्केट!

गुंतवणूकदारांसाठी कोर्स

राष्ट्रीय शेअर बाजारातर्फे एनसीएफएम अंतर्गत काही अभ्यासक्रम घेतले जातात. त्यातील फायनान्शिअल मार्केटची तोंडओळख करुन देणारा कोर्स चांगला आहे.

धन्यवाद

तात्या आणि अजानुकर्ण तत्पर प्रतिसादाबद्दल अनेक आभार.
तुम्हा लोकांच्या सहकार्याने आता आम्ही देखिल थोडे थोडे ग म भ न गिरवायला लागावे म्हणतोय :-) आपण ज्या लिंक्स दिल्या आहेत तसले विश्लेषण करण्यासाठी काही सॉफ्टवेअर पण मिळते का? इथे एका सहकर्‍याला सतत तसले काहितरी उघडून बसलेले पाहिले आहे म्हणून शंका आली.. (लेकाचा कुणीही बघितले की लगेच ते मिनीमाइझ करुन कामाची विंडो उघडतो म्हणून त्याला विचारु शकलो नाही :-)

गधडा! :)

(लेकाचा कुणीही बघितले की लगेच ते मिनीमाइझ करुन कामाची विंडो उघडतो म्हणून त्याला विचारु शकलो नाही :-)

हा हा हा! त्या गधड्याचा पीसी हॅक करता येतोय का बघ! :)
साला क्या माल लेके बैठा है वो पता होगा! :)

तात्या.

सॉफ्टवेअर

असल्या विश्लेषणासाठी सॉफ्टवेअरचा वापर करणे हितावह नाही. कंपनीची गुणवत्ता, कंपनी व्यवस्थापनाचा दर्जा, कंपनीचे त्या क्षेत्रातील स्थान, ब्रँड व्हॅल्यू अशा अनेक महत्वपूर्ण गोष्टी निर्बुद्ध सॉफ्टवेअरला समजणार नाहीत. शेअर गुंतवणूक हे केवळ शास्त्र नसून एक कला आहे असे कोणाचे तरी प्रसिद्ध वाक्य या निमित्ताने आठवले.

बहुतेक! :)

शेअर गुंतवणूक हे केवळ शास्त्र नसून एक कला आहे असे कोणाचे तरी प्रसिद्ध वाक्य या निमित्ताने आठवले.

हो, बहुतेक मीच असं मागे कुठेतरी म्हटल्याचं मला आठवतंय! :))

तात्या.

शिकाऊ उमेदवार

मीही थोडीफार गुंतवणूक करते शेअर्समध्ये. सद्ध्या पॉवर ग्रिड आयपीओ ट्राय केलाय आणि एबीबी, नंदन, क्यूफ्लेक्स यांचे काही शेअर्स बाळगून आहे. विश्लेषण वगैरे करायला कुठे शास्त्रशुद्ध ( की कलाशुद्ध?! ) शिकले वगैरे तर नाही अजून पण हळूहळू नेटवरचे लेख वगैरे वाचून शिकायचा प्रयत्न करतेय. या शिकाऊ उमेदवारीत सदर चर्चेचा उपयोग होइलसे वाटते.

सियाराम! :)

वरीलपैकी सियाराम सिल्क हा समभाग आम्ही दि ११ सप्टेंबर रोजी ११५ च्या आसपास सुचवला होता. या क्षणी त्याचा भाव १३८ आहे. १० दिवसात २०% मिळकत तशी बरीच म्हणायची! :))

अन्य समभागही चांगले आहेत. आम्ही सुचवलेल्या भावांना जर ते कुणी खरेदी केले असतील तर चांगलंच आहे. माल लेके बैठ जाओ! :)

आपला,
तात्या अभ्यंकर,
दलाल स्ट्रीट, मुंबई -२३.

स्वार्थ आणि परमार्थ! :)

सदर लेख इथे लिहिण्यामागे आमचा स्वार्थही आणि परमार्थही आहे.

स्वार्थ असा की जर का आम्ही सुचवलेले समभाग वर्षभरात चांगला परतावा देऊ शकले तर आम्हाला काही अशील मिळतील आणि आम्हा गरीबाची रोजीरोटी सुरू राहील :)

आणि परमार्थ असा की जर या बाजारात शहा, महेश्वरी, चोपडा, शर्मा, पटेल कमावतात तर अभ्यंकर, बापट, कुलकर्णी, देशपांडे या मंडळींनी का नाही कमवायचे, असा एक मराठीधार्जिणा प्रश्न आम्हाला पडला आहे. त्यामुळे मराठी मंडळींनीही या बाजारातून जरूर पैसे कमवावे असा परमार्थिक विचार डोक्यात येतो.

असो..

तात्या.

चेव्हिओट चांगला वाढला! :)

4) Cheviot, CMP Rs 233 per share

आम्ही ११ सप्टेंबर रोजी वरील समभाग सुचवला होता तेव्हा तो २३३ रुपायाला मिळत होता. आज त्याची किंमत ३१२ रुपये आहे. दोन महिन्यांच्या आत ३४% परतावा काही वाईट नाही!

बाकीचे समभागही फंडामेन्टली चांगलेच आहेत, माल लेके बैठ जाओ!

तात्या.

 
^ वर