आम आदमीचे वैज्ञानिक वर्णन आणि आम आदमीची त्याला मान्यता

दुसर्‍या एका ठिकाणी मी एका लेखात लिहिले
>> मराठीत क्रियापदाची कोणकोणती रूपे होतात... गुंजीकर, दामले, राजवाडे, अर्जुनवाडकर, आचार्य आणि दीक्षितांनी
>>... उत्तरोत्तर फेरफार करून मान्यता मिळवलेली व्यवस्था अशी :
त्याला मधुशालाप्रेमी यांनी एक महत्त्वाचा आणि समर्पक प्रश्न विचारला
> गुंजीकर, दामले, राजवाडे, अर्जुनवाडकर, आचार्य आणि दीक्षित ही सगळी मंडळी कोण आहेत?
> कुणाची मान्यता मिळवली आहे असं म्हणताय आपण? आम मराठी माणसाची का?

हा प्रश्न व्याकरणापेक्षा मोठा आहे. त्याची चर्चा व्हावी.
येथे वेगळे उदाहरण देतो. (मी इंजिनियर नसल्याने काही चूक होण्याची शक्यता आहे, कोणाला आकडेवारी नीट माहीती असल्यास सुधारावी.)

सामान्य मोटारचालक (गियर असलेल्या "कार"चा चालक) गाडीचा वेग वाढवताना इंजिनचा आवाज जाणून गियर बदलतो. बहुतेक अनुभवी मोटारचालक मोटारची मिनिटाला २४००-३६०० भ्रमणे होऊ लागली की गियर बदलून भ्रमणे कमी करतो. वेग वाढून पुन्हा मोटारची मिनिटाला २४००-३६०० भ्रमणे होऊ लागली की गियर बदलतो. म्हणजे मोटारच्या आवाजाची पट्टी पांढरी ३ च्या वर चढली की काही चालक गियर बदलतात, तर काही लोक पट्टी पांढरी ७ पर्यंत जाऊ देतात. पट्टी पांढरी १-पांढरी ३च्या दरम्यान इंजिनचा ध्वनी असल्यास साधारण कोणीच गियर बदलत नाही.

आता कोणी सामान्य आणि त्या अभियंत्याहीपेक्षा मोटार चालवण्यात अनुभवी वाहनचालक म्हणेल : "मोटारची भ्रमणे" हा काय प्रकार आहे? बाजाच्या पेटीला मी कधी हात लावला नाही, माझ्या गियर बदलण्याचे त्या शब्दांत वर्णन मला मान्य नाही.

येथे अभियंत्याचे आणि अनुभवी वाहनचालकाचे त्यांच्यात्यांच्या ठिकाणी बरोबर आहे. इंजिनियरने चालकाला "तुम्ही पेटी वाजवायला शिका" म्हणू नये. चालक जर प्रकटपणे न जाणताही त्याच पट्टीत गियर बदलत असेल तर इंजिनियरचेही चूक आहे असे त्याने म्हणू नये. कारण नवीन इंजिनाची रचना करताना, सामान्य चालकाच्या सवयीला (त्याला त्या शब्दांत अवगत असो वा नसो) त्रास कधी होईल/होणार नाही? अशी तांत्रिक माहिती त्या इंजिनियरला हवी असते.

पण अधूनमधून तांत्रिक अभ्यासकाचा आणि तंत्रज्ञान वापरणार्‍याचा सुखसंवाद साधावा. हा कसा साधावा, उपक्रमावर तो साधता येईल काय, याबद्दल आपले काय मत आहे?

Comments

तांत्रिक अभ्यासकाचा आणि तंत्रज्ञान वापरणार्‍याचा सुखसंवाद

हा चर्चेचा विषय चांगला आहे (काहीतरी लिहीता येईल असे वाटतयं! :) ह.घ्या.)

"गुंजीकर, दामले, राजवाडे, अर्जुनवाडकर, आचार्य आणि दीक्षित ही सगळी मंडळी कोण आहेत? कुणाची मान्यता मिळवली आहे असं म्हणताय आपण? आम मराठी माणसाची का? "

यावर आपण जे इंजीनियर आणि सामान्य / अनुभवी वाहनवचालकाचे उदाहरण देत आहात त्यावर खालील भाष्य करता येईलः
मोटारीचे गियर कसे तयार करायचे म्हणजे ते विशिष्ठ पद्धतीने ते चालतील हे एखाद्या इंजीनियर्स - शास्त्रज्ञांचा आणि व्यवस्थापकांचा गट ठरवतो. ते मग गाडीचे सरकारमान्य आणि "इंडस्ट्री"मान्य (स्टँडर्ड) तत्रज्ञान असेल त्यात बसते का ते पाहून तसे मान्य करून घेतो, मग त्या पद्धतीने गाडीचे मॉडेल/प्रोटोटाईप इत्यादी बनवून टप्या टप्याने ती गाडी सर्वप्रकारच्या शास्त्रीय आणि सेफ्टीसंदर्भात चाचण्या झाल्या की गाडी बाजारात येते. मग ती एखादा अनुभवी चालक विकत घेतो आणि त्याच्या अनुभवाने तो जशी चालवायची तशी चालवतो. अर्थात ते जरी बरोबर असले तरीवाअधी म्हटल्याप्रमाणे "स्टँडर्ड" च्या तत्वात बसणारे नसेल किंवा तसे ते त्याचा भाग नसेल. म्हणून त्याच्या पद्धतीने गाडी चालवणे ही इंग्रजीत ज्याला SOP or Standard Operating Procedure असे म्हणतात ती होवू शकत नाही.

आता आपण ज्या मंडळींनी उत्तरोत्तर फेरफार करून मान्यता मिळवलेली व्यवस्था तयार केली म्हणता ते एक तर अशा पद्धतीचा भाग असले पाहीजे अथवा त्यांनी तसा पुढाकार घेवून तशी पद्धत तयार केलेली असली पाहीजे पण ते नुसतेच अनुभवी चालक आहेत असे म्हणून उपयोगाचे नाही. म्हणजे व्याकरणासंदर्भातीलच उदाहरण देयचे झाले तर पाणिनींनी व्याकरणाचे अस्तित्वात नसलेले नियम तयार केले ज्याला "standardaization" म्हणता येईल. तर दादोबा पांडूरंगांनी इंग्रजी भाषेचे व्याकरणातील नियम मूळ धरून त्याच पद्धतीचे नियम अधुनीक मराठीत आणले (कृपया या आठवणीवरील माहीतीत काही चूक असल्यास दुरूस्त करावी).

शेवटी आपल्या प्रश्नाचे : "पण अधूनमधून तांत्रिक अभ्यासकाचा आणि तंत्रज्ञान वापरणार्‍याचा सुखसंवाद साधावा. हा कसा साधावा, उपक्रमावर तो साधता येईल काय, याबद्दल आपले काय मत आहे?", मला वाटते ते उत्तरः

आपण आधी चालू केलेल्या चर्चेत एकंदरीत सुसंवाद आहे असे वाटते. पण आपल्याला आपल्या प्रश्नातून जर असे विचारायचे असेल की त्या चर्चेत जास्तीत जास्त लोकांना रस (interest)तयार करणे आणि सहभाग घेण्यास लावणे कसे जमेल, तर ते शेवटी प्रत्येकाच्या आवडीनिवडिवर आणि एखाद्या विशिष्ठ लेखाच्या पद्धतीवर (लेखकाच्या नव्हे) , अवलंबून राहील. काही लेख लोकांना आकर्षीत करतील तर काही नाही. मला इतकेच सुचवायचे आहे की आपण जरूर लिहीत राहा, कारण अशी माहीती जालावर राहील्यास त्याचा उपयोग फक्त उपक्रमावरील व्यक्तींपुरताच तो मर्यादीत राहणार नाही तर कालांतरानेपण होईल.

ऍब्स्ट्रॅक्शन - पटले!

तंत्रज्ञांची भाषा तंत्रज्ञान वापरणार्‍याला कळत नाहीच बहुतेकदा.
एकदम पटले.

तर व्याकरणाचे नियम पाठ असण्यापेक्षा मराठी पुस्तके वाचून कळले, तेवढे बोलण्या-लिहिण्यासाठी मला पुरेसे आहे असे वाटते.

कधी कधी अमेरिकन लोकांचे बोलीभाषेतील व्याकरण ऐकून आपले खूपच बरे वाटते...

नियम पाठ करू नये हे बरोबर

> माझ्यापुरते बोलायचे झाले, तर व्याकरणाचे नियम पाठ असण्यापेक्षा
> मराठी पुस्तके वाचून कळले, तेवढे बोलण्या-लिहिण्यासाठी मला पुरेसे
> आहे असे वाटते.

हे अगदी बरोबर आहे. भाषाशास्त्र या दृष्टीने जो मराठी व्याकरणाचा अभ्यास केला जातो, त्याचे नियम कधीच कोणी मराठी माणसाने पाठ करू नये.

वैज्ञानिक दृष्टीचे व्याकरण हे वर्णन-नियम करणारे असते, आदेश-नियम सांगणारे नाही. मराठी मातृभाषा बोलणार्‍यांना कसे बोलायचे ते नियम न सांगता मनोमन कळते. "असे बोलू नका, तसे बोला" म्हणणार्‍या व्याकरणकाराकडे एकतर दुर्लक्ष होईल, नाहीतर त्याचे हसे होईल. स्वभाषा म्हणून मराठी सहज आणि अस्खलित बोलणार्‍यांच्या खुबी आणि लकबींचे तंतोतंत वर्णन करणे हेच व्याकरणकारांचे काम.

पण वैज्ञानिक व्याकरणकार जर म्हणाला "मी लोकांना 'अमुक' असे बोलताना ऐकले आहे, म्हणून नियम (एकत्रित वर्णन) 'अमुक' आहे असे मला वाटते", तर स्वभाषा म्हणून मराठी सहज आणि अस्खलित बोलणार्‍यांनी असे जरूर सांगावे : "आम्ही 'अमुक' असे बोलत नाहीच मुळी, आम्ही 'तमुक' असे बोलतो - नियमाचे काय करायचे ते तुमचे तुम्ही बघून घ्या." हे खरे असल्याची पडताळणी केली की वर्णन-नियम बदलणे व्याकरणकाराला भागच पडते.

विदेशी नवशिक्याला मात्र साधारणपणे नियम पाठ करावे लागतात. एखाद्याचा कान पटाईत असतो, पण ते फार थोडे. संगणकालासुद्धा लहानपणी आईवडलांकडून कळत नकळत बोलणे शिकल्याची आठवण नसते, त्याला नेहमीच नियम पाठ करावे लागतात.

ऍब्स्ट्रॅक्शन

तंत्रज्ञांची भाषा तंत्रज्ञान वापरणार्‍याला कळत नाहीच बहुतेकदा. तंत्रज्ञ आणि गिर्‍हाईक ह्यांच्यात ऍबस्ट्रॅक्शनची जी दरी आहे, ती भरून काढायला सोप्या भाषेत समजवून सांगणारे लोक अस्तित्त्वात आहेत.

यावरुन आठवले. गावाकडे एकदा एस टी त एक म्हातारी गर्दित चढली. कंडक्टरला गाडीत गर्दी झाल्याने पुढ्ची 'शीटं' नाकारायची होती. तो म्हतारीला खाली उतरायला सांगत होता. म्हतारी काही ऐकत नव्हती. 'मपल्या एकटीच्या वझ्याने तुपल्या यवढ्या मोठ्या गाडीला काय व्हतय रे" कंडक्टर म्हणाला," तसं न्हाय म्हतारे, गाडी उराळन ना?" म्हतारी पटकन खाली उतरली.{ उरळणे- बैलगाडीत ओझे भरताना बैलांची क्षमता, ओझ्याचा प्रकार, आकार. वजन याचा विचार करुन ते ठेवावे लागते अन्यथा गाडीचा गुरुत्वमध्य ढासाळून जू[बैलगाडीचा बैलांच्या मानेवर येणारा भाग] उलटे होण्याची संभावना असते त्यामुळे बैलाच्या गळ्याला फास बसतो}
प्रकाश घाटपांडे

धन्याशेठ,

त्याला मधुशालाप्रेमी यांनी एक महत्त्वाचा आणि समर्पक प्रश्न विचारला
हा प्रश्न व्याकरणापेक्षा मोठा आहे. त्याची चर्चा व्हावी.

धन्यवाद धन्याशेठ, हद्द आहे तुझी बाबा! :) माझ्या एका प्रश्नावर तू नवीन चर्चाविषय सुरू केलास याचे खरंच नवल वाटले! पण म्हणजे बघ, माझा प्रश्न किती महत्वाचा होता ते! ज्यामुळे तुलाही नवीन चर्चाविषय सुरू करावासा वाटला!

असो, आता चर्चाविषयाकडे वळतो-

"मोटारची भ्रमणे" हा काय प्रकार आहे? बाजाच्या पेटीला मी कधी हात लावला नाही, माझ्या गियर बदलण्याचे त्या शब्दांत वर्णन मला मान्य नाही.

करेक्ट!

हे मोटारीचं उदाहरण अगदी चपखल दिलंस बघ धनंजया! अरे मगाशी तुझा लेख वाचतांना माझीही अगदी अशीच अवस्था झाली होती. मनाशी म्हटलं, आपण तर मारे एवढे बोलतो, गप्पा मारतो, लेख वगैरे लिहितो, पण हे सर्व आपण ज्या भाषेत लिहितो त्या भाषेच्या व्याकरणाचा आपल्याला काहीही गंध नसताना आपण हे सगळं कसं काय करू शकतो? तुझ्या लेखातलं जे व्याकरण वाचत होतो त्यातला एक शब्दही कळत नव्हता, मग आपल्याला लिहिता-बोलताना हे व्याकरण कुठेच कसं अडत नाही, असा प्रश्न मला पडला होता! असो...

तुझाच,
तात्या.

मजकूर संपादित. व्यक्तिगत रोखाचा वाटलेला मजकूर अप्रकाशित केला आहे.

एक शंका

'मराठी' व्याकरण आणि भाषासौंदर्य ह्यावर आधारीत असणार्‍या ह्या चर्चेमध्ये 'सामान्य माणसा'चा 'आम आदमी' का झाला आहे?

नियम

आपले बोलणे आणि उच्चार शुद्ध असले की लिखाण आपोआप शुद्ध व्हावे. व्याकरणाचे किंवा शुद्धलेखनाचे नियम माहीत असायचे काहीच कारण नसते. परंतु जर आपले लिखाण जगभर पसलेल्या स्व-भाषकांना किंवा त्या भाषेची जाण असणार्‍यांना सहज आणि बिनचूक समजावे असे वाटत असेल तर न कळत का होईना लिखाण व्याकरणशुद्धच लिहिले गेले पाहिजे. म्हणजे अर्थाचे अनर्थ होत नाहीत.
आपण शुद्ध बोलतो, लिहितो हे आपल्यावर लहानपणी आईबापांनी, शेजारपाजारच्या मंडळींनी, नातेवाईकांनी आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आपल्या शिक्षकांनी केलेल्या संस्कारांच्या मेहेरबानीमुळे. त्यात आपले काही कौतुक नाही.
बोलताना शब्दांवरचे आघात आणि निवेदनातील चढ‍उतारांमुळे अर्थ स्प्ष्ट होतो, लिखाणात ही सोय नसते. तिथे व्याकरणशुद्धच लिहिले गेले पाहिजे. हे बोली भाषेत शक्य नाही. पूर्णपणे कॉक्‍नी किंवा स्लॅंग बोलीत लिहिलेला एकही इंग्रजी ग्रंथ आपल्या सुदैवाने आपल्या दृष्टोत्पत्तीस सहसा पडत नाही. त्यामुळे कुठल्याही पुस्तकातले इंग्रजी आपल्याला कळते. तसेच मराठीचे व्हावे. --वाचक्‍नवी

 
^ वर