शाळेतील शिक्षा

छडी लागे छमछम या चर्चेत विशिष्ठ मुद्यांवर चर्चा चालू आहे त्यामुळे विषयांतर होऊ शकेल म्हणून ही नवीन चर्चा!

छडी लागे छमछम हे बरोबर की चूक यावर मतमतांतरे असू शकतात, पण आपण जेंव्हा शाळेत होतो, तेंव्हा नक्कीच शिक्षा करणे आणि अगदीच अपवाद सोडल्यास ती होणे हे ग्राह्यच धरले जायचे.

आपल्याला कधी काही आठवणीत राहील अशी शिक्षा झाली आहे का? काही मजेशीर प्रसंग वगैरे किंवा एखाद्या शिक्षकाची आठवण (फार तर त्याचे/तीचे नाव न लिहीता, योग्य तो मान ठेवून)?

मी छोटीशी सुरवात करतो. माझ्या (तुर्त) व्यक्तीगत (शिक्षांच्या) आठवणींनी नाही !

हिंदीच्या परीक्षेत निंबंधाला विषय दिला गेला " शिक्षा का महत्व"

किमान अर्ध्या मुलांनी "शिक्षे" मुळे मुलांना शिस्त कशी लागते, कधी कधी गडबड थांबवण्यासाठी गरजेचे पण असते इत्यादी वर रकाने भरले!

लेखनविषय: दुवे:

Comments

शिक्षा

आम्हाला शाळेत शिकवायला देव नावाचे गुरुजी होते. ते चुका झाल्यावर छड्या देताना म्हणायचे "दया क्षमा शांती तेथे राक्षसांची वसति" त्यातील रा ऽऽ क्षसांच्या या समेवर छडी बसायची. छडी खाण्याच्या अगोदर वर्गातल्या सारवलेल्या जमीनीवर हात घासायची मुभा असायची.(म्हणजे छडीची वेदना कमी होते असा समज होता) वाडयांवरले पोर लाम्बून शाळेत यायची .एकदा मदगुले नावाच्या पोराला विचारल "का रे शाळेत का आला नाही?" तो म्हणाला," गुर्जी आमच्या क उच्छव होता." गुरुजी म्हणाले ठीक् आहे उत्सव शब्द फळ्यावर लिहून दाखव. त्याने सुरुवातीला "उधव" लिहिले.गुरुजींना चांगला चोप दिला. नंतर त्याने"उछव" लिहिले. शेवटपर्यंत त्याला उत्सव शब्द लिहिता आला नाही. अर्थात यात त्याने बराच मार खाल्ला. पुढे त्याला "उछव उधव" हेच टोपण नाव पाडल. खेड्यात गुरुजींनी न मारणे ही अपवादात्मक बाब होती. घरी देव गुरुजींबाबत कुणी तक्रार केली तर त्याला दुप्पट मार पडत असे. पोरग देव गुरुजींच्या पायावर आणून घातल कि पालकाची जबाबदारी संपत असे. अक्षर सुधारावे म्हणून रोज पाच ओळी शुद्धलेखन लिहून आणणे बंधनकारक होते. टाकच वापरायचा, पेन वापरला कि तो दगडावर ठेचून टाकीत. टाकाच्या निबाला तिरपा छेद असल्यामुळे अक्षर वळणदार येते. पेनचे अक्षर लगेच ओळखू येई. पण आजही माझे अक्षर खराबच आहे.
प्रकाश घाटपांडे

पहा!

पण आजही माझे अक्षर खराबच आहे.

पहा इतक्या शिक्षा केल्या... काय उपयोग झाला...

ते उच्छव म्हणणारं पोरगं माराच्या भीतीने शाळा सोडील नाही तर काय काय करेल?

आपला
गुंडोपंत

थोबाडीत्

आमच्या शाळेत पाणी प्यायला एका जागी चार नळ होते. एकदा त्याला पाणी नव्हते तसेच आमच्याकडे वॉटरबॅग पण नव्हत्या. मला हे माहीत होते की शाळेत एक हस्तव्यवसाय ह्या नावाचा वेगळा विभाग आहे तिथे एका खोलीत् एक पिण्याचे पाणी असलेला नळ आहे. तसेच तिकडे परवानगी शिवाय जाता येत नव्हते. आम्ही काही मित्र बाजूला कार्यशाळेत उभे असलेल्या सरांकडे गेलो. मी आम्हा चौघांच्या वतीने परवानगी मागीतली. तेवढयात अजून काही पोरे तेथे आली व आम्हाला अशी परवानगी मिळाली पाहून "अरे इकडे पाणी आहे" म्हणून अजून काही पोरांना घेउन आली. झालं बहूतेक टोळधाड, गलका, दंगा, आवाज ऐकून सर तिरमीरीत आत आले व दरवाज्यातून पहील्या हाताला लागलेल्या पोराला धरले व लावली मुस्कटात् अन एकडे यायचे नाही हे माहीत नाही का, व्हा बाहेर असे खडसावले... गरम गाल, त्याहून गरम उफाळून आलेला राग , झालेला अपमान हे सर्व ओल्या डोळ्याने, कापलेल्या स्वराने "पण तुम्ही मला पाणी प्यायला परवानगी दिली होतीत ना सर" असे म्हणत गाल धरुन मी बाहेर पडलो. सर एकदम शांत झाल्यासारखे वाटले खरे.

आख्या शालेय जीवनात बसलेला हा एकच मार, पण चांगलाच लक्षात आहे.

आमच्या वेळी .....

मी चौथ्या इयत्तेंत असतांना आम्हाला जुवेकर नावाचे मास्तर होते. त्यांनी शिक्षकांना "मास्तर" न म्हणता गुरुजी म्हणायचे हा फतवा जारी केला. छडी त्यांच्या हातांत नसे तेव्हा ती सहज हाताला लागेल अशा अंतरावर असे. तिचा अनिर्बंध वापर ते करीत. मारतांना व एरवी रागावतांनाही शिव्यांचा भरपूर वापर करीत. त्यांत कमरेखालच्या अवयवांचा स्वच्छ शब्दांत बिनदिक्कत उल्लेख असे. त्यांची उत्कृष्ट शिक्षक म्हणून ख्याति होती. माझ्या पालकांसहित सर्व पालकांना त्यांच्याविषयी फार आदर होता.

बायकांचा जन्म

शाळेत शिक्षा व्हावी असे अनेक उद्योग केलेले आहेत उदा. सर्वात मागच्या बाकावर बसून कराकरा वेफर्स खाणे, चित्रे रंगवणे - कागदावर आणि त्याला कॅप्शन्स देऊन ती इतरांना हळूच पाठवणे असे अनेक उद्योग केलेले आहेत पण शिक्षा झाली नाही, एकदा एका स्वभावाने गरीब बाईंनी "बाळा, तू पण का असे उद्योग करतेस?" (जसे काही असे उद्योग करणे हा फक्त मुलांचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि यत्ता १०वीत बाळा-बिळा म्हणवून घेणे हे आणखीनच वैतागदायी.) असे सांगितल्याचे आठवते. पण प्रत्यक्ष शिक्षा झाल्याचे आठवत नाही, शिक्षक मुलींच्या बाबतीत थोडी पार्श्यालिटीच करतात बुवा!!!

८ वीत असताना आम्हाला एक नवीन बाई होत्या, त्या खूप गृहपाठ देत म्हणून संगनमताने एकदा संपूर्ण वर्गाने गृहपाठ केलाच नाही. यावर वैतागून त्यांनी सर्वांना शाळा सुटल्यावर बसून अभ्यास करावा लागेल असे सांगितले. संध्याकाळी शाळा सुटायची वेळ आली तशी मुलींना घरी जायला सांगितले आणि मुलांना बसून अभ्यास करायला. (बिच्चारी मुले!!) या बाई शाळेजवळच राहायच्या. वर्गातील मुलांनाच फक्त थांबावे लागले याचा मुलांना राग आला आणि त्यांनी त्या संध्याकाळी बाईंच्या घरावर चक्क मोर्चा नेला. बाईंनी ती बोंबाबोंब ऐकून आपल्या बिल्डींगमध्ये शोभा नको म्हणून सर्वांना घरी पाठवले. दुसर्‍या दिवशी अर्थातच ही बातमी सर्वांच्या गरमागरम चर्चेचा विषय होती.

असो... अशा पार्श्यालिटींमुळे बायकांचा जन्म मिळाल्याबद्दल अस्मादिक अतिशय आनंदी आहेत. (ह. घ्या)

उत्तरपूजा (अजून एक् पुढचे पाऊल)

आमच्या गुरुजींना "किल्ली देणे" ही अद्भुत कला अवगत होती. म्हणजे कमरेच्या वरती जाड चिमटा काढायचा, आणि पिरगाळायचा.

आमच्याकडेपण हा प्रकार चालयचा. त्यात अजून एक् गोष्ट म्हणजे असा चिमटाकाढलेल्या अवस्थेत असताना ओणवे होयला सांगायचे!

एरंडेल

हा खरा अनुभव आहे!

भुगोलाचा तास सुरू होता. वेगवेगळ्या पिकांवरून प्रश्न विचारत शिकवणे चालू होते. सरांनी प्रश्न विचारला की "एरंडाच्या तेलाचा औद्योगीक उपयोग काय?" - उत्तर होते वंगण म्हणून. पण मुलांना ते माहीत नव्हते म्हणून (किंवा लक्ष देयचे नसेल म्हणून) कोणी हात वर केला नव्हता.

सरांनी परत प्रश्न विचारला "एरंडाच्या तेलाचा औद्योगीक उपयोग काय?", तेंव्हा माझे इतर उद्योगातून सरांकडे (प्रश्नाकडे) लक्ष गेले आणि आश्चर्य वाटले की कोणी हात का वर करत नाही? मी हात वर केला फक्त प्र्शन् चुकीचा ऐकला होता, ""एरंडाच्या तेलाचा औषधी उपयोग काय?", सर म्हणाले सांग काय तो, "सोपे आहे, पोट साफ करायला"

ताबडतोब प्रतिक्रीया मिळाली, "चालता हो!"

नकल्सवर मारणे

आमचे गुरुवर्य हाताची मूठ करायला सांगून नकल्स (मराठी काय?) वर डस्टरने मारत.

शिवाय दोन विद्यार्थी चुका(!) करताना सापडले की त्यांना एकमेकांच्या मुस्काटीत मारायला सांगत. पाहुण्याच्या काठीने साप मारायची अशी पद्धत आम्ही लहानपणीच शिकलो.
नंतर डबा खाण्याच्या सुट्टीत त्या दोघांचा हिशेब चुकते करण्यासाठी पुन्हा एकदा रिपीट टेलिकास्ट होत असे.

रुळ

आमचे वैद्य गुरुजी आम्हाला शाळेत उशीराने आल्याबद्दल एका चांगल्या जाड रुळाने मारत. ते इतक्या जोरात असे की त्यादिवशी काही लिहिता येत नसे.
मग इतर तासांना शिक्षकांनी विचारले 'का लिहित नाहे रे?' की फक्त 'वैद्य सर' इतके म्हंटले तरी शिक्षक समजून जात.
गुंडोपंत प्राथमीक मधून माध्यमीक शाळेत गेल्या गेल्या हा प्रसाद मिळायला लागला. मग एकतर शाळेत जायचे तर वेळेवर नाहीतर मग नाहीच जायचे.
आपला
गुंडोपंत

आमची 'शैक्ष'णिक प्रगती

अहो काय सांगू तुम्हाला अगदी कधीही न मारणार्‍या मास्तरांच्या हातचाही मार मी खाल्लाय. नावासारखेच होते ते गोडबोले. एक सर राग आला की खिशातला पेन, हातातलं घड्याळ काढून टेबलावर ठेवायचे. संबंधित मुलगा सरांनी घड्याळ काढायला सुरुवात केली की अर्धमेला व्हायचा. मग त्याला वाकवून पाठीत पैलवानी रट्टा बसायचा. मग दोन थोबाडीत. किल्ली देणे, एकमेकांच्या कानाखाली मारायला लावणे वगैरे प्रकार तर सर्रास. माझ्या मित्राला हळू मारत होतो म्हणून एकदा मलाच सरांनी एक् लगावून दिली होती.

एक सर मात्र अभिनव पद्धतीने शिक्षा करायचे. एकदा वर्गात गृहपाठ न केलेल्या दहा-बारा जणांना ओळीने अंगठे धरून उभं केलं होतं. मध्येच काय झालं कुणास ठाऊक सरांनी पहिल्या मुलाला ढकलून दिले. एका पाठोपाठ ठेवलेली पुस्तके कोसळावी तसे आम्ही कोसळलो(मी पण होतोच). अशीच गृहपाठाची वही तपासताना त्यांच पेन मध्येच लिहायच बंद झालं आणि दोनदा झटकून लिहितंय का बघायला माझ्या पांढर्‍या शर्टावर छातीपासून पोटापर्यंत लाल रेघ ओढली.

बर्‍याच गमजा आहेत .. किती सांगायच्या अन किती लपवायच्या . ;-)

अभिजित...
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.

ओळीने अंगठे धरून उभे

एक सर मात्र अभिनव पद्धतीने शिक्षा करायचे. एकदा वर्गात गृहपाठ न केलेल्या दहा-बारा जणांना ओळीने अंगठे धरून उभं केलं होतं.

काय गडबड केली ते "जागे अभावी "सांगत नाही :) पण एकदा आमच्या वर्गातील सतरा मुलांना एका बाईंनी वर्गाबाहेर व्हरांड्यात असेच आंगठे धरून उभे केले. बाजूच्या वर्गातील मास्तरांनी पाहीले आणि बाईंना, मुलांनी काय उपद्व्याप केला ते विचारले. मग आम्हाला मोजले आणि जोरात म्हणाले, "सतरा बैल आहेत. जोड्या पूर्ण होण्यासाठी अजून एकाची गरज आहे". मग स्वतःच्या वर्गातील अशाच एका मुलाला हाक मारली आणि म्हणाले की जा त्या लाईनीत आंगठे धरून उभा रहा म्हणजे बैलांच्या नऊ जोड्या होतील!

माझी शाळा !

कोल्हापुर मध्ये नदी काठी विवेकानंद हायस्कूल आहे तेथे जेव्हा मी ८ वीच्या वर्गा मध्ये होतो तेव्हा श्री ए. शेख हे ईंग्रजीचे शिक्षक होते ते उलट्या हातावर काठीने मारायचे व इतक्या जोरात की मुलगा जमीनी पर्यंत हात खाली करत असे, पहिल्या पहिल्यादा तर खुप मार बसला ! पण जेवढे मारकुटे होते तितकेच प्रेमळ ! जे थोडे फार विदेशी भाषेची जाण आहे ती ह्यांच्यामुळेच !

नंतर १० वी ला कोल्हापुर हायस्कूल मध्ये आल्या वर ही खुप मार खल्ला ! कधी पाण्यासाठी मारामारी तर कधी जेवण्याच्या जागेवरुन मारामारी केली तेव्हा चांगलेच बदडले गेलो होतो ! रागाच्या भरात चाचणी परिक्षेचे पेपर फाडण्याचा प्रकार जेव्हा केला तेव्हा जी धुलाई दोन शिक्षकांनी केली होती ...... ती कधीच विसरणे शक्य नाही ! त्यामुळे शक्यतो मला येथील कुठल्याच शिक्षकांचे नाव देखील आठवत नाही आजकाल ;)

लहानपणी ५, ६ व सातवी बाहूबली हायस्कूल, हातकलंगडे येथे वसतीगॄहामध्ये देखील सकाळ सकाळी ५ वाजता उठणे हे पार्श्वभागी लात पडून व नंतर जोरात मुस्काट फोडून घेऊन दिवस चालू होत असे व संध्याकाळी आरती पर्यंत बोकडा सारखा मार !

* माझे त्या वेळचे मित्र आज देखील म्हणतात की त्या मारामुळेच मी ईतका निगरगट्ट् झालो आहे ;) कि कुणालाच जुमानत नाही :))

राज जैन
*********
मी सध्या स्वाक्षरी शोधत आहे सध्या मीळाली की येथे लिहीनच.

कोल्हापूर धुलाई केंद्र

जी धुलाई दोन शिक्षकांनी केली होती ...... ती कधीच विसरणे शक्य नाही ! त्यामुळे शक्यतो मला येथील कुठल्याच शिक्षकांचे नाव देखील आठवत नाही आजकाल ;)

या दोन शिक्षकांची नावे तरी तुम्ही विसरला नसाल.

अभिजित...
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.

हो आहे लक्षात नाव त्यांचे !

आनंदाचे दिवस कधी विसरू नये असे म्हणतात, त्यानूसार दुखः देण्या-याला विसरा व आनंदाचे दिवस दाखवण्या-याला लक्षात ठेवा ;)
काय म्हणता ?

राज जैन
*********
स्वाक्षरी लिहण्यात काही मजा नाई बा !

अरेरेरे...

समस्त प्रतिसाद कर्त्यांनो,
इथले प्रतिसाद वाचून शाळा नामक तुरुंगातील त्या आठवणी पुनर्जिवीत केल्यात!
आता कचेरीत होणारी खरडपटट्टी ह्यावर देखिल एक चर्चा सुरू करावी म्हणतो!!

 
^ वर