छडी लागे छम छम ........

शाळेंतील मुलांना चुकारपणाबद्दल शिक्षा देतांना शिक्षक क्रूरपणे वागल्याच्या बातम्या आपण वाचतो. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने सरकारला काही सूचना केल्या आहेत. त्या शिफारसींनुसार सरकार लवकरच शाळेंतील शिक्षकांवर, मुलांना शिक्षा करण्याचे प्रकार थांबावेत म्हणून, अनेक निर्बंध लादणार आहे असे कळते. या निर्बंधांनुसार चुकार मुलांना शारीरिक शिक्षा देता येणार नाहीत, लिखाण करण्याची शिक्षा -इंपोझिशन- देता येणार नाही तसेच त्यांना अपमानकारक वाटतील असे शब्दही त्यांच्या बाबतींत वापरता येणार नाहीत.

शिक्षणक्षेत्रांतील बहुसंख्य शिक्षकांना सरकारचा हा एकतर्फी निर्णय मान्य नाही. पण सरकार यावर संबंधितांशी विचार-विनिमय करून पूर्ण विचारांती निर्णय घेण्याची शक्यता फार कमी आहे कारण सरकारला वर्गपाठ व गृहपाठ करण्याची सवय नाही हे शिक्षणाबाबत घेतलेल्या अनेक निर्णयांवरून दिसून आले आहे. (उदा. चौथीची परीक्षा बोर्डाची असावी हा निर्णय).

दिनांक १६-८-२००७ च्या टाइम्स् ऑफ् इंडिया च्या संपादकीय पृष्ठावर दोन्ही बाजू मांडणारे लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांतील मुख्य मुद्दे असे आहेत :
१) बालहक्कसंरक्षण आयोगाच्या बाजूने जे लिखाण आहे त्यांत शिक्षकांच्या क्रौर्याच्या काही घटनांचा उल्लेख करून असे म्हंटले आहे की या बाबतींत कोणताही कायदा अस्तित्वांत नसल्यामुळे शिक्षकांविरुद्ध कारवाई करणे शक्य नसते. शिवाय मुलांच्या भवितव्याची काळजी असल्यामुळे बहुसंख्य पालक त्याबाबतींत नरमाईचे धोरण स्वीकारून मुलांवर होणारा अन्याय सहन करीत राहतात.
२) सरकारने निर्बंध लादण्याच्या विरोधांत जे लिखाण आहे त्यांत, असा कायदा अस्तित्वांत आल्यास त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता आहे अशी भीति व्यक्त करण्यांत आली आहे. कारण प्रस्तावित संहिता, ६ ते १७ वर्षांची मुले मुळांत निष्पाप व शिस्तप्रिय असतात या गृहीतकावर आधारित आहे; आणि हे गृहीतक निर्विवाद खरे नाही. त्यांत पुढे असे सूचित केले आहे की जे सरकार आपल्या राजकीय कल्पना लोकांवर लादण्यासाठी हिंसेचा अवलंब करीत असते त्या सरकारला असे निर्बंध लादायचा (नैतिक) अधिकार नाही. शिवाय बालहक्क संरक्षण आयोगाची उद्दिष्टे कितीही चांगली असली तरी त्यामुळे सरकारच्या हाती शाळांवर अनावश्यक नियंत्रण ठेवण्यासाठी कारण नसतांना एक हत्यार मिळणार आहे.

मला वाटतं सरकारने क्रांतिकारक बदल करण्याचा मोह टाळावा व संबंधितांशी नीट विचार-विनिमय करून टप्प्याटप्प्याने निर्बंध अंमलांत आणावे.

आपणास काय वाटते?

लेखनविषय: दुवे:

Comments

हेच वाटते

मला वाटतं सरकारने क्रांतिकारक बदल करण्याचा मोह टाळावा व संबंधितांशी नीट विचार-विनिमय करून टप्प्याटप्प्याने निर्बंध अंमलांत आणावे.

हेच वाटते. सब घोडे बारा टके करुन कसे चालेल.
प्रकाश घाटपांडे

हेच

प्रकाशरावांशी सहमत.

माझ्या लहानपणी वर्गातील मुले ही शिक्षकांच्या पायात पाय घालून पाडणे, त्यांच्या सायकलींची हवा सोडून देणे. शिक्षकांना खडूचे तुकडे फेकून मारणे. वर्गात कागदाची विमाने उडवणे या क्रीडांमध्ये प्रवीण होती. शिक्षा केल्याने अशा मुलांच्या मृदू आणि कोमल मनांवर परिणाम होण्याऐवजी अशा विद्यार्थ्यांच्या संगतीमुळे शिक्षकच मनाने अधिक कणखर झाले. ;)

मान्य

आपले म्हणणे मान्य. शिक्षकाला त्याचे/तीचे आधी हक्क द्या, शिकवण्याची मोकळीक द्या, योग्य तो पगार द्या आणि मग त्याच्या/तिच्याकडून योग्य त्या अपेक्षा करा.

बरोबर

शिक्षकांना योग्य तो पगार द्या आणि त्यानुसार फिया भरायची तयारी देखिल असु द्या... कारण गाडी त्यावर घसरली की सगळी समीकरणे लगेच बदलतात!!

याचा काय संबंध?

शिक्षकाला त्याचे/तीचे आधी हक्क द्या, शिकवण्याची मोकळीक द्या, योग्य तो पगार द्या आणि मग त्याच्या/तिच्याकडून योग्य त्या अपेक्षा करा.

हा भंपक मुद्दा आहे या चर्चेत. याचा मुलांच्या मारहाणीशी नि शिक्षांशी काय संबंध आहे?
म्हणजे हक्क/पगार कमी केला तर मुलांच्या शिक्षा वाढवायच्या की काय?
असं कसं?
मुलांशी कसं वागायचे याचा पगाराशी संबंध असु नये.

आपला
गुंडोपंत

खुलासा

शिक्षकाच्या हक्कांचा आणि मुलांच्या मारहाणीचा संबंध आहे असे मी म्हणत नाही. मी छडी लागे छम छमच्या बाजूने पण बोलत नाही, त्याला विरोधच आहे पण अशी शिक्षकांची गुणवत्ता होण्याची कारणे काय असू शकतात याचा विचार करतोय. ह्या चर्चेत मुलांना मारणे बरोबर का चूक हा प्रश्न नसून असे कायदे करणे अथवा एकतर्फी करणे योग्य की अयोग्य हा प्रश्न आहे.
(मला वाटतं सरकारने क्रांतिकारक बदल करण्याचा मोह टाळावा व संबंधितांशी नीट विचार-विनिमय करून टप्प्याटप्प्याने निर्बंध अंमलांत आणावे.
आपणास काय वाटते?
)

मला वाटते, या चर्चेतील मुद्यांवर बोलायचे झाल्यास सरकारकडून होत असलेली ही दिशाभूल आहे, आणि महाराष्ट्रात तरी (बाकीच्या राज्यांचे माहीत नाही) हे नक्की पहायला मिळते आणि मी त्यापुरतेच बोलतोय असे समजा हवे तर (जरी भारतभर याहून वेगळी असवस्था नसेल असे वाटतयं तरी). शिक्षणाचा दर्जा खालावतोच आहे, त्यात काही सुधारणा नाही, पुस्तके चुकीची छापणार, शिवाय शिक्षक म्हणून न घेता, शिक्षकसेवक म्हणणार आणि रोजनदारीच्या पद्धतीने ठेवणार. - अशा पद्धतीने ना लायकीचे शिक्षक मिळणार ना शिक्षण. मग मुलांची काळजी घेतो हे दाखवण्यासाठी केलेली ही केवळ दिखाऊ मलमपट्टी आहे.

आता जे पालक आपल्या मुलांना हजोरो रुपये वर्षाला शुल्क भरून आणि बर्‍याचदा बळजबरीच्या देणग्या देऊन ज्या काही चांगल्या वाटणार्‍या शाळांत पाठवतात तिथे छडी लागे छम छम होते का? पण लोकसंख्येचा विचार केल्यास ज्यांना असे परवडते ते कमीच असणार- १००% तर नक्कीच नसणार.

तुम्ही विचार करा ज्या कुठल्या प्रोफेशन मधे आपण काम करत असू त्यात पैशाचा आणि/अथवा मानाचा योग्य मोबदला मिळाला नाही तर आपण कामे करू का? आणि गरजेपोटी केली तर त्यात गुणवत्ता असेल का? शेवटी शिक्षकपण माणूसच असल्याने मानसीक क्रिया-प्रतिक्रीया या स्वतःला मिळणार्‍या वागणूकीवर आणि मोबदल्यावरच हळूहळू तयार होणार. आज शिक्षक हा पेशा "सॉफ्ट टारगेट" आहे, समाजातला सर्वात कमकूवत घटक आहे. त्याला वर म्हणल्याप्रमाणे, ना धड पैसे, ना धड खात्रीचे काम, निवडणूकांना बसवणार, पुढार्‍याच्या बापाच्या जयंत्या/मयंत्या साजर्‍या करायला लावणार, परत मे महीन्यात म्हणणार की स्वतःला सुधारण्यासाठी काहीतरी "कोर्सेस" करायला हवेत. थोडक्यात गुलामाची वागणूक आणि अपेक्षा उद्याच्या भारताचे स्वतंत्र नागरीक तयार केले पाहीजेत.

बरे अमेरिकेत, बाकी कुठे माहीत नाही, असे मुलांना फटके बसले तर शिक्षकाला परीणाम भोगावे लागतील. पण येथे सरकारी शाळेत पण पगार चांगले असतात, वातावरण चांगले असते, एका शिक्षकाला २०-२२ मुलांकडेच लक्ष द्यावे लागते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, मुलांना मारणे हेच कायद्याने गुन्हा ठरवला गेला आहे - मग ते शिक्षक असो अथवा पालक. घरात मुलांना फटके बसलेले कळले तर समाजसेवा खात्या कडून समज मिळण्या पासून पालकत्वाचे हक्क काढण्यापर्यंत काही होऊ शकते. आपल्या कडे असे मुलांना अशा प्रकारचे सर्वसमावेशक हक्क (घरात अथवा दारात) द्यायला "राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग" तयार आहे का? बर तसे कायदे केले तर पालक ऐकतील का अथवा मान्य करतील का? (पाळतील का हा अजूनच वेगळा प्रश्न आहे!)

या शेवटच्या मुद्याबाबत मला वाटते की तसा सर्वसमावेशक हक्क देण्याची नितांत गरज आहे, नुसतेच शिक्षकाला झोडपण्याची आणि दिशाभूल करण्याची नाही...

हो मान्य आहे

मग मुलांची काळजी घेतो हे दाखवण्यासाठी केलेली ही केवळ दिखाऊ मलमपट्टी आहे.
खरं आहे अगदी मान्य!
शिक्षकांचे हाल असतात यात शंकाच नाहीये.
त्यांचे पगारही चांगले कडक असलेच पहिजेत. एका शिक्षकाला एकावेळी जास्तीत जास्त २५ मुलांनाच शिकवता येईल अशीही तरतूद हवी.
यापेक्षा जास्त मुले दिल्यास त्याचे जबाबदारी मुख्याध्यापकांवर असावी नि पर्यायाने संस्थेच्या चालकांवर. हा अ-जामिनपात्र गुन्हा असावा यात संचालकांना २४ तासात अटकेचा मुद्दा असावा.
अर्थात हे मला वाटते... इथे अनेक साध्याशा गोष्टी खुद्द शिक्षंणमंत्र्यांना वाटूनही मंत्रालय हलत नाही तिथे गुंडोपंत कोण?

मारहाण विषयक सर्वसमावेशक कायदा यावा या मताचा मी ही आहे. मुलांना पालकांनीही मारू नये. यासंबंधी सर्व समावेशक कायदा झाला तर खरच काही घडेल.

आपला
गुंडोपंत
(विकासराव फारच मुद्देसूद लिहितात नि मुद्दाही थंड डोक्याने दाखवून देतात, त्यामुळे चुकीची का होईना पण तावातावाने चर्चा हरवून जाते हो! ;) )

इद्या येई घमघम

मास्तराले मास्तराचे काम करुद्या मास्तराचा पोरांला धाक पाहिजे
तसा त्याला शिकशा करायला टैम नै. त्यो जनगणना,निवडणूकीच्या कामात,लै कामात गुतेल हाये
मह्या येळंला गणीताच्या मास्तरानं बाजीचं एक पाय मह्या हातावर ठीउन् शिकीले महा बाप म्हणला लयी भारी मास्तर तेच्याशीवा वठणीवर नै येत पोरं .

बाबूराव

तेच्या मारी

तेच्या मारी त्या मास्तराच्या
शाळीच्या बाहीर पल्ड्यावर धुवाचा ना त्याला...
जौ द्या भौ... इडं लोकं मलाच धुवाच्या मागं पल्डे हाये...

पन काहो बाबुराव मंग गनितं आली का येवडं करून?

आपला
कंचीच गनितं कदी बि इचारा कदिइ बि न येनारा
गुंडोपंत

शारीरिक शिक्षा

शारीरिक शिक्षा - ह्याची व्याख्या केली गेली असेल तर बरे. सगळे काम सोपे होईल. भींतीकडे तोंड करून थोडा वेळ उभे करणे, बाकावर थोडा वेळ ऊभे करणे, दंगा करणार्‍या मुलाला वर्गात समोर उभा करुन वर्गाला शिकवायला लावणे, ह्या परीणामकारक शारीरिक शिक्षा आहेत व त्या असू द्याव्यात.

शिक्षकांच्या क्रौर्याच्या काही घटनांचा" ज्या वृत्तपत्रातून वाचल्या आहेत त्या भयानकच होत्या. त्या बाबतीत कारवाई न करता येण्यासारखा कसला संभ्रम? नक्कीच आहे आत्ताच्या कायद्यात योग्य तरतुद. मला आत्ता माहीत नाही ऩक्की कशी पण जर तशी तरतूद नसेल अन सरकारने आत्ता केली तर ते योग्यच केले.

बाकी एक धपाटा मारणे (डोळे, डोके व नाजुक् भाग, सुज, रक्तपात्, अवयव रंगबदल इ. सोडून)ह्याबाबत मात्र शिक्षकाला शिक्षा नको, शिवाय वर्षात अमुकच् फटके, एका विद्यार्थाला एका महीन्यात २ पेक्षा जास्त नाही तसेच दोन फटक्यात कमीतकमी ४८ तासाचे अंतर अश्या तरतुदी असाव्या. मग काय कायद्याच बोलायच म्हणजे सगळ एकदम स्पष्ट , सर्वसमावेशक नको का?

शिक्षकाचा पगार (वाढवणे), काम (कमी करणे), पर्यायाने फी वाढ ह्या अवांतर बाबी नकोत उलट् शिक्षा करायचे काम कमी करून जरा भार हलका केला नाही का?. सरकार एकवेळ हा अध्यादेश, कायदा मागे घेईल ह्या अवांतर गोष्टी टाळायला. :-)

असो हे सगळे प्रकरण - "एकतर्फी निर्णय" , "संबंधितांशी विचार-विनिमय न करणे" ह्याच कारणामुळे आहे असे वाटते, त्यात फार काही वावग नाही म्हणा.

१००% अमान्य!

बाकी एक धपाटा मारणे (डोळे, डोके व नाजुक् भाग, सुज, रक्तपात्, अवयव रंगबदल इ. सोडून)ह्याबाबत मात्र शिक्षकाला शिक्षा नको, शिवाय वर्षात अमुकच् फटके, एका विद्यार्थाला एका महीन्यात २ पेक्षा जास्त नाही तसेच दोन फटक्यात कमीतकमी ४८ तासाचे अंतर अश्या तरतुदी असाव्या.

१००% अमान्य!!
तुम्ही कोण ठरवणारे??? कोणती शिक्षा कोणत्या मुलाच्या मनावर काय परिणाम करणार आहे हे तुम्हाला कसे कळणार?
त्याच्या घरी काय स्थिती आहे हे तुम्हाला काय माहित?
त्याला नक्की काय त्रास आहेत याची तुम्हाला काय कल्पना?

मुलांना आजिबात मारायला नको!

सगळ्यात आधी मुलांना तर विचारा की शिक्षा हव्यात की नकोत ते...

आपला
गुंडोपंत

पंत शांत

नाही हो मी आज् कुठले कपडे घालायचे हे ठरवु शकत नाही तर कोणी , कोणाला मारण काय ठरवणार? अहींसेचे समर्थक आम्ही... :-)

बाकी ठराव, वाटाघाटी, चर्चा, कायदा, अंमलबजावणी, सर्व घटकपक्षांना मान्य असा तोडगा, आजवर चालत आलेला कोणाचा "हक्क्" हे सर्व सांभाळून काहीतरी तडजोड्...गंमत केली.

ओके पंत, शांत शांत.. कोणी कोणाला मारू नये, कदाचीत दंड किंवा निलंबन (वर्ष वाया) ह्याच पुरे :-) माझ्या मते एक वर्ष वाया जाण्यापेक्षा एखादा फटका....असो माझे मत पण तुम्ही त्रास करून घेऊ नका...

मारू नये!

मुलांना आजिबात मारू नये. मग ती कसलीही चूक असो!
कोणत्याही वरून लावलेल्या शिस्तीपेक्षा आतून, मनातून आलेली शिस्त सगळ्यात प्रभावी असते. माराच्या दहशतीतून आलेली शिस्त खरंच शिस्त असते का?
जे काम प्रेमाने होते ते शिस्तीने होत नाही. माझे असे अतिशय शिस्तीत वाढलेले मित्र बाहेर कसे वागायचे ते पाहिले तर पालकांना धक्काच बसला असता. शिवाय शिक्षक मारकुटे असले तर त्या विषयाचे कसली गोडी लागणार? नकोसाच वाटणार त्यांचा तो तास नि तो विषय.
कशावरून त्या दिवशी बाई किंवा गुरुजींचे घरी भांडण झालेले नसेल? कशावरून इतर कोणता राग ते इथे मुलांवर काढत नसतील?

या कायद्याला माझ संपुर्ण पाठीबा आहे. नव्हे हा कायदा व्हायला कमीत कमी वीस वर्ष उशीर झाला आहे. अजून किती लहान मुलांचे मुल पण शिक्षकांच्या वैयक्तिक शिस्तीच्या कल्पनांपाई कुस्करणार आहात?

अजिबात कोणत्याही परीस्थितीत मुलांना मारहाण नको!
आता लवकरात लवकर आणा हा कायदा...
शिक्षकांचे पगार नि मुलांच्या शिक्षा यांचा संबंध असलाच तर तो फक्त शिक्षकांनी मुलांवर काढलेले फ्रस्ट्रेशन इतकाच आहे.

आणी याकायद्याच्या उल्लंघनांच्या शिक्षाही कडक असायला हव्यात.

आपला
मुलांच्या माराच्या संपुर्ण विरोधातला
गुंडोपंत

मग

शिक्षणक्षेत्रांतील बहुसंख्य शिक्षकांना सरकारचा हा एकतर्फी निर्णय मान्य नाही.
मग शिक्षण क्षेत्रात झालेले जागतीक बदल शिक्षकांपर्यंत आलेलेच नाहीत म्हणायचे तर! काही राष्ट्रात तर् असे कायदे ७० सालापासूनच लागू झाले आहेत.

निर्णय मान्य नसणारे हे बहुसंख्य शिक्षक कोण आहेत? कोणता सर्व्हे? सँपल कसे निवडले होते?

आपला
गुंडोपंत

बहुसंख्य शिक्षक

निर्णय मान्य नसणारे हे बहुसंख्य शिक्षक कोण आहेत? कोणता सर्व्हे? सँपल कसे निवडले होते?

काही कारणाने माझ्या संपर्कांत अनेक शिक्षक येत असतात. त्यांचा "मुलांना शिक्षा करू नये" या निर्णयाला विरोध आहे. आपण (किंवा आणखी कुणीही) आपल्या संपर्कांत येणार्‍या शिक्षकांचे मत घेतले तर आपल्यालाही तेच आढळून येईल. मला वाटतं त्यानिमित्ताने तरी (मला खोटे पाडण्यासाठी का होईना) शिक्षक वर्गाशी संपर्क साधावा व मत चाचणीचे निष्कर्ष मांडावेत.

टीप : मी हे रागाने लिहीत नसून मनापासून लिहीत आहे.

शिस्ती शिवाय शिक्षण व्यर्थ आहे.

मुलानां घडवणे ही कला आहे आणि ही शिक्षक व पालक याना अवगत असायला हवी. शाळकरी मुलांत शिक्षक व पालक जे शिकवतील तेच त्यांच्या मनावर कोरले जाते. शिस्ती शिवाय शिक्षण व्यर्थ आहे पण शिक्षा शारिरीक नसावी. त्यासाठी साम, दाम, दंड आणि भेद असे वर्गीकरण व्हावे. अपमान, मार खाणे कुणास आवडेल? अशा गोष्टी कायमच्या मनात बसतात. एक तर न्युनगंड तरी किंव्हा द्वेश भावना तरी मनात रूजू लागते. एका मर्यादे पलीकडे माराचा परिणाम शून्य होतो. आपल्या पाल्याचे गुण, दोष हे पालकाला माहीत असयला हवे. शाळेत शिक्षा झाल्यास ती माझ्या पाल्यास होणे शक्य नाही असा ग्रह नसावा.

मुलांची दुखरी नस म्हणजे त्यांचें नाजुक मन असते, ती कुठे व किती दाबावी हे शिक्षक व पालक याना माहित हवे. वेळोवेळी प्रेमाने समजुत घालणे अवलंबील्यास पुढचा 'क्रांतिकारक बदलाचा' प्रश्नच येणार नाही.

हेमंत

फटकावून काढा! :)

शिक्षकांना जेथे आवश्यक वाटेल तेथे त्यांनी मुलांना फटकावूनच काढले पाहिजेत! फक्त मार मुका असावा अन् सुजेपर्यंत वगैरे मारू नये इतकंच! परंतु छडीला पर्याय नाही! :)

आपला,
(घरात बापाचा अन् शाळेत शिक्षकांचा यथास्थित मार खाऊन ठणठणीत असलेला! :) तात्या.

इथेच तर लोच्या आहे ना...

शिक्षकांना जेथे आवश्यक वाटेल तेथे
इथेच तर लोच्या आहे ना... शिक्षकांचे घरी वाजले असेल अन् काढत असतील ते सगळे बिचार्‍या पोरांवर तर?

अजिबात नाही... पोरांना मारण्या बदडण्याचे काहीही कारण नाही.
"मी पण मार खाल्लाय आता तू खा" हे म्हणणे खरंच योग्य आहे का?
उद्या मी तात्यांना शेअर्स मध्ये ट्रेडिंग कसे करावे हे शिकवत असलो, नि तात्यांना चांगले दहा पाच लाखाच्या ख्ड्ड्यात जावू दिले. वर म्हणालो की, 'त्यात काय मी पण गेलो आहे खड्ड्यात, तात्या यातून तुम्ही शिकणार बरका, शेअर बाजार कसा चालतो ते! ' तर केवळ मी 'शिकवतो आहे' म्हणून हे तुम्हाला चालणार आहे का?

आपला
गुंडोपंत

व्रात्य मुले

शिक्षकांना जेथे आवश्यक वाटेल तेथे त्यांनी मुलांना फटकावूनच काढले पाहिजेत!
(घरात बापाचा अन् शाळेत शिक्षकांचा यथास्थित मार खाऊन ठणठणीत असलेला! :) तात्या.

अगदी बरोब्बर! "काही व्रात्य मुलांना" आजही दोन चार धपाटे मारावे लागतात. (ह. घ्या) ;-)

व्रात्य मुले - उपाय

अगदी बरोब्बर! "काही व्रात्य मुलांना" आजही दोन चार धपाटे मारावे लागतात.

बिचार्‍यांना धपाटे मारण्या ऐवजी, मुंज करून बघा! (ह. घ्या) ;-)

मुंज आणि बेडूक

बिचार्‍यांना धपाटे मारण्या ऐवजी, मुंज करून बघा! (ह. घ्या) ;-)

मुंज करताना म्हणूनच मांडीत बेडूक भरण्याची भीती घालत असावेत.
प्रकाश घाटपांडे

सकाळमधली बातमी

अभय अभियान

अभिजित...
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.

सकाळमधली बातमी - आठवण

विजया कदम (मानसपोचार तज्ज्ञ) - "टाचणी पडली, तरी आवाज यायला पाहिजे एवढी शांतता ठेवा,' असा संवाद शाळांमध्ये नेहमी ऐकायला मिळतो. पण किलबिलाटाशिवाय शाळा असूच शकत नाही. विद्यार्थ्यांना शिक्षा करण्यापेक्षा त्यांच्याशी प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न केला, तर शिक्षा करण्याची वेळच येणार नाही.

आम्ही नशिबवान होतो की असा विचार करणार्‍या आमच्या वेळच्या मुख्याध्यापिका होत्या. (आमच्या आधी काही वर्षे) एका वर्ग शिक्षिकेनेवर्गातील मुलांना मधल्या सुट्टीतपण ओळीने बाहेर येण्या इतकी शिस्त लावली होती. पण एकदा त्या वर्गाला तसे बाहेर पडताना आमच्या मुख्याध्यापिकेने पाहीले आणि आश्चर्य वाटले. पुढे त्यांनी तो प्रकार कायम होता हे नक्की केले आणि मग आधी त्या शिक्षिकेला "लेक्चर" दिले आणि मग वर्गात जाऊन मुलांना सांगीतले की असली शिस्त योग्य नाही मला मुलांचा गडबडाट ऐकायला येयलाच पाहीजे...

अर्थात याच आमच्या (मुख्याध्यापक) बाई जेंव्हा गरज होती तेंव्हा कडक पण असायच्या आणि मुलाच्या चुकीच्या/बेशिस्त/हिंसक वागण्याविरुद्ध कुठलाही निर्णय घेताना मागे-पुढे पाहायच्या नाहीत हे ही आम्ही पाहीले होते...

लोकसभेत पण ...

""लोकसभेतील खासदारांचे सध्याचे वर्तन लक्षात घेता, त्यांच्यापेक्षा मुलेच अधिक शिस्तबद्ध आहेत, असे म्हणावे लागते,'' अशा शब्दांत लोकसभेचे सभापती सोमनाथ चटर्जी यांनी खासदारांच्या सभागृहातील वर्तनावर कोरडे ओढले. ........
लोकसभेत गोंधळामुळे कामकाजात वारंवार व्यत्यय येत असल्याने चटर्जी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सभागृहाचे कामकाज शांततेत पार पडावे म्हणून ते सातत्याने वेगवेगळे प्रयत्नही करीत असतात. लोकसभेत आज शून्य प्रहरादरम्यान काही सदस्य आपसांत गप्पा मारत असल्याचे दिसताच चटर्जी संतप्त झाले. """सभागृहात हे काय सुरू आहे,'' असा प्रश्‍नही त्यांनी केला. तसेच, ""तुमच्यापेक्षा मुलेच अधिक शिस्तबद्ध आहेत,'' अशी टिप्पणीही त्यांनी केली.

थोड्या वेळानंतर सभागृहातच काही सदस्य आपसांत चर्चा करत असल्याचे निदर्शनास आल्याने चटर्जी म्हणाले, ""ही कसली चर्चा सुरू आहे? चर्चाच करायची असेल, तर बाहेर जाऊन करा.'' आरक्षण आणि सेतुसमुद्रम प्रकल्पावरच्या मुद्द्यावरून सत्तारूढ संयुक्त पुरोगामी आघाडी आणि विरोधी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सदस्यांत शाब्दिक खडाजंगी झाली. त्यावर, ""सभागृहात असेच चालू राहिले, तर मी रोज एकेकाला बाहेर काढेन,'' अशी तंबीही त्यांनी दिली. एवढे झाल्यानंतरही कॉंग्रेसचे सदस्य एस. पी. गोयल अचानक उभे राहून बोलण्याचा प्रयत्न करू लागले. ""तुम्ही खाली बसा; नाही तर मी तुम्हाला बाहेर काढेन,'' असे चटर्जींनी सुनावले. तसेच, "गोयल यांना खाली बसवा; अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल,' असे त्यांनी संसदीय कामकाज खात्याचे राज्यमंत्री बी. के. हांडिक यांना सांगितले.

अवांतरः मला लोकसभाध्यक्षांना सांगावेसे वाटते की , "ही कसली चर्चा सुरू आहे? चर्चाच करायची असेल, तर बाहेर जाऊन करा.'' या त्यांच्या वाक्या पुढे त्यांनी खासदार मंडळींना सांगावे की , "चर्चा कशी करावी हे उपक्रमावर जाऊन पहा! " :))

 
^ वर