प्रौढ मंडळी थोडं समजुतीने घेणार का?
'आता तुम्ही मोठे झालात. शिंगं आली ना...' सर्व साधारण माणसाच्या घरात बर्याच वेळा कानावर येणारे हे वाक्य.
विषय नाजुक आहे पण ही प्रौढ मंडळी लहानाना कधीच परिपुर्ण का समजत नाहीत? नटसम्राट आप्पासाहेब बेलवलकरांनी नवी पिढी कृतघ्न आहे जवळ-जवळ असंच सर्वांच्या मनावर बिंबवले. काही मुलाना तर आपले आईवडिल अडचणीचे वाटु लागतात. अशा स्थितीत त्या आईवडिलाना आपले वृध्दत्व शाप वाटले नाही तर नवलच. पण मग नाण्याला दोन बाजु असतात. ...दुसर्या बाजूचे काय?
खरंतर या प्रौढांचा उपदेश अमंलात आणुन देखिल यांचे समाधान होत नसते. नमून वागण्यात कमीपणा न मानणारे तरूणही नव्या पिढीत आहेत. विषेशत: वृद्ध जोडप्यात साथीदार नसेल तर चिडचीड ही जास्तच असते. आपल्याला लहानाचे मोठे केले याची जाण ठेऊन पालकांच्या वृद्धापकाळात त्यांना चैनीत राहु दे असा तरूणांचा दृष्टीकोन निराळा असु शकतो. परंतु स्वत: च्या आयुष्यात काटकसर केलेली असल्याने वृध्दापकाळात त्यांना हा पैशाचा होणारा अपव्यय वाटतो. यांच्यात सर्वात मोठा बदल हा नवी सून घरात आल्यावर होतो. कुटुंबाची सत्ता आपल्या हातून जाणार असा यांचा ग्रह होतो. आता मुलगा आपल्या आज्ञेबाहेर जाणार हे जणू त्यांनी गृहीत धरलेले असते. सुरूवातीला नाही म्हणता लग्नाची नवलाई असल्याने नव्या युगूलाचे त्यांच्याकडे थोडे दुर्ल़क्ष होते आणि मग इथुनच मन कलुषीत व्हायला सुरूवात होते. छोट्या-छोट्या गोष्टीत नव्या गृहीणीचे दोष दिसु लागतात. दोन कुटुंबातील खाण्याजेवण्याच्या पद्धती भिन्न असल्याने त्यावरून त्यांची चिडचीड होते. अजून एक गोष्ट अशी की या मोठ्यांच्या भावना जुन्या वस्तुत गुंतलेल्या असतात. एखादी जुनी ओंगळवाणी वस्तु देखिल त्यानां दिवाणखाण्यात हवी असा अट्टहास असतो. बरेचदा 'आम्ही काय संसार केला नाही काय?' हे यांचे पालुपद चालुच असते. वास्तविक पाहता ते ही ह्या परिस्थितीतून गेलेले असतात. वारंवार (पालक -मुलगा-सून या) त्रिकोणात खटके उडायला लगतात. शेवटी परिणाम व्हायचा तोच होतो. बायको नवर्याला वेगळे होण्यास सुचवते.
आता यात मरण कुणाचे होते ते वेगळे सांगायला नको. बिचारा मुलगा. त्याला आई-वडिल ही प्रिय असतात तितकेच आदरणीय ही असतात, पण सर्वसाधारणपणे लग्न झालेल्या मुलाकडे पाहाण्याचा दृष्टीकोन म्हणजे 'बायकोचा गुलाम' असाच असतो. हि अशी तारेवरची कसरत करत पालक आणि सौं. दोघीनां समाधानी ठेवण्याचे दिव्य जो करतो तोच संसाराची घडी व्यवस्थित बसवतो. पण हे दिव्य कितीजण करू शकतात? सर्वांकडेच वकृत्व प्राविण्य नसते. आपली बाजू मांडण्याची कला अवगत नसते. बरं ही मोठी माणसे कालांतराने तुटक वागतात त्याच्याशी संवाद साधणे देखिल कठीण होऊन जाते. संस्कार आणि कर्तव्याच्या ओझ्याखाली पुरता भरडला गेलेला तरूण मुलगा मनस्थितीत नसतो. त्यातच ऑफिसमधे कामचा उरक कमी होऊन वरिष्ठांचा मनस्थाप सहन करावा लागत असतो. अशातच जास्त्तत जास्त वेळ तो घराबाहेर राहातो. कधी कधी भावनांचा उद्रेक होऊन शेवटी तो नशेच्या आहारी जाण्याची शक्यता असते. तरिही त्याची देवाकडे माफक मागणी असते वृद्ध पालक आणि सहचारिणी दोधे आपल्या सोबत राहोत. घरोघरी हीच परिस्थिति आहे असं म्हणणे खोटे ठरेल पण बर्याच जणांनी हा अनुभव घेतला असेल.
पण हे बदलायचं कसं? देवबाप्पा मुलाची मागणी मान्य करेल का? तुम्हाला काय वाटते ?
आ.
हेमंत
Comments
वा !
खुप खोल विचार व्यक्त केला आहे तुम्ही साहेब !
सहमत, आज देखील माझी आई सून आली नाही आहे व ती माझ्या पासून २००० किमी. वर राहते तरी देखील माझ्या होणा-या बायको बद्दल् / आपल्या सूने बद्दल ती असेच काहीतरी बोलत राहते ;) तीला मी हा लेख प्रिंट काढून वाचण्यास देईन.
राज जैन
*********
मी सध्या स्वाक्षरी शोधत आहे सध्या मीळाली की येथे लिहीनच.
घरोघरी मातीच्या चुली..
हेमंतराव,
ललना, माहेर, सुनिता, असले दिवाळी अंक नका वाचत जाऊ हो फार! त्यातल्या अत्यंत टंपड अन् फालतू अशा बहुतांशी कथांतून हे असेच विषय अगदी मनसोक्त चर्चिलेले असतात! :)
आपला चर्चाविषय मला व्यक्तिशः मुळीच आवडला नाही असे नम्रपणे नमूद करतो. याला येणार्या प्रतिसादांच्या खिचडीतून किंवा प्रतिसादांच्या मंथनातून काहीही निष्पन्न होणार नाही असेही मला वाटते! असो..
आता आपल्या चर्चविषयावर माझे मत खालीलप्रमाणे -
अहो घरोघरी मातीच्या चुली! आपण वर नमूद केलेले जनरेशन गॅपचे प्रश्न अन् वाद, सासू-सून-मुलगा यांचे वाद हे प्रत्येकच पिढीत दिसतात. फक्त स्वरूप वेगळं पण त्यातील जनरेशन गॅपचा मुद्दा हा पिढी दरपिढी तसाच चालत आलेला असतो. त्यामुळे हे असंच चालायचं आणि जे चाल्लंय ते बरं आहे असं म्हणायचं!
शिवाय व्यक्ति तितक्या प्रकृती! त्यामुळे आपण उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा अनुभव थोड्याफार फरकाने सगळ्यांनाच येतो/येत असावा!
असो, माझ्यापुरतं बोलायचं तर मी अजुनही फक्त माझ्या आईचा (हल्लीच्या फॅशनेबल भाषेत बोलायचं तर 'ममाज गुड बॉय' आहे! :)
सबब, सासू-सून-मुलगा यांचे वाद, मुलावर मालकी, असले प्रश्न आमच्या घरात सुदैवाने उद्भवलेलेच नाहीत! :)
कसें? :)
आपला,
(एक रसिक अविवाहित) तात्या.
मजकूर संपादित. अनावश्यक वाटणारा मजकूर संपादन मंडळ अप्रकाशित करत आहे.
हरकत काय?
अहो कोणाला वाचून चर्वितचर्वण करायचे असेल तर हरकत काय म्हणतो मी? काही प्रसिद्ध लेखकांवर काहीजण सतत अशाच चर्चा करत असतात तेव्हा आम्ही नाही म्हणत उबग आला.
घरोघरी मातीच्या चुली हा मुद्दा पटला बरं का?
चूल पेटवण्याच्या विचारात,
राजीव.
बरं बरं! :)
मजकूर संपादित. अनावश्यक वाटणारा मजकूर संपादन मंडळ अप्रकाशित करत आहे.
बरं बरं! जशी आपली मर्जी!
च्यामारी पण तुमच्या संपादक मंडळात कोण कोण मंडळी आहेत ते तरी एकदा सांगा की मेल्यानो! :)
तात्या.
अगदीच असहमत तर नाही ना?
तात्यासाहेब,
जे तरूण ह्या परिस्थितीतून जात आहेत त्याना ह्या चर्चेतून काही मार्गदर्शन व्हावे इतकाच हेतू होता. काही चुकले असल्यास क्षमस्व.
आ.
हेमंत
छे हो..
जे तरूण ह्या परिस्थितीतून जात आहेत त्याना ह्या चर्चेतून काही मार्गदर्शन व्हावे इतकाच हेतू होता. काही चुकले असल्यास क्षमस्व.
छे हो, आपलं काही चुकलं आहे असं मला बिलकूल म्हणायचं नव्हतं हेमंतराव!
असो.. चालू द्या.
जे तरूण ह्या परिस्थितीतून जात आहेत त्याना मी इतकंच सांगेन की आपल्या सत् सद् विवेकबुद्धीला पटेल तसेच वागा. मग ते वागणे बायकोच्या बाबतीत असू दे किंवा आईच्या बाबतीत!जास्त विचार करत बसू नका, तसे केल्यास डोक्याला नस्ता ताप होण्यापलिकडे अन्य काहीही होणार नाही..
आपला,
(अविवाहित) तात्या.
--
कुत्र्याच्या शेपटासारखे झालेले पिंड आमचे! ते भगवतगीतेच्या नळकांड्यात घातले तरी सरळ थोडेच होणार आहेत?! :) (-इति वासूअण्णा. नाटक-तुझे आजे तुजपाशी, लेखक-भाईकाका.)
तात्याबा हळू!
तात्याबा जरा हळू!
आपले नवीन मंडळींना लिखाणासाठी प्रोत्साहन द्यायचे असे ठरले आहे ना?
(कोण म्हणे असे ठरवले रे?? पाहु का तुझ्या कडे, काय रे गुंड्या चार दिवस झाले नाही इथे तर तुझ्या -डीला शिंग फुटले का रे?)
आता प्रस्तावाचे टायटल तरी वाचा बॉ!! ;)
आपला
गुंडोपंत
तथ्य
या प्रस्तावात तथ्य आहे असे मला वाटते.
काही हरकत नाही चर्चा करायला.
यात मला असे वाटते -
जुनी पीढी
----
मंडळी नवीन आहेत. नवीन पद्धती येणार. आपणही हेच केले होते काही वर्षांपुर्वी नाही का?
आता ते तसं करत आहेत. पण जरा तंत्र आमचंही सांभाळा हो. पैसे खर्च करायला हरकत नाही पण आम्हाला इतके पैसे खर्च करता येतात याचा जरा अंदाज तर येवू देत. जरा सवय तर होवू देत.
आमचं तरूणपण तुमच्या सकाळच्या दुधात साखर घालता यावी म्हणून साखरेसाठी रेशन च्या रांगेत उभे राहण्यात गेले आहे राजा! तेंव्हा जरा शांत व्हा आपण बोलू या नि जरा हळू मार्ग काढू या... तुमचा हा बदलाचा वेग आम्हाला सहन होत नाही बाबा. असं वाटतं आमचं घरंच नाही तर आयुष्यच बदलून टाकता अहात तुम्ही...
आम्हाला आवडते बुवा वांग्याची बटाटे घालून केलेली भाजी नि पोळी, लोणचं आपलं सगळ्यांच घरातच गप्पा मारत जेवणं. मग आरामात तुम्हा मुलांना घेवून बाहेर मारलेली एक चक्कर. आता या वयात सुनबाई म्हणते म्हणून एकदम सांजच्या ला बाहेरच्या न सहन होणार्या आवाजात जावून एकदम पिझ्झावर कसे राहणार आम्ही? तीही दरच आठवड्याला? एखाद्यावेळी ठिकाय, पण नेहमीच नाही बाबा जमत आम्हाला. बरं त बरं चामडं पचतही नाही हो धड!
जरा मधला मार्ग काढा... आम्हाला ही जरा मान द्या... नसेल जमत तर दिल्या सारखे करा! जरा चार वेळा विचारत जा नि दूर असलात तर किमान संपर्कात तरी रहाल? आम्ही थोडक्यात आनंदी राहणारी पीढी आहोत रे बाबा.
पण आमच्या ही काही भावनिक गरजा आहेत ना...
त्या ही वयानुसार बदललेल्या...
आपला
गुंडोपंत
हेमंतराव
चर्चा काही वाईट नाही, निर्णय मात्र होणार नाही हे निश्चित. एक मुद्दा पटला नाही --
>> कधी कधी भावनांचा उद्रेक होऊन शेवटी तो नशेच्या आहारी जाण्याची शक्यता असते.
अहो भावनांचा उद्रेक काय पुरुषांच्याच होतो? बायकांच्या होत नाही? घरात आई आणि बायको दारु पिऊन तर्र होताना दिसतात का मग? पुरुषांच्या हातात चार पैसे जास्त खुळखुळतात, आपण पुरुष आहोत काहीपण करू शकतो अशी गुर्मी असते म्हणून दारू ढोसता येते. भावनांचा उद्रेक होऊन नशेच्या आहारी गेलो असे कारण देणार्याला चाबकाने फोडायला हवे.
- राजीव.
मान्य!
मान्य नशेचे कारण हे पळपुटेपणाचे आहे.
पण प्रत्येक पिणार्याला चाबकाने फोडले तर मात्र काही खरे नाही बॉ!
मी तर आत्ताच चळाचळा कापतो आहे ;)
पण माझी काही हरकत नाही हो 'ही' ला पण प्यायची असेल तर!
मग तर काय बहार येईल... वा आम्ही दोघेही!
धुंदीत राहू... मस्तीत गाऊ
चल ग सखे मस्त पीत राहू!
आपला
चांगली मदिरा प्यायल्या नंतरचा काही धुंद काळ आवडणारा
गुंडोपंत
"बायकांनाही प्यायला आडकाठी असु नये याचे मी समर्थन करतो"
मि. दांडेकर
अहो गुंडोपंत दांडेकर वाचा की हो नीट,
मी काय म्हणालो - भावनांचा उद्रेक होऊन नशेच्या आहारी गेलो असे कारण देणार्याला चाबकाने फोडायला हवे.
आणि हिलाही पिऊ दे पण तुमच्याशी भांडले आता डोकं पिकलं एक पेग हाणते असं नको हो!
-राजीव.
हा हा हा!!
आणि हिलाही पिऊ दे पण तुमच्याशी भांडले आता डोकं पिकलं एक पेग हाणते
हा हा हा!!!
आमची बायको बायको पेग काय हाणेल, ती आम्हालाच हाणेल ;)
आपला
बाहेर रुबाबात पण आतुन बायकोला भिऊन असणारा,
गुंडोपंत
विषयांतर..
एकदम "चांदनी" आठवला "कॉनॅक शराब नही होती..."
आणि सख्खेशेजारी, "वहीनी तुम्हाला काय हवे - चहा की सरबत?" " मला व्हिस्की चालेल"
वेगळे राहणे
वेगळे राहणे
--------------
वेगळे राहणे याला असे वेगळे 'काळे वलय' का आहे?
काय हरकत आहे जर समजून उमजून असा निर्णय होत असेल तर?
याचा अर्थ असा नाही की मुले आईबापांना टाकून देत आहेत.
पण योग्य सोई सुविधा असतील तर काय हरकत आहे असे करायला? मात्र यात दोन्ही कडून असे होणे योग्य...
मी अशी ही दांपत्ये पाहीली आहेत की जी मुले मोठी झाल्यावर, लग्ने झाल्यावर मुलांना वेगळेच रहायला सांगितले आहे. (हे मुंबईत तरी घडतेच आहे.) आणी नंतरचे अतिशय सौहार्दपुर्ण संबंध पाहिल्यावर तर हे योग्यच आहे असे काहीसे वाटले. पण हे सगळीकडे जमेलच असेही नाही. शिवाय प्रत्येक कुटुंबाची विचारांची बैठक वेगळी.
खालील गोष्टींचा विचार करायला हरकत नाही.
१. सदैव घडणारा मोकळा संवाद
२. विचारपुर्वक योजलेले शब्द
३. विचारांचा मुक्तपणा व वेगळा विचार करण्याची कुवत
४. प्रत्येक प्रसंगाला उत्तर असलेच पाहिजे हा अट्टाहास सोडण्याची तयारी
५. बदल मान्य करण्याची तयारी
यातून काहीतरी उत्तर नक्कीच मिळत जात असावे असे वाटते.
याशिवाय अतिशय ताणाताणीच्या प्रसंगांमध्ये निव्वळ समोरच्या व्यक्तीच्या भावना ओळखुन त्या आपण परत म्हणणे या युक्तीनेही व्यक्ती शांत व्हायला मदत होते. शांत व्यक्तीचे तोंडाबरोबर कानही उघडे असु शकतात. अर्थात दुसरा विचार ऐकण्याची कुवत असते.
पण हे सगळे पुर्णतः व्यक्तीसापेक्ष प्रसंग सापेक्ष आहे याची नोंद घेणे.
आपला
गुंडोपंत
समंजसपणा, तारतम्य, मुद्याला धरुन्
एक गोष्ट नक्की की आजकालच्या जगात सर्वांना आपापली मत व जीवनस्वातंत्र आहे. सासु सुनेच्या तालावर नाचु शकत नाही कि सुन सासुच्या.
पुढील पिढीला आई-वडील व आजी आजोबा एकाच घरात मिळाले (व घरात निरर्थक भांडणे होत नसतील) तर ती नक्किच जास्त समंजस (बॅलन्सड / मॅच्युअर) होतील असे मला वाटते (पुढे मागे कोणी शास्त्रज्ञ बहुदा परदेशी अशी थिअरी मांडेल व जगाला पटेल. :-))
शक्यतो ज्या बाबतीत खटका उडतो त्या बाबतीत ज्या व्यक्तींमधे विवाद आहे त्यांनाच "विन-विन"(यश-यश, सहमत-सहमत) तोडगा काढायला लावायचा. वाद हा मुद्याला धरुनच झाला पहिजे, व्यक्तिगत (तुला कळते का, तुमच असच असत्) नाही. (म्हणणे सोपे आहे, वागणे अवघड) पण पचनी पडले की मार्ग काढणे सुकर होते.
सगळ्यांनी ईगो, इमोशनस् बाजुला (संयमीत) ठेवुन विचार केला, दुसर्याच्या बाजुने विचार केला, फक्त विरोध न करता प्रामाणीक पर्याय सुचवले तर काम सोपे होते.
बाकी "नशेच्या आहारी जाण्याची शक्यता" हा फारच सोपा पलायनवाद आहे. जर एखाद्याला असे वाटत असेल तर त्याने विचार करावा माझ्या वडीलांनी हे केले असते तर मला त्यांच्याबद्दल आदर तेवढाच राहील का? किंवा मी नशेत असल्याने माझ्या अपत्यावर घरातील भांडणाचा काय दुष्परीणाम होतो आहे.
असो शक्यतो एकत्र राहीले पाहीजे, कारण घरात सगळ्यांचा सगळ्यांना उपयोग होतो.(अगदीच व्यवहारीक बोलायचे तर) :-) जाताजाता एक सांगतो, जो पर्यंत स्वःता आई-बाप बनत नाही तो पर्यंत आपल्या आई-वडलांबद्दल एक नवीन प्रेम, आदर निर्माण होत नाही. (शक्यतो आपल कार्ट / कार्टी चालू असेल तर जास्तच)
जीए
"मी लग्न न केल्याने काही गोष्टींना मुकलो असलो तरी त्यामुळे बर्याच तापदायक गोष्टींपासून आपोआपच सुटका झाली."
-जीए
-- आजानुकर्ण गटणे
______
शुद्धलेखनाच्या नियमांचे पालन केलेली आजानुकर्ण यांची माहितीपूर्ण अनुदिनी आता नवीन आकर्षक स्वरुपात. एकदा भेट देऊन शुद्धलेखनाची खात्री करा.
वावा! जीए
>>मी लग्न न केल्याने काही गोष्टींना मुकलो असलो तरी त्यामुळे बर्याच तापदायक गोष्टींपासून आपोआपच सुटका झाली."
म्हणजे तात्याबा आणि जीए सारखाच विचार करतात तर. छान छान!
-राजीव.