लावणी

right

मराठी वाड्मयात पोवाडे आणि लावणी यांना स्वतंत्र स्थान आहे.महानुभाव,संत,पंडित,आणि शाहिरी साहित्य, ही मराठी रथाची चार चाके,यांनी केलेली वाड्मय निर्मिती यावरच मराठी वाड्मयाचा प्रवास चालू आहे.

संताच्या भक्तिभावातून गौळणी,अभंगाची निर्मिती झाली,याच भावनेतून पुढे लावणी अवतरली.लावणीची निर्मितीमागची प्रेरणा भक्तीची होती.या भक्तिभावात स्त्री मनाची विविध रुपे प्रकट झालेली आहेत.पुरुषमनाला असलेली स्त्रीदेहाची,आणि शृंगाराची अभिलाषा काही गौळनीतुन व्यक्त होताना दिसते.हीच अभिलाषा लावणीला कारणीभूत ठरली असावी.श्रीकृष्ण,विट्ठल,पांडुरंग यांच्याविषयीचा भक्तिभाव,अभंग,यालाच जोड मिळाली ती लोकजीवनातील लोकगीतांची.लोकगीतातील प्रेमभावना म्हणजे गौळणी,विराण्या,इत्यादी रचना दिसतात.संतांनी भागवतातील श्रीकृष्णाला नायक करून या परब्रह्माला राधेची आणि गौळणीची साथ देऊन भक्तीतून श्रुंगारभाव व्यक्त केला.राधा,गौळ्णी,आणि कान्हा,यांच्या श्रुंगारक्रिडा,आणि त्याला असलेला अध्यात्माची जोड त्यामुळे तो शृंगार अध्यात्माच्या आवरणाखाली झाकला गेला.पुढे यातील अध्यात्म गेले,आणि शृंगार राहिला.यातूनच लावणीचे रूप साकार झाले असावे,श्रीकृष्ण विषयी भक्तिभाव व्यक्त करतांना शाहीरांनी गोपी-कृष्ण,यांच्या स्त्री देहाचे वर्णन करताना अनेक शृंगारिक लावण्या लिहिल्या.लावणीची निर्मिती परंपरा प्राचीन गीतात विशेष दिसते. मराठी भाषा आणि मराठी प्रदेश यांची लावणी आणि पोवाडे ही भूषणे आहेत .लावणी वाड्मय समजून घेण्यापूर्वी लावणी ही संकल्पना लक्षात घेतली पाहिजे.

left

"१)'लावणी' हा शब्द संस्कृत "लू" या धातूवरून आला "लू" म्हणजे कापणी शेतातील पीक कापणीच्या वेळी म्हणायचे गीत ती "लावणी".
२)'लवन' म्हणजे 'सुंदर' यावरून लावण्य-लावणी शब्द तयार झाला.
३)'लावणी 'नृत्यात नर्तकी शरीर सहजपणे लववते म्हणून 'लवणी' त्यावरून लावणी.
४)'लापनिका' या संस्कृत शब्दापासून 'लावणी' हा शब्द तयार झाला असावा लापनिका हा शब्द महानुभाव साहित्यात केशवराव सुरी यांनी वापरला आहे.त्यांच्या ग्रंथाचे नाव 'लापनिका' असे आहे.
५)'लावणी' हा शब्द ज्ञानेश्वरांनी सोळाव्या अध्यायात वापरला आहे.-

तेया निरोपनाचेनि नावे ! अध्यायपद सोळावे !
लावणी पाहता जाणावे ! मागितला वरी !!

ज्ञानेश्वरांनी लावणी हा शब्द मांडणी रचना या अर्थाने उपयोजिला आहे.लावण्य हा शब्दही ज्ञानेश्वरीत आला आहे.

देशियेचे लावण्य ! हिरोनि आणिले तारुण्य !
मग रचिले अगन्य ! गीतात्त्व !! " *

right

शेतात शेतकरी पेरणी करतो,लावणी करतो. ही पेरणी किंवा लावणी करताना अगोदर नीट आखणी मांडणी करावी लागते.ठराविक अंतरावर रोपे लावली जातात शेतक-याची लावणी मोठी देखणी असते. त्या लावणीत पेरणीतही एक प्रकारची भूमीतीय सौंदर्य असते शाहिरांनी अशीच देखणी रचना करून मांडणी करून लावणी अविष्कारली.ज्ञानेश्वरांनी देशियेच्या लावण्या साठी तारुण्य हिरोनि आणले आणि गीतातत्व "रचिले", ही सुद्धा एक रचनाच आहे. अशी लावण्ययुक्त रचना करून शाहिर लावणी लिहितो.

६) -हदयाला चटका लावते ती लावणी - अ.ब. कोल्हटकर.
७) म.वा.धोंड, लावणीच्या बाबतीत म्हणतात की,"सर्व सामान्यजनांच्या मनोरंजनाकरिता त्यांना रुचतील अशा लौकिक,पौराणिक,वा आध्यात्मिक विषयावर रचलेली,ढोलकीच्या तालावर विशिष्ट ढंगाने म्हटलेली,खटकेबाज,व सफाईदार पद्मावर्तनी वा भृंगावर्तनी जातिरचना म्हणजे लावणी"

लावणीचे प्रकार.

१)फडाची लावणी:- नाच्या,सोंगाड्या इत्यादी कलाकारांच्या साथीने नृत्य आणि अभिनयाच्या जोडीने ढोलकीवर गायली जाणारी लावणी.
२)बैठकीची लावणी :- तबला,पेटी,तंबुरी यांच्या साथीने लावणी गायिका लावणी बैठकीत सादर करतात.
३)बालघाटी;- विरह-दु:खाची भावना आळवणारी.
४)छक्कडः- उत्तान- शृंगारिक आशय असणारी.
५) सवाल -जबाबयुक्तः- कलगीतुरेवाली प्रश्नोत्तरे असलेली.
६) चौकाची लावणी ;- चार चौकाची.चार वेळा चाली बदलणारी.
७) प्रतिकात्मक लावणी :- स्त्री-पुरुषांच्या भावना प्रतीकातून मांडणारी उदा.'तुझ्या ऊसाला लागल,कोल्हा' या सारख्या सुलोचना चव्हाण यांनी गायिलेल्या लावण्या.

left

लावणी एका अर्थाने स्तुती गीतेच आहेत.लावणीत केलेली स्त्रीदेहाची आणि सौंदर्याची वर्णनेही स्तुतीच आहे.शाहिरांच्या कवनातील स्त्रिया तत्कालीन उच्चभ्रू समाजाचे प्रतिनिधित्व करताना दिसतात. त्या यौवना आहेत.रूपवती,देखण्या आणि टंच भरलेल्या सौंदर्याच्या पुतळ्या आहेत.शृंगाराला पोषक त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे. याचा अर्थ लावणीत फक्त शृंगारच आहे असे नाही.त्यातही विविधता आहे."

गणेश,शंकर,आणि इतरही देवतांची स्त्रोत्रे,तुळजापूर,पंढरपूर,पैठणसारख्या क्षेत्राची वर्णने: वेदांत,अध्यात्म,पंचीकरण सावित्री,हरिश्चंद्र,यासारख्या पुराणकथा,लक्ष्मी पार्वती किंवा श्रीकृष्ण- राधा संवाद, दुष्काळाचे वर्णन,सुर्योदयाचे वर्णन,सती जाण्याचे वचन देणारा कामुक नवरा, इत्या्दी कथांतील शृंगारिक भावाबरोबर,भक्ती,शांत,वीर,करुण,वत्सल,हास्य,बीभत्स,असे विविध रस ही लावणीत दिसतात.

मुलूखगिरीत गुंतलेल्या,संसारात शिणलेल्या व विलासात आंबलेल्या मनाला परत ताजेतवाने करून जीवनात नवा रंग भरण्याकरिता शाहिरांनी लावण्या रचल्या असाव्यात.(म.वा.धोंड)

लावणी सामान्य रसिकांमुळेच भरभराटीला आली.उत्तर पेशवाईत लावणी-पोवाड्याला बहर आला.महत्त्वाचे शाहीर याच काळात झाले.याच काळात वीररसापेक्षा शृंगारिक लावण्याच अधिक लिहिल्या गेल्या, याचा अर्थ पेशवा आणि त्यांचे सरदार शिपाई यांच्या अंगात लावणीमुळे तेज आले,शौर्य आले असे म्हणणे हास्यास्पद ठरेल.उलट यामुळे पेशवे चैनी,विलासी,ऐषारामी,व्यसनी आणि स्त्रीलंपट तसेच नादानही झाल्याचे अनेक चर्चेतून वाचावयास मिळते.उत्तर पेशवाईत शृंगाररसास कवटाळून बसल्यामुळे,वीररस,निर्माण झाला नाही अथवा शिवछत्रपतींच्या काळात वीररसामुळे श्रुंगाररसयुक्त लावण्याची सुरुवात झाली नाही.

गेयता,नाट्यात्मकता आणि म-हाठीपना हे पोवाडे आणि लावणीचे खास वैशिष्ट्ये,त्यातला श्रुंगारभाव जसा मनाला भिडतो,तसाच त्याच्यातली नाट्यात्मकता अधिक परिणामकारक ठरते.( वि.का. राजवाडे,यांच्या 'महिकावतीच्या बखरीत' पोवाड्याच्या बाबतीत, शाहिराबद्दल, त्यांनी विवेचन केले आहे.पण ते येथे लिहिण्याचे टाळतो आहे.)

right

शाहिरांनी अध्यात्माच्या आडून श्रुंगारवर्णन करण्यापेक्षा सामान्य माणसाला रुचेल,पटेल,भावेल, व आवडेल,अशा सरळ साधी, भाषाशैली वापरली.त्यातून शृंगार हा आपल्या काव्याचा प्रमुख भाव ठरविला.पती-पत्नी विरह,विवाह,पत्नीचे मिलन,पतीचे युध्दमोहिमेवर जाणे, सात्त्विक तसेच व्यभिचारी प्रेम,निपुत्रिक स्त्रीचे दु:ख,सकाळचे वर्णन,दुष्काळ,पराभव, धन्याची स्तुती. या आणि इतर अनेक विषयात शाहिरांनी पोवाडे आणि लावण्या लिहिल्या आहेत.त्या काळातील वास्तव जीवनातील, प्रेमभावनेचा आनंद शाहिरांनी डोळसपणे अनुभवला घेतला आणि त्या आनंदाची अभिव्यक्ती त्यांनी काव्यातून करून सामान्य माणसाला सुखावले.शाहिरांच्या श्रुंगारवर्नणात रुसवे,फुगवे, मनधरणी,उघड उघड कामतृप्तीचे आव्हान,बाहेरख्यालीपण, इत्यादी अनेक बाबी.शाहिरांनी काव्यातून टिपलेल्या दिसतात.कोवळ्या मनाची अल्लड वृत्ती,लग्न झाल्यावर पतीविषयी केवळ धार्मिक आनुवंशिक बुद्धीने उद्भभवणारे प्रेम,तारुण्याच्या उंबरठ्यावर पतीदर्शनाची अभिलाषा,उत्सुकता,हुरहुर,मिलनाची बेहोषी,बावळट नव-यामुळे मनाची होणारी तडफड,व्यभिचारी मनाची उत्कट अभिव्यक्ती, असे अनेक प्रणयविकारांचा आविष्कार लावण्यांतून प्रकट झालेला दिसतो.

मराठी लावणीला ज्यांनी आकार दिला,त्यात प्रभाकर,रामजोशी,होनाजीबाळा,परशराम,सगनभाऊ,अनंतफंदी,अशी अनेक नावे सांगता येतील.या लेखात लावणीचे सादरीकरण,आणि लावणी साम्राज्ञा ,तमाशा,हे विषय टाळले आहेत.
*निवडक शाहिरी वाड्मय-संपाडःडॉ.दादा गोरे.
लेख मोठ्ठा झालाय पण दोन तीन भागात लिहिण्याची सवय नाही.म्हणून धकून घ्या ! या लेखावर,लेखात भर पडतील असे प्रतिसाद आले तर आनंद वाटेल,नाही आले तरी काही हरकत नाही,लेखकाचा,आणि उपक्रमींचा उत्साह वाढेल,मनोरंजन होईल, असे सर्व हसरे प्रतिसाद, विषयांतर,यांचेही मनापासून स्वागत आहे.:)

लेखनविषय: दुवे:

Comments

भलताच रंगला कात, लाल ओठात...!

वा बिरुटेसाहेब!

आपण तर कमाल केलीत. अतिशय सुरेख आणि अभ्यासपूर्ण आणि संदर्भांसहीत लिहिलेला आपला लेख अतिशय आवडला, मनाला ताजंतवानं करून गेला! चित्रही छान आहेत..

हा लेख वाचताना एका लावणीचे शब्द आणि स्वर माझ्या मनात गुंजी घालू लागले त्याचे दोन शब्द इथे लिहावेसे वाटतात!

राजसा जवळी जरा बसा,
जीव हा पिसा तुम्हाविण बाई,
कोणता करू शिणगार सांगा तरी काही!

त्या दिशी करून दिला विडा,
पिचला माझा चुडा कहर भलताच
भलताच रंगला कात लाल ओठात!

राजसा जवळी जरा बसा...

जियो बिरुटेसाहेब! आज गटारी अमावास्येच्या मुहुर्तावर एक चांगला लेख वाचायला मिळाला!

आपला,
सरपंच तात्या पाटील,
निंबळक बुद्रुक,
तालुका फलटण, जिल्हा सातारा.

कुणीतरी बोलवा दाजीबाला

लई झ्याक केलंसा, बिरुटे सर! चालू ठेवा.

तात्यांना एक लावणी आठवली त्यावरून मला आणखी एक आठवली.
ही लावणी म्हणजे एक खास नमुना आहे. मराठीत गाण्यातून एवढे बेधडकपणे अनैतिक विचार मांडलेले क्वचितच दिसतील आणि या बेधडकपणामुळेच ही मला आवडते. आशा भोसलेने या शब्दांना पूर्ण न्याय दिला आहे असे म्हणावे लागेल.
आणि अशी बन्धने झुगारून देणे हे लावणी या प्रकाराचेच एक वैशिष्ट्य आहे.

"मी बाई चाललीया जत्रंला, गाडीचा खोंड बिथरला, बळ नाही घरच्या गणोबाला,
कुणीतरी बोऽऽलवा दाजीबाला हो, कुणीतरी (अ हो ) कुणीतरी बोऽऽलवा दाजीबाला

दाजीबासारखा दीर दुनियेमध्ये नाही
गोर्‍या भावजयीची त्यांना लयी अपूर्वाई
त्यांची बाईल होईल तिची खरी पुण्याई
हेंद्रट आमच्या नशीबाला, हेंद्रट आमच्या नशीबाला, कुणीतरी बोलवा दाजीबाला"

पुढे आपली नायिका व दाजीबा यांचे हे खास लफडे आहे असे आपल्याला वाटते न वाटते तोच नायिका/गायिका स्पष्ट करते की हे तिचे नेहमीचेच आहे
"मी लयी भुलते रुबाबाला"

अर्थात् फक्त स्वप्ने रंगवण्यात तिचे समाधान नाही तर पुढे सरळ कृती करायची आहे. ती आपली खात्री बोलून दाखवते आहे की "तगडे" दाजीबा घोड्यावर बसून येतील व "मला पुढ्यात घेतील सांगितल्यासरशी" आणि मग
"म्होरं-मागं ठाऊक जोतीबाला"
इथपर्यंत तयारी आहे.
[हे गाणे मला संपूर्ण आठवत असते तर बरे झाले असते.]
राधा-कृष्ण वगैरेंच्या नावाने आडून-आडून केलेला रसभरित शृंगार बहुतेकांना चालतो पण हा असला झणझणित अनैतिकतेचा झटका समाजाच्या सोवळ्या वृत्तीला कितपत रुचेल व झेपेल याची शंकाच आहे.
पण अशा विचाराने बावरेल तर ती आशा कसली! ती आपल्या नेहमीच्या झोकात व बिन्धास्तपणाने हे गाणे म्हणून मोकळी झाली, त्या दोन झेन साधूंच्या सुप्रसिद्ध गोष्टीप्रमाणे.
हा फरक आहे आशा व उषा यांच्यामध्ये. किती जरी रानवट व रांगडेपणा व्यक्त करणारा आवाज असला तरी उषाने गाण्यांत सहसा नैतिकता उघडउघड ओलांडलेली नाही. लताने तर नाहीच नाही. त्या दोघींचे सारे सूचकपणे.
पण आशा कायम सगळ्या बंधनांपलीकडची हेच खरे.
- दिगम्भा

नैतिकता !

लई झ्याक केलंसा, बिरुटे सर! चालू ठेवा.

धन्यवाद ! - दिगम्भा साहेब,
गायकांनी नैतिक, अनैतिकतेचा विचार केला असेल,पण शाहिरांनी नाही बरं का ! या आपल्या विचाराशी सहमत.

प्रभाकर यांच्या -
झुलत खुलत डोलात कमर हलहलवित नख-याने !
ठुमक चाल चौरंगी खबुतर झडपी कु-याने !!

किंवा
कधि ग भेटसिल अतां जिवाचे जिवलग मैतरणी
ऐन उन्हाळ्यामधे मुलुखगिरि कठीण प्रियकरणी !!

या लावण्याही लाजवाब आहेत बरं का ! दिगम्भा साहेब.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिरुटेशेठ, ऐका ही लावणी...

राजसा जवळी जरा बसा..!

बिरुटेशेठ, ह्या लावणीचे शब्द आपल्याला येथे मिळतील आणि येथून ही लावणी आपल्या संगणकावर उतरवून घेऊन ऐकता येईल. खास तुमच्याकरता ही लावणी मी जालावर चढवली आहे! :)

(आपल्या संग्रही असेल तर उत्तमच, अन्यथा आता उतरवून घेऊ शकता,)

दिदिने ही लावणी अक्षरशः जीवघेणी म्हटली आहे. एक तर पुरियाधनाश्रीसारखा राग आणि त्यात पुन्हा दिदिचा स्वर! अजून काय पाहिजे बिरुटेशेठ? :)

तालाला छानसा अद्ध्या/केरव्यासारखा ठेका अन् अतिशय सुरेख अश्या दोन कडव्यांमधील हार्मिनियमच्या स्वरावली! क्या बात है..

'कोणता करू शिणगार' मधला पुरियाधनाश्रीतून पूर्वीकडे वळणारा, किंवा वळू शकणारा, गाण्याला अचानक वळण देणारा शुद्ध मध्यम! वा वा...

साला काय पण म्हणा बिरुटेशेठ, दिदिचे स्वर काळजाला हात घालतात!

असो,

आपला,
(लताभक्त) तात्या.

"आशा"वादी.. (!)

मा. लताभक्त तात्या,

"राजसा जवळी जरा बसा.." ही चांगलीच लावणी आहे आणि खूप् प्रसिद्धही आहे. ती जशी जरा वैठकीच्या पद्धतीतील आहे तशीच बाबूजींनी संगीत दिलेली गदीमांनी लिहीलेली आणि आशाताईंनी म्हणलेली "असेल कोठे रूतला काटा.." ही पण ऐकण्यासारखी आहे. बाबूजींनी ती स्वतः एकदा दूरदर्शनच्या कार्यक्रमात अफलातून म्हटली होती...

गदीमांच्या वेबसाईटवर ती आपण येथे ऐकू शकता. (बाकी पण त्यांच्या प्रसिद्ध लावण्या तेथे आहेत)

विकासराव,

ती जशी जरा वैठकीच्या पद्धतीतील आहे तशीच बाबूजींनी संगीत दिलेली गदीमांनी लिहीलेली आणि आशाताईंनी म्हणलेली "असेल कोठे रूतला काटा.." ही पण ऐकण्यासारखी आहे. बाबूजींनी ती स्वतः एकदा दूरदर्शनच्या कार्यक्रमात अफलातून म्हटली होती...

आपलं म्हणणं खरं आहे! ती लावणीही सुरेखच आहे..

आपला,
तात्या सरपंच.

कमाल आहे!

लेख खूप आवडला, अभिनंदन! अतिशय माहितीपूर्ण आणि अगदी अनपेक्षित विषयावरचा लेख, चित्रांनी शोभा वाढवली. मी गेल्यावर्षी एका कार्यक्रमाचे निवेदन करत असता लावणीवर शोधाशोध करत होते, "'लवन' म्हणजे 'सुंदर' यावरून लावण्य-लावणी शब्द तयार झाला." एवढीच काय ती महत्त्वाची गोष्ट नेटावर दिसली बाकी विशेष मिळाले नाही तेव्हा वाटून गेले की नेटावर कोणालाही याबाबत लिहावेसे का नाही वाटले. तुमचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत.

मराठी लावणीला ज्यांनी आकार दिला,त्यात प्रभाकर,रामजोशी,होनाजीबाळा,परशराम,सगनभाऊ,अनंतफंदी,अशी अनेक नावे सांगता येतील. या लेखात लावणीचे सादरीकरण,आणि लावणी साम्राज्ञा ,तमाशा,हे विषय टाळले आहेत.

टाळू नका. पुढच्या भागांत लिहा, या शाहिरांबद्दल वाचायला खूप आवडेल... अतिशय वाचनीय लेख आहे. असे लेख आणखी येऊ दे.

आता एक फुकटचा सल्ला: वरील प्रशंसेला दृष्ट लागू नये म्हणून काजळाचे तीट समजा. (तशी मी अंधश्रद्ध नाही :) )

शुद्धलेखनाकडे थोडे अधिक लक्ष पुरवा. माझं शुद्धलेखन खूप भारी आहे अशातला प्रकार नाही पण काहीजणांचा चांगले लेख वाचताना त्यातील चुकीचे शब्द वाचल्याने विरस होतो हे मी मान्य केलेले आहे आणि त्या अनुषंगाने स्वतःत सुधारणा करण्याचा प्रयत्न करते, म्हणून तुम्हाला सांगितले. तुम्हालाही तसे करणे कठिण नाहीच.

हेच...

म्हणतो. लेख वाचून बरीच नवी माहिती मिळाली. लेख सुंदर झाला आहे.

यावरुन एक प्रश्न पडलाय त्याची स्वतंत्र चर्चा सुरु करतो.

तुम्ही शुद्धलेखनाकडे थोडे लक्ष पुरवले तर नाव ठेवायला जागा राहणार नाही.


शुद्धलेखनाच्या नियमांचे पालन केलेली आजानुकर्ण यांची माहितीपूर्ण अनुदिनी आता नवीन आकर्षक स्वरुपात. एकदा भेट देऊन शुद्धलेखनाची खात्री करा.

शुद्धलेखन :)

आपण जी प्रशंसा केली त्याबद्दल आपले आभार.
शुद्धलेखनाकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करतो.

तुमचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत
त्यात आभार कसले !
अहो दोन वर्षापूर्वी अभ्यासक्रमात निवडक शाहिरी वाड्मय हा भाग होता.
त्यातल्या लावणीला आकार दिला इतकेच.

शाहिरांवरही कधी तरी नक्की लिहू !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभ्यासक्रमात निवडक शाहिरी वाड्मय

वा वा सर मग तुम्ही तर या विषयावर लिहिण्यासाठी अतिशय योग्य व्यक्ती आहात.
शाहिरांवर काही तरी नक्की लिहा.

कार्यालयात आमच्या बालमनावर होणारे कुसंस्कार टाळण्यासाठी फ्लिकर व तत्सम सेवा बंद केल्यामुळे चित्रे पाहता आली नव्हती ती घरच्या संगणकावर आता बघता आली. चित्रांमुळे लेख अधिकच डौलदार झाला आहे.


शुद्धलेखनाच्या नियमांचे पालन केलेली आजानुकर्ण यांची माहितीपूर्ण अनुदिनी आता नवीन आकर्षक स्वरुपात. एकदा भेट देऊन शुद्धलेखनाची खात्री करा.

वा !

साहेब,
लेख मस्त जमला आहे !

अतिशय वेगळ्या वाटेचा हा विषय कधी पाहीला नाही पण जुन्या मराठी चित्रपटामध्ये खुप लावण्या असत व त्या मधील मला एक सवाल-जबाब नावाचा प्रकार खुपच आवडत असे ! ( एक चित्रपट आहे तसा खुप जुना आहे ज्या मध्ये एक मास्तर एका तमासगीरीण च्या प्रेमामध्ये पडतो.... व तबलची बनतो अश्या प्रकाराचा नाव माहीत आहे का कोणाला ? )

राज जैन
*********
मी सध्या स्वाक्षरी शोधत आहे सध्या मीळाली की येथे लिहीनच.

विनोद आवडला...

तो खूप जुना चित्रपट म्हणजे 'द केज' तर नव्हे? ;)
असो. विनोद आवडला.

द केज - सोन्याचा पिंजरा

'आकाशी झेप घे रे पाखरा, तोडी सोन्याचा पिंजरा' ही त्या 'द केज' चित्रपटातील लावणी असावी. बाबूजीप्रेमींची क्षमा मागतो, अपराध पोटात घालावा.

सर,

ढोलकीवर जबरदस्त थाप मारलीत, रंग चढू दे, लावणी रंगू दे... आम्ही रसिक बसलो आहोत दाद द्यायला. येऊ द्यात.

- राजीव.

मस्त लेख + चित्रपट

सर्वप्रथम प्राध्यापक महाशयांना अशा माहीतीपूर्ण लेखाबद्दल धन्यवाद. वास्तवीक लावणी हा एक लोककलेचा भाग आहे. त्याचा चित्रपटात वापर करून त्या कलेचा आणि मराठी चित्रपटांचा अक्षरशः तमाशा केला! असो. उपक्रमावर असेच लेख जिथे "वाद" घालायला वाव मिळणार नाहीत सतत येवोत ही सदीच्छा!

आता राज साहेबांच्या प्रश्नाचे बरोबर उत्तरः
एक चित्रपट आहे तसा खुप जुना आहे ज्या मध्ये एक मास्तर एका तमासगीरीण च्या प्रेमामध्ये पडतो.... व तबलची बनतो अश्या प्रकाराचा नाव माहीत आहे का कोणाला ?

चित्रपटाचे नाव पिंजरा असेच आहे. त्यात श्रीराम लागू हे मास्तर असतात आणि ते गावातील तमाशाचा फड उखडून लावताना, तुनतुन फेकतात जे त्यातील प्रमुख तमासगिरीण संध्या घेते आणि संतापात प्रतिज्ञा घेते की "हे तुनतुन तुम्हाला एक दिवस हातात घ्यायला लावीन..." . पुढे जे घेतले आहे ती 'एका अर्थी ' मूकप्रेमकहाणी आहे. त्या दोघांचे आणि निळू फूल्यांची कामे अप्रतिम आहेत. व्ही. शांताराम यांचे दिग्दर्शन, जगदीश खेबूडकर यांची गीते संगीत कुणाचे ते आठवत नाही पण कदाचीत राम कदम यांचे. "तुम्हावर केली मी मर्जी बहाल" हे (मादक वाटेल असे) गाणे ऐकले की उषा मंगेषकर हळूवार आवाजात पण गाऊ शकते हे समजते !

आता राजीव साहेबांच्या प्रतिक्रीयेबद्दलः
'आकाशी झेप घे रे पाखरा, तोडी सोन्याचा पिंजरा' ही त्या 'द केज' चित्रपटातील लावणी असावी. बाबूजीप्रेमींची क्षमा मागतो, अपराध पोटात घालावा.

हा चित्रपट "आराम हराम आहे" हा होता. त्यात माडगुळकरांनी लिहीलेली , बाबूजींनी संगीतबद्ध केलेली आणि आशाने गायलेली बैठकीच्या पद्धतीतील लावणी आहे. ती पण ऐकण्यासारखी आहे - आशाच्या आवाजातील तसेच एकदा बाबूजींनी दूरदर्शनवर स्वतः म्हणलेली!

विकास जी

माहीती साठी धन्यवाद !
तो चित्रपट मी ८-१० वर्षापुर्वी दुरदर्शन वर पाहीला होता... थोडा वेगळी कथा होती त्यामुळे लक्षात राहीली पण नाव विसरलो होतो ;)

राज जैन
*********
मी सध्या स्वाक्षरी शोधत आहे सध्या मीळाली की येथे लिहीनच.

ब्लू एंजल !

साधारण ६२-६३ च्या आसपास मी "ब्लू एंजल" नावाची एक इंग्रजी कादंबरिका वाचली होती, ती बहुतेक या व अशा प्रकारच्या सर्व कथानकांचा मूळ स्रोत असावी. कथेचा आराखडा असा - एक सच्छील शिक्षक, त्याच्या उनाड विद्यार्थ्यांनी वारंवार वर्ग चुकवून क्लबमध्ये नर्तकीचे उत्तान नृत्य पाहण्यासाठी जाणे, त्यांना वळणावर आणण्यासाठी शिक्षकाने त्यांच्यामागून त्या क्लबात जाणे, मग स्वतःच तिच्या नादी लागून आयुष्याची परवड करून घेणे, वगैरे. कथेतील नावे, वातावरण, जर्मन होते असे अंधुक आठवते. त्यावरून मूळ कथा जर्मन असावी. पुस्तकात "ब्लू एंजल" याच नावाच्या चित्रपटातील छायाचित्रेसुद्धा होती. म्हणजे हा सर्व मामला अप्रसिद्ध तरी नक्की नव्हता.
मग एक-दोन वर्षांत मराठीत "निळावंतीचा वग" नावाचे लोकनाट्य आले. बहुधा ते याच कथेवर होते. इतर भाषांतदेखील थोड्याफार फरकाने असे अनुवाद झाले असतीलच.

मग बर्‍याच काळाने (७५-७६ च्या सुमारास) याच कथेत मामुली फेरफार करून, मालमसाला-मेलोड्रामा घालून, खास शांतारामबापूंच्या मेगास्केल व हाइप सकट "पिंजरा" आला.
आपल्याकडे मूळ कथेला श्रेय देणे वगैरे भानगड कधीच रूढ नव्हती, त्यामुळे हे कनेक्शन लागले नसावे.

- दिगम्भा

ब्लू एंजल

हा मूळ जर्मन चित्रपट असावा. १९३० सालचा. १९५९ ला पुन्हा त्याचा रिमेक करण्यात आला बहुधा. मूळ कथा आणि चित्रपट जर्मनच असावेत. मी काही ही कादंबरी वाचलेली नाही परंतु मध्यंतरी काही मित्रमैत्रिणींनी ही वाच्यता केल्याचे आठवते. वाच्यता म्हणजे हेच की भल्याभल्यांना मूळ कथेचे श्रेय देण्याची उपरती होत नाही वगैरे वगैरे.

वॉव!

साधारण ६२-६३ च्या आसपास मी "ब्लू एंजल" नावाची एक इंग्रजी कादंबरिका वाचली होती, ...

मला हे माहीत नव्हते. या माहीतीबद्दल धन्यवाद. तो चित्रपट मला जरी आवडला असला तरी, श्रेय न दिल्याचे कळल्यामुळे त्याच्याबद्दलचे आणि शांतारामबापूंबद्दलचे "appreciation" थोडे कमी नक्कीच झाले.

लय भारी

काय राव, झकास लिवलया सम्दं...
लय भारी.येकदम ब्येस!
बिरुटे सायेब, आसं राखून नगासा ठेवू.
सम्दं खुल्लं खुल्लं लिवा.
आजून यिऊ दे की चार-पाच भागात.
आमी दम धरतो तंवर.
काय, लिवताय न्हवं मग?

धन्यवाद. !

या लेखाचे कौतुक करणारे,तात्या,प्रियाली,राज साहेब,विसुनाना,जेसन बोर्न,विकासराव,आपले आभार व्यक्त करतो.
आम्ही जरा गडबडीत आहोत,तिन्ही सांजेला जमले तर, आमचा हा प्रतिसाद दीर्घ करतो !

अवांतर ;) मास्तर अन पिंज-याची आठवण सही ! ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुलोचना चव्हाण

वा! काय छान लेख वाचायला मिळाला अवचितपणे!
सर लेख आवडला. यावर अजुन येवू देत. आणी कुणी तरी त्या लावण्यांची जाला वरची लिंक पण द्या हो!

एकुणच अध्यात्मिकते कडे नेणारा हा मनोरंजनाचा प्रकार फक्त शृंगारीकतेत अडकवून मराठी चित्रपटांनी खुप मोठी हानीच केली आहे असे काहीसे वाटून गेले.

बाकी आपल्या चित्रांमुळे लेख जरा भारी वाटतोय बरंका!
सुलोचना चव्हाण या लावण्यांच्या राज्यातल्या खास गायिका होत्या. त्यांच्या उल्लेखा शिवाय ही चर्चा पुर्ण होणार नाही... यांची गाणीही जालावर ऐकायला मिळाल्यास आवडेल.

आपला
गुंडोपंत

जालावरील सुलोचना चव्हाण

सुलोचना चव्हाण या लावण्यांच्या राज्यातल्या खास गायिका होत्या. त्यांच्या उल्लेखा शिवाय ही चर्चा पुर्ण होणार नाही... यांची गाणीही जालावर ऐकायला मिळाल्यास आवडेल.

हा घ्या दुवा

त्यांची गाणी पण मस्त असतात आणि हसर्‍या मुद्रेने त्या दूरदर्शन वर म्हणायच्या..

दुवा परत उपक्रमावरच

विकासराव, आपण दिलेला
दुवा परत उपक्रमावरच येतो आहे...
(आम्हाला जाला वर असं काही शोधायला जमत नाही म्हणून म्या पामराची खेचताय का? :)) )

आपला
गुंडोपंत

हा घ्या

दूवा

चुकीचा दूवा आधी दिल्याबद्दल क्षमस्व!

इंटरेस्टींग

लावणी ह्या विषयावर एकाच वेळी मी एवढे कधी वाचले नव्हते किंवा विचारपण केला नव्हता.

जसे सुरवातीला नाटक व चित्रपटातील संगीत, हे शास्त्रीय संगीतावर आधारीत होते व नंतर त्यावर भले बुरे संस्कार होत आज रिमीक्सावस्था प्राप्त झाली आहे, तद्वत सुरवातीला अध्यात्म, हितोपदेश असे गियर् टाकून चालू झालेली लावणी आजच्या अवघड वळणाला आली आहे तर. :-)

बाकी (सर मला माफ करा पण) लावणी मधे मला काही रस नाही पण हा लेख नक्कीच इंटरेस्टींग वाटला. आवडला.

अवांतर - पिंजरामधील काही गाणी "ऐकायला" (बहूतेक त्या श्रवणीय चालींमुळे जास्त) मला खुप आवडतात,(बघायला नाही, संध्याबाई डोळे अन मान हलवायला लागल्या की मलाच फीट येति आहे की काय असे वाटते. :-)) बाकी कोल्हा हा ऊस खातो हे मला माहीत नव्हते (सुलोचनाबाई सावधतेचा इशारा देई पर्यंत् :-) ), अजुनही पुरावा नाही मिळाला, परत एकदा चितमपल्ली, माडगुळकर वाचले पाहीजेत. कोणाला हा पुरावा मिळाला असल्यास कळवा. व हे जर खरच रुपकात्मक (टंग-इन-चीक) असेल प्लीज ह्या पेक्षा कितितरी छान शब्दात कित्येक मराठी कवी, गजलकार अश्या भावनांचा अविष्कार करुन गेले आहेत, करत आहेत.

उसाला कोल्हा

बाकी कोल्हा हा ऊस खातो हे मला माहीत नव्हते (सुलोचनाबाई सावधतेचा इशारा देई पर्यंत् :-) ),

उसाला खरोखर कोल्हा लागतो बरका..आमच्या गावाकडं अशी चिकार पिकं कोल्ह्यांनी खराब केली हायेत.

अभिजित...
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.

मास्तर सांभाळ बॉ.

मास्तर,
लावणीवर झक्कास लिव्हलंय. संभाळा सोताला, बाई अन बाटलीचा नाद लयी बेक्कार बरं का !त्याची हाये का लावणी एखांदी !

पिंजरा

कशी नशिबानं थट्टा गाणं ऐका नक्की..

तो मास्तर ज्या पोटतिडीकीने गाणं म्हणतो की त्याच्यासारखा तोच..काय अभिनय..काय गायन वाह..

हे पहा..

अभिजित...
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.

सुंदरा मनामध्ये भरली

अमेरिकेतल्या डॉ.मीना नेरुरकर यानी सादर केलेला सुंदरा मनामध्ये भरली हा लावण्यांवरचा बहारदार कार्यक्रम बघितला कि माझ प्वॉट भरतं.
प्रकाश घाटपांडे

वा..सुंदर

बिरुटे साहेब,
लेख फार सुंदर. लावणी प्रकाराबद्दल इतके यापूर्वी कधीच वाचले ऐकले नव्हते.
या वरुन संत तुकाराम चित्रपटातील
'बैस अशी माझ्या पाशी, रुप तुझं छान गं, रुप तुझं छान !
चंद्रावाणी मुखडा तुझा रंग गोरापान गं
हाय हाय यो मुखडा बघुनी, हरतं माझं भान गं, हरतं माझं भान !'
ही लावणी (?) आठवली.

रामशास्त्री या चित्रपटात सुद्धा बटकीच्या बाजारातली लावणी सुंदर आहे.

असेच लेख अजून येवू देत. शाहिरांबद्दल अजून जाणून घ्यायची इच्छा आहे.
--लिखाळ.

यंदा श्रावण पाळावा म्हणतो ! त्याला साखळीला बांधावे की पिंजर्‍यात ठेवावे याचा निर्णय होत नाहीये :)

छान

खूप माहितीपूर्ण लेख आहे. आवडला.

ब्लु एन्जेल्

ही नवीन् माहिती दिल्याबद्दल् धन्यवाद्.

 
^ वर