उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
दिव्यांची आवस.. ;)
दोन दिसांची नाती
August 12, 2007 - 5:36 am
राम राम उपक्रमींनो,
आज आषाढातील अमावास्या. हा दिवस 'दिव्यांची अमावास्या' म्हणून साजरा केला जातो अशी 'माहिती' मी देऊ इच्छितो.
या दिवशी दीपपूजा केली जाते. कणिक वापरून केलेले गोडाचे दिवे या दिवशी केले जातात. देशावर काही ठिकाणी बाजरीचेही दिवे केले जातात. दूधातुपासोबत गोडाच्या दिव्यांचा नैवेद्य दाखवला जातो. याबद्दल कुणाला काही अधिक माहिती असल्यास ती इथे अवश्य द्यावी ही विनंती!
याच दिवसाला 'गटारी अमावास्या' असेही संबोधले जाते, अशीही माहिती मी जाता जाता देऊ इच्छितो! :)
सर्व उपक्रमींना दिव्यांच्या अमावास्येच्या आणि काही (!) उपक्रमींना गटारी अमावास्येच्या अनेकोत्तम शुभेच्छा! :)
भविष्यात या अमावास्येला 'तांब्याची अमावास्या' असेही नांव कदाचित पडू शकेल असे वाटते! :)
आपला,
(तांब्यातल्या तांब्यात पाय घसरून पडलेला) खोडकर तात्या! :)
दुवे:
Comments
दिव्यांच्या अवसेची कहाणी
ऐका दीपकांनो, तुमची कहाणी. आटपाट नगर होतें. तिथें एक राजा होता. त्याला एक सून होती. तिने एके दिवशीं घरातला पदार्थ स्वत: खाल्ला आणि उंदरावरती आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनीं विचार केला कीं, हा आपल्यावर उगाच आळ
आला आहे, तेव्हां हिचा आपण सूड घ्यावा. म्हणून सर्वांनीं विचार केला व रात्रीं हिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणांत नेऊन टाकली.
दुसरे दिवशीं हिची फजिती झाली. सासू व दिरांनीं निंदा केली. घरांतून तिला घालवून दिली. हिचा रोजचा नेम असे कीं, रोज दिवे घासावे, तेलवात करावी, स्वत: ते लावावेत, खडीसाखरेच्या खड्यानें त्यांच्या ज्योती साराव्या. दिव्यांच्या अवसेच्या दिवशीं त्यांस चांगला नैवेद्य दाखवावा. याप्रमाणे ही घरांतून निघाल्यावर तें सारें बंद पडलें.
पुढे ह्या अवसेच्या दिवशीं राजा शिकारीहून येत होता. एका झाडाखालीं मुक्कामास उतरला. तेथें त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला. आपले सर्व गांवांतले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांशी गोष्टी करीत कीं कोणाचे घरीं जेवावयास काय केलें होतें ? कशी कशी पूजा मिळाली. वगैरे चौकशी चालली आहे. सर्वत्रांनीं आपापल्या घरीं घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगूं लागला, बाबांनो, काय सांगूं ? यंदा मजसारखा हतभागीं कोणी नाहीं. मी दरवर्षीं सर्व दिव्यांत मुख्य असावयाचा, माझा थाटमाट जास्तीं व्हावयाचा. त्या मला यंदा अशा विपत्तींत दिवस काढावे लागत आहेत. इतके म्हटल्यावर त्यास सर्व दीपकांनीं विचारलें, असें होण्याचें कारण काय ? मग तो सांगूं लागला, बाबांनो, काय सांगूं ? मी या गावच्या राजाच्या घरचा दिवा. त्याची एक सून होती. तिने एके दिवशीं घरातला पदार्थ स्वत: खाल्ला आणि उंदरावरती आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनीं विचार केला कीं, हा आपल्यावर उगाच आळ आला आहे, तेव्हां हिचा आपण सूड घ्यावा. म्हणून सर्वांनी विचार केला व रात्रीं हिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणांत नेऊन टाकली. दुसरे दिवशीं हिची फजिती झाली. सासू व दिरांनीं निंदा केली. घरांतून तिला घालवून दिली. म्हणून मला असे दिवस आले. ती दर वर्षास माझी पूजा करी त असे. जेथें असेल तेथें ती खुशाल असो, असें म्हणून दिव्यानें आशीर्वाद दिला.
सदरहू घडलेला प्रकार राजानें श्रवण केला. घरीं आला. कोणीं प्रत्यक्ष पाहिलें आहे काय म्हणून चौकशी केली. तेव्हां कोणींहि पाहिलें नाहीं असें समजलें. मग तिला मेणा पाठवून आणली. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. सार्या घरांत मुखत्यारी दिली. ती सुखानें राज्य करूं लागली.
तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टळो. ही साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.
गटारिका
बाटलीच्या गळ्यात हात टाकत
बोकड लागला नाचू
आषाढ सरल, चल धरला
महिनाभर तर वाचू!
- रामदास फुटाणे
गटारीच्या "उगमाची" माहीती कोणास आहे का? हा शब्द कधी, कोणी सुरू केला.
पहिला माणूस
आषाढी अमावास्येला दारू पिऊन गटारात लोळला तेव्हाच तिला गटारी म्हणायला सुरुवात झाली.
आमचा बेत ऐका -खिमा, कोंबडी, भाकर्या, वांग्याचे भरीत, तळलेले पापलेट पण पिणे नाही. याबाबत मी ही 'मम्माज् बॉय' आहे असं म्हणायचं तर म्हणा कोणी.
- राजीव.
दिव्यांची आवस ;)
तात्या,
'दिव्यांची अमावास्या' चे ऐतिहासिक महत्व माहित नाही, पण गटारी आमावश्याचे वर्तमानकालीन महत्व काय असते,ते आज कळले ;) बाकी वाचनकवीची कथा सहीच. !
हळू बोला, ब्राउजरला कान असतात! :)
पण गटारी आमावश्याचे वर्तमानकालीन महत्व काय असते,ते आज कळले ;)
जरा हळू बोला बिरुटेशेठ, ब्राउजरलाही कान असतात! :)
मजकूर संपादित. परस्परांना आणि/किंवा इतर सदस्यांना उद्देशून टीकाटिप्पणी प्रतिसादातून करू नये. प्रतिसादाच्या माध्यमातून होणारे लेखन सार्वजनिक स्वरूपाचे राहील याची काळजी घ्यावी.
असो, आता उद्या पासून श्रावण पाळला पाहिजे रे बाबा! :)
आपला,
(श्रावणबाळ!) तात्या. :)
दिव्यांची आवस पण का ?
तात्या,
पोर्णिमेच्या दिवशी काही माणसं अस्वस्थ असतात,चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे समुद्राला भरती-ओहटी येते,तसा त्याचा परिणाम कमकुवत माणसांवरही होतो म्हणे,(ही ऐकीव माहिती)तसे काही दिव्यांची आवसे बाबत आहे का ?जरा शोधा-शोध करावी लागते.
अवांतर ;) मजकुर संपादित होत होते,आता संपुर्ण प्रतिसादही संपादित होऊ लागले की काय ?
हा हा हा! :)
अवांतर ;) मजकुर संपादित होत होते,आता संपुर्ण प्रतिसादही संपादित होऊ लागले की काय ?
हा हा हा! चलता है बिरुटेसाहेब! अहो हा उपक्रमपंत शेवटी आपलाच माणूस आहे हो! त्याला कशाला उगाच जास्त त्रास अन् टेन्शन द्या!
मिसळपाव डॉट कॉमवर मी तुम्हालाच प्रमुख संपादनमंत्री करेन! मग एखादा प्रतिसादच्या प्रतिसाद संपादित करावा की त्यातला काही मजकूर संपादित करावा हा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल! :)
च्यामारी नुसती धमाल उडवून देऊ मिसळपाववर! :)
आपला,
(संपादक!) तात्या.