हा "फ्रेंडशीप डे" काय प्रकार आहे?

नमस्कार,

हा फ्रेंडशीप डे काय प्रकार आहे?

आजचा रविवार (ऑगस्ट ५, २००७) हा आंतरराष्ट्रीय दिवस होताअसे वाचले. भारतीय वर्तमानपत्रात बातम्या पाहील्या आणि अग्रलेखही पाहीला.. अमेरिकेत कधी फ्रेंडशीप डे ऐकायला येत नसल्याने मी हा शब्द "गुगलला" तर पहीले पान भारतातून तयार झालेलेच आले. त्यात अमेरिकन काँग्रेसने हा १९३५ ला चालू केल्याचे लिहीले होते (अमेरिकेला जे मित्र समजतात त्यांचा दिवस असे नंतर विकी मधे वाचले..). शिवाय संदर्भासहीत बायबल मधले उतारे आणि संदर्भाविरहीत महाभारता कृष्णाने फ्रेंडशीपचा अर्थ कसा जबाबदारीपासून ते प्रणय (रोमँटीक) वगैरे सांगीतला हे लिहीले आहे.

हे काही सेक्यूलर लोकांचे चातुर्मासातील व्रत वगैरे आहे का? समजले तर बरे होईल (वसा काय असतो वगैरे ते कळले तर अजूनच उत्तम!).

अधीक माहीती असल्यास आणि आपण काही अनुभवले असल्यास जरूर कळवा.

Comments

आर्थिक राजकारण...

मला या निरनिराळ्या डेजचा उगम वगैरे माहीत नाही, परंतु सध्या हे डेज म्हणजे मोबाईल कंपन्यांचे एक खूप मोठे आर्थिक राजकारण आहे. 'अमुक क्रमांकावर समस पाठवा आणि आपल्या मित्राला 'फ्रेंडशिप डे' चे कार्ड पाठवा', 'ढमुक क्रमांकावर समस पाठवा आणि आपल्या मित्राला तमुक पाठवा', असले पैसे उकळण्याचे प्रकार सुरू असतात.

तात्या.

--
काल पुण्यात संजोपशेठच्या घरी संत तात्याबां, संजोपशेठ, आणि सर्कीट यांची एक लहानशी मिटिंग झाली. त्यांनी 'मराठी आंतरजाल' या विषयावर गंभीरतेने चर्चा वगैरे केली! :)

त्याचप्रमाणे 'मिसळपाव डॉट कॉम' सुरू करण्याच्या दृष्टीने संत तात्याबा पुण्यातील काही मंडळींना भेटले. मिसळपाव डॉट कॉम बद्दल त्यांनी दाखवलेल्या उत्सुकतेबद्दल संत तात्याबांनी समाधान व्यक्त केले! येत्या शनिवारी संत तात्याबा पुन्हा पुण्याला जाणार आहेत आणि काही मंडळींसोबत 'तांब्याझारीतली' चर्चा करणार आहेत! :)

फार महाग?

तात्याबा,
फार महाग जातंय का? अहो चालेल; मला नाही पाठवला तरी... मी आपला समजून घेईन बॉ तुमच्या भावना!

(चालायचंच! तात्यांना अनेक मैत्रिणी पण असणार नि त्यांना समस पाठवायला पण खर्च पण येणार याबद्दल सहानुभुती आहे बरं मला...!)

आपला फ्रेंड
गुंडोपंत

मिसळपाव

त्याचप्रमाणे 'मिसळपाव डॉट कॉम' सुरू करण्याच्या दृष्टीने संत तात्याबा पुण्यातील काही मंडळींना भेटले.

आपण पण मिसळपाव इव्ह (संध्या) चालू करा. इंग्रजी तारखे ऐवजी आषाढी अमावास्येला म्हणायचे.. म्हणजे मिसळीबरोबर "सरकारमान्य.." दुकांनामधेही अजून जास्त रांगा लागतील. आणि हो, यात मात्र मोबाईल कंपन्यां काही फायदा करून घेऊ शकणार नाहीत !

'फ्रेंडशिप डे' पाहिजे हो !

तात्या,

मैत्री असु दे,नाही तर प्रेम,हे व्यक्त झालेच पाहिजे.काळच तसा आहे,त्या शिवाय
एकमेकांचे एकमेकांवर प्रेम आहे,असे वाटतच नाही.

अवांतर ;) मिसळपावच्या प्रगती मुळे आनंद वाटतो आहे.आज महाविद्यालयात विद्यार्थी,विद्यार्थींनींची
फ्रेंडशीप पट्टीची बांधाबांध जोरदार चाललेली होती.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हा हा हा!

"सेक्यूलर लोकांचे चातुर्मासातील व्रत वगैरे "
हा हा हा!!! अगदी झकास!!!

कृष्ण यात आलेला बघुन गम्मत वाटली! पण हे बाकी आहे की तो आद्य ज्याने नुस्तेच मित्र नाही तर मित्रमैत्रिणी एकत्रपणे असण समाजात आणले...

(हो ना? का अजून पण कोणी होता त्या आधी... एखादा राजा वगैरे..?)

वा अशी नवीन व्रते आली तर मग अजून सुट्ट्या!!!
वा आपल्याला तर आवडेल बॉ!

आपला
गुंडोपंत

मित्रमैत्रिणी

कृष्ण यात आलेला बघुन गम्मत वाटली! पण हे बाकी आहे की तो आद्य ज्याने नुस्तेच मित्र नाही तर मित्रमैत्रिणी एकत्रपणे असण समाजात आणले...

कृष्णाआधी कोणी असेल असे वाटत नाही. म्हणूनच त्याला संपूर्ण पुरूष म्हणतात. पण मी असेही ऐकले आहे की त्याच्या रासक्रीडा वगैरे जे काही प्रणायत्मक (अतिरंजीत) कथा आहेत (दे रे कान्हा चोळी लुगडीच्या धर्तीवरच्या) त्या म्हणे मध्ययुगातील (का त्याही आधीच्या) एका राजच्या म्हणण्यानुसार आणलेल्या आहेत. त्या निमित्ताने त्याला (राजाला) 'परमार्थाचा अर्थ जरा जास्त व्यापक करता आला'. मला त्या राजाचे नाव आठवत नाही, पण हे खरेच ऐकले होते आणि आता हा विषय निघाल्या मुळे ही गोष्ट (की इतिहास कोण जाणे) शोधायचा प्रयत्न करीन.

ऑल डेज

ऑल डेज आर अबाऊट मार्केटींग, मिडीया, मनी एन्ड् मेक पिपल स्पेन्ड देअर मनी इन धीस् न्यू इकॉनॉमी...

पण चांगलय, भारतात ज्याला त्याला मोबाईलचे वेड आहे, असे दिवस साजरे करायचा हौस आहे. आपण काय निमूटपणे मोबाईल कंपन्यांचे शेअरस् (समभाग) विकत घेणार. अजून काय करु शकतो? लोकांना शहाणपण शिकवलेले आवडत नाही तर आपण .....

काय हरकत आहे पण?

काय हरकत आहे पण असे डे साजरे करायला?

नाहीतर पोराने पोरीने आपल्या आवडत्या छावा / छावीला
विचारायचे तरी कसे हो कॉलेजातल्या?
नुसतेच बघत बसायचे की काय?

ही गोष्ट प्रसिद्धीला येते आहे कारण त्यात काही उपयोगीता आहे...
(हीच उपयोगीता अमेरीकेतल्या मुक्तपणामुळे 'तितकीशी आवश्यक' वाटत नसावी शिवाय सामाजिक संदर्भही बदलत असावेत - अनुभवींनी खुलासा करावा)
मला त्यात आत्ता तरी काही वावगे वाटत नाहीये.

आपला फ्रेंड
गुंडोपंत

खुलासा

काय हरकत आहे पण असे डे साजरे करायला?

हा विषय मी काही संस्कृतीरक्षक म्हणून वगैरे सुरू केला नाही. सध्याच्या विशेषकरून शाळा-कॉलेजमधील पिढीला यात मजा वाटत असेल तर, जो पर्यंत त्यात काही चुकीच्या गोष्टी येत नाहीत तो पर्यंत काहीच फरक पडत नाही.

एक नक्की वाटले की अमेरिकन काँग्रेस कधी काळी काहीतरी ठराव पास करते की जे अमेरिकन्सना पण माहीत नसतात आणि आपण मात्र ते एखादे "व्रत" करावे तसे पाळतो (म्हणून मी त्या अर्थाचे विधान केले होते) - अर्थात त्यातून एक गोष्ट जाणवते की आपल्या संस्कृतीत पिढ्यान् पिढ्या कुठलीतरी गोष्ट पाळण्याची न समजून घेता सवय लागलेली आहे - मग त्यासाठी कोणी चातुर्मास करील, शनीवार वगैरेचे उपवास करतील किंवा "ये सब झूट है," असे म्हणत कधी फ्रेंडशीप डे, तर कधी अजून कुठला तरी "हॉलमार्क" डे साजरा करतील. एका माकडाची टोपी पडली की सगळ्या माकडांच्या पडतात... का म्हणून विचार करायचा नाही. यात अगदी कुठल्या न कुठल्या गोष्टीत आपण सर्वच जण येतो असे मला प्रामाणीकपणे वाटते.

बाकी राहता-राहीला मुला-मुलींनी एकमेकांशी बोलण्याचा मुद्दा - तो बरोबर आहे. पण मला वाटते त्यासाठी काही एखाद्या डे ची गरज नाही. निदान आम्ही शाळा कॉलेजात असताना असे "डे" नव्हते पण त्यामुळे आमचे काही (भांडणा सहीत) संवाद अथवा मैत्री नव्हती असे झाले नाही. उलटे मी म्हणीन त्या मैत्री आजही टिकून आहेत.(सर्वसाधारणपणे) भिन्नलिंगी, समवयस्कर् व्यक्तीशी बोलताना प्रत्येक वेळेस "विचारण्यासाठी" बोलतोय असे डोक्यात न ठेवता बोलू शकलो तर मग खरी फ्रेंडशीप होऊ शकते.

वा!

.(सर्वसाधारणपणे) भिन्नलिंगी, समवयस्कर् व्यक्तीशी बोलताना प्रत्येक वेळेस "विचारण्यासाठी" बोलतोय असे डोक्यात न ठेवता बोलू शकलो तर मग खरी फ्रेंडशीप होऊ शकते.

वा! क्या बात है!
अगदी खरं आहे, मान्यही आहे, अनुभवही आहे!
पण सगळ्यांनाच हे जमतं असं नाही हे पण तितकेच खरे.
माझे अनेक दुर्दैवी 'अभियंते' मित्र आहेत ज्यांना आयुष्यात मैत्रिण कधी मिळालीच नाही.
काय करणार? त्या विभागात मुली यायच्याच नाहीत तेंव्हा.

(माझ्या वर जळायचे ते;) )

आपला
(मित्र नि मैत्रिणीं बरोबर धमाल केलेला!)
गुंडोपंत

भावनेचा धंदा

प्रत्येक भावनेचा उपयोग धंद्यासाठी उत्तमप्रकारे करून घेता येतो. कारण भावना ही बुद्धीशी निगडीत नसते.
त्यामुळे तिथे सारासार विचार मागे पडतो.
भावनेचा धंद्यात उपयोग -
१. वेगवेगळे डेज - माझ्या मुलाने काल हट्ट करून १५० रुपयांचे (२५ * ६ रुपये) फ्रेंडशिप बँड विकत आणले. आर्चीजने ठिकठिकाणी बॅनर्स लावली होती. भारतातील मध्यम / उच्च वर्गातील प्रत्येक मुलाने/मुलीने सरासरी ५ बँड विकत घेतले तर 'आर्चीज'ला किती फायदा झाला? काही विदा आहे का?
२. टी.व्ही. स्पर्धा - 'तुमच्या' राज्यातील गायक/गायिकेला मत द्या. समस प्रत्येकी ३ रुपये.
३. हॅरी पॉटर- तुझ्याकडे सातवे 'हॅलोज' नाही? तुझ्याकडे 'सेट' नाही?
४. यंत्रे, खडे, गुरू आणि देवदेवता
५. नेबर्स् एन्वी - ओवनर्स् प्राईड (टी.व्ही. कार, मोबाईल, फ्रीज... काहीही. यावर फक्त स्त्रियांची मक्तेदारी नाही.)
अशी अनेक उदाहरणे.
महत्त्वाचे म्हणजे 'हे आपल्याला मिळू शकत नाही' हा न्यूनगंड ग्राहकांच्या मनात उत्पन्न करण्याचा जाहिरातींचा प्रयत्न.

पूर्वी 'भावना ही मूक असते' अशी समजूत होती. आता 'भावना ही भूक असते' असे म्हणावे लागते.
पैसा मिळवण्यासाठी जग दिवसेंदिवस अधिकाधिक निर्लज्ज होत आहे, इतकेच वाटते.

पुर्वीपासूनच

पैसा मिळवण्यासाठी जग दिवसेंदिवस अधिकाधिक निर्लज्ज होत आहे

पुर्वीपासूनच जग पैसा मिळवण्यासाठी निर्लज्जच होते. या विषयी काहीच शंका नाही. विकणारे कधीच नीतीमान वगैरे नसतात. घोडा घास से दोस्ती करेगा तो खायेगा क्या?
विकणारे आहेत नि ते असणारच आहेत. हा त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे.

पण आपण किती मुर्खात निघायचे हे ज्याचे त्याने ठरवावे. जाहिराती विक्रीसाठी आहेत. त्या असणारच. पुर्वीही होत्या. या भावनांना आवाहन होतेच. पण तेंव्हा असे वाटायचे की हे आपल्यासाठी नाहीच. आता ते बदलले आहे. आपल्यासाठीही हे आहे ही भावना आली आहे. जिवनमान सुधारले आहे. या सुधारण्यात कुठेतरी जाहिरातींनीही हातभार लावलाय नाही का?
बाकी या नेबर्स एन्व्ही मध्ये काही काळ यात धावले की कुठे थांबायचे हे आपोआप कळतेच...
(नाहीच कळले तर क्रेडीटकार्ड वाले बिलासाठी घरी येवून निट समजावून सांगतातच ;) )

(बाकी रु.१५० म्हणजे बरेच झाले बरंका... त्याने आता त्याच्या खर्चासाठी एखादी पार्टटाइम नोकरी पाहिलेली बरी, असे माझे अत्यंत वैयक्तीक मत आहे.)

असं मला वाटतं बॉ!

आपला
गुंडोपंत

खरे आहे, पण..

आपले म्हणणे खरे आहे, पण अधिकाधिक शब्द महत्त्वाचा. संपर्क आंणि प्रसार माध्यमांच्या रेट्यामुळे भावनांचा हा बाजार फारच बकाल आणि उत्तान होत चालला आहे.

पण आपण किती मुर्खात निघायचे हे ज्याचे त्याने ठरवावे.....जिवनमान सुधारले आहे.

-एकदा भावना गुंतली की शहाणपणा उरतोच कोठे? आपले जीवनमान सुधारले आहे ही जाणीवच मुळात एक भावना आहे - अभिमान किंवा अहंगंडाची. तिला पोसण्यासाठी मॉलमध्ये जाणे गरजेचे बनवले जात आहे.

नाहीच कळले तर क्रेडीटकार्ड वाले बिलासाठी घरी येवून निट समजावून सांगतातच

-हा हा , आजकाल क्रेडिटकार्ड वालें (ले वर अनुस्वार) घरी येतें (ते वर अनुस्वार) असे ऐकून आहे. (फक्त ऐकून आहे.. अनुभव नाही. ;))

बाकी रु.१५० म्हणजे बरेच झाले बरंका

-खरं आहे. ज्याचं जळतं त्यालाच कळतं...:(

आणि नोकरीचं म्हणाल तर अजून लहान आहे पण जरा शिंगं फुटली की जातोय वाटतं कुठे फोन करायला.

पॉकेट मनी?

बद्दल आपलं काय मत आहे? आपण आपल्या मुलांना देता का?

ही खूप वाईट कल्पना नाहिये. पॉकेट मनी इतकाच असावा असे नाही, तो आपल्या ऐपतीप्रमाणे असावा. त्यामुळे लहान वयातच मुलांना त्यांचे बजेट आखायची सवय लागते. आपल्याला ऑगस्ट मध्ये फ्रेंडशिप बँड्स लागणार आहे हे लक्षात ठेवून ते आपल्या पैशांचे नियोजन करू शकतात.

अजून एक, आपल्यालाही वाटलं का की १५० रू जास्त झाले? मग आपण ते द्यायलाच नको होते! पण केवळ सध्या तो कमवत नाही म्हणून त्याला ज्या गोष्टीवर त्याला मनापासून खर्च करावा असे वाटत असेल (ते आपल्याला चूक वाटो वा बरोबर) त्याला नाही म्हणणे हे ही जरा जास्तच् होते.

सुटीतील छोट्या नोक-या वगैरे करायला योग्य वेळ येताच मुलांना प्रोत्साहन द्यायला हवे. म्हणजे 'पैशांची किंमत' कळायला लागेल. त्याहून लहान मुलांना घरातील कामे करायला लावून त्याचेच थोडेसे पैसे द्यावे. आपले काय मत?

मुलांचे संगोपन आणि संस्कार : सापेक्षता

फ्रेंडशिप डे वरची ही चर्चा आता पॉकेटमनी, मुलांचे संगोपन आणि संस्कार या दिशेने जात आहे असे दिसते.
आपापल्या रहाणीमान, पूर्वग्रह आणि विचारसरणीनुसार आपापली मते तयार होतात हे नमूद करावेसे वाटते.
पण हे सर्व सापेक्ष आहे असे मला वाटते.
१.आपल्या चर्चेत सहभागी झालेले सर्वजण महाराष्ट्रीय, सुशिक्षित, मध्यमवर्गीय असल्याने अशी मते व्यक्त होत आहेत.
किंबहुना, माझ्या मुलाला मी १५० रुपये फ्रेंडशिप बँड साठी दिले हे मला जास्त वाटले कारण मीही त्याच गटात मोडतो.याउलट मुलाच्याच वर्गात अख्ख्या वर्गाला फ्रेंडशिप बँड वाटणारीही मुले आहेत.त्यांनी खर्च केलेले पैसे जर एकत्र करून क्रायला दिले असते तर? वगैरे अस्सल मध्यमवर्गीय विचार मनात येतात. पण माझ्या या महान विचारांनी मुलाला हरीलाल झाल्यासारखे वाटेल काय? (मुलाची शाळा मध्यमवर्गीय आहे. वार्षिक फी- रुपये १२०००/- फक्त. होय, फक्तच. आय.सि.एस्.ई. च्या काही शाळा वर्षाला १,००,००० ते ५,००,००० रु. फी आकारतात!!!)
माझ्या मुलाने जेवढे बँड्स मित्रांना दिले त्याच्यापेक्षा जास्त त्याला परत मिळाले. (माझ्या मध्यमवर्गीय विचारसरणीनुसार मी त्याला सांगितले की हे जपून ठेव आणि पुढच्या वर्षी हेच मित्रांना बांध! कसें? (अनुनासिक) ) ;)
२.मुलांना 'पॉकेटमनी देणे' किंवा 'कामाचा मोबदला देणे' हे सारे राबवण्यासाठी एक विचारांची बैठक लागते. ती प्रत्येक कुटुंबास रुचेलच असे नाही. मी स्वतः असा ठराविक पॉकेटमनी देत नाही. आणि आपणच आपल्या मुलाला काम करण्यासाठी मोबदला द्यायचा आणि बाहेर 'लहान मुलांचे व्यावसायिक शोषण' याला विरोध करायचा हे पटत नाही.
३. आजकाल आय. आय. एम. , आय.आय.टी. , आय.एस्. बी. करून बाहेर पडलेल्या नव्या पदवीधरांना वार्षिक ५० लाख रुपये मिळू शकतात असे ऐकले आहे. (आय.एस्. बी. तून बाहेर पडलेल्या एका मुलीला एक कोटी रुपयांची कँपस ऑफर होती!!)
भारतातील कसबी नोकरदारांना (दहा वर्षे किंवा अधिक अनुभव) माझ्या अंदाजाप्रमाणे सात ते बारा लाख रुपये वार्षिक उत्पन्न असावे. तसेच जर नवरा-बायको दोघेही कमावते आणि तितक्याच उच्च पदावर असतील तर हे उत्पन्न दुप्पटही होऊ शकते. असे असले तरी 'जीवनमान' उंचावल्यामुळे घर विकत घेणे, त्याला सजवणे, कार विकत घेणे या 'कॉमन' गोष्टींवर बराच खर्च येतो. शिवाय ३३%+२% वगैरे आयकर भरल्यामुळे हे उत्पन्न कमी होते. तरीही ते कमी आहे असे नाही.
व्यावसायिकांचे उत्पन्न याच घरात असावे - किंबहूना जास्तच.
शिवाय (पुण्याबाहेर) महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर असे (महाराष्ट्रीय), सुशिक्षित, विचारी, मध्यमवर्गीय पालक किती प्रमाणात मिळतात?
त्यामुळे फ्रे.बँ. वरील १५० रुपये खर्च मला जास्त वाटला तरी इतरांना तो तसा वाटेलच याची खात्री नाही.
४.मुलांचा 'वाढदिवस' या नावाखाली एखादे गार्डन रेस्ट्रो बुक करून तिथे पार्टी ठेवायची हा प्रकार भलताच बोकाळला आहे. गेला बाजार, एखादा 'फंक्षण' हॉल तरी घेतला जातोच. यासाठी किमान १५ ते २० हजार रुपये खर्च येतो.
५. पाचशे रुपये ही रक्कम पुस्तकासाठी थोडीथोडकी नाही. (साधना मासिकाचा आठ खंडांचा लेखसंग्रह पाचशे रुपयात येतो.) हॅरी पॉटर( डेथली हॅलोज) सारखे पुस्तक ५५० रुपयांपासून ते ९४५ रुपयांपर्यंत मिळते. पूर्ण संच रू. ३५००/- पर्यंत आहे.
६. मुलाच्या वर्गात (सहावीत) अनेकांकडे मोबाईल आहेत. त्याची कार‍णे ते अनेक प्रकारे देतात.
७. युनिसेफ किंवा क्रायला वार्षिक ५००० रु. दिले तर एका मुलाचे वर्षभरचे शिक्षण होऊ शकते. ( हे अनुभवाने माहित आहे.)
त्यामुळे आज शालेय सहलीसाठी द्यावे लागणारे १५०० रु. ते ५००० रु. मला जास्त वाटतात.(माझ्या वैयक्तिक लहानपणी माझी गोव्याची अख्खी शालेय सहल ८० रुपये देऊन झाली होती.)

"तुझ्या फ्रेंडशिप बँडचे/हॅरी पॉटरचे/सहलीचे/वाढदिवसाचे/मोबाईलचे/चॉकलेटचे पैसे आपण एका मुलाला देऊ - त्याचे शिक्षण होईल " असे किती आईबाप आपल्या मुलाला सांगू शकतील?

मुलांचे लाड या-ना त्या स्वरूपात होतात. ते 'चांडे' लाड आहेत की नव्या जगाची जगरहाटी आहे, ते सापेक्ष आहे. नक्की कसे ठरवणार? कुणावरही प्रेम नुसते असून उपयोग नाही, ते दिसले पाहिजे - असाच या फादर,मदर,वूमन,फ्रेंडशिप, रोज-'डेज' चा संदेश नाही काय?
हाच नवा मनू आहे आणि आपणच जुनाट होत आहो असे राहून-राहून वाटते. आपणही 'हॅपी बर्थ डे/ ऍनिवर्सरी' म्हणतोच ना? हे सारे याच समाजात घडत आहे.(कदाचित पुण्यात घडत नसावे. ह. घ्या.) "आम्ही तरी असे काही करत नाही, बुवा!" असे म्हणणे सोपे असले तरी खरे असेलच असे नाही. मुळात बहुमताचा रेटाच इतका वाढला आहे की आपण कोणी वेगळे आहोत ही कल्पना मुलाच्या मनात भरवणे धोक्याचे वाटते. (मी एक अत्यंत सर्वसामान्य माणूस आहे आणि चारचौघांसारखा वागतो. 'डोंबिवली फास्ट्' चित्रपट उत्तम पण तसे जगणे नको.)

अमेरिका, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, इंग्लंड येथे रहाणार्‍या मध्यमवर्गीय मुलांपेक्षा भारतातील मध्यमवर्गीय मुलांचे जीवन फारच सुखाचे आहे.
त्यांना खर्चाची काळजी न करता शिकता येते. हॉटेलात बर्गर, सोडापॉप असले विकावे लागत नाही.
पण ही पाश्चात्यीकरणाची पहिली पायरी आहे. काही दिवसांनी , "सीसी बॉय, ही स्टेज विथ हिज पेरेंटस!" हे आपल्याकडे होणारच.

संगोपन आणि संस्कार याही गोष्टी आता 'समर व्हेकेशन समस्कारा अँड डेवेलपमेंट कँप' मध्ये मिळू लागल्याच आहेत.
किंमत फक्त - ५००० रु.

पुण्यातील किस्सा

फ्रेंडशिप डे चे काही माहिती नाही. फ्रेंडशिप बँडस् मात्र जोरात आहेत. सर्वत्र बँडस बांधून घेणारे तरूण/तरूणी, मुली /मुले दिसत आहेत.

आजच कँपात जायचा योग आला. मुलीला घेऊन गेले होते कारण तिला भावांना बांधायला राख्या घेऊन ठेवायच्या आहेत. जरी राखी पौर्णिमा तीन एक आठवड्यांनंतर असली तरी राखी एकाही मोठ्या दुकानात सापडली नाही. मॉलमधील तर नाहीच. नंतर एका शॉपिंग काँप्लेक्स मध्ये "प्रयत्न करून पहा" असे मॉलमधील एकाने सांगितले म्हणून तेथे गेले. तेव्हा समोरच्या एकाही स्त्रियांच्या म्हणून असलेल्या दुकानात नावालाही राखी ठेवलेली नव्हती. मग त्याच काँप्लेक्स मध्ये अनेकांनी कुठचेसे शॉपी म्हणून सांगितलेल्या एका दुकानाचा पत्ता आडव्या काढलेल्या गाळ्यांच्या मधून मधून शोधत गेले. तिथे राखीसारखे टांगलेले काही दिसले पण ते हे नवे फ्रेंडशिप धागे असावेत, कारण दुकानदाराने लगेच राखी नाही असे माना हलवून सांगितले. मग मी वैतागलेली पाहून एका मुलीने त्यातील एका मागच्या खबदाडात असलेले एक छोटे दुकान सांगितले. त्या एकमेव दुकानात शेवटी राखी मिळाली.

हा काळाचा महिमा. आमच्या वेळी राख्या होत्या (आमच्या आया आपापल्या भावांना राख्या त्यांच्या लहानपणी बांधत होत्या की नाही ते विचारले नाही) आता असे म्हणायचे की फ्रेंडशिप बँडस् आहेत. तसे पहायला गेल्यास या सर्व वरवरच्या गोष्टी आहेत. पण कसलाही विचार न करता बाहेरून आलेल्या बर्‍यावाईट गोष्टींचा चटकन स्विकार करणारी पिढी दिसली की ते मनाला फारसे आल्हाददायक वाटत नाही हेही तितकेच खरे.

फ्रेंडशिप डे

हे सगळे आर्थिक राजकरण पितळी तांब्या यांना सहमत.
[१५० जरा जास्तच झाले]

फ्रेडशिप डे

MAITREEचं नातंच नाजुक फुलासारख अलगद फुलणार
आणि एकदा फूलन आलं की ...... गंध देत झुलणार.......

पैशाचे महत्त्व

संपूर्ण चर्चा वाचली, वाचून असे वाटले की मुलांना पैशाचे महत्त्व कळण्याची गरज आहे.

फ्रेंडशीप डे हा आंतरराष्ट्रीय दिवस असावा का? याबाबत फारशी माहिती नाही परंतु तो अमेरिकन असावा असे वाटत नाही कारण ऑगस्टच्या सुरुवातीला अमेरिकेतील शाळा महाविद्यालये बंद असतात. वॅलेंटाईन डे, रोज डे आणि त्यानंतर हा मैत्रीदिन यांची भारतात चलती होण्याचे दिवस मात्र आहेत असे वाटते. एकंदरीतच भारताला आपण पौर्वात्य राहावे की पाश्चिमात्यांच्या एक पाऊल पुढे टाकावे याबाबत मनात संदेह आहे असे जाणवते.

पहिला मुद्दा मैत्रीचा घेतला तर 'तू माझा मित्र होतोस का?' असे म्हणून मैत्री होत असते आणि टिकत असते असे अभावाने होते. समान विचार, आचार, आवडीनिवडी, समान समाज यांतून माणसे एकमेकांच्या जवळ येतात. आपल्या मनातील भावना बोलून दाखवण्यासाठी वॅलेंटाईन डे, रोज डे, फ्रेंडशीप डे कामास येत असतील याबाबत दुमत नाहीच परंतु त्याचे इतके व्यावसायिकरण अपेक्षित आहे का? हा मुद्दा उरतोच. अमेरिकेत तसेही फारच कमी सण साजरे केले जातात. वाढदिवस, थँक्स गिविंग आणि ख्रिसमस सोडून एकमेकांना भेटवस्तू देण्यासाठी वॅलेंटाईन डे उरत असावा. मैत्री, प्रेम व्यक्त करण्यासाठी हा एक दिवस त्यांनाही पुरेसा असावा असे वाटते. आपल्याकडे आधीच सण-समारंभाची रेलचेल, त्यात हे दिवसेंदिवस वाढत जाणारे "डेज्" म्हणजे खिशाला भुर्दंड.

यांत जाहिरातदारांना सरसकट दोषी ठरवणे फारसे योग्य वाटत नाही. अर्थात, त्यांचा दोष नाही असे ही नाही, 'मागणी तसा पुरवठा' या तत्त्वाचे महत्त्व विसरून मागणी नसतानाही पुरवठा करण्यात जाहिरातदारांबरोबर पालकांचाही कल असतो. भारतातील अनेक सुशिक्षित दांपत्यांचे वार्षिक उत्पन्न १५ ते २० लाखांच्या घरात असल्याचे हल्लीच वाचनात आले. सदर कुटुंबात मुलांना हवे ते आणि नको ते ही पुरवण्याकडे पालकांचा कल दिसतो असे अनेकदा दिसून आले आहे. हे कदाचित,

  • आपल्याला लहानपणी जे मिळाले नाही ते आपल्या मुलांना त्यांच्या लहानपणी मिळावे या सद्भावनेतून येत असावे.
  • ओळखीच्या इतर मुलांकडे अमुक गोष्ट आहे, ती आपल्या मुलांकडेही असावी या ईर्ष्येतून येत असावे. किंवा
  • मला माझ्या मुलांसोबत वेळ घालवणे अशक्य आहे त्यामुळे पैशाने त्याची निकड पुरवतो या अपराधीपणाच्या भावनेतून येत असावे.

मोबाईलचे वेड हे एक असेच पराकोटीला पोहोचलेले वेड वाटते. मुंबई-पुण्यासारख्या ठिकाणी जेथे पावलोपावली सार्वजनिक टेलिफोन उपलब्ध आहेत तेथे कोवळ्या मुलांच्या हाती ८-१० हजारांचे सेलफोन्स देणार्‍या पालकांना काय म्हणावे? हॉलमार्क वगैरे अमेरिकेतही एक एक कार्ड किमान ३ ते ४ डॉ. च्या खाली विकत नाहीत. भारतात एकेका ग्रीटींग कार्डची किंमत नक्कीच शंभराच्या घरात असावी आणि फ्रेंडशीप बँडची २५-५० च्या घरात. दोन तीन वर्षांपूर्वी हाताला रंगीबेरंगी झिरमिळ्या लावून फिरणारी पोरे पाहिली होती. त्यावरून त्यांना किती रूपयांचे बँड्स मिळाले याची कल्पना येते.

फ्रेंडशीप डे, रोज डे यांचे फ्याड हे कुमारवयीन मुलांना नजरेसमोर ठेवून पसरवलेले दिसते. भारतात या वयाच्या मुलांना अद्यापही स्वावलंबन किंवा स्वतः पैसे कमवून खर्च करण्यावर पालक उद्युक्त करतात असे वाटत नाही. पालकांनी हे करण्यास सुरुवात करून पाहावी कदाचित पैशाचे महत्त्व* कळू लागल्यावर मुलांमध्ये ही फ्याडे कमी होण्याची शक्यता वाटते.

उदाहरण म्हणून एक साधी गोष्ट की वॅलेंटाईन डे ला आपल्या वर्ग मित्र-मैत्रिणींना कार्डे- गोळ्या वाटण्याची प्रथा अमेरिकन शाळांत असते. अशा गोष्टींचे बजेट आम्ही करतो. अशाच प्रकारे वाढदिवसांचे बजेटही ठरवलेले आहे. समजा कार्डे-गोळ्यांसाठी १० डॉ. खर्च करायचे असे ठरवले असेल आणि मुलीला हव्या असलेल्या गोळ्या आणि कार्डे १२ डॉ.ची होत असतील तर २ डॉ. तिच्या कमाईतून वजा होतात. तिची कमाई ही घरातील अतिरिक्त कामे (यांत तिचे कपाट लावणे, खोली साफ करणे अंतर्भूत नाही) जसे, गाडी धुवायला मदत करणे, खरेदीला मदत करणे, साफसफाई करणे, झाडांना पाणी घालणे इ. इ. यांतून होते. जेव्हा कष्टाने मिळालेले पैसे इतरांना कार्डे आणि गोळ्या वाटण्यात जातात असे लक्षात येते तेव्हा खर्चाला आपसूक लगाम बसतो.

* पैशाचे नको ते महत्त्व अमेरिकेला कळल्याने शिक्षणाला गौणत्व प्राप्त झाल्याचे दिसते, यांतही सुवर्णमध्य साधण्याचे काम पालकांना करता येणे सहज शक्य असते.

घरातल्या कमाचा मोबदला !!!??

बाकी चर्चा चांगलीच. आम्ही खर्च न करता करता येणारे डेज पाळतो :) (ह.घ्या.)

प्रियालीताई,
....तिची कमाई ही घरातील अतिरिक्त कामे (यांत तिचे कपाट लावणे, खोली साफ करणे अंतर्भूत नाही) जसे, गाडी धुवायला मदत करणे, खरेदीला मदत करणे, साफसफाई करणे, झाडांना पाणी घालणे इ. इ. यांतून होते. जेव्हा कष्टाने मिळालेले पैसे...
हे काही विशेष पटले नाही. घरातले कोठलेही काम आणि घरातल्यांचेच काय पण अगदी शेजार्‍यांचे काम सुद्धा स्वतःचा वेळ आणि पैसा खर्च करुन (गरज पडेल तेंव्हा) करायला मुलांना शिकवावे असे मला वाटते. त्याचे मुल्य काय करायचे !! मग समाजसेवेची बीजे पेरणे तर दूरच राहिल.
-- लिखाळ.
जय स्वावलंबन ! कष्ट करा ... कष्ट करा !!

हम्म

घरातले कोठलेही काम आणि घरातल्यांचेच काय पण अगदी शेजार्‍यांचे काम सुद्धा स्वतःचा वेळ आणि पैसा खर्च करुन (गरज पडेल तेंव्हा) करायला मुलांना शिकवावे असे मला वाटते. त्याचे मुल्य काय करायचे !!

प्रत्येक कामाचे मूल्य असते. तसेच, काही कामांचे मूल्य करणे योग्य नसते कारण ते कर्तव्य असते. स्वतःची कामे करणे हे कर्तव्य आहे परंतु गाडी धुणे, खरेदीला मदत करणे ही सध्या तिची कामे नाहीत. पॉकेटमनी किंवा अलावन्स हा फुकट मिळणार नाही हे सांगण्यासाठी ही केलेली सोय आहे. शेजार्‍यांचे काम फुकट करणे ही अमेरिकन सवय नाही. देश तसा वेश! :) तसेच गरज आणि चैन या वेगळ्या गोष्टी. सध्या ती या वयांत आहे की तिला बाहेरची कामे करता येणे शक्य नाही म्हणून घरातील वेगळी कामे केल्याचे पैसे मिळतात. आणखी काही वर्षांनी हेच पैसे शेजार्‍यांचे लॉन मोव करून, मुले सांभाळून (बेबी सिटींग) किंवा कुत्रे फिरवून मिळवता येतील. ही कामे अमेरिकेत फुकट होत नाहीत.

गोष्ट दुसरी, वडिलांचे घर म्हणजे उद्या माझे घर ही अमेरिकन धारणा नाही. वडिलांची गाडी म्हणजे माझी गाडी ही देखील नाही. भारतीयांनी पाश्चात्य विचारसरणी अवलंबताना या सर्वांचा विचार करणेही गरजेचे आहे. केवळ, मजा-मस्ती उचलणे, निस्तरायला पालक आहेतच ही वृत्ती भविष्यात महागच पडेल.

मग समाजसेवेची बीजे पेरणे तर दूरच राहिल.

समाजसेवेचे बीज वेगळ्या रितीने पेरले जाते. समाजाची सेवा आणि कामाचा मोबदला ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. गाडी धुणे ही समाजसेवा नाही ते काम आहे, शेजार्‍यांचा कुत्रा फिरवणे ही देखील समाजसेवा नाही ते काम आहे. परंतु आजारी व्यक्तीला दवाखान्यात नेणे किंवा एखाद्याला निकडीची गरज असता मदत करणे ही कामे नाहीत. उदा. पिशव्या उचलायला मदत, हात द्यायला मदत इ. इ.

समाजसेवा करण्याबाबत येथे मुलांना शाळेतच अनेक गोष्टी शिकवल्या जातात. यांत आपल्या समाजाची मदत करणे, मोठ्या मुलांनी लहान मुलांच्या शाळांत जाऊन मदत करणे, वृद्धाश्रमांत मदत करणे, ग्रंथालयांत मदत करणे इ. इ. अनेक गोष्टींचा समावेश असतो. खरे सांगायचे झाले तर आपण भारतीयच समाजाचे कोणतेही काम मोबदल्याशिवाय करायला कां कू करतो. भीतींवर ग्राफिटी आहे म्हणून आपल्या कॉलनीतील भींती पुसून काढणार्‍या कितीजणांना आपण ओळखतो? बहुतांश अमेरिकन समाज हा देश माझा आहे, ही संपत्ती माझी आहे, हा समाज माझा आहे हे समजून सेवा करत असतो*.

* या माझेपणाचा वेगळाच अर्थ विकास यांनी मागे सांगितला होता तो येथे आठवला. अपवाद सर्वत्रच असतात. :)

देश तसा वेश

देश तसा वेश हा भाग ठिकच.
पण घरातल्या कामांचा मोबदला हे काही पचत नाहिये. पण ही चर्चा येथे विषयांतर आहे. त्यामुळे खरडवहित बोलूया का?
--(कामसू :) लिखाळ.

जय स्वावलंबन ! कष्ट करा ... कष्ट करा !!

फ्रेंडशिप डे

"बाजार" शक्तींचे एक खेळ आहे अशाप्रकारचे डेज्, त्यात वहात आहेत पैसे वाले मुलं-मुली आणि ज्या आई-बापांकडे मुलाला खर्च करायला द्यायला पैसे नाहीत ती निम्न-मध्यम वर्गीय मुलं चुकीच्या वळणावर जायला लागले आहेत... पण गरिबाच्या मुलाला समजत नाही कि "पैसा आणि बुद्धि चे खोटे प्रदर्शन काही वेळच चालू शकते" आणि तो खड्ड्यात अडकतच जातो...
ह्या बद्दल एक छोटा सा व्यंग्य लिहिला आहे.... येथे पाहू शकता

http://sureshchiplunkar.blogspot.com

मोबदला, समाजसेवा वगैरे

प्रियालींच्या पैशाचे महत्व आणि आवडाबाईंनी पण त्याच धर्तीवर पॉकेटमनीवरून जे काही लिहीले आहे ते पटणारे आहे. मला देखील लिखाळ यांनी लिहील्याप्रमाणे घरातील कामासाठी मोबदला कसला असे येथे येण्या आधी वाटायचे. पण त्यात थोडासा सुवर्णमध्य असण्याची गरज असते.

कॉलेज संपेपर्यंत सर्वसाधारणपणे भारतातल्या (आणि अगदी बर्‍याचदा अमेरिकेतीलही) भारतीय कुटूंबात आई-वडील मुलांची काळजी घेतात त्यांना काही काम करावे लागत नाही. पण त्यामुळे मुलांना पैसा वापरण कळत कारण त्यात अक्कल नसते पण पैसा मिळवणे अथवा तो "मॅनेज" करणे बर्‍याचदा जमत नाही. भारतात तर आता गाड्यांचे प्रमाण वाढल्याने, चुकीच्या पद्धतीने अमेरिकन प्रभाव वाढल्याने तरूण मुले वाहावत जाऊ शकतात. एखद्या सलमानने गाडि ठोकल्याचे त्याच्या नावामुळे वाचतो पण तोच प्रकार इतरत्रही होत असतो...

हक्क आणि जबाबदारी या एका नाण्याच्या दोन बाजू असल्यासारख्या असतात. पण बर्‍याचदा पालक प्रियालींनी वर दिलेल्या कारणांमुळे (अपराधीपणाच्या भावनेने, की मी जास्त वेळ देऊ शकत नाही वगैरे) "जबाबदारी"च्या नावाखाली काही अंशी आंधळे प्रेम करतात तर मुलांना कालांतराने आई-वडीलांचे प्रेम/जबाबदारी हे त्यांचे हक्क वाटतात!

आता थोडे अमेरिकेतील मुलांविषयी आणि वास्तवीक मोठ्यांविषयीपण (जे "नॉर्मल" म्हणता येतील असे लहान-मोठे, सामान्य-असामान्य) ः ह्या देशात जसे पैशाचे महत्व जरा अती आहे. प्रत्येक गोष्टीला काहीना काहीतरी किंम्त लावली जाते. लहान मुलांना कामाचा मोबदला मिळतो. त्याच प्रमाणे समाजसेवा पण मनात रुजवली जाते. अगदी आमची मुलगी साडेतीन वर्षाची असताना ती ज्या प्रीस्कूल मधे जायची तिथेपण तीच्या वर्गला नर्सिंग होममधे वृद्धांना भेटायला, त्यांची करमणूक करायला नेले होते. तिथपासून ते अमेरिकन सणावारी सूपकिचन (आता काही भारतीय संस्थापण तसे "सेवा" प्रॉजेक्ट करतात) करून बेघर लोकांना देतात. अमेरिकन पिस कोअर मधून बरेच तरूण जगभर अप्रगत राष्ट्रात जाऊन १-२ वर्षे कामे करतात, परत येतात वकील, डॉक्टरकी, अभियांत्रीकी, आंतरार्ष्ट्रीय राजकारण यात शिकतात, सर्व अनुभव एक्त्र करून मोठे होतात.(गेल्याच आठवड्यात अशा पद्धतीतून वर आलेल्या एका एम आय टी च्या प्राध्यापिकेला भेटण्याचा योग आला होता).त्यात अर्थातच वेळ आणि संयम द्यावा लागतो. मग तसे दान करणे पार बिल गेटस पर्यंत जाते. आता भारतीयंनी पण "ईंडीकोअर" म्हणून संस्था काढली आहे आणि त्यातून तरूण तरूणी भारतात येऊन २-३ महीन्यांसाठी झोपडपटट्यांमधे, वनवासी भागात जाऊन कामे करतात. त्याकाळात ते कुठल्याही नातेवाईक, व्यक्तिगत प्रवास वगैरे काही करत नाहीत.

आपल्याकडे दुर्दैवाने १०वी, १२वी, पुढचे प्रवेश, मग जीआरई, किंवा एमबीए वगैरे असे चक्रातून शिकत जातो.असे काम कर्ण्यातून काय मिळणार, आपल्याला कोणीतरी फसवेल असे वेगवेगळे संशय घेत एकदा का "महाजनो येन गता स पंथः" करत २५शी पर्यंत सर्व शिक्षण संपले आणि कामाला लागलो की झाले आणी कौटूंबिक जिवन सूरू झाले की बच्चा खूष बच्चे के माँबाप खूष...

"सेवा" प्रॉजेक्ट

आता काही भारतीय संस्थापण तसे "सेवा" प्रॉजेक्ट करतात

बरोबर! आम्हीही गेलो होतो मागे एकदा. मुलांना एकदातरी सोबत नेऊन हा काय प्रकार आहे ते समजावून सांगावे असे वाटते. परिणाम खात्रीशीर.

थोडासा सहमत !

भारतीय परंपरेत कमी वयात स्वतः पैसे कमवावे,आणि त्यातले खर्च करावे ही कल्पनाच नाही. अगदी लग्न झाले ,आता तरी काही कमवून आण असे म्हणण्याची वेळ येते,तो पर्यंत पालकांचीच जवाबदारी त्याला पोसण्याची.आता मुले शिकता शिकता काम मिळवायचा प्रयत्न करतात, पण कमी शिक्षण आणि अनुभव नसल्यामुळे कमी पैशावर त्याचे आणि त्याच्या कुटुंबाचे समाधान होत नाही. त्यामुळे परवड ही पाचविला पुजलेली.त्यामुळे शिकत असतांना फ्रेंड्शीप ब्रॅड् साठी पालकांनी पैसे दिले तरी त्यात नवल वाटत नाही. मोबदल्या पेक्षा समाजसेवा या वृत्तीने काम,आणि घरातल्या कामाचा मोबदला हा विचार अजून रुजलेला नाही.असे वाटते
भारतातील अनेक सुशिक्षित दांपत्यांचे वार्षिक उत्पन्न १५ ते २० लाखांच्या घरात असल्याचे हल्लीच वाचनात आले.
२ ते ७ लाख वार्षिक उत्पन्न असावे,असे वाटते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नाही हो! :(

आकडा बरोबर आहे.

१० लाखापेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न तर कॉमन आहे. नवरा बायको मिळून १५-२० लाखही आहेत. (अर्थात, हे आकडे पुणे-मुंबई आणि बंगलोर येथील संगणकतज्ज्ञांच्या घरातील आहेत असे धरा, इतर क्षेत्रात एवढा पैसा नवराबायको डॉक्टर, वकिल किंवा व्यावसायिक असतील तरी मिळवतात.)

आकडा आणि मध्यमवर्गीय

एका प्राध्यापकाचा पगार नोकरीतील दहा वर्षानंतर ३० हजार होतो,नवरा बायकोचे मिळून ६०,मग तो पुणे-मुंबई आणि बंगलोर येथील असला तरी , दहा लाख होत नाहीत म्हणून म्हणालो,खाजगी कंपणीतील संगणक तज्ञ असेल किंवा मोठी कंपणी असेल तर त्यांचे माहित नाही.त्यांचे वार्षिक उत्पन्न जर १० लाखाचे पुढे असेल तर ते आमच्या दृष्टीने श्रीमंत,पण इतके जर वार्षिक उत्पन्न असेल तर त्याला १५० रुपये फ्रेंडशीप बँड साठी अगदी नगण्यच आहे.असे वाटते.

अवांतर ;) आम्ही इतक्या दिवस स्वतःला मध्यमवर्गीय समजून घेत होतो.पण आम्ही आता फारच गरीब वाटतोय :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पगाराबाबत

१० लाखापेक्षा अधिक उत्पन्न संगणक क्षेत्रात मिळते मात्र ते अर्थातच कॉमननाही.
साधारण प्रॉजेक्ट मॅनेजर व वरील पदावरील लोकांना १० लाखाच्या आसपास पगार मिळतो व प्रॉजेक्ट मॅनेजरचे प्रमाण कंपनीतील एकूण सेवकांच्या १५-२० टक्क्यांपेक्षा जास्त नसावे. (अंदाज)


शुद्धलेखनाच्या नियमांचे पालन केलेली आजानुकर्ण यांची माहितीपूर्ण अनुदिनी आता नवीन आकर्षक स्वरुपात. एकदा भेट देऊन शुद्धलेखनाची खात्री करा.

मिळून

१० लाख आणि १५ लाख दोघांचे मिळून पण माणूस ३५-४० ला आला की होणारच ना प्रोजेक्ट म्यानेजर. ;-) आणि तेव्हाच त्याला हट्ट करणारी मुलं असणार ना... अर्थात, हा काही अलिखित नियम नाही पण तरीही.

एक उदा म्हणून माझ्याच कुटुंबात अशी उदाहरणे आहेत, तीन कुटुंबे देते.

१. नवरा वय ३० वार्षिक पगार ११ लाख, बायको वय २६ वार्षिक पगार ७ लाख. दोघे इंजिनिअर
२. नवरा वय ३५ वार्षिक पगार सुमारे १५ लाख (आय आय एम्) बायको (एमबीए) पगार माहित नाही परंतु खाजगी क्षेत्रात नोकरी म्हणजे कल्पना करावी.
३. नवरा बायको दोघे एम डी.. उत्पन्न इतर दोन्ही दांपत्यापेक्षा जास्त.

मग ठीक

दोघे मिळून असतील तर मग ठीक आहे...

आय.आय.एम व तत्सम शिक्षण संस्थातील उदाहरणेही अपवादात्मक धरावीत असे वाटते.
किंबहुना आय.आय.एम सारखी उदाहरणे इकॉनॉमिक टाईम्स व इतर दैनिकांत पहिल्या पानावर वाचून आमदार. ढोले पाटील महाविद्यालयातून यमबीए झालेले म्यानेजरही तितक्याच पगाराची अपेक्षा करतात. ;)


शुद्धलेखनाच्या नियमांचे पालन केलेली आजानुकर्ण यांची माहितीपूर्ण अनुदिनी आता नवीन आकर्षक स्वरुपात. एकदा भेट देऊन शुद्धलेखनाची खात्री करा.

सहमत

१० लाखापेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न तर कॉमन आहे. नवरा बायको मिळून १५-२० लाखही आहेत.

खूपच कॉमन हो !! (पुण्यात राहते ना !!)

 
^ वर