सेन्सेक्स, ब्रोकरेज, पोर्टफोलिओ व सर्किट ब्रेकर्स

आजानुकर्ण यांनी येथे दिलेल्या माहितीपूर्ण प्रतिसादांचे संकलन करुन आजानुकर्ण यांनीच हा नवीन लेख इथे टाकला आहे.:) एकमेकांना प्रश्न विचारत भांडवली बाजाराबद्दल शिकूया.

सेन्सेक्स व इतर निर्देशांक
सेन्सेक्स हे सेन्सिटिव्ह इंडेक्स या शब्दप्रयोगाचे लघुरुप आहे. त्याचा मराठीतील अर्थ म्हणजे संवेदी निर्देशांक.
हा निर्देशांक भारतीय शेअर बाजारातील एक प्रमाणभूत निर्देशांक आहे.

आता निर्देशांक म्हणजे काय हे समजावण्यासाठी या निर्देशांकाचे काय काम आहे ते जाणून घ्या.

निर्देशांकाचे काम एकच आणि ते म्हणजे किंमतीमधील चढउतार सूचित करणे. मग जर एखादा निर्देशांक समभागाधारित असेल तर तो समभागांच्या किंमतीमधील चढउतार सूचित करतो. या उलट एखादा निर्देशांक बाँड्स वर आधारित असेल तर तो बाँडच्या किमतीमधील चढउतार सूचित करतो.

सेन्सेक्स हा निर्देशांक मुंबई बाजारातील समभागांच्या किंमतीमधील चढउतार सूचित करतो. जेव्हा आपण सेन्सेक्स वर गेला असे म्हणतो तेव्हा शेअरबाजारामधील शेअर्सच्या किमती वाढलेल्या असतात. समभागांच्या किमती या नेहमीच त्या कंपनीच्या भविष्यातील कामगिरीचे द्योतक असतात असे म्हटले जाते. त्यामुळे समभागाची वाढणारी किंमत म्हणजे कंपनीच्या भविष्यातील कामगिरीची खात्री असे समीकरण मांडले जाते. यावरुन सेन्सेक्स वाढतो तेव्हा एकंदर कंपन्यांच्या भविष्यातील कामगिरीबाबत बाजाराची खात्री आणि एकूण अर्थव्यवस्थेबाबत आशादायी चित्र आहे असे मानले जाते.

सेन्सेक्स म्हणजे ३० शेअर्स. होय! फक्त ३० शेअर्स तुम्हाला बाजाराची एकूण दिशा सांगतात.
तुम्ही म्हणाल केवळ ३० शेअर्स संपूर्ण बाजाराची दिशा कसे सांगतील?
तर त्याचं उत्तर पुढीलप्रमाणे.
हे शेअर्स हे बाजारातील सर्वाधिक उलाढाली होणारे शेअर्स असतात. मुंबई बाजारातील निम्म्याहून अधिक भांडवल हे या शेअर्समध्ये असते. शिवाय हे शेअर्स १३ हून अधिक सेक्टर्सचेही प्रतिनिधित्व करतात.

निर्देशांकातील शेअर्स निवडण्यासाठी साधारण मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे:
समभागामध्ये कामाच्या प्रत्येक दिवशी व्यवहार होणे आवश्यक आहे.
गेल्या एक वर्षात सरासरी उलाढालींच्या संख्येमध्ये तसेच व्यवहाराच्या किंमतीमध्ये (विक्री किंवा खरेदी) हा समभाग पहिल्या १५० कंपन्यांमध्ये असणे गरजेचे आहे.
मुंबई शेअर बाजारात हा समभाग व्यवहारासाठी किमान एक वर्षापूर्वी नोंदणी झालेला असावा.

याचप्रमाणे निफ्टी हा राष्ट्रीय शेअर बाजारातील निर्देशांक असून त्यामध्ये ५० समभागांच्या किमतीचे चढउतार निर्देशित होतात. नॅशनल + फिफ्टी = निफ्टी असे सूत्र आहे.

याच धर्तीवर
बीएसई १००, बीएसई ५०० असे सर्वसमावेशक निर्देशांक तर
बँकेक्स, बीएसई आयटी हे सेक्टोरल निर्देशांक आणि
मिडकॅप, स्मॉलकॅप निर्देशांक हे भांडवलावर आधारित निर्देशांक आहेत.

सेन्सेक्सविषयी अधिक माहिती येथे वाचता येईल.

भारतातील सेन्सेक्स व निफ्टी प्रमाणेच अमेरिकेतील डाऊ जोन्स इंडस्ट्रीयल ऍवरेज, जपानचा निक्की, हाँगकाँगचा हँग सेंग, सिंगापूरचा स्ट्रेट टाईम्स इंडेक्स, कोरीयाचा कोस्पी इंडेक्स ह्या लोकप्रिय निर्देशांकांवर लक्ष ठेवले जाते.

ब्रोकरेज
आपली व्यवहाराची क्षमता व तयारी यानुसार ब्रोकरेज आकारणी केली जाते. खरेदी केलेले शेअर्स तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी तुमच्या डीमॅट खात्यात हवे असतील (डिलिव्हरी) तर साधारण व्यवहाराच्या ०.५% ते ०.८% पर्यंत ब्रोकरेज द्यावे लागते. लिया-दिया प्रकाराच्या सट्टेबाजी व्यवहारामध्ये (ट्रेडिंग) एकूण किंमतीऐवजी "उक्ते" (लंपसम) ब्रोकरेज उदा. एका व्यवहाराला समजा ५ रुपये असे ब्रोकरेज आकारले जाते.
या क्षेत्रात नव्याने उतरलेल्या रिलायन्स मनी सारख्या कंपन्या जम बसवण्यासाठी २०० रुपये ब्रोकरेजमध्ये कितीही व्यवहार करा अशा पद्धतीच्या आकर्षक योजना आणतात.
किती ब्रोकरेज द्यायचे असा काही नियम नसला तरी वर उल्लेख केलेल्या डिलिवरी प्रकारामध्ये ब्रोकरेज + सेक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स मिळून १ टक्क्यापर्यंत खर्च अपेक्षित धरावा.

म्हणजे १०० रुपये व्यवहारावर (खरेदी किंवा विक्री) ब्रोकरेज + सेक्युरिटी टॅक्स + सर्विस टॅक्स असा १ रुपये खर्च होईल असे समजावे.

ऑनलाईन ब्रोकर्स उदा. आयसीआयसीआय डायरेक्ट, कोटक व शेरखान सारख्या कंपन्यांचे ब्रोकरेज हे थोडेसे जास्त असते. कारण तुम्हाला देण्यात येणारी व्यवहाराची सुलभता. याउलट कागदोपत्री व्यवहार करणार्‍या स्थानिक ब्रोकर्सचे ब्रोकरेज कमी असते.

पोर्टफोलिओ

आपला पोर्टफोलिओ बनवताना नेहमी दोन गोष्टींचा विचार करावा:
१. जोखीम घेण्याची क्षमता-ताकद (कपॅसिटी)
२. जोखीम सहन करण्याची तयारी (टॉलरन्स)

जोखीम घेण्याची क्षमता ही तुमच्या वयावर, तुम्ही कौटुंबिक, वैयक्तिक आयुष्यात पार पाडत असलेल्या जबाबदारीवर, तुमच्या आर्थिक आरोग्यावर अवलंबून असते तर जोखीम सहन करण्याची तयारी ही एक मानसिक वृत्ती आहे.
या दोन्हींच्या संयोगाचा तुमच्या पोर्टफोलिओवर अतिशय प्रभाव पडतो.
प्रत्येक व्यक्तीसाठी हे दोन गुणधर्म वेगळे असल्यामुळे एका व्यक्तीसाठी उत्तम असलेली गुंतवणूक ही दुसर्‍या व्यक्तीसाठी उत्तम असेलच असे नाही.

हे दोन्ही गुणधर्म जर तुमच्या बाजूने असतील उदा. जोखीम घेण्याची अधिक क्षमता व पैसे गेले तरी चालतील अशी मानसिक वृत्ती तर अधिक जोखीम व पर्यायाने अधिक परतावा देणार्‍या साधनांमध्ये गुंतवणूक करणे शक्य होते. याउलट असेल तर कमी जोखीम व त्यामुळे कमी परतावा देणार्‍या साधनांमध्ये गुंतवणूक करावी लागते.

तुम्ही अतिशय मुलभूत प्रश्न विचारल्यामुळे सावधानताचा इशारा म्हणून येथे एक गोष्ट ध्यानात ठेवणे आवश्यक आहे. अधिक जोखीम घेतल्यावर अधिक परतावा मिळतोच मिळतो असे नाही. अधिक जोखीम घेतल्यावर अधिक परतावा मिळण्याची शक्यता फक्त वाढते.

पोर्टफोलिओ तयार करताना वर दिलेला "क्षमता" हा गुणधर्म ज्या गोष्टींवर अवलंबून असतो त्याचा विचार करावा. जर तुम्ही अविवाहित, तरुण व आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असाल व पुढील काही वर्षे तरी शिल्लकीत टाकत असलेले पैसे वापरण्याची काहीही गरज नाही असे वाटत असेल तर समभाग किंवा त्यापेक्षा उत्तम म्हणजे समभागाधारित म्युच्युअल फंडांमध्ये अधिक गुंतवणूक करावी. याउलट जर पैशाची निकड नजीकच्या भविष्यात लागेल असे वाटत असेल तर बाँड/डेट आधारित म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करावी.

थेट समभागांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार असल्यास आधी कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक करणार आहात त्या क्षेत्राचा थोडासा अभ्यास करावा.
सध्या तेजीत असलेल्या क्षेत्रामधील वाईट कंपन्याही चांगला परतावा देतात तर सध्या साडेसाती असलेल्या क्षेत्रामधील अतिशय चांगल्या कंपन्या लाखाचे बारा हजार करु शकतात हे ध्यानात ठेवावे.
उदा. सध्या रुपया तेजीत असल्यामुळे डॉलरच्या विनिमयदरावर फायदा आधारित असलेल्या तंत्रज्ञान क्षेत्राचे बूच लागलेले आहे. त्यामुळे इन्फोसिस सदृश कंपन्या ह्या कितीही चांगल्या असल्या तरी क्षेत्राला चांगले दिवस नाहीत. याउलट क्यापिटल गुड्स, ऊर्जा क्षेत्राला सरकारी सवलती मिळत असल्यामुळे तसेच बांधकामे करणार्‍या क्षेत्रालाही चांगले दिवस असल्यामुळे ही क्षेत्रे चांगली आहेत. बांधकाम करणार्‍या क्षेत्रावर अवलंबून असेलेले सीमेंट क्षेत्रही चांगले वाटेल. मात्र सीमेंटच्या किमती नियंत्रित करण्याच्या सरकारच्या धरसोड धोरणामुळे तेथे काहीही होऊ शकते. साखरेचीही तशीच गत आहे. अशा प्रकारचा जुजबी अभ्यास प्रत्येक क्षेत्राबद्दल ठेवावा.

एकदा कोणती क्षेत्रे निवडायची हे ठरले की त्यात्या क्षेत्रामधील अग्रगण्य व फायदेशीर कंपन्या शोधून त्यांचा थोडासा अभ्यास करावा. गेल्या काही वर्षांमध्ये कंपन्यांनी किती फायदा कमावला आहे. पुढे कितपत फायदा कमावतील याबाबत त्यांची दिशा कशी आहे हे पहावे. एकाच क्षेत्रातील दोन कंपन्यांचे फायदे व शेअरची किंमत यांचे गुणोत्तर तपासून कोणती कंपनी घेण्यास स्वस्त आहे हे पहावे.

सर्किट ब्रेकर्स
सर्किट ब्रेकर्स हा सेबीने गुंतवणुकदारांचे पैसे वाचवण्यासाठी आणलेला उत्तम मार्ग आहे.
१७ मे २००४ चा काळदिवस आठवा. भाजपाचे सरकार पडल्यामुळे बाजारातील खेळाडुंनी मार्केट जोरदार सटकवले होते. किंवा परदेशी गुंतवणूकदारांनाही कर द्यावा लागेल अशी पुडी अर्थमंत्र्यानी सोडल्यामुळेही गेल्या वर्षी मार्केट आपटले होते. अशा प्रसंगी हे सर्किट ब्रेकर्स मदतीला येतात.

बाजारात प्रमुख घटक हा मनुष्य असल्यामुळे मनुष्यस्वभावाचे मुख्य पैलू - लोभ आणि भीती येथे पाहायला मिळतात. वर सांगितलेल्या प्रसंगांसारख्या घटना घडल्या की अर्थशास्त्राचे मूलभूत नियम विसरुन भावनांवर स्वार झालेले खेळाडू मग जोरदार खरेदी किंवा विक्री सुरु करतात आणि पर्यायाने बाजार भरमसाट वधारतो किंवा सपशेल आपटतो. अशा प्रसंगी थोडा वेळ व्यवहार बंद करुन शांत डोक्याने विचार करण्यातच शहाणपणा असतो हे सूत्र आहे. त्यामुळे अशी असाधारण वाढ किंवा घट दिसली की सर्किट ब्रेकर्स लागतात.

माझ्या माहितीप्रमाणे बाजारात दोन प्रकारचे सर्किट ब्रेकर्स आहेत.
१. संपूर्ण बाजार/सेन्सेक्स/निफ्टी सर्किट ब्रेकर
२. प्रत्येक शेअरचा सर्किट ब्रेकर

संपूर्ण बाजाराचा सर्किट ब्रेकर हा उपरोल्लिखित घटनांमध्ये वापरला गेला आहे. तो लागू होण्याचे नियम साधारणतः असे.
अ. निर्देशांकामध्ये १० टक्क्याची वाढ किंवा घट.
दुपारी १ वाजण्यापूर्वी झाल्यास : १ तास व्यवहार बंद
दुपारी १ ते २.३० मध्ये झाल्यास : अर्धा तास व्यवहार बंद
२.३० नंतर झाल्यास: : व्यवहार सुरु राहतात.

ब. निर्देशांकामध्ये १५ टक्क्याची वाढ किंवा घट.
दुपारी १ वाजण्यापूर्वी झाल्यास : २ तास व्यवहार बंद
दुपारी १ ते २.०० मध्ये झाल्यास : १ तास व्यवहार बंद
२.०० नंतर झाल्यास : व्यवहार दिवसभरासाठी बंद.

क. निर्देशांकामध्ये २० टक्क्याची वाढ किंवा घट.
दिवसभरात केव्हाही : व्यवहार दिवसभरासाठी बंद

२. प्रत्येक शेअरचा सर्किट ब्रेकर:
यामध्ये प्रत्येक शेअरच्या किमतीच्या चढ-उताराची मर्यादा निश्चित केली जाते. याला अपवाद म्हणजे सेन्सेक्स मध्ये अंतर्भूत असलेल्या ३० शेअर्सना व निफ्टीमधील ५० शेअर्सना कोणताही स्वतंत्र सर्किट ब्रेकर नाही. मात्र इतर सर्व शेअर्सना स्वतंत्र/वैयक्तिक सर्किट ब्रेकर आहे.

शेअरचा सर्किट ब्रेकर या प्रत्येक दिवशी बाजारामध्ये जाहीर केला जातो. साधारण २%, ५%, १०% २०% अशा प्रकारचे सर्किट ब्रेकर्स आहेत. शेअर बाजाराच्या अधिकृत संकेतस्थळांवर व्यवहाराच्या दिवशी प्रत्येक शेअरचा सर्किट ब्रेकर समजू शकतो.

हा व असे इतर माहितीपूर्ण लेख आजानुकर्ण यांच्या अनुदिनीवर पहावयास मिळतील.

लेखनविषय: दुवे:

Comments

उत्तम माहिती..

कर्णा, उत्तम माहिती दिली आहेस रे. औरभी लिख्खो!

एक सूचना - थेअरीपेक्षा प्रंक्टिकल माहिती देण्यावर अधिक भर द्यावास असे वाटते.

तात्या.

सही लेख

सेक्टरबद्दल माहिती मिळविणे महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात सिमेंट पडते आणि फर्टीलायझर वाढते वगैरे. या बद्दल जरा सविस्तर लिहिलेत तर उत्तम.

अभिजित...
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.

क्या बात है..

ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.

क्या बात है..

तात्या.

क्षण

तात्यानु आसा होता की नाय ते सांगा..:-))

अभिजित...
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.

छान , सोप् करुन सांगीतले आहेस

आता हाच विषय सगळे शंकानिरसन करत पूढे चालू ठेवुया.
जाणकार लोकांनी अजून वेगवेगळी कालसापेक्ष माहीती सांगावी.

माझ्या बाबतीत म्हणायचे तर डायरेक्ट ट्रेडींग, शेयर उलाढाल करणे अवघड (कारण तेवढे समजत नाही व हिंमत नाही )पण गुंतवणूकीचा हा मार्ग नक्कीच त्याज्य नाही. उलट (पुर्वीसारखे आर्कषक व्याजदर न राहील्यामुळे व महागाई ही पुढे अशीच रहाणारी आहे) ज्यांना शक्य आहे त्या सर्वांनी ह्या (स्टॉक मार्केट) साधनाचा उपयोग करावा.

मी मध्यम मार्ग म्हणून (लाँग टर्म) डायव्हर्सीफाईड इक्वीटी म्यूचूअल फंडात गुंतवणूक , एस-आय-पी (दर महीन्याला विशीष्ट् रक्कम) पध्दतीने करतो.

बिरूटेसर म्हणतात तसे लाखाचे बाराहजार होउ शकतात, तो अनुभव घेतला आहे, कोठारी पायोनीअरचा एक फंड १०,०००/ रु चा एकेकाळी ३००० झाला होता पण तोच फंड आज फ्रँकलीन इंडीया ऑपॉर्च्युनीटीज नावाने २८,७६३/- रु आहे. (उद्या खाली पण जाउ शकतो.) मुद्दा असा की खाली जाउ शकतो, वर पण येउ शकतो, आपण आपले आर्थिक नुकसान सोसायची ताकद आहे तितकीच गुंतवणूक करायची. तसेच आपले ध्येय साध्य झाले की विकून नफा घ्यायचा.

गुंतवणूक प्रकार , अभ्यास सगळे ठीक आहे पण "आपल्याला" योग्य वेळी विक्री (करून फायदा किंवा कमीतकमी नुकसान ) हा या सगळ्या प्रकारातील सर्वात महत्वाचा भाग मी मानतो.

एक महत्वाचा धडा

समभागाच्या प्रेमात पडू नये, भाव आपल्याला पाहिजे तितका वाढल्यावर लगेच विकून टाकावा असे वाटते. 'इतका सोन्यासारखा शेअर विकायचा कशाला' म्हणून कागदातल्या कागदातच कायम पैसे अडकवून ठेवणारी मंडळीही बर्‍यापैकी आहेत.

सापेक्ष..

समभागाच्या प्रेमात पडू नये, भाव आपल्याला पाहिजे तितका वाढल्यावर लगेच विकून टाकावा असे वाटते.

'आपल्याला पाहिजे तितका भाव' हे वाक्य सापेक्ष आहे.

'इतका सोन्यासारखा शेअर विकायचा कशाला' म्हणून कागदातल्या कागदातच कायम पैसे अडकवून ठेवणारी मंडळीही बर्‍यापैकी आहेत.

खरं आहे. अशा काही मंडळींमधे आम्हीही मोडतो. आमच्या भांडारातील काही समभागांकडे आम्ही 'इतका सोन्यासारखा शेअर विकायचा कशाला' याच भावनेने पाहतो/पाहिले आहे..

भेल, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ ईंडिया, ओएनजीसी, हिंडाल्को, स्टेट बँक, सेल हे त्यापकी काही शेअर्स!

उदा. भेल हा समभाग आम्ही १९९३/९४ च्या सुमारास अवघ्या ७० रुपायात खरेदी केला आहे. सेल ह्या कंपनीचे समभाग आम्ही आमच्या आठवणीप्रमाणे २००२-३ च्या सुमारास अवघ्या १२/१३ रुपायात खरेदी केले आहेत. हे समभाग आजही आमच्या ताब्यात असून तसेच त्यावर उत्तम परतावा मिळत असूनदेखील ते विकण्याचा आमचा को़णताही इरादा नाही! :)

असो, प्रत्येक व्यक्तिचे समभागांमधील गुंतवणुकविषयीचे विचार वेगवेगळे असू शकतात हेच खरे!

आपला,
(लाँग टर्म फंडामेन्टल ऍनालिस्ट) तात्या.

कसे?

लाँग टर्म फंडामेन्टल ऍनालिस्ट) तात्या.

लाँग टर्म फंडामेन्टल ऍनालिसिस कसे करावे? त्यासाठी लागणारी माहिती सामान्य गुंतवणुकदारासाठी कुठे उपलब्ध असते? आणि हा अभ्यास कुठल्या शेअर्सचा करायचा ते तरी कसं ठरवणार?

हे एफएनओ चं काही खरं नाही बघा !

अगदी बरोबर

अगदी बरोबर अनु

व्यापारात प्रेम-भावना याला थारा नसावा, फायदा हे एकच लक्ष असुद्या.

हेमंत

टेक्निकल की फंडामेंटल

या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. तात्या जरा लक्ष असू द्यावे. :)

१. टेक्निकल ऍनालिसिसः
टेक्निकल ऍनालिसीस या संकल्पनेचा उगम डाऊ थेअरी पासून झाला आहे असे मानण्यास हरकत नाही. डाऊ थेअरी केवळ एका वाक्यात स्पष्ट होईलः शेअरच्या किंमतीमध्ये शेअरचे सर्व गुणधर्म परावर्तित झालेले असतात. हे ते वाक्य. कंपनीचा होणारा फायदा/तोटा, कंपनीकडे असलेले काम, कंपनीच्या व्यवस्थापनाचा दर्जा हे महत्त्वाचे व इतर फुटकळ गुणधर्म शेअरची किंमत या एकाच गोष्टीमध्ये परावर्तित होतात असा एकंदर डाऊ बाबांचा सिद्धांत आहे.

शेअरच्या किंमतीमध्ये नजीकच्या भूतकाळात झालेल्या चढउतारांचे पॅटर्न्स यावरुन भविष्यात काय होईल याचा अंदाज बांधणे याला टेक्निकल ऍनालिसिस असे म्हणतात. अनेक सटोडिये टेक्निकल ऍनालिसिसचा वापर आपली पुढची चाल खेळण्यासाठी वापरतात.

टेक्निकल ऍनालिसिस हे अर्थातच सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी नाही. टेक्निकल ऍनालिसिसमध्ये अंतर्भूत असलेले स्टॉपलॉस, रेझिस्टन्स लेवल, सपोर्ट लेवल, ब्रेकआऊट असे शब्द एकदा तुम्ही बाजारात उतरलात की सारखे कानावर पडतील. मात्र शहाणपणा ठेवून याकडे दुर्लक्ष करणे श्रेयस्कर.

टेक्निकल ऍनालिसिसचा सर्वात मोठा दोष म्हणजे शेअरबाजाराचे जे मूलभूत तत्त्व आहे "कमी किंमतीत खरेदी करा व जास्त किंमतीत विका" या तत्त्वाला टेक्निकल ऍनालिसिस मध्ये स्थान नाही. टेक्निकल ऍनालिसिस मधून मिळणारे मार्गदर्शन हे साधारणपणे अमुकतमुक शेअरने भाव वाढून क्ष रु. ची पातळी ओलांडली की खरेदी करण्यास हरकत नाही. कारण क्ष ही आता नवीन सपोर्ट लेवल आहे. अशा प्रकारचे असते. या विश्लेषणाकडे व यावर आधारित टिप्सकडे लक्ष देऊ नये.

टेक्निकल ऍनालिसिसची एवढी तोंडओळख पुरेशी आहे.

२. फंडामेंटल ऍनालिसिसः
यामध्ये प्रामुख्याने खालील गोष्टींचा विचार करावा:
१. प्रति शेअर उपार्जन (अर्निंग पर शेअर)
२. वार्षिक फायदा व कमाई
३. कंपनी व्यवस्थापनाचा दर्जा
४. कंपनीचे क्षेत्रातील स्थान
५. बाजाराचा कल

फंडामेंटल ऍनालिसिस विषयी अधिक माहिती विस्ताराने देतो.

ही डोकेफोडच

टेक्निकल ऍनालिसिस म्हणजे डोकेफोडच आहे. तुमच म्हणणे बरोबरच आहे तिकडे लक्ष न देणे ईष्ट. फंडामेंटल ऍनालिसिसची अधिक माहिती जरूर लिहा.

याशिवाय शेअर विकताना आणि खरेदी करताना ते ट्प्याटप्याने विकावे किंव्हा घ्यावे असं म्हणतात ते कितपत योग्य आहे?

हेमंत

चांगली माहिती

अगदी सोप्या शब्दांत समजावलेली चांगली माहिती. दुसर्‍या चर्चेत प्रतिसाद आधीच वाचले होते पण येथील टेक्निकल अनॅलिसीस इ. आताच वाचले. अमेरिकन बाजार आणि व्यवहारांवरही असा लेख उपक्रमावरील 'बुल्स' ना लिहायला हरकत नसावी.

उत्तम लेख

अतिशय चांगली माहिती दिली आहे, धन्यवाद! या क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणार्‍या लोकांना कोणत्या व्यावहारिक अडचणी येऊ शकतात किंवा मुळात सुरुवात कुठून करायची याविषयी अधिक माहिती दिल्यास फार उपयोगी ठरेल असे वाटते. आणखी लेखांची प्रतीक्षा आहे.

अभिप्राय्

सुंदर लेख आहे

 
^ वर